– मधू पोतदार 

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Asha Bhosle Marathi Songs with Music Director Ram Kadam. संगीतकार राम कदम आणि गायिका आशा भोसले यांचे संगीताच्या दुनियेत अतूट असे भावबंधन होते. अनेक गाणी ही आशा भोसले यांच्याकडूनच गायली जावी असा रामभाऊंचा अट्टाहास असे व त्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी असे. म्हणून रामभाऊंचे संगीत आणि आशाताईंचा आवाज यांच्यातून अवीट अशी असंख्य गाणी जन्माला आली.

asha bhosle sings for ram kadam

संगीतकार राम कदम! आपल्या सुरेल संगीताने मराठी रसिकांना अनेक वर्ष आनंद देणारे; आपल्या असंख्य लावण्यांनी त्यांना भुरळ पाडणारे, ‘प्रभात’ ची परंपरा टिकवणारे; लावणीचे लावण्य खुलवणारे, मराठी लोकसंगीताचं सारं वैभव आपल्या संगीतात आणून आपल्या अवघ्या संगीताला अस्सल ‘मराठी माती’ चा सुगंध देणारे संगीतकार म्हणजे राम कदम! आणि ‘तरूणाई’ जपणार्‍या, भारतातील मराठी शिवाय हिंदी, बंगाली, राजस्थानी, गुजराती, भोजपुरी, मगधी, मैथिली याा भाषांसह विदेशातील रशियन, झेक, इंग्रजी, नेपाळी अशा अनेक भाषातून सुमारे दहा हजारांच्यावर गाणी म्हणणार्‍या आशा भोसले! आपल्या आवाजातील चापल्य खळाळतेपण टिकवून पाण्यासारख्या पारदर्शकपणे कुठलंही गाणं गाणार्‍या, गळ्यातील वैविध्यातून गाण्याचे निरनिराळे भाव दाखवणार्‍या, अंगाईगीत, अभंगापासून ते गझल-लावणीपर्यंत सर्व गीत प्रकारात सुरांना सारख्याच लडिवाळपणे जोजवणार्‍या आशा भोसले म्हणजे स्वरसृष्टीला अलौकिक चमत्कार आहे. संगीतकार राम कदम यांच्याकडे आशाताईंनी गायलेल्या गीतांचा आढावा घेण्याचा या लेखात प्रयत्न आहे.

मराठी चित्रपट संगीतात स्वतःचे युग निर्माण करणारे दोनचं संगीतकार पहिलु सुधीर फडके व दुसरे राम कदम. आशा भोसले यांनी सर्वात जास्त गाणी (चित्रपट गीते) सुधीर फडके यांच्याकडे गायली. या गाण्यांची संख्या आहे 191. तर त्या खालोखाल संगीतकार राम कदम यांच्याकडे त्यांनी सुमारे 140 गाणी गायली आहेत. राम कदम स्वतंत्र संगीत द्यायला सुरूवात करण्यापूर्वी सुधीर फडके यांच्याकडे सहायक म्हणून काम करीत होते त्यामुळे राम कदमांच्या सुरूवातीच्या चित्रपटात फडक्यांकडील गायिका मालती पांडे, मोहनतारा तळपदे व मणिक वर्मा यांचेच आवाज आहेत. मात्र फिल्मिस्तानच्या ‘पडदा’ या चित्रपटापासून त्यांनी आशा भोसले यांचा आवाज घ्यायचं ठरवलं. रामभाऊंनी आशाताईंना भेटून तसं सांगितलं. आशाताईंनी रामभाऊंकडे गायलेलं पहिलं गाणं होतं – ‘वाटतो वाटतो आज जिवा उल्हास’.

या गाण्यातील वाटतो वाटतो या दोन शब्दांमध्ये आशाताई खळखळून इतक्या छान हसायच्या की त्या गाण्यामधला आनंददायी मूड बरोबर पकडला जायचा. या सर्व रिहर्सल्स फिल्मिस्तान स्टुडिओत चालत. आशाताई त्यावेळी फिल्मिस्तानच्याच ‘तुमसा नहीं देखा’ या चित्रपटासाठी ओ.पी. नय्यर यांच्याकडे गात होत्या. आशाताई या रामभाऊंच्या आवडत्या गायिका होत्या व त्यांची ओ.पी. नय्यरकडली सारीच गाणी रामभाऊंना फार आवडायची.

रामभाऊंनी चार चित्रपटांना संगीत देऊनही ते चित्रपट न गाजल्यामुळे रामभाऊंना हवी तशी प्रसिद्धी मिळत नव्हती, त्यांचं नाव झालं नव्हतं. त्यांना फारसे चित्रपटही मिळत नव्हते. बरेच दिवस चित्रपट न मिळाल्यामुळे त्यांनी परत संगीतकार वसंत पवार यांच्याकडे परत सहायक म्हणून काम करायचं ठरवलं. वसंत पवार यांच्या ‘सांगत्ये ऐका’ या चित्रपटासाठी राम कदम व राम किंकर हे दोघेही सहायक होते. ‘सांगत्ये ऐका’ ची गाणी तयार होत होती. गीतकार ग. दि. माडगूळकरांनी एक मस्त मुखड्याची भन्नाट लावणी लिहिली होती-

‘बुगडी माझी सांडली ग जाता सातार्‍याला
चुगली नका सांगू ग कुणी हिच्या म्हातार्‍याला’

माडगूळकरांनी ही लावणी लिहून संगीतकार वसंत पवारांकडे चालीसाठी दिली. वसंतरावांसारखा झटपट चाली लावणारा दुसरा संगीतकार त्या काळात नव्हता. पण या ‘बुगडी’ ने सुरूवातीला त्यांना चकवले. त्यांना ‘बुगडी’ ला चाल सुचेना. वसंतरावांच्या बाबतीत हे असं पहिल्यांदाच होत होतं. पण त्यांच्याच पठडीत तयार झालेले व त्यांना गुरू मानणारे त्यांचे मित्र व सहायक, संगीतकार राम कदम हे त्यावेळी दिग्दर्शक अनंत माने यांच्या विनंतीवरून आपल्या गुरूच्या मदतीला धावले. अनंत माने यांनी राम कदमांना, ‘तू या लावणीला चाल लाव’ अशी आज्ञाच केली. रामभाऊंपुढे हे एक मोठं आवाहन होतं. दिवसभर त्यांच्या डोक्यात लावणीच्या चालीलाच विचार होता. त्याच दिवशी कुणा वादकाचे वडील वारले म्हणून ते त्याच्या घरी गेले, त्याच्या घरची मंडळी रामभाऊंना ओळखत होती. त्यांना पाहताच एकदम कल्लोळ उठला. एखादं समूहगीत कोरसमध्ये म्हणावं तसं घरातल्या बायकांनी एकदम सूर लावला, ‘माझा त्यो बाबा रे ऽऽ कसा कुठं गेला रं ऽऽ, राम आण रं ऽऽ’ हा प्रकार बराच वेळ चालला होता. रामभाऊ घरी आले तरी त्यांच्या कानात मात्र ‘माझा त्यो बाबा रं ऽऽ’ चेच सूर घुमत होते. त्यांना एकदम आठवण झाली की आपल्याला ‘बुगडी’ च्या लावणीला चाल लावायची आहे. कानात घुमणार्‍या त्याच सुरांमध्ये रामभाऊंनी बुगडीची चाल बांधून टाकली आणि कैक वर्षे मराठी मनाला भुरळ पाडणारी, अवघ्या मराठी जनतेचा कलिजा खलास करणारी अप्रतिम लावणी जन्मालाा आली.

आशाताईंनी रिहर्सलच्या वेळी या लावणीला त्यांच्या कल्पनेतून आलेल्या ‘हाय’ ची जोड दिल्यामुळे त्या लावणीची लज्जत अधिक वाढली. या लावणीने इतिहास निर्माण केला. या लावणीचं ध्वनिमुद्रण झालं आणि रामभाऊंना ‘उद्यापासून कामावर येऊ नका’ असं सांगण्यात आलं. त्यांना चालीचे पाचशे रूपये मिळणार होते तेही दिले नाहीत. दुसर्‍या दिवशी आशाताई स्टुडिओत आल्या. ‘राम कुठे दिसत नाही?’ त्यांनी चौकशी केली. ‘त्याची तब्येत बरी नाही’ असं कुणीतरी सांगितलं. पण आशाताईंना झाल्या गोष्टीची कुणकुण लागली होती. रामभाऊंचा पत्ता कुणाला तरी विचारून आशाताई त्यांच्या घरी गेल्या. रामभाऊंची परिस्थिती त्यावेळी इतकी वाईट होती की घरात दूध सोडाच पण चहा पावडर आणि साखरही नव्हती. पण तरीही त्यांनी उसनं अवसान आणून त्यांनी विचारलं, ‘चहा घेणार की कॉफी?’आशाताई प्रापंचिक होत्या त्यांनी परिस्थिती ओळखली व म्हणाल्या, ‘काही नको, तूच संध्याकाळी मीना लॉजवर ये!’ जाताना रामभाऊंच्या आठ महिन्याच्या मुलीच्या बाळ मुठीतं शंभर रूपयाची नोट अडवायला त्या विसरल्या नाहीत. त्याक्षणी ते पैसे इतक्या मोलाचे होते की रामभाऊंना आशाताई साक्षात परमेश्‍वरच वाटली.

पुढे लवकरच रामभाऊंना दत्ता धर्माधिकारींचा ‘पतिव्रता’ हा शास्त्रीय गाणी असलेला चित्रपट मिळाला. या चित्रपटाचे संगीत म्हणजे रामभाऊंना एक प्रकारे आव्हानच होते. त्यांनी या चित्रपटाच्या संगीतासाठी अतिशय कष्ट घेतले. या चित्रपटात त्यांनी ‘ए री माई आज शुभमंगल गाओ’ ही बंदिश पं. भीमसेन जोशी व आशाताई यांच्या सुरात करून घ्यायचं ठरवलं. आशाताई त्यावेळी हिंदी चित्रपटात विशेषतः ओ.पी. नय्यर यांच्याकडे गाण्यात व्यस्त होत्या. हिंदीमधील त्यांच्या ‘करिअर’ ला चांगली गती आली होती. त्यामुळे रेकॉर्डिंगच्या दिवशी त्या म्हणाल्या, ‘रामभाऊ मी रेकॉर्डिंगला येऊ शकणार नाही!’ रामभाऊंचे धाबेच दणाणले. एकतर खूप दिवसांनी त्यांना चित्रपट मिळाला होता. मराठी गाण्यांचं रेकॉर्डिंग पुढं ढकलणं निर्मात्याला परवडत नाही. रामभाऊ गांगरून गेले. काय करावं त्यांना सुचेना. त्यांची ती अवस्था आशाताईंच्या लक्षात आली. त्याच मग त्यांच्या मदतीला धावून आल्या. त्यांनी लक्ष्मीशंकरचाा पत्ता दिला व म्हणाल्या, ‘‘रामभाऊ तुम्ही तिच्याकडून गाऊन घ्या!’’ पण त्यानंतर आशाताई रामभाऊंसाठी आवर्जून गात. ‘एक धागा सुखाचा’ या चित्रपटासाठी डोंबिवलीच्या मधुकर जोशी या प्रसिद्ध गीतकारांनी छान भावगीते लिहिली होती. ‘मी लता तू कल्पतरू’‘थंडगार ही हवा’ ही दोन्ही गाणी आशाताईंच्या आवाजात फार छान जमून गेली होती.

रामभाऊंचं संगीतकार म्हणून थोडफार नाव झालं ते ‘रंगपंचमी’ या चित्रपटामुळे! या चित्रपटातली माडगूळकरांची सारी गाणी रामभाऊंनी रागदरित केली होती. ही सारी गाणी आशाताईंनीच गाऊन मोठी बहार उडवून दिली होती. ‘आनंद आगळा हा’ ह्या गाण्याची चाला तरी इतकी आर्त होती की रेकॉर्डिंग संपलं तेव्हा आशाताईंच्या डोळ्यात पाणी आलं, त्या म्हणाल्या, ‘‘रामभाऊ मी या गाण्याचे पैसे घेणार नाही!’’ ‘अंगाई’ हा एक आगळ्या वेगळ्या कथेवरचा चित्रपट. त्यातली गावच्या पाण्यासाठी आपल्या अपत्याचा बळी देण्याची कल्पनाच मोठी भयानक वाटते. बळी जाणार्‍या मुलासाठी गीतकार जगदीश खेबूडकरांनी – ‘थांबव रडणे थांबव चाळा, उगी उगी लडिवाळा’ हे अंगाई गीत लिहिले होते. आशाताईंनी हे गीत इतकं समरसून म्हटलं होतं की चित्रपटगृहात ते ऐकताना समस्त स्त्री वर्ग अक्षरशः ढसाढसा रडत असे.

‘छंद प्रीतीचा’ या चित्रपटासाठी गीतकार पी. सावळाराम यांनी अत्यंत सरस अशी गाणी लिहिली होती. त्यातली ‘नयनांच्या महाली अहो सजणाया’ ही बैठकीची लावणी त्याचप्रमाणे ‘मूर्तिमंत भगवंत भेटला’ ही शास्त्रीय गाण्यावरील आधारित रचना ही दोन्ही गाणी आशाताईंनी गायली होती. ‘मूर्तिमंत भगवंत भेटला’ या गाण्यासाठी रामभाऊंनी 1968 सालचं ‘सूरसिंगार’ चं ‘बृहस्पती अ‍ॅवॉर्ड’ मिळालं होतं. हिंदी चित्रपट सृष्टीत ‘पंचम’ (संगीतकार आर. डी. बर्मन) यांचा उदय झाला होता. हिंदी गाण्यांचा ‘ट्रेंड’ बदलून टाकणार्‍या या संगीतकाराने सार्‍यांना सपाटून टाकलं होतं. त्याची सारी गाणी आशाताईच गात त्यामुळे 1970 नंतर आशाताईंची मराठी चित्रपटातली गाणी कमी झाली होती. त्यांना वेळच नव्हता.

रामभाऊंच्या ‘सोंगाड्या’ ची गाणी खूप गाजली. तेव्हापासून उषा मंगेशकर या जास्त करून त्यांची गाणी गाऊ लागल्या. ‘पिंजरा’ चं संगीत हा तर रामभाऊंच्या सांगितिक कारकिर्दीचा ‘कळसाध्याय’ होता. उषा मंगेशकरांनी गायलेली सारीच गाणी गाजली. त्या गाण्यांनी महाराष्ट्रभर धुमाकूळ घातला. उषाताईंनी ठसकेबाज आवाजात पिंजरातल्या सार्‍या लावण्यांचं सोनं केलं खरं पण एका मुलाखतीत त्यांनी म्हटलं होतं, ‘पिंजरा मधील लावण्यााांना आशाताईने माझ्यापेक्षा जास्त न्याय दिला असता!’ ‘पिंजरा’ तील लावण्या आशाताईंनी गायल्या असत्या तर काय झालं असतं? रामभाऊ यावर म्हणत, ‘हा एक अतिशय रम्य मनोहर असा कल्पनाविलास आहे!’

हिंदीत भरपूर काम आल्यामुळे आशाताईंनी मराठीत गाणी कमी केली खरी तरी पण काही विशेषश संगीतकारांसाठी त्या वेळ काढत त्यात मुख्य होते सुधीर फडके आणि राम कदम या दोघांचाही काही गाण्यांसाठी आशाताईंचाच आग्रह असे. 1974 साली रामभाऊंनी त्यांचे मित्र बाबासाहेब फतेलाल व यासीनभाई फतेलाल यांच्यासह ‘सुंगधी कट्टा’ या चित्रपटाची निर्मिती केली. रामभाऊंच्या मनात या चित्रपटातली सर्व गाणी आशाताईंनी गावी असं होतं. रामभाऊंनी आशाताईंना हे सांगितलं तेव्हा त्या गायल्या पण त्यांनी रामभाऊंना एक अट घातली. त्या रामभाऊंना म्हणाल्या, ‘माझा भाऊ चित्रपटसृष्टीत निर्माता होतोय. मी गाण्यांचा एकही पैसा घेणार नाही!’ ‘सुंगधी कट्टा’ तली आशाताईंची सारी गाणी गाजली. चित्रपटालाही खूप यश मिळालं. रामभाऊ म्हणाले, ‘सुगंधी कट्टाला आशाताईंचा आशीर्वाद लाभल्यावर त्याला यश न देण्याची दैवाची सुद्धा शामत नव्हती!’

‘पानिपतकार’ विश्‍वास पाटील यांनी ‘जन्मठेप’ या महत्वाकांक्षी चित्रपटाची निर्मिती केली होती. आशाताईंनी गाणी गायलेला रामभाऊंचा हा शेवटचा चित्रपट. यातलं ‘जव्वा तव्वा वाजविता पव्वा’ हे दस्तुरखुद्द विश्‍वास पाटील यांचं अतिशय सुंदर गीत आशाताईंच्या कंठातून ऐकतांना फार छान वाटतं. त्यातल्या ‘नेसून शालू हिरवा हिरवा मला चांदण्यात फिरवा फिरवा, चांदणं फुंकून दिवा लावा, पिरतीचा मेवा हा हळूहळू खावा’ या ओळी गातांना तर आशाताई एवढ्या गुंग झाल्या होत्या की जाणकार रसिकांना क्षणभर आशाताई ‘ओ.पी. नय्यर’ गात आहेत असा भास व्हावा! याशिवाय ‘जन्मठेप’ मधली शाहीरलहरी हैदर यांचं ‘गोरी गोरी पान, लैल्हान भीती वाटते’ हे गीत त्याचप्रमाणे कवी संजीव यांनी लिहिलेली नयन, शराबी, ‘माझा गाल गुलाबाचा’‘लावा ग बाई लावा हळद अंगाला’ ही दोन्ही गाणी आशाताईंच्या कंठातून उतरली होती.

असा हा आशाताईंच्या गाण्यांचा राम कदम यांच्या संगीतातील प्रवास. राम कदम यांच्या 1951 (गावगुंड) ते 1996 (पैंजण) अशा प्रदीर्घ 45 वर्षाच्या कारकिर्दीतील 113 चित्रपटांपैकी सुमारे 45 चित्रपटात आशाताईंनी सुमारे 140 गाणी गायली होती.
रामभाऊंनी चित्रपटातून ‘लावणीचा रंगमहाल’ नटवला, सजवला त्यामुळे त्यांच्यावर ‘लावणी’ चा शिक्का बसला. मुळात त्यांचा शास्त्रीय संगीताचा चांगला अभ्यास असल्यामुळे लोकसंगीत व शास्त्रीय संगीत यांच्या मिश्रणातून त्यांनी स्वतःची अशी स्वतंत्र शैली निर्माण केली. त्यांनी भावगीत, भक्तीगीत, अभंग, भजन, प्रार्थना, बालगीत, द्वंद्वगीत हे नेहमीचे प्रकार तर अगदी सहजपणे हाताळले, त्याचबरोबर लोकसंगीताचे झाडून सारे प्रकार त्यांनी आपल्या संगीतात आणले. त्यामुळे आशाताईंनी रामभाऊंकडे सर्व प्रकारची गाणी गायले आहेत.

संगीतकार राम कदम हे ‘लावणी सम्राट’ म्हणून ओळखले जातात. पण त्यांनी पारंपारिक संगीताबरोबर शास्त्रीय संगीताचाही आपल्या संगीतात भरपूर वापर केला आहे. या लेखाचा शेवट करतांना रामभाऊंच्या संगीतातील आशाताईंच्या गाजलेल्या लावण्या व आशाताईंनीव गायलेली शास्त्रीय संगीतावर आधारित अशी काही गाणी देऊन करीत आहे. रामभाऊंच्या चित्रपटातील लावणीचं फर्मास, फाकडी नखरेल, अक्कडबाज आणि झोकदार असं रूप आशाताईंच्या तितक्याच शृंगारिक आणि रंगतदार आवाजात खुललं होतं. किंबहुना आशाताईंच्या आवाजातली लावणी पानासारखी रंगायची. पानाच्या रंगण्यात काथ व चुना जे कार्य करतो ते लावणीत आशाताईंचा ‘स्वर’ करीत असे. काथ-चुन्यासारखं त्यांच्या स्वरात गोडवा व तिखटपणा होता.

आशाताईंच्या रामभाऊंकडील लावण्या –

1. बाई मला ठेच लागली ठेच – रंगपंचमी
2. मारिते गं पिचकार्‍या भरभरून – रंगपंचमी
3. गेला हटकुन बाई भरल्या बाजारात – रंगपंचमी
4. आली बाई पंचीम रंगाची – रंगपंचमी
5. काहो तुम्ही येणं जाणं सोडलं – देवा तुझी सोन्याची जेजुरी
6. सुभेदार तुम्ही फलटणचे – देवा तुझी सोन्याची जेजुरी
7. नयनांच्या महाली अहो सजणार्‍या – छंद प्रीतीचा
8. झोंबतो गारवा ग बाई मला – गणानं घुंगरू हरवलं
9. एक पारवळ घुमतंय मनामदी – गणानं घुंगरू हरवलं
10. अहो लय थंडीचा पडलाय कडका – कसं काय पाटील बरं हाय का
11. नाचू किती लाजू किती कंबर लचकली – सुगंधी कट्टा
12. तिळगूळ घ्या हो गोड गोड बोला – सुगंधी कट्टा
13. गाडी उतरू दे खंडाळा घाट – पैज
14. रंग रंगात ढंगला – भन्नाट भानू
15. जव्वा तव्वा वाजविता पाव्वा – जन्मठेप

शास्त्रीय रागांवर आधारित आशाताईंची गाणी –

1. नाचुनी तुझ्यापुऐ मागते मुशाहिरा (रंगपंचमी) – जयजयवंती
2. आनंद आगळा हा मी आज (रंगपंचमी) – पुरिया धनश्री
3. कोर्‍या कुमारिकेला सर्वस्व दान (रंगपंचमी) – पुरिया
4. सांगू कशी रे तुला (पतिव्रता) – भैरवी
5. कुणी तरी सांगा श्रीहरीला (प्रेम आंधळं असतं) – चंद्रनंदन
6. रात्रभर जागले मी (सुख आले माझ्या दारी) – भैरवी
7. चांद किरणांनो जा जा माझ्या मोहरा (वैभव) – यमन
8. मूर्तिमंत भगवंत भेटला (छंद प्रीतीचा) – मालकंस
9. मी लता तू कल्पतरू (एक धागा सुखाचा) – गारा
10. थंडगार हवा, त्यात धुंद गारवा (एक धागा सुखाचा) – पहाडी

संगीतकार राम कदम यांच्या सुरात सजलेली आणि आशाताईंच्या स्वरात भिजलेली ही अशी सुरेल गाणी. ही सारी गाणी महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात, कानाकोपर्‍यातल्या घराघरात जाऊन पोचली. सर्वसामान्य माणसांच्या ओठांवर खेळली याहून श्रेष्ठ सन्मान त्या कलावंतांचा दुसरा काय असू शकणार? 

मराठी गीत-संगीताच्या जगतातील अशाच इतर माहितीपूर्ण  लेखांसाठी क्लिक करा  

Madhu Potdar
+ posts

Leave a comment