-आशिष देवडे
“ऑल इज वेल” हे सुंदर वाक्य आपल्याला देणाऱ्या ३ इडियट्स ला आज ११ वर्ष पूर्ण झाली. राजकुमार हिराणी, आमिर खान हे दोन टॅलेंटेड लोक पहिल्यांदा एकत्र आले आणि त्यांनी ही ‘ख्रिसमस भेट’ लोकांना दिली. लोकांच्या ऑल टाईम फेवरेट सिनेमा मध्ये ‘३ इडियट्स’ असणार आहे हे नक्की.
‘३ इडियट्स’ हा फक्त एक सिनेमा नसून एक शिकवण आहे. “पॅशन को फॉलो करो” हे जेव्हा रॅंचो त्याच्या मित्रांना सांगतो तेव्हा तो आपल्याशी बोलत असतो. सोनम वांगचुक यांच्या व्यक्तिमत्वाशी साधर्म्य असलेलं रॅंचो हे पात्र लोकांना अभ्यासाकडे बघण्याचा नवीन दृष्टिकोन शिकवून गेला हे सगळेच मान्य करतील. तीन मित्रांची घनिष्ठ मैत्री, कॉलेज लाईफ मध्ये घडलेले काही प्रसंग, एक प्रेमकथा या सर्वांमध्ये कुठेही फिल्मी ड्रामा नाही हे ‘३ इडियट्स’ चं एक वैशिष्ट्य होतं.
आर. माधवन आणि शर्मन जोशी हे सिनेमाच्या सुरुवातीलाच त्यांच्या मित्राला शोधायला निघालेले असतात. “बहेती हवा सा था वो…” हे समर्पक शब्दांचं गाणं बॅकग्राऊंड ला सुरू असतं आणि त्या गाण्यातून रॅंचो चं पात्र आपल्याला उलगडत जातं. रणछोडदास चांचड म्हणजेच रॅंचो ला शोधण्याच्या या प्रवासात फ्लॅशबॅक मध्ये सादर करण्यात आलेला हा सिनेमा कथा कशी सांगावी ? याचा एक उत्कृष्ट नमुना आहे. फ्लॅशबॅक मध्ये कथा सांगण्याचा जणू या सिनेमानंतर एक ट्रेंड बॉलीवूड मध्ये आला.

आर माधवन ने सादर केलेला फरहान ला मुळात एक वाईल्ड लाईफ फोटोग्राफर व्हायचं असतं. पण, वडिलांच्या इच्छेपुढे आपलं मन मारून तो इंजिनियरिंग चं शिक्षण घेत असतो. फरहान ची ही आवड त्याचं प्रोफेशन बनू शकते हा विश्वास रॅंचो त्याच्या मनात निर्माण करतो.
शर्मन जोशी ने सादर केलेला ‘राजू रस्तोगी’ ची इच्छा आणि पॅशन इंजिनियरिंग करण्याचं असतं. पण, तो प्रत्येक गोष्ट खूप घाबरून करत असतो. मनातील ही भीती कशी काढून टाकावी हे रॅंचो राजू ला शिकवतो. घरात असलेल्या गरिबी चं टेन्शन न घेता आपल्या अभ्यासाची आवड तुम्हाला परिस्थिती कशी बदलू शकते हे रॅंचो करून दाखवतो.

‘३ इडियट्स’ लोकांना इतका का आवडला ? याचं उत्तर या दोन उदाहरणातूनच मिळतं. प्रोजेक्ट वेळेत न पूर्ण झाल्याने जॉय लोबो हा विद्यार्थी जेव्हा आत्महत्या करतो, तेव्हा इंजिनियरिंग च्या मुलांना शिक्षणातील या सर्वच गोष्टींचं किती टेन्शन असतं हे सिनेमा ने लोकांसमोर आणलं. ‘चतुर’ सारखं पात्र सिनेमा मध्ये दाखवून दिगदर्शकाने खरा अभ्यासू विद्यार्थी आणि घोकंपट्टी करून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यातील फरक लोकांसमोर सादर केलं.
९० च्या दशकात शालेय शिक्षण पूर्ण करणारा प्रेक्षक जेव्हा ‘३ इडियट्स’ बघत होता तेव्हा त्यांनी ती कुठे तरी आपलीच कथा वाटत होती. आपल्याला दुसऱ्या ट्रेन मध्ये बसायचं होतं. पण, आपण घाईघाईत चुकीच्या ट्रेन मध्ये बसलो आहोत याची जाणीव कित्येक तरुणांना ‘३ इडियट्स’ बघतांना झाली आणि तिथेच त्यांनी सिनेमा ला दिलखुलास दाद दिली. हा फॉर्म्युला वापरून नंतर बरेच सिनेमे झाले. पण, त्यांना ‘३ इडियट्स’ ची सर नाही हे नक्की.
करीना कपूर ने कॉलेजच्या डायरेक्टर ची मुलगी पिया चा रोल करणं हा सुद्धा परफेक्ट कास्टिंग चं एक उदाहरण म्हणता येईल. मेडिकल चं शिक्षण घेणाऱ्या पिया आणि रॅंचो यांची प्रेमकथा ही खूप सुंदर पद्धतीने रंगवली गेली आहे. मध्यरात्री रॅंचो ने खिडकीतून पियाच्या घरी येणं, दारूच्या नशेत आपल्या प्रेमाची कबुली देणं, मोठ्या बहिणीने कोणताही सीन न करता हा मुलगा मला आवडला आहे हे सांगणं हे दिगदर्शकाचं मूळ कथेकडे असलेलं लक्ष आपल्याला दाखवतं.
फरहान, राजू आणि चतुर यांचा रॅंचो ला शोधण्याचा प्रवास हा चतुर ने केलेल्या एका फोन कॉल मुळे शिमला पर्यंत येऊन पोहोचतो. तिथे दोन मित्रांना एक नवीन माहिती कळते की, जो आपल्यासाठी रॅंचो होता तो शामलदास चांचड यांच्या एका नोकराचा मुलगा आहे. इंजिनियरिंग च्या एका डिग्री साठी शामलदास यांनी लहानपणापासूनच प्रचंड हुशार असलेल्या रॅंचो ला दिल्ली च्या इंपेरियल कॉलेज ऑफ इंजिनियरिंग मध्ये ऍडमिशन करून दिलं होतं. सध्या रॅंचो हा लडाख मध्ये असल्याची माहिती या तीन मित्रांच्या ‘शोध पथकाला’ मिळते.

कॉलेज गॅदरिंग मध्ये चुकीच्या हिंदीतील भाषणामुळे प्रेक्षकांच्या लक्षात राहणारा चतुर हा अमेरिकेतील एका कंपनीत नोकरी करत असतो. ‘फुंगसुक वांगडू’ या शास्त्रज्ञाला भेटण्यासाठी तो खूप दिवसांपासून प्रयत्न करत असतो. भारतात आलेल्या चतुर सोबत फरहान आणि राजू त्याच्या गाडी मध्ये रॅंचो चा शोध सुरू ठेवतात. या शोध मोहिमेत पिया सुद्धा जॉईन होते जेव्हा फरहान तिला तिच्या लग्नातून रॅंचो ला भेटण्यासाठी पळवून नेतो. ‘एकीकडे मनाविरुद्ध ठरलेलं लग्न आणि दुसरीकडे घरासमोर उभी असलेली गाडी’ यामध्ये पिया दुसरा पर्याय निवडते.
लडाख च्या सुंदर भूमीवर सर्वांचा शोध पूर्णत्वास जातो. चतुर ज्या ‘फुंसूक वांगडू’ या शास्त्रज्ञाला भेटायला भारतात आलेला असतो तो दुसरा कोणी नसून रॅंचो असतो. लडाख मध्ये विद्यार्थ्यांना एका शाळेच्या माध्यमातून तो लहान मुलांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण करत असतो. पिया सोबत लग्न करण्यासाठी रॅंचो उर्फ फुंसुक वांगडू तयार असतो. म्हणून, ती आनंदी होते. फरहान, राजू यांना आपल्या मित्राला भेटण्याचा आनंद होतो. रॅंचो ला केवळ एक शिक्षक समजणाऱ्या चतुर ची त्यावेळी खरी फजिती तेव्हा होते जेव्हा त्याला कळतं की, “रॅंचो ही फुंसुक वांगडू है.” कॉलेज च्या डायरेक्टर ने दिलेला पेन मिरवणाऱ्या चतुर ला त्याच पेन ने रॅंचो ची सही घ्यावी लागते आणि टॅलेंट हे मार्क्स पेक्षा श्रेष्ठ आहे हे सिद्ध होतं.
चेतन भगत यांच्या ‘फाईव्ह पॉईंट समवन’ या पुस्तकावरून प्रेरित होऊन लिहिल्या गेलेली ही स्क्रिप्ट ही खऱ्या अर्थाने सिनेमाचा हिरो होती. शंतनु मोईत्रा यांनी संगीतबद्ध केलेली गाणी सुद्धा लोकांना तितकीच आवडली होती आणि आजही आवडतात. ३ राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या ‘३ इडियट्स’ ने बॉक्स ऑफिस वर सुद्धा सर्वाधिक कमाई करण्याचा रेकॉर्ड २००९ मध्ये केला होता. भारतातच नाही तर चीन मध्ये सुद्धा ‘३ इडियट्स’ चा समावेश सर्वोत्तम कमाई करणाऱ्या सिनेमांच्या यादीत झाला होता. राजकुमार हिराणी यांनी ‘३ इडियट्स’ च्या सिक्वेल बद्दल शक्यता वर्तवली आहे. पण, ते मुन्नाभाई ३ च्या नंतर होईल असं त्यांनी सांगितलं आहे.
आपल्या बॉलीवूड सिनेमा ला खऱ्या अर्थाने मॅच्युअर करण्याची सुरुवात करणाऱ्या ‘३ इडियट्स’ सारखे सिनेमे भारतात तयार होत राहिले तर प्रेक्षकांसाठी एक पर्वणी असेल. वेबसिरीज कडे वळलेल्या प्रेक्षकांना पुन्हा थिएटर मध्ये खेचून आणणं हे काम आता फक्त एक चांगली स्क्रिप्ट करू शकते. २०२० मध्ये संघर्ष करावं लागणाऱ्या बॉलीवूड साठी परत एकदा सगळं “ऑल इज वेल” करायचं असेल तर ‘३ इडियट्स’ च्या दर्जाची स्क्रिप्ट लेखकांना लिहाव्या लागतील हे नक्की.
