– आशिष देवडे

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक ट्विटर I इंस्टाग्राम

————————

मराठी चित्रपटसृष्टीला आणि आता मराठी OTT ला (Marathi OTT) सुद्धा हिंदी सिनेमा, OTT ला फॉलो करण्याची सवय नेहमीच स्पष्ट दिसून येते. मराठी मध्ये इतका चांगला कंटेंट असूनही आपले मराठी निर्माता, दिग्दर्शक हिंदी सादरीकरणाला इतकं महत्व का देतात ? हे खरंच अगम्य आहे. हे आज नाही तर अगदी लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ हे नायकाचे रोल करतांना सुद्धा आपण बघत आलो आहोत. हिंदी गाण्यांच्या चालीवर मराठी शब्द वापरून लोकांना हसवायचं. का ? दक्षिणेकडील सिनेमांनी त्यांच्या प्रादेशिक सिनेमांमध्ये असा कोणताच प्रयोग केलेला नाहीये. इथून पुढे तरी हे थांबेल या आशेवर असलेल्या मराठी प्रेक्षकाला OTT मध्ये सुद्धा हिंदी सारखं सादरीकरण दिसलं आणि तो काही अंशी नाराज झालाय हे नक्की. (Presence of Marathi Entertainment on OTT Platform as Compared to Hindi)

मराठी OTT इंडस्ट्री त्या मानाने सध्या अगदीच बाल्यावस्थेत आहे. MX प्लेयर वरील समांतर चे २ सिरीज आणि त्या आधी आलेलं “आणि काय हवंय ?” या दोनच वेबसिरीज सध्या तरी रिलीज झाले आहेत. सध्या फक्त MX प्लेयर हा OTT प्लॅटफॉर्म उपलब्ध असलेल्या मराठी इंडस्ट्री ला ‘प्लॅनेट मराठी’ हा एक नवीन प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला आहे ही मराठी प्रेक्षकांसाठी आनंदाची गोष्ट आहे. ‘प्लॅनेट मराठी’ वर सुरू होणाऱ्या ओरिजनल वेबसिरीज मुळे मरगळ आलेल्या मराठी कलासृष्टीत सर्वांमध्ये चैतन्याचं वातावरण निर्माण झालं आहे.

आजवर रिलीज झालेल्या वेबसिरीज पैकी समांतर च्या दुसऱ्या सिझन मध्ये हिंदी OTT सारख्या शिव्या, प्रणयदृश्य वापरण्यात आले आणि आपण पुन्हा त्याच वाटेवर जात आहोत हे स्पष्ट झालं आहे. आर्थिक गुंतवणूकीचा परतावा मिळण्याची शाश्वती नसल्याने निर्मात्यांनी कदाचित हा मार्ग अवलंबला असावा.

सध्या चांगलाच चर्चेत असलेल्या समांतर विषयी :

‘समांतर’ मुळे मराठी OTT ची दमदार सुरुवात झाली आहे असं म्हणता येईल. वेगवान कथानक, सर्व कलाकारांची प्रोफेशनल कामं यामुळे मराठी ने या ऑनलाईन जगाला ‘हम किसीं से कम नही’ हे दाखवून दिलं. समांतर १ या सिरीज चा फोकस हा पूर्णपणे कथानक आणि कंटेंट वर होता. मात्र ‘समांतर २’ ही सिरीज तयार करतांना मात्र निर्माता अरुण सिंघ बारन आणि दिगदर्शक समीर विध्वंस यांनी पूर्णपणे ‘कमर्शियल’ जॅकेट परिधान केला आणि आपल्या पारंपारिक प्रेक्षकांना निराश केलं हे नक्की.

मराठी प्रेक्षकांचं आपल्या कलाकारांवर, भाषेवर खूप प्रेम आहे. मागच्या काही वर्षात मराठी मालिकांना मिळालेलं वयवसायिक यश बघितलं तर हे लक्षात येतं की, लोकांना फक्त अशी कथा असावी लागते जी पूर्ण कुटुंब एकत्र बसून बघू शकेल. ‘समांतर २’ चं तर असं झालं की, मार्केटिंग खूप मोठ्या प्रमाणावर, अगदी जागोजागी होर्डिंग्ज लावून करण्यात आली. लोकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली. पण, रिव्यु असे आले की कुटुंबातील लोक ही सिरीज एकत्र बघणं तर सोडाच. पण, ही सिरीज बघितल्याचं एकमेकांना मोकळेपणाने सांगू देखील शकत नाहीत.

“आपलं कर्म हे आपलं नशीब घडवत असतं” आणि “काळाच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करू नकोस” किंवा “स्वतःच्या चुकलेल्या निर्णयांची जबाबदरी घ्या” यासारखे संदेश देणारे संवाद सुद्धा समांतर मध्ये आहेत हे क्वचितच लोक काही वर्षांनी लक्षात ठेवतील. त्यांचं कौतुक होणं तर फार मोठी गोष्ट आहे.

दहा वर्ष संसार केलेल्या एका दाम्पत्यावर जेव्हा एखादं संकट येतं तेव्हा ते दोघं जसे एकत्रितपणे त्या संकटाचा सामना करतात ते समांतर बघतांना कुठेच आपल्या सारखं वाटत नाही. मराठी प्रेक्षकाला गोष्टी या आजूबाजूला घडणाऱ्या वाटणं हे आवश्यक असतं. समांतर बघतांना आपण बघतो ते नवरा बायको मध्ये सर्रास दिल्या जाणाऱ्या शिव्या, एकमेकांच्या थोबाडीत मारणे हे त्याला कुठेच आपलं वाटलं नाही. सुशिक्षित मराठी दाम्पत्य हे एकमेकांचा आदर करणारे असतात. ते एकमेकांवर रागावत असतात, पण ते सुद्धा सभ्य भाषेतच. युपी, बिहार सारखी शैक्षणीक विषमता ही मराठी दाम्पत्यात नसते आणि त्यामुळे एकमेकांना मान दिला जातो, प्रसंगी घाबरलं जातं. समांतर लिहितांना लेखकाला या गोष्टीचा पूर्णपणे विसर पडल्याचं जाणवतं. किंवा कथा ही लेखकापेक्षा निर्मात्याने हिंदी प्रेक्षकांना डोळ्यासमोर ठेवून लिहिली आहे असं म्हणता येईल.

समांतर चं मार्केटिंग आणि व्यवसायिक यश :

डिजिटल माध्यम कितीही जाहिरात करत असलं तरीही ‘माऊथ / सोशल पब्लिसिटी’ हा प्रकार कोणत्याही कलाकृतीला एका वेगळया उंचीवर नेऊन ठेवत असतो. मराठी वेबसिरीज बद्दल जर का हा प्रकार झाला तर त्या टीम ला आणि पर्यायाने सध्या चाचपडणाऱ्या मराठी इंडस्ट्री ला जास्त फायदा होईल.

समांतर च्या बाबतीत सांगायचं तर असं झालं आहे की, एखाद्या उत्सवात जशी मूर्तीभोवती खूप सजावट केलेली असते, आणि ती सजावट काही वेळेस इतकी बटबटीत झालेली असते की ती मूर्तीच दिसत नाही. इथे मूर्ती म्हणजे समांतर चा मूळ विषय आहे. तो विषय स्ट्रॉंग असूनही सिरीज बघितल्यानंतर तो गाभा कुठे तरी हरवल्यासारखा वाटतो हे दुर्दैव आहे.

‘सिनेमॅटिक लिबर्टी’ हा प्रकार मराठी प्रेक्षक सुद्धा जाणतो. पण, त्यासाठी तो ‘काहीही’ पचवू शकत नाही. आणि म्हणून समांतर च्या यशाला कायम मर्यादा असतील हे नक्की. आर्थिकदृष्ट्या निर्माते, चॅनल यांना कितीतरी पटीने फायदाच होईल हे ही खरं. पण, यश म्हणजे केवळ हे आकडे नसतात. मनापासून एखादी कलाकृती आवडणे, ती चार लोकांना आवर्जून बघण्याची विनंती करणे हे एखाद्या कलाकृतीचं यश असतं. हे यश समांतर सारख्या बीभत्स सिरीज च्या वाटेला कधीच येणार नाही.

मराठी प्रेक्षकांना काय हवं असतं ?

चांगली कथा, लॉजीकली आणि आपल्या आजूबाजुला घडणाऱ्या वाटाव्यात अश्या घटना आणि तशी पात्रं. समांतर बघतांना ‘कुमार महाजन’ च्या नशीबासोबत सामान्य माणूस रिलेट करतो. पण, त्याला देण्यात आलेले संवाद, शिव्या या प्रेक्षकांना पटणारं नव्हतंच. एक चांगला विषय असूनही त्यामुळे समांतर आणि पर्यायाने मराठी OTT ला एक गालबोट लागलं आहे. अभिजात साहित्याची परंपरा लाभलेल्या आपल्या मराठी भाषेतील कथांना प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतांना कोणत्याही शिव्यांची गरज नाहीये हा विश्वास निर्माता, दिगदर्शक आणि कलाकारांना का वाटला नाही ? ही एक आश्चर्याची बाब आहे.

मराठी प्रेक्षकांनी बदलायची गरज आहे का ?

होय. काही प्रमाणात.

समांतर च्या ट्रोलिंग साठी त्याची टीम तर जबाबदार आहेच. पण, या ट्रोलिंग ला आपल्या अपेक्षा सुद्धा जबाबदार आहेत. मराठी प्रेक्षक हा असा आहे की, ज्याला हॉटेल मध्ये जाऊन नॉन-व्हेज खायचं असतं, मात्र घरी त्याला साधं वरण भात आणि तूप असावं अशीच त्याची अपेक्षा असते. या अपेक्षा थोड्या सैल झाल्या तर मराठीत चांगल्या कथा घेऊन नवीन प्रयोग होऊ शकतील, नवीन कलाकारांना कामाच्या संधी मिळतील.

वेबसिरीज मध्ये शिव्यांची गरज असते का ?

नियमाने नाही. ‘पंचायत राज’, ‘त्रिभंगा’ सारख्या वेबसिरीज जर का आपण बघितल्या तर लक्षात येतं की, हे माध्यम सुद्धा फक्त कंटेंट चं भुकेलं आहे. वेबसिरीज ही संकल्पना जेव्हा नवी होती तेव्हा लोकांना या माध्यमाकडे वळवण्यासाठी निर्मात्यांनी भडक दृश्यांचा, शिव्यांचा सहारा घेतला होता. पण, आजच्या प्रेक्षकाला तशी कोणतीच गरज नसते. निदान, मराठी प्रेक्षकांना नाहीच.

एक प्रेक्षक म्हणून येणाऱ्या काळात मराठी OTT ची दिशा कशी असावी ?

‘सैराट’ सारखं दैदिप्यमान यश मिळवल्या नंतर मराठी चित्रपट सृष्टी ला ते सातत्य टिकवता आलं नाही हे सगळेच मान्य करतील. समांतर नंतर येणाऱ्या मराठी वेबसिरीज ची अशी अवस्था होऊ नये असंच प्रत्येक मराठी रसिक प्रेक्षकाचं मत आहे यात शंकाच नाही. कथानक, कलाकार आणि सादरीकरण जर प्रभावशाली असेल तर तुम्हाला हिंदी वेबसिरीज सारख्या भडक दृश्य आणि शिव्यांच्या कुबड्या घेण्याची आपल्या मराठी वेबसिरीज ला गरज नाहीये हे नक्की.

मोठ्या पडद्यावर सिनेमा बघण्याची आवड असलेल्या मराठी प्रेक्षकांना इथून पुढे मराठी वेबसिरीज वर म्हणजेच दुधाची तहान ही ताकावर भागवावी लागणार हे स्पष्ट आहे. या ताकात मसाला सुद्धा असेलच हे ही मान्य. फक्त तो मसाला इतका असू नये की ताक उग्र लागेल याची वरिष्ठ कलाकारांनी सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे.

मनोरंजनाचे प्रचंड पर्याय उपलब्ध असलेल्या आजच्या काळात प्रेक्षकांना बांधून ठेवणे हे एक कसब कथेमध्ये असावं लागतं. ते कसब आपल्या मराठी कथांमध्ये आहेच. ती गोष्ट सांगतांना कोणत्याही अतिरंजित, बोल्ड सीन्स मुळे रंग चा बेरंग होऊ नये याकडे फक्त निर्मात्यांनी लक्ष द्यावं ही नम्र विनंती.

ओटीटी प्लॅटफॉर्म्स वरील ताज्या घडामोडींसाठी आणि लेखांसाठी क्लिक करा

Aashish Deode
+ posts

Leave a comment