© विवेक पुणतांबेकर

१९६५ साली युनायटेड प्रोड्यूसर आणि फिल्मफेअर यांनी नवीन नायकाच्या शोधासाठी आखिल भारतीय स्तरावर स्पर्धा आयोजित केली. त्याची अंतीम फेरी मुंबईच्या राजकमल स्टुडिओत आयोजित केली. दहा हजार अर्जातून पन्नास जण निवडले. यात सुभाष घई आणि धीरजकुमार पण होते. शेवटचा उमेदवार परिक्षकांसमोर आला तेव्हा रात्रीचे अकरा वाजले. शेवटच्या स्पर्धकाने सांगितले मी अभिनय न करता एक कथा सांगतो पसंत पडली तरच माझा विचार करा. परिक्षकांची संमती मिळाल्यावर त्याने एका कुरुप चेहर्‍याच्या पण बुध्दिमान लेखकाची गोष्ट सांगायला सुरुवात केली. या लेखकाचा सगळे तिरस्कार करत. मुली तर त्याला पाहून तोंड फिरवत. बिचारा उदास असायचा. एके दिवशी त्याने लिहिलेल्या कादंबरीला पुरस्कार मिळाला. त्यानंतर एका मुलीचे सतत फोन यायला लागले भेटायला ये. याने आधी दुर्लक्ष्य केले. पण तिने फोन करणे सुरुच ठेवले. शेवटी कंटाळून याने होकार दिला. तिने एका हाॅटेल मध्ये भेटायला बोलावले. ओळखीची खूण म्हणून टेबलावर पुष्पगुच्छ ठेवलेला असेल हे सांगितले. हा लेखक तिथे पोहोचला. तिच्याजवळ जाऊन  म्हणाला आज तागायत माझ्या इतका कुरुप माणूस तू पाहिला नसशील. पाहून घे मी लगेच निघणार. तिने सांगितले मला तुमच्या कथा आवडतात पण मी आंधळी आहे. ही कथा इतक्या भावूकतेने सांगितल्यावर परिक्षक गहिवरले. त्या तरुणाची निवड झाली. हा होता जतीन खन्ना. आपला पहिला सुपरस्टार राजेश खन्ना. 

         २९ डिसेंबर १९४२ ला अमृतसर येथे जतीन चा जन्म झाला. वडिल लाला हिराचंद खन्ना आणि आई चंद्राणी खन्ना. वडिल पंजाब मधल्या बुरेवाला गावातल्या शाळेत हेडमास्तर होते. अपघातात दोघांचे निधन झाल्यावर जतीन च्या काकांनी चुनिलाल खन्नांनी त्याला दत्तक घेतले. चुनिलाल खन्ना रेल्वे चे ठेकेदार होते. सधन होते. मुंबईत गिरगावात ठाकूरद्वार येथे सरस्वती निवासात रहात होते. जतीन चे शिक्षण मुंबईच्या सॅबेस्टियन गोवन स्कूल मध्ये सुरु झाले. त्याच्याच वर्गात रवि कपूर उर्फ जितेंद्र होता. लहानपणापासून जतीन ला अभिनयाची आवड होती. शाळेत तसेच काॅलेजमध्ये अनेक नाटकात कामे करुन त्याने बक्षिसे मिळवली होती. के.सी.काॅलेज मधून जतीन पदवीधर झाला. त्याचे मामा जतीन ला राजेश म्हणत. तेच नाव त्याने घेतले. त्याची मित्रमंडळी त्याला काका म्हणत. (काका याचा पंजाबी भाषेतला अर्थ गोंडस बालिश चेहरा असलेला.)

Superstar Rajesh Khanna

१९६६ च्या आखरी खत हा राजेश खन्नाचा पहिला सिनेमा. हा त्या वर्षी ऑस्करला पाठवला होता. त्यानंतर १९६७ साली आलेल्या राज सिनेमातून राजेशच्या अभिनयाची चूणूक जाणवायला लागली. राज च्या प्रिमीयर च्या दिवशी आपल्या नव्या फियाट मधून आलेला राजेश सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होता. बहारोंके सपने, औरत, डोली या सिनेमांनंतर आला इत्तफाक. या नव्या हिरो बरोबर कोणीच काम करायला उत्सुक नव्हते. मात्र अभिनेत्री नंदा तयार झाली. अतिशय कमी दिवसात तयार झालेला हा सिनेमा खूप गाजला. राजेश नंदाचे ऋण कायम मानत असे. तसे यानंतर नंदा बरोबर आला द ट्रेन. शूटींग च्या पहिल्या शेड्यूल ला नंदाला पहायला गर्दी जमायची. राजेश कडे मात्र फारसे कोणाचे लक्ष नसे. मधल्या काळात आराधना रिलिज झाला आणि राजेश प्रसिध्दिच्या शिखरावर पोहोचला. द ट्रेन च्या शूटींग च्या दुसर्‍या शेड्युल ला राजेश ला पहायला तुफान गर्दी उसळली. आराधना पासून राजेश आणि किशोरकुमार हे समीकरण पक्के झाले. आधी इतर गायकांचे पार्श्वगायन घेणारा राजेश नंतर फक्त किशोर कुमारचाच आग्रह धरायचा. हाथी मेरे साथी मधली भुमिका त्याने स्वीकारली पण स्क्रिप्ट बरोबर नव्हते ते सलिम जावेदनी सुधारुन दिले. हाथी मेरे साथी च्या मानधनामुळे राजेश ने राजेंद्रकुमार चा बंगला डिंपल विकत घेतला आणि त्याचे नाव आशिर्वाद ठेवले. वहिदा रहमान च्या शिफारसीमुळे खामोशी मधली भुमिका राजेश ला मिळाली. खामोशी जरी अपयशी झाला तरी राजेशच्या भुमिकेचे कौतूक समिक्षकांनी केले. सुपरस्टार म्हणायला सुरुवात केली. १९६९ ते १९७१ या कालखंडात राजेश चे १५ यशस्वी सिनेमे आले. त्याची स्टाईल फार लोकप्रिय झाली. मुलींचा तो लाडका हिरो बनला. त्याला पहायला गर्दी उसळयाची. त्याचे दर्शन व्हावे म्हणून बंगल्यासमोर रांग लागायची. अनेकजणींनी त्याचे नाव हातावर गोंदून घेतले. इतकी लोकप्रियता यापूर्वी कोणालाच मिळाली नव्हती. त्याचे अभिनय गुण पाहून ऋषिकेश मुखर्जीनी आनंद मधली प्रमुख भुमिका राजेश ला दिली. डाॅक्टर भास्कर चा रोल अमिताभ ला दिला. अभिनयाची विलक्षण जुगलबंदी पहायला मिळाली. १९७२ साली राजेश चे ११ सिनेमे रिलिज झाले. त्यातील अमर प्रेम, अपना देश, मेरे जीवन साथी सिनेमांनी ५ कोटीपेक्षा जास्त धंदा केला. दिल दौलत दुनिया, जोरु का गुलाम, बावर्ची आणि शहजादा या सिनेमांनी ४.५ कोटीचा धंदा केला. त्याची भुमिका असलेला अनुराग ने पण चांगला धंदा केला. मुमताज बरोबर सहा यशस्वी सिनेमात राजेश ने भुमिका केली. अमर प्रेम च्या वेळी राजेश ची लोकप्रियता इतकी वाढली की एका गाण्याचे चित्रण हावडा ब्रिज खाली व्हायचे होते त्याला पश्चिम बंगाल सरकारने परवानगी नाकारली कारण पुलावर एव्हढी गर्दी झाली असती की नियंत्रण ठेवणे अवघड झाले असते. शेवटी नटराज स्टुडिओत सेट लावून ते गाणे चित्रीत करावे लागले.

Rajesh Khanna with Amitabh Bachchan in Anand
Rajesh Khanna with Amitabh Bachchan in Anand

१९७३ ला फिल्मफेअर चे नाॅमिनेशन मिळाले पण अवाॅर्ड ऋषि कपूर ने मिळवले. किर्तीच्या सर्वोच्च शिखरावर असताना त्याचे स्थान कोणीच हिरावून घेणार नाही असे वाटत असतानाच अमिताभ चा उदय झाला. आनंद च्या यशानंतर अनेक सिनेमे अपयशी झालेल्या अमिताभ चे यश पालटले जंजीर ने. नमक हराम मध्ये जाणवले की या स्पर्धेत कोण बाजी मारणार. स्टारडम डोक्यात घुसलेल्या राजेश चे नखरे सुरु झाले. शक्ति सामंतांबरोबर भागीदारीत शक्तिराज डिस्ट्रीब्युटर्स ही वितरण संस्था त्याने सुरु केली. पैश्याचा ओघ वाढायला लागला. आधी योग्य कथानक निवडूनच सिनेमे स्वीकारणारा राजेश सरसकट सिनेमे स्वीकारु लागला. सेटवर उशिरा येणे, सहकलाकारांचा पाणऊतारा करणे सुरु झाले. त्याचा सेक्रेटरी गुरनाम ब्लड कॅन्सर ने गेला. तो होता तो पर्यंत निर्माते संभाळून घेत. आनंद च्या सेटवर तसेच नमक हराम च्या सेटवर अमिताभ चा सतत पाणउतारा करणे त्याने सुरुच ठेवले. बावर्ची च्या वेळी ऋषिकेश मुखर्जींना खूप त्रास दिला. डेटस लवकर न देणे, सेटवर सतत चहा मागवून टाईमपास करणे सुरु झाले. कशीबशी एक डेट मिळाली. ऋषिदांनी भरभर शाॅटस् ची आखणी करुन भरभर लायटींग करुन शूटींग आटोपले आणि या पुढे राजेश ला सिनेमात कधीही घ्यायचे नाही असे ठरवून टाकले.

Rajesh Khanna-Sharmila Tagore in Aradhana
Rajesh Khanna-Sharmila Tagore in Aradhana. Courtesy-Rediff

 

व्यक्तिगत जीवनातली मैत्रीण अंजू महेंद्र बरोबरचे सात वर्षाचे संबंध तोडून डिंपल बरोबर लग्न करुन सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला. बाॅबी चे दोन दिवसाचे शूटींग बाकी होते पण राजेशने राज कपूरना खूप सतावले. शेवटी कशीतरी डेट मिळाल्यावर राजबागेत सेट लावून सिनेमा पुर्ण केला. त्यामुळे सत्यम शिवम सुंदरम च्या वेळी राजेश ला प्रमुख भुमिकेत घ्यायचा राजकपूर यांचा निर्णय ऋषि कपूरच्या प्रखर विरोधाने मागे घ्यावा लागला.

 

राजेशच्या लोकप्रियतेत संगीताचा फार मोठा वाटा होता. कल्याणजी आनंदजी, लक्ष्मीकांत प्यारेलाल, शंकर जयकिशन, एस.डी.बर्मन,आर.डी.बर्मन, भप्पी लाहिरी यांनी राजेश साठी दिलेली गाणी लोकप्रिय झाली. १९७६ ते १९७८ सालात आलेले राजेशचे कितीतरी सिनेमे अपयशी ठरले. यात मेहबूबा, बंडलबाज, त्याग, पलकोकी छाओ मे, जनता हवालदार यांचा समावेश होता. आपल्या मेहूणीची सिंपल ची शिफारस केलेला अनुरोध मात्र यशस्वी झाला. ७७ सालचा छैला बाबू राजेशचा यशस्वी सिनेमा. ७८ नंतर राजेश ने अमरदीप, अवतार, अगर तुम ना होते, थोडीसी बेवफाई, कुदरत, सौतन, जानवर, अशांती, अनोखा रिश्ता अश्या सिनेमात भुमिका केल्या. सिंगाप्पू रोजाकल या तामिळ सिनेमाचा हिंदी रिमेक रेड रोझ मधली राजेश ची नकारात्मक भुमिका प्रेक्षकांनी झिडकारली. वास्तविक कमल हसन ला या  मूळ तामिळ सिनेमातल्या भुमिकेसाठी फिल्मफेअर अवाॅर्ड मिळाले होते. दोन मुलींच्या जन्मानंतर मतभेद झाल्याने डिंपल आणि राजेश विभक्त झाले पण घटस्फोट घेतला नाही. या नंतर त्याने अंजू महेंद्रशी परत संबंध काही काळ जुळवले. मग त्याच्या आयुष्यात आली टीना मुनिम. तिच्याबरोबर नऊ सिनेमात त्याने भुमिका केल्या. शबाना आझमी स्मिता पाटिल, पूनम धिल्लन, पद्मिनी कोल्हापूरे या अभिनेत्रीं बरोबर भुमिका त्याने ८० च्या दशकात केल्या. १९८१ साली सुंदरा सातारकर या मराठी सिनेमात राजेश ने अभिनय केला. आपल्या फिल्मी करीयर मध्ये मेहबूब की मेहंदी, रोटी, बरसात (१९९५) या सिनेमाची सहनिर्मीती केली. तर अलग अलग, पोलिस के पीछे पोलिस (अनरिलिजड) आणि जय शिवशंकर या सिनेमाची निर्मिती केली.

Rajesh Khanna with Kishore Kumar
Rajesh Khanna with Kishore Kumar

१९८४  नंतर राजेश खन्ना राजकारणात शिरला. काॅग्रेस पार्टी तर्फे तिकीट मिळवून १९९१ साली दिल्लीतून त्याने निवडणूक लढवली पण त्यात त्याचा पराभव झाला. १९९२ च्या पोटनिवडणूकीत तिथूनच तो विजयी झाला. १९९६ साला पर्यंत तो लोकसभेत खासदार होता. त्यानंतर त्याने निवडणूकीत भाग घेतला नाही पण २०१२ च्या पंजाब च्या निवडणूकीपर्यंत राजकारणात सक्रीय होता. १९९४ साली खुदाई सिनेमात त्याने अभिनय केला. १९९९ च्या आ अब लौट चले या आर.के.फिल्मस् च्या शेवटच्या सिनेमात त्याची महत्वाची भुमिका होती. क्या दिलने कहा, सौतेला भाई, प्यार जिंदगी हे अशा सिनेमात भुमिका केल्या. २०१० साली त्याचा शेवटचा सिनेमा आला रियासत. चार टीव्ही सिरियल्स मध्ये त्याने भुमिका केल्या. १६८ सिनेमात भुमिका केलेल्या राजेश ला अभिनयाची ३ फिल्मफेअर अवाॅर्डस्, बाॅम्बे फिल्म जर्न्यालिझमची चार अवाॅर्डस्, फिल्मफेअर स्पेशल अवाॅर्ड आणि फिल्म फेअर लाईफ टाईम अवाॅर्ड मिळाले. आपल्या कारकिर्दीत त्याने केलेल्या विविध भुमिका अविस्मरणीय होत्या सच्चा झूठा, दो रास्ते, इत्तफाक, मेहबूबा, रेड रोझ, आनंद, बावर्ची, अवतार, नमक हराम अमर प्रेम, आपकी कसम अश्या अनेक भुमिका रसिकांच्या कायम लक्षात रहातील. त्याच्या मोठ्या मुलीने अक्षय कुमार बरोबर लग्न केले. तर धाकट्या मुलीने लंडन मधला बॅन्कर समीर सरन बरोबर लग्न केले.

Rajesh Khanna's Family with Anju Mahendru
Rajesh Khanna’s Family with Anju Mahendru

काळाचा महिमा बघा ज्या अमिताभ ला राजेश सतत हिणवायचा तो अमिताभ खूप पुढे जाऊन सुपर स्टार बनला. हळूहळु राजेश चे जवळचे लोक त्याला सोडून गेले. फक्त त्याचा स्वयंपाकी उरला होता. वैभव हळूहळु उतरत चालले. लाईफ टाईम अवाॅर्ड अमिताभ च्या हातून घेताना राजेश खूपच गहिवरला. आज मेरे बाबू मोशाय ने मुझे अवाॅर्ड दिया असे घरी आल्यावर त्याने नोकराला सांगितले. हॅवेल फॅन्सच्या जाहिरातीतले त्याचे दर्शन रसिकांना चटका लावून गेले. १८ जुलै २००२ ला राजेश खन्ना नावाचा पहिला सुपरस्टार या दुनियेला अलविदा करुन गेला. ९ लाख माणसे त्याच्या अंत्ययात्रेला आली. रो मत पुष्पा आय हेट टियर्स म्हणणारा संगळ्यांना रडवून गेला. आनंद सिनेमाच्या अखेरीला अमिताभ सांगतात आनंद मरा नही, आनंद मरते नही. खरे आहे शो मस्ट गो ऑन. यापुढेही अनेक सुपर स्टार येतील पण पहिला सुपर स्टार राजेश खन्ना कायम स्मरणात राहिल. 

Vivek Puntambekar
+ posts

Science Graduate from Somayya College in the year 1977.

Started Carrier in Kohinoor Mills in SQC Dept. After the closer of mill, began carrier as a Medical Sales Representative.

Retired as Zonal Sales Manager. Since childhood fond of Films and film music.

Wrote programs for FM Radios. Wrote articles in various Diwali magazines.

Participated in Doordarshan program. Performing an audio visual programs based on Golden era of hindi music.

Regularly writing articles for newspaper. Die hard fan of Raj Kapoor and his entire team.

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

Twitter

[elfsight_twitter_feed id="4"]

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2024. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2024. All rights reserved.