-आशिष देवडे

प्रेम हे सुंदर असतं. बॉलीवूड च्या सिनेमातून आपल्याला प्रेमाच्या नवीन व्याख्या, परिभाषा नेहमीच बघायला मिळतात. ‘व्हॅलेंटाईन डे’ च्या निमित्ताने सध्या ‘Love is in the air’ ही भावना प्रत्येकाच्याच मनात आहे. आपल्या प्रिय व्यक्तीला वेळ देणे हेच ‘व्हॅलेंटाईन डे’ चं सर्वात चांगलं गिफ्ट आहे असं म्हणता येईल. आजच्या फास्ट आयुष्याप्रमाणे सध्याचे बॉलीवूडचे सिनेमे सुद्धा ९० च्या दशकातील सिनेमा सारखे निवांत राहिलेले नाहियेत. तुम्हाला एखादी सुंदर प्रेमकथा या ‘व्हॅलेंटाईन डे’ च्या दिवशी बघायची असेल तर 90s चा एखादा सिनेमा बघणं कधीही चांगला पर्याय असू शकतो.

१९७० च्या दशकात यश चोप्रा या जादुई दिगदर्शकाने अमिताभ-रेखा या जोडीला ‘देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए’ सारख्या गाण्यात काश्मीर च्या रोझ गार्डन मध्ये प्रेमात आकंठ बुडालेलं दाखवलं होतं. लोकांनी या जोडीवर भरभरून प्रेम केलं. त्यानंतर आलेल्या ‘कसमे वादे निभाएंगे हम…’ या रोमँटिक गाण्यांची जादू ओसरत असतांनाच ९० च्या दशकाची सुरुवात होत होती. ‘कयामत से कयामत तक’ या सिनेमाने पुन्हा तरुणाईला बॉलीवूड कडे आकर्षित होण्यासाठी भाग पाडले होते. श्रवणीय गाणे, चॉकलेटी चेहऱ्याचा आमिर खान, तितकीच सुंदर दिसलेली जुही चावला यांच्यामध्ये तरुणाई स्वतःला बघू लागली होती.

आजच्या इतके संपर्क करण्याचे, व्यक्त होण्याचे माध्यम नसल्याने त्या काळात प्रेमात असलेल्या दोन व्यक्तींना रोमँटिक गण्यात, सिनेमा हेच माध्यम त्यांच्या भावनांचा आरसा असायचे. ‘मैने प्यार किया’ मधून सलमान खान सारखा अजून एक ‘गुड लुकिंग’ स्टार नुकताच बॉलीवूड ला मिळाला होता. प्रेमात गरीब श्रीमंत असं काही नसतं आणि प्रेम मिळवण्यासाठी नायकाला चांगलीच मेहनत घ्यावी लागते हे हा काळ तरुणांना सांगत होता.

90s romantic film dil hai ke manta nahin

१९९१ मध्ये रुलीज झालेला ‘दिल है के मानता नही…’ ने आमिर खान आणि पुजा भट ही नवीन जोडी प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. शीर्षक गीतच इतकं लोकप्रिय झालं होतं की, आजही हे आणि या सिनेमाचे इतर गाणे लोकांच्या मोबाईल मध्ये, कार मध्ये आजही आवडीने लावले जातात. गाण्यांचा वारंवार उल्लेख करण्याचं हे कारण की, त्यावेळी कथे इतकंच किंबहुना कथेपेक्षा जास्त महत्व हे सिनेमाच्या गाण्यांना असायचं.

रोमँटिक गाण्यांचा ट्रेंड हा १९९० मधील ‘आशिकी’ ने सुरू केला होता. कुमार सानू, अलका याग्निक यांच्या सुरेल गाण्यांनी सगळे रिक्षा, सार्वजनिक उत्सव हे न्हाऊन निघत होते. या प्रेमळ भावनांनीच हे दशक गाजणार हे सिनेसमीक्षकांच्या लक्षात आलं होतं. १९९१ मध्ये रिलीज झालेल्या ‘साजन’ ने पुन्हा एकदा संगम सारखा प्रेमाचा त्रिकोण लोकांसमोर आणला होता. या त्रिकोणी प्रेमकथेची चौथी बाजू ही त्याचं मधुर संगीत होतं. ‘बहुत प्यार करते है, तुम को सनम’ आणि ‘तू शायर है, मै तेरी शायरी’ सारख्या गाण्यांनी लोकांना वेड लावलं होतं. सुंदर माधुरी दिक्षीत च्या मोठ्या पडद्यावरील सहज वावराने सिनेमावर सुद्धा प्रेम करायला शिकवलं होतं.

90s romantic film aashiqui

यश चोप्रा यांनी दिगदर्शीत केलेला ‘लम्हे’ सारखा काळाच्या पुढे असलेला सिनेमा सुद्धा या दशकातच लोकांच्या भेटीला आला होता. प्रेम हे कालातीत असतं हा संदेश या सिनेमाने सर्वांना दिला. एका तरुण मुलीची आपल्यापेक्षा वयाने जास्त असणाऱ्या व्यक्तीबद्दल असलेलं प्रेम आणि त्याला भूतकाळातील आठवणींची जोड असा सुंदर कोलाज ‘लम्हे’ ने लोकांसमोर ठेवला. सोबतीला होते संगीतकार शिव-हरी यांनी संगीतबद्ध केलेले ‘कभी मै कहूं, कभी तुम सुनो’, ‘ये लम्हे…’ ही गाणी एका ऐकण्यात आणि बघण्यातच लोकांच्या मनात घर करणारे होते. बॉक्स ऑफिसवर फार कमाल न करू शकलेला हा सिनेमा एक वेगळी प्रेमकथा म्हणून कायम लोकांच्या लक्षात राहील हे नक्की.

१९९४ मध्ये सलमान खान, माधुरी दिक्षीत या जोडीने ‘हम आपके है कौन..’मधून लोकांना हळुवार प्रेमाची नवीन परिभाषा लोकांना बघायला मिळाली. ‘एका लग्नाची गोष्ट’ असलेला हा सिनेमा हा हळूहळू प्रेमकथेत रुपांतरीत होतो आणि प्रेक्षक हे नकळत या समारंभात सहभागी होतात. ‘पहला पहला प्यार है…’ सारखी गाणी लोकांना एक सुखद अनुभव देत होते. वहिनीची बहीण आणि नवऱ्याचा भाऊ असे कित्येक लग्न या सिनेमानंतर प्रत्यक्ष आयुष्यात बघायला मिळाले. ‘जुते दो, पैसे लो..’ सारख्या गाण्यांनी काही राज्यांपुरती मर्यादित असलेली लग्नात नवरदेवाची बुट चोरण्याची प्रथा पूर्ण भारतात प्रचलित केली. लग्न सोहळा हा केवळ अपेक्षांच्या बोलणीवर न होता त्यात एक गोडवा सुद्धा असतो हे लोकांना दाखवलं. ‘प्रत्येक नात्यातील प्रेम’ हे या सिनेमात दिगदर्शकाने अधोरेखित करून लोकांसमोर एक सुंदर नजराणा ठेवला होता.

१९९५ मध्ये ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ हा आजपर्यंत चा सर्वात मोठा रोमँटिक हिट लोकांच्या भेटीस आला होता. रोमँटिक सिनेमाचा विषय आणि शाहरुख खान चं नाव अजूनही नाही हे सर्वांना वाटतच असेल. ‘रोमान्स चा बादशाह’ सारखे बिरुद शाहरुख खान ला या सिनेमापासूनच मिळायला सुरुवात झाली हे नक्की. फॉरेन लोकेशन्स, तिथे एका सहलीत भेटणारे ‘राज-सिमरन’ हे लोकांना इतके आवडले की, लोकांनी अक्षरशः या सिनेमाचे पारायण केले. ‘मराठा मंदिर’ या मुंबईतील एका टॉकीज मध्ये थोडे नाही तर २५ वर्ष हा सिनेमा तळ ठोकून होता यातूनच ही प्रेमकथा लोकांना किती आवडली होती याचा अंदाज येईल. युरोप मध्ये सुरू झालेली प्रेमकथा ही भारतात येऊन पूर्ण होते हा एक फॉर्म्युला या सिनेमाने बॉलीवूड ला दिला. या धरतीवर नंतर कित्येक सिनेमाची कथा लिहिली गेली. पण, जी जादू DDLJ ने केली ती कोणालाच परत करता आली नाही. ‘तुझे देखा तो ये जाना सनम..’, ‘हो गया है तुझ को तो प्यार सजना…’ ही रोमँटिक गाणी आजही लोकांच्या मनात घर करून आहेत. गाण्यातून सुद्धा प्रेमकथा पुढे जाऊ शकते हे सुद्धा या सिनेमाने इतर दिगदर्शकांना शिकवलं. ‘प्रेमासाठी कायपण’ हा संदेश या सिनेमाने लोकांना दिला आणि लोकांनी सुद्धा या सिनेमावर भरभरून प्रेम केलं.

Shahrukh Khan and Kajol in DDLJ
Shahrukh Khan and Kajol in DDLJ- Courtesy-Yashraj films

१९९६ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या आमिर खानच्या ‘राजा हिंदुस्तानी’ ने लोकांना पुन्हा एकदा ‘प्रेमात गरीब-श्रीमंत’ काही नसतं हे दाखवलं. श्रीमंत घरातली मुलगी एका टुरिस्ट गाईड च्या प्रेमात पडू शकते आणि थोड्या अडथळ्यांच्या शर्यती नंतर ते दोघे एकत्र येतात हे लोकांना खूप आवडलं. ‘परदेसी, परदेसी जाना नही…’ या गण्याने प्रेमाची आर्तता लोकांपर्यंत पोहोचवली. एक गाणं सिनेमाला सुपरहिट करू शकतो हे सुद्धा या गाण्याने परत एकदा सिद्ध केलं. आमिर खान आणि करिश्मा कपूर यांचा सर्वोत्तम अभिनय म्हणून या सिनेमाकडे आजही बघितलं जातं. प्रेम मिळवण्यासाठी सर्वांची राजा ला मिळणारी साथ ही खऱ्या प्रेमात लोक साथ देतात हा विश्वास वाढवणारं होतं.

१९९७ आणि १९९८ हे दोन्ही वर्ष पुन्हा एकदा शाहरुख खान ची ‘प्रेमाची’ होती यात अजिबात शंका नाही. आधी आलेला ‘दिल तो पागल है’ आणि त्या नंतर आलेला ‘कुछ कुछ होता है’ या दोन्ही सिनेमांनी शाहरुख खान ला सुपरस्टार हे पद तर दिलंच. त्यासोबतच, प्रेम व्यक्त करावं तर ते शाहरुख च्या अंदाजाने हे मुलांमध्ये आणि प्रेमी असावा तर शाहरुख सारखा ही भावना त्यावेळी निर्माण झाली होती. ‘दिल तो पागल है’ मधील प्रेमाबद्दल अनभिज्ञ असलेला राहुल आणि ‘कुछ कुछ होता है’ मधील सहज प्रेम व्यक्त करणारा राहुल हे दोन्ही लोकांना प्रचंड आवडले. ‘दिल तो पागल है’ मधील व्हॅलेंटाईन डे च्या रात्री सादर केलेलं ‘चांद ने कुछ कहा…प्यार कर’ हे गाणं, त्यामधील ‘अरे रे ये क्या हुआ…’ ची ट्युन ही लोकांमध्ये प्रेम करण्याची, कोणाचं तरी होण्याची, कोणासाठी तरी जगण्याची इच्छा निर्माण करणारे होते. ‘जैसे दिल है, धडकन है… एक दुजे के वासते…’ हे गाणं आजही लोकांचा प्रेमावरील विश्वास कायम टिकून राहण्यास मदत करतात असं नक्कीच म्हणता येईल.

Shahrukh Khan, Kajol and Rani Mukherjee in Kuch Kuch Hota Hai
Shahrukh Khan, Kajol and Rani Mukherjee in Kuch Kuch Hota Hai

९० चं दशक संपत येतांना अजय देवगण चा ‘प्यार तो होना ही था…’ हा सिनेमा लोकांना प्रचंड आवडला होता. आपल्या प्रत्यक्ष आयुष्यात सुद्धा या सिनेमा नंतर लग्न करणाऱ्या अजय देवगण आणि काजोल साठी हा सिनेमा विशेष असेल यात शंकाच नाही. ‘जब किसी के तरफ दिल…’ हे कुमार सानू यांचं गाणं तरुणाईने अक्षरशः डोक्यावर घेतलं आणि हा सिनेमा सुदधा सुपरहिट ठरला. काजोल-अजय (संजना आणि शेखर) ही जोडी या सिनेमात खूप सुंदर दिसली. यानंतर इश्क, राजूचाचा सारखे बरेच सिनेमांमध्ये या दोघांनी एकत्र काम केलं. पण, ‘प्यार तो होना ही था…’ सारखी जादू मोठ्या पडद्यावर एकदाच झाली हे सगळेच मान्य करतील.

१९९९ मधील ‘हम दिल दे चुके सनम’ हा संजय लीला भन्साली यांचा प्रेमाचा त्रिकोण असलेला सिनेमा लोकांना प्रचंड आवडला. सलमान-ऐश्वर्या रॉय यांची जोडी, अप्रतिम गाणी, अजय देवगण चा इंटेन्स अभिनय हे या प्रेमकथेला उच्च सिनेमांच्या यादीत नेऊन ठेवते. प्रेमासाठी ‘त्याग’ सुद्धा करावा लागतो हा संदेश या सिनेमाने सर्वांना दिला आहे. संगीत शिकायला आलेल्या सलमान वर ऐश्वर्या रॉय चं जडलेलं प्रेम हे आजवरच्या सुंदर प्रेमकथांपैकी एक आहे. आपल्या प्रेमाला शोधण्यासाठी इटली ला गेलेल्या ऐश्वर्या रॉय ला अजय देवगण मध्ये एक सच्चा मित्र, न बोलता व्यक्त होणारं प्रेम दिसतं आणि ती त्याची साथ द्यायची ठरवते. अजय देवगण च्या करिअर मधील हा एक गेम चेंजर म्हणजेच सर्वोत्कृष्ट रोल आहे हे नक्की.

२१ व्या शतकात सुद्धा मोहब्बते, रब ने बना दी जोडी, गदर-एक प्रेमकथा सारखे सिनेमे लोकांच्या भेटीस आले. प्रेमाची गंगा ही बॉलीवूड मधून अविरत वाहत राहणार आहे. सादरीकरणात फक्त फरक पडेल इतकाच काय तो फरक. 90s च्या दशकातील आपली कोणती प्रेमकथा सर्वात आवडती आहे हे कमेंट मध्ये नक्की सांगा…

सर्वांना प्रेमदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

Aashish Deode
+ posts

Leave a comment