-दीपकळी नाईक
नूतन. नाव उच्चारताच डोळ्यापुढे येतात ते तिचे भावपूर्ण असे विलक्षण बोलके डोळे. डोळ्यातून अभिनय करण्यारया ज्या काही मोजक्या अभिनेत्री आहेत त्यात हिचा क्रमांक वरच्या स्थानी येतो. आपल्या डोळ्यांतून झिरपणारे हसू तसेच पाझरणारे आसू (उदा. जलते है जिसके लिये .. या तलत च्या भावस्पर्शी तरल गाण्यातील तिचा अभिनय आठवा. संपूर्ण गाणं आपल्याला अक्षरशः झपाटून टाकतं)तिच्या अभिनयाने ती त्या गाण्याला एका उंची वर नेते. अशा ह्या सावळ्या वर्णाच्या, शेलाटी बांध्याच्या व उंच चणीच्या नूतन चा आज स्मृती दिन.
ह्या निमित्तानं तिच्या बहुअयामी, बहुरंगी व बहुपेडी व्यक्तीरेखांच्या स्मरण रंजनाचा हा एक प्रयत्न. मग ती 1955 सालच्या अमेय चक्रवर्ती यांच्या ” सीमा ” मधली अन्याया विरुद्ध आवाज उठवणारी तडफदार गौरी असो वा खालच्या जातीत जन्म झाला म्हणून अपमानास्पद जिणं वाट्याला आलेली ” सुजाता ” मधली उपेक्षिता सुजाता असो आपल्या कसदार अभिनयानं तिनं त्या त्या व्यक्तीरेखा वर आपला ठसा उमटवला. ” सीमा ” त शुभा खोटे सोबत चा तिचा फायटिंग सीन तसेच तिच्या अभिनयाला वाव देणारे अनेक पैलू तिनं दाखवून दिले, खरया अर्थाने एक यशस्वी प्रतिभावान अभिनेत्री म्हणून तिला ओळख याच सिनेमाने मिळाली.
तशी तिला हिंदी चित्रपट सृष्टी नवीन नव्हती. शोभना समर्थ ह्या प्रसिद्ध अभिनेत्री ची मोठी मुलगी असल्याने बालपणा पासूनच ह्या वातावरणात ती वावरली होती.” नल दमयंती ” सिनेमात बाल कलाकार म्हणून छोटीशी भूमिका तिनं शाळकरी वयात केली होती. तिच्या आईने तिच्या साठी ” हमारी बेटी ” (1950) हा सिनेमा काढला. ( यात बेबी तनुजा ही होती ) त्या वेळी नूतन चे वय अवघे 14 वर्ष होते. मिस इंडिया पुरस्कार मिळवणारी ती पहिली नटी होती. 3 वर्षाची असल्या पासून ती शास्त्रीय संगीत शिकली होती तसंच कथ्थक नृत्य ही शिकली होती. जयजयवंती रागावर आधारित ” मनमोहना बडे झूटे ” ( संगीतकार शंकर जयकिशन) या गाण्यातला तानपुरा… त्यावर लिलया फिरणारी तिची बोटं तिचं ह्या क्षेत्रातलं प्रभुत्व दाखवतात, तसंच मनातला सर्व उद्रेक बाहेर काढताना आश्रमाच्या खिडक्या संतापाने फोडताना ” मनमोहना, मनमोहना च्या ठेक्या वर ती गुणगुणते तेव्हा ही तिच्या गायनाची समज, तयारी ची झलक दिसते. 1951 मध्ये झिया सरहदी यांचा ” हमलोग ” व रवींद्र दवे यांचा ” नगिना ” हे तिचे पिक्चर्स आले. हमलोग मधे श्यामा सहनायिका होती. हमलोग ला रोशन चे तर नगिना ला शंकर जयकिशन चे संगीत होते. यातले ” तूने हाये, हाय मेरे जख्मे जिगर को छू लिया..” हे लताचे जबरदस्त गाणं ऐकताना त्यातली आर्तता काळजाला भिडते.
याच नगिना च्या वेळचा एक मजेदार किस्सा सांगितला जातो. गूढ आणि झपाटलेल्या सिन्स मुळे याला सेन्सॉर चे ए प्रमाणपत्र मिळाले होते. याच्या प्रिमीयर ला आपला फॅमिली मित्र शम्मी कपूर सह ती गेली असता 15 वर्षाच्या कोवळ्या नूतन ला अडवण्यात आले. नगिना आणि शीशम मध्ये ती दिलीप कुमार चा भाऊ नासिर खान ची नायिका होती. दिलीप कुमार बरोबर काम करण्याची तिची इच्छा मात्र पुरी होऊ शकली नाही. त्या दोघांचा ” शिकवा ” हा सिनेमा सेट वर गेला होता, त्याची पोस्टर्स ही बघायला मिळतात. पण तो पूर्ण झालाच नाही. कालांतराने “कर्मा ” या सिनेमात दोघे एकत्र आले.
आत्ता पर्यंत सीमा ( गौरी. 1957), सुजाता ( सुजाता. 1960), बंदिनी (कल्याणी. 1964), मिलन ( राधा. 1968), मै तुलसी तेरे अंगन की ( संयुक्ता चौहान. 1979) या भूमिकां साठी पाच वेळा तिला फिल्मफेअर चा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री चा पुरस्कार मिळाला असून मेरी जंग ( आरती. 1986) साठी सहाय्यक अभिनेत्री पुरस्कार मिळाला आहे.
दिग्दर्शक हमीद दत्ता यांच्या हीर (1956) मध्ये तिला गीता दत्त ने उसना आवाज दिला आहे. त्यातलं
” बुलबूल मेरे चमन के
तकदीर मेरी बन के
जागो मेरी तमन्ना, जा ss गो ” हे माझ्या आवडत्या गाण्यांपैकी एक आहे. यात प्रदीप कुमार तिचा सहनायक आहे. संगीतकार अनिल विश्वास यांच्या संगीतातील सगळीच गाणी अवीट गोडीची आहेत. 1960 च्या छबीली मध्ये तिनं गीतकार व गायिका अशी दुहेरी भूमिका बजावली आहे. संगीतकार स्नेहल भाटकर यांनी गाणी स्वरबद्ध केली आहेत.
” ऐ मेरे हमसफर रोक अपनी नजर..हे तिचे सुंदर गाणं आजही ऐकायला मिळते. रोशन च्या ” दिल ही तो है ” मधली आशा भोसले ची सदाबहार कव्वाली तिच्या सर्वोत्तम गाण्या पैकी एक आहे. तर सचिनदा च्या सुजाता (दिग्दर्शक बिमल रॉय) मधे ही “काली घटा छाए मोरा जिया तरसाए ” यातले नूतन चे विभ्रम ही पहाण्या सारखे आहेत. बागेतून मुक्त पणे बागडणारया प्रेमात पडलेल्या अवखळ किशोरीची मनोवस्था हळुवार पणे व्यक्त झाली आहे. दिग्दर्शक डी. डी. कश्यप यांच्या ” दुल्हन एक रात की ” ( संगीतकार मदन मोहन) मधलं ” कई दिन से जी है बेकल, ऐ दिल की लगी अब ले चल जहां मेरा पी है वहा.. ” हे लताचं गाणं आणि नूतन चा अभिनय ही तितकाच अविस्मरणीय असा.

इस्मत चुगताई यांच्या कथेवर चा दिग्दर्शक शहीद लतीफ चा ” सोने की चिडिया ” हा ही तिच्या कारकिर्दीतला एक महत्वपूर्ण चित्रपट. (संगीतकार ओ.पी. नय्यर ) गायक अभिनेता तलत महमूद समवेत तिच्या भूमिकेला ही तिने पुरेपूर न्याय दिला आहे. ” लैला मजनू “, ” शबाब” “अनाडी”, ” आखरी दाव” हे तिचे आणखी काही उल्लेखनीय चित्रपट होत. तर ” बारिश “, ” पेईग गेस्ट “, ” “मंझिल” आणि ” तेरे घर के सामने” यात तिचा हिरो असलेला देव आनंद तिच्या बद्दल बोलताना म्हणतो ” बुद्धिमान संभाषण करता येईल अशा अभिनेत्री पैकी नूतन ही एक अभिनेत्री होती. “

