– © डॉ. अमिता कुलकर्णी 

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

१९७० मध्ये एक चित्रपट पडद्यावर आला. चित्रपटाचं नाव होतं ‘दस्तक’ (1970 Hindi Film Dastak)! एका नवविवाहित दांपत्त्याची कथा सांगणारा चित्रपट…संजीव कुमार (Sanjeev Kumar) व रेहाना सुलतान (Rehana Sultan) यांना अनुक्रमे उत्कृष्ट अभिनेता व अभिनेत्री व सोबत संगीतकार मदन मोहन (Music Director Madan Mohan) यांना उत्कृष्ट संगीतकार म्हणून त्यांचा पहिला राष्ट्रीय सन्मान मिळवून देणारा चित्रपट.
त्यातलं एक गीत, ‘माई री ..मैं कासे कहूॅं पीर..’ आई, मी माझ्या हृदयातली पीडा कोणाला सांगू?.. संगीतकार मदनमोहन यांचं हृदयस्पर्शी संगीत व शब्दांचे जादूगार मजरुह सुलतानपुरी यांचं हे गीत.. गायलंय स्वरसम्रााज्ञी लतादीदी व खुद्द मदनजी यांनी..गेल्या महिन्यात २५ जून रोजी मदन मोहन यांचा जन्मदिन व दोन दिवसांपूर्वी १४ जुलै रोजी त्यांचा स्मृतिदिन होता. त्यानिमित्ताने  हृदयस्पर्शी गीत ‘माई री मैं कासे कहूँ पीर अपने जिया की’ गाण्याचे हे रसग्रहण. (Revisiting Music Director Madan Mohan’s 1970s National Award Winning Film Dastak Song Mai Ri Main Kase Kahoon)

रस्त्यानं चालताना अचानक जर ठेच लागली तर इजा होते, जीव कळवळतो..पीडा होते. वेदनांनी जीव कासावीस होतो…पीडा, हृदयाची पीडा, वेदना..

पण हे झालं बाहेरच्या जखमांचं, इजांचं..याचे घाव तर काही योग्य इलाजांनी बरे होतात..

पण हृदयावर झालेल्या घावामुळं जी जखम होते, त्याच्या वेदनांमुळं हृदय व्यथित होतं, ती वेदना असहय असते..एकतर ती बोलून दाखवता येत नाही, अन त्याच्या वेदना सहन होत नाहीत..अन या जखमा चिघळत जाणार्‍या, नासूर..याच्यावर उपायही करणं मुश्कील..या वेदना सहन करत राहायच्या…

किंवा कोणा जवळच्या संवेदनशील माणसाकडे मन मोकळं केलं तर कदाचित या वेदना हलक्या व्हायला मदत होते..

मन हलकं होतं, आणि या व्यथेवरचा एखादा उपायही कदाचित अशा कोणाकडून मिळू शकतो…

पण सगळ्यांच्याच नशीबात असा एखादा ‘हमदर्द’ असतोच असं नाही.

आदमी का आदमी हर हाल में हमदर्द हो
इक तवज्जोह चाहिए इंसाँ को इंसाँ की तरफ़

दुःख, सल, वेदना हलकी कधी होते?..तर ती वाटून घेणारं, ती ऐकून समजून घेणारं संवेदनशीलता असणारं माणूस लाभलं तर..अन जो आपला असणारा, तोच ही वेदना समजून घेणारा ‘हमदर्द’ नसेल तर व्यथा अजूनच तीव्र होत जाते..

जो हमदर्द , वही दर्दका कारण..

आपल्या मनातलं दुःख, हृदयातली वेदना ही न सांगताही केवळ आपल्या देहबोली किंवा डोळ्यातील भावनांवरुन चुटकीसरशी ओळखते ती आपली आई…

आई ही आपल्या मुलांशी भावनांनी जोडली गेलेली असते..मुलांचं दुःख नुसत्या डोळ्यांतून समजून घेणारी, वेदनांवर हळूवारपणे फुंकर घालून त्यांची पीडा कमी करणारी…आईबरोबर आपण आपली सुखं दुःखं सहज बोलू शकतो..

एका मुलीसाठी तर आई म्हणजे आपल्या सर्व गोष्टी बोलण्याचं सुरक्षित व ममत्वाचं महत्वपूर्ण, विश्वासाचं स्थान..

जर आईच जवळ नसेल, किंवा दुर्दैवानं आई नसेलच तर एखादी मुलगी कोणाला आपल्या सुख दुःखात सहभागी करुन घेईल?

कोणासोबत आपलं दुःख, पीडा व्यक्त करेल?
ती एकच करु शकेल, आपल्या हृदयात वसलेल्या आपल्या मातेला आपल्या वेदनेत भागीदार करुन घेईल..

१९७० मध्ये एक चित्रपट पडद्यावर आला. चित्रपटाचं नाव होतं ‘दस्तक’ !

एका नवविवाहित दांपत्त्याची कथा सांगणारा चित्रपट…

त्यातलं एक गीत,

‘माई री ..मैं कासे कहूॅं पीर..’

आई, मी माझ्या हृदयातली पीडा कोणाला सांगू?..

संगीतकार मदनमोहन यांचं हृदयस्पर्शी संगीत व शब्दांचे जादूगार मजरुह सुलतानपुरी यांचं हे गीत..

गायलंय स्वरसम्रााज्ञी लतादीदी व खुद्द मदनजी यांनी..

‘माई री, मै कासे कहूॅं पीर..’

‘दस्तक’ चित्रपटाची नवपरिणीता नायिका सलमा ही परिस्थिती, नशीबाच्या कचाट्यात सापडलीय..एक प्रकारे तिची ससेहोलपटच होतेय..त्याची ही कथा, ‘दस्तक’..

सलमा व तिचा नवरा हमीद, यांची ही कथा..

Dastak 1970 film poster

हमीद एक कारकून आहे, अन मुंबईत राहायला घर मिळवण्यासाठी बरेच प्रयत्न करुन झाल्यावर जे घर मिळतं, ते कुप्रसिद्ध अशा वेश्यावस्तीत असलेलं..जे घर मिळतं ते पूर्वी त्या घरात राहणार्‍या शमशाद नावाच्या एका कुख्यात मुजरा करणार्‍या, तवायफचं..हमीद व सलमा तिथं राहायला आल्यानंतरही तिचे असंख्य चाहते रात्री बेरात्री दार ठोठावू लागले..

आजूबाजूचं वातावरणही कुचंबणा करणारं..कारण वेश्यावस्ती, अन नाच व गाणार्‍यांचा हा मोहल्ला..सतत नाच गाण्यांच्या आवाजांनी, येणार्‍या जाणार्‍या विकृत चाहत्यांच्या वर्दळीनं गजबजलेला..

परिस्थितीमुळं सलमा इतकी अगतिक झालीय की जगणंही मुश्कील झाल्यासारखं…संगीत हा तिचा श्वास आहे, अन त्याच्यापासून तिला लांब राहावं लागतंय..हमीद चांगलं घर मिळवण्यासाठी कष्ट करतोय, अन त्यासाठी त्याला साहजिकच दिवसभर घरापासून लांब राहाणं भाग पडतंय, अन अशा वस्तीत, अशा परिस्थितीत सलमा त्याची वाट बघत बसण्यापलीकडे काहीही करु शकत नाही..

सलमाचे वडील शास्त्रीय संगीत गायक, हा वारसा तिच्याकडे चालत आलाय. संगीत आणि गायनाचा ..कुचंबणा अशी आहे की, पूर्वीच्या एका तवायफच्या जागेत ते सध्या राहात असल्यामुळं आजूबाजूच्या लोकांचा तिच्याकडे बघण्याचा नजरियाही तसाच होतो…अशा अवस्थेत साधी खिडकी उघडून बाहेर बघणंही मुश्कील होतं.

तिनंही लोकांसाठी गावं अशी जबरदस्ती काही लोक करतात. पण हमीद आणि सलमा आला दिवस घालवत असतात. सलमाचा प्राण असलेलं तिचं संगीत, गायन यामुळं बंद होत जातं… तिचा जीवाभावाचा तानपुराही तिला दुरावतो..

बाहेरच्या जगातले .वासनांनी ग्रस्त, विकारी लोक अन घरात एकटीनं, मनाविरुद्ध डांबून राहाण्याची शिक्षा..त्यात स्वतःची संगीताची आवडही न जपता येण्याचं दुःख..ही मानसिक कुचंबणा सहन न होऊन ती खचून जाते..तिचा जीव कोंडतो..

कारण असं आहे की, स्वतःची आवड न जपता येण्याची सक्ती, तसंच या मोहोल्ल्यात येणार्‍या रंगेल लोकांच्यापासून स्वतःला वाचवण्याची पराकाष्ठा करणं या दुहेरी कात्रीत ती सापडलीय..तिला घरात साधं गुणगुणायचीही चोरीच..कारण या वस्तीतल्या तवायफ, मुजरा करणार्‍या, वेश्या यांच्याकडे येणार्‍या लोकांच्या नजरा तिच्या खिडकीकडे लागलेल्या, जणू काही टपून बसलेल्या…

याच चित्रपटातल्या एका प्रसिद्ध गीताच्या ओळींतून हे सूचित केलंय..

हम हैं मता-ए-कूचा-ओ-बाज़ार की तरह,
उठती है हर निगाह ख़रीदार की तरह।

नायिका स्वतःला “मता-ए-कूचा-ओ-बाज़ार” म्हणतेय, याचा अर्थ बाज़ारात विकलं जाणारं सामान, असं सामान ज्याच्यावर प्रत्येक ग्राहकाची नजर आहे.. अशा पारिसरात राहात असताना तिला ती स्वतःला बाजारात विकलं जाणारं सामान असल्यासारखं वाटतंय, कारण या मोहोल्ल्यात येणारा प्रत्येक ग्रााहक हा तिच्याकडे तसंच बघतोय..

या आत्यंतिक मानसिक कुचंबणेनं सलमा कोलमडते.
अन मग..एक निश्चयानं ती आपल्या लाडक्या तानपुर्‍याला जवळ करुन संगीत छेडते..त्यातून हमीदचा संताप ओढवून घेते…तानपुरा व संगीत कायमचं बंद होतं…

अशा परिस्थितीत तिच्या हृदयाची व्यथा या गाण्यातून बाहेर पडलीय..

‘माई री मैं कासे कहूँ पीर अपने जिया की, माई री’ ….

 

यात हमीदची असहाय्यताही..ती सलमाला समजतेय, पण तिची स्वतःचीही जी कुतरओढ होतेय ती दयनीय आहे..स्वस्थ बसू देत नाही तिला..ही व्यथा कोणाला सांगावी?

या कुचंबणेतून जन्माला आलेली अगतिकता, हतबलता या संपूर्ण चित्रपटातून आपल्या अंगावर येते..आघात करते..

या चित्रपटात बरीच प्रतिकात्मकता आहे..

सलमानं हौसेनं एक मैना पाळलीय, पिंजर्‍यात बंदिस्त..चित्रपट बघताना आपल्या लक्षात येतं की, ही पिंजर्‍यातली बंदिस्त मैना हे सलमाचंच प्रतिक आहे..उंच आकाशात भरारी मारणारी स्वच्छंद मैना या पिंजर्‍यात अडकलीय, ती उडणं विसरलीय, आपलं मंजुळ गाणं विसरुन गेलीय..

पिंजर्‍यातली मैना आणि प्रारब्धाच्या, अदृश्य गजांआड बंदिस्त झालेली सलमा दोघीही नकळत एकाच पातळीवर , समांतर आयुष्य जगताना दिसताहेत..

या असहय वेदनेतून सलमा त्या मैनेपुढं आपली वेदना बोलून दाखवतेच…

‘मैना, तू तो गा, मेरा नाही तो कमसे कम अपना ही दिल बहला’ ….

हमीद रोज कामाला निघून गेल्यावर, घरातच अडकून राहाणं हे तिचं प्राक्तन बनलंय..बाकीच्या सर्वसामान्य स्त्रियांसारखं तिला घराबाहेर पडणं, शेजारी जाऊन गप्पा मारणं हे अशक्य आहे..

आजूबाजूचा भाग हा नाचणं गाणं, बजावणं चालणार्‍यांचा मोहोल्ला आहे..लाभलेल्या शेजारणी या गृहिणी नाहीत, अन शेजारी सर्वसाधारण दुकानं, किराणा,भाजी वगैरेंची नसून दारुचे गुत्ते, अन तिथं येणार्‍या मद्यधुंद माणसांच्या वासनांध नजरा..जणू नजरेनंच तिला खाऊन टाकतील, अंगाला झोंबणार्‍या बुभुक्षित नजरा..

मनीची व्यथा बोलायलाही कोणी नाहीये..
एका उच्च दर्जाच्या शास्त्रीय गायकाची मुलगी सलमा स्वतः संगीत शिकलेली आहे.
ज्या परिसरात ती राहतेय तिथून आजूबाजूनं गाणं सतत कानांवर पडतंय..पण तिला गाता येत नाहीये..त्यामुळं तिची जी तगमग होतेय, ती हमीदला समजतेय..

तो बोलून दाखवत नाहीयेत, किंवा तिला दिलासा देणं जमत नसलं तरी तो अगदीच अनभिज्ञही नाहीये. सलमाला एवढंच पुरेसं नाहीये..त्याचं वाईट वाटणं किंवा सहानुभुतीपूर्वक बघणं..एवढ्यावरच तिची तगमग कमी होत नाहीये…

तिचा सुख-दु:खाचा सखा, तिचा तंबोरा तिच्या सोबत आहे. पण तिला गाण्याची इच्छा झाली तरी गुणगुणायचीही परवानगी नाहीये..

मोहोल्ल्यात येणार्‍या बुभुक्षित गिर्‍हाइकांचा डोळा आहेच तिच्यावर… घरात तंबोरा असून तो वाजवता येत नाही… जणू काही संगीताची गंगा बाजूनं वाहतेय पण त्या स्वररगंगेत आपली तृष्णा भागवण्याची तिला परवानगी नाहीये.

काठावर उभी तशीच, तहानलेली..

आपली बेबसी, अगतिकता व्यक्त करताना ती म्हणतेय,

ओस नयन की उनके मेरी लगी को बुझाये ना
तन मन भीगो दे आके ऐसी घटा कोई छाये ना
मोहे बहा ले जाये ऐसी लहर कोई आये ना
पड़ी नदिया के किनारे मैं प्यासी..१

डोळ्यातली आर्द्रता (ओस), अश्रू माझ्या अंतर्मनातली पीडा, उदासीच्या अग्नीला विझवू शकत नाही.

माझ्या तनामनाला चिंब भिजवून ही आग शांत करेल असे मेघही बरसत नाहीयेत..

अशा परिस्थितीत मला सोबत वाहून नेणारी एखादी लाटही येत नाहीये..माझी अवस्था अशी आहे की, तुडुंब भरलेल्या नदीकिनारी मी. काठावर उभी तशीच, तहानलेली..अगतिक, व्यथित..अन कोणाला सांगताही येत नाही ही व्यथा..

तिच्या हातात हमीद घरी परत येण्याची फक्त प्रतिक्षा करत राहाणं एवढंच आहे.

पी की डगर में बैठा मैला हुआ री मोरा आंचरा
मुखडा है फीका फीका नैनों में सोहे नहीं काजरा,
कोई जो देखे मैया प्रीत का वासे कहूं माजरा
लट में पड़ी कैसी बिरहा की माटी..२

ती सांगतेय, पतिच्या प्रतीक्षेत, त्याची वाट बघता बघता डोळ्यांतून अश्रू वाहतात..
डोळ्यातून सतत वाहणार्‍या अश्रूंनी डोळ्यातलं काजळ वाहून जातंय..रडून चेहेर्‍यावरचे रंग उडालेत…
डोळ्यातले अश्रू पुसून माझा पदर मळकटलाय..
कोणी आपलं ही व्यथा ऐकणारं असेल तर मी ही व्यथा त्याला सांगेन, मैय्या..पण कोणी असेल तर..
प्रेमातली ही वेदना मला सहन करावी लागतेय ती कोणाला सांगू?

विरहाची माती माझं प्राक्तन बनलीय..

ही एका नवपरिणीतेची व्यथाही आहे..नवीन लग्न झालेल्या स्त्रीची जी स्वप्नं असतात ती सलमाचीही आहेत..

लग्न करुन पतिसोबत संसाराची स्वप्नं तिनं रंगवली आहेत..नर्म शृंगार..वैवाहिक सुखाच्या कल्पना तिच्याही आहेत..

‘मैय्या, कोणी आपलं भेटलं तर माझ्या प्रेमाची ही व्यथा सांगून मन हलकं करेन.पण कोणीच नाही, ज्याला मी ही वेदना सांगेन..’

तिच्या खूप अपेक्षा आहेत. लग्न करून नवर्‍याच्या घरी येताना प्रत्येक नववधूच्या आपल्या वैवहिक आयुष्याबद्दल खूप स्वप्नाळू कल्पना असतात, तशाच सलमाच्याही आहेत. मधुचंद्र, पहिली रात्र, शृंगार याबद्दलची तिचीही काही स्वप्ने आहेत..

पण ही तर विरहोत्कंठिता आहे.

‘अनेककार्यव्यासङ्गात् यस्या नागच्छति प्रियः
तस्यानुगमदुःखार्ता विरहोत्कण्ठिता मता||’

खूप कामांच्या व्यापांमुळं जिचा प्रियकर/पती तिला भेटत नाही त्यामुळं दुःखानं व्याकुळलेली ती ‘विरहोत्कण्ठिता’ आहे..

‘शृंगारमंजरी’ मध्ये एकाच घरात राहूनही प्रियकर कामाच्या व्यापामुळं भेटू शकत नाही ती ‘विरहोत्कण्ठिता’ मानलं गेलंय…

खरंतर इथं परिस्थिती अशी आहे, मोहोल्ल्यात येणारे आंबटशौकीन लोक रात्री-बेरात्री सुद्धा दारं-खिडक्या वाजवतात, यांच्या दारं व खिडक्यांना कान आणि डोळे लावून बसलेले असतात. हे हमीदच्या लक्षात आलंय…

मुळातच संकोची असलेला हमीद बुजून गेलाय…तिला जवळ घेण्याचाही त्याला संकोच वाटतोय..अन त्यामुळं एक अपराधी भावनाही..आपल्या पत्नीस आपल्या सहवासाचं सुख आपण देऊ शकत नाही, ज्यावर तिचा अधिकार आहे..तिला प्रेमानं जवळही घेऊन तिला धीर देता येत नाहीये..प्रणयोत्सुकता तर आहे, पण अडसर आहे तो या सर्व परिस्थितीचा..

आपली पत्नी जवळ आहे, पण तिला प्रणयसुख देताना संकोच आडवा येतोय ही अपराधी भावना व दारुण दुःख हमीदच्या मनात आहे..सलमा, मदनाचा तीव्र आवेग कसाबसा आवरतेय..

जे सर्वस्वी आपलं आहे, त्या प्रणयाचं, मीलनाचं सुख उपभोगता न येणं यासारखी वाईट परिस्थिती नसेल.. हे दुःख दोघांनाही..पण कामामध्ये हमीदला हे बाजूल ठेवता येणं शक्य आहे..पण सलमा?

ती तर घरातच डांबली गेलीय..अन काहीच मार्ग नाही हे विसरायला किंवा बाजूला ठेवायला..

आँखों में चलते फिरते रोज़ मिले पिया बावरे
बैंया की छैंया आके मिलते नहीं कभी साँवरे
दुःख ये मिलन का लेकर काह कारूँ कहाँ जाउँ रे
आँखों में चलते फिरते रोज़ मिले पिया बावरे
पाकर भी नहीं उनको मैं पाती
माई री …३

हृदयपीडा शब्दांत अभिव्यक्त करताना ती म्हणतेय,

‘माझे पिया,(पति) माझ्या डोळ्यांतच वसलेले आहेत..डोळे बंद वा उघडे असोत, समोर तेच असतात..नजरेतच सामावलेले..पण हकीकत ही की, मला त्यांच्या बाहूंच्या सावलीत राहाण्याचं सुख मिळत नाही..त्यांची प्रेमळ मिठी अन त्यांच्या वक्षावर डोकं टेकवून मिळणारा सुकून माझ्या नशीबात नाही..मी फक्त त्यांची वाट बघते..
सावरे सैंयाशी माझं प्रत्यक्ष मीलन कधी व्हावं?…’

किती दर्द आहे हा, पति सतत तिच्या विचारांत, स्वप्नांत आहे..अन त्याच्याशी मीलनाची स्वप्नं रंगवताना प्रत्यक्ष मीलन न होण्याच्या, विरहाच्या या वेदनेनं ती दुःखी आहे..

म्हणूनच ती म्हणतेय, ‘मीलनाचं हे दुःख घेऊन मी कुठं जाऊ, काय करु?ते सतत माझ्याबरोबर असूनही ..प्रत्यक्षात ते माझे नाहीत..मैय्या, तूच सांग, हे मी कोणापाशी बोलू?’

हे दु:ख सांगायचं कोणाला?
तिच्यासारख्याच एकट्या व बंदिस्त असलेल्या त्या मैनेला?

जोपर्यंत दुसरी एखादी चांगली जागा मिळत नाही तोपर्यंत नशीबात हा असहय एकांत आहे, पति मीलनाची आस आहे.. आणि करता येण्यासारखं म्हणजे अथक प्रतिक्षा…

आणि हमीदचं दुःखही तितकंच आहे…समोर नवयौवना पत्नी आहे..तिच्यावर मनसोक्त प्रेम करावं, अन प्रणयबहार अनुभवावी ही आत्यंतिक तीव्रेच्छा नाईलाजानं तो मनातच दाबून ठेवतोय…समोर जणू पंचपक्वान्नं आहेत पण त्यांच्यात व त्याच्यात मध्ये एक अदृश्य काचेची भिंत आहे..

किती प्रणयोत्कट, नवथर भावना असंख्य उसाशांमध्ये रोजच दबल्या जाताहेत..
हे सर्व या कथा व विशेषतः या गीताच्या माध्यमातून आपण बघतो..

अनेक जोडप्यांच्या अशा तर्‍हेच्या जागेअभावी व आजूबाजूच्या विपरीत परिस्थितीमुळं संसार व प्रणय फुलण्याआधीच कोमेजून जातानाच्या व्यथा आहेत..

परंतु, स्व. मदनमोहनजी, मजरुहजी यांनी आपल्या गीत व संगीताच्या माध्यमातून त्याला जिवंत केलंय..

संगीत ही कला उपजत एखाद्यात भिनलेली असायला लागते… ज्यांच्या जवळ ही अशी काळजापर्यंत पोचायची जादू होती ती माणसं खरच अनेकांच्या थेट हृदयापर्यंत जाऊनच पोहोचली..

याची अगणित उदाहरणं …पण एखादा जादूगार नुसती जादू करत नाही तर त्याच्या कलेच्या माध्यमानं मनावरच राज्य करू लागतो..

संगीतकार मदनमोहन, हे हृदयांवर राज्य करणारे संगीतकार.

काही लोकं कळत नकळत अनेकांच्या जीविताचं, जगण्याचं साधन बनून जातात,आनंदाचा मोठा ठेवा आपल्यामागं ठेवून जातात तोही अक्षय्य असा.…

‘मदनमोहन’ त्यापैकीच एक आहेत..

हे गीत व त्याचं संगीत म्हणजे कळसाध्याय आहे..

अभिरुचीसंपन्न व अभिरुचीपूर्ण असं हे गीत व संगीत..करुण विलापाचा आविष्कार असणारं..करुणा रस, दुःख-दर्द, आनंद, असे सर्व भाव आपल्या संगीतातून अभिजात रीत्या प्रकट करणं ही स्व. मदनमोहनजींची खासियत व कौशल्य आहे..

मदनजी शायरीवर जोर देत असत..जोपर्यंत गीताच्या बोलात खोली, अर्थपूर्णता नसेल तोपर्यंत मदनजी प्रयत्न करायला लावत असत..ते म्हणत, ‘दिलसे बात निकलेगी, तभी असर करेगी’

असा हा महान व द्रष्टा संगीतकार..त्यांनी आपण सर्वांच्या कानांना व मनांना अत्यांनद देणार्‍या अनेक रचना दिल्या आहेत, ज्या आजही अजरामर आहेत, राहतील..

मदनजींच्या भावभीन्या आवाजात हे गीत ऐकणं हा एक अत्यानंद आहे…

हे गाणं रेकॉर्ड होताना काही अपरिहार्य कारणांनं लतादीदी रेकॉर्डिंग स्टुडिओ मध्ये वेळेवर पोहोचू शकल्या नाहीत, अन हे गाणं रेकॉर्ड होणं आवश्‍यक होतं, म्हणून मदनजींच्या आवाजात डमी रेकॉर्डिंग केलं गेलं, नंतर लतादीदींच्या आवाजात ..

या दोघांच्याही आवाजात हे गीत, अहीर भैरव रागातली ही रचना ऐकणं हा एक अद्भुत अनुभव आहे..

माणसाची व्यथा, जी तो कोणापाशीही बोलू शकत नाही, अथवा बोलण्याची इच्छा नाही, अशा वेदनेला मदनजींचं हे गीत,

‘माई री मैं कासे कहूँ पीर अपने जिया की’
हे सर्वार्थानं अचूकरीत्या न्याय देतं…

‘न तडपनेकी इजाजत है, ना फरियाद की है
घुटके मर जाऊॅं ये मर्जी मेरे सय्यादकी है’

जेव्हा अशी अवस्था होते, तेव्हा आपसूकच
हे बोल उमटतात…

‘माई री मैं कासे कहूँ पीर अपने जिया की
माई री…’

गीतकार – मजरुह सुलतानपुरी
संगीतकार -मदनमोहन
गायक – लता जी / मदन मोहन
राग- अहीर भैरव

स्व. मदनमोहनजींच्या संगीताबद्दल काही लिहावं इतकी पात्रता नाही…पण त्यांनी संगीतबद्ध केलेली अवीट, अमीट गीतं ही वेळोवेळी आयुष्‍य जगताना कितीतरी आनंद देतात..अजरामर व हृदयावर छाप ठेवणारी ही गीतं..आज यांच्यामुळं आपल्या अनेकांच्या आयुष्याला एक अर्थ आहे..

अशा मदनमोहनजींच्या स्मृतींना वंदन..

हेही वाचा – संगीतकार रोशन आणि कव्वाली!

Dr Amita Kulkarni
Dr. Amita Kulkarni
+ posts

डॉ. अमिता कुलकर्णी

आयुर्वेदाच्या डॉक्टर असलेल्या अमिता कुलकर्णी यांना  समाजसेवेचा वारसा त्यांच्या घरातूनच मिळाला. आजी-आजोबा, आई वडील सर्वच जण समाजासाठी होईल तितकं काम करणारे. अर्थातच अमिताताईंवर लहानपणापासून तेच संस्कार झाले. समाजसेवा करता यावी म्हणूनच त्यांनी वैद्यकीय शिक्षण घ्यायचं ठरवलं. शिक्षण चालू असतानाच रोटरॅक्टच्या माध्यमातून नेत्र तपासणी शिबिरं, स्त्री आरोग्य तपासणी, पोलिओ निर्मूलन इ. उपक्रमांत त्या सहभागी होत असत. पुढे स्वतःचा व्यवसाय सुरू केल्यावर त्यात तोचतोचपणा जाणवू लागला म्हणून त्या धर्मार्थ दवाखाने, फिरती रुग्णालये अशा ठिकाणी स्वयंसेवक म्हणून काम करू लागल्या.

CASP (Community aids sponsorship programme) च्या अंतर्गत झोपडपट्टीत वैद्यकीय सेवा त्या देत असत. पुढे CRY या आंतरराष्ट्रीय संघटनेसाठी त्या काम करू लागल्या. ते करत असतानाच त्यांनी स्वतःच्या पुढील कार्याची दिशा ठरवली. वंचित मुलं आणि शोषित स्त्रिया यांच्यासाठी आरोग्य सेवा देण्याचं पक्कं केलं. हे सर्व करत असताना त्यांच्या आईने त्यांच्या मुलाची संपूर्ण जबाबदारी घेऊन त्यांच्या कामाला सक्रिय पाठिंबा दिला. त्यामुळे त्या झोकून देऊन काम करू शकल्या. १९९८ पासून जवळजवळ एक तप त्यांनी पूर्णतः समाजसेवा केली. त्या काळात अर्थार्जन तर दूरच राहिलं उलट कित्येकदा त्यांना पदरमोड करून काम चालू ठेवावं लागलं. आरोग्य विषयक काम करतानाच त्यांना आदिवासी पाड्यांतून बालविवाह, वयात येणाऱ्या मुलींच्या मूळ समस्या, कुटुंब नियोजनाविषयी अज्ञान अशा इतर गोष्टीही लक्षात येऊ लागल्या आणि मग त्यासाठी प्रबोधन करण्याचं कामही त्यांनी सुरू केलं.

महाराष्ट्राव्यतिरिक्त हरियाणा, पंजाब इ. राज्यांत देखील त्यांनी अनेक अडचणी व विरोध सहन करून काम केलेलं आहे. इतक्या सगळ्या गोष्टी करत असताना स्वतःची ट्रेकिंगची आवड जोपासण्याचा सुद्धा त्यांनी प्रयत्न केला. हिमालयात ट्रेकिंगला गेलेल्या असतांना तिकडे झालेल्या ओळखींमधून उत्तरांचल मधल्या लहान लहान गावातली आरोग्य केंद्रे, RCH ( Reproductive Child & Health) च्या माध्यमातून आरोग्य जागृती करण्याचं कामही त्यांनी उत्साहाने केलं.

आयुष्याबद्दल बोलताना त्या म्हणतात, "निसर्गाकडून माणसाला खूप काही शिकायला मिळतं. आपल्या मर्यादा कळतात. आणि एक अनुभव संपन्न आयुष्य मिळालं की माणूस म्हणून जन्माला आल्याचा आनंद होतो.

Leave a comment