– अजिंक्य उजळंबकर
————————
आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम
————————
90s Hindi Cinema and Music…Year-1991
वर्ष १९९१ म्हणजे एकदम खास. ९४ साली ज्यांची दहावी पूर्ण झाली त्या आमच्या बॅचचे ९१ हे हायस्कुल म्हणजेच ८ वीत प्रवेशाचे वर्ष. शाहरुखचे आगमन व्हायचे होते. दोन बाईक्स वर पाय ठेऊन उभे राहत अजयचे आगमन याच वर्षी झाले. सुपरस्टार अमिताभच्या कानात “तू आता ‘अकेला’ चालणार नाहीस, तुला कोणासोबत तरी ‘हम’ बनून यावे लागेल” असा आवाज काढणारे हेच ते वर्ष. बापाने मुलीच्या वयाच्या नायिकेसोबत घालविलेले रोमँटिक ‘लम्हे’ प्रेक्षकांनी नाकारलेले हेच ते वर्ष. ‘इलू इलू’ (सौदागर) करीत मनीषा, ‘आय लिव्ह फॉर यु’ (प्रेम कैदी) म्हणत करिष्मा आणि ‘कभी तू छलिया लगता है’ (पत्थर के फुल) असे गुणगुणत रवीना या तिघी पहिल्यांदा रुपेरी पडद्यावर अवतरल्या त्या याच वर्षी. महाराणी च्या रूपात तृतीयपंथी खलनायकाचा (सडक) प्रयोग ज्यावर्षी झाला तेही हेच वर्ष. शोमॅन राज कपूर यांनी पाहिलेले अखेरचे स्वप्न ज्या वर्षी पडद्यावर आले (हिना) तेही हेच वर्ष. आणि लास्ट बट नॉट लिस्ट ९० सालच्या ‘आशिकी’ नंतर ज्यांच्या सुपरहिट गाण्यांनी ९१ सालचा सर्वात मोठा हिट सिनेमा दिला असा ‘नदीम श्रवण’ संगीतकार जोडीचा ‘साजन’ सुद्धा याच वर्षीचा. बघा किती गाजले आमचे हायस्कुल चे पहिलेच वर्ष.
व्हीनस कॅसेट कंपनीसाठी हे वर्ष लॉटरीचे होते कारण यावर्षीचा हायेस्ट सेलिंग म्युझिक अल्बम ठरलेल्या ‘साजन’ ची गाणी व्हीनस कडे होती. कित्येक ठिकाणी ७५ आठवडे चाललेला ‘साजन’ हा सलमान, माधुरी आणि संजय दत्त या तिघांच्याही करिअर करता गेम चेंजर ठरला. संजय दत्त तर पहिल्यांदाच त्याच्या ऍक्शन हिरो इमेजच्या अगदी विरुद्ध एका कवीच्या भूमिकेत होता. आमिरने नकार दिल्यामुळे ही भूमिका संजयकडे चालून आली. सलमानने तर चित्रपटभर निव्वळ मुर्खासारखे एक्स्प्रेशन दिले आहेत यात. भाव खाऊन गेली माधुरी. अलका याग्निकच्या मधाळ आवाजातील ‘तू शायर है मै तेरी शायरी’ गाण्यातील तिचे दिलखेच नृत्य तर क्या कहने. ‘साजन’ सर्व अर्थाने एक कम्प्लिट अल्बम होता. ‘मेरा दिल भी कितना पागल है’, ‘बहोत प्यार करते है तुमको सनम’, ‘देखा है पहेली बार साजन की आँखों में प्यार’, ‘जिये तो जिये कैसे’ आणि ‘तुमसे मिलने की तमन्ना है’ अशी सर्वच गाणी रसिकांनी डोक्यावर घेतली होती. ९१ मध्ये, ‘साजन’चे एकूण बॉक्स-ऑफिस कलेक्शन रु. १५ कोटी होते, आज ज्याची किमत रु. १८० कोटीच्या आसपास होते.
‘साजन’ नंतर बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलेल्या चित्रपटांमध्ये ‘राम लखन’ नंतर आलेला दिग्दर्शक सुभाष घईंचा मॅग्नम ओपस ‘सौदागर’ ज्यात अभिनय सम्राट दिलीप कुमार आणि राज कुमार आमने सामने उभे होते, अमिताभ-गोविंदा-रजनीकांत त्रिकुटाचा, ‘अग्निपथ’ च्या दारुण अपयशानंतर दिग्दर्शक मुकुल आनंद दिग्दर्शित ‘हम’, नदीम श्रवण जोडीच्या सुपरहिट गाण्यांमुळे तरलेला अजय देवगण चा पहिला चित्रपट ‘फूल और कांटे’ आणि पुन्हा एकदा नदीम श्रवण जोडीच्याच सुपरहिट गाण्यांनी सजलेला दिग्दर्शक महेश भट्ट यांचा ‘सडक’. थोडक्यात ९१ हे वर्ष दुसऱ्या तिसऱ्या कुणाचे नव्हते तर ते होते फक्त आणि फक्त संगीतकार नदीम श्रवण यांचे!
गाणी सुपरहिट झाल्यानंतर कॅसेट कंपनी त्याच गाण्यांना झंकार बिट्स इफेक्ट्स देऊन नव्याने कॅसेट बाजारात आणण्याचा प्रघात यावर्षी सुरु झाला. ‘सडक’ हा अशा प्रकारच्या पहिल्या काही प्रयोगांपैकी एक होता. झंकार बिट्स मध्ये गाणी ऐकायला पण मजा यायची. याशिवाय या जोडीचे यावर्षी गाजलेले सिनेमे होते ‘दिल है के मानता नही’ आणि ‘साथी’. दोन्ही महेश भट्ट दिग्दर्शित. ‘डॅडी’ नंतर पूजा भट्ट ला मोठा ब्रेक देण्यात महेश भट्ट यशस्वी ठरले ते ‘दिल है के मानता नही’ द्वारे. राज कपूर यांच्या ‘चोरी चोरी’ सिनेमाची नक्कल म्हणजे हा सिनेमा होता. यातील आमिर खान ने रंगविलेला रघु अविस्मरणीय आहे. गाणी सुद्धा एकाहून एक. पण त्यातल्या त्यात शीर्षक गीतासोबतच ‘तू प्यार है किसी और का’, ‘अदाये भी है’, ‘हम तो मशहूर हुए है’ ही गाणी मेलडीने भरगच्च होती. संजय दत्त ने एकाच वर्षी ‘साजन’ मधील सोज्वळ कवी आणि ‘सडक’ मधील माथेफिरू तरुण या दोन अगदी विरुद्ध टोकाच्या भूमिका तितक्याच सहजतेने साकारल्या हे विशेष. पण गाण्यांसोबतच ‘सडक’ गाजला सदाशिव अमरापूर यांच्या महाराणी मुळे. अमरापूरकर सरांनी त्यावर्षीच्या फिल्मफेअर मध्ये ‘बेस्ट व्हिलन’ हा अवॉर्ड जिंकला. स्पर्धेत होते ‘हम’ मधील डॅनी चा बख्तावर, ‘सौदागर’ मधील अमरीश पुरी यांचा चुनिया मामा आणि ‘नरसिम्हा’ मधील ओम पुरी यांचा बापजी.
‘साथी’ जसा गाण्यासाठी गाजला तसा तो चर्चिला गेला अजून एका कारणासाठी. मराठी अभिनेत्रीचे हिंदी सिनेमात आगमन ही त्यावेळी मोठी घटना होती. वर्षा उसगावकर ने ‘साथी’ मधील जशी लीड हिरोईन साकारली तशीच अश्विनी भावे दिसली आरके फिल्म्स च्या ‘हिना’ मध्ये. अश्विनी भावे लीड मध्ये नव्हती पण तिची भूमिका महत्वाची होती. ‘मै देर करता नही देर हो जाती है’ म्हणत ऋषी कपूर सोबत ती छानच दिसली होती. संगीतकार रवींद्र जैन यांची ‘हिना’ मधील लता मंगेशकर यांच्या आवाजातील सर्वच गाणी मधुर आणि श्रवणीय होती. दुर्दैव हे की असे असूनही राज कपूर यांचे अखेरचे स्वप्न असलेल्या ‘हिना’ ला मात्र म्हणावे तसे यश लाभले नाही.
नदीम श्रवण जोडीप्रमाणेच आनंद मिलिंद या संगीतकार जोडीने सुद्धा यावर्षी मैदान गाजविले. अविनाश वाधवानचा ‘आई मिलन की रात’, सलमानचा आयेशा झुल्का सोबतचा ‘कुर्बान’ आणि रेवती सोबतचा ‘लव्ह’ आणि करिष्मा चा ‘प्रेमकैदी’ या आनंद मिलिंद जोडीच्या सर्वच सिनेमांची गाणी तरुणाईला खूपच आवडली होती. संगीतकार राम लक्ष्मण यांच्या दोन सिनेमांच्या गाण्यांनी सुद्धा यावर्षी प्रचंड लोकप्रियता मिळवली. ते होते ‘सून बेलिया शुक्रिया मेहरबानी’ म्हणत आलेला माधुरी-जॅकी जोडीचा ‘१०० डेज’ आणि ‘तुमसे जो देखते ही प्यार हुवा जिंदगी में पहेली बार हुवा’ गुणगुणत आलेला सलमान रविनाचा ‘पत्थर के फुल’. ‘जुम्मा चुम्मा दे दे’ या लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या गाण्याने तर यावर्षी कहर केला होता. ‘हम’ च्या यशामध्ये या गाण्याचा सिंहाचा वाटा होता. या गाण्याने नृत्य दिग्दर्शक चिन्नी प्रकाश यांना आणि अमिताभ बच्चन ला बेस्ट ऍक्टर म्हणून फिल्मफेअर मिळवून दिला. ‘मोरनी बागा मां बोले आधी रात मा’, ‘कभी मै कहूं कभी तुम कहो’, ‘ये लम्हे ये पल’, ‘मेरी बिंदिया’ ही संगीतकार शिव हरी यांची गाणी रसिक श्रोत्यांना आवडली खरी पण चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर मात्र वाचवू शकली नाहीत. श्रीदेवीने मात्र आपल्या कमाल अभिनयाने बेस्ट ऍक्ट्रेसचे फिल्मफेअर पटकावले.
यावर्षी फारसे उल्लेखनीय नसतांनाही ज्या सिनेमांच्या गाण्यांची चर्चा होती त्यात सलमान चा ‘सनम बेवफा’, आमिरचा ‘अफसाना प्यार का’, विवेक-मनीषा चा ‘फर्स्ट लव्ह लेटर’ इत्यादी.
एका महत्वाच्या सिनेमाचा उल्लेख अखेरीस केल्याशिवाय ९१ चा अध्याय पूर्ण होऊ शकत नाही. सिनेमा व्यावसायिक नव्हता पण त्याच्या संगीताने रसिकांवर गारुड केले होते जे आजही कायम आहे. तो म्हणजे संगीतकार ह्रदयनाथ मंगेशकरांचा गुलजार दिग्दर्शित ‘लेकिन’. नॅशनल फिल्म अवॉर्ड्स मध्ये तब्बल ५ पुरस्कार या सिनेमाने जिंकले ज्यात उत्कृष्ट संगीत दिग्दर्शक म्हणून हृदयनाथ आणि उत्कृष्ट गीतकार म्हणून गुलजार यांचा समावेश होता. ‘यारा सिली सिली बिरहा की रात का जलना’ म्हणत लतादीदींनी ९१ चा शेवट अवीट गोड केला होता आणि आमची बॅच ८ वीतून ९ वीत जायला तयार होत होती.
(क्रमशः… लवकरच पुढील लेख- साल १९९२)
९० च्या दशकाशी संबंधित इतर लेखांसाठी क्लिक करा.