-© विवेक पुणतांबेकर

एकोणीसाव्या शतकात बंगालमध्ये राघो नावाचा दरोडेखोर होता. हा श्रीमंतांना लुटायचा आणि गरिबांना मदत करायचा. परिसरातल्या गरीब मुलीचे लग्न असले की आवर्जून भरघोस मदत करायचा. हुंड्यासाठी लग्न मोडत असेल तर दबाव आणून हुंडा न घेता लग्न करायला भाग पाडायचा. गरिबांना जेवायला घालायचा. ब्रिटिशांनी राघो ला पकडायचे खूप प्रयत्न केले पण शेवट पर्यंत राघो सापडला नाही. रविंद्र नाथ टागोरांच्या कवितेत या राघोचा उल्लेख सापडतो. अश्या राॅबिनहुड राघो च्या ब्राम्हण वंशात जन्मले अशोक कुमार. बंगालच्या नांदिया जिल्हातले गांगूली कुटुंब कालांतराने मध्य प्रदेशात खांडवा येथे स्थायिक झाले.

अशोक कुमारांचा जन्म खांडव्याला झाला. त्यांचे वडिल कुंजलाल गांगुली पेशाने वकील होते. आई गौरीदेवी प्रेमळ होती. या दांपत्याला एकूण चार मुले झाली. मोठे कुमुदलाल (अशोक कुमार ), त्यानंतर सती देवी, कल्याण कुमार (अनुपकुमार) आणि धाकटा आभासकुमार (किशोर कुमार). शालेय जीवनात अशोक कुमार हुशार होते. त्यांचे वडिल गोरगरीबांच्या केसेस फुकट लढवीत. त्यांच्याकडे एक गाजलेला तांतिया भिल्ल नेहमी यायचा. त्याची दहशत होती. अशोक कुमारांचे वडिल गाणे बजावणे यांचे शौकीन होते. तांतिया भिल्ल त्यांचा अशिल होता. तो पण अनेकदा गाण्यांच्या बैठकीत येत असे. पखवाज उत्तम वाजवायचा. अशोक कुमारांना फार उत्सुकता होती तांतियाला पहायची. एकदा वडिलांच्या ऑफिसमध्ये अशोक कुमार आले असताना वडिलांनी तांतिया भिल्लाची ओळख करुन दिली. त्याला पहाताच अशोक कुमार चकीत झाले. अरे हा तर आपल्या नेहमीच्या बैठकीतला पखवाज वादक. याच तांतिया भिल्लावरुन आशिर्वाद सिनेमातली जोगी ठाकूर ही व्यक्तिरेखा तयार केली गेली.

शालेय शिक्षण पूर्ण करुन अशोककुमारांनी विज्ञानाची पदवी मिळवली. त्यांच्या वडिलांची इच्छा होती अशोककुमारांनी आपल्यासारखे वकील व्हावे. त्यांच्या इच्छेचा मान म्हणून अशोककुमारांनी एल.एल.बी.ला प्रवेश घेतला. पण त्यात त्यांचे मन रमेना. त्यांच्या बहिणीचा सती देवी चा विवाह शशधर मुखर्जी बरोबर झाला होता. कलकत्त्याच्या न्यू थिएटर्स मध्ये साऊंड रेकाॅर्डिस्ट असलेले शशधर मुखर्जी आणि दिग्दर्शक हिमांशु राॅय कंपनी बंद पडल्यावर मुंबईत स्थायिक झाले आणि सावक वाच्छाबरोबर भागीदारीत बाॅम्बे टाॅकीज ही सिनेमा कंपनी सुरु केली होती. शशधर मुखर्जींनी अशोककुमारांना बाॅम्बे टाॅकिज च्या रसायन शाळेत तंत्रज्ञ म्हणून ठेवले. इथेच ते फिल्म प्रोसेसिंग शिकले. या शिवाय संकलनाचे धडे पण घेऊ लागले. त्या वेळचे त्यांचे सहकारी होते ऋषिकेश मुखर्जी.

 बाॅम्बे टाॅकीज मध्ये पगार चांगला होता. कामात शिस्त होती. स्वतः हिमांशू राॅय जर्मनीतून शिक्षण घेऊन आले होते. हान्स फ्रॅम या जर्मन दिग्दर्शकाला त्यांनी चांगल्या पगारावर नेमले होते. कॅमेरामन जोसेफ विर्शिंग ला पण त्यांनीच आणले होते. त्यांची पत्नी देविकाराणी रविंद्रनाथ टागोरांची नात होती. अनेक उत्तम सामाजिक सिनेमे बाॅम्बे टाॅकीज ने निर्माण केले. जीवन नैया सिनेमाचा नायक नजमल हुसेन आणि देविकाराणी यांच्यात वाद झाला आणि देविकाराणी ने नजमल ला काढून टाकले. तिची नजर लॅबोरेटरीत काम करणार्‍या अशोककुमारांवर पडली. तिने अशोककुमारांना नायक म्हणून काम करायची आज्ञा दिली. नाईलाजाने अशोक कुमार कॅमेर्‍यासमोर उभे राहीले. देविकाराणी बरोबर प्रेमप्रसंग साकारताना त्यांना घाम फुटला.  देविकाराणी ने कुमुदलाल गांगुली यांचे नामकरण केले अशोककुमार. या एका सिनेमात काम करुन मुंबई सोडायचा विचार अशोककुमारांनी केला. जीवन नैय्या ने अफाट यश मिळवले. अभिनयाबरोबर संकलनाची जबाबदारी अशोककुमार संभाळत.

 

एके दिवशी वडिलांची तार आली ताबडतोब ये. खांडव्याला पोचल्यावर त्यांनी सांगितले आजच कलकत्त्याला निघायचे. तुझ्यासाठी एक मुलगी पहायची आहे. कलकत्त्याला दुसरे दिवशी मुलगी पहायचा समारंभ होता. सफेद सूट घातलेले अशोक कुमार आईवडिलांबरोबर मुलीच्या घरी गेले..जबरदस्त उकाडा होता. खोलीतला पंखा खूप आवाज करत होता म्हणून त्यात तेल टाकले. पंखा सुरु झाल्यावर त्या तेलाची नक्षी अशोक कुमारांच्या सफेद सुटावर पडली. अश्या अवस्थेत आपल्या पत्नी ला शोभा ला पाहिल्याची आठवण अशोक कुमारांनी आपल्या आत्मचरित्रात सांगितली आहे. मुलगी पसंत पडली. दुसरे दिवशीचा मुहूर्त होता. यानंतर तीन वर्षे मुहूर्त नव्हता असे ज्योतिष्यांनी सांगितले. अतिशय घाईघाईने दुसरे दिवशी लग्न उरकले. तिसरे दिवशी बहिण सती देवी मुंबईहून आली. लग्न झाल्याचे कळताच तिला धक्का बसला आणि संतापली. मग तिच्या समजुतीसाठी परत एकदा लग्न लावावे लागले.

शोभाला घेऊन अशोक कुमार मुंबईला आले. जन्मभूमी सिनेमात त्यांनी अभिनय केला. अछूत कन्या सिनेमाचे काम सुरु झाले. अशोक कुमारांच्या वडिलांनी जीवन नैय्या सिनेमा खांडव्यात पाहिल्यावर संतापले. आपला मुलगा सिनेमात काम करतो ही गोष्ट त्यांना सहन झाली नाही. ते तडक मुंबईला आले. अशोक कुमारांना परत घेऊन जाण्यासाठी बाॅम्बे टाॅकीज मध्ये गेले. तिथे हिमांशु राॅयनी त्यांची समजूत काढली. सगळा स्टुडिओ फिरुन दाखवला. सगळी सुशिक्षित माणसे पाहून त्यांच्या वडिलांचा राग निवळला. अछूत कन्या सिनेमात काम करायची परवानगी त्यांनी अशोक कुमारांना दिली आणि ते खांडव्याला निघून गेले. अछूत कन्याला अफाट यश लाभले. सगळ्या गांगूली कुटूंबाने अछूत कन्या सिनेमा पाहिला. आपला मुलगा भरकटणार नाही याची त्यांना खात्री वाटून त्यांचा विरोध कायमचा मावळला.

अशोक कुमार नायक म्हणून स्थिरावले जात असतानाच हिमांशु राॅय वारले. देविका राणी सर्वेसर्वा बनली. बाॅम्बे टाॅकीजमध्ये दोन गट झाले. एक गट अमिया चक्रवर्ती आणि देविकाराणी यांचा आणि दुसरा अशोक कुमार आणि सावक वाच्छा यांचा. किस्मत सिनेमाचे एडिटिंग सुरु असताना देविकाराणी ने अशोककुमारांना काढून टाकले. संतप्त अशोक कुमारांनी कात्री फेकून दिली आणि एडिटींग रुमच्या लाकडी पार्टीशन ला लाथ मारली. मोठे भगदाड पडले. किस्मत सिनेमा कलकत्त्याच्या राॅक्सी थिएटरमध्ये सलग तीन वर्षे चालला. पुढे देविका राणीला कंपनी चालवता येईना. कंपनी बंद करुन रशियन चित्रकार रोरिच बरोबर लग्न करुन ती बंगलोर ला स्थायिक झाली. अशोक कुमार, सावक वाच्छा आणि भागीदारांनी पैसे घालून कंपनी ताब्यात घेतली. अशोक कुमारांनी हिमांशू राॅय यांचा अडगळीत पडलेला पुतळा स्वच्छ करुन ऑफिस मध्ये बसवला. बाहेर पडताना लाथ मारुन पडलेले भगदाड दुरुस्त करुन घेतले. अशोक कुमार प्राॅडक्शन या संस्थेतर्फे सिनेमा निर्मितीचा निर्णय घेतला.

कथा लेखकाचा शोध सुरु केला. सुरैय्याला चाळिस हजार रुपयाच्या करारावर नायिका म्हणून घेतले. एक तरुण लेखक अशोककुमारांना भेटले. सोहराब मोदींकडे ते संवाद लेखक म्हणून काम करत होते. त्यांचे नाव सय्यद हैदर उर्फ कमाल अमरोही. त्यांच्याकडे एक गूढकथा होती. कथा ऐकवल्यावर अमरोहींनी अट घातली दिग्दर्शन मीच करणार, नायिका माझ्या पसंतीची घेणार. अशोककुमारांनी अट मान्य केली. मधुबाला नायिका, दिग्दर्शन कमाल अमरोही यांचे, संगीत खेमचंद प्रकाश गीतकार नक्षब आणि नायक अशोककुमारांना घेऊन महल चे शूटींग सुरु झाले. मधुबाला आणि अशोककुमार यांची गाठ पहिल्यांदा बसंत सिनेमाच्या सेटवर पडली. तिचा पहिलाच टेक ओके झाला. टाळ्यांचा कडकडाट झाला. बाजूच्या सेटवर काम करत असलेले अशोककुमार धावत गेले. त्यांनी या चिमुरडीला चाॅकलेट दिले. सहा वर्षानंतर ती त्यांची नायिका झाली आणि काही वर्षानंतर धाकटी भावजय झाली. महल ने इतिहास घडवला. पहिल्यांदाच गाण्यांच्या रेकाॅर्डवर पार्श्वगायिका म्हणून लता मंगेशकरांचे नाव छापले गेले. वितरकांना न दाखवता मुंबई टेरिटरी साडेचार लाखाला विकली. सेन्साॅर ला पाठवताना शेवटचे रीळ दाखवायचे राहिले. या अपूर्ण सिनेमाने देशभर चांगला धंदा केला. महल ने इतिहास घडवला.

बाॅम्बे टाॅकीज च्या शेवटच्या कालखंडात अनेक उत्तमोत्तम सिनेमांची निर्मिती अशोक कुमारांनी केली. त्यातल्या जिद्दी सिनेमापासून देवानंद यांचा ग्राफ वर गेला. याच जिद्दी पासून किशोर कुमारांनी पार्श्वगायन सुरु केले. पत्रकार असलेले बलदेव राज चोप्रा अशोककुमार निर्मित अफसाना पासून दिग्दर्शक बनले. तेव्हापासून या दोघांची मैत्री झाली. बलदेव राज चोप्रांच्या अनेक सिनेमात अशोककुमारांनी अभिनय केला. बिमल राॅय, हेमंत कुमार, एस.डी.बर्मन  यांना मुंबईत अशोक कुमारांनी आणले. बिमल राॅय नी अशोककुमारांच्या विराज बहू आणि परिणिता सिनेमाचे दिग्दर्शन केले. परिणिता च्या वेळी फसवल्याने बिमल राॅय यांच्याबरोबर कधीच काम न करायचा निर्णय त्यांनी घेतला. अपवाद फक्त बंदिनी सिनेमाचा. अनेकांच्या मध्यस्ती नंतर अशोक कुमारांनी बंदिनी चा रोल स्वीकारताना अट घातली की कथेत अजिबात बदल करायचा नाही. परिणिता सिनेमा अपयशी झाला. सहा लाखाचा फटका बसल्यावर अशोक कुमारांनी सिनेनिर्मिती बंद केली.

आधी शामळू असलेल्या अशोककुमारांची इमेज किस्मत आणि संग्राम सिनेमापासून बदलून गेली. नकारात्मक भुमिका स्वीकारणारे अशोककुमार पहिले अभिनेते. सुरुवातीला स्वतः गाणी म्हणणारे अशोक कुमार नंतर इतर गायकांचा आवाज वापरु लागले. कामिनी कौशल, सुरैय्या, नर्गिस या बालवयात अशोककुमारांच्या चाहत्या असलेल्या मुली नंतरच्या काळात त्यांच्या नायिका बनल्या. १९४३ साली बाॅम्बे टाॅकीज चा सिनेमा आला किस्मत. त्या आधी आला बसंत. या बसंत मध्ये असलेली चिमुरडी मधुबाला महल मध्ये त्यांची नायिका बनली. लीला चिटणीस, मुमताज शांती, देविका राणी यांच्याबरोबर आणखी एक अभिनेत्री होती शोभना समर्थ. पण तिच्या बरोबर अशोक कुमारांनी कधीच काम केले नाही. पण तिची मुलगी नुतन त्यांची नायिका बनली. माला सिन्हा बालतारका नव्हती. तिचे वडिल अशोक कुमारांपेक्षा लहान होते. पण १९५९ च्या धूल का फूल मध्ये ती त्यांची नायिका होती. अशोक कुमारांनी. काम केलेले कंगन नावाचे तीन सिनेमे होते. पहिला कंगन आला १९३९ ला. नायिका होती लीला चिटणीस दुसरा कंगन आला १९५९ ला. नायिका होती निरुपा राॅय. १९७१ ला तिसरा कंगन आला. नायिका होती माला सिन्हा. बंदिनी मध्ये त्यांची नायिका असलेली नूतन मेहेररबान आणि अनुराग मध्ये त्यांची सून होती. वहिदा रहमान कधीही अशोक कुमारांची नायिका बनली नाही. पण १९६२ साली आलेल्या राखी सिनेमात अशोक कुमार वहिदा चे भाऊ होते. त्यामुळे या दोघांमध्ये बहिण भावाचे नाते निर्माण झाले. अनेक वर्षे वहिदा त्यांना राखी बांधत असे. राखी सिनेमातल्या. भावाच्या भुमिकेसाठी १९६३ ला फिल्मफेअर चे सर्वोकृष्ट अभिनेत्याचे अवाॅर्ड त्यांना मिळाले. हे त्यांना मिळालेले पहिले फिल्मफेअर अवाॅर्ड. बेवफा मध्ये राजकपूर बरोबर, दीदार मध्ये दिलिपकुमार बरोबर आणि ज्युवेल थीफ मध्ये अशोककुमारांनी दमदार अभिनय केला.

मीनाकुमारी लहानपणापासून अशोक कुमारांची चाहती होती. दादरला चित्रा सिनेमाजवळ रहात असे. अशोक कुमारांचे सिनेमे ती चित्रा सिनेमागृहात पहायची. पैसे नसले तर डोअरकिपर ची नजर चुकवून तिकीटा शिवाय आत शिरायची. अशोक कुमारांनी एकूण चौदा सिनेमात तिच्या बरोबर नायकाची भुमिका केली. तमाशा, परिणिता, बादबान, बंदिश, एक ही रास्ता, शतरंज, सवेरा, आरती, बेनझीर, चित्रलेखा, भीगी रात, जबाब, बहुबेगम आणि पाकिझा. वैजयंतीमाला आणि बी.सरोजादेवी यांचे आवडते नायक होते अशोककुमार. गेस्ट ॲपिरियन्स चा ट्रेंड अशोक कुमारांनी पहिल्यांदा सुरु केला. १९५३ च्या आवशार सिनेमात ते पहिल्यांदा पाहुणे कलाकार म्हणून आले. एकच सीन असलेल्या या सिनेमाच्या जाहिरातीत आणि टायटल्स मध्ये आपले नाव टाकायचे नाही ही प्रमुख अट त्यांनी घातली. धूल का फूल, आराधना, शक्ती सिनेमात सरप्राईज रोल्स त्यांनी केले. टायटल्समध्ये त्यांचे नाव नाही. शेवटचा मालुसरा आणि हा खेळ सावल्यांचा या दोन मराठी सिनेमात त्यांनी पाहुणा कलाकार म्हणून काम केले. चार अभिनेत्रीं बरोबर अशोक कुमारांची जोडी जमली. देविका राणी, लीला चिटणीस, नलिनी जयवंत आणि मीना कुमारी. देविकाराणी बरोबर आठ सिनेमात, लीला चिटणीस बरोबर चार सिनेमात आणि नलिनी जयवंत बरोबर दहा सिनेमात अशोक कुमार नायक होते. नलिनी जयवंत आणि अशोक कुमार यांचे ट्युनिंग जमले होते. दोघेही एकमेकांमध्ये गुंतले होते. त्या वेळी अशोककुमार फोर्ट मध्ये रॅम्पार्ट रो ला रहायचे. नलिनी जयवंत चेंबूरला युनियन पार्क मध्ये. तिच्या समोर रहायला मिळावे म्हणून तिच्या समोरचा बंगला अशोक कुमारांनी विकत घेतला. गच्चीवर दुर्बिण बसवली होती. तिच्यातून अशोक कुमार नलिनी जयवंत ला सतत न्याहाळत. परिणिता मध्ये मीनाकुमारी त्यांची नायिका बनल्यावर हे बंध विस्कटले. ते केवळ नलिनी जयवंत चे शेजारी बनले. नलिनी जयवंत नी प्रभू दयाळ बरोबर लग्न केले.

८० च्या दशकात सुप्रसिध्द सिने पत्रकार इसाक मुजावर आणि औरंगाबाद चे सिने पत्रकार अशोक उजळंबकर अशोक कुमारांना भेटायला बंगल्यावर गेले. बोलण्याच्या ओघात अशोककुमार म्हणाले नलिनी जयवंतकडे गेलात तर त्यांना माझा निरोप सांगा की बाहेर येऊन बसत जा म्हणजे मला त्यांना पाहता येईल. हा निरोप या दोघांनी सांगितल्यावर नलिनी जयवंत फणकारल्या आता माझी आठवण झाली का?? तेव्हा बोलले असते तर गोष्ट वेगळी होती. अशोककुमार सिनेमात आले तेव्हा त्यांना सात रुयये पगार होता. मग तो एकदम दिडशे रुपये झाल्यावर ते चकीत झाले. इतकी रक्कम कोणीतरी पळवेल ही भीती वाटत असल्याने ती रक्कम उशाशी घेऊन ते झोपत. १९३८ साली लग्न झाल्यावर त्यांचा पगार शंभर रुपयाने वाढला. मग वाढत वाढत जाऊन सातशे रुपये झाला. दुसर्‍या महायुध्दानंतर सिने निर्मीतीसाठी असलेली लायसन्स पध्दत बंद झाली. फ्रि लांसिग सुरु झाले. सिने निर्मिती वाढू लागल्यावर अशोककुमारांचा दर लाखाच्या घरात गेला. पैसे बुडवणारे महाभाग होतेच. मग डेली वेजेस ची युक्ती अशोककुमारांनी केली. रोज पाच हजार रुपये मिळाले तरच मेकअप ला बसायचे. या मुळे त्यांचे पैसे बुडवणे थांबले.

किस्मत सिनेमात अशोककुमारांची बाल भुमिका करणारा मेहमूद अशोक कुमारांच्या रुपेरी वाटचालीत त्यांच्या बरोबर होता. मि.एक्स, काला आदमी, कानून, इसीका नाम दुनिया है, राखी, फुलो की सेज, बहुबेटी, मेहेरबान, एक कली मुस्काई, साधू ओर शैतान, जबाब, नया जमाना, दो फूल या सिनेमात मेहमूद आणि अशोककुमार एकत्र होते.

 

बाॅक्सिंग चा त्यांना नाद होता. त्यांच्या या गुणाचा उपयोग चलती का नाम गाडी सिनेमात केला होता. या सिनेमाचे वैशिष्ट म्हणजे संवाद लिहीले नव्हते तर आयत्या वेळी सुचेल तसे म्हणले होते. तोच प्रकार व्हिक्टोरिया २०३ च्या वेळी अशोककुमार आणि प्राण ने करुन धमाल आणली होती. अनेक वर्षे दम्याने त्रस्त असलेल्या अशोककुमारांना होमिओपथी ने बरे वाटले. त्यानंतर ते होमिओपथी शिकले आणि अनेकांवर त्यांनी विनामूल्य उपचार केले. सुभाषचंद्र बोस त्यांचे आराध्य दैवत. त्यांच्यावरच्या कार्यक्रमाला ते आवर्जून हजेरी लावत. कुत्रे पाळायचा त्यांना शौक होता. जपानी कुत्रा पाळणारे ते पहिले मुंबईकर.


   

ऋषिकेश मुखर्जी त्यांचे आवडते दिग्दर्शक. त्यांच्या आशिर्वाद मधल्या भुमिकेने अशोक कुमारांना केवळ फिल्मफेअरच नव्हे तर राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले. सत्यकाम,  मिली, खुबसुरत हे त्यांनी ऋषिकेश मुखर्जीं बरोबर केलेले सिनेमे अविस्मरणीय होते. अशोककुमारांना तीन मुली. भारती, रुपा आणि प्रीती. यातली फक्त प्रीती सिनेमात आली. भारतीची मुलगी अनुराधा पटेल सिनेमात आली. रुपा ने अभिनेता देवेन वर्माशी विवाह केला. मुलगा अरुप फक्त बेजुबान सिनेमात दिसला. नंतर तो काॅपोरेट विश्वात गेला आणि यशस्वी झाला. लोणावळा येथे अशोक कुमारांचे पोल्ट्री फार्म होते. मुंबईला लागणार्‍या अंड्यांपैकी निम्मी अंडी या फार्म वरुन येत असत. नंतर हे फार्म त्यांनी व्यंकटेश्वरा हॅचरीज ला विकले. अशोककुमार भविष्य सांगत. ते नेहमीच सांगत मी सगळ्यांच्या शेवटी जाणार. तसेच झाले. पत्नी शोभा, जावई डाॅक्टर पटेल, अनुप कुमार, किशोर कुमार त्यांच्या आधी गेले.

सतत ५३ वर्षे सिनेमात राहून एकूण २६७ सिनेमात आपला ठसा उमटवणारे दादामुनी १० डिसेंबर २००१ ला आपल्यातून गेले. अनेक बक्षिसे आणि दादासाहेब फाळके पुरस्कार मिळालेल्या अशोककुमारांना मात्र महाराष्ट्र भुषण हा सन्मान मोठा वाटायाचा. या महाराष्ट्रात मी मोठा झालो. या महाराष्ट्राचे माझ्यावर ऋण आहे आणि या ऋणातच मला रहायला आवडेल असे सांगणार्‍या अशोक कुमारांना माझी आदरांजली.

Vivek Puntambekar
+ posts

Science Graduate from Somayya College in the year 1977.

Started Carrier in Kohinoor Mills in SQC Dept. After the closer of mill, began carrier as a Medical Sales Representative.

Retired as Zonal Sales Manager. Since childhood fond of Films and film music.

Wrote programs for FM Radios. Wrote articles in various Diwali magazines.

Participated in Doordarshan program. Performing an audio visual programs based on Golden era of hindi music.

Regularly writing articles for newspaper. Die hard fan of Raj Kapoor and his entire team.

Leave a comment