-© विवेक पुणतांबेकर

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम

————————

Remembering Iconic Actor of Hindi Cinema Shammi Kapoor. ‘दिवाना मुझसा नही…’ हे गाणे सुरु झाले की डोळ्यासमोर येतो समशेर राज उर्फ शम्मी कपूर. कपूर भावंडातला दुसरा. खरं तर चौथा.  कारण त्याला अजून दोन मोठे भाऊ होते. राजिंदर आणि तेजिंदर. पण एकदा चुकून उंदराचे विष प्यायल्यामुळे तेजिंदर अकाली गेला. या नंतर तीन महिन्यानी राजिंदर अचानक गेला. नंतर वर्षभराने २१ /८/३१ ला समशेर राज चा जन्म झाला. शम्मी हे त्याचे टोपण नाव आणि त्याच नावाने तो प्रसिध्द झाला.

शम्मी कपूर जरी मुंबईत जन्मला तरी त्याचे लहानपण पेशावर, सिमला, कलकत्ता येथे गेले. पृथ्वीराज कपूर मुंबईत स्थिरावल्यालर आधी सेंट जोसेफ स्कूल वडाळा आणि डाॅन बाॅस्को शाळेत शिकत असताना पृथ्वीराज कपूर यांच्या नाटक कंपनीत तो पडेल ती कामे करु लागला. याच वेळी राज कपूर सिनेमात नावारुपाला येत होते. आर.के. फिल्मची स्थापना करुन आग सिनेमाच्या निर्मितीत गुंतले होते. आग चे चित्रण वरळी नाक्यावर असलेल्या ईस्टर्न स्टुडिओत सुरु झाले. शाळा सुटल्यावर शम्मी स्टुडिओत नियमीत येत असे. फातिमा बेबी उर्फ नर्गिस बरोबर शम्मी ची मैत्री जमली. ‘आग’ च्या माफक यशानंतर राज कपूरनी बरसात सिनेमाची निर्मिती केली.

‘बरसात’ तुफान यशस्वी झाला. पिता पुत्रांच्या अनोख्या संबंधावर आधारित एक अप्रतिम कथा पटकथा लेखक के.ए.अब्बास यांनी लिहीली होती. यावर आधारित आवारा सिनेमा निर्माण करायचा निर्णय राज कपूर नी घेतला होता. त्यावर काम सुरु केले. नेहमी प्रमाणे शाळा सुटल्यावर शम्मी स्टुडिओत आला तेव्हा मेकप रुम मध्ये नर्गिस रडत होती. शम्मीने कारण विचारल्यावर तीने सांगितले ‘आवारा’ सिनेमात काम करायला आई जद्दनबाई मनाई करते आहे. शम्मीने तिला धीर दिला आणि सांगितले ‘आवारा’ निर्माण होईल तर तुझ्यासकटच. नर्गिस ने सांगितले तसे झाले तर तू जे मागशील ते मी देईन. थोड्याच दिवसात जद्दनबाईचा विरोध मावळला आणि ,’आवारा’चे चित्रण सुरु झाले. तो पर्यंत मॅट्रिक पास झालेला शम्मी खालसा काॅलेज मध्ये जायला लागला होता. त्यानी नर्गिस ला आठवण करुन दिली तिने दिलेल्या वचनाची. तिने शम्मीला विचारले काय पाहिजे, शम्मीने मागितला ग्रामफोन. नर्गिस त्याला घेऊन फोर्ट मधल्या रिदम हाऊस मध्ये गेली, तिने २०० रुपयाचा ग्रामोफोन आणि २०० रुपयाच्या एल्विस प्रिसले च्या रेकाॅर्डस शम्मीला भेट दिल्या. त्या रेकाॅर्डस ऐकून शम्मी नाचायला शिकला. आपली कारकीर्द यशस्वी व्हायला नर्गिस चा मोठा वाटा असल्याची कबूली शम्मीने जीवन गौरव पुरस्कार स्वीकारताना साश्रु नयनांनी दिली.

सिनेसृष्टीची ओढ लागलेला शम्मी स्टुडिओच्या चकरा मारायला लागला. मधल्या काळात पृथ्वी थिएटर्स मध्ये  काम करताना ५० रुपये पगार मिळायला लागला. पाॅकेटमनी म्हणून कमीच होता. मग मामा राजेंद्रनाथ बरोबर उगाचच फावल्या वेळात टिवल्या बावल्या करताना लोकांना उल्लू बनवायचा उद्योग अनेकदा शम्मी ने केला. खानदानी सौंदर्य लाभलेल्या शम्मीला पहिला सिनेमा मिळाला जीवनज्योती. महेश कौल दिग्दर्शित जीवनज्योती मध्ये त्याची नायिका होती चांद उस्मानी. यानंतरच्या काळात नूतन, मधुबाला या सारख्या आघाडीच्या नायिका लाभूनही शम्मीला यशाने हुलकावणी दिली. ओळीने आठ सिनेमे अपयशी झाल्यावर त्याच्यावर फ्लाॅप स्टार चा शिक्का बसला. दरवेळी त्याची तुलना राज कपूर बरोबर व्हायची. मोठ्या झाडाखाली छोटे झाड वाढत नसते तसाच प्रकार त्याच्या आयुष्यात घडला.

१९५५ सालच्या रंगीन राते सिनेमाच्या वेळी त्याच्या आयुष्यात आली गीता बाली. मुंबईच्या बाणगंगा येथल्या गुरुद्बारातल्या पुजार्‍याची मुलगी पण शिख समाजातली अतिशय पुढारलेली होती. पाश्चात्य नृत्यशैली तिला फार अवगत होती. शम्मीपेक्षा वयाने मोठी होती. या दोघांत प्रेमसंबंध सुरु झाले. पृथ्वीराज यांचा याला विरोध होता. रंगीन राते चे चित्रण सुरु असताना गीताबाली ने आग्रह केला आजच लग्न करुया. शम्मीने राजकपूरना कळवले. राज कपूरनी पुढाकार घेऊन पहाटे पाच वाजता बाणगंगा गुरुद्वारात या दोघांनी लग्न केले. त्या संध्याकाळी राजकपूर यांनी आयोजित केलेल्या स्वागत समारंभात भोजनाच्या वेळी नर्गिस स्वतः पाहुण्यांना आग्रहाने वाढत होती.

गीताबाली ने शम्मीची शिफारस अनेक निर्मात्यांकडे केली. लेखक निर्माते दिग्दर्शक के.ए.अब्बास नी शम्मीला सल्ला दिला की राजकपूर ची नक्कल करणे बंद कर आणि मिशी काढून टाक. फिल्मिस्तान च्या तोलाराम जालन ला एक सिनेमा निर्माण करायचा होता. त्याचा फायनान्सर होता ओ.पी.कपूर. गीताबाली ने ओ.पी.कपूर कडे शम्मी ची शिफारस केली. शम्मी, अमिता यांना घेऊन व संगीतकार ओ.पी.नय्यर ला घेऊन तुमसा नही देखा ची निर्मिती तोलाराम जालन ने केली. याचा हिशोब असा की हा सिनेमा अपयशी होईल आणि आपला काळा पैसा छपवता येईल. पण झाले उलटेच. तुमसा नही देखा ने तुफान धंदा केला. सिनेविश्वाला नव्या रुपातला डान्सिग स्टार मिळाला.

उजाला, दिल देके देखो, काॅलेज गर्ल, बाॅयफ्रेंड, दिल तेरा दिवाना, चायना टाऊन, बसंत, सिंगापूर, ब्लफ मास्टर असे यशस्वी सिनेमे आल्यावर १९६१ साली निर्माते सुबोध मुखर्जी यांचा रंगीत सिनेमा जंगली प्रदर्शित झाला. जंगली मधला धसमुसळा शम्मी प्रेक्षकांच्या पसंतीला उतरला. जंगली सिनेमापासून रंगीत सिनेमांच्या युगाला सुरुवात झाली. जंगलीच्या यशानंतर शम्मीकपूर चा रुबाब जास्त वाढला. लाखो रुपयात मानधन घेऊ लागला. आपल्या पसंतीचे संगीतकार ओ.पी.नय्यर किंवा शंकर जयकिशन यांनाच घेण्याच्या अटी निर्मात्यांना घालू लागला. गीताबाली आणि आपल्या दोन मुलांबरोबर त्याचा संसार सुखात चालला होता. यश आणि पैसा भरभरुन येत असताना निर्माते नासिर हुसैन यांच्या तिसरी मंझिल सिनेमात शम्मीला नायकाची भुमिका मिळाली. ही भुमिका देवानंदनी आयत्या वेळी नाकारली म्हणून शम्मीला मिळाली.

याचे चित्रण सुरु असतानाच देवीच्या आजाराचे निमित्त होऊन गीताबाली चे निधन झाले. शम्मी कपूर खचला. पण विजय आनंद ने समजूत घालून त्याचा आत्मविश्वास वाढवला आणि सिनेमा पूर्ण केला. १९७० सालापासून सिनेविश्वात अनेक बदल घडत होते. सिनेमांचे ट्रेंड बदलले होते. नवनवीन नायकांचा उदय होत होता. शम्मीपण अंगाने सुटायला लागला. यामुळे १९७० नंतर शम्मीची कारकिर्द उतरणीला लागली. गीताबाली गेल्यावर मुमताज त्याच्या आयुष्यात आली. पण तिला आपली कारकिर्द महत्वाची वाटली म्हणून तिने लग्नाला नकार दिला. मग जुनागड संस्थान ची राजकन्या निलादेवी बरोबर शम्मी ने लग्न केले. योगायोग म्हणजे शम्मीकपूर चा नायक म्हणून अस्त झाल्यावर त्याचा आवाज म्हणून ओळखल्या गेलेल्या महंमद रफि ची कारकिर्द उतरणीला लागली.

१९७४ साली इर्माला ड्यूस या फ्रेंच सिनेमावर आधारित मनोरंजन सिनेमापासून शम्मी दिग्दर्शक बनला. बंडलबाज हा आणखी एक सिनेमा त्याने दिग्दर्शित केला. हे दोन्ही सिनेमे अपयशी झाल्यामुळे त्याने दिग्दर्शनाचा नाद सोडला. जमीर सिनेमापासून चरित्रात्मक भुमिका त्याने स्वीकारायला सुरुवात केली. प्रेक्षकांना त्या भुमिका आवडल्या. आधुनिक तंत्रज्ञानाचा भरपूर वापर शम्मी ने केला. इंटरनेट च्या क्षेत्रात पण त्याने भरीव कामगिरी केली. इंडियन इंटरनेट युजर कमिटी चा तो फाऊंडर आणि चेअरमन होता. अनेक लेखकांना तो आर्थिक मदत देत असे.ब्लफ मास्टर सिनेमाचे लेखक मधुसुदन कालेलकर आर्थिक तंगीत होते.हे समजल्यावर कथा वाचलेली नसताना सुध्दा निर्मात्याला फोन करुन कथा घ्यायला लावायची दानत त्याच्याकडे होती. हा सिनेमा होता प्रीत न जाने रीत. स्वभावाने मिस्किल असलेल्या शम्मीने राजकपूरच्या प्रेमरोग मध्ये केलेली गंभीर भुमिका अविस्मरणीय होती. राज कपूर आणि शम्मी कपूर यांनी चार दिल चार राहे या एकाच सिनेमात एकत्र भुमिका केल्या होत्या.

किडनीच्या विकाराने त्रस्त झालेला शम्मी १४/८/२०११ ला आपल्यातून गेला. पडद्यावर गाणे साकारावे तर ते शम्मी नेच. आजही दिवाना मुझसा नही गाणे टीवी चॅनेलवर लागल्यावर थिरकणार्‍या नव्या पिढीला पाहून सांगावेसे वाटते. शम्मी जी तुमसा नही देखां! 

हिंदी चित्रपटाच्या गोल्डन इरा काळातील इतर लेखांसाठी क्लिक करा

Vivek Puntambekar
+ posts

Science Graduate from Somayya College in the year 1977.

Started Carrier in Kohinoor Mills in SQC Dept. After the closer of mill, began carrier as a Medical Sales Representative.

Retired as Zonal Sales Manager. Since childhood fond of Films and film music.

Wrote programs for FM Radios. Wrote articles in various Diwali magazines.

Participated in Doordarshan program. Performing an audio visual programs based on Golden era of hindi music.

Regularly writing articles for newspaper. Die hard fan of Raj Kapoor and his entire team.

Leave a comment