-© नयना पिकळे

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Remembering Actress Sadhana and Story behind her famous hair style popularly known as Sadhana cut नुसतं अभिनेत्री साधना म्हटलं तर आजच्या तरुण पिढीला ती कितीशी आठवेल माहीत नाही. पण साधना कट विषयी माहीत नसलेली मात्र एकही मुलगी किंवा स्त्री निदान भारतात सापडणं कठीण. साधना म्हणजे ६०-७०च्या दशकातली हिन्दी सिनेसृष्टीतली एक अतिशय लोकप्रिय अभिनेत्री.

“First impression is the last impression” हे साधनाच्या बाबतीत अगदी चपखलपणे बसतं. कारण साधना म्हटली की मला आजही आठवतो मी सर्वात आधी पाहिलेला तिचा चित्रपट, एक मुसाफिर एक हसीना(१९६०). आणि आठवतं हे गाणं, ज्यात तिने खांद्याभोवती अतिशय आगळ्यावेगळ्या seductive पद्धतीने ढोलकी अडकवून आपल्या निमुळत्या लांबसडक बोटांनी ती ढोलकी वाजवत म्हटलेलं,

” मुझे डर है मुझमें ग़ुरूर आ न जाए,
लगू झूमने मैं सुरूर आ न जाए,
कहीं दिल न मेरा ये तारीफ़ सुनकर ,
तुम्हारा बने और मुझे भूल जाए ” …..

आहा ! काय ती नजाकत ! काय ते निरागस लाघवी सौंदर्य.
आजही इतक्या वर्षानंतर पडद्यावर हे पाहून जर मी घायाळ होत असेन तर जॉय मुखर्जी व इतर लाखो लोकांच्या काळजाचं पाणी पाणी नाही झालं तरच नवल.

साधना म्हणजेच सात्विक चेहरा, ग्रेसफुल हालचाली, लाजरी देहबोली आणि बोलके लाडिक डोळे. पडद्यावरचं रागावणं सुद्धा कसं? तर तिच्या सोज्वळ रुपाला साजेसंच, सौदर्याला चार चाँद लावणारं …..

लाखो करोडो रसिकांची स्वप्नपरी होती ती आणि म्हणून ह्या रसिकांच्याच भावना कधी जॉय मुखर्जीच्या तोंडून …..

“बहुत शुक्रिया बड़ी मेहरबानी,
मेरी ज़िन्दगी में हुज़ूर आप आए”
म्हणत बाहेर पडल्या तर कधी मदनाचा पुतळा देव आनंदच्या सहाय्याने तिला

“अभी न जाओ छोडकर
के दिल अभी भरा नही”
अशी आर्जवपूर्ण विनवणी केली गेली ……

कराची इथे २ सप्टेम्बर १९४१ साली साधना शिवदासानीचा जन्म झाला आणि तिचं कुटुंब फाळणी नंतर भारतात येऊन मुंबईला स्थायिक झालं.
साधनाचे वडील सिनेनटी बबिताचे काका …
म्हणजेच साधना ही अभिनेत्री बबीताची चुलत बाहीण, आजच्या पिढीला आणखी जवळची ओळख सांगायची तर अभिनेत्री करीनाची मावशी ….
कपूर घराण्याशी तिचा असा निकटचा संबंध होता ….
पण याचा तिला कधी फायदा झालाही नाही व तिने करूनही घेतला नाही …

उलट सिनेसृष्टीत जम बसायच्या आधी व हे नातं निर्माण होण्याआधी साधना आणि राजकपूर बाबतीत झालेला एक मजेशीर किस्सा मात्र वाचनात आला तो असा …..
१९५५ सालच्या राज कपूरच्या श्री ४२० मध्ये “रमैय्या वत्सा वैय्या” आणि “मूड मूड के न देख” या दोन्ही गाण्यात तिला कोरस मध्ये नृत्याची संधी मिळाली होती.
त्या वेळपर्यंत राज कपूरचं नाव बऱ्यापैकी झाल्याने मिळालेल्या संधी मुळे साधना भलतीच खुश होती. आपल्या मैत्रिणींना उत्साहाने थिएटर मध्ये श्री ४२० सिनेमा दाखवायला घेऊन गेली. पण आश्चर्य म्हणजे दोन्ही गाण्यांच्या एडिटींग वेळी नेमकं तिलाच उडवण्यात आलं होतं. मैत्रिणींसमोर साधनाला अक्षरशः रडू फुटलं. घरी आल्यावर घरातल्यांनी देखील तिला समजावलं आणि चित्रपटांचा नाद सोडायला सांगितला.

पण साधनाने मात्र तिथल्या तिथेच निश्चय केला की एके दिवशी मी प्रसिध्द अभिनेत्री बनवून दाखवेनच आणि गम्मत म्हणजे १९६४ साली आलेल्या “दुल्हा दुल्हन” मध्ये ती चक्क राजकपूरची नायिका होती. म्हणतात नं नशीब बदलायला वेळ लागत नाही …..

१९५८ साली “अब्बाना” नावाच्या सिंधी चित्रपटात तिला सर्वप्रथम संधी मिळाली आणि त्यानंतर ‘लव्ह इन सिमला’-१९६० मध्ये ती जॉय मुखर्जी बरोबर हिंदी पडद्यावर दिसली. पण इथे आली एक अडचण. साधनाच्या चेहऱ्याच्या मनाने तिचं कपाळ खूपच मोठं होतं. ह्यावर तोडगा म्हणून चित्रपटाचे दिग्दर्शक आर. के. नय्यर ह्यांनी तिला प्रसिद्ध हॉलीवूड नटी ‘ऑड्री हेपबर्न’ सारखा हेयरकट करायला लावला. हा हेयरकट म्हणजे कपाळावरचे थोडे केस तोकडे कापून ते कपाळावर पुढे आणायचे आणि कपाळाची लांबी कमी असल्याचा आभास निर्माण करायचा. ह्या अशा हेयरकट मुळे फार काही साध्य होईल अशी साधनाला आधी मात्र खात्री नव्हती. पण हा कट त्या काळच्या नवयुवतींमध्ये एवढा लोकप्रिय झाला की काही विचारू नका. स्वतः आर. के. नय्यर सुद्धा साधनाच्या ह्या नव्या रूपावर इतके भाळले की दोघं प्रेमात पडून नंतर त्यांनी विवाह केला.

समस्त सिनेरासिकांमध्ये सुद्धा हा कट जबरदस्त हीट झाला. अचानक सर्वच मुलींना आणि स्त्रियांना पार्लर मध्ये जाऊन अगदी अस्साच हेयरकट करून घ्यायची गरज भासू लागली. मग काय ह्या कटचं नावच मुळी ‘साधनाकट’ पडलं. आणि हा कट पुढे साधनाची identity ठरला.

वेगळं सांगायची गरजच नाही की ‘लव्ह इन सिमला’ सुद्धा सुपरहिट झाला आणि त्यातलं साधनाचं मोहक रूप, कुठेही ओव्हरएक्टींग किंवा नाटकीपणा नसणारा सहज अभिनय ह्यामुळे तिने हिंदी सिनेसृष्टीत अगदी अल्पावधीतच कायमची जागा पटकावली ….

साधनाचा दुसरा चित्रपट होता परख-१९६०. ह्यावेळी मात्र वेगळीच गंमत झाली. म्हणजे परख चित्रपटाच्या वेळी हाच लोकप्रिय हेअरकट एक अडसर ठरणार होता. परखचे दिग्दर्शक बिमल रॉय ह्यांना आपल्या नायिकेचा look एकदम साधा सरळ हवा होता. त्यांनी अट घातली जर माझ्या चित्रपटात काम करायचं असेल तर हा कट बदलावा लागेल. आता आली ना पंचाईत. साधना विचारात पडली. पण लगेचच प्रसंगावधान राखून तिने कपाळावर पुढे येणार्‍या केसांना पिना लावून मागे घेतले आणि बिमल रॉयना हवी होती तशी सोज्वळ भोळीभाबडी नायिका बनून त्यांच्या समोर उभी राहिली. अर्थातच ह्या रूपाला बिमल राॅयची पसंती मिळाली आणि त्यामुळे आपल्याला मिळाली “मिला है किसीका झुमका” आणि “ओ सजना बरखा बहार आयी” म्हणत सर्वांचं हृदय जिंकणारी परख चित्रपटातली सोज्वळ, लाजरी, गोडगिजिरी नायिका सीमा.

साधनाचा जॉय मुखर्जी बरोबरचा एक मुसाफिर एक हसीना-१९६२ माझा अतिशय आवडता चित्रपट. या चित्रपटाची जवळजवळ सारीच गाणी खूप गाजली.

” आप युँही अगर हमसे मिलते रहे ”
” मुझे देखकर आपका मुस्कराना ”
” हमको तुम्हारे इश्क ने क्या क्या बना दिया ”
सगळीच लाजवाब.

तसच देव आनंद बरोबरचे हम दोनो-१९६१ आणि असली नकली–१९६३ हे देखील तिचे गाजलेले चित्रपट.
‘हम दोनो’ मध्ये तिने पूर्वार्धात देवच्या अवखळ प्रेयसीची आणि नंतर उत्तरार्धात आपला प्रियकर दुसर्‍या कुणाच्या प्रेमात आहे असं वाटल्यामुळे आलेली निराशा, अस्वस्थता, पण सत्य कळल्यावर दुविधा स्थितीत सापडलेल्या देवला खंबीरपणे साथ देणारी, अशा विविध छटा असलेली भूमिका खूपच ताकदीने वठवली आहे.
“तुमसे मैं जुदा नहीं, मुझसे तुम जुदा नहीं” किती आश्वासक वाटतो तिचा चेहरा हे गाताना.
“तेरा मेरा प्यार अमर, फिर क्युं मुझको लागता है डर” असली नकली मध्ये हाताच्या कोपरापर्यंत ब्लाउज घातलेली, साध्या साडीतली आणि सैलसर आंबाड्यावर माळलेल्या गजर्‍यातली गोडूली साधना डोळ्यासमोरून हलत नाही.

सुनील दत्त बरोबर मेरा साया-१९६६, वक्त-१९६५, गबन-१९६७ हे चित्रपट गाजले तर मनोज कुमार बरोबरच्या वो कौन थी-१९६४ चित्रपटाने तिला एक गूढ रहस्यमय व्यक्तिमत्व बहाल केलं. ‘मेरा साया’ आणि ‘वो कौन थी’ दोन्ही चित्रपटात तिच्या दुहेरी भूमिका होत्या. ‘मेरा साया’ मध्ये सुनील दत्तची पत्नी जी आजारात मरण पावते आणि दुसरी एका डाकुच्या टोळीतील मुलीची. दोन्ही भूमिका साधनाने अगदी सहजपणे कोणताही अभिनिवेश न आणता यशस्वीरीत्या केल्या आहेत .

“तू जहाँ जहाँ चलेगा मेरा साया साथ होगा”,
“झुमका गिरा रे बरेली के बाजार में”,
“नैनो में बदरा छाये, बिजुरी भी चमके हाये”
ही या चित्रपटातील गाजलेली गाणी .

‘वो कौन थी’ मध्ये सुद्धा एक मनोज कुमारची पत्नी जी खरच निरागस असते आणि दुसरी काहीशी निगेटिव भूमिका.

वरील सर्वच भूमिका साधना ने अतिशय सुरेख निभावल्या.

शम्मीकपूर बरोबरच्या राजकुमार-१९६४, आणि बदतमीज-१९६६ ह्या दोन्ही चित्रपटांमध्ये ती शम्मीच्या उत्साही, खोडकर, धुसमुसळेपणाला पुरून उरली आहे.
आणि राजेंद्र कुमार बरोबर आप आये बहार आयी-१९७१, मेरे मेहेबूब-१९६३, आरजू-१९६५ मध्येही विलक्षण गोड दिसली आहे.
तसेच मनमौजी, प्रेमपत्र, एक फुल दो माली, वंदना, गीता मेरा नाम, हे देखील साधनाचे इतर काही लोकप्रिय झालेले चित्रपट.

तिला अनेक उत्तम गाणी मिळाली ज्याचं तिने सोनं केलं.

“नैना बरसे रिमझिम रिमझिम” मध्ये स्वतःभोवती गूढ वलय निर्माण करणारी,
“आजा आयी बहार दिल है बेकरार” मध्ये फुलांनी सजवलेल्या raft सदृश बोटीवर अल्लडपणे शम्मीला मोहवणारी,
“अजी रूठ कर अब कहा जायिएगा” असा सवाल राजेंद्रकुमारला विचारणारी,
“ओ सजना बरखा बहर आयी” म्हणत आपल्या सजणाला प्रेमळ साद घालत आपलं मन चिंब भिजवणारी,
“मिला है किसीका झुमका” म्हणत फुलाशीच गुजगोष्टी करणारी फुलासारखी नाजूक,
“हम जब सीमट के आप कि बाहो में आ गये” म्हणतानाची तिची लाजरी छबी,
“बेदर्दी बालमा तुझको मेरा मन याद करता है” मधील आर्ततेने सर्वांचेच डोळे ओले करणारी,
“जो हमने दास्ताँ अपनी सुनाई आप क्यूं रोए” म्हणत आपल्याला हेलावून सोडणारी ,
“मेरे मेहेबूब तुझे मेरे मुहब्बत कि कसम” मधल तिचं खानदानी रूप आणि
“मेरे मेहेबूब में क्या नही, क्या नही” म्हणतानाची अल्लड, बालिश गोड अशी साधना.

तिची अनेक रुपं डोळ्यासमोर येत राहतात. या व अशा अनेक गाण्यातून ती सतत भेटत राहते. तिने जवळ जवळ ३०च्या वर चित्रपटात काम केलं आणि त्यातले काही अपवाद सोडता बहुतेक चित्रपट गाजले पण तरीही तिला फिल्मफेअर पुरस्कार मात्र कधीच मिळाला नाही. फक्त ‘वह कौन थी’ आणि ‘वक्त’ ह्या चित्रपटासाठी तिला नॉमिनेशन मिळालेलं.
पण याबद्दल तिने कधी त्रागा केलेला किंवा खेदजनक उद्गार काढलेलेही ऐकिवात नाहीत. जे वाट्याला आलं त्याचं सोनं करणारी, मिळालं ते हसतमुखाने स्वीकारणारी आणि जे नाही मिळालं त्याचा त्रास करून न घेणारी अशी ही गुणी अभिनेत्री.

मला आवडलेली तिची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तिने प्रसिद्धीच्या ऐन शिखरावर असताना घेतलेला चित्रपट सन्यास. यामुळे आजही ती आपल्या डोळ्यासमोर येते ती एका नाजूक, अवखळ, चंचल तरुणीच्या रूपातंच.
तिच्या समकालीन असलेल्या काही नट्या चेहऱ्यावर रंगरंगोटी करून आज जेव्हा कॅमेऱ्यासमोर सुंदर दिसायचा प्रयत्न करतात तेव्हा त्या अधिकच केविलवाण्या वाटतात. साधनाने मात्र योग्य वेळी योग्य निर्णय घेतला.

नंतरच्या काळातही साधनाने तिला झालेला डोळ्यांचा प्रॉब्लम, थायरॉयड आणि कॅन्सर सारख्या दीर्घ गंभीर आजारपणात दाखवलेली सहनशीलता, हिम्मत व या सर्वांना तिचं धीराने सामोरं जाणं all these incidences speak volumes about this dignified beauty.

तर ही होती कथा आजही लोकप्रिय असलेल्या साधनाकटची आणि हा कट अस्तित्वात आणणार्‍या अभिनेत्री साधनाची.

हिंदी चित्रपटांचा गोल्डन इरा काळातील दर्जेदार माहितीपूर्ण लेखांसाठी क्लिक करा 

Nayana Pikle
+ posts

सौ नयना सतीश पिकळे

शिक्षण -
बी एस्सी रसायनशास्त्र
एम ए संस्कृत (वेदांत)
मोबाईल - ९९६७०५३९६७

एच एस बी सी बॅन्केत नोकरी (१९९२-२००३)

बी ए संस्कृतच्या खाजगी शिकवण्या .

मराठी विश्वकोशासाठी नोंदी करणे .

यशोवाणी संस्थेतर्फे अंध मुलांसाठी आॅडियो बुक्सचे रेकाॅर्डींग करणे .

सांगितिक कार्यक्रमांसाठी स्क्रीप्ट लिहिणे आणि निवेदन करणे.

सिने-संगीत व सिनेमा विषयक लेखन करणे .

Leave a comment