– © विवेक पुणतांबेकर

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक ट्विटर I इंस्टाग्राम

————————

१५ नोव्हेंबर १९१७ साली दत्ता डावजेकरांचा (Music Director Datta Davjekar) जन्म झाला. संगीताचा वारसा त्यांना आपल्या घराण्यातून लाभला. त्यांचे आजोबा, वडिल उत्तम वादक होते. वडिल तबला उत्तम वाजवत तसेच तबला शिकवत असत. शाळेतून आल्यावर डावजेकर तबल्याशी झटापट करत त्यात पारंगत झाले. घरातला दिलरुबा पण ते वाजवायला शिकले. शालेय शिक्षण आणि संगीताची आराधना करत असताना तांत्रिक गोष्टींची पण आवड होती. त्या काळी अवघड समजली जाणारी स्पर्धा जिंकून मेकॅनो जिंकला होता. जर्मनीला जाऊन इंजिनिअर व्हायचे त्यांचे स्वप्न होते. (Remembering Finest Music Director Datta Davjekar from Marathi and Hindi Cinema)

घरची परिस्थिति अत्यंत हालाखीची. शालेय जीवनात पुस्तके वाचून डावजेकरांनी रेडिओ तयार केला. शंभर फुटाची एरियल पुण्यातल्या शनिवार पेठेतल्या घरावर लावून ते रेडिओ ऐकत. समोरच दत्तो वामन पोतदारांचे मोठे बंधू रहात होते. एके दिवशी ते मुद्दाम डावजेकरांनी तयार केलेला रेडिओ पहायला आले. त्यांना फार कौतूक वाटले. त्यांनी डावजेकरांना सांगितले तुझा जर्मनीला शिक्षणाचा सगळा खर्च मी करीन. पण पुढल्या वर्षी त्यांचे अकस्मात निधन झाले. जर्मनी दूरच पण मॅट्रिक च्या परिक्षेची फी भरणे अशक्य होते. शिक्षणाचा नाद सोडून द्यावा लागला. त्या काळी मनोरंजक कार्यक्रम करणारे मेळे असायचे. अश्याच एका मेळ्यातून डावजेकरांची सांगितिक कारकिर्द सुरु झाली. थोडेफार पैसे मिळायला सुरुवात झाली. आधी डावजेकर तबला वाजवत. मग दिलरुबा, हार्मोनियम, पियानो अशी अनेक वाद्ये वाजवत ते पारंगत झाले.

अभिनेत्री शांता आपटे प्रभात फिल्म कंपनीतून बाहेर पडल्या आणि त्यांनी स्वतःची कंपनी सुरु केली. तिथे पियानो वादक म्हणून डावजेकरांना बोलावले. दहा महिने रिहर्सल करुन लाहोर पर्यंत कंपनी ने दौरा केला व कंपनी मुंबईत परतली. याच सुमारास ओडियन ग्रामफोन या जर्मन रेकाॅर्डिंग कंपनी ने डावजेकरांना बोलावले. डावजेकरांनी शिफारस करुन आपले मित्र सुधीर फडकेंना बोलावले. रेकाॅर्डिंग ठरले. पण त्याच वेळी दुसरे महायुध्द सुरु झाले आणि कंपनीने गाशा गुंडाळला. परत मेळ्यातले काम सुरु करणे नशिबी आले. मेळ्यात महिना २०० रुपये पगार मिळायचा. एके दिवशी मास्टर विनायक यांच्या नवयुग पिक्चर्स कडून डावजेकरांना बोलावणे आले. विनायकरावांनी विचारले गाण्याला चाली द्याल का?? डावजेकरांनी होकार दिला. भावगीत गायक गजानन वाटवे यांच्या वारा फोफावला गाण्याची चाल आपणच तयार केल्याची थाप मारली. महिना अडीचशे रुपये पगारावर नोकरी मिळाली. संध्याकाळी डावजेकर गजानन वाटवे यांना भेटले आणि खोटे सांगून नोकरी मिळवल्याबद्दल क्षमा मागितली. वाटवे हसले. ते म्हणाले ही माझी चाल आहे असे सगळे समजतात पण ही चाल बाबुराव गोखले यांनी लावलेली आहे.

नवयुग पिक्चर्स मध्ये एक नवी मुलगी आली होती. तिच्या आवाजाची चाचणी घ्यायला विनायकरावांनी सांगितले. तिचा सुरेल सूर ऐकून भारावलेले डावजेकर पळत पळत विनायकरावांकडे आले. तिला पाहिजे तितका पगार द्या पण तिला सोडू नका, विनायकराव हसले . त्यांनी सांगितले अहो मास्टर दिनानाथांची कन्या लता. डावजेकरांची आणि लतादिदींची ही पहिली भेट. यानंतर काही दिवसात नवयुग पिक्चर्स बंद पडली. विनायकराव सगळ्यांना घेऊन कोल्हापूर ला गेले. तिथे त्यांनी प्रफुल्ल पिक्चर्स ही संस्था सुरु केली. पहिली निर्मिती होती माझं बाळ. या सिनेमात लतादिदींनी पहिल्यांदा पार्श्वगायन केले. संगीतकार होते दत्ता डावजेकर आणि लतादीदींचे हे पहिले गाणे होते ‘चला चला नवबाला’.

संगळ्या मंगेशकर बंधु भगिनींचे पहिले गाणे संगीतबध्द करायचा मान दत्ता डावजेकरांचा. यानंतर मास्टर विनायक यांनी चिमुकला संसार सिनेमा निर्माण केला. यानंतर गजाभाऊ सिनेमाच्या वेळी राॅबर्ट नावाच्या ब्रम्हदेशी डान्सर ने एक टॅप डान्स बेबी आचरेकर आणि डावजेकरांना शिकवला. या गाण्यात पडद्यावर डावजेकर आणि बेबी आचरेकर पहिल्यांदा दिसले. सरकारी पाहुणे सिनेमा निर्मिति नंतर प्रफुल्ल पिक्चर्स बंद झाली. विनायकराव सर्वांना घेऊन मुंबईत परतले. शंकर शेठ वाड्यात सर्वांचा मुक्काम होता. त्याच वेळी लाल गोखले या निर्मात्याचा ‘आपकी सेवा मे’ हा सिनेमा वसंतराव जोगळेकरांना दिग्दर्शित करायला मिळाला. याचे संगीत डावजेकरांचे होते. या सिनेमात लतादिदींनी पहिल्यांदा हिंदी गाणे गायले. ही कंपनी सोडल्यावर डावजेकरांना एच.एम.व्हीत वसंतराव कामेरकरांनी बोलावले. लतादिदींसाठी चार भावगीते डावजेकरांनी लिहिली आणि संगीतबध्द केली. यातले ‘तुज स्वप्नी पाहिले गोपाला’ अतिशय लोकप्रिय झाले. यंग इंडिया या रेकाॅर्ड कंपनीसाठी डावजेकरांनी लिहीलेली आणि आशाताईंसाठी स्वरबध्द केलेली गाणी आजही रसिक विसरले नाहीत.

१९४३ साली डावजेकर पत्नी आणि मुलांसकट पुण्यात रहायला आले. पुण्यात आल्यावर डावजेकरांना बरेच मराठी सिनेमा संगीत द्यायला मिळाले. पैसे बुडवणारे निर्माते जसे भेटले तसे भालजी पेंढारकर, माधव शिंदे, राजाभाऊ परांजपे यांच्यासारखे चांगले निर्माते पण त्यांना चित्रपटसृष्टीत भेटले. राजाभाऊ परांजपे यांचा त्या वेळचा गाजलेला सिनेमा ‘पेडगावंचे शहाणे’. त्यातले वसंतराव देशपांडे आणि डावजेकरांनी गायलेले ‘झांजीबार झांजीबार दुनिया वेड्यांचा बाजार’ गाणे इतके लोकप्रिय झाले की पेडगावंचे शहाणे चा हिंदी रीमेक ‘चाचा चौधरी’ संगीतबध्द करताना मदनमोहन नीं डावजेकरांची चाल तशीच वापरली.

संगीतकार सी.रामचंद्र डावजेकरांना फिल्मिस्तान मध्ये घेऊन गेले. निर्माते शशधर मुखर्जींना डावजेकरांच्या चाली पसंत पडल्या नाहीत. सी. रामचंद्र यांनी डावजेकरांना आपला सहकारी म्हणून ठेऊन घेतले. ‘अनारकली’ पासून ते सी.रामचंद्र यांचे संगीत संयोजक म्हणून काम करु लागले. पहिले गाणे रेकाॅर्ड व्हायचे होते. ‘यह जिंदगी उसीकी है’. इतका मोठा वाद्यवृंद संभाळायची ही पहिलीच वेळ त्यामुळे डावजेकर चुकुन लतादिदींसमोर उभे राहून हातवारे करायला लागले. लतादिदींनी हसत डावजेकरांना चूक दाखवून दिली.

सी. रामचंद्र यांच्या अनेक संगीतरचनांना डावजेकरांनी स्वरसाज चढवला. आशा सिनेमासाठी अनोखे बोल असलेले गाणे हवे होते. डावजेकरांनी मुंबई रेडिओवर बालनाट्यासाठी तयार केलेले बोल ऐकवले. सी.रामचंद्र यांना पसंत पडले त्यावर राजेंद्रकृष्णनी गाणे लिहीले ‘इना मिना डिका’. आजपर्यंत या गाण्याची जादू ओसरलेली नाही. ‘नवरंग’ सिनेमाच्या वेळी ‘आधा है चंद्रमा’ गाण्यातल्या घंटा डावजेकरांनी चार महिने उन्हात राबून राजकमल स्टुडिओत घडवून घेतल्या ही गोष्ट फारशी ज्ञात नाही.

याच सिनेमात ‘आ दिल से दिल मिलाले’ गाण्यात आशाताईंना हवा तसा सूर मिळेना. नऊ तास रिहर्सल चालली. शेवटी डावजेकरांनी सुचवले जरासे ओठ फाकवून गा. तसे केल्यामुळे आशाताईंचा वेगळाच आवाज लागला. सी. रामचंद्र यांची सिने कारकीर्द उतरायला लागली. तो पर्यंत हिंदी सिनेविश्वात डावजेकरांचे उत्कृष्ट पार्श्वसंगीत करणारे म्हणून नाव झाले होते. संगीतकार चित्रगुप्तनी डावजेकरांना ‘काली टोपी लाल रुमाल’ चे पार्श्वसंगीत करायला बोलावले. बाॅम्बे फिल्म लॅबमध्ये डावजेकरांना दीड मिनीटाचा सीन दाखवला. डावजेकरांना लगेच सुचले. वादकांना सुचना देऊन वाजवले. ट्रायल इतकी उत्तम जमली की साऊंड रेकाॅडिस्ट शर्माजीं बरोबर बसलेले चित्रगुप्त धावत आत आले. डावजेकरांना म्हणाले ‘बस यही चाहिये मुझे!. आजसे आप हमारे साथ रहो’. इथून ते चित्रगुप्त यांचे संगीत संयोजक बनले.

यानंतर रोशन यांच्याकडे पण ते संगीत संयोजक होते. ए.व्ही.एम. जेमिनी, विजय वाहिनी या दाक्षिणात्य चित्रसंस्था पार्श्वसंगीत द्यायला आवर्जून डावजेकरांना बोलावत. संगीतकार म्हणून काम करताना पार्श्वसंगीत डावजेकर स्वतः करायचे. जवळ जवळ तीनशे डाॅक्युमेंटरी फिल्मस् ना डावजेकरांनी संगीत देऊन त्यातही आपले कौशल्य दाखवले.

१९६२ ला राजा ठाकूर यांच्या रंगल्या रात्री अश्या सिनेमाला संगीत द्यायला डावजेकरांना बोलावले. यात तीन संगीतकार होते. छोटा गंधर्व (नाट्यगीता साठी), वसंत पवार आणि डावजेकर. तिघांना प्रत्येकी एक हजार रुपये मानधन राजा ठाकूरांनी दिले. हिंदी गाणी आणि टायटल म्युझिक डावजेकरांनी केले. टायटल म्युझिक साठी तबला वादक अल्लारखांकडून रुपक ताल वाजवून घेतला. रंगल्या रात्री अशा चे संगीत फार लोकप्रिय झाले.

डावजेकरांनी स्वरबध्द केलेल्या ६० सिनेमापैकी ‘पाहू रे किती वाट’ ची गाणी डावजेकरांची आवडती गाणी. यातले तोडी रागातले ‘आसावल्या मनाला माझाच राग येतो’ गाणे रेकाॅर्ड करताना आशाताई इतक्या भारावल्या की तिसरे कडवे रेकाॅर्ड करणे कठीण झाले. नंतर त्या राजकमल स्टुडिओत वसंत देसाईंच्या रेकाॅडिंग ला गेल्या. वसंतरावांंना म्हणाल्या मला जरा स्वस्थ बसू द्या. डावजेकरांच्या गाण्याने मला रडवले. गंमत म्हणजे त्या वर्षी तोडी रागातली अनेक गाणी बाॅम्बे फिल्म लॅब ला रेकाॅर्ड झाली. साऊंड रेकाॅडिस्ट अनेक संगीतकारांना कौतुकाने सांगायचे ‘डावजेकर का गाना सुनो, इसमे उन्होने जो कमाल दिखाया उसका जबाब नही!’. याच सिनेमातले ह्रदयस्पर्शी गाणे ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ गाताना पण आशाताई रडल्या होत्या.

माडगुळकरांनी या आधी लिहीलेले गाणे दिग्दर्शक राजा ठाकूर ना पसंत पडले नाही. पण माडगुळकरांना हे सांगायची त्यांची हिंम्मत होईना. डावजेकर माडगुळकरांकडे गेले. सिच्युएशन परत समजावली. माडगुळकर रागावले. पण दहा मिनिटात सहा कडव्यांचे गाणे त्यांनी लिहून दिले. अतिशय अजरामर गाणे आहे हे. या गाण्यांत सतार वाजवणारे अरविंद मयेकर डावजेकरांचे जावई झाले. डावजेकरांच्या कन्या रेखा यांच्याशी त्यांचा विवाह झाला. मागच्या वर्षी अरविंद मयेकरांचे निधन झाले.

‘पाठलाग’ सिनेमातल्या ‘या डोळ्यांची दोन पाखरे’ गाण्याची आधी केलेली मालकंस रागातली चाल राजाभाऊ परांजपे यांना पसंत पडली नाही. डावजेकरांच्या पत्नींने सुचवले ‘चंद्रकौस रागात चाल करा’. राजाभाऊंना चाल पसंत पडली. आजही हे गाणे सिनेरसिकांच्या मनात रेंगाळत असते. ‘पाठलाग’ ला सर्वोत्तम संगीताचे बक्षिस मिळाले.

सिनेविश्वातले बरे वाईट अनुभव येऊनही डावजेकर स्थितप्रज्ञ राहिले. हा खेळ सावल्यांचा सिनेमा आधी डावजेकरांना मिळाला होता. टायटल साॅन्ग रविंद्र साठेंच्या आवाजात रेकाॅर्ड ही झाले. पण नंतर तो सिनेमा ह्रदयनाथ मंगेशकरांना मिळाला. पण पार्श्वसंगीत डावजेकरांनी दिले. असे अनेकदा घडले. संगीतात त्यांनी अनेक तांत्रिक प्रयोग केले. फक्त पाचशे रुपयात तयार केलेला सिंथेसायझर आर.डी. बर्मन यांच्या तीनशे रेकाॅर्डिंग ला वापरला गेला. सूर पेटी हा त्यांचाच आविष्कार. त्यांचे मोठे चिरंजीव या वाद्यांच्या निर्मितीत आहेत. त्यांच्या कन्या डाॅक्टर अपर्णा मयेकर उत्तम गायिका आहेत. लता मंगेशकर पारितोषिकांनी डावजेकरांचा सन्मान केला गेला. हा आपल्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण असे दूरदर्शन च्या स्वरयात्री कार्याक्रमात डावजेकरांनी सांगितले होते.

१९ सप्टेंबर २००७ ला आपल्या कन्येच्या डाॅक्टर अपर्णा मयेकरांच्या वाढदिवसा दिवशी डावजेकर आपल्यातून गेले. या महान संगीतकारांना माझी आदरांजली. 

मराठी गीत-संगीताच्या जगतातील अशाच इतर माहितीपूर्ण  लेखांसाठी क्लिक करा  

Vivek Puntambekar
+ posts

Science Graduate from Somayya College in the year 1977.

Started Carrier in Kohinoor Mills in SQC Dept. After the closer of mill, began carrier as a Medical Sales Representative.

Retired as Zonal Sales Manager. Since childhood fond of Films and film music.

Wrote programs for FM Radios. Wrote articles in various Diwali magazines.

Participated in Doordarshan program. Performing an audio visual programs based on Golden era of hindi music.

Regularly writing articles for newspaper. Die hard fan of Raj Kapoor and his entire team.

Leave a comment