क..क्क..क..क्क किरण ने बदलले ९० च्या दशकाचे वारे- ‘डर’ ची २७ वर्षे

-आशिष देवडे

२४ डिसेंबर १९९३ हा दिवस सिनेप्रेमींसाठी विशेष आहे. कारण, या दिवशी ‘डर’ रिलीज झाला होता. शाहरुख खान, सनी देओल आणि जुही चावला या तिघांना घेऊन लव्हस्टोरी सादर करण्यात प्राविण्य असलेल्या यश चोप्रा यांनी हा एक वेगळा प्रयत्न लोकांसमोर ठेवला होता. लव्हस्टोरी मध्ये काय वेगळं असणार ? असा प्रश्न सिनेमा न बघितलेल्या आजच्या पिढीला पडू शकतो. पण, ज्यांनी डर बघितला आहे त्यांना हा लेख वाजताना क्कक्क किरण आणि लँडलाईन फोन च्या बेल चा पहिल्यांदाच इतक्या वेगळ्या पद्धतीने ऐकलेला आवाज नक्की ऐकू येईल.

प्रियकर आणि प्रेयसी या दोघांसोबतच या सिनेमात प्रथमच एक न दिसणारं पात्र होतं जे की फक्त फोनवर, ट्युन ऐकवूनच बोलायचं. सुरुवातीला गंमत वाटणारं हे पात्र सतत जेव्हा हिरोईन चा पाठलाग करतं तेव्हा तिच्या मनात एक भीती निर्माण होते. एकतर्फी प्रेम असलेलं राहुल हे पात्र शाहरुख खान ने ज्या ताकतीने उभं केलं आहे त्याला तोड नाहीये. आज शाहरुख खान च्या कामाबद्दल दोन विरोधी मतं बघायला मिळतात. ज्यांना तो आवडतो, त्यांना तो आवडतोच; आणि ज्यांना तो आवडला नाही त्यांना तो आवडतच नाही. दुसऱ्या प्रवाहातील व्यक्ती सुद्धा हे मान्य करतील की, शाहरुख खान शिवाय ‘डर’ शक्य नव्हता. आमिर खान ला आधी ऑफर झालेला हा रोल शाहरुख खान ला मिळाला आणि त्याने या संधीचं सोनं केलं.

shahrukh khan, juhi chawla and sunny deol in darr
Shahrukh Khan, Juhi Chawla and Sunny Deol in Darr. Image Courtesy-YRF

जुही चावला ने साकारलेली किरण ही तितकीच सुंदर आणि चार्मिंग होती. किरण ला कॉलेज पासून ओळखणाऱ्या राहुल मध्ये तिच्याशी बोलायची हिंमत नव्हती. प्रेम मिळवण्यासाठी आधी ते व्यक्त करावं लागतं हेच राहुल ला माहीत नव्हतं. तो फक्त तिचे फोटो जमा करायचा, त्यांना रूमच्या भिंतीवर लावायचा, त्यांच्याशी बोलायचा. कधी आपल्या छातीवर चाकूने किरण हे गोंदवायचा तर कधी गच्चीवरील कठड्यावर उभं राहून ‘She loves me / She loves me not’ हा खेळ गुलाबाच्या पाकळ्यांसोबत खेळायचा. ९० च्या दशकांत असे बरेच तरुण होते असं म्हंटल्यास वावगं ठरणार नाही. पण, अश्या पात्राला मोठ्या पडद्यावर सादर करायचं आणि त्याच्या बद्दल सुद्धा आपल्या मनात अगदी कमी का होईना, पण एक सहानुभूती निर्माण करणे यात दिगदर्शक यश चोप्रा यांचं यश आहे.

सनी देओल ने या सिनेमात एका आर्मी ऑफिसर चा रोल केला होता. ‘ढाई किलो का हाथ’ असलेल्या सनी देओल समोर शाहरुख खान अगदीच छोटा दिसत होता. पण, त्याचं पात्र ‘राहुल’ हे इतकं लक्ष वेधून घेणारं होतं की ते कधी सिनेमाचा हिरो वाटायला लागतं. हे आम्हीच नाही तर, सनी देओल ने स्वतः यश चोप्रा यांना बोलून दाखवलं होतं. इतकंच नाही तर, सनी देओल ने ‘डर’ नंतर पुन्हा यशराज बॅनर मध्ये काम सुद्धा केलं नाही. सनी देओल च्या चाहत्यांना त्या वेळेसच आनंद होतो जेव्हा घाबरलेल्या जुही चावला ला वाचवण्यासाठी सनी देओल (सुनील) किरण च्या मागे लागलेल्या राहुल ला ठोसे लगावतो. हे खूप शेवटी घडतं, पण तेव्हा लोकांना ‘हा, आता आपला सनी दिसतोय’ हे समाधान त्यांना मिळतं.

shahrukh khan and juhi chawla in darr. image courtesydailyo
Shahrukh Khan and Juhi Chawla in Darr. image courtesy-dailyo

प्रेमकथा म्हंटल्यावर गाणी चांगले असणं हे क्रमप्राप्त आहे. ‘शिव-हरी’ यांनी सार्थपणे संगीताची धुरा सांभाळली होती. सिनेमाच्या सुरुवातच ‘जादू तेरी नजर…’ ने होते. ‘तू हा कर या ना कर, तू है मेरी किरन’ या सिनेमाच्या कथानकाला अगदी समर्पक असलेल्या ओळी लिहिणाऱ्या आनंद बक्षी यांचं इतकं तरुण गाणं लिहिण्याबद्दल खूप कौतुक झालं होतं. आज २७ वर्षांनी सुद्धा डर म्हंटलं की लोकांना एक तर क्क किरण आणि दुसरं ‘जादू तेरी नजर’ हेच आधी आठवतं. या गाण्याशिवाय, लोकांना ‘तू मेरे सामने..’, ‘दरवाजा बंद कर लो’ हे गाणे सुद्धा आवडले होते. स्वित्झर्लंड ला शुटिंग झालेले हे गाणं ऐकण्यापेक्षा बघतांना लोकांना आवडले. कारण, त्याला यश चोप्रा यांचा ‘मिडास टच’ होता.

‘डर’ अजून लक्षात आहे तो त्याच्या बॅकग्राऊंड म्युझिक मुळे. सनी देओल जेव्हा शाहरुख खान चा पाठलाग करतो तेव्हा वाजणाऱ्या तबल्याचा आवाज लोकांच्या कायम लक्षात राहणारा आहे. आपल्या मुंबईत झालेली काही शुटिंग, गणपती विसर्जनाच्या ठिकाणी सनी देओल ला शाहरुख चं येऊन भेटणं, होळी च्या दिवशी वेश बदलून ढोल वाजवायला येणं हे काही सीन्स खूप छान रंगवले आहेत. या सीन्स मध्ये एकतर्फी प्रेम आहे, भीती आहे, गाण्यांमध्ये फॅमिली बॉंडिंग आहे, भारतीय सण आहे. अजून काय अपेक्षा करणार तुम्ही एका सिनेमा कडून ? लोकांना ‘डर’ खूप आवडला आणि त्याला ‘सर्वात लोकप्रिय सिनेमा’ च्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

Shahrukh Khan and Sunny Deol in Darr
Shahrukh Khan and Sunny Deol in Darr

शेवटी हिंसक होणाऱ्या या प्रेमकथेचा सनी देओल हाच ‘हिरो’ ठरतो. शाहरुख खान चा राहुल हा लोकांच्या लक्षात राहीला आणि खऱ्या अर्थाने डर हे त्याचं सिनेसृष्टीत पदार्पण मानलं जातं. राहुल साकारताना दिसलेलं जे अग्रेशन त्याने दाखवलं ते लोकांना खूप भावलं आणि लोकांनी त्याला मनापासून दाद दिली. डर च्या बॉक्स ऑफिस वरील यशानंतर शाहरुख खान हा यश चोप्रा बॅनर चा आवडता कलाकार झाला. कोणतंही बॅकग्राऊंड नसलेल्या शाहरुख ला हा पर्याय निवडणं योग्य वाटलं & rest is the history…

बॉलीवूड च्या सिनेमाची हॉलीवूड मध्ये कॉपी झालेल्या मोजक्या सिनेमा मध्ये डर चा समावेश होतो. FEAR या नावाने एक हॉलीवूडपट १९९६ मध्ये रिलीज झाला होता. तो तितका यशस्वी झाला नाही, कदाचित हा भारतीय प्रेक्षक आणि कथा सादरीकरणात असलेल्या फरकामुळे असावं. फास्ट लाईफ जगणाऱ्या आजच्या पिढीला डर हा तितका आवडणार देखील नाही. पण, ९० च्या दशकातील या बॉक्स ऑफिस वरील ‘माईलस्टोन’ ने लोकांना प्रेम आणि obsession यातील फरक लोकांना दाखवला जे की आजच्या पिढीतील काही तरुणांनी सुद्धा समजून घेण्याची गरज आहे.

Juhi Chawla with Sunny Deol and Shahrukh Khan
Juhi Chawla with Sunny Deol and Shahrukh Khan. Courtesy Team Juhi Chawla twitter handle

‘डर के आगे जीत है’ हे पूर्ण टीम साठी खरं ठरलं.
यश चोप्रा बॅनर कडून भविष्यात सादर होणाऱ्या प्रेमकथेच्या मालिकांची ही डर ही एक सुरुवात होती. डर चा रिमेक करण्याचा अजून तरी प्रयत्न झालेला नाहीये आणि होऊ सुद्धा नये हेच सच्चे चाहते म्हणतील.

Yash Chopra with Shahrukh Khan
Yash Chopra with Shahrukh Khan- Image Courtesy India.com

Aashish Deode
+ posts

Leave a comment