© विवेक पुणतांबेकर

Remembering the Great Showman of Hindi Cinema, Raj Kapoor. निळ्या डोळ्याचा विलक्षण बोलका चेहरा असलेला अभिनेता/ चतुर दिग्दर्शक/ कुशल संकलनकार/ निर्माता/ स्वतः संगीताची उत्तम जाण असलेला तसेच आपल्या टीम मधे एकापेक्षा एक नवरत्ने घेऊन सातत्याने सिनेविश्वात आपला ठसा उमटवणारा रणबीर राज उर्फ राजकपूर आज हयात असता तर १४ डिसेंबरला ९८ वर्षाचा झाला असता. उच्च शिक्षित पापाजी ना अभिनयाची आवड असल्याने वकीली पेशा न स्वीकारता ते रंगमंचाकडे वळले. त्यांच्या पत्नी रमादेवींना गाण्याची अत्यंत आवड. पंजाबी लोकगीते त्या घरगुती कार्यक्रमात गात. अश्या दांपत्याच्या पोटी जन्मलेले पहिले अपत्य रणबीर राज. त्यामुळे लहानपणी भरपूर लाडकौतुक होणे साहजिकच.

पापाजी सिनेविश्वात गेले तरी रंगभूमीचे प्रेम कायम असल्याने आपली नाटक कंपनी त्यांनी सुरुच ठेवली. रंगमंचावरचे संस्कार, आईकडून आलेला गाण्याचा वारसा यातूनच घडणारे राज कपूर सुरैय्या बरोबर ऑल इंडिया रेडियोवर लहान मुलांचा कार्यक्रम सादर करत. पापाजींच्या नाटक कंपनीत पडेल ती कामे करत करत ते अभिनेता बनले. पापाजी भालजी पेंढारकरांच्या महारथी कर्ण सिनेमाच्या शूटींग च्या दरम्यान कोल्हापूर ला सहकुटुंब गेले असताना, भालजींच्या मनात राजकपूर भरले आणि वाल्मिकी सिनेमात नारदाची भुमिका दिली. या साठी चार हजार रूपये मानधन दिले. पापाजींनी भालजीना सांगितले याची लायकी नाही. पैसे नका देऊ. पण भालजीनी सांगितले हा माझा मानलेला भाचा आहे आणि मामाने दिलेली भेट नाकारू नका. (कोल्हापूर मुक्कामी रमादेवींनी भालजींना राखी बांधली होती.) पापाजींनी नाईलाजाने पैसे स्वीकारले पण उघळ्या राजकपूर कडे न देता आपल्याकडे तसेच ठेवले. त्याच पैश्यातून चेंबूरला चार एकर जागा खरेदी केली. कालांतराने त्याच जागेवर आर.के.स्टुडियो निर्माण झाला. अभ्यासाकडे फार लक्ष न देणारे राजकपूर केंब्रिज परिक्षेत नापास झाल्यावर त्यांनी सिनेमात जाण्याचा विचार पापाजींना सांगितला. पापाजी त्यांना चंदुलाल शहा यांच्या रणजीत स्टुडियोत घेऊन गेले. तिथे गेल्यावर चंदुलाल शहांना सांगितले याला अजिबात पगार न देता शिकावू उमेदवार म्हणून ठेवा. इथून राजकपूर यांची उमेदवारी सुरु झाली. सिने निर्मितीचे अनेक धडे घेत क्लँपर बॉय बनले.

 

कँमेरा समोर यायची धडपड एकदा चांगलीच अंगाशी आली. क्लँप देताना एका पात्राची दाढी अडकली. दिग्दर्शक केदार शर्मा संतप्त झाले आणि राजकपूर ना एक सणसणीत लगावली. गाल चोळत भरल्या डोळ्यांनी पहाणारे राजकपूर पहाताना शर्माजींना त्यांच्यातला अभिनेता जाणवला. त्यांनी नीलकमल सिनेमात राजकपूरना हिरो चा रोल दिला. रणजीत सोडल्यावर काही काळ त्यांनी बॉम्बे टॉकीज मधे २०० रुपये पगारावर नोकरी केली. अमिया चक्रवर्तींचे ते सहाय्यक बनले. ज्वारभाटा सिनेमात नायकाची भुमिका त्यांना न मिळता, दिलीपकुमार ना मिळाली. यामुळे नाराज झालेल्या राजकपूर नी बॉम्बे टॉकीज सोडली आणि काही काळ पापाजींच्या नाटककंपनीत काम केले. याच काळात त्यांच्या लांबच्या नात्यातल्या मल्होत्रांच्या मुलीबरोबर त्यांचा विवाह झाला. नाटक कंपनीतून राजकपूर नी आपली भविष्यातील टीम जमवायला सुरूवात केली. लेखक इंदर राज आनंद, संगीतकार राम गांगुली,  शंकरसिंग सुर्यवंशी, जयकिशन पांचाळ, हसरत जयपुरी, दत्ताराम वाडकर असे सहकारी जमले. लहानपणी चा मित्र विश्व मेहरा, कलाचंद, वसंत साठे, के.ए.अब्बास यांच्या बरोबर फोर्ट मधल्या मरोसा रेस्टॉरंटमध्ये राजकपूर चा रोज अड्डा असायचा. कधी कधी पर्शियन डेअरीत जमायचे. हमारी बात , गोपीनाथ, चितोड विजय, दिल की रानी या सिनेमात काम केल्यावर राजकपूर स्वतः ची चित्रसंस्था काढायची स्वप्ने पहायला लागले. 

 

सिनेमातून मिळालेला थोडाफार पैसा, लग्नात भेट मिळालेली सेकंड हँड फोर्ड गाडी एव्हढाच भांडवलावर त्यांनी आग सिनेमाची निर्मिती सुरु केली. फाळणी च्या पार्श्वभूमीवर इंदर राज आनंद यांनी लिहीलेल्या कथेवर वरळीच्या ईस्टर्न स्टुडियोत आग चे शूटींग सुरू झाले. कामिनी कौशल घेऊन सहा रिळे तयार झाली. त्यावेळची नामवंत अभिनेत्री नर्गिसला चाळीस हजार रुपये मानधन देऊन बोलावले. संगीताची जबाबदारी रामगांगुली यांच्याकडे सोपवली. सहाय्यक होते शंकर जयकिशन. आग तयार करताना खूप मेहनत घ्यावी लागली कँमेरामन के.आर.एस.रेड्डी शॉटस् घेताना सहकार्य न देता कुचेष्टेने पहात. कारण तो पर्यंत क्लोजअप लेन्स चा वापर कोणीच केला नव्हता. नंतर रेड्डी सहकार्य करू लागले. साऊंड फिल्मस् ची टंचाई असे. तिथले साऊंड रेकॉर्डिस्ट अल्लाऊद्दीन कुरेशींनी उधारीवर साऊंड फिल्म चे डबे देऊन मदत केली. बाबुभाई मेहता या वितरकांने , तसेच त्यांचा जुना नोकर द्वारकाने पैश्याची मदत केली. आग पुर्ण झाला सेंसॉरला दाखवायला न्यायला टँक्सी चे पैसे नव्हते. राजकपूर आणि मेहुणा प्रेमनाथ नी डोक्यावरुन रिळे नेली. वितरकांसाठी ट्रायल शो ठेवला. शो सुरू झाला आणि एक वितरक दहा मिनीटात झोपला. राजकपूर निराश झाले पण तासाभराने तो वितरक उठला. स्क्रिनींग बंद करायला सांगितले आणि राजकपूर ना सांगितले हा सिनेमा मी घेतला. पुढचा सिनेमा सुरु कर मी पाच लाखाची मिनिमम गँरेंटी देतो. बाबुभाई शहांनी चांदीचा रूपया देऊन मुंबई सर्कल ला विकत घेत असल्याचे सांगितले. तेव्हापासून ते आर.के.फिल्मस् चे मुंबईतील वितरक बनले. मेरा नाम जोकर रिलीज व्हायच्या आधी त्यांचे निधन झाले. मिनीमम् गँरेंटी देणारे होते व्ही.व्ही.पुरी जे नंतर इंडिया टुडे चे मालक झाले. आग सतरा आठवडे चालला. हुरूप आलेल्या राजकपूर नी पुढला सिनेमा जाहीर केला बरसात. बरसात चे बजेट सहा लाख ओलांडून गेले. जद्दनबाई (नर्गिस ची आई) ने नर्गिसला आऊट डोअर शूटींगला काश्मीर ला जायला मनाई केली. राजकपूर आणि कँमेरामन जाल मिस्त्री नी काश्मीर चा बँकड्रॉप शूट केला आणि महाबळेश्वर मधे शूटींग केले. याच सुमारास शैलेंद्र राजकपूर च्या टीम मधे आले. या आधी आग साठी राजकपूर बोलावले होते पण शैलेंद्र नी नकार दिला .राम गांगुली बरोबर झालेल्या तीव्र मतभेदांमुळे त्याना काढून शंकर जयकिशन कडे संगीत दिले. इथूनच एका संगीतमय युगाची सुरुवात झाली.

 

अतिशय मोहक चाली शंकर जयकिशन नी दिल्याच पण लतादिदींना हाय पिचवर गायला लावले. बरसात ची गाणी रेडियो सिलोनवरून वाजायला लागली आणि रसिक वेडे झाले. बरसात च्या रेकॉर्डस चा खप इतका वाढला की एच.एम.व्ही च्या डमडम फँक्टरी ला बाकीच्या रेकॉर्डस ची कामे बाजूला ठेवायला लागली. बरसातच्या रिलीज नंतर पत्रकार लेखक रामानंद सागर, अभिनेत्री निम्मी, शंकर जयकिशन प्रकाशात आले. बरसात कलकत्ता येथे सलग दोन वर्षे चालला. अनेक ठिकाणी रौप्य महोत्सवी ठरला. बरसात ने त्या काळी एक कोटीचा धंदा केला. बरसात च्या वेळी राजकपूर नी स्वतःचा मिचेल कँमेरा विकत घेतला. बरसात ची लोकप्रियता इतकी वाढली की लाल दुपट्ट्यांची विक्री वाढल्याने एका कापड गिरणीला नवीन साचे बसवायला लागले. तसेच पुण्यात गणपतीच्या मुर्ति बरसातच्या देखाव्यावर (आर.के.चे बोधचिन्ह ) तयार केल्या होत्या. बरसात नंतर साहसी राजकपूर नी ठरवले पुढला सिनेमा स्वतःच्या स्टुडियोत. पिता पुत्र संबंधित एक कथा के.ए.अब्बास नी लिहीली होती. बी.आर.चोप्रा नी त्यावर सिनेमा काढायचे ठरवले पण बरेच दिवस काहीच केले नाही. ती कथा राजकपूर नी ऐकली आणि अब्बास ना सांगितले ही कथा मी घेतली. प्रमुख भुमिकेसाठी पापाजींना ऑफर दिली. आधी ते तयार नव्हते पण राजकपूर नी समजावले की यात राजकपूर ची भुमिका नायकाच्या मुलाची आहे. मग ते तयार झाले. नर्गिस, के.एन.सिंग, लिला चिटणीसना करारबद्ध करून दादरच्या रंगमहाल स्टुडियोत शूटींग सुरू केले. मध्यंतरा पर्यंत चा भाग रंगमहाल मधे घेतला आणि ड्रिम सिक्वेन्स नव्याने उभारत असलेल्या आर.के. स्टुडियोत घ्यायचे ठरवले. या ड्रिम सिक्वेंस वर एवढा खर्च केला की त्या पैश्यात नवा सिनेमा तयार झाला असता. पत्रकारांना सेटवर नेण्याची प्रथा ड्रिम सिक्वेंस पासूनच सुरू झाली. त्यावेळी भारत आणि साम्यवादी देशात सर्वसामान्य माणसाची असलेली परिस्थिती या सिनेमात इतकी अचूक दाखवली की सामान्य माणसाला आपले प्रतिबिंब त्यात दिसले. अप्रतिम संगीत, सरस अभिनय यामुळे आपल्या देशात हा सिनेमा यशस्वी झाला इतकेच नाही रशिया आणि इतर साम्यवादी देशात हिंदी सिनेमे लोकप्रिय झाले. आवारा पासून. तेव्हापासून आजपर्यंत राजकपूर ची लोकप्रियता अद्याप कायम आहे.

 

आवारा पासून आर.के.ची टीम परिपुर्ण झाली.  कँमेरामन राघू कर्मकार, कलादिग्दर्शक मुरलीधर आचरेकर, संकलक जी.जी.मयेकर, जयवंत पाठारे ऑफिस मँनेजर रामन , शंकर जयकिशन, शैलेंद्र,हसरत ही सगळी आर.के.च्या पे रोलवर आली. आवारा नंतर आह या कलात्मक सिनेमावर आपले लक्ष राजकपूर नी केंद्रित करायचे ठरवले आणि आपल्या सहाय्यकांना दिगदर्शनाची संधी द्यायचे ठरवले. राजा नवाथे आह चे दिग्दर्शन करणार होते. प्रकाश अरोरा बूटपॉलिश चे आणि अमरकुमार अब दिल्ली दूर नही चे. टी.बी.च्या भयानक रोगाने पछाडलेल्या नायकाची कथा असलेल्या आह वर देवदास ची छाप होती. राजकपूर ,नर्गिस , प्राण आणि विजयाशांती यांच्या सरस भुमिका, शैलेंद्र हसरतची अप्रतिम गाणी, शंकर जयकिशन चे मधुर संगीत लाभूनही आह प्रेक्षकांनी नाकारला. शेवट बदलून पण चालला नाही. हे अपयश राजकपूर ना खूप लागले. प्रकाश अरोरानी दिग्दर्शित केलेल्या बूटपॉलिश ची ट्रायल पहाताना राजकपूर ना जाणवले की सिनेमा एखाद्या डॉक्युमेंटरी सारखा झाला होता. आधी हा सिनेमा सॉंगलेस होता. राजकपूर नी गाणी टाकायचा निर्णय घेतला. शंकर जयकिशन नी फक्त २० दिवसात अप्रतिम संगीत दिले. यात पहिल्यांदाच तलत मेहमूद आणि आशा भोसले आर.के.फिल्मस साठी गायले. कान्स फिल्म फेस्टिवल ला या सिनेमाने पहिले बक्षीस मिळवले. बॉक्स ऑफिसवर पण चांगला धंदा केला. बूटपॉलिश पासून राज नर्गिस संबंध बिघडायला सुरुवात झाली. आपल्या अभिनयाला योग्य न्याय मिळत नाही अशी तिची धारणा होती. तिच्या साठी खास अजंठा या टेक्निकलर सिनेमाची घोषणा राजकपूर नी केली. सिनेमाचा आराखडा तयार झाला. पण हा सिनेमा फ्लोअर वर गेलाच नाही. त्या ऐवजी समाजाची दांभिकता दाखवणारा श्री ४२० सिनेमा राजकपूर नी सुरू केला. राजकपूर नी चार्ली चँप्लिन ची विदूषकाची प्रतिमा भारतीय पध्दतीने साकारायला सुरुवात केली ती पुर्णत्वाला नेली श्री ४२० मधे. शंकर जयकिशन चे ऐन बहरातले अविस्मरणीय संगीत, शैलेंद्र हसरत ची अप्रतिम गीते, राजकपूर, नर्गिस, नादिरा, ललिता पवार यांच्या सुंदर अभिनयाने या सिनेमाने कलात्मक उंची गाठलीच आणि लोकप्रियतेचा उच्चांक गाठला. यातले थीम सॉंग मेरा जूता है जपानी देशविदेशात इतके लोकप्रिय झाले की चीनचे पंतप्रधान चौ एन लॉय भारतात आले असताना हे गाणे ऐकायची इच्छा व्यक्त केली तेव्हा मुकेशला स्टेजवर जाऊन हे गाणे गायला लागले. शंकर जयकिशन ची गाणी अतिशय चांगल्या रितीने चित्रीत झाली होती.

शंभू मित्रा आणि अमीत मित्रा एक वेगळी कहाणी घेऊन आधी बिमल रॉय कडे गेले होते त्यांनी राजकपूर कडे जायला सांगितले. राजकपूर नी कथा ऐकल्यावर दोन अटी सांगितल्या एकतर मी दिग्दर्शन करीन तुम्ही काम करा किंवा तुम्ही दिग्दर्शन करा मी काम करीन. दुसरी अट या दोघांनी मानली. या ऑफबीट सिनेमाला संगीत द्यायला शंकर जयकिशन नी नकार दिला. या मुळे संगीत सलील चौधरी नी दिले. राजकपूर, मोतीलाल, नेमो, सुमित्रा देवी, प्रदिपकुमार , इप्तेकार असे दिग्गज कलाकार यात होते. शेवटचा एक डायलॉग सोडल्यास राजकपूर नी केलेला नि:शब्द अभिनय अप्रतिम होता. राजकपूर ची स्फूर्तीदेवता नर्गिस चे शेवटचे गाणे आर.के.फिल्मस् मघले शेवटचे दर्शन ठरले. या नंतर ती आर.के फिल्मस् आणि राजकपूर च्या जीवनातून गेली. सिनेमा अपयशी झाला. आर.के.फिल्मस ला १८ लाखाचा दणका मारून गेला. कार्लेव्ही वँली फेस्टिव्हल ला ग्रँड प्री अवॉर्ड मिळाल्यावर हा सिनेमा धंदा करून गेला. सिनेमाचे अपयश आणि नर्गिस चे जाणे यामुळे राजकपूर खचून गेलेयानंतर आलेला सिनेमा अब दिल्ली दूर नही उपेक्षेत गेला. आपल्या मुलावर झालेला अन्याय पंतप्रधानांना सागायला एक मदारी दिल्ली पर्यंत प्रवास करतो अशी कथा होती. रोमी, याकुब मोतीलाल आणि सुलोचना या कलावंतांची सुरेख कामे आणि दत्ताराम चे मधुर संगीतपण या सिनेमाला तारु शकले नाही. पंडित नेहरु या सिनेमात काम करणार होते पण त्यांच्या आजारामुळे डमी वापरावी लागली. सहा लाखाचा फटका आर.के. फिल्मस् ला बसला. नर्गिस सोडून गेलेल्या घक्यातून सावरायला खूप वेळ लागला. त्याला यातून बाहेर काढायला ह्रषिकेश मुखर्जी नी अनाडी चा रोल दिला. अनाडीतल्या कामाला फिल्मफेअर अवॉर्ड मिळाले. याच सुमारास छलिया, फिर सुबह होगी, परवरिश सिनेमातल्या कामामुळे राजकपूर चा आत्मविश्वास वाढला. डाकूंच्या शरणागती वर लिहिलेली अर्जुन देव रश्क यांच्या कथेवर जिस देश मे गंगा बहती है या सिनेमाची घोषणा राजकपूर नी केली. या वेळी दिग्दर्शन कँमेरामन राघू कर्मकार ना करायला सांगितले. शंकर जयकिशन नी या सिनेमाला पण संगीत द्यायला नकार दिला पण राजकपूर नी परत सिटिंग लावून गाण्याच्या जागा दाखवून दिल्यावर ते तयार झाले. पद्मीनी, प्राण, नाना पळशीकर, नायमपल्ली, चंचल, ललिता पवार आणि राजकपूर यांनी जबरदस्त कामे केली. शैलेंद्र हसरतची गीते आणि शंकर जयकिशन च्या सुंदर संगीताने नटलेला हा सिनेमा आजही ताजा वाटतो. संकलक मयेकर आजारी होते म्हणून राज कपूर नी स्वतः संकलन केले. पण एडिटर गिल्ड ची मान्यता नसल्याने मयेकरांचे नाव टायटल्स मधे आहे. कलकत्ता प्रिमीयरला जाणीव पुर्वक प्रोजेक्टर चा स्पिड वाढवून सिनेमा पाडायचा प्रयत्न फसला. राज कपूर नी विरोधकांना सडेतोड उत्तर दिले. या सिनेमाच्या यशाने सबंध आर.के.टीम ला हुरूप आला. फोटोग्राफी साठी फिल्मफेअर न मिळाल्याने नाराज झालेल्या तारु दत्त ना राजकपूर नी नवी कोरी फियाट गाडी घेऊन दिली.

मेरा नाम जोकर चा विषय १९५२ पासून राजकपूर च्या डोक्यात होता. त्याचा विचार राजकपूर नी परत सुरु केला पण मधेच संगम ची कथा जी आधी घरोंदा नावाने होती समोर आली. मेहबूब खान च्या अंदाज वर आधारलेल्या या सिनेमासाठी दिलिपकुमार आणि नर्गिस ला ऑफर दिली पण दोघांनी नकार दिल्याने राजेंद्रकुमार आणि वैजयंतीमाला यांना बोलावले. मूळ ब्लँक अँंड व्हाईट सिनेमा टेक्निकलर मधे घ्यायचे ठरले. या साठी कँमेरामन राघू कर्मकार ना लंडन ला टेक्निकलर फोटोग्राफी शिकायला पाठवले. परदेशात चित्रण करायची पध्दत संगम पासून सुरु झाली. दोन मध्यंतर असलेला चार तासाचा हा सिनेमा सरस दिग्दर्शन, सुरेख भुमिका , देखणे छायाचित्रण, अवीट गीते आणि संगीत आणि स्वतः राजकपूर नी केलेले कुशल संकलन यामुळे रशिया , इराण सकट भारतात पण अनेक ठिकाणी सुवर्ण महोत्सवी ठरला. संगम ने अफाट पैसा दिला पण इन्कमटँक्स ने घातलेल्या धाडीत बेहिशोबी तीस लाख रुपये आर.के. स्टुडियोत सापडले. राज कपूर हादरले पण राजकीय ओळखीमुळे त्यातून सुटले. त्याच वर्षी पुण्याजवळ उरळी कांचनला १०० एकर जमीन राजकपूर नी घेतली. १९६४ साली भारतातील करोडपतींची यादी जाहीर झाली. त्यात राजकपूर चा नंबर आठवा होता. संगम ने यश, पैसा दिला पण वैजयंतीमाला नावाच्या वादळाने घर उध्वस्त केले. पत्नी मुलांसोबत घर सोडून गेली. अनेकांच्या मध्यस्थी ने परत आली. अश्या वातावरणात मेरा नाम जोकर ची निर्मिती सुरू झाली. आधी हा सिनेमा तीन भागात तयार व्हायचा होता. १९६६ ला शैलेंद्र गेला त्याने लिहिलेले अपुरे थीम सॉंग त्याच्या मुलाने शैली ने पुर्ण केले. रशियन सर्कस बोलावली. इथल्या हवामानाशी जुळवून घेताना रशियन कलाकार आणि प्राण्यांना खूप त्रास झाला. सबंध सर्कस एयर कंडिशन करावी लागली. पद्मिनी लग्न करून अमेरिकेत जाणार होती. त्यामुळे तिसरा भाग आधी शूट करावा लागला. दोन वर्षात पुरा करायच्या सिनेमाला सात वर्ष लागली. संकलनात सिनेमा घसरला. ट्रायल शो च्या वेळीच राजकपूर ना समजले हा सिनेमा चालणार नाही. तसेच झाले. यातला पहिला भाग अप्रतिम होता. दुसऱ्या भागात सिनेमा संपवला असता तर तो अविस्मरणीय झाला असता. हा सिनेमा दणदणीत आपटला. राजकपूर ना ६८ लाखाचा फटका बसला. सर्वोत्तम दिग्दर्शनाचे मिळालेले फिल्मफेयर , पेरुग्वे ला ५० आठवडे मिळालेले यश, इस्त्रायल ला २५ आठवडे मिळालेले यश ही दु:खात मिळालेली सुखद झुळुक. ८० च्या दशकात काटछाट करून लांबी कमी केलेल्या मेरा नाम जोकर यशस्वी झाला. राजकपूर च्या चाहत्यांना आजही हा कलात्मक सिनेमा आवडतो. या नंतर कल आज और कल हा कौटुंबिक सिनेमा राजकपूर नी निर्माण केला. तीन पिढ्यांचा संघर्ष यात दाखवला. रणधीरकपूर चा हा नायक आणि दिग्दर्शक म्हणून पहीला सिनेमा. आवारा सिनेमात कपूर घरातल्या चार पिढ्या होत्या. यात तीन पिढ्या होत्या. पापाजी, राजकपूर, रणधीरकपूर, बबीता, डेव्हिड असे कलाकार होते. संगीतकार जयकिशन या सिनेमा दरम्यान वारले.हा सिनेमा पण अपयशी ठरला. आर.के.ला. २८ लाखाचा फटका बसला. पापाजी कँंन्सर ने गेले. आठ दिवसात रमादेवी पण गेल्या. राजकपूर संपले ही भावना सिनेविश्वात होती.

नेक दिवस विचार करून जिद्दीने राजकपूर नी नवीन टीम घेऊन सिनेमा काढायचे ठरवले. शंकर जयकिशन ऐवजी लक्ष्मीकांत प्यारेलाल आले. ऋषी कपूर आणि नवी नायिका डिंपल कपाडिया या जोडीला सादर करणारा सदाबहार सिनेमा बॉबी ची निर्मिती सुरु झाली. राजकपूर नी आपले सर्वस्व पणाला लावले. शूटींग पुर्ण व्हायच्या आत डिंपल चे लग्न राजेश खन्ना बरोबर झाले. तिच्या तारखा मिळताना त्रास झाला. सगळ्या अडचणींवर मात करत बॉबी पुर्ण होऊन सेंसॉर झाला. पण जवळजवळ ३ महिने विकला गेला नाही. मुंबई टेरीटरी १२ लाखाला विकल्यानंतर बाकी टेरीटरी ना प्रत्येकी ३६ लाखाला विकला. रिलीज झाला आणि तुफान धंदा करून राजकपूर ना कर्जातून बाहेर काढले या सिनेमाने. सदाबहार सिनेमा काढून राजकपूर नी दाखवून दिले की ते संपले नाहीत. रणधीर कपूर दिगदर्शित घरमकरम या सिनेमात राजकपूर चे अभिनेता म्हणून शेवटचे दर्शन. यात पहिल्यांदाच आर.डी.बर्मन ने आर.के.फिल्मस् साठी संगीत दिले. रणधीरकपूर, रेखा, राजकपूर आणि प्रेमनाथ असूनही सिनेमा फारसा धंदा करु शकला नाही. या नंतरचा सत्यम शिवम सुंदरम . हा विषय पण १९५२ चा. एका कुरूप पण मधुर आवाजाच्या मुलीची कथा. शशीकपूर आर.के.फिल्मस् चा नायक म्हणून पहिल्यांदा या सिनेमात दिसला. नायिका होती झीनत अमान. लक्ष्मीकांत प्यारेलाल नी मधुर संगीत दिले. सिनेमा तयार करताना १८ लाखाचा सेट पुरात वाहून गेला. पूराचे चित्रण राजकपूर नी करून सिनेमात वापरले. झीनत च्या अंगप्रदर्शनाने हा सिनेमा वादात सापडला. या सिनेमाच्या दरम्यान गायक आणि राजकपूर चा जिवलग मित्र मुकेश गेला. अनेकांनी टिका करूनही अफाट धंदा या सिनेमाने केला. विधवा विवाहाची समस्या घेऊन काढलेला प्रेमरोग प्रेक्षकांना पसंत पडला पण पुरस्कारांचा सुध्दा मानकरी ठरला. शम्मीकपूर आणि नंदा पहिल्यांदाच आर.के.फिल्मस् मधे दिसले.

 

राजकपूर नी दिगदर्शित केलेला शेवटचा सिनेमा राम तेरी गंगा मैली. दम्याचा त्रास वाढला असताना डोलीत बसून गंगोत्री येथे सर्व शूटींग जिद्दीने राजकपूर नी केले. वादात सापडून पण ८० च्या दशकात सर्वाधिक धंदा करणारा सिनेमा होता राम तेरी गंगा मैली. शरीर साथ देत नसतानाही हीना ची घोषणा राजकपूर नी केली. एक गाणे पण रेकॉर्ड झाले. दिल्ली ला दादासाहेब फाळके पुरस्कार स्वीकारायला राजकपूर गेले. पुरस्कार घेताक्षणीच राजकपूर कोसळले. ऑल इंडिया मेडिकल इंस्टिट्यूट मधे दाखल केले. महिनाभराची झुंज २ जून ला संपली. राजकपूर गेले. यशस्वी अभिनेता बनून पण दिग्दर्शनाकडे कल होता या साठी राजकपूर नी स्वतः ची चित्रसंस्था काढली. अनेक बाबतीत ट्रेंड सेटर बनले. हॉलिवूड दर्जाचे सेट राजकपूर नी पहिल्यांदा आणले. कँमेरा साठी ट्रॉली वापरणारे राजकपूर पहिले, ड्रिम सिक्वेंस वर सिनेमा इतका पैसा उधळणारे राजकपूर, नर्गिसची साथ संपल्यावर तिची आठवण आयुष्यभर जपणारे, अनेकदा सेटबँक मिळूनपण प्रचंढ अहंकारामुळे जिद्दीने परत उभे रहाणारे राजकपूर, शंकर जयकिशन ना बाहेरच्या सिनेमात संगीत द्यायची मोकळेपणाने परवानगी देणारे, स्वतः उत्तम आवाज असूनही मुकेशलाच गाण्याची संधी देणारे, सबंध आर.के.चे कर्मचारी आपल्या घरातले मानणारे, अतिशय साधेपणे सर्वसामान्यांत मिसळणारे, चेंबूरचे वैभव असलेले महान राजकपूर ना माझी आदरांजली.

Vivek Puntambekar
+ posts

Science Graduate from Somayya College in the year 1977.

Started Carrier in Kohinoor Mills in SQC Dept. After the closer of mill, began carrier as a Medical Sales Representative.

Retired as Zonal Sales Manager. Since childhood fond of Films and film music.

Wrote programs for FM Radios. Wrote articles in various Diwali magazines.

Participated in Doordarshan program. Performing an audio visual programs based on Golden era of hindi music.

Regularly writing articles for newspaper. Die hard fan of Raj Kapoor and his entire team.

Leave a comment