-आशिष देवडे
90s आपल्या सर्वांनी जगलेला बॉलीवूड चा सुवर्णकाळ. हा तो काळ होता जेव्हा रोमँटिक सिनेमा, गाणी हा एक ट्रेंड सुरू होता. १९८८ मध्ये रिलीज झालेल्या ‘कयामत से कयामत तक’ ने पुन्हा एकदा कॉलेज च्या मुलामुलींना चित्रपटगृहाकडे खेचून आणलं होतं. तो सिनेमा, त्याच्या गाण्यांची जादू ओसरायच्या आधीच १९९० मध्ये आला ‘आशिकी’. प्रत्येक गाणं हिट. कुमार सानू, नदीम – श्रवण, अलका याग्निक हे या वर्षाने आपल्याला दिलेले हिरे आहेत. एका पिढीला या त्रयीने वेड लावलं आहे. आजही आपण जर कुमार सानू चे गाणे इंटरनेट वर सर्च केले तर लाखो लोकांनी ते गाणे सर्च केल्याचं आपल्याला दिसतं.
१९९२ मध्ये सोनू निगम च्या रूपाने अजून एक स्टार गायकाचं बॉलीवूड मध्ये पदार्पण झालं. “रफी की यादे” या अल्बम ने त्याला एक ओळख करून दिली. पण, त्याला स्टार केलं ते १९९५ मध्ये रिलीज झालेल्या बेवफा सनम या अल्बम ने.
“अच्छा सीला दिया तुने…” हे गाणं चित्रहार मधून सर्वात पहिल्यांदा दाखवण्यात आलं आणि लोक अक्षरशः सोनु निगम च्या आवाजाच्या प्रेमातच पडले. एका नॉन फिल्म अल्बम मधील गाण्यांना लोकांनी इतकं डोक्यावर घेण्याची ही पहिलीच वेळ होती. बेवफा सनम या अल्बम चा उल्लेख करणं हे सांगण्यासाठी आहे की, त्यावेळी लोक चांगल्या ट्युन्स ला पसंत करायचे, त्याचा सोर्स कोणताही असो. इंटरनेट चा इतका सहज वापर नसणाऱ्या त्या काळात लोक आपल्या आवडीच्या गाण्याची लिस्ट देऊन ऑडिओ कॅसेट रांग लावून भरून घ्यायचे.
१९९४ या वर्षात ‘1942 – A Love Story‘ हा आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेला शेवटचा सिनेमा सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. सिनेमा बॉक्स ऑफिस वर पडला होता. पण, ‘कुछ ना कहो..’ आणि ‘एक लडकी को देखा तो…’ या गाण्यांमुळे सिनेमाला प्रेक्षक मिळाले होते. त्याच वर्षात ‘हम आप के है कौन’ हा एका लग्नाची गोष्ट असलेला सुद्धा रिलीज झाला ज्यामध्ये प्रत्येक १५ मिनिटांनी एक गाणं आहे. ‘राम-लक्ष्मण’ या राजश्री प्रॉडक्शन च्या नेहमीच्या जोडीने तयार केलेल्या प्रत्येक गाण्यात एक गोडवा होता. गाणे हे संवादाप्रमाणे कथानक पुढे घेऊन जाणारे होते.
अजून एक कमालीची गोष्ट म्हणजे १९९४ मध्येच एका ठराविक प्रेक्षक वर्गाला गोविंदा च्या डान्स आणि राजबाबू मधील ‘अ आ ई…’ सारख्या गाणे सुद्धा तितकेच आवडत होते. आनंद-मिलिंद या जोडीने सुद्धा प्रेक्षकांची आवड योग्यपणे हेरली होती.
जतीन-ललित या संगीतकार जोडीने सुद्धा या दशकात कमाल केली होती. ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या बॉलीवूड च्या इतिहासातील सर्वात यशस्वी सिनेमाचं संगीत देण्याचं शिवधनुष्य त्यांनी लीलया पेललं होतं. अर्धा सिनेमा भारतात आणि अर्धा सिनेमा युरोप मध्ये शुट झालेल्या DDLJ मध्ये या जोडीने दिगदर्शकाला दोन्ही ठिकाणी योग्य वाटतील असे गाणे तयार करून दिले. “तुझे देखा तो ये जाना सनम…” हे गाणं बघताना दोन्ही देशातील दिसणारी शुटिंग आपल्याला कुठेच खटकत नाही. त्यासोबतच, “जरा सा झुम लू मै…” हे अगदीच तरुण आणि वेस्टर्न गाणं आहे, तर “मेहंदी लगा के रखना…” हे तितकंच पारंपारिक आणि भारतीय गाणं आहे. हा मिलाप साधणं यात संगीतकारांची खरी कसोटी असते.
जतीन-ललित यांची रेंज अफाट होती याचा प्रत्यय परत आला तो सरफरोश मधील ‘होश वालो को खबर क्या..’ ही गझल ऐकताना आणि तितकंच विरुद्ध गुलाम मधील ‘आती क्या खंडाला’ हे टपोरी गाणं ऐकल्यावर.
१९९५ मध्ये रिलीज बॉर्डर मधील अनु मलिक यांनी कंपोज केलेल्या “संदेसे आते है…” ने सर्वात लांब म्हणजेच १० मिनिटाचं गाणं तयार करण्याचा विक्रम केला. सोनु निगम आणि रुपकुमार राठोड यांनी एकत्र येऊन गायलेलं हे गाणं आजही लोकांच्या आवडत्या देशभक्तीपर गीतांपैकी एक आहे.
९० चं दशक हे खरंच जादुई होतं. एकीकडे देशशभक्तीपर गाणी हिट होत होती, तर दुसरीकडे रंगीला चे ए आर रहेमान यांनी कंपोज केलेली गाणी सुद्धा तेव्हा तितकीच लोकप्रिय झाली होती. ‘तन्हा तन्हा यहा पे जिना…’ ने लोकांना प्रेमात पडायला लावलं. म्युजिक डायरेक्टर हा सुद्धा त्या काळातील सिनेमाचा न दिसणारा ‘हिरो’ होता.
९० च्या दशकात लक्ष्मीकांत प्यारेलाल यांची रचना असलेलं ‘चोली के पिछे क्या है’ च्या तालावर सुद्धा लोकांनी ठेका धरला होता. भान विसरायला लावणारे गाणे हे ९० च्या दशकातच झाले हे मान्यच करावं लागेल. तेव्हा गाणे हा सिनेमा चा प्राण होता. फटाक्यांची जशी लड लागते तसे एकेक गाणे तयार होत होते आणि लोकांना वेड लावत होते.
नदीम-श्रवण ही जोडी या दशकात त्यांच्या करिअर च्या सर्वोच्च स्थानी होती. १९९६ मध्ये रिलीज झालेल्या ‘राजा हिंदुस्थानी’ मध्ये या जोडीने तयार केलेलं ‘परदेसी परदेसी जाना नही…’ हे गाणं इतकं हिट झालं की त्याने एका साधारण कथानक असलेल्या सिनेमाला त्या दशकातील तिसरा सर्वात जास्त कमाई करणारा सिनेमा होण्याचा मान मिळाला. गाणं बघण्यासाठी लोक सिनेमा त्या काळात रिपीट सुद्धा बघायचे.

१९९७ मध्ये उत्तम सिंग या संगीतकाराने ‘दिल तो पागल है’ सारख्या म्युजिकल सिनेमा ला संगीत देऊन एक नवीन लोकांना एक संगीत पर्वणी दिली. उत्तम सिंग यांचं जर का संगीत या सिनेमातून वजा केलं तर सिनेमा इतका मोठा हिट झाला नसता हे नक्की. उत्तम सिंग ने या सिनेमा साठी १५० ट्युन्स तयार केल्या होत्या अशी खबर होती.
९० चं दशक सरत असतांना ए आर रहेमान यांनी आपल्यला १९९८ मध्ये ‘दिल से’ च्या रुपात अजून एक ग्रेट ‘अल्बम’ दिला होता. ‘छईय्या छईय्या..’ ने प्रत्येकाला ठेका धरायला भाग पाडले होते. ‘ऐ अजनबी’ हे गाणं नेहमी साठीच ए आर रहेमान यांच्या प्रमुख गाण्यांपैकी एक असेल.

१९९८ मध्ये रिलीज झालेल्या ‘कुछ कुछ होता है’ मधील रोमँटिक गाणी जतीन-ललित या जोडीने खूप सहज वाटावीत अशी तयार केली. या सिनेमात कॉलेजची मैत्री आणि लग्न या दोन्ही काळाला साजेशी गाणी या जोडीने तयार केली आणि नवोदित दिगदर्शकाला एक मजबूत पाठबळ दिलं.
कितीही मोठी यादी केली तरी ही मेलडियस गाण्यांची यादी ही अपूर्णच असेल. संगीतकरांच्या या दशकातील त्यांचं योगदान हे भारतातील कित्येक नवोदित गायक, संगीतकार व्यक्तींना बॉलीवूड मध्ये करिअर करण्यासाठी एक आशा आणि कामाची संधी निर्माण करून देणारं होतं.
सिनेमाला प्रेक्षक मिळवून देणाऱ्या आणि आपल्या सर्वांना नेहमीसाठी ऐकता येतील असे गाणे तयार करणाऱ्या या सर्व संगीतकारांचे आभार मानावेत तितके कमी आहेत. या लोकांनी एक खजिना तयार करून ठेवला आहे, म्हणूनच आपण ‘बस बजना चाहीये गाना…’ हे हक्काने म्हणू शकतो.

