– अजिंक्य उजळंबकर
एकीकडे ‘सडक’ मधील तृतीयपंथी खलनायक महाराणी, ‘अर्ध सत्य’ मधील डॉन रामा शेट्टी, ‘आखरी रास्ता’ मधील बलात्कारी राजकारणी चतुर्वेदी तर दुसरीकडे तितकाच विनोदी ‘आँखें’ मधील इन्स्पेक्टर प्यारे मोहन, ‘इश्क’ मधील विनोदी शैलीचा खलनायक रणजीत राय व ‘हम साथ साथ है’ मधील धरमराज …बरं या सगळ्यासोबत गंभीर चरित्र भूमिकांमधूनही स्वतःच्या अभिनय संपन्नतेची झलक सातत्याने दिसून येत असे, मग ती आपली पदार्पणाची पहिली टिळकांची भूमिका असो (चित्रपट-‘२२ जून १८९७’) वा अगदी अलीकडच्या ‘कदाचित’ या मराठी चित्रपटामधील पित्याची भूमिका असो … सदाशिव अमरापूरकर (Sadashiv Amrapurkar) स्वतः अभिनयाचं एक चालतं बोलतं, समृद्ध व संपन्न असं विद्यापीठच होते. आज त्यांचा जन्मदिन
सदाशिव अमरापूरकर हे मुळचे अहमदनगरचे. जन्म नगरचाच. ११ मे १९५० चा. वडील दत्तात्रय उर्फ दादासाहेब अमरापूरकर म्हणजे नगरचं प्रतिष्ठित व लोकप्रिय नाव. स्वातंत्र्यसैनिक असलेले दादासाहेब एक व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते होते. शालेय शिक्षण झाल्यावर, सदाशिवरावांचे महाविद्यालयीन शिक्षण नगर मध्येच झाले. कॉलेज मध्ये असतांनाच त्यांनी अनेक नाटके, युवक महोत्सव यातून अभिनय करत बरेच पुरस्कारही मिळवले. मग पुण्यातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून मुंबई गाठली व तेथून पुढे प्रायोगिक रंगभूमीवर काम करण्यास सुरुवात केली. १९७६ चे ते वर्ष. प्रायोगिक सोबतच यात्रिक, कन्यादान, सूर्याची पिल्ले, अकस्मात, बखर एका राजाची, कन्यादान इत्यादी काही व्यावसायिक नाटकांमधूनही अभिनय व दिग्दर्शन प्रवास सुरु केला होता.
Sadashiv Amrapurkar in Ardh Satya
Sadashiv Amrapurkar in Ardh Satya
हे करीत असतांना १९७९ साली पहिला मराठी चित्रपट व त्यातही पहिलीच लोकमान्य टिळकांची ताकदीची भूमिका साकारण्याची संधी त्यांना मिळाली. चित्रपट होता ‘२२ जून १८९७’. सदाशिवरावांनी या संधीचे सोने केले. या भूमिकेने सदाशिवरावांच्या अभिनय करिअरला खऱ्या अर्थाने कलाटणी दिली. मग पुढे काही वर्षे मराठी चित्रपट व रंगभूमी असा प्रवास सुरु राहिला. १९८३ या वर्षी त्यांचे हिंदी चित्रपटात दमदार पदार्पण झाले. सिनेमा होता गोविंद निहलानींचा ‘अर्ध सत्य’. सदाशिवरावांनी रंगविलेला यातील डॉन रामा शेट्टी प्रेक्षक व समीक्षक दोघांनाही मनापासून आवडला आणि इथून पुढे हिंदी सिनेसृष्टीला एक दमदार खलनायक मिळाला. आपल्या या हिंदी चित्रपटातील पहिल्याच भूमिकेसाठी सदाशिवरावांनी फिल्मफेअर पुरस्कार पटकाविला.
Sadashiv Amrapurkar in Sadak
Sadashiv Amrapurkar in Sadak
८० च्या दशकातील आखरी रास्ता, हुकूमत, मोहरें, खतरों के खिलाडी, काल चक्र (फिल्मफेअर नामांकन), ईश्वर, ऐलान-ए-जंग, फरिश्ते इत्यादी काही हिंदी चित्रपटात त्यांनी रंगविलेला खलनायक अविस्मरणीय होता. सदाशिवरावांच्या खलनायकी भूमिकेला त्यांच्या विशेष अशा संवाद फेकीच्या स्टाईल मुळे काहीशी विनोदी झालर असायची. ती असूनही तो खलनायक जास्तीत जास्त क्रूर वाटेल याची ते काळजी घ्यायचे. १९९१ साली महेश भट्ट यांच्या सडक मधील त्यांनी रंगविलेल्या महाराणीने तर कहरच केला. हिंदी चित्रपटात इतक्या प्रभावीपणे तृतीयपंथी खलनायक कुणी तोपर्यंत साकारलेला नव्हता. या भूमिकेसाठी सदाशिवरावांना फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. खलनायकी अभिनयाचे धडे घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व विशेष करून नवोदित कलाकारांसाठी ही भूमिका म्हणजे सदैव एक मार्गदर्शक म्हणून राहील.
Sadashiv Amrapurkar with Govinda in Coolie No.1
Sadashiv Amrapurkar with Govinda in Coolie No.1
९० च्या दशकात त्यांनी बऱ्याच हिंदी चित्रपटांमधून खलनायकासोबतच विनोदी भूमिकाही केल्या. त्या आधी ते दूरदर्शन माध्यमातून ‘राज से स्वराज’ (१९८९) या मालिकेत ते पुन्हा एकदा टिळकांच्या भूमिकेतून घराघरात जाऊन पोहोचले. श्याम बेनेगल यांच्या भारत एक खोज या मालिकेमध्ये ते महात्मा फुलेंच्या भूमिकेत झळकले. हिंदीसोबतच खिचडी, झेड.पी., पैंजण, सावरखेड एक गाव, वास्तुपुरुष, आरं आरं आबा, आघात, आई पाहिजे, दोघी असे काही मराठी चित्रपटही केले. खलनायक अथवा विनोदी कलाकार एवढीच त्यांची ओळख नव्हती. अर्थपूर्ण व गंभीर चरित्र भूमिकाही त्यांनी त्याच सहजतेने साकारल्या. याचे एक अलीकडचे उदाहरण म्हणजे चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित कदाचित या चित्रपटातील त्यांनी रंगविलेली पित्याची भूमिका खूपच भावस्पर्शी होती. सदाशिवरावांनी रंगभूमीवर अभिनयासोबतच दिग्दर्शनही चालूच ठेवले. त्यांनी दिग्दर्शित केलेली नाटके म्हणजे बंडू बेबी आणि बुरखा, जावई माझा भला, काही स्वप्न विकायची आहेत, हवा अंधारा कवडसा, छू मंतर, मी कुमार, विठ्ठला, सूर्याची पिल्ले, हॅन्ड्स-अप, कन्यादान, अकस्मात, यात्रिक , ज्याचा त्याचा विठोबा इत्यादी काही.

वडिलांकडून मिळालेले समाजसेवेचे बाळकडू सदाशिवरावांनी अभिनय क्षेत्र सांभाळून तितक्याच तन्मयतेने पुढे नेले. निष्काम भावनेने व निस्वार्थ हेतूने त्यांनी स्वतःला सामाजिक कार्यात झोकून दिले होते. महाराष्ट्र सामाजिक कृतज्ञता निधी, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, स्नेहालय, नर्मदा बचाओ आंदोलन, लोकशाही प्रबोधन व्यासपीठ व अहमदनगर ऐतिहासिक वास्तू संग्रहालय या काही संस्थांसोबत त्यांचे कार्य अखेरच्या क्षणापर्यंत जोमाने चालू होते. सामाजिक विषयांवर अनेक वृत्तपत्रांमधून त्यांनी स्तंभलेखनही केले. खेड्यातील तरुणांविषयी त्यांना कमालीची आस्था होती. ग्रामीण तरुणांचे भविष्य उज्वल व्हावे यासाठी त्यांनी गावोगावी जाऊन व्याख्यानेही दिली. ‘किमयागार’ व ‘अभिनयाचे सहा पाठ’ हि त्यांची दोन पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत. अभिनयासोबतच त्यांना फोटोग्राफी व चित्रकलेचा छंद होता. लेखन, अभिनय, दिग्दर्शन व सामाजिक कार्य करणारे असे हे खऱ्या अर्थाने चतुरस्त्र व्यक्तिमत्व. जेवढा महान कलाकार त्याहूनही मोठा व सच्चा माणूस. दुर्दैवाने आजच्या दिवशी २०१४ साली, वयाच्या ६४ व्या वर्षी, म्हणजे काहीशी लवकर, त्यांनी या जगाच्या रंगमंचावरून एक्झिट घेतली. त्यांच्या निधनानंतर अहमदनगरच्या ‘थिंक ग्लोबल फाउंडेशन’ तर्फे त्यांच्या स्मरणार्थ, त्यांच्या नावाने, दरवर्षी एक पुरस्कारही दिला जातो.
अभिनयाच्या या विद्यापीठास त्यांच्या जन्मदिनी विनम्र आदरांजली.

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment