-©विवेक पुणतांबेकर

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Albela Actor Bhagwana Dada
“ओ बेटाजी किस्मत की हवा कभी गरम.. कभी नरम…”
अलबेला मधले हे गाणे ऐकले की समोर उभे रहातात  मास्टर भगवान. ‘अलबेला’ सिनेमात या गाण्यावर बहारदार अभिनय करणार्‍या भगवान आबाजी पालव यांच्या आयुष्यात असेच चढाव उतार आले. त्यांचा जीवनपट उलगडायचा हा छोटासा प्रयत्न.

अतिशय सामान्य परिस्थितीतल्या गिरणी कामगारांचे हे चिरंजीव. (जन्म १/८/१९३१). त्यांचे वडिल दादरच्या कोहीनूर मिल्स मध्ये कामगार होते. अभ्यासात फारसे लक्ष्य नसे. सिनेमाचे त्यांना प्रचंढ आकर्षण. या साठी वडिलांचा मार अनेकदा खाल्ला. पण सिनेमाचे आकर्षण काही कमी होईना. व्यायामाची अतिशय आवड असल्याने शरीरयष्टी उत्तम झाली. वेळ मिळेल तेव्हा स्टुडिओच्या चकरा मारणे सुरु झाले. स्टुडिओतली पडेल ती कामे करत चित्रपट निर्मितीचे तंत्र आत्मसात करुन घेतले, मूकपटांचा जमाना होता. निर्माते सिराज हकीम यांनी आपल्या मूकपटात बेवफा आशिक सिनेमात विनोदी भुमिका साकारायची संधी दिली. पहिल्याच भुमिकेत भगवानदादांनी केलेला अभिनय प्रेक्षकांना फार पसंत पडला.

मूकपटाचा जमाना संपून बोलपटाचा जमाना सुरु झाला. ४० च्या दशकात दोस्ती, तुम्हारी कसम, आशिक, शौकिन अश्या सिनेमांमधून त्यांची अभिनयाची घोडदौड सुरु झाली. त्यांच्यावर देमार सिनेमांचा अतिशय प्रभाव होता. डग्लस फेयरबॅक हे पाश्चिमात्य अभिनेते त्यांचे आदर्श. त्यांनी स्वतःची जागृती पिक्चर्स ही चित्रसंस्था सुरु केली. देमार पध्दतीचे सिनेमे निर्माण केले. त्यांच्या अश्या सिनेमांना आश्रय देणारा प्रेक्षकवर्ग होताच. सिनेमातली मारामारी वास्तववादी वाटली पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. त्यांची ड्राॅपकिक तर अतिशय गाजली होती. जालान, क्रिमिनल, भेदी बंगला, लालच मतवाले हे सिनेमे अतिशय गाजले. सोहराब मोदी यांच्या मिनर्वा मुविटोन मध्ये काम करत असताना त्यांची सी.रामचंद्र यांच्या बरोबर मैत्री झाली. त्याच वेळी एक तामिळ सिनेमा जयकोडी चे दिग्दर्शन करायची संधी त्यांना मिळाली. मद्रासला जाताना ते सी.रामचंद्र यांना बरोबर घेऊन गेले. सी.रामचंद्र यांनी या सिनेमाचे संगीत दिले. यानंतर विश्वमोहिनी या तामिळ सिनेमाचे दिग्दर्शन भगवानदादांनी केले तर संगीत दिग्दर्शन सी.रामचंद्र यांनी केले. इथे केलेल्या आगावूपणामुळे भगवानदादा व सी.रामचंद्र यांची हकालपट्टी झाली. मुंबईत परत आल्यावर भगवानदादांना हरिश्चंद्र बाली यांच्या सुखी जीवन या हिंदी सिनेमात अभिनय करायला बोलावले. त्यांनी शिफारस केली आणि सी.रामचंद्र यांना पहिला हिंदी सिनेमा संगीतबध्द करायला मिळाला . या दोधांची दृढ मैत्री होती जी सी.रामचंद्र यांच्या मृत्युपर्यंत कायम राहिली.

‘हिम्मत ए मर्दा’ या आपल्या पहिल्या बोलपटा पासून सुरु झालेली कारकिर्द आता चांगली बहरायला लागली. ४० च्या दशकाच्या शेवटी चेंबूरला त्यांनी आपला जागृती स्टुडिओ निर्माण केला. राजकपूर त्यांना प्रेमाने इंडियन डग्लस म्हणून हाक मारत असत. एका पार्टीत राजकपूरनी सल्ला दिला की आता स्टंट सिनेमा निर्मिती कमी करुन सोशल सिनेमे निर्माण करा. त्या प्रमाणे भगवानदादांनी अलबेला ची निर्मिती करायचे ठरवले. पण फायनान्सरच मिळेनात. गीताबाली शी करार करुन बसले. पण भगवानदादा सोशल सिनेमा निर्माण करतील यावर वितरकांचा विश्वास बसेना. एकदा सी.रामचंद्र यांच्याबरोबर बसले असताना भगवानदादांनी अलबेला चा विषय काढला. रडत रडत आपली व्यथा सांगितली. सी.रामचंद्र खवळले. हा तुझा मित्र मेला नाही अजून विसरला काय ?? असे खडसावले. तुम्हाला मानधन द्यायला माझ्याकडे फक्त एक रुपया उरला आहे असे भगवानदादांनी सांगितल्यावर सी.रामचंद्र यांनी एक रुपया मानधनावर आणि राॅयल्टीचा करार या अटींवर संगीत द्यायचे कबूल केले. शहा नावाचा फायनान्सर मिळाला. त्यानेच राजेंद्रकृष्ण ना गाणी लिहायला सांगितली.

अलबेला निर्माण करत असताना एरिक उर्फ कृष्णकुमार या नृत्यदिग्दर्शकाचा खून झाला. त्याचा भाऊ राबर्ट उर्फ सूर्यकुमार याने नृत्यदिग्दर्शनाची जबाबदारी घेतली. अलबेलाने इतिहास घडवला. दादरच्या लल्लुभाई मॅन्शन या चाळीत रहाणार्‍या भगवानदादांनी जुहुला बंगला घेतला. मोटार गाड्यांचा ताफा घेतला. भगवानदादांच्या नृत्यशैली च्या घडणीत सूर्यकुमार यांचा मोठा वाटा आहे. ही नृत्य शैली इतकी लोकप्रिय झाली की महानायक अमिताभ बच्चन ना पण या शैलीची नक्कल करावीशी वाटली. अलबेला च्या यशानंतर लाबेला, झांझर , शोला जो भडके, शिन शिना की बबलाबू असे अनेक सिनेमे निर्माण केले. पण अलबेला इतके यश कोणत्याही सिनेमाला लाभले नाही. मधल्या काळात सी.रामचंद्र यांच्याशी त्यांनी अबोला धरला. इतर  संगीतकारांना आपल्या सिनेमात संधी केली. कालांतराने परत दोघांच्यात समेट झाला. हम दिवाने या त्यांनी निर्माण केलेल्या सिनेमात परत हे दोघे एकत्र आले खरे पण सी.रामचंद्र आणि भगवानदादा यांचा प्रभाव ओसरला होता. किशोरकुमार ला घेऊन निर्माण करायला घेतलेला सिनेमा अर्घवट राहिला. यात त्यांचे खूप नुकसान झाले.

सिनेलॅबोरेटरीला लागलेल्या आगीत त्यांनी निर्माण केलेल्या ४८ सिनेमांपैकी अलबेला आणि हमदिवाने चा अपवाद वगळता बाकीचे सिनेमे नष्ट झाले. परिस्थिती खूपच खालावत गेली. त्यातच आयुष्यात आलेल्या इतर बायकांनी त्यांना लुबाडले. स्टुडिओ विकावा लागला. परत लल्लूभाई मॅन्शन या चाळीत रहायला गेले. उदरनिर्वाहासाठी अनेक सिनेमात विनोदी भुमिका करत राहिले. ७०च्या दशकात नकलाकार रणजीत बुधकर यांनी काही जुने सिनेमे आपल्या चित्रखजीना या संस्थेतर्फे परत प्रकाशित केले. अलबेला ची प्रत मागायला ते भगवानदादांकडे गेले तेव्हा भगवानदादा म्हणाले ते मेलेले मढे कशाला हवे आहे. रणजीत बुधकरांनी आग्रह सोडला नाही. अतिशय कमी किमतीत अलबेला चे हक्क भगवानदादांनी रणजीत बुधकरांना दिले. रिपिट रन ला लावलेल्या अलबेला ने तुफान कमाई केली. सी.रामचंद्र यांना १६ लाख रुपये राॅयल्टी मिळाली. नव्या पिढीला अलबेला ची जादू परत समजली. भगवानदादा मात्र कफल्लक राहिले. सी. रामचंद्र, राजेंद्रकृष्ण, ओमप्रकाश असे त्यांचे जीवलग मित्र या जगातून गेले. एकाकी पडलेल्या भगवानदादांचे सिनेमात क्वचित दर्शन व्हायचे.

राजकमल स्टुडिओतले मॅनेजर पाटील यांना मी भेटलो होतो. त्यांनी सांगितले राजकमल प्रतिष्टान ने भगवानदादांना जीवन दर्शन गौरव पुरस्कार द्यायचे ठरवले. या साठी लल्लुभाई मॅन्शनमध्ये त्यांना भेटायला पाटील गेले. भगवानदादांची अवस्था अगदी खराब होती. फाटका बनियन घालून ते बसले होते. भगवानदादांनी विनंती केली की पुरस्कार रकमेतून काही रक्कम आगूव मिळेल का?? म्हणजे बनियन आणि लेंगा मला खरेदी करता येईल. पाटील यांनी नवे कपडे खरेदी करुन दिल्यावरच भगवानदादा समारंभाला येऊ शकले. ४ फेब्रुवारी २००४ ला भगवानदादा आपल्यातून गेले. ते गेल्यावर स्मशानभूमीत त्यांना अग्नि कोणी द्यायचा यावरुन औरस आणि अनौरस मुलांच्यात वाद झाला. यापेक्षा दुर्देव कोणते?? भगवानदादा यांना आमची पिढी कधीही विसरु शकणार नाही.

हिंदी चित्रपटाच्या गोल्डन इरा काळातील इतर दर्जेदार लेखांसाठी क्लिक करा 

Vivek Puntambekar
+ posts

Science Graduate from Somayya College in the year 1977.

Started Carrier in Kohinoor Mills in SQC Dept. After the closer of mill, began carrier as a Medical Sales Representative.

Retired as Zonal Sales Manager. Since childhood fond of Films and film music.

Wrote programs for FM Radios. Wrote articles in various Diwali magazines.

Participated in Doordarshan program. Performing an audio visual programs based on Golden era of hindi music.

Regularly writing articles for newspaper. Die hard fan of Raj Kapoor and his entire team.

Leave a comment