-आशिष देवडे

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक ट्विटर I इंस्टाग्राम

————————

30 Years of one of the finest and versatile Actress of Hindi Cinema, Kajol. काजोल ही आपल्या सर्वांचीच आवडती अभिनेत्री आहे. ९० च्या दशकात प्रदर्शित झालेल्या काजोलच्या सिनेमांची जादू आजही प्रेक्षकांच्या मनावर कायम आहे. अभिनेत्री म्हणून काजोलने मिळवलेलं यश हे विशेष  आहे. कारण, काजोलने सिनेसृष्टीत पाऊल ठेवेपर्यंत नायिका म्हणजे फक्त ‘गोरी’ मुलगी ही एक संकल्पना रूढ होती. अभिनय वगैरे सगळं नायक करतील, नायिका या केवळ त्यांच्यासोबत गाण्यात सुंदर दिसतील याची केवळ दिगदर्शक काळजी घ्यायचे. काजोलने मात्र हा पायंडा पूर्णपणे मोडीत काढला. १९९२ मध्ये तिने पदार्पण केलेला बेखुदी सिनेमा जरी बॉक्स ऑफिसवर अयशस्वी ठरला तरी तिने आपल्या रोल निवडण्याच्या पद्धतीत कोणतीच तडजोड केली नाही. यावर्षी आज असलेला तिचा वाढदिवस पण जरा स्पेशल आहे कारण काही दिवसांपूर्वीच तिने आपल्या कारकिर्दीची ३० वर्षे पूर्ण केली आहेत. होय, बेखुदी हा तिचा पहिला सिनेमा ३१ जुलै १९९२ रोजी प्रदर्शित झाला होता. 

१९९३ मध्ये जेव्हा “बाजीगर ओ बाजीगर” या गाण्यातून जेव्हा काजोल प्रेक्षकांसमोर आली तेव्हा ती तिच्या मूळ सावळ्या रंगातच होती. बाजीगरचं गाणं जेव्हा चित्रहार मधून दाखवलं जाऊ लागलं तेव्हा प्रेक्षक  शाहरुख खान सोबत ही कोण नवीन मुलगी आहे ? असे विचारायचे? ‘तनुजा’ची मुलगी आणि शोभना समर्थ यांची नात ही माहिती लोकांसमोर यायची. बाजीगर प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांना काजोल ही कोणी नवीन अभिनेत्री आहे असं वाटलंच नाही. दुसऱ्याच सिनेमाच्या मानाने तिच्यात असलेला आत्मविश्वास, स्पष्ट आवजात असलेली संवादफेक, चेहऱ्यावरील हावभाव हे प्रेक्षकांना प्रचंड भावले. काजोल वेगळी आहे, ती बॉलीवूडमध्ये लांबचा पल्ला गाठणार हे लोकांनी तेव्हाच हेरलं होतं. चित्रपट समीक्षकांनी काजोलच्या दिसण्यावर टीका केली होती. पण, त्याचा विशेष काही परिणाम झाला नाही.

बाजीगर सुपरहिट झाला. “ये काली काली आखे…” हे गाणं लोकांना प्रचंड आवडलं. पण, काजोलचा पुढचा प्रवास तितका सोपा नव्हता. १९९४ मध्ये प्रदर्शित झालेला ‘उधार की जिंदगी’ हा काजोलचा तिसरा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काहीच कमाल करू शकला नाही. यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला ‘यश चोप्रा’ यांच्या कंपूत समाविष्ट व्हावं लागतं हा जणू ९० च्या दशकाचा एक नियमच होता. काजोल सुद्धा त्यासाठी अपवाद नव्हती. अब्बास मस्तान यांच्या दिगदर्शनात काम केलेल्या बाजीगर नंतर तिचा यश चोप्रा यांच्या बॅनरमध्ये तयार झालेला ‘ये दिल्लगी’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला. काजोलची ओळख सिनेसृष्टीत या सिनेमानंतर झाली असं सांगितलं जातं.

काजोल आणि इतर नायिका किंवा नायक यांच्यात हा फरक आहे की, ती चोप्रा आणि पुढे जाऊन जोहर यांच्या कॅम्पमध्ये समाविष्ट झाली, पण तिने तिच्या कामाची, अभिनयाची पद्धती या बॅनरसाठी बदलली नाही. शाहरुख खान मधील अभिनेता जसा कॅम्पमध्ये काम करत असतांना लोप पावतांना आपण बघितला तसं काजोल बद्दल कधीच जाणवलं नाही. चोप्रा, जोहर यांनी आज सुरू केलेली ३ सिनेमांमध्ये काम करण्याची करार पद्धत त्यावेळी नव्हती हे देखील काजोलच्या ‘टाईपकास्ट’ न होण्याचं कारण म्हणता येईल.

१९९५ मध्ये बॉक्सऑफिसचे सर्व विक्रम मोडणाऱ्या ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ मधून काजोल आणि शाहरुख खान ही जोडी प्रेक्षकांसमोर परत एकत्र आली. युरोपियन लोकेशन्स, सुंदर गाणी आणि नवीन कथानक यामुळे हा सिनेमा प्रेक्षकांना प्रचंड आवडला आणि त्यानंतर काजोलने कधीच मागे वळून बघितलं नाही. हो, पण ते चोप्रा बॅनरमुळे नाही तर तिच्या चित्रपट निवडीमुळे आणि सार्थ अभिनयामुळे. त्याच वर्षी प्रदर्शित झालेला राकेश रोशन यांचं दिगदर्शन असलेला ‘करण अर्जुन’ सुद्धा करिअर ग्राफ उंचावणारा होता. दोन नायकांच्या पुनर्जन्मावर आधारित असलेली कथा असूनही त्यामध्ये काजोलने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. ” जाती हूं मै…” या गाण्यात काजोल आणि शाहरुखची जी केमेस्ट्री दिसली ती प्रेक्षकांना कित्येक वर्ष कोणत्याही जोडीत बघयाला मिळाली नव्हती.

काजोल ही एक सशक्त अभिनेत्री आहे हे एव्हाना प्रेक्षक, दिगदर्शक आणि निर्मात्यांना एव्हाना कळलं होतं. काजोलला केंद्रस्थानी ठेवून इथून पुढे रोल लिहिले जाऊ लागले. १९९७ मध्ये प्रदर्शित झालेला राजीव राय दिगदर्शक असलेले ‘गुप्त’ हा सिनेमा बघून समीक्षकांनी देखील हे मान्य केलं की,  गुप्त मधील नकारात्मक नायिकेची भूमिका ही काजोलशिवाय इतर कोणी करूच शकलं नसतं. बॉबी देओल आणि मनीषा कोईराला असूनही या सिनेमाची खरी नायिका ही काजोल ठरली. गुप्त प्रदर्शित होईपर्यंत बॉलीवूड सिनेमे  हे नायकाच्या जीवावरच चित्रपट गर्दी खेचतात असा एक समज होता. पण, गुप्त नंतर काजोलने हा समज खोडून काढला आणि एका नवीन ट्रेंडला सुरुवात केली ज्याचा आजच्या अभिनेत्रींना देखील नक्कीच फायदा होत आहे. काजोल ही त्या मोजक्या अभिनेत्रींपैकी एक आहे ज्यांना फिल्मफेअरने ‘सर्वोत्कृष्ट नकारात्मक भूमिका’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.

बॉक्स ऑफिसवर कमाई करणाऱ्या मसाला चित्रपटांसोबतच काजोलने ‘सपने’ सारखा एक गंभीर विषय असलेल्या चित्रपटात सुद्धा काम केलं होतं. आपण स्वतः एक डान्सर नाही आहोत हे माहीत असूनही तिने प्रभुदेवा सोबत काम करण्याचं आव्हान लीलया पेललं होतं. काजोलने या सिनेमात ‘नन’ होण्याची इच्छा असलेल्या एका मुलीची भूमिका साकारली होती. ‘सपने’ मधील “आवारा भवरे हो हॉले हॉले गाये…” हे गाणं आजही लोकांना प्रचंड आवडतं. अरविंद स्वामी आणि प्रभूदेवा सारखी तगडी स्टारकास्ट समोर असूनही काजोलने या सिनेमात दाक्षिणात्य प्रेक्षकांचं सुद्धा लक्ष वेधून घेतलं होतं. या सिनेमाला ४ राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.

१९९७ मध्ये इंद्र कुमार यांचं दिगदर्शन असलेला ‘इश्क’ हा सिनेमा देखील काजोलच्या करिअर मधील महत्वाचा सिनेमा मानला जातो. परफेक्शनिस्ट आमिर खान, सुंदर दिसणारी जुही चावला आणि अभिनेता म्हणून प्रस्थापित झालेल्या अजय देवगण अशी मोठी स्टारकास्ट असूनही ‘इश्क’ मध्ये काजोलने आपल्या भूमिकेसोबत कुठेच तडजोड केल्यासारखी वाटली नाही. श्रवणीय गाणे आणि साधी कथा असलेला हा सिनेमा प्रेक्षकांना आवडला आणि काजोलने हे परत एकदा सिद्ध केलं की, सिनेमा यशस्वी होण्यासाठी प्रत्येकवेळी तो चोप्रा, जोहर यासारख्या बॅनरखालीच तयार होणं हे गरजेचं नसतं.

१९९८ हे वर्ष काजोलचं होतं असं म्हंटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. कारण, या एकाच वर्षात  प्रदर्शित झालेले ‘प्यार किया तो डरना क्या’, ‘प्यार तो होना ही था’ आणि ‘कुछ कुछ होता है’ या काजोलच्या तिन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केली होती. बॅनर सलमान खानचं असो वा नवोदित निर्माता गोर्धन तनवाणी यांचं असो काजोलने दोन्ही सिनेमांमध्ये उत्तम काम केलं आणि सिनेमावर आपली छाप सोडली. ‘प्यार किया तो डरना क्या’ मधील सलमानचं शर्ट न घातलेलं गाणं लोकप्रिय झालं तितकंच काजोलने साकारलेल्या  ‘मुस्कान’चं सुद्धा कौतुक झालं होतं.

‘प्यार तो होना ही था’ हा अनिस बझमी यांचं दिगदर्शन असलेला सिनेमा पूर्णपणे ‘काजोल’चा सिनेमा होता हे समीक्षकांनी मान्य केलं होतं. या सिनेमात दिसलेली अजय देवगण सोबतची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली आणि या सिनेमाच्या यशानंतरच ही जोडी लग्नाच्या बेडीत सुद्धा अडकली.

‘कुछ कुछ होता है’ हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि तिथून काजोलच्या करिअरची किंवा एकूणच बॉलीवूडची समीकरणं बदलली असं मानलं जातं. करण जोहरने कथा सांगण्याची अशी काही पद्धत आणली की ज्यामुळे कलाकार, कथानक यापेक्षा जास्त महत्व हे चित्रीकरण करण्याचं लोकेशन, आखूड कपडे या गोष्टींना अधिक महत्व दिलं जाऊ लागलं. आपल्या ठराविक लोकांचा एक कॅम्प तयार करायचा, स्टार मंडळींच्या मुलांना काम द्यायचं आणि सिनेमाचा आत्मा असलेल्या कथेकडे लक्ष देण्यापेक्षा सिनेमा ‘लार्जर दॅन लाईफ’ कसा दिसेल हा एक ट्रेंड करण जोहरने बॉलीवूडमध्ये आणला आणि त्यामध्ये बरेच सेलिब्रिटी वाहून गेले. पण, काजोल तिथेही अपवाद होती.

९० च्या दशकात ‘भव्य’ सिनेमा तयार करण्याची पद्धत ही ‘संजय लीला भन्साली’ या दिगदर्शकाची  सुद्धा होती. पण, त्यांच्या सिनेमात हा फरक होता की, ते नेहमीच कथेतील पात्रांना जास्त महत्व द्यायचे आणि त्यामुळे कलाकारांचा अभिनय हा उठून दिसायचा. काजोल आणि संजय लीला भन्साली एकत्र यावेत अशी दोघांच्याही चाहत्यांना इच्छा असणार हे नक्की.

करण जोहरच्या कॅम्प मध्ये न अडकता काजोलने पुढचा सिनेमा महेश भट यांनी लिहिलेला आणि तनुजा चंद्रा यांचं दिगदर्शन असलेला ‘दुष्मन’ हा निवडला. आशुतोष राणा हे या सिनेमाचे व्हीलन होते. त्यांचा रोल जास्त भाव खाऊन जाईल हे लक्षात येऊनही काजोलने   या सिनेमात डबल रोल करण्याचं आव्हान पेललं आणि  केवळ आपल्या अभिनयाने तिने हा सिनेमा एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला. “आवाज दो हमको… हम खो गये” आणि “चिट्ठी ना कोई संदेस…” या सिनेमातील ही दोन्ही गाणी प्रेक्षकांना खूप आवडली आणि काजोलच्या नावावर अजून एका दर्जेदार सिनेमाची नोंद झाली. एका बलात्कार पीडित मुलीची भूमिका करतांना तिच्या चेहऱ्यावर दिसलेली भीती ही सर्वांनाच संवेदनशील करणारी होती. काजोलनेच साकारलेली तिची जुळी बहीण जेव्हा आशुतोष राणाला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा देते तेव्हा तीसुद्धा प्रेक्षकांना तितकीच खरी वाटली.

९० च्या दशकात लग्न झालेल्या नायिकांना पुन्हा सिनेमात काम मिळणं हे आजच्या इतकं सोपं नसायचं. काजोलने हा देखील ट्रेंड बदलला. १९९९ मध्ये लग्नानंतर तिचे ‘दिल क्या करे’, ‘हम आपके दिल मे रहेते है’ हे रोमँटिक सिनेमे प्रदर्शित झाले. यापैकी प्रकाश झा यांची कथा आणि दिगदर्शन असलेला ‘दिल क्या करे’ भारतीय प्रेक्षकांनी नाकारला. पण, परदेशात या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कमाल केली होती असं आकडे सांगतात.

सतीश कौशिक यांचं दिगदर्शन असलेला ‘हम आप के दिल मे रहेते है’ हा सिनेमा तेलगू सिनेमा ‘पवित्र बंधनम’चा रिमेक होता. अनिल कपूर आणि काजोल यांची जोडी या सिनेमात पहिल्यांदा प्रेक्षकांना दिसली आणि ती त्यांना आवडली. सिनेमाला संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या. पण, या सिनेमातील काजोलच्या भूमिकेचं सर्वांनीच कौतुक केलं.

२१ व्या शतकात काजोल करण जोहरच्या कभी खुशी कभी गम या सिनेमातून प्रेक्षकांसमोर आली. अमिताभ, शाहरुख, ह्रितीक रोशन सारखी तगडी स्टारकास्ट असतांनाही यामध्ये काजोलने साकारलेली आधी चांदनी चौक आणि नंतर लंडनमध्ये स्थायिक झालेली नायिका प्रत्येकाच्या लक्षात राहिली. कभी खुशी कभी गम च्या चित्रीकरणा दरम्यान काजोल गरोदर होती तरीही तिने शूटिंग मध्ये खंड पडू दिला नाहो याचं देखील खूप कौतुक झालं होतं.

२००६ मध्ये काजोलने आमिर खान सोबत आदित्य चोप्रा बॅनरच्या ‘फना’ मध्ये काम केलं. आमिर खान समोरची नायिका म्हणजे शोभेची बाहुली ही प्रतिमा तिने पूर्णपणे पुसून टाकली. “चांद सिफरीश जो करता तुम्हारी…” या गाण्यात एका अंध मुलीच्या भूमिकेत तिने चार चांद लावले आणि या सिनेमाचं यशस्वी होण्याचं श्रेय हे केवळ आमिर खानच्या नावे न जाता काजोलला देखील दिलं गेलं.

२०१० मध्ये काजोलने पुन्हा एकदा करण जोहरच्या दिगदर्शनात तयार झालेल्या ‘माय नेम इज खान’ मध्ये काम केलं. नायकाभोवती गुंफलेल्या या कथेत सुद्धा काजोलने आपला सशक्त अभिनय सादर करत प्रेक्षकांची मनं जिंकली. २०१५ मध्ये काजोलने रोहित शेट्टीचं दिगदर्शन असलेल्या ‘दिलवाले’ मधून ७ व्या वेळेस शाहरुख सोबत काम केलं. त्यानंतर २०१८ मध्ये काजोलने ‘हेलिकॉप्टर इला’ या प्रदीप सरकार यांच्या सिनेमात एका आईची भूमिका केली. एका गुजराती नाटकावर बेतलेला हा सिनेमा प्रेक्षकांनी केवळ काजोलमुळे बघितला.

२०२० मध्ये अजय देवगणच्या निर्मितीत तयार झालेल्या आणि ओम राऊत यांचं दिगदर्शन असलेल्या ‘तान्हाजी’ मधून काजोल प्रेक्षकांना परत एकदा दिसली. अजय देवगण आणि टीमने हा सिनेमा छानच तयार केला होता. सिनेमा जितका प्रेक्षकांच्या लक्षात राहीला तितकीच त्यात शेवटच्या फ्रेम मध्ये तयार होताना सुंदर दिसलेली काजोल प्रेक्षकांच्या लक्षात आहे. मोठ्या पडद्यावरील काजोलचा तो शेवटचा सिनेमा आहे. ती २०२१ मध्ये नेटफलिक्सवर प्रदर्शित झालेल्या रेणुका शहाणे यांचं दिगदर्शन असलेल्या ‘त्रिभंगा’ मधून प्रेक्षकांना भेटली. पण, तिला मोठ्या पडद्यावर बघण्यासाठी तिचे चाहते सध्या आतुर आहेत.

तुमच्यात टॅलेंट असेल तर ब्रँड, बॅनर यांच्या कृपेची तुम्हाला काहीच गरज नसते हे काजोलच्या यशस्वी कारकीर्दीकडे बघितलं की लगेच लक्षात येऊ शकतं. प्रस्थापित बॅनर मध्ये काम करावं, पण आपली कामाची पद्धत विसरू नये हे काजोलने नेहमीच दाखवून दिलं. आजच्या सर्व अभिनेत्री आणि अभिनेत्यांनी तिच्याकडून ही गोष्ट नक्कीच शिकायला पाहिजे. 

९० च्या दशकावर आधारित हिंदी चित्रपटांच्या इतर लेखांसाठी क्लिक करा

Aashish Deode
+ posts

Leave a comment