– © अजिंक्य उजळंबकर

 

ऐतिहासिक. हा एकच शब्द आहे ज्यात १९७५ हे वर्ष बसतं. स्वातंत्र्योत्तर भारताच्या सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक आयुष्यात मोठे भूकंप याच वर्षात आले. २५ जून १९७५ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी जाहीर केली होती. १९७३ ला ‘जंजीर’ द्वारे अँग्री यंग मॅनचे पदार्पण पडद्यावर झाले होते. जंजीर ही तर केवळ सुरुवात होती. १९७५ साली त्याचे पुढील दोन भाग आले. या वर्षीच्या २६ जानेवारी व १५ ऑगस्ट या दोन तारखांची ओळख म्हणजे केवळ प्रजासत्ताक व स्वातंत्र्य दिन नाहीए. कारण या दोन तारखांनीच या अँग्री यंग मॅनला प्रथमच “लार्जर दॅन लाईफ” बनवून प्रेक्षकांसमोर आणले होते. कारण प्रजासत्ताक दिनाच्या दोनच दिवस आधी प्रदर्शित ‘दीवार’ द्वारे या अँग्री यंग मॅनने  प्रेक्षकांच्या हृदयावर पूर्ण सत्ता काबीज केली तर आणीबाणीत स्वातंत्र्यदिनी प्रदर्शित ‘शोले’ ने हा अँग्री यंग मॅन ‘लार्जर दॅन लाईफ’ बनविला. पण या सर्व भव्यदिव्य, फिल्मी हाणामारीच्या गोंधळामध्ये या सर्वांच्या विरुद्ध काही अतिशय साध्यासुध्या, हलक्या फुलक्या, तुमच्या आमच्या घरातील वाटणाऱ्या, चेहऱ्यावर स्मित हास्य आणतील अशा गोड गोष्टीही रुपेरी पडद्यावर घडत होत्या. कोणाला कळणार नाही इतक्या अलगद, हळुवारपणे…अगदी ‘चुपके चुपके’ (46 Years of Evergreen Cult Classic Hindi Film Chupke Chupke)

साधेपणा, हळुवारपणा, प्रासंगिक व स्वच्छ विनोद, नात्यांमधील संवेदना व सहजता या सर्वांना रुपेरी पडद्यावर व्यावसायिक यश मिळवून देण्याची दुर्मिळ प्रतिभा असलेले काही दिग्दर्शक भारतीय सिनेमा इतिहासात होऊन गेलेत. ह्रिषीकेश मुखर्जी (Hrishikesh Mukherjee) उर्फ ह्रिषीदा यांना त्या सर्वांचे कॅप्टन म्हटले तरी चालेल. ‘चुपके चुपके’ च्या प्रमुख कलाकारातील वसुधा हे पात्र रंगावितांना जया भादुरी या सौ. जया बच्चन होत्या. १९७१ साली ‘गुड्डी’ द्वारे रुपेरी पडद्यावर त्यांची ओळख निर्माण करून दिली ती ह्रिषीदांनी. ‘चुपके चुपके’ मधील प्रोफेसर सुकुमार सिन्हा हे पात्र रंगविणारे अमिताभ यांची याच वर्षी म्हणजे १९७१ साली आनंद द्वारे बाबू मोशाय अशी ओळख निर्माण केली ती ह्रिषीदांनीच. १९७३ साली मग हे बाबू मोशाय व गुड्डी विवाह रिअल बंधनात अडकले. विवाहाच्या महिन्याभरातच त्यांना ‘अभिमान’द्वारे पहिल्यांदा पडद्यावर विवाहित कलाकार जोडप्याच्या भूमिकेत घेऊन आले ह्रिषीदाच. एवढंच कशाला ‘चुपके चुपके’ मधील नायक नायिका म्हणजे डॉ परिमल त्रिपाठींच्या भूमिकेतील धर्मेंद्र व सुलेखाच्या भूमिकेतील शर्मिला टागोर यांना ९ वर्षांपूर्वी १९६६ साली ‘अनुपमा’ द्वारे पहिल्यांदा सोबत आणले तेही ह्रिषीदांनीच. १९६९ साली ‘सत्यकाम’ हा धर्मेंद्र-शर्मिला जोडीला सोबत घेऊन ह्रिषीदांनी दिग्दर्शित केलेला दुसरा चित्रपट होता.

Dhramendra with Om Prakash and Usha Kiran in Chupke Chupke
Dhramendra with Om Prakash and Usha Kiran in Chupke Chupke

चुपके चुपके चे कथानक अतिशय साधे. बॉटनी विषयाचे प्रोफेसर डॉ परिमल त्रिपाठी (धर्मेंद्र/Dharmendra) व त्यांच्या विषयाची आवड असलेली विद्यार्थी सुलेखा (शर्मिला टागोर/Sharmila Tagore) यांची ओळख व नंतर अलाहाबाद येथे प्रेम विवाह होतो. मुंबईत राहत असलेले सुलेखाची बहीण व बॅरिस्टर जिजाजी ( उषा किरण व ओम प्रकाश/Usha Kiran and Om Prakash) मात्र या विवाहास उपस्थित राहू शकत नाहीत. सुलेखाकडून सातत्याने “प्यारे जिजाजी यांची हुशारीची तारीफ” ऐकून परिमल पुरता वैतागलेला असतो. लग्नानंतर मग जोडप्याला ब्रेक हवा असतो व जिजाजी यांचे मुंबईला या असे बोलावणे पण असते. जिजाजी यांच्या हुशारीला आवाहन द्यावे व सुलेखाला आपल्या प्यारे जिजाजीबद्दल असलेला खोटा भ्रम तोडावा म्हणून मग परिमल एक शक्कल लढवितो. जिजाजींना एक शुद्ध हिंदी बोलणारा ड्रायव्हर हवा असतो. परिमल तो ड्रायव्हर ‘प्यारे मोहन’ बनून मुंबईला जातो व त्याच्या काही दिवसाने सुलेखा तिथे येते. नाटक चांगले शिजते. परिमल बनून मग काही दिवसांनी त्याचा जिवलग मित्र सुकुमार (अमिताभ बच्चन/Amitabh Bachchan) जिजाजींच्या घरी येतो. ठरल्या नाटकाप्रमाणे तो यायच्या आधी सुलेखा ड्रायव्हर प्यारे मोहन सोबत घर सोडून निघून जाते. या सर्व नाटकात परिमल व सुकुमार यांना मदत करणारा त्यांचा मुंबईतील मित्र असतो प्रशांत (असराणी/Asrani). सुलेखाच्या अनुपस्थितीत मग परिमल बनलेल्या सुकुमारचे जमते प्रशांतच्या सालीशी म्हणजे वसुधाशी (जया बच्चन). आणि मग एकच गोंधळ उडतो. हे सर्व जिजाजींना शेवटपर्यंत कसे कळत नाही व परिमल आपल्या नाटकात कसा यशस्वी होतो हा पुढील कथाभाग.

Dhramendra with Asrani, Sharmila Tagore, David and Amitabh Bachchan in Chupke Chupke
Dhramendra with Asrani, Sharmila Tagore, David and Amitabh Bachchan in Chupke Chupke

१९७१ साली प्रदर्शित बंगाली चित्रपट ‘छद्म बेशी’ चा हिंदी रिमेक म्हणजे ‘चुपके चुपके’. उत्तम कुमार यांनी त्यात नायकाची भूमिका साकारली जी हिंदीत धर्मेंद्र (Dharmendra) यांनी रंगविली. चुपके चुपके प्रदर्शित होईपर्यंत धर्मेंद्र यांची ही-मॅन अर्थातच ऍक्शन स्टार इमेज निर्माण झाली होती. धर्मेंद्र हे एव्हाना खूप मोठे व स्वतःचे एक वेगळे वलय असलेले कलाकार होते. अमिताभ यांचा अँग्री यंग मॅन ‘दीवार’ नुकताच सुपरहिट झाला होता. पण तरीही या दोघांना ह्रिषीदांनी साध्या प्रोफेसरच्या भूमिकेत पेश केले होते. अमिताभ-जया यांच्या रोलसाठी ह्रिषीदांना खरंतर नवीन कलाकार हवे होते कारण त्या भूमिका खूपच छोट्या होत्या. पण अमिताभ-जया दोघेही यात काम करण्यास इतके उत्सुक होते की त्यांनी ह्रिषीदांना निशुल्क काम करण्याची तयारी दाखविली होती. याच वर्षी पण ‘चुपके चुपके’ च्या नंतर अमिताभ-जया जोडीला घेऊन ह्रिषीदांचा ‘मिली’ सुद्धा प्रदर्शित झाला होता. जया बच्चन या शूटिंग दरम्यान गर्भवती होत्या. त्यामुळे शूटिंग करतांना ह्रिषीदांना जया यांचे कॉस्च्युम्स व कॅमेरा अँगल्स याची विशेष काळजी घ्यावी लागली होती. धर्मेंद्र असो वा अमिताभ, शर्मिला असो वा जया, ओम प्रकाश असो वा असरानी सर्वच कलाकारांनी अतिशय अप्रतिम अभिनय केला होता. धर्मेंद्र यांनी तर शुद्ध हिंदी बोलणाऱ्या प्यारे मोहनच्या भूमिकेत धमाल मजा आणली होती. न्यूमोनिया व थायसिस च्या स्पेलिंगमध्ये असलेल्या ‘पी’ चा उच्चार का नाही केल्या जात ?  किंवा डीओ ‘डू’ होते तर मग जीओ ‘गू’ का नाही? प्रश्नांनी, मध्येच तिरळ्या डोळ्यांनी तर कधी हाकलत बोलून ओम प्रकाश यांना चित्रपटभर परेशान करणारा प्यारे मोहन धर्मेंद्र यांनी लाजवाब साकारला आहे.

Amitabh and Jaya Bachchan in Chupke Chupke
Amitabh and Jaya Bachchan in Chupke Chupke

उपेंद्रनाथ गांगुली यांच्या मूळ कथेला गुलजार व डी.एन. मुखर्जी यांनी पटकथेत रूपांतरित केले होते. या चित्रपटाची प्रमुख ओळख यातील हलके फुलके, मजेशीर संवाद आहेत व ती जबाबदारी लीलया पेलली गुलजार साहेबांनी. हॅट्स ऑफ. आनंद बक्षी यांच्या सुरेख गीतांना संगीतबद्ध केले होते दि ग्रेट सचिन देव बर्मनदांनी.

‘अभिमान’ नंतर ‘मिली’ व ‘चुपके चुपके’ दोन्हीचे संगीतकार सचिनदाच होते. सचिनदांनी त्यांच्या खास शैलीत संगीतबद्ध केलेले  ‘चुपके चुपके चलरी पुरवैय्या’ असो वा ‘अबके सजन सावनमें आग लगेगी बदन में’ ही दोन्ही गीते लता दीदींच्या अवीट गोड आवाजाने अजरामर झाली आहेत. लतादीदींचे मुकेश यांच्यासोबतचे ‘बागोमें कैसे ये फुल खिलते हैं’ हे सुद्धा मस्तच. किशोरदा आणि रफीसाहेबांची जुगलबंदी असलेले धर्मेंद्र-अमिताभ यांच्यावर चित्रित गाणे‘सारेगामा ’हे सुद्धा अफलातून.

‘चुपके चुपके’ एप्रिल १९७५ ला प्रदर्शित झाला. दोन महिन्यांनी आणीबाणी घोषित झाली. आणि त्यानंतर दोन महिन्यांनी ऑगस्टमध्ये ‘शोले’प्रदर्शित झाला. शोले ज्यात प्रोफेसर परिमल त्रिपाठी व प्रोफेसर सुकुमार अट्टल चोर वीरू आणि जयदेव झाले. वसुधा बनली ठाकूरची सून राधा. प्रशांत बनला अंग्रेजो के जमाने का जेलर. ड्रायव्हर जेम्स बनला जेल मधील खबऱ्या हरीराम न्हाई. इतर कलाकारांचे एक वेळ काहीही असो पण अमिताभ व धर्मेंद्र यांची हि जय व वीरूची भूमिका इतकी अविस्मरणीय ठरली कि आज ४६ वर्षे झाली तरी प्रेक्षकांना शोले मधील जय-वीरू जास्त लक्षात आहेत. ‘अँग्री यंग मॅन’ व ‘हि-मॅन’ लक्षात आहेत परिमल व सुकुमार या प्रोफेसरांपेक्षा. या दोन महान कलाकारांची बनलेली हि ‘इमेजची चौकट’ त्यांच्यातील अभिनेत्यांसाठी मात्र पुढे घातक ठरली. हा काळाचा महिमा. पण ह्रिषीदा हे असे दिग्दर्शक होते जे प्रवाहाच्या विरुद्ध गेले. त्यांनी  उगवत्या सूर्याला कधीच नमस्कार केला नाही. त्यांनी नेहमी प्रेम केले, जपले  कॉमन मॅन शी कनेक्ट होणाऱ्या पात्रांना. त्या भावनांना. त्या स्वच्छ विनोदांना. असे विनोद जिथे कधी कुणाचे कपडे खाली आले म्हणून हसले नाही नाही कि कुणी वेडेवाकडे तोंडे केली नाहीत ना कुणी साधे कधी घसरुनही पडले नाही. १९९९ साली मिळालेला सर्वोच्च सन्मान ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ व २००१ साली मिळालेले‘पद्मविभूषण’ हे त्याचेच प्रतीक होय.

१९७५ साली गाजलेल्या इतरचित्रपटांमध्ये होते जय संतोषी माँ, धर्मात्मा, संन्यासी, प्रतिग्या, खेल खेल में, वॉरंट, रफू चक्कर, ज्युली इत्यादी. चुपके चुपके मात्र एव्हरग्रीन क्लासिक सदरात समाविष्ट झाला ज्याला पिढ्यान पिढ्या प्रेक्षक बघतच आहेत. प्रेम करतच आहेत.

थँक्स ह्रिषीदा. थँक्स गुलजार साहेब व सचिन देव बर्मनदा. थँक्स धर्मेंद्रजी व बीग बी.

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment