-धनंजय कुलकर्णी;

(पी सावळाराम स्केच सौजन्य- श्रीकांत धोंगडे)

मराठी भावसंगीतातील एक लखलखतं नाव म्हणजे गीतकार पी सावळाराम (Lyricist P. Savalaram). पी सावळाराम म्हटलं की मनात त्यांच्या गीतांचा पाऊस सुरू होतो. ’गंगा जमुना डोळ्यात उभ्या का जा मुली जा दिल्या घरी तू सुखी रहा’, ’पंढरी नाथा झडकरी आता’, ’कल्पवृक्ष कन्येसाठी लावूनिया बाबा गेले’, ’सप्तपदी मी रोज चालते ’ , ’हृदयी जागा तू अनुरागा प्रीतीला या देशील का’ ’जिथे सागरा धरणी मिळते तिथे तुझी मी वाट पहाते’ अशी अजरामर अक्षय गाणी देणारे गीतकार पी सावळाराम आजही रसिकांच्या मनात घर करून आहेत. भावगीताच्या दुनियेत आपल्या लेखणीने आपलं आगळं आणि वेगळं स्थान निर्माण करणारा हा कलावंत कायम सामान्य जनांच्या भावनांना आपल्या गीतातून गुंफत होता. म्हणूनच कुसुमाग्रजांनी त्यांना जनकवी हि पदवी दिली. (Remembering One of the Most Popular Marathi Lyricist P. Savalaram) 

खरे तर सावळाराम हे काही त्यांचे पाळण्यातले नाव नाही. त्यांचे खरे नाव- निवृत्ती रावजी पाटील. जन्म त्यांच्या आजोळी ४ जुलै १९१४ गोटखिंडी या वाळवा तालुक्यातील गावी झाला. त्यांच मूळ गाव येडे निपाणी ! वि. स. पागे त्यांचे सहाध्यायी. त्यांनी ह. ना. आपटे यांच्या ‘उष:काल’ या कादंबरीतील सावळ्या तांडेल या पात्रावरून त्यांना प्रेमाने दिलेले ते नाव! सावळारामांनी ते आयुष्यभर स्वीकारले. १९५० साली विदर्भात आणखी एक सावळाराम नावाचे कलाकार होते. नावाची गल्लत नको म्हणून सावळाराम च्या आधी पाटील चे पी घेतले आणि बनले पी सावळाराम! (व्ही शांताराम, सी रामचंद्र या प्रमाणेच पी सावळाराम!)

१९४३ साली ते ठाण्यात आले आणि रेशनिंग खात्यात कामाला लागले. इथे ते फार काही रमले नाहीतच. १९४४ पासून गीत लेखनाला सुरूवात केली. आपल्या तरल, भावपूर्ण गीतांनी आणि समाजकार्याने त्यांनी महाराष्ट्रीय जनमानसात आदराचे स्थान निर्माण केले. पी. सावळाराम यांना ‘जनकवी’ ही उपाधी देताना कुसुमाग्रजांना नेमके काय अभिप्रेत होते, हे त्यांनी पुढील शब्दांमध्ये व्यक्त केले आहे.. ‘पी. सावळाराम त्यांच्या रसपूर्ण आणि भावगर्भ गीतांच्या द्वारा महाराष्ट्रातील असंख्य घरांपर्यंत- नव्हे, घरातल्या स्वयंपाकघरांपर्यंतही पोहोचले आहेत. खानदानी दिवाणखान्यापासून गोरगरीबांच्या ओटी-ओसरीपर्यंत सर्वत्र या नावाचा संचार झाला आहे. नागरवस्तीच्या वेशीवरच ते थांबले नाहीत. ग्रामीण भागातील झोपडय़ांत आणि चावडी-चव्हाटय़ावरही त्यांचे स्वागत झाले आहे. ’पी. सावळाराम यांची गीते अशी लोकमानसात त्यांचा ठेवा म्हणून स्थिरावली आहेत. संत ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम यांच्या अभंग व ओव्यांना हे भाग्य लाभले होते. अलीकडल्या काळात ग. दि. माडगूळकर यांच्या बरोबरीने कवी पी. सावळाराम यांना ते लाभले. या अर्थाने ते ‘जनकवी’ आहेत.

एखाद्या सम्राटाने जसा गरीबाच्या घरी  जन्म घ्यावा तसा  ’गंगा जमुना डोळ्यात उभ्या का’ या भावगीताचे झाले. दादर स्टेशनच्या जवळच्या एका लिबांच्या वखारीत, आजुबाजूला प्रचंड गोंधळ, गर्दी असताना या गीताची चाल बांधली गेली. ’कल्पवृक्ष कन्येसाठी लावूनिया बाबा गेला ’ हे गीत ऐकल्यावर लताच्या तोंडून हुंदका बाहेर आला! पन्नासच्या दशकात ’गदीमा-फडके-आशा’ अशी त्रयी असताना इकडे ’पी सावळाराम-वसंतप्रभू-लता’ ही दुसरी त्रयी देखील प्रचंड लोकप्रिय ठरली. वसंत प्रभू आणि पी सावळाराम या दोघातील द्वैत फार सुंदर आहे. पी सावळाराम यांनी अतिशय सोप्या अर्थवाही अशा शबदांचा आपल्या काव्यात वापर केला.

त्यांची गाणी ऐकताना त्यातील कुठल्याही शब्दाचा अर्थ कोषात शोधावा लागत नाही. या बाबतीत गदीमा त्यांचे आदर्श होते. आचार्य अत्रे या दोघांची गाणी ऐकून गोंधळून  ’अरे हे गाणे सावळ्याचे आहे की मावळयाचे आहे ? असे विचारायचे. ’सावळारामांनी बव्हंशी स्त्री गीतं लिहिली. त्यांच्या एकूण गीतांपैकी फक्त १०% गाणी पुरूष स्वरातली आहेत! ’मराठी रंगभूमीवर ’बालगंधर्व’ या महान पुरूषाने जशा  स्त्री भूमिका नटवल्या, रंगवल्या व आपल्या मधुर गळ्यातून नाट्यगीतांनी रसिक जनांना मोहिनी घातली. जवळजवळ तसाच प्रकार मराठी भावगीत विश्वात पी सावळाराम यांनी आपल्या अदभुत प्रतिभेने केला आहे. त्यांनी अपल्या ’परकाया प्रवेशा’च्या भूमिकेतून लिहिलेल्या अनेक स्त्रीगीत रूपी भावगीतांनी रसिकांना भुरळ पाडली. ’पी सावळाराम यांचे  सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील कार्यमहत्वाचे आहे. ठाणे शहराचे  नगराध्यक्ष पद त्यांनी भूषविले होते! 

हेही  वाचा – ऐ मालिक तेरे बंदे हम… प्रतिभासंपन्न संगीतकार वसंत देसाई

 पी सावळाराम टॉप २५ गाणी – 

१.  गंगा, जमुना डोळयात उभ्या का

२.  घट डोईवर, घट कंबरेवर

३.  आली हासत पहिली रात

४.  उठी गोविंदा उठी गोपाळा

५.  ओळख पाहिली गाली हसते

६.  जो आवडतो सर्वाना

७.  कल्पवृक्ष कन्येसाठी

८.  कोकीळ कुहू कुहू बोले

९.  गोड गोजिरी लाज लाजरी ताई तू होणार नवरी

१०. जिथे सागरा धरणी मिळते

११. तूच कर्ता आणि करवीता

१२. देव जरी मज कधी भेटला

१३. धागा धागा अखंड विणू या

१४. पंढरीनाथा झडकरी आता

१५. जो तो सांगे ज्याला त्याला

१६. प्रेमा काय देऊ तुला

१७. मानसीचा चित्रकार

१८. रघुनंदन आले आले

१९. राधा कृष्णावरी भाळली

२०. रिमझिम पाऊस पडे सारखा

२१. विठ्ठल तो आला आला

२२. विठ्ठला समचरण तुझे धरते

२२. ज्ञानदेव बाळ माझा

२३. रघुपती राघव गजरी गजरी

२४. हसले गं बाई हसले

२५. लेक लाडकी या घरची

           

Dhananjay Kulkarni
+ posts

Leave a comment