© डॉ अमिता कुलकर्णी

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

बाबूजी अर्थात मा.सुधीर फडके व आधुनिक वाल्मिकी, शब्दप्रभू ग.दि.मा….या अजरामर द्वयीनं आपलं आयुष्य खर्‍या अर्थानं शब्द व स्वरांच्या किमयेनं भारून टाकलंय..आपलं बालपण,महाविद्यालयीन दिवस व आत्तापर्यंतचं आयुष्य हे बाबूजींनी स्वरबद्ध केलेल्या व गायलेल्या असंख्य गीतांनी समृद्ध केलंय..गदिमा व बाबूजी ही अजरामर जोडी..
“फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार ।
विठ्ठला तू वेडा कुंभार ।।”
हे ग.दि.मांनी लिहिलेलं अन बाबूजींनी गायलेलं आवडतं गाणं…असंख्य वेळा ऐकलेलं, अगदी शाळकरी वयापासून..आज बाबूजींचा स्मृतिदिन. अनुभवांचं विश्व विस्तारत गेलं अन या गाण्याचे नवनवे अर्थ, त्यातून निघणा-या वेगवेगळ्या आशयांच्या निरनिराळ्या छटा दिसू लागल्या…(Revisiting the Unforgettable Marathi Devotional Song by Sudhir Phadke ‘Vithala Tu Veda Kumbhar’)

तेव्हा कुंड्या, माठ, तसंच दिवाळीच्या दिवसात किल्ल्यावर ठेवण्यासाठी मातीची चित्रं वगैरे आणण्याच्या निमित्तानं घरातल्या वडीलधार्‍यांसोबत कधीतरी कुंभारवाड्यात चक्कर मारतांना मातीपासून वेगवेगळे आकार निर्माण करणा-या त्या अद्भुत किमयागारांच्या कलाकृति मनात घर करुन राहिलेल्या होत्या, आहेत…गाणी, कविता यांचे अर्थही समजणं त्या वयात तसंही अवघड होतं..वरवरचा अर्थ समजला तरी खूप होतं..तेंव्हा हे गाणं विठ्ठल नांवाच्या कुठल्या तरी कुंभाराला उद्देशून म्हटलंय असंच वाटायचं. पण त्याला वेडा कां म्हंटलं असावं? त्यानं कसला वेडेपणा केला असेल?

माती पाणी उजेड वारा। तूच मिसळशी सर्व पसारा।

आभाळचि मग ये आकारा । तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत ना पाऱ ।।

कुंभार जे काम करतो त्याचा थोडक्यात सारांश या ओळीत दिला आहे…मातीवर सगळ्या प्रक्रिया करुन, मातीचा गोळा चाकावर ठेवून, चाक फिरवताना हलक्या हातानं त्या गोळ्याला हवा तसा आकार द्यायचा. ते कच्चं मडकं थोडं सुकलं की भट्टीत पक्कं भाजायचं अशी सारी कुंभारकामाची प्रक्रिया..त्यानं बनवलेल्या बहुतेक पात्रांचा मुख्य आकार आभाळासारखा घुमटाकार, म्हणून त्याच्या कामातून आभाळच आकाराला येतंय हा विचार…या विठ्ठल नावाच्या उद्योगी कुंभारानं बनवलेल्या या मडक्यांची संख्या अगणित..जागा वाचवण्यासाठी या वेड्या कुंभारानं बनवलेल्या घटांची विशाल उतरंड कुठपासून सुरू होते आणि कुठपर्यंत ती पसरलीय तिथपर्यंत नजर सुद्धा पोचू शकत नाही. आता त्यानं तरी इतकी मडकी कशाला म्हणून बनवून ठेवायची? वेडा कुठला…

घटाघटाचे रूप आगळे । प्रत्येकाचे दैव वेगळे ।

तुझ्याविना ते कोणा न कळे । मुखी कुणाच्या पडते लोणी कुणामुखी अंगार ।।

या वेड्या कुंभारानं किती वेगवेगळ्या आकारचे घट बनवावेत? नानाविध…जसे या घटांचे आकार वेगळे तशीच त्यांची नशीबंही किती भिन्न भिन्न…एकाचं दुसर्‍यासारखं मुळीच नाही..द्वापर युगातली मातीची मडकी, घट, रांजण हे दही, दूध, लोणी यांची साठवण करण्यासाठी, अन त्यांचं भाग्य एवढं थोर की भगवान श्रीकृष्णांच्या हस्तस्पर्शाचा लाभ त्यांना झालेला..पण काहींच्या नशीबात सदाच रखरखाट..अंत्ययात्रेला जातांना एका मडक्यात निखारे घालून बरोबर नेण्याची प्रथा आहे. त्यांची कहाणी मृत्तिकेपासून सुरू होते आणि अंत्ययात्रेला संपते.

तूच घडविसी तूच मोडिसी । कुरवाळिसी तू तूच ताडिसी ।

नकळे यातुन काय जोडिसी । देसी डोळे परी निर्मिसी तयापुढे अंधार ।।

विश्व निर्माता, दिन व ऋतूचक्रांसारख्या यंत्रणेतून विश्वातल्या असंख्य वस्तू निर्माण करतो अन नष्टही करतो. त्याचं हे काम अनादिकालापासून सदोदित अव्याहतपणे चालू आहे अन अनंत कालापर्यंत ते असंच चालत राहणार आहे. माती, पाणी, उजेड, वारा अन अवकाश म्हणजेच पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांमधून सृष्टीमधील सारी निर्मिती होते …पांचभौतिक तत्वांपासूनच मनुष्याची निर्मिती…या पाच मुख्य घटकांमधून परमेश्वर जी निर्मिती करतोय ती किती विस्तृत व महान आहे हे,

“आभाळचि मग ये आकारा” या ओळीतून सांगितलंय…आभाळासारखाच तिचा अंत किंवा पार लागणार नाही…मनुष्यप्रााणी हा परमेश्वराची सर्वोत्तम निर्मिती आहे असं मानलं जातं..पंच महाभूतांचे आपण सारेच अंश..असं असताना हा वेगळा, तो वेगळा हे मानण्यात आपण धन्यता मानतोय..अन त्या महानतेचा अपमानही करतोय..

एका अत्यंत सालस आणि निरागस कुटुंबाच्या दैवगतीमुळं होणार्‍या दुर्दशेची हृदयद्रावक कथा या एका गाण्यातून स्पष्ट केलीय..

“तूच घडविसी तूच मोडिसी, कुरवाळिसी तू तूच ताडिसी ।”

दुःख अगदीच असह्य झाल्यावर,

“देसी डोळे परी निर्मिसी तयापुढे अंधार, विठ्ठला तू वेडा कुंभार।।”

अशा शब्दात त्या वेड्या कुंभाराचा निषेध केलाय.. अंधार, याचा अर्थ या ठिकाणी काळोख किंवा उजेडाचा अभाव एवढ्यापुरताच मर्यादित नाही…अनेक प्रकारचे अंधःकार या जगात दिसतात..कोणी अज्ञानाच्या अंधःकारात तर कोणी निराशेच्या गर्तेत, कोणी अन्यायाच्या अंधारात …आशेचा एक किरण पाहण्याची आस बाळगणारे सगळेच..

अनेकांना संपत्तीचा माज…काही ज्ञानांध, ज्ञानाच्या अहंकारानं आंधळे.. स्वार्थापोटी डोळ्यावर कातडं ओढून घेतल्यामुळं उघड्या डोळ्यांसमोर अंधार असलेले अनेक..तर अनेक जण सत्तांध… कोणी मदांध, कोणी धर्मांध तर कोणी कामांध!…आपणहून अंधःकार स्वीकारलेले हे..काहींना उपासमारीमुळं भोंवळ येऊन डोळ्यापुढे अंधार दाटलाय तर काहींच्या डोळ्यांसमोर भीतीमुळं अंधार.. किती तर्‍हांचे अंधार..

कवि देवाला विचारतोय, की जर सगळीकडे अंधारच पसरवायचा होता तर तो पहायला डोळे तरी कशाला दिलेस? जगाकडं बघण्यासाठी दृष्टी दिली,पण ते समजून घेण्याची नजर आपल्यालाच उत्पन्न करायचीय..ती परमेश्वर नाही तयार करु शकत..डोळे समोरचं दिसतं ते बघतात,पण बुद्धी , नजरिया,दृष्टिकोणासमोरचा अंधार दूर करायला मदत करते..अन त्यासाठी बुद्धी जागृत ठेवायचं काम हे माणूस स्वतःच करु शकतो..त्यासाठी इतरांचा वा परमेश्वराचा उपयोग नाही..बुद्धीचा वापर,दृष्टिकोण स्वतःचा स्वतःच निर्माण करुन स्वतःभोवती असणार्‍या अज्ञानाच्या अंधाराचं निराकरण आपणच करायचंय..त्यासाठी आपलं जग समृद्ध व्हायला हवंय…

बाबूजींना सादर वंदन…

हेही वाचापराधीन आहे जगती पुत्र मानवाचा..बाबूजी उर्फ सुधीर फडके 

Dr Amita Kulkarni
Dr. Amita Kulkarni
+ posts

डॉ. अमिता कुलकर्णी

आयुर्वेदाच्या डॉक्टर असलेल्या अमिता कुलकर्णी यांना  समाजसेवेचा वारसा त्यांच्या घरातूनच मिळाला. आजी-आजोबा, आई वडील सर्वच जण समाजासाठी होईल तितकं काम करणारे. अर्थातच अमिताताईंवर लहानपणापासून तेच संस्कार झाले. समाजसेवा करता यावी म्हणूनच त्यांनी वैद्यकीय शिक्षण घ्यायचं ठरवलं. शिक्षण चालू असतानाच रोटरॅक्टच्या माध्यमातून नेत्र तपासणी शिबिरं, स्त्री आरोग्य तपासणी, पोलिओ निर्मूलन इ. उपक्रमांत त्या सहभागी होत असत. पुढे स्वतःचा व्यवसाय सुरू केल्यावर त्यात तोचतोचपणा जाणवू लागला म्हणून त्या धर्मार्थ दवाखाने, फिरती रुग्णालये अशा ठिकाणी स्वयंसेवक म्हणून काम करू लागल्या.

CASP (Community aids sponsorship programme) च्या अंतर्गत झोपडपट्टीत वैद्यकीय सेवा त्या देत असत. पुढे CRY या आंतरराष्ट्रीय संघटनेसाठी त्या काम करू लागल्या. ते करत असतानाच त्यांनी स्वतःच्या पुढील कार्याची दिशा ठरवली. वंचित मुलं आणि शोषित स्त्रिया यांच्यासाठी आरोग्य सेवा देण्याचं पक्कं केलं. हे सर्व करत असताना त्यांच्या आईने त्यांच्या मुलाची संपूर्ण जबाबदारी घेऊन त्यांच्या कामाला सक्रिय पाठिंबा दिला. त्यामुळे त्या झोकून देऊन काम करू शकल्या. १९९८ पासून जवळजवळ एक तप त्यांनी पूर्णतः समाजसेवा केली. त्या काळात अर्थार्जन तर दूरच राहिलं उलट कित्येकदा त्यांना पदरमोड करून काम चालू ठेवावं लागलं. आरोग्य विषयक काम करतानाच त्यांना आदिवासी पाड्यांतून बालविवाह, वयात येणाऱ्या मुलींच्या मूळ समस्या, कुटुंब नियोजनाविषयी अज्ञान अशा इतर गोष्टीही लक्षात येऊ लागल्या आणि मग त्यासाठी प्रबोधन करण्याचं कामही त्यांनी सुरू केलं.

महाराष्ट्राव्यतिरिक्त हरियाणा, पंजाब इ. राज्यांत देखील त्यांनी अनेक अडचणी व विरोध सहन करून काम केलेलं आहे. इतक्या सगळ्या गोष्टी करत असताना स्वतःची ट्रेकिंगची आवड जोपासण्याचा सुद्धा त्यांनी प्रयत्न केला. हिमालयात ट्रेकिंगला गेलेल्या असतांना तिकडे झालेल्या ओळखींमधून उत्तरांचल मधल्या लहान लहान गावातली आरोग्य केंद्रे, RCH ( Reproductive Child & Health) च्या माध्यमातून आरोग्य जागृती करण्याचं कामही त्यांनी उत्साहाने केलं.

आयुष्याबद्दल बोलताना त्या म्हणतात, "निसर्गाकडून माणसाला खूप काही शिकायला मिळतं. आपल्या मर्यादा कळतात. आणि एक अनुभव संपन्न आयुष्य मिळालं की माणूस म्हणून जन्माला आल्याचा आनंद होतो.

Leave a comment