– © विवेक पुणतांबेकर

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

परवाच युट्युबवर ‘तिसरी कसम’ (Teesri Kasam 1966 Hindi Film) हा अप्रतिम सिनेमा पाहिला. कितव्यांदा ते आठवावे लागेल. पण अनेकदा त्याचा शेवट पहाताना जसा गहिवरलो होतो, तसाच परवा पण गहिवरलो. तो सुवर्णकाळ आठवला. निर्माता, गीतकार शैलेंद्र, राज कपूर, दिग्दर्शक बासु भट्टाचार्य, कँमेरामन सुब्रातो गुहा, शंकर जयकिशन, हसरत जयपुरी, इप्तेकार, दुलारी ही मंडळी गेलीच नाहीत तर आपल्या मनात अमर आहेत. बरसात सिनेमापासून गीतकार बनलेले शैलेंद्र आवारा पासून सिनेविश्वात स्थिरावले. लेखक फणीश्वर रेणु यांनी १९५४ साली एक लघुकथा लिहीली मारे गये गुलफाम. ही कथा वाचून शैलेंद्र (Lyricist Shailendra) झपाटून गेले. यावर एक उत्तम सिनेमा काढावा असा विचार अनेक वर्षे त्यांच्या डोक्यात घोळत होता. भांडवला अभावी अनेक वर्षे हा विचार मागे पडला. १९६१ साली या सिनेमाची निर्मिती करायचीच असे ठरवून शैलेंद्र नी स्वतः ची इमेज मेकर ही फिल्म कंपनी स्थापन केली. (Making of 1966 Hindi film Teesri Kasam Produced by Lyricist Shailendra and Directed by Basu Bhattacharya)

महालक्ष्मी येथील फेमस स्टुडिओत शैलेंद्र नी ऑफिस घेतले. एक साधा भोळाभाबडा गाडीवान हिरामन आणि नौटंकी हिराबाई यांच्या अपयशी प्रेमकहाणी वर आधारित असलेल्या या सिनेमात मेहमूद आणि मीनाकुमारी यांना घ्यायचा विचार शैलेंद्र करत होते. एके दिवशी नेहमीप्रमाणे रात्री चेंबूरमध्ये आर.के. कॉटेज मध्ये राजकपूर बरोबर बसले असतानाच शैलेंद्रनी राजकपूर ना आपण सिनेनिर्मित उतरणार असल्याचे सांगितले. राजकपूर नी अनेकदा शैलेंद्र ना समजावून सांगितले की सिनेनिर्मिती तुमचे काम नाही. पण शैलेंद्र हट्टालाच पेटले होते. शेवटी राजकपूर नी कथा ऐकवायला सांगितली. कथा ऐकल्यावर शैलेंद्र नी सांगितले मेहमूद मीनाकुमारी अशी स्टारकास्ट घ्यायचे मनात आहे. राजकपूर भडकले. इथे मी असताना तुला मेहमूद कशाला हवा आहे?? स्टार व्हँल्यू असलेला हिरो असेल तरच फायनान्सर मिळतात. शैलेंद्र ना राजकपूर यांचे सांगणे पटले होते. पण राजकपूर यांची मार्केट प्राईज शैलेंद्र ना परवडणारी नव्हती. ते गप्प बसले. राजकपूर नी सांगितले कविराज आपकी फिल्म मे बिना पैसे काम करूंगा. मीनाकुमारी को पुछो क्या वह मेरे साथ काम करेगी? मीनाकुमारी चे सगळे व्यहवार कमाल अमरोही पहात. त्यांनी नकार दिला. मग वहिदा ला विचारले. तिने होकार दिला. संगीताची जबाबदारी शंकर जयकिशन नी उचलली ती पण अगदी नाममात्र मानधन घेऊन. राजकपूर वहिदा रेहमान आणि शंकर जयकिशन ला घेऊन शैलेंद्र सिनेमा निर्माण करत आहेत हे समजल्यावर देशभरातल्या वितरकांनी शैलेंद्र कडे पैसै जमवायला सुरुवात केली.

Making of 1966 Hindi film Teesri Kasam Produced by Lyricist Shailendra
Lyricist Shailendra

आठवड्याभरात एक लाख रुपये जमा झाले. बासु भट्टाचार्य कडे दिग्दर्शन दिले. बासु भट्टाचार्य बिमल रॉय यांचे सहाय्यक होते आणि ती नोकरी पण शैलेंद्र यांच्या शिफारसी मुळेच मिळाली होती. नबेंदु घोष ज्यांनी देवदास, सुजाता बंदिनी ची पटकथा लिहिली होती त्यांनाच तिसरी कसम ची पटकथा लिहायला सांगितले. संवाद फणीश्वर रेणु यांचे होते .सुब्रातो मित्रा जे सत्यजित रे यांचे फोटोग्राफर होते त्यांना फोटोग्राफर नेमले. आर.के.फिल्म चे संकलक जी.जी.मयेकर तिसरी कसम चे संकलक होते. लच्छु महाराज कोरिओग्राफर होते. बासु चटर्जी ज्यांनी आपले करिअर करंट पेपरमध्ये कार्टूनिस्ट म्हणून सुरु केले होते ते बासु भट्टाचार्य यांचे चीफ असिस्टंट बनले. कँंटीन मध्ये चहावाला म्हणून करिअर सुरु करुन सहाय्यक दिग्दर्शक झालेले बी.आर.इशारा पण बासु भट्टाचार्य यांचे सहाय्यक बनले. सिनेमातल्या इतर पात्रांची निवड सुरु झाली.

Making of 1966 Hindi film Teesri Kasam Produced by Lyricist Shailendra
Raj Kapoor and Waheeda Rehman in Teesri Kasam

दुलारी,इप्तेकार, दुबे, केश्तो मुखर्जी, ए.के. हनगल यांची निवड झाली. राजकपूर नी आपला ड्रिम प्रोजेक्ट संगम सुरू केला होता. साहजिकच यातून वेळ मिळेल तेव्हाच ते उपलब्ध होणार याची कल्पना त्यांनी शैलेंद्र ना दिली होती. त्याप्रमाणे पहिले इनडोअर शूटिंग चे श्यूड्युल मोहन स्टुडिओत आयोजित केले होते. सुब्रातो मित्रा कँमेरा यंत्रामध्ये ज्ञानी आणि परफेक्शनिस्ट होते इतके की कोडँक फिल्म कंपनी नवे इमल्शन बाजारात आणायच्या आधी सुब्रातो मित्रांचा सल्ला घेत असे. अश्या प्रायोगिक ज्ञानी कँमेरामन बरोबर जुळवून घेणे राजकपूर ना कठीण गेले. तशातच मोहन स्टुडिओत उभारलेल्या सेटवर भिंतीवर सुब्रातो नीं पांढरे कागद लावले. सगळ्यांना घक्का बसला. राजकपूर नी विचारले यह क्या कर रहे हो? सुब्रातो नी सांगितले बाऊसिंग लाईट चाहीये. अतिशय नाराजीने राजकपूर नी पहिला शॉट दिला. रात्री रश प्रिंट पहाताना सुब्रातो चीं कमाल पडद्यावर पाहिल्यावर राजकपूर खुश झाले. त्यांनी मुद्दाम आपला कँमेरामन राघू कर्मकार बोलावून पुन्हा पुन्हा शॉटस् दाखवले. पहिले शेड्युल पार पडले. सजन रे झुट मत बोलो गाण्याचे शूटिंग गोरेगावच्या आरे कॉलनीतील रस्त्यावर केले गेले. बासु भट्टाचार्य जरी बिमल रॉय चे सहाय्यक होते तरीही सेटवर कधीच न गेल्यामुळे शूटिंग कसे होते, शॉट कसे घेतात याची त्यांना कल्पनाच नव्हती. बी.आर.इशारा यांनी डायलॉग डायरेक्टर, सहाय्यक तसेच सेन्सॉर स्क्रिप्टवर काम केलेले असल्याने एडिटिंग चे पण ज्ञान होते. त्यामुळे बासु भट्टाचार्य यांनी एखादा कँमेरा अँंगल सांगितला की सुब्रातो बी.आर. इशारा यांचाच सल्ला घेत. ही गोष्ट बासु भट्टाचार्य ना आवडत नसे. पण इलाजच नव्हता. तशातच बिमल रॉय यांची मुलगी रिंकी बरोबर बासु चे प्रेमप्रकरण सुरू होते. बिमल रॉय यांचा विरोध असतानाही दोघांनी पळून जाऊन लग्न केले. या मुळे बिमल रॉय आणि शैलेंद्र यांच्यात वितुष्ट आले.

वहिदा ची एक तारीख अचानक मिळाली म्हणून एक सीन शूट करायचे ठरवले. संवाद लेखक बाहेरगावी गेले होते म्हणून शैलेंद्र नी बी.आर.इशारा ना सीन लिहायला सांगितला. आठ दिवसानंतर त्यांनी सीन लिहीला. यात एजंट दुबे वहिदा ला सांगतो कही ऐसा न हो की हिरादेवी को पूजनेवाला कोई न हो और हिराबाई को देखनेवाला न हो. शैलेंद्र नी मुद्दाम हा सीन राजकपूर ना दाखवायला सांगितला. सीन वाचून राजकपूर इतके खुश झाले की बी.आर.इशारा चा हात घरून सबंध आर.के.स्टुडिओत फिरुन ज्याला त्याला सांगत सुटले पहा हा लहान असून किती सुंदर सीन लिहीतो. अतिशय बिझी शेड्युल असनही राजकपूर नी कधीच शूटिंग ची तारीख रद्द केली नाही किंवा शूटिंग ला उशिरा पण आले नाहीत. खर म्हणजे दुपारी दोन च्या आधी ते कुठल्याही सेटवर जात नसत पण शैलेंद्र साठी ते वेळेवर येत. भोपाळ च्या आऊटडोअर शूटींग साठी सूर्योदयाचा शॉट हवा होता. सकाळी सहा वाजता राजकपूर हजर होते.

चलत मुसाफिर गाण्याचे शूटिंग आर.के.स्टुडिओत व्हायचे होते. कोरस शॉट घ्यायचा होता. राजकपूर कोरसमध्ये कसे येतील अशी शंका बासु भट्टाचार्य ना होती. पण निरोप पाठवताच ते सेटवर आले आणि कोरस शॉट देऊन गेले. एरव्ही सेटवर बसून राजकपूर पत्ते खेळत. पण शॉट आला की लगेच शॉट देत. तो किती प्रभावी असायचा हे एडिटिंग च्या वेळी सहाय्यक दिग्दर्शक बासु चटर्जी ना कळायचे. खेडवळ गाडीवान तिरके चालतात म्हणून सबंध सिनेमात राजकपूर यांनी आपली चाल तिरकी ठेवली. डबिंग करताना माईकभोवती गोल गोल फिरूनही अप्रतिम डबिंग करत. खरे सांगायचे म्हणजे ते हिरामन ची भुमिका जगले. तितकीच मेहनत वहिदा पण घेतली. नौटंकी चे डान्सेस शंकर शंभू याच्याकडून शिक्षण घेऊन जबरदस्त साकारले. फक्त तिला बासु भट्टाचार्य ची दिग्दर्शनाची शैली अजीबात पटली नाही. शॉट घ्यायला खूप वेळ घालवायचा. त्याला काय अपेक्षित आहे हे सांगताच येत नसे. (© विवेक) एकदा तर वहिदाने राजकपूर कडे तक्रार करून सांगितले आप कुछ बोलो. वरना मुझे काम छोडना पडेगा. राजकपूर आणि शैलेंद्र नी समजावल्यावर वहिदा शांत झाली.

चित्रनिर्मीती चा अनुभव नसल्यामुळे शैलेंद्र ना प्रचंढ मनस्ताप सहन करावा लागला. गीतलेखनातून मिळालेला पैसा ते सिनेमात घालत होते. ते स्वभावाने साधे होते. याचा गैरफायदा त्यांच्या नातेवाईकांनी घेतला. निर्मिती प्रमुख असलेला त्यांचा मेहुणा संतोष आणि त्यांच्या सावत्रभावाने जबरदस्त डल्ला मारला. ए.के.हनगल यांचा शिवणकामाचा घंदा होता. त्यांच्या कडून दहा सूटस् शिवून घेतले. वास्तविक सिनेमात कोणताही सूटबुटाचा सीन नाही. बरेच दिवस वाट पाहून हनगल यांनी शैलेंद्र कडे पैसे मागितले. तेव्हा ही गोष्ट समजली. आऊटडोअर शूटींग साठी मध्यप्रदेशातील बीना इथला स्पॉट मुद्दाम निवडला कारण शैलेंद्र च्या मेहुण्याची प्रेयसी तिथली होती. शैलेंद्र च्या पैश्यावर स्वतः चे अफेयर आणि मौजमजा त्याच्या मेहुण्याने संतोष ने केली. फणीश्वर रेणू यांच्या औराही हिंगना गावात बरेचसे आऊटडोअर शूटींग झाले. यातल्या बैलांच्या शर्यतीसाठी संतोष ने बैल विकत घ्यायला लावले. त्याची निगा राखायला एक माणूस नेमला. बैलांच्या रोजच्या खाण्यावर इतका खर्च व्हायला लागला की शेवटी देखरेख करणा-या माणसालाच ती जोडी विकावी लागली. या आतबट्ट्याच्या व्यहवारात शैलेंद्र ना वीस हजाराचा फटका बसला.

गुलाब बाग मेळ्यातल्यी भारत नौटंकी कंपनी, गढबनैली रेल्वे स्टेशन इथेही काही सीन्स घेतले. गढबनैली स्टेशनावर सिनेमाचा क्लायमॅक्स शूट झाला. हिराबाई जायला निघाल्याचे कळल्यावर बेभान झालेला हिरामन स्टेशनवर पोहोचतो हा सीन शूट करताना राजकपूर मरता मरता वाचले. विरुद्ध बाजूकडून येत असलेल्या गाडीच्या ड्रायव्हर ने ब्रेक लावला नसता तर ते गाडीखाली आले असते. कर्जाचा डोंगर वाढतच होता. देणेकरी चकरा मारत होते. रिमझिम बंगला गहाण पडला होता. यात भरीस भर म्हणजे बासु भट्टाचार्य ने पैसे वाढवून मागितले. शैलेंद्र पैसे द्यायला असमर्थ होते. बासु काम सोडून निघून गेला. वास्तविक शैलेंद्र मुळे तो डायरेक्टर बनला ही गोष्टच विसरला.

शंकर जयकिशन आगळेवेगळे संगीत अतिशय छान दिले. एकूण दहा गाणी स्वरबध्द केली. लाली लाली डोलियामे लायी रे दुल्हनीया आणि सजनवा बैरी हो गये हमार ही दोन गाणी लोकसंगीतावर आधारलेली होती. लाली गाण्याच्या चित्रणात शैलेंद्र ची पाचही मुले दिसतात. शैली, अमला, मनोज, दिनेश आणि गोपा. पान खाये सय्या हमारो या गाण्याचा मुखडा मजरुह सुलतानपुरी यांनी लिहीला होता. संगीतकार सचिन देव बर्मन ना पान खायची अतिशय आवड होती. त्याच्या कुर्त्यावर पानाचे डाग पडलेले असायचे. त्यांना पाहून मजरुह ना या ओळी सुचल्या होत्या. शैलेंद्र ना हा मुखडा अतिशय आवडला. त्यांनी मजरुह यांची परवानगी घेऊन अंतरे लिहीले. आशा भोसले यांची दोन्ही गाणी विलक्षण होती. सगळीच गाणी अप्रतिम होती. शैलेंद्र आणि हसरत ची प्रतिभा बहरात होती. तसे पहायला गेले तर शंकर जयकिशन नी आशाताई ना कमी गाणी दिली. पण जी दिली तीचे आशाताई नी सोने केले. संकलक मयेकर आर.के.फिल्मस् मधून मतभेद झाल्यामुळे बाहेर पडले. बासु भट्टाचार्य पण सिनेमा अर्धवट सोडून गेले. शेवटी बासु चटर्जी आणि बी.आर.इशारा यांनी सिनेमा दिग्दर्शन संभाळले. राजकपूर आणि बी.आर.इशारा यांनी संकलन पुर्ण केले. १९६२ ला सुरू झालेला हा सिनेमा १९६६ ला तयार झाला.

खास वितरकांसमोर ट्रायल ठेवली. पण बहुतेकांना हा सिनेमा आवडला नाही. राजकपूर वहिदा रहमान सारखे नामवंत कलाकार असूनही हा चाकोरी बाहेरचा सिनेमा वितरणाला घ्यायला कोणीच तयार होईनात. त्यातून रंगीत सिनेमाचा ट्रेंड सुरु झाला. राजकपूर नी सुचवले शेवट बदलून सुखांत कर. मी आर.के.फिल्मच्या बँनरखाली सिनेमा रिलीज करतो. शैलेंद्र याला तयार नव्हते. शेवटी कसेबसे वितरक मिळाले. पण सिनेमा आपटला. मुंबईत गायक मुकेश ने हा सिनेमा वितरणाला घेतला. रॉक्सी थिएटरमध्ये रिलीज केला. अकरा आठवडे सिनेमा चालला. तेव्हढ्यात हिंदी सिनेमा विरोधी आंदोलन सुरु झाले. याचा फटका तिसरी कसम ला बसला. सिनेमा थिएटरमधून काढून घ्यायला लागला.

आर्थिक फटका, जवळच्या नातलगांनी केलेली दगाबाजी यामुळेच शैलेंद्र नैराश्यात गेले. यामुळे त्यांचे मद्यपान अतोनात वाढले. तिसरी कसम नंतर मैला आंचल या सिनेमांची घोषणा त्यांनी केली होती. पण ते स्वप्नच ठरले. जुवेल थीफ साठी गाणी लिहायला देवानंद नी बोलावले. पण रूला के गया सपना मेरा हे एकच गाणे लिहून दिले आणि दुसरा गीतकार शोधा असे देवानंद ना सांगितले.

तब्येतीकडे दुर्लक्ष केले. १३ डिसेंबर १९६६ ला तश्या अवस्थेत शैलेंद्र आर.के.स्टुडिओत आले. काही काळ आपल्या आवडत्या खुर्चीवर बसले आणि तिथूनच हॉस्पिटलमध्ये गेले. १४ डिसेंबर च्या दुपारी, राजकपूर यांच्या वाढदिवसा दिवशीच शैलेंद्र ने या जगाचा निरोप घेतला. शैलेंद्र ना खात्री होती की सिनेमा ला नक्कीच पारितोषिक मिळेल. तसेच झाले. ते गेल्यानंतर राष्टपती पदक तिसरी कसम ला मिळाले.

नंतर उत्तर प्रदेशात आणि बिहार मध्ये हा सिनेमा जबरदस्त चालला. शैलेंद्र चे कर्ज फिटले. पाचही मुलांचे शिक्षण तिसरी कसम च्या रॉयल्टी तून झाले. शैली वडिलांच्या पायावर पाऊल टाकून गीतकार बनला पण फारसे यश मिळवू शकला नाही. दिनेश सिनेमात सहाय्यक दिग्दर्शक होता. मनोज अमेरिकेत स्थायिक झाला. मोठी कन्या अमला इस्ट वेस्ट एयरलाईन्स ला एक्झिक्युटिव्ह होती. मोठा शैली आणि घाकटी गोपा आता या जगात नाहीत. १९७२ ला दूरदर्शन केंद्र मुबंईत सुरु झाले तेव्हा पहिला सिनेमा तिसरी कसम दाखवला. इतकेच नाही राजकपूर यांच्या अंत्यसंस्कारा दिवशी त्यांना श्रध्दांजली म्हणून तिसरी कसम दाखवला. असे कलात्मक अविस्मरणीय सिनेमे आता बनणार नाहीत.

Vivek Puntambekar
+ posts

Science Graduate from Somayya College in the year 1977.

Started Carrier in Kohinoor Mills in SQC Dept. After the closer of mill, began carrier as a Medical Sales Representative.

Retired as Zonal Sales Manager. Since childhood fond of Films and film music.

Wrote programs for FM Radios. Wrote articles in various Diwali magazines.

Participated in Doordarshan program. Performing an audio visual programs based on Golden era of hindi music.

Regularly writing articles for newspaper. Die hard fan of Raj Kapoor and his entire team.

Leave a comment