– धनंजय कुलकर्णी, पुणे ; स्केच सौजन्य- श्रीकांत धोंगडे 

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम

————————

Revisiting Some of the Melodious Duet Songs of  Lata Mangeshkar. लता मंगेशकर! या सात अक्षरांमध्येच ‘सा रे ग म प ध नी’ हे सप्तसूर दडलेले आहेत. तमान भारतीयांच्या रसिक मनावर गेली साठ वर्षे अधिराज्य गाजविणारी ही अनभिषिक्त सम्राज्ञी आहे. जगातील जेवढी म्हणून सुंदरतेची / गुणवत्तेची आणि कलात्मकतेची विशेषणे आहेत, ती लताच्या स्वराला / गीतांना दिलेली आहेत. तमाम साहित्यिकांनी / विचारवंतांनी / राजकीय तत्त्ववेत्त्यांनी जसा लताचा स्वर आपल्या काळजात घर करून इेवला तितकाच किंबहुना काकणभर सरस इथल्या सामान्य जिणं जगणार्‍या कामगारांपासून थे महालात राहणार्‍या अमीरजाद्यांनी या स्वरावर प्रेम केले. 

लताचे मराठीपण
29 सप्टेंबर 1928 रोजी इंदोरला जन्मलेल्या लताने हिंदी चित्रपटाची पार्श्वगायनाची सुरुवात दत्ता डावजेकर या मराठी संगीतकाराकडे ‘आप की सेवा मे’ या चित्रपटापासून केली. ‘पा लागू कर जोरी रे श्याम मोसे ना खेलो होरी’ हेच लताचे पहिले पार्श्वगायन केलेले गीत! (हे गीत लिहिले होते पुढे शांताराम बापूंच्या चित्रपटातून नायक बनलेल्या महिपालने!) लताचे पार्श्वगायनक असलेला ‘आप की सेवा में’ 1942 साली प्रदर्शित झाला; पण त्यापूर्वीच 1946 साली ‘जीवनयात्रा’ हा चित्रपट झळकला, यात लताचे गीत होते. ‘चिडीया बोले’ हा सिनेमा वसंत देसाईंनी स्वरबद्ध केला होता. म्हणजेच लताच्या हिंदी करिअरकरिता सुरुवात दोन मराठी संगीतकारांकडून झाली. लताच्या कारकीर्दीला खरा आकार देण्याचे काम पुढे आणखी एका मराठी संगीतकाराने केले तो म्हणजे अण्णा तथा रामचंद्र चितळकर, अर्थात सी. रामचंद्र! लता आज भलेही ही गोष्ट मान्य करीत नसली तरी लताला आणि तमाम रसिकांना ही बाब माहीत आहे की, अण्णाइतकी गोष्ट आणि संख्येने अधिक गाणी लताकडून दुसर्‍या कुणी संगीतकाराने गाऊन घेतली नाहीत!
नमनाला एवढे घडाभर तेल वापरायचे कारण म्हणजे लताच्या सुरुवातीच्या काळात तिच्या पंखाला बळ देणारे मराठी संगीतकारच होते. जाऊ दे, आजचा विषय लताने विविध गायकांसोबत गायलेली युगल गीते आहेत. एक गोष्ट प्रांजळपणे मानावी लागेल, रसिकांना कामयच युगल गीतांपेक्षा एकट्याने किंवा एकटीने गायलेली गाणी आवडतात. युगल गीतात भावना शेअर होत असल्याने कदाचित असे होत असावे. तरीही युगल गीतांनी दिलेला आनंद अवर्णनीय असतो. लताने जवळपास 100 पार्श्वगायकांसमवेत युगलगीते गायली!

लारालप्पा लारालप्पा
लताचे पहिले गाजलेले युगल गीत कोणते? लता-मुकेशचे 1948 साली आलेल्या अनिलदांच्या ‘अनोखा प्यार’ चित्रपटातील ‘यार रखना चाँद तारो इस सुहानी रातको’ याच वर्षी किशोरकुमारसोबत ‘ये कौन आया रे करके सोला सिंगार’ (‘जिद्दी’, सं. खेमचंद प्रकाश) हे गीत लताने गायले.
पन्नास वर्षांपूर्वी लताने गायलेल्या युगल गीतांचा जेव्हा आपण विचार करू लागतो, तेव्हा कितीतरी कधी काळी रेडिओ सिलोनवर / ऑल इंडिया रेडिओ की उर्दू सर्व्हिसवर ऐकलेली गाणी भेटतात. 1949 साली आलेल्या ‘लाहोर’ (संगीतकार – विनोद) चित्रपटात लता आणि करण दिवाण यांचे एक युगल गीत होते. ‘दुनिया हमारे प्यार की यूँही जवाँ रहे मैं भी रहूँ मेरा साजन जहाँ रहे’ लताचा कोवळा विरहाने ओथंबलेला स्वर ऐकला की, आतून गलबलल्यासारखं होतं. खरंच या स्वराने आम्हाला इतका विस्तृत जीवनानुभव दिलाय की, या मायेच्या स्वराशिवाय युगल गीते होती, ‘मिल मिल के गायेंगे हो दो दिल यहाँ एक तेरा एक मेरा’ (‘दुलारी’), ‘अपनी नजर से दूर वो’ (‘बाजार’), ‘जरा तुमने देखा तो प्या आ गया’ (‘जलतरंग’), ‘मुहब्बत उनसे मिलने का बहाना’ (‘बाजार’), मुकेशसोबतची ‘पतली कमर है तिरछी नजर है’ (‘बरसात’), ‘ये दुनिया है यहाँ दिल का लगाना किसको आता है’ (‘शायर’), ‘छोड गये बालम’ (‘बरसात’), जी. एम. दुराणीसोबत लताचे ‘शायर’ (सं. गुलाम मुहम्मद) मध्ये एक गीत होतं, ‘दो बिछडे हुए दिल आपस में गये मिल’ अण्णा चितळकरांसोबतचं ‘ले आँखे अब ना रोना’ (‘सिपाहीया’) लताचं सर्वाधिक गाजलेलं या काळातील युगल गीत जी. एम. दुर्राणींसोबतचं ‘एक थी लडकी’मध्ये गाण होतं, ‘लारालप्पा लारालप्पा लाई रख दा’ संगीत (विनोद). गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी गायलेल्या पन्नासच्या दशकताील युगल गीतांचा जेव्हा आपण आढावा घेऊ लागतो, तेव्हा तिथल्या हिरे-माणकांकडे पाहून डोळे दिपून जातात. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर लगेचच सुरू झालेले हे दशक भारतीयांकरिता उत्साहाचं / आनंदाचे आणि चैतन्याने रसरसलेले होते. पं. नेहरूंसारखा द्रष्टा नायक देशाला लाभला होता. सारा भारत देश त्यांच्या डोळ्यातून प्रगतीची स्वप्न पाहात होता. जे जे करायचं ते उत्तम / उदात्त अशी भावना वाढीस लागली होती. या सर्वांचे चित्र माध्यमातून उतरणे स्वाभाविक होते. सिनेमाच्या आणि त्यातल्या त्यात सिनेमा संगीतच्या दृष्टीनं हे दशक ‘सुवर्णयुग’च होतं. त्यामुळे आज पन्नास वर्षांचा कालखंड लोटला गेला असला तरी या संगीताची गोडी अवीट आहे. आजही कुठलाही संगीतविषयक कार्यक्रम या कालखंडाला टाळून पुढे जाऊ शकत नाही.

लताच्या या पन्नासच्या दशकातील (1950-59) युगल गीतांची एकूण संख्या आहे 376 गीतांची! याचं आणखी बारकाईने विश्‍लेषण केलं, तर असं दिसतं की, या दशकात लताने सर्वाधिक युगल गीते म. रफीसमवेत एकूण 102 गायली, तर सर्वात कमी किशोरकुमारसोबत एकूण 9 गायलीत! इतर गायकांसमवेत म्हणजे मुकेश (45), तलतमहमूद (35), हेमंतकुमार (29), मन्नाडे (45) आणि सी. रामचंद्रसोबत 36 गाणी गायली! या दशकात सर्वच संगीतकार त्यांच्या ‘बेस्ट परफॉर्मिंग पीरेड’मध्ये होते. सचिनदा, नौशाद, शंकर-जयकिशन, सलील चौधरी, सी. रामचंद्र, हेमंतकुमार, रोशन हे संगीतकार या दशकातील ‘टॉप मोस्ट म्युझिशियन्स’ होते. लताच्या सोबत गाणारी गायक मंडळीदेखील तयारीची होती. गीतकारांची नवी ‘फ्रेश टीम’ मायाच्या दुनियेत दाखल झाली होती. कलावंत / दिग्दर्शक / कथानक / नायक / नायिका सर्वांमध्येच सळसळत चैतन्य ओसंडून वाहत होतं. त्यामुळे चित्रपटाचं संगीतदेखील हिमालयातून झेप घेणार्‍या गंगेच्या पवित्र जलासारखं ताजं, रसरशीत, मधुर चवीचं होतं! 1950 साली लतानं एकूण 35 चित्रपटांमधून 147 गाणी गायली, पैकी त्यात 91 सोलो (एकटीची), तर 17 ड्युएटस् (युगल गीतं) होती. इतर मिश्र स्वरूपाची किंवा द्वंद्व गीते गायिकासोबतची होती. या वर्षाच्या युगल गीतांपैकी आजही रसिकांना स्मृतिगंधाचा आनंद देणारी गाणी म्हणजे ‘वो हमसे चूप है हम उनसे चूप है, मनाने वाले मना रहे है’ (‘सरगम’, सी. रामचंद्र), रफीसोबत ‘ओ माही ओ दुपट्टा मेरा देदे’ (‘मीनाबाजार’), ‘छोटा आफसान है ये तेरे मेरे प्यार का’ (‘बिरह की रात’) ही दोन्ही गाणी हुस्नलाल भगतराम यांनी संगीतबद्ध केली होती. मुकेशसोबतचं ‘जमाने का दस्तुर है ये पुराना, मिटाकर बनाना बनाकर मिटाना’ (‘लाजबाब’ अनिल विश्वास), तलत सोबतची विनोदने स्वरबद्ध केलेली ‘शिकवा तेरा मै गाऊँ दिल मे समाने वाले’, ‘यार आने वाले फिर याद आ रहे है’ ही ‘अनमोल रतन’ची गाणी खरोखरच अनमोल अशी होती! 1951 सालापास्नं गाण्यांची / चित्रपटांची संख्या वाढत गेली. यावर्षी लताने एकूण 50 चित्रपटांत पार्श्वगायन केले व त्यात 147 सोलो, तर 91 ड्युएटस् होती. सी. रामचंद्र तथा अण्णा चितळकरांचा ‘अलबेला’ हा संंगीतप्रधान चित्रपट या वर्षी झळकला. यात तब्बल 7 युगलगीते होती. यापैकी 1 गीत रफीसोबत ‘महफिल में मेरी कौन ये दिवाना आ गया, दिवाना आ गया, जब शम्मा ने पुकारा तो परवाना आ गया, जो परवाना आ गया’ आणि अण्णा चितळकरांसोबत 6 बेहतरीन युगल गीते ‘शोला जो भडके, दिल मेरा धडके’, ‘भोली सुरत दिल के खोटे नाम बडे और दर्शन’, ‘शाम ढले खिडकी तले तुम सिटी बजाना छोड दो’, ‘धीरे से आजा रे अँखियन में’, ‘दिवाना परवाना’, ‘मेरे दिल की घडी करे टिकटिक जब बजे रात के बारा’. मा. भगवान यांचा हा चित्रपट अफाट गाजला. (पुढे 25 वर्षांनी पुण्याला रणजित बुधकरांनी पुन्हा एकदा हाच सिनेमा रिलिज केला, तेव्हा त्याने चक्क ‘शोले’ला टक्कर देत पुन्हा हिट झाला.) त्याकाळी ‘शोले’ला भगवानच्या ‘अलबेला’ आणि धार्मिक चित्रपट ‘जय संतोषी माँ’ने चांगलीच स्पर्धा निर्माण केली. याच वर्षी आर. के. चा ‘आवारा’ झळकला. यात लताने एक मन्नाडेसोबत ‘तेरे बिना आग ये चाँदनी तू आजा… घर आया मेरा परदेसी’ हे गीत, तर मुकेशसोबत ‘दम भर जो उधर मुँह फेरे ओ चंदा’ ही गाणी होती. अनिल विश्वास यांनी यावर्षी ‘तराना’ हा चित्रपट स्वरबद्ध केला. यात लताची तलतसोबतची ‘ऑल टाईम ग्रेट’ अशी सुमधुर गाणी आहेत. ‘नैन मिले नैन हुए बावरे चैन कहाँ मेरे सजन साँवरे’ आणि ‘सीने में सुलगते है अरमाँ, आँखों में उदासी छायी है’. लता तलतच्या एकूण सर्व युगल गीतांपैकी हे सर्वोत्कृष्ट ठरावे! ही दोन्ही गाणी प्रेमधवन यांनी लिहिली होती. लताला ‘सीने में सुलगते’ची धून एवढी आवडली की, सुरुवातीला फक्त तलत गाणार असलेलं गीत लताच्या आग्रहाखातर (हट्टा खातर!) बदल करून ड्युएट करावे लागले, अशी आठवण सांगितली जाते. दिलीपकुमार – मधुबालावर चित्रित ही दोन गाणी पाहाणं हा एक स्वर्गीय सुखाचा अनुभव आहे. दिलीपचाच नौशाद यांनी स्वरबद्ध केलेला ‘दीदार’ या वर्षी आला. त्यातील ‘देख लिया मैने किस्मत का तमाशा देख लिया’, ‘हुए हम जिनके लिए बरबाद’ या वर्षातील लताची इतर युगल गीतांपैकी मुकेशसोबत ‘बडे अरमानोंसे रखा है बलम तेरी कसम’, ‘एक बार अगर तू कह दे तू है मेरी कि मैं हूँ तरेरा’, ‘कहाँ हो तुम जरा आवाज दो हम याद करते है’ ही तीन ‘मल्हार’ (सं. रोशन) चित्रपटातील गाणी, तसेच मुकेशसोबत ‘ऐ दिल न मुझसे छुपा सच बता क्या हुआ’ (‘बादल’), तलतसोबत ‘मुहब्बत में ऐसे जमाने भी आये’ (‘सगाई’) रफीसोबतची ‘हलचल’ चित्रपटातील ‘ओ बिछडे हुए साथी जिऊँ कैसे बता दे’ आणि ‘प्रीतजता के मीत बनाके’ युगल गीते संगीतकार महंमद रफी यांनी स्वरबद्ध केली होती. ‘हमलोग’ नावाचा एक चित्रपट यावर्षी झळकला, त्यात लताचे जी. एम. दुर्राणीसोबत मस्तगीत होते, ‘गाये चला जा, गाये चला जा इक दिन तेरा भी जमाना आयेगा’ (सं. रोशन)

गाये चला जा…..
‘गाये चला जा गाये चला जा इक दिन तेरा भी जमाना आयेगा’ लताने दुर्राणीसोबत गायले. जी. एम. दुर्राणीचा जमाना काही आला नाही. लता मात्र संगीताच्या दुनियेतील अनभिषिक्त सम्राज्ञी बनू लागली. एक लक्षात घ्या, तो काळ, ते दशक दिलीप – राज – देव या सदाबहार त्रिकुटाचं होतं. या त्रिकुटाने अनुक्रमे नौशाद, एस. जे. आणि सचिनदा हे संगीतकार जसे वाटून घेतले होते, तसेच गायकही अनुक्रमे रफी, मुकेश आणि किशोरकुमारही वाटून घेतले होते; पण गायिकांच्या बाबतीत असला प्रकार नव्हता. नायिकेनुसार गायिका हा प्रकार कधीच नव्हता. त्यामुळे झालं काय, नायिका कुणीही असो (अगदी अनिता गुहा, निरूपा रॉयपासून थेट नर्गिस, मधुबालापर्यंत) पार्श्वगायिका कायम लताच असायची. या काळात लताला प्रतिस्पर्धी म्हणून शमशाद बेगम, गीता दत्त, सुरैया या गायिका होत्या; पण लताच्या स्वरतेजापुढे त्या फिक्या पडल्या. त्या काळातल्या सर्वच चोटीच्या संगीतकारांची पहिली पसंती लताच असायची. 1952 साली लताने 43 चित्रपटांकरिता पार्श्वगायन करीत 173 गाणी गायली. पैकी 135 सोलो, तर 31 युगल गीते होती! या वर्षीचा सर्वांगसुंदर चित्रपट होता, विजयभट्ट दिग्दर्शित ‘बैजू बावरा’. यातील रफी-लताच्या दोन युगल गीतांची खुमारी काही आगळीच होती. ‘झूल में पवन आयी बहार’ आणि ‘तू गंगा की मौज मै जमुना की धारा’ याच वर्षी रफीसोबत ‘हम तुम ये बहार देखो रंग लाया यार’ (‘अंबर’), ‘आ गई है इश्क पे बहार’ (‘साकी’), हेमंतकुमार सोबतचे ‘ये रात ये चाँदनी… चाँदनी राते प्यार की बाते खो गई जाने कहाँ’ (‘जाल’), किशोरकुमारसोबतचे ‘लहरों से पूछ लो या किनारों से पूछ लो’ (‘काफिला’) ही गाणी आपले वेगळत्व दाखवून देतच होती. लता – तलतची काही गाणी त्या वर्षी रसिकांना आवडून गेली ‘मेरे दिल की धडकन क्या बोले क्या बोले’ (‘अनहोनी’), ‘अपनी कहो कुछ मेरी सुनो क्या दिल का लगाना भूल गये’ (‘परछाई’), ‘दिल बेकरार सोजा’ (‘रागरंग’), ‘दिल मे समा गये सजन’ (‘संगदिल’, सं. सज्जाद) आणि ‘किसे मालूम या इक दिन मुहोब्बत बेजूबाँ होगी’ (‘साकी’, सं. चितळकर) पैकी शेवटच्या गाण्यातील अंतर्‍याच्या शेवटी ‘मेरी दुनिया कहाँ होगी’ ही ओळ आलटून-पालटून गात लता-तलत जेव्हा समेवर येतात तेव्हा अंगावर अक्षरश: काटा येतो! लताच्या कोवळ्या स्वरानुभवाने रसिक मंत्रमुग्ध होतात. 1953 साली लताने 45 चित्रपटांकरिता 187 गाणी गायली, त्यापैकी 145 सोलो, तर 33 ड्युएटस् होती. त्यावर्षीचा सर्वाधिक चर्चेचा चित्रपट होता ‘अनाकरली’. यात हेमंतदासोबत ‘जाग दर्देइश्क जाग दिल को बेकरार कर छेड रे आँसूओ का राग’ हे अप्रतिम गीत होते. ‘पतिता’ चित्रपटातील ‘याद किया दिलने कहाँ हो तुम’ (सं. एस. जे.), तर ‘ऑल टाईम फेवरेट’ असे आहे. मुकेशसोबत आर. के. च्या ‘आह’ चित्रपटातील ‘जाने न नजर पहचाने जिगर ये कौन जो दिल पर छाया मेरा अंग अंग मुस्काया’ आणि ‘आ जारे अब मेरा दिल पुकारा रो रो के गम भी हारा’ या गीतातील सारा दर्द, सारे दु:ख लता आपल्या स्वरात ओथंबून गायलीय! बिमल राय यांच्या ‘दो बिघा जमीन’ चित्रपटात सलीलदांनी लता – मन्नाडेचं एक सुरीलं युगल गीत दिले होते. ‘धरती कहे पुकार के… सावन बीता जाये’, संगीतकार हुस्नलाल भगतराम यांच्या या वर्षीच्याच ‘आँसू’ चित्रपटातील दोन युगल गीतं कोण विसरणार! ‘सुन मेरे साजना देखोना मुझको भूल न जाना सुन मेरे साजना’ आणि ‘दिन प्यार के आये दे नजर मिल जाए तो गोरी कहाँ जाए’ हीच ती गाणी ज्याकरिता रेडिओ सिलोननी पारायण केली होती. किशोरकुमारसोबतचं एक लताचं गाणं अनेक रसिकांनी अजूनही मनात खोलवर जपून ठेवलंय. ‘अनिल विश्वास’ यांच्या ‘फरेब’मधलं हे गीत होतं, ‘आ मुहब्बत की बस्ती बसायेंगे हम इस जमीं से’. 1953 साली लता-तलतची मखमली स्पर्शाची काही गाणी होती. ‘आसमाँ गले तेरी दुनिया से जी घबरा गया’ (‘लैला-मजनू’, सं. गुलाम महंमद या चित्रपटाचा नायक शम्मी कपूर होता) आणि ‘जब जब फूल खिले तुझे याद किया हमने’ (‘शिकस्त’, सं. एस. जे.), तलतच्या कंपमय आवाजातील रोमँटिक गाणी ऐकणं हा एक लाजबाव अनुभव असतो. त्याला लताची पूरक साथ असेल तर सुवर्णाला सुगंध मिळतो. शैलेंद्र या गीतकाराच्या चित्रपटातील गीतांच्या वहीला त्याने नाव दिले होते ‘जब जब फूल खिले…’

भुला नही देना…
‘जब जब फूल खिले तुझे याद किया हमने’ खरंच कुठे गेली ती लुभावणारी गाणी? कुठे गेले ते कलावंत? कुठे गेला तो सुवर्णकाळ? लताच्या सहस्रचंद्र दर्शनाच्या निमित्ताने तिला इतर गायकांसोबत गायलेल्या कितीतरी मनमोहक आठवणी मनात फेर धरून नाचू लागतात. स्मृतिगंधाचा हळवा हसर्‍या दु:खाचा मनोरम अनुभव ठायी-ठायी येतो. 1954 साली लताने 44 चित्रपटांतून 176 गाणी गायली. पैकी 148 सोलो, तर 22 युगलगीते होती. यावर्षी हेमंतकुमारच्या ‘नागीन’ चित्रपटाने बाजी मारली. यात त्याचे लतासोबत ‘अरे छोड दे सजनीया छोड रे पतंग मेरी छोड दे’ हे गीत होते. याच दोघांचे ‘गगन झनझन रहा पवन सनसना रहा’ (‘नास्तिक’, सं. चितळकर), ‘आ नीले गगन के तले प्यार हम करे’ (‘बादशहा’, सं. सलीलदा), ‘देखो वो चाँद छुपकर करता है क्या इशारे’ (‘शर्त’), म. रफीसोबतचे ‘मन की बीन मतवारी बाजे’ (‘शबाब’, सं. नौशाद), मन्नाडेसोबतचे ‘ऋतू आये ऋतू जाये सखी री’ (‘हमदर्द’, अनिल विश्वास), तलतसमवेत ‘तेरे रास्ते पे हमने एक घर बना लिया है’ (‘कवी’), ‘अजी हमको जै तुमसे प्यार तो होगा मै क्या जानू’ (‘मेहबुबा’) आणि शांतारामबापूंच्या ‘सुबह का तारा’ चित्रपटातील ‘गया अंधेरा हुआ उजाला चमका चमका सुबह का तारा.’ 1955 सालापासून संगीत आणखी सुरील होऊ लागले. नवनवीन गीतकार / संगीतकार या क्षेत्रात येऊ लागले. लताच्या स्वराने आता कमालीची व्यावसायिक यशस्विता गाठली होती. 1955 साली लताने 52 चित्रपटांतून 220 गाणी गायली. त्यात 180 सोलो एकटीने गायलेली होती, तर 30 युगलगीते होती. शांतारामबापूंचा ‘झनक झनक पायल बाजे: या वर्षीचा! नृत्यसंगीताची मोठी बहार यात उडवून दिली होती. वसंत देसाई या महान मराठमोठ्या संगीतकाराने रागधारीवर आधारित संगीत देऊन चित्रपटाला कलात्मक उंचीवर नेले! मन्नाडेसमवेत ‘मुरली मनोहर कृष्ण कन्हैया’, ‘हमे गोप ग्वाला कहते है’, ‘मेरे ऐ दिल बता मेदे दिल ऐ बता’, ‘ऋतू बसंत की आयी उपवन’ आणि हेमंतकुमारसोबतचे सदाबहार ‘नैन को नैन नाही मिलाओ देखत सुरत आवत लाज’ यातील कडव्याच्या मधले लताचे आलाप अतिशय सुंदर होते. लता -हेमंतचे ‘तांगावाली’ चित्रपटातील ‘हलके हलके चलो साँवरे प्यार की मस्त हवाओ में’ (सं. सलीलदा), संगीतकार नाशाद (नौशाद नव्हे) यांच्या ‘बारादरी चित्रपटातील दोन युगल गीते अजूनही रसिक विसरू शकलेले नाहीत. ‘भुला नही देनाजी भुला नही देना जमाना खराब है, दगा नही देना’ आणि ‘मुहब्बत की बस इतनी दास्ता है’. या वर्षीचा सुपरहिट होता ‘श्री 420’. यात लताची रफी, मुकेश, मन्नाडे या तिघांसोबत युगल गीते होती. मन्नाडेसोबतच ‘प्यार हुआ इकरार हुआ है प्यास से फिर क्यूं डरता है दिल’, मुकेशसोबतचे ‘इचक दाना बिचक दाना’ आणि रफी/मुकेशसोबतचे ‘रमय्या वस्ता वय्या’ आज किती वर्षे लोटली; पण ‘आद आती रही दिल दुखाती रही अपने मन को मनाना न आया हमे, तू न आये तो क्या भूल जाये तो क्या प्यार करके भुलाया न आया हमे’ या बोळी आम्ही विसरू शकत नाहीत.

याद आती रही…
खरंच ‘याद आती रही दिल दुखाती रही’ याचा प्रत्यय आता वारंवार येतो. आता जुन्या गाण्यांवर कुणी बोलणारं जरी भेटलं तरी मन हळवं होतं. त्या सुरील्या काळाचं गारूड मनावर इतकं अधिराज्य गाजवतं की, काळाच्या ओघात आम्ही काय कमावलं आणि काय गमावलं याचा हिशेब करता नाही येत. 1956 साली लताने गायलेल्या युगल गीतांचा आपण जेव्हा विचार करू लागलो, तेव्हा दिसतं. लताने 1956 साली 49 चित्रपटांतून 204 गाणी गायली. पैकी 153 सोलो साँग्ज,, तर 36 ड्युएटस् होती. यावर्षी तिची सर्वाधिक युगलगीते होती आणि गाजली. राज-नर्गिसच्या ‘चोरी-चोरी’ चित्रपटातील! यात रफीसोबत लताचे एक गीत होते, ‘तुम अरबों का हेरफेर करनेवाले राम जी’ आणि मन्नाडेसोबत चार भन्नाट युगल गीते होती, ‘पंछी बनू उडती फिरू मस्त गगन में’, ‘ये रात भीगी भीगी ये मस्त फिजाए’, ‘जहाँ मैं जाती हूँ वही चले आते हो’ आणि नितांत सुंदर असे ‘आजा सनम मधुर चाँदनी में हम’. शंकर-जयकिशनचाच ‘बसंत बहार’ चित्रपटात लता-मन्नाडे मदमस्त गीत होते ‘नैन मिले चैन कहाँ दिल है वही तू है जहाँ’, ‘परिवार’ (सं. सलील चौधरी) मधील ‘जा तोसे नाही बोलू कन्हैयाँ’ गीतातील लताचे लटक्या रागाचं दर्शन कोण विसरू शकेल? यावर्षीची लताची आणखी काही बेहतरीन ड्यूएटस् होते. ‘साँवले सलोने आये दिन बहार के’ (हेमंतकुमार, ‘एक ही रास्ता’), ‘ये नई नई प्रीत है तू ही तो मेरा मीत है’ (तलत, ‘पॉकेटमार’), ‘मेरा नाम अब्दुल रहमान पिस्तावाला मै हूँ पठाण’ (किशोर, ‘भाई भाई’), ‘भूल जा सपने सुहाने भूल जा’ (‘राजधानी’). रफीसोबतची दोन गाणी ‘आजा के इंतजार में जाने को है बहार भी’ आणि ‘दिल क न करना ऐतबार कोई’ ही गाणी हलाकू (सं. एस. जे.) चित्रपटातील होती. 1956 साली आलेल्या ‘नया दौर’ (सं. ओ. पी. नय्यर) पासून लताला गायनाच्या क्षेत्रात घरातच स्पर्धा सुरू झाली. आशा भोसलेंची दमदार खेळी इथूनच सुरू झाली. शमशाद / सुरैया हळूहळू निवृत्तीच्या वाटेकडे वळल्या. सुमन हेमाडी कल्याणपूर यांचेदेखील आगमन चित्रसृष्टीत झाले. लताच्या अधिसत्तेला ही एक चुणूक होती. लता – सी. रामचंद्र यांचे परस्परावरील राग / अनुराग सुपरिचित आहेतच. 1957 नंतर दोहोंमध्ये कटुतेला सुरुवात झाली. सचिनदा व लता यांच्यातील मतभेदही पुढे 4 वर्षे वाढत गेले. एकूणच हा कालखंड लताकरिता प्रथमच आव्हानात्मक असला तरी चित्रपट संगीताच्या दृष्टीने सुवर्णयुगाचा कळसाध्याय गाठणारा होता. 1957 साली लताने एकूण 48 चित्रपटांतून 162 गाणी गायली. पैकी 113 सोलो, तर 39 ड्यूएटस् होती. 1957 सालापासून लताची युगलगीतं रफी / मुकेश यांच्यासोबत वाढू लागली. तलत / हेमंत / मन्नाडे हे दुसर्‍या फळीतील गायक बनले. यावर्षी एस. एन. त्रिपाठी यांच्या धार्मिक चित्रपटाने मोठी गर्दी खेचली. ‘जनम जनम के फेरे’ चित्रपटातील ‘जरा सामने आओ छलिये छुप छुप छलने में क्या बात है यूँ छुप ना सकेगा परमात्मा मेरी आत्मा की ये आवाज है’ या लता-रफीच्या गीताने बिना का गीतमालाचे सर्वोच्च पद पटकावले. या जोडीची अण्णांच्या ‘नौशेरवाने आदिल’ चित्रपटात दोन युगलगीते होती. दोन्हीही गाणी खूप मिठ्ठास होती. ‘तारों की जुबां पर है मुहोब्बत की कहानी ऐ चाँद मुबारक हो तुझे रात सुहानी’ आणि ‘भूल जाए सारे गम डूब जाए प्यार में’ लता – रफीची या वर्षी आणखी काही ड्युएटस् रसिकांमध्ये खूपच लोकप्रिय ठरली. हेमंतकुमारनेे स्वरबद्ध केलेल्या ‘मिस मेरी’ या दाक्षिणात्य चित्रपटात ‘वृन्दा वन का कृष्ण कन्हैया सबकी आँखों का तारा’, ‘ओ रात के मुसाफीर चंदा मुझे बता दे’, ‘छुपाकर मेरी आँखो में’ ही गाणी आजही लोकप्रिय आहेत. ‘दो घडी वो जो पास आ बैठे’ (‘गेट वे ऑफ इंडिया’, सं. मदनमोहन), हेमंतदासोबतच ‘नई मंझिल नई राहे नया है मेहरबाँ अपना’ (‘हिल स्टेशन’). लता व चितळकर यांच्यातील अंतर वाढत गेले; पण त्यापूर्वी ‘बारिश’ चित्रपटातील त्यांचे एक युगलगीत ‘शेवटचे’ ठरले. गीताचे बोल होते, ‘कहते है प्यार जिसको पंछी जरा बता दे उडना खुली हवा में’ लता-तलतचे एक गीत खूप अप्रतिम होते. ‘तेरी चकाकती आँखो के आगे सितारे कुछ भी नहीं’ (‘छोटे बाबू’). 1957 सालचा सर्वात हिट चित्रपट होता ‘मदर इंडिया’. यात लताचे रफीसोबत गीत होते ‘मतवाल जिया डोले पिया झूक छाये रे बादल’.

मैं तुम्हीसे पूछती हूँ
1958 साली लताने 36 चित्रपटांकरिता 133 गाणी गायली. पैकी 96 एकटीची व 26 युगलगीते होती. हिंदी चित्रपट संगीताच्या युगातील हा सुवर्णयुगाचा परमोच्च बिंदू होता. युगल गीतांचा आढावा घेताना सुरुवातीपासून एक गोष्ट लक्षात येते की, कोणत्याही गायक/गायिकांच्या युगल गीतांची संख्या ही त्याने गायलेल्या एकूण गीतांच्या 30 ते 35% असते. कदाचित एकट्याने किंवा एकटीने गायलेली गाणी रसिकांना जास्त जवळची, जास्त आपलीशी वाटत असावीत किंवा एकूणच भारतीय मनाचे ‘आत्ममग्न’ किंवा ‘स्वमग्न’ राहायचा स्वभाव असल्याने भावना ‘शेअर’ करण्याचा प्रकार फारसा दिसत नाही. त्यामुळेच युगल गीतांची संख्या तुलनात्मक दृष्टीने कमी वाटते. असो. या वर्षीच्या लताच्या युगल गीतात मन्नाडेसोबत ‘देखा रे देखा रे चढ गयो पापी बुछवा (‘मधुमती’, सं. सलीलदा), ‘मेरे दिल में है इक बात’ (‘पो. बॉ. 999’, सं. कल्याणजी), ‘छुपा छुपी ओ छुपी आगड बागड जाई रे’ (‘सवेरा’, सं. शैलेश), हेमंतदासोबत ओ निंद ना मुझको आये दिल मेरा घबराये’ (‘पो. बॉ. 999’), तलतसोबत ‘टिम टिम टिम तारों के दीप जले’ (‘मौसी’, सं. वसंत देसाई), मुकेशसोबत ‘दिल तडप तडप के कह रहा है’ (‘मधुमती’), गुणी पण दुर्लक्षित राहिलेले संगीतकार दत्ताराम यांच्या ‘परवरीश’मधील लता-मन्नाडेचे ‘बेलिया बेलिया’ आणि ‘मस्ती भरा है समा हम तुम है दोनो यहाँ’ ही गाणी आजही जाणकारांच्या लक्षात आहेत. रफीसोबत ‘सुवर्ण सुंदरी’ चित्रपटातील ‘कुहू कुहू बोले कोयलिया’ (सं. आदिनारायणराव), ‘आने वाले को आना होगा’ (‘सोहनी महिवाल’, सं. नौशाद). याच वर्षी ऋषीदांचा ‘मुसाफीर’ चित्रपट आला, ज्यात सूरश्री लतासोबत चक्क दिलीपकुमार गायला. गीताचे बोल होते, ‘लागी नाही छूटे राम चाहे जिया जाए’ संगीतकार होते सलील चौधरी! 1959 साली लताने एकूण 58 चित्रपटांतून 209 गाणी गायली. पैकी 130 एकटीची तर 68 युगल गीते होती. (इतर गाणी मिश्र / द्वंद्व स्वरूपातील होती.) लताची ही युगल गीतांची संख्या इतर कुठल्याही वर्षातील युगलगीतांच्या संख्येपेक्षा जास्त होती! पन्नासच्या दशकाच्या शेवटच्या वर्षातील लताने पार्श्वगायन केलेल्या चित्रपटांच्या संख्येबाबतही हे वर्ष तिच्या इतर कुठलही वर्षांपेक्षा अधिक आहे. तरी या वर्षी सी. रामचंद्र, सचिनदेव बर्मन आणि नौशादअलीच्या एकाही चित्रपटात लताचे गायन नव्हते! या वर्षी लताची रफीसोबत गाणी होती, ‘धीरे धीरे चल चाँग गगन में’ (‘लव्ह मॅरेज’), ‘मै तुम्हीसे पूछती हूँ, मुझे तुमसे प्यार क्यूँ है’ (‘ब्लॅक कॅट’), ‘जीवन में पिया तेरा साथ रहे, होले होले घूँघट पट खोले’ (‘गूँज उठी शहनाई’), ‘लगी छूटे ना अब तो सनम चाहे जिया जाए’ (‘काली टोपी लाल रुमाल’), मुकेशसोबत ‘ओ चाँद खिला वो तारे हँसे ये रात अजब, दिल की नजर से नजरों के दिलसे (‘अनाडी’), ‘दुनिया वालों से दूर जलन वालों सू दूर’ (‘उजाला’), ‘नी बलीये ऋत है बहार की’ (‘कन्हैया’), ‘तुम चल रहे हो हम चल रहे है मगर दुनिया वाले के दिल जल रहे है’ (‘दुनिया न माने’), ‘इक रात में दो दो चाँद खिले’ (‘बरखा’), ‘दिल लूटने वाले जादूगर अब मैने तुझे पहचाना है’ (‘मदारी’), मन्नाडेसोबत ‘झुमता मौसम मस्त महिना’ (‘उजाला’), ‘प्यार भरी ये घटाये गीत मीलन के गाये’ (‘कैदी नं. 111’), ‘प्रीतम दरस दिखाओ तुम बिन रो रो रैन बीतायी’ (‘चाचा जिंदाबाद’), हेमंतकुमारसोबत ‘तुम्हे याद होगा कभी हम मिले थे, क्या मेरा प्यार पसंत है तुम्हे’ (‘स्कूलमास्टर’), किशोरकुमारसोबत ‘चाचा जिंदाबाद’ (सं. मदन मोहन), लताने दोन मस्त गाणी गायली ‘बच गये हम दोनो फँसते फँसते’ आणि ‘बडी चीज है प्यार मुहब्बत ऐसी तैसी झगडे की’. महेंद्र कपूरसोबतचे लताचे पहिले गाणे याच वर्षी आले, ‘तेरे प्यार का आसरा चाहता हूँ वफा कर रहा हूँ’ (‘धूल का फूल’, सं. एन. दत्ता). लताच्या पन्नासच्या दशकाचे युगलगीतांच्या नजरेतून अवलोकन केले, तर बर्‍याच बाबी स्पष्ट होतात. लताच्या गायकीचा मोठा कालखंड जो 1950 ते 1990 असा चाळीस वर्षांचा समजला, तर यातील बरोबर 1/4 गाणी (युगलगीते) लताने 1950 ते 59 या दशकात गायली. या दशकात किशोरकुमारसमवेत अवघी 9 युगलगीते गायली असली तरी एकण कालखंडात रफी (426) पाठोपाठ किशोरचाच (321) नंबर लागतो.
देखो मौसम क्या बहार है…

1960 ते 1969 या दहा वर्षांच्या कालखंडात लताने गायलेल्या युगलगीतांचा संख्या 340 आहे. जी आधीच्या दशकाच्या मानाने 36 ने कमी आहे. गायकांच्या बरोबरच्या युगलगीतांची संख्या म. रफी (146), किशोरकुमार (19), मुकेश (67), तलत (14), हेमंतकुमार (03), मन्नाडे (15) आणि महेन्द्र कपूर (30). (उर्वरित गाणी अन्य गायकांसमवेत) यातही म. रफीचा क्रमांक वरचा असला तरी साठच्या मध्यापासून लता-रफीची गाणी कमी होत राहिली, कारण त्या दोघांमधील तो ‘ऐतिहासिक’ रॉयल्टीचा वाद! असो! 1960 साली लताने 49 चित्रपटांपासन 169 गाणी गायली. पैकी 103 सोलो, तर 52 युगलगीते होती. या वर्षी प्रदर्शित झालेल्या चित्रपटांपैकी लोकप्रिय ठरलेल्या ‘मुलग-ए-आजम’, ‘दिल अपना और प्रीत पराई’, ‘चौदहवी का चाँद’ या चित्रपटांमध्ये लताची सोलो गाणी होती; ड्यूएटस् नव्हती. लताच्या लोकप्रिय युगलगीतात म. रफीसमवेत ‘दो सितारों का जमीं पर है मिलन आज की रात’, ‘कोई प्यार की देखे जादूगरी, तन रंग लो जी आज मन’ (‘कोहिनूर’), ‘हम और तुम और ये समां लवली लवली’ (‘कॉलेज गर्ल’), ‘जिंदगी भर नहीं भुलेगी वो’ (‘बरसात की रात’), ‘तुम लाख छुपाना चाहोगे’ (‘सिंगापूर’), मुकेशसमवेत ‘बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना’, ‘आ अब लौट चले’, ‘है आग हमारे सीने में’ (‘जिस देश में गंगा बहती है’), ‘चंदा रे मेरी पतियाँ ले जा’ (‘बंजारीन’), तलतसोबत ‘अब रिमझिम के ये प्यारे प्यारे गीत लिए’ (‘उसने कहा था’). 1961 सालापासून चित्रपटाचा ट्रेंड बदलला. सिनेमा रंगीत बनू लागल्याने ‘व्हिज्युअल इफेक्ट’ला महत्त्व प्राप्त झाले. नयनरम्य लोकेशन्स, रोमॅटीसिझम यामुळे हिंदी सिनेमा ‘देखणा’ बनला व गोड गोड रोमँटिक युगलगीते वाढू लागली. 1961 सालच्या शम्मी कपूरच्या ‘जंगली’ने रूपेरी पडद्याचा चेहराच बदलवून टाकला. ताज्या दमाचे नवीन संगीतकार (आर. डी., लक्ष्मी-प्यारे) मैदानात येऊ लागले. 1961 साली लताने 44 चित्रपटांतून 159 गाणी गायली. पैकी 91 सोलो, तर 60 ड्युएटस् होती. रफी व मुकेश यांच्या तुलनेने इतर गायकांना आता लतासोबत गायला मिळत नव्हते. या वर्षाच्या लोकप्रिय चित्रपटांत ‘गंगा जमुना’, ‘ससुराल’, ‘हम दोनो’, ‘जंगली’ हे चित्रपट होते. लताची गाजलेली युगलगीते म. रफीसोबत ‘मतवाली आँखो वाले अलबेले दिलवाले’ (‘छोटे नवाब’), ‘सौ साल पहले मुझे तुमचे प्यार था’, ‘ये आँखे उफ युमाँ’ (‘जब प्यार किसीसे होता है’), ‘दिन सारा गुजारा तेरे अंगना’ (‘जंगली’), ‘तसवीर तेरी दिल में’ (‘माया’), ‘साज-ए-दिल छेड दे’ (‘पासपोट’), ‘एक सवाल मैं करूँ, एक सवाल’, ‘क्या मिल गया हाय क्या खो गया’ (‘ससुराल’), ‘जीत ही लेंगे बाजी’ (‘शोला और शबनम’), ‘तेरी दुनिया से दूर चले होके मजबूर’ (‘जबक’), मुकेशसोबत ‘तुम रूठी रहो मैं मनाता रहूँ’ (‘आस का पंछी’), ‘सोचना हूँ ये क्या किया मैंने’ (‘हमारी याद आयेगी’), ‘बिखरा के जुल्फे चमन में न जाना क्यूं’ (‘नजराना’), ‘देखो मौसम क्या बहार है’ (‘ऑपेरा हाऊस’), ‘इक मंजिल राही दो फिर प्यार न कैसे’ (‘संजोग’), ‘अपनी उल्फत पे जमान का न पहरा होता तो कितना अच्छा होता’ (‘ससुराल’), तलत-महमूदसोबत ‘इतना न मुझसे तू प्यार बढा’ (‘छाया’), ‘बागो में खिलते है फूल कसम तेरी आँखो’ (‘सुहाग सिंदूर’), महेन्द्र कपूरसोबत आज मधुवातास डोले’ (‘स्त्री’), द्विजन मुखर्जीसोबत ‘ऐ दिल कहाँ तेरी मंजिल ना कोई दिपक है’ (‘माया’).

साठच्या दशकात रूपेरी पडदा सप्तरंगात न्हाऊ लागला आणि शर्मिला टागोर, सायरा बानो, आशा पारेख, साधना या नव्या नायिकांमुळे आणखी ‘हसीन’ झाला. नायिका बदलल्या; पण गायिका त्याच राहिल्या. ओपीचा सन्माननीय अपवाद वगळला, तर सार्‍या संगीतकारांची पहिली पसंती लता जरी असली तरी या दशकात चित्र बदलले होते. सचिनदा या दशकाच्या सुरुवातीला लताशी वितुष्ट आल्याने जवळपास 5 वर्षे तिच्यासोबत काम करीत नव्हते. सी. रामचंद्र व लता यांच्यातील संबंध संपूर्णत: संपुष्टात आले. या दशकाच्या मध्यापासून शंकर-जयकिशनमध्येही हळूहळू मतभेद झाल्याने लताचे गाणे कमी होऊ लागले. 1962 साली लताने 39 चित्रपटांतून 133 गाणी गायली. त्यात 85 सोलो, तर 41 ड्युएटस् होती. सी. रामचंद्र, नौशाद, हुस्नलाल भगत, राम, सज्जाद ही संगीतकारांची पिढी आता मागे पडू लागली होती. संगीतातील वैविध्य नव्या संगीतकारांच्या आगमनाने बघायला मिळू लागले. ‘व्हिज्युएलायझेशन’ महत्त्व प्राप्त झाल्याने संगीतदेखील टवटवीत बनू लागले. यावर्षी लताच्या लोकप्रिय युगलगीतात म. रफीसमवेत ‘आपने याद दिलाया तो तुझे याद आया’, ‘बार बार तोहे क्या समझाए’ (‘आरती’), ‘तुझे जीवन की डोर से’ (‘असली नकली’), ‘बिजली गिरा के’, ‘मुझे कितना प्यार है तुमसे’, ‘चाँद जाने कहाँ खो गया’ (‘मैं चूप रहूँगी’), ‘आवाज दे के हम तुम बुलाओ’, ‘मैं चली मैं चली’ (‘प्रोफेसर’), ‘दिल तोडने वाले तुझे दिल ढूँढ रहा है’ (‘सन ऑफ इंडिया’), मुकेशसोबत ‘ओ शमा मुझे फूँक दे’, ‘मेहताब तेरा चेहरा’ (‘आशिक’), ‘इब्तदा-ए-इश्क में हम सारी रात जागे’, ‘लाखो तारे आसमान पर’, ‘बोल मेरे तकदीर में क्या है’ (‘हरियाली और रास्ता’), ‘मैं खुश नसीब हूँ, मुझको किसीका’ (‘टॉवर हाऊस’), किशोरसोबत ‘चाँद रात तुम ही साथ’ (‘हाफ टिकीट’), ‘एक था अब्दुल रहमान एक थी अब्दुल रहमानिया’ (‘मनमौजी’). ‘एक नजर किसीने देखा और दिल हुआ दिवाना’ (‘रंगोली’) आणि तलतसोबत ‘सावन की रातो में ऐसी भी होता है’, ‘ये मेरे अंधेरे उजाले न होते’ (‘प्रेमपत्र’) ही गाणी होती.
साल 1963! यावर्षी लताच्या 37 चित्रपटांतून पार्श्वगायन केलेल्या गीतांची संख्या 111 होती. त्यापैकी 62 गाणी सोलो, तर 38 गाणी ड्युएटस्च्या स्वरूपातील होती. याच वर्षी संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांचे आगमन ‘पारसमणी’ या चित्राद्वारे झाले. यात लताचे रफीसोबत ‘वो जब याद आये बहुत याद आये’ आणि मुकेशसोबत ‘चोरी चोरी जो तुमसे मिले तो लोग क्या कहेंगे’ ही युगलगीते होती. याच वर्षी लताचा सचिनदा सोबतचा ‘अबोला’ मिटला. (‘जो सितारोंसे आगे’ या 1952 सालच्या चित्रपटापासून सुरू होता) व ‘बंदिनी’द्वारेही पुनश्च त्यांच्याकडे गाऊ लागली. ‘बंदिनी’त एकही ‘ड्युएट’ नव्हते; पण ‘तेरे घर के सामने’मध्ये काय सॉलीड ड्युएटस् होती! ‘देखो रूठा ना करो बात नजरो की सुनो’, ‘इक घर बनाऊँगा तेरे घर के सामने’ ही लताची इतर गाजलेली या वर्षीची युगल गीते होती. रफीसोबत ‘हुस्न चला कुछ ऐसी चाल’ (‘बल्फ मास्टर’), ‘तुम ही तुम हो मेरे जीवन में’ (‘एक दिल सौ अफसाने’), ‘वो दिन याद करो’ (‘मेहे मेहबूब’), ‘तेरे बिन सुने नैन हमारे’ (‘मेरी सूरत त ेरी आँखे’), ‘तुम तो प्यार हो सजना’, ‘अरे जा जा तुझे हम जान गये’ (‘सेहरा’), ‘चमन के फूल भी तुझको गुलाब कहते है’, ‘अगर मैं पुछूँ जवाब दोगे’ (‘शिकारी’), ‘जो वादा किया वो’, ‘छू लेने दो’ (‘ताजमहल’), मुकेशसोबत ‘तुम्हारी मस्त नजर’ (‘दिल ही तो है’) (यातील लताची ‘उचकी’ रसिकांच्या लक्षात असेल), हेमंतदासोबत ‘उम्र हुई तुमचे मिले’ (‘बहुरानी’, सं. सी. रामचंद हा लतासोबतच्या अण्णांचा शेवटचा सिनेमा), किशोरसोबत ‘अजनबी से बनकर’ (‘एक राज’), हेमंतदासोबत ‘इक बार जरा फिर कह दो मुझे शरमा के तुम दिवाना!’

ओ मेरे सनम…
1964 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटात सुपरहिट ठरलेल्या ‘संगम’, ‘राजकुमार’, ‘जिद्दी’, ‘दोस्ती’, ‘बेटी-बेटे’, ‘दुल्हा दुल्हन’ हे चित्रपट येतात. ‘कश्मीर की कली’देखील याच वर्षीचा! पण हा सिनेमा ‘ओची’चा असल्याने लताला त्यात स्थान नव्हते. यावर्षी लताने 46 चित्रपटांतून 138 गाणी गायली. पैकी 92 सोलो, तर 34 ड्युएटस् होती. यावर्षीच्या गाजलेल्या लताच्या युगलगीतात ‘ओ मेरे सनम ओ मेरे सनम’ (‘संगम’), ‘ये मेरा प्रेमपत्र पढकर’ (‘संगम’ – वस्तुत: हे युगलगीत रेकॉर्डवर नाही फक्त चित्रपटातील साऊंड ट्रॅकवर आहे.) यातील ‘हर दिल जो प्यार करेगा वो गाना गायेगा’ हे त्रयी गीत कोण विसरेल? लता-रफीची इतर युगलगीते ‘तुम अकेले तो भी बाग में जाया न करो’ (‘आओ प्यार करे’), ‘ओ सनम तेरे हो गये हम’ (‘आयी मिलन की बेला’), ‘तेरे हुस्न की क्या तारीफ करूँ’, ‘इक शहंशाह ने बनवा के हँसी ताजमहल’ (‘लीडर’), किशोरकुमारसमवेत ‘खुबसूरत हसीना जान-ए-जा जान-ए-मन’ (‘मि. एक्स इन बॉम्बे’, संगीत एल. पी.), ‘मचलती हुई हवा में छम छम हमारे संग संग चले’, ‘छेडो ना मेरी जुल्फे सब लोग क्या कहेंगे’ (‘गंगा की लहरे’, सं. चित्रगुप्त), महेन्द्र कपूरसमवेत ‘तुम गगन के चंद्रमा हो मैं धरा की धूल हूँ’ (‘सती सावित्री’), ‘छोडकर तेरे प्यार का दामन’ (‘वह कौन थी’) आणि तलतसोबतच ‘तुम्ही तो मेरी पूजा हो’ (‘सुहागन’) (शेवटची दोन्ही गाणी मदनमोहनची होती.)

साठच्या दशकाच्या मध्यापासून संगीताची समीकरणं बदलू लागली. पंचम, एल. पी., कल्याणजी-आनंदजी. हे नवे संगीतकार स्थिरावू लागले. मेहबूब, बिमल रॉयसारखी मंडळी पडद्यापासून दूर झाल्याने दर्जात्मक फरक ठळकपणे जाणवू लागला. चित्रपटाच्या सुवर्णयुगाला ग्रहण लागू लागले. लताच्या कालखंडाचा विचार करू लागल्यावर असे दिसते. गायिका ‘शारदा’च्या आगमनाने ‘लता’ सावध झाली! शंकर-जयकिशन या जोडीत त्यामुळे दरारा निर्माण झाला. रॉयल्टीच्या प्रश्‍नावर लता आक्रमक झाल्याने रफीसोबतची गाणी कमी होऊ लागली. त्यामुळे आता युगलगीतांचा आढावा घेताना 1965 ते 1969 या पाच वर्षांचा एकत्रित घ्यायला लागेल. या कालखंडात लताने 120 युगलगीते गायली. या पाच वर्षांत लताच्या युगलगीतांची संख्या वर्षागणिक अशी होती 1965 (17), 1966 (14), 1967 (31), 1968 (20) आणि 1969 (29) लताच्या एकूणच कारकीर्दीतील हा सर्वाधिक कमी ‘स्कोअर’ होता.

हमने जो देखे सपने…
या पाच वर्षांत मात्र लताने अवीट गोडीची युगलगीते गायली. रफीसमवेत ‘ओ जाने वाले सुन जरा ये दिल का माजरा’ (‘प्रीत न जाने रीत’), ‘कभी रात दिन हम साथ थे’ (‘आमने-सामने’), ‘दिल पुकारे आरे आरे’ (‘ज्वेलथीफ’), ‘वो है खफा खफा तो नैन यूॅ’ (‘शागीर्द’), ‘तुम्हारी नजर क्यूँ खफा हो गई’ (‘दो कलियाँ’), ‘ये दिल तुम बिन कही लगता नही’ (‘इज्जत’), ‘बेखुदी में सन उठ गये जो कदम’ (‘हसिना मान जायेगी’), ‘क्या क्या न सहे हमने सितम आपके खातिर’ (‘मेरे हुजूर’), ‘ये पर्वतों के दायरे मे शाम का धुआँ’ (‘वासना’), ‘रिमझिम के गीत सावन गाये’ (‘अन्जाना’), ‘साथिया नही जाना’ (‘आया सावन झूम के’), ‘बागों मे बहार है’ (‘आराधना’), ‘ओ हम तुम्हारे लिए तुम हमारे लिए’ (‘इंतकाम’), ‘छुप गये तारे नजारे’ (‘दो रास्ते’), ‘ओ निसुल्ताना रे’ (‘प्यार का मौसम’), ‘पलको के पीछे से क्या तुमने कह डाला’, ‘आज तो झुनली रात मा धरती पर है आसमाँ’ (‘तलाश’), ‘रंगत तेरी नजर की किसीमें’ (‘तुमसे अच्छा कौन है’), ‘एक तेरा साथ हमको दो जहाँ से प्यारा है’ (‘वापस’). साठच्या दशकातील उत्तरार्धात ‘आराधना’ झळकला आणि किशोरकुमारचा प्रचंड यशाचा झंझावती कालखंड सुरू झाला. पूर्वी केवळ देव आनंदचा आवाज असलेला हा स्वर सर्व प्रमुख नायकांचा प्राणस्व ठरला. लता / किशोरची 1965 ते 1969 या काळातील गाणी संख्येने कमी असली तरी अविस्मरणीय अशी होती. ‘गाता रहे मेरा दिल’ (‘गाईड’), ‘लिखा है तेरी आँखो में किसका फसाना’ (‘तीन देवीयाँ’), ‘आसमाँ के नीचे हम आज अपने’ (‘ज्वेलथीफ’), ‘प्यार हुआ है जबसे’ (‘अभिलाषा’), ‘कोरा कागज था ये मन मेरा’ (‘आराधना’) याच कालावधीत लता-मुकेशची गाणी होती. ‘हम सफर मेरे हमसफर पंख तुम’ (‘पूर्णिमा’), ‘हम तो तेरे आशिक है’ (‘कर्ज’), ‘हम तुम युग युग से ये गीत मीलन के’, ‘सावन का महिना पवन करे’, ‘बोल गोरी बोल तेरा कौन पिया’ (‘मिलन’), ‘मेहबूब मेरे मेहबूब मेरे तू है तो’ (‘पत्थर के सनम’), ‘फूल तुम्हे भेजा है खत में’ (‘सरस्वती चंद्र’). इतर गायकांमध्ये मन्नाडेसोबत ‘सोच के थे गगन झूमे अभी चाँद निकल आयेगा’ (‘ज्योती’), ‘चुनरी संभाल गोरी’ (‘बहारों के सपने’), महेन्द्र कपूरसोबत ‘ये कली जब तकल फूल बनके खिले इंतजार’ (‘आये दिन बहार के’), ‘आजारे मेरे प्यार के राही निहारूँ’ (‘उँचे लोग’), ‘हमने जो देखे सपने सच हो गये वो सपने (‘परिवार’).

काँची रे काँची रे…
सत्तरचे दशक उजाडले तेच मुळी नवीन चेहर्‍याने! एक पिढी अस्तंगत होऊन नवी पिढी प्रेक्षकांपुढे येत होती. दिलीपचा ‘गोपी’, राज कपूरचा ‘जोकर’ त्यांना निवृत्तीच्या सूचना देत होता. राजेंद्रकुमार / मनोजकुमार / शम्मी कपूर / जॉय मुखर्जी / विश्वजित या नायकांच्या पिढीसोबतच वैजयंतीमाला / वहिदा / मालासिन्हा / मीनाकुमारी / आशा पारेख यांनादेखील निवृत्तीचे वेध लागले होते. नायिकांची नवी जनरेशन हेमामालिनी / राखी / जया भादुरी / लीना / योगिता बाली रूपेरी पडद्यावर आल्या. सत्तरचे दशक तसे म्हटले तर राजेश खन्ना आणि अमिताभचे होते! 75 च्या ‘शोले’च्या राक्षसी यशाने अ‍ॅक्शन फिल्मला भाव आल्याने संगीत मागे पडू लागले होते. त्यापूर्वीची पाच वर्षे म्हणजे 70 ते 74 सालापर्यंत ‘काकां’चे अधिराज्य होते! या काळात लताची संख्येने अधिक अशी युगलगीते आली. किशोसमवेत ती आणखी खुलली. या पाच वर्षांत रफीसोबतची तिची ‘बेहतरीन’ युगलगीते पाहा. ‘रंग रंग के फूल खिले मोहे भाये कोई रंग ना’ (‘आन मिलो सजना’), ‘ये मौसम भीगा भीगा है हवा भी ज्यादा’ (‘धरती’), ‘आजा तुझको पुकारे मेरे’ (‘गीत’), ‘ये दिल दिवाना है दिल तो’ (‘इश्क पर जोर नही’), ‘झिलमिल सितारों का आँगन’ (‘जीवन-मृत्यू’), ‘चला भी आ आना रसिया’ (‘मन की आँखे’), ‘यूँही तुम मुझसे बात करती हो या’ (‘सच्चा-झूठा’), ‘ओ सपनों के राजा’ (‘बन फूल’), ‘कितना प्यारा वादा’ (‘कारवाँ’), ‘तेरी नीली नीली आँखो के दिल पे’ (‘जाने अंजाने’), ‘तू भी आजा के आ गयी रूत ये सुहानी’ (‘मर्यादा’), ‘इतना तो याद है मुझे’ (‘महेबूब की मेहंदी’), ‘कुछ कहता है ये सावन’ (‘मेरा गाँव मेरा देश’), ‘चलो दिलदार चलो’ (‘पाकिजा’), ‘आओ तुम्हे मै प्यार सिखा दूँ’ (‘उपासना’), ‘तुम मेरी हो मेरे सिवा किसीकी नहीं खात हूँ कसम’ (‘आनबान’), ‘पत्ता पत्ता बूटा बूटा हाल हमारा’ (‘एक नजर’), ‘तेरी बिंदीया रे’ (‘अभिमान’), ‘वादा करले साजना’ (‘हाथ की सफाई’), ‘काहे को बुलाया मुझे बालामा’ (‘हम शकल’).

आज जी पिढी चाळीशीत असेल त्यांच्याकरिता ही गाणी ‘मर्मबंधातली ठेव’ असणार! लताची किशोरसोबतची गाणी बघा ‘सा रे ग म पा धा’ (‘अभिनेत्री’), ‘आज ना छोडेंगे बस हमजोली’ (‘कटीपतंग’), ‘शोखियों में घोला जाए फूलों का शबाब’ (‘प्रेमपुजारी’), ‘तुमको भी कुछ ऐसा ही कुछ होता होगा’ (‘आप आये बहार आयी’), ‘अपनी होने की बन्सी बना ले मुझे’, ‘चूडी नही मेरा दिल है’ (‘गॅम्बलर’), ‘काँची काँची रे’ (‘हरे रामा हरे कृष्णा’), ‘जोगी ओ जोगी अरे प्यार में क्या होगा’, ‘चंदा ओ चंदा’ (‘लाखों में एक’), ‘जादूगर तेरे नैना’ (‘मनमंदीर’), ‘तू प्यार तू प्रीत’ (‘पराया धन’), ‘आज मदहोश हुआ जाये रे’ (‘शर्मिली’), ‘ऐ मैने कसम ली’, ‘जीवन की बगीचा महकेगी लहकेगी’ (‘तेरे मेरे सपने’), ‘दिल तेरा है मैं भी तेरी हूँ’ (‘बॉम्बे टू गोवा’), ‘हमारे सिवा तुम्हारे और कितने दिवाने है’ (‘अपराध’), ‘चाहे रहो दूर चाहे रहो पास सुनलो मगर इक बात’, ‘काली पलक तेरी गोरी’ (‘दो चोर’), ‘गुम हो किसीके प्यार में’ (‘रामपूर का लक्ष्मण’), ‘दिल की बाते दिल ही जाने’ (‘रूप तेरा मस्ताना’), ‘वादा करो नही छोडेंगे तुम मेरा साथ’ (‘आ गेल लग जा’), ‘तेरे मेरे मिलन की ये रैना’ (‘अभिमान’), ‘मिले मिले दो बदन’ (‘ब्लॅकमेल’), ‘हम और तुम, तुम और हम’, ‘अब चाहे माँ रूठे या बाबा यारा मैने तो’ (‘दाग’), ‘पन्ना की तमन्ना है की हिरा मुझे’ (‘हिरा पन्ना’), ‘नयनो में दर्पण है, दर्पण में कोई’ (‘आरोप’, सं. भूपेन हजारीका), ‘करवटे बदलते रहे’ (‘आप की कसम’), ‘हम दोनो दो प्रेमी’, ‘भीगी रातो में’ (‘अजनबी’), ‘आ री आ आजा निंदीया तू ले चल’ (‘कुंवारा बाप’). लता – किशोरच्या युगलगीतांची ‘केमिस्ट्री’ आता जुळून येत होती.

लताचा युगलगीतातला तिसरा साथीदार होता मुकेश. त्यांच्यासोबत 1970 ते 1974 या काळातली गाणी होती : ‘किसी राह में किसी मोड पर कही चल न देना’ (‘मेरे हमसफर’), ‘हो मेरी आँखो के पहले ही सपने’ (‘मनमंदीर’), ‘तेरे होठों के दोन फूल प्यारे प्यारे’ (‘पारस’), ‘दो कदम तुम भी चलो, दो कदम हम भी चले’ (‘एक हसीना दो दिवाने’), ‘इक प्यार का नग्मा है’ (‘शोर’), ‘मै ना भुलूंगा मैं ना भुलूंगी’ (‘रोटी, कपडा और मकान’). या पाच वर्षांत लताचे आणखी काही सहगायक होते महेन्द्र कपूर, मन्नाडे, मनदर, शैलेन्द्र सिंग, भूपेन्द्र, डॅनी डेन्जोपा (‘मेरा नाम आओ मेरे पास आओ, ये गुलीस्तां हमारा’) आणि पंचम! शैलेन्द्र सिंगसोबतची ‘बॉबी’ची गाणी गातानाा लता 45 वर्षांची होती आणि डिम्पल 16 वर्षांची! याच सहगायकात एक नाव वाढवावे लागेल ते तलत महमूदचे! तलत व लताचे शेवटचे युगलगीत 1971 साली आलेल्या ‘वो दिन याद करो’ (‘मुहब्बत की कहानियाँ सुनाने लगी है’) या चित्रपटात होते! या पाच वर्षांत लताने 223 ड्युएटस् गायली!
आपकी आँखो में कुछ…

1975 ते 1979 या सत्तरच्या दशकाच्या उत्तरार्धाकडे जेव्हा आपण येतो तेव्हा लक्षात येते हा कालखंड मोठा धांदलीचा / अस्थिरतेचा असा देश पातळीवर होता. सिनेमा क्षेत्रातही त्याचे पडसाद उमटत होते. अमिताभचा जमाना सुरू झाल्याने नायिकांचे अधिराज्य संपुष्टात येऊ लागले. संगीतमय चित्रपटांची जागा अ‍ॅक्शन फिल्मने घेतली! याच कालखंडात लताचे दोन सहगायक काळाच्या पडद्याआड गेले. (29 ऑगस्ट 1976 मुकेश आणि 31 जुलै 1980 म. रफी) याचाही परिणाम युगलगीतांच्या गुणत्तेवर झाला. या पाच वर्षांत लताच्या युगलगीतांची संख्या होती 172! म. रफीसोबतचीच गाणी बघू या. ‘छडी रे छडी कैसे गले में पडी’ (‘मौसम’), ‘ओ तुमसे दूर रह के’ (‘अदालत’), ‘इस रेशमी पाजेब की झंकार’, ‘अब अगर हमसे’ (‘लैला मजनू’), ‘आदमी मुसाफीर है’ (‘अपनापन’), ‘नाव कागज की गहरा है पानी’ (‘दुनियादारी’), ‘तुम्हारे बिन गुजारे है कई दिन अब न’ (‘आत्माराम’), ‘सिमटी हुई है ये घडीयाँ’ (‘चंबल की कसम’), ‘बाहों में तेरे मस्ती के ढेरे’ (‘कालापत्थर’), ‘पर्वत के इस पार’, ‘कोयल बोली’, ‘डफली वाले डफली बजा’ (‘सरगम’).

याच कालखंडात लता – किशोरची गाजलेली युगलगीते पाहा : ‘इस मोड से जाते है’, ‘तुम आ गये है’, ‘तेरे बिना जिंदगी से’ (‘आँधी’), ‘मैं प्यासा तुम सावन’ (‘फरार’), ‘लडी नजरीया लडी’ (‘वॉरंट’), ‘तेरे चेहरे से नजर नहीं हटती’ (‘कभी कभी’), ‘नजरों से कह दो प्यार मे मिलने का मौसम’ (‘दूसरा आदमी’), ‘थोडा है थोडे की जरूरत है’ (‘खट्टा-मीठा’), ‘जान की कसम सच कहते है हम’ (‘आजाद’), ‘चाँद चुराके लाया हूँ’ (‘देवता’), ‘गुलमोहर गर तुम्हारा नाम होता’ (‘देवता’), ‘आपकी आँखो में कुछ महके’ (‘घर’), ‘भूल गया सब कुछ याद नही’ (‘जूली’). पूर्वी म्हटल्याप्रमाणे मुकेशची साथ 1976 सालीच सुटल्याने या पाच वर्षांत त्यांची गाणी कमीच होती. ‘चन संन्यासी मंदिर में’ (‘संन्यासी’), ‘याद रहेगा प्यार का ये रंगीन जमाना याद रहेगा’ (‘उमर कैद’), ‘कभी कभी मेरे दिल में’ (‘कभी कभी’), आता लताच्या सहगायकात अमितकुमार, नितीन मुकेश, येसूदास, अन्वर, भप्पी लहरी यांची भर पडली होती. याच काळात रफी, किशोर, मुकेश व लता मंगेशकर यांचे एकमेव गीत ‘अमर अकबर अँथोनी’त होते, गीताचे बोल होते, ‘देख के तुमको दिल डोला है’. लतासोबतचे भूपेन्द्रचे ‘नाम गुम जायेगा चेहरा ये बदल जायेगा’ (‘किनारा’), महेन्द्र कपूरसोबतचे ‘मेरी साँसो को जो महका रही है’ (‘बदलते रिश्ते’) ही गाणीही गाजत होती!
मेरी आवाजही पहचान है…

‘मेरी आवाजही पहचान है’ लताकरिता ही गीताची ओळ ‘परफेक्ट’ आहे. आजही वयाच्या 80 व्या वर्षी लता मधुर भांडारकरच्या ‘जेल’मध्ये गाते आहे. करिश्मा म्हणतात तो हा! 1970 ते 79 या दशकात लताच्या एकूण युगलगीतांची संख्या होती 395! आणि या पुढील दशकात म्हणजे 1980 ते 1989 या ऐंशीच्या दशकात होती 270! पण हा कालखंड संगीताच्या दुनियेत सर्वात ‘वाईट’ म्हणून ओळखला जातो. याच दशकात 13 ऑक्टोबर 1987 ला लताचा तिसरा सहगायक किशोरकुमारदेखील कालवश झाला आणि चित्रपट संगीतातील आमचा इंटरेस्टच संपला. लताचे या दशकातील नवे सहगायक होते : सुरेश वाडकर, शब्बीरकुमार, महम्मद अजजी, एस. पी. बालसुब्रह्मण्यम्, तलत अजीज, अनुप जलोटा, पंकज उधास, मनमोहन सिंग! या दशकात किशोरसोबतची लताची गाणी होती ‘आँखो में हमने आपके सपने सजाये है’, ‘हजार राहे’ (‘थोडीसी बेवफाई’), ‘चारू चंद्र की चंचल चितवन बिन बरसा बदले सावन’ (‘मनपसंद’), ‘मुझे रही है तेरी गर्म साँसे’ (‘स्वयंवर’), ‘अपने प्यार के सपने सच हुए’ (‘बरसात की एक रात’), ‘चाँदनी रात में इक बार तुझे देखा है’ (‘दिल-ए-नादान’), ‘क्या यही प्यार है’ (‘रॉकी’), ‘सर के सरके सर की चुनरिया’, ‘देखा एक ख्वाब तो ये’ (‘सिलसिला’), ‘तुज संग प्रीत लगाई सजना’ (‘कामचोर’), ‘उँचे नीचे रास्ते और मंजिल तेरी दूर’ (‘खुद्दार’), ‘जाने कैसे कब कहाँ’ (‘शक्ती’), ‘मुझे तुम याद करना और मुझको’ (‘मशाल’), ‘शायद मेरी शादी का खयाल’ (‘सौतन’), ‘दिल मे आग लगाये’ (‘अलग अलग’), ‘हम चुप है दिल सुन रहे है’ (‘फासले’), ‘सागर किनारे दिल ये पुकारे’ (‘सागर’). सुरेश वाडकरांसोबत ‘ये आँखे देखकर हम सारी दुनिया’ (‘धनवान’), ‘मेघा रे मेघा रे’, ‘इन हँसी वादियों से दो चार नजारे’ (‘प्यासा सावन’), ‘मेरी किस्मत में तू नही’ (‘प्रेमरोग’), ‘लिखनेवाले ने लिख डाले’ (‘अर्पण’), ‘हमराही मेरे हमराही’ (‘दो दिलों की दास्तां’), ‘मेरी याद आयेगी आती रहेगी’ (‘सनी’), ‘हुस्न पहाडों का’ (‘राम तेरी गंगा मैली’), ‘पतझड सावन बसंत बहार’ (‘सिंदूर’), ‘घटा छा गई बहार आ गई है’ (‘वारीस’), एस. पी. बालसुमण्यमसोबतची ‘एक दुजे के लिए’ आणि ‘मैने प्यार किया’ची गाणी. तलत अजीजसोबतच ‘फिर छीडी रात बात फूलों की’ (‘बाजार’), शब्बीरकुमारसोबत ‘जब हम जवाँ होगे’, ‘बादल यूँ गरजता है’ (‘बेताब’), ‘प्यार किया नहीं जाता’ (‘वो सात दिन’), ‘तुमसे मिलकर न जाने कुछ’ (‘प्यार झुकता नही’), ‘जिहाल-ए-मस्की मकून वरंजिश बहाल ए हिजरा तुम्हारा दिल है’ (‘गुलामी’) ही यादी तशी न संपणारी आहे.

1991 पासून लताचे गाण कमालीचे कमी झाले. नव्वदच्या दशकात गुलशनकुमार यांच्या झंझावाताने संगीतात आमूलाग्र बदल होत गेले. ‘अनुराधा पौडवाल’चे टीव्ही चॅनेल्सवर उबग येईल इतके हॅमरिंग सुरू झाले. लताने या सर्व प्रकारातून व्यवस्थित आणि सुज्ञपणे स्वत:ला अलिप्त ठेवल्याने आम्हा लताप्रेमींना आनंदच झाला! पुढे मग ‘मोहब्बते’, ‘दिलवाले दुल्हनिया’, ‘दिल तो पागल है’ आणि ‘वीरजारा’त लताची युगलगीते होती; पण त्यात ती ‘मजा’ नव्हती! आणि खरं सांगायचे तर ज्यांनी चित्रपट संगीताच्या सुवर्णकाळाची तृप्ती अनुभवली त्यांना तर अलीकडचे संगीत ऐकावंही वाटत नाही, इतके ते वाईट आहे. लताच्या युगलगीतांचा आढावा घेताना तुहीदेखील त्या ‘मंतरलेल्या युगाचा’ आस्वाद घेतला असणार. लताच्या सहस्रचंद्रदर्शनाच्या निमित्ताने तिच्या ‘सहस्र’ गीतांचा सुखद वर्षाव झेलत लताला शुभेच्छा देऊयात!

गीतकारांसोबत लताने गायलेल्या गीतांचा आढावा घेताना पुढील नोंदी नजरेसमोर येतात. लताने प्रमुख गीतकारांकडे गायलेल्या गीतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.
आनंद बक्षी (679), राजेंद्रकृष्ण (554), शैलेन्द्र (359), मजरूह सुलतानपुरी (411), साहीर लुधियानबी (160), हसरत जयपुरी (296), शकील बदायुनी (204), भरत व्यास (206), इंदीवर (156), प्रेमधवन (197), गुलजार (55), प्रदीप (52), पं. नरेन्द्र शर्मा (55)

विश्वास नेरूरकरांच्या ‘गंधार’ या लताच्या गीतकोषाने 1947 ते 1990 पर्यंतच्या लताने गायलेल्या गीतांबाबतची रोचक माहिती रसिकांना मिळते. लताने प्रमुख संगीतकारांकडे गायलेल्या एकूण गीतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे लताने त्या संगीतकाराकडे गायलेली युगलगीते आहेत.
शंकर-जयकिशन : 453 (116), लक्ष्मीकांत-प्यारेलाल : 666 (241), सचिन देव बर्मन : 182 (45), मदनमोहन : 210 (34), कल्याणजी – आनंदजी : 297 (102), चित्रगुप्त : 240 (68), नौशाद अली : 155 (33), अनिल विश्वास : 123 (16), रोशन : 146 (32), वसंत देसाई : 112 (30), सलील चौधरी : 108 (40), सी. रामचंद्र : 298 (76), राहुल देव बर्मन : 327 (152), हेमंतकुमार : 139 (24), हुस्नलाल भगतराम : 107 (29), राजेश रोशन : 112 (60).

लतासोबत पहिले : शेवटचे
(चित्रपट प्रदर्शनाच्या तारखेनुसार)
1. म. रफी : पहिले युगलगीत : ‘चलो हो गयी तैय्यार’ (‘शादी से पहले’) 1947
शेवटचे युगलगीत : ‘शोले शोले मेरी जवानी’ (‘लॉकेट’) 1984
2. मुकेश : पहिले युगलगीत : ‘याद रखना चाँद तारो इस सुहानी’ (‘अनोखा प्यार’) 1948
शेवटचे युगलगीत : ‘प्यार का बंधन खून का रिश्ता’ (‘खेल खिलाडी का’) 1977
3. किशोरकुमार : पहिले युगलगीत : ‘ये कौन आया रे करके सोलह सिंगार’ (‘जिद्दी’) 1948
शेवटचे युगलगीत : ‘जाने दो जाने दो मुझे जाना है’ (‘शहनशाह’) 1988
4. तलत महमूद : पहिले युगलगीत : ‘शिकवा मैं तेरा गाऊंँ दिल में’ (‘अनमोल रतन’) 1950
शेवटचे युगलगीत : ‘मुहब्बत की कहानियाँ सुनाने लगी’ (‘वो दिन याद करो’) 1977
5. हेमंतकुमार : पहिले युगलगीत : ‘चाँदनी राते प्यार की बाते’ (‘जाल’) 1952
शेवटचे युगलगीत : ‘छुपा लो यूँ दिल में प्यार’ (‘ममता’) 1966

प्रमुख गायक – गायिकांसोबत लताने गायलेल्या गीतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. म. रफी (440), किशोरकुमार (327), मुकेश (161), सी. रामचंद्र (50), तलत महमूद (65), मन्नाडे (107), महेन्द्र कपूर (77), ह ेमंतकुमार (52), आशा भोसले (74), उषा मंगेशकर (62), गीता दत्त (34), शमशाद बेगम (27).

हिंदी चित्रपट संगीताच्या गोल्डन इरा काळातील दर्जेदार माहितीपूर्ण लेखांसाठी क्लिक करा 

Dhananjay Kulkarni
+ posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.