-धनंजय कुलकर्णी 

चौदा विद्या आणि चौंसष्ट कलांचा अधिपती गणराय याचे आज घरोघरी आगमन झाले आहे. महाराष्ट्रासाठी हा जनोत्सव आहे. या गणरायाचे प्रतिबिंब भारतीय सिनेमात ठळकपणे पडलेले दिसते.भारतीय सिनेमाची मायानगरी हि मुंबई असल्याने इथल्या गणेशोत्सवाला रूपेरी पडद्यावर सातत्याने स्थान मिळते. (On the Auspicious Ganesh Chaturthi Revisiting Ganesh Festivals and Ganpati Songs in Hindi and Marathi Cinema)

सिनेमातील गणेशाबाबत आपण जेंव्हा विचार करू लागतो तेंव्हा एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येते की इतर देवदेवतांच्या चित्रपटासारखे चमत्कार या सिनेमात कधी नसतात. ‘गणेश चित्रपटां’चं वैशिष्ट्य असं, की त्यांमध्ये बटबटीतपणा नसतो. भोळ्याभाबड्या प्रेक्षकांच्या मनामध्ये भोळाभाबडा भक्तिभाव निर्माण करणारे हे चित्रपट आहेत. बहुतेक ‘गणेश चित्रपटां’ मध्ये गणरायांभोवती कथा गुंफलेली असते, त्यामुळे देवाचं गुणगान त्यांच्यात उगीचच घुसडल्यासारखं वाटत नाही. या चित्रपटातले चमत्कार असल्रेच तरी हे हास्यास्पद, अचाट नसतात. बऱ्याचदा देव मृत व्यक्तीला जिवंत करतो, महाप्रचंड रूप घेतो, अचंबित करणारे चमत्कार करतो, असं चित्रपटांत दाखवलं जातं. गणेश चित्रपट मात्र त्याला अपवाद आहेत. त्यात चमत्कार अर्थातच आहेत; पण ते अविश्‍वसनीय वाटत नाहीत. त्यामुळेच गणपती हा युजर्स फ्रेंडली वाटतो.

मराठी चित्रपटातून बाप्पा पूर्वीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. १९७८ साली सचिनने ’अष्टविनायक’ हा चित्रपट बनविला त्याची कथा गणेशाभोवती फिरणारी होती. यात शेवटी १३ मिनिटांचं ’अष्टविनायका तुझा महिमा कसा’ हे गीत त्या काळातील सर्व नामवंत व श्रेष्ठ कलाकारांना घेवून चित्रीत झालं होतं. गंमत म्हणजे या गाण्याचे गीतकार जगदिश खेबुडकर यांनी तोवर अष्टविनायकाची यात्रा देखील केली नव्हती. पुलंचा पन्नासच्या दशकात ’सबकुछ पुलं’ असा ’गुळाचा गणपती’ हा चित्रपट आला होता. अवधूत गुप्ते यांनी मोरया या चित्रपटात गणेश स्तवनाची एक कव्वालीच बनवली होती. त्या कव्वालीचे बोल होते ‘हे लंबोदर गजमुख मेरे मोरया मेरे मालिक मेरे मौला मोरया’.

अजय अतुल यानी ’उलाढाल’ या सिनेमातील ’मोरया मोरया’ने तर आधीचे सारे विक्रम मोडीत काढले. हिंदी सिने कलावंताच्या घरचा गणेशोत्सव खूप लोकप्रिय आहे.  1951 साली ‘श्री गणेश जन्म’ याच नावाने हिंदी चित्रपट निघाला होता. त्यामध्ये निरुपा रॉय, त्रिलोक कपूर, जीवन, उल्हास आदी प्रमुख कलाकारांनी काम केले होते. त्याला संगीत दिले होते खेमचंद प्रकाश आणि मन्ना डे यांनी. या चित्रपटात श्री गणेश आणि त्याचे पिताश्री शंकर यांच्याशी संबंधित तब्बल बारा गाणी होती. त्यातले “जय गणपती, विजय हमारी हो’ हे भजनाच्या रूपातील गाणे सुलोचना कदम यांनी गायले होते.

हिंदी सिनेमात अलीकडे गणपतीच्या गाण्यांची संख्या वाढू लागली आहे. १९७९ साली आलेल्या ’हम से बढकर कौन’ या सिनेमातील ’देवा हो देवा गणपती देवा’ हे गाणं रफीने गायलं होतं आणि अमजद खान वर चित्रीत झालं होतं. १९८० सालच्या ’टक्कर’ सिनेमात ’मूर्ती गणेश की अंदर दौलत देशकी’ या गाण्यावर संजीवकुमार व जितेंद्र थिरकले खरे पण साउथचा शिक्का या गाण्यावर दिसतो. मुंबईतला भव्य आणि दिव्य गणेशोत्सवाचे आकर्षण अलम दुनियेला आहे.

१९८२ साली आलेल्या ’दर्द का रिश्ता’ या चित्रपटात भव्य विसर्जन मिरवणूक दाखवत एक अत्यंत भावस्पर्शी गाणं चित्रीत केलं होतं. ’मेरे मन मंदीर मे तुम भगवान रहे मेरे दुख से तुम कैसे अन्जान रहे’ पंचमच्या संगीतात हे गाणे हरीहरन ने गायले होते. सुनील दत्त वर चित्रित हे गीत आजही पापण्या ओलावून जाते. अमिताभच्या अग्नीपथ (१९९०) मध्ये ’गणपती अपने गांव चले’ या गीतात मिथुनचाही सहभाग होता.

इतर काही गाण्यांमध्ये ’मोरया रे’ (डॉन), तेराही जलवा (वॉन्टेड), गा गा गा गणपती (एबीसीडी), सिंदूर लाल चढाओ (वास्तव), श्री गणेशाय धीमही (विरूध्द), देवा श्री गणेशा (अग्नीपथ), गणपती बप्पा अगले बरस तू (आंसू बने अंगारे), हे गणपती बाप्पा मोरया (पुजारीन). अलीकडे ‘माय फ्रेंड गणेशा’ या animation film ने खूप लोकप्रियता हासील केली होती.

मराठी भक्तीगीतात गणेशाची अनेक रूप मनाला मोहून टाकतात. त्यात प्रामुख्याने उल्लेख करावीशी अशी गणेश गीते म्हणजे गजानना गजानना करीशी तुजसी, गजानना श्री गणराया, गणराज रंगी नाचतो नाचतो, गणा धाव रे मला पाव रे.

फार पूर्वी आशालता बाबगावकर यांचे मुंबई आकाशवाणीवर ’ तू सुखकर्ता तू दुःखहर्ता विघ्न विनाशक मोरया संकटी रक्षी शरण तुला मी, गणपती बाप्पा मोरया’ हे गीत आवर्जुन लागायचे या गीताची खुमारी मात्र अजूनही कमी होत नाही.

हेही वाचा – OMG! अवघ्या १० मिनिटांत शरद केळकरने बनवला ‘इको फ्रेंडली बाप्पा’!

Dhananjay Kulkarni
+ posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

Twitter

[elfsight_twitter_feed id="4"]

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2024. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2024. All rights reserved.