-विवेक पुणतांबेकर

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

आज महान गायक संगीतकार बाबूजी उर्फ सुधीर फडके (Music Director and Singer Sudhir Phadke) यांचा जन्मदिन आहे. या निमित्ताने त्यांच्या आठवणींना उजाळा द्यायचा हा प्रयत्न. २५ जुलै १९१९ ला कोल्हापूर येथे जन्मलेल्या राम फडके (त्यांचे मूळ नाव) याच्या घराण्याचा आई कडून किंवा वडिलांकडून गाण्याशी कधीच संबंध नव्हता. पण व्यवसायाने वकील असलेल्या त्यांच्या वडिलांना गाण्याची अतिशय आवड होती. त्या काळी कोल्हापूर मध्ये पहिला फोनोग्राफ असणा-या मंडळींमध्ये त्यांच्या वडिलांचा समावेश होता. अनेक नामवंत गायकांच्या बांगडीच्या रेकॉर्डस् त्यांच्या संग्रहात होत्या. त्या काळी नाटकातले मोठमोठाले नट आणि मालक त्यांच्या घरी येत असत. वडिलांची वकिली चांगली चालायची. समाजसुधारकाचा वारसा वडिलांकडून राम कडे आला. पाच भावंडांपैकी फक्त राम गाणे शिकला. राम मात्र अडीच वर्षाचा असल्यापासून घराबाहेर कोणी गोसावी, बैरागी, भिकारी गाणे म्हणू लागला की त्यांची हुबेहूब नक्कल करायचा. (Remembering The Legendary Music Director and Singer of Marathi Film Music Sudhir Phadke)

आवाज छान होता. रामच्या संगीत प्रेमी मामांनी आणि राम चे गाण्याचे वेड हेरून लहानपणी गाणे शिकवायला पाध्ये बुवांकडे पाठवले. रामच्या आजोबांनी पाध्ये बुवांना वेदविद्या विनामूल्य शिकवली होती. त्यामुळे राम ला गाणे विनामूल्य शिकवायचे त्यांनी कबूल केले. त्यांच्या विद्यालयात राम ची साधना सुरु झाली. इथेच राम वर राग, ख्याल, चिजा, आलाप, ताना, हरकती यांचे संस्कार झाले. बुवा शिकवत असताना राम ला मधेच सांगायचे गाऊन दाखव आणि राम च्या गळ्यातून सहज निघायचे. राम नोटशन पण करायला शिकला. पँलेस थिएटरमध्ये झालेल्या मैफीलीत अनेक नामवंत गायकांच्या गाण्याचे नोटेशन करून राम ने सहीसही गाऊन दाखवले. पाध्ये बुवांची इच्छा होती राम ला त्यांच्या सारखा शास्रीय गायक बनवायचा. पण नियती हसत होती. १९२८ सालच्या दिवाळीत राम ची आई गेली. सगळे गाडे विस्कटून गेले. पाठच्या भावाला मामांनी मिरजेला ठेऊन घेतले. मोठे दोन्ही भाऊ मँट्रिक ला होते. स्वयपाकापासून घरातली सगळी कामे राम ला करावी लागली. वडिलांचे उत्पन्न घटले. घरातली भांडी विकावी लागली. १९२९ च्या दिवाळीत मामांनी राम चे गाणे ठेवले. सर्जन भाजेकर गाणे ऐकायला आले होते. त्यांच्या शिफारसी मुळे राम ला मुंबईत त्यांच्याकडे शिकायला आणि गाणे शिकायला पाठवले. पाध्ये बुवांचा निरोप घेऊन १९३० जानेवारीत राम ने मुंबईत पाऊल ठेवली.

आर्यन हायस्कूल मध्ये मराठी चौथीत रामला प्रवेश मिळाला. बशीर खां या गायकाकडे गायनाची शिकवणी लावली ती जेमतेम महिनाभर टिकली. मग महाराष्ट्र संगीत विद्यालयात बाबूराव गोखले यांची शिकवणी सुरू केली. १९३२ सालच्या संगीत स्पर्धेत राम ने पहिले बक्षीस जिंकले. परिक्षक अब्दुल करीम खांनी राम चे भरपूर कौतुक केले. बाबूराव गोखलेंच्या आडमुठेपणा मुळे कोलंबिया कंपनी ची राम ची रेकॉर्ड काढायची संधी हुकली. रामला धक्का बसला. मुंबईत त्या वेळी नीट स्थिरावला असता तर राम च्या आयुष्याला वेगळे वळण लागले असते. पण एका चुकीने डॉक्टर भाजेकरांचे घर सोडावे लागले. राम कोल्हापूर ला परतला. साल होते १९३३.

वडिलांनी संतप्त होऊन रामला खूप मारले. काही दिवसांनी राग निवळला. घरची परिस्थिती फार बिकट झाली. वडिलांनी वकिलीची पुस्तके विकायला पाठवले तर राम वर चोरीचा आळ आला. अश्या अवस्थेत दिवस काढत असताना कोल्हापूर च्या ठाणेकर मास्तरांच्या हार्मोनियम क्लासमध्ये गाणे शिकवायची संधी रामला मिळाली. पहिली कमाई झाली एक रूपया. मग हळूहळू हळूहळू विद्यार्थी वाढत पंधरा रुपये मिळायला लागले. कुठेही आधार नव्हता तेव्हा ठाणेकरांनी दिलेला आधार राम कधीच विसरू शकला नाही. या बरोबर राम इंग्रजी पण शिकू लागला. गणेशोत्सवातल्या मेळ्यात राम गात असे. मेळ्याचे संचालक न.ना. देशपांडे यांनी राम चे नाव बदलले. आता भविष्यात राम फडके सुधीर फडके या नावानेच ओळखला जाणार होता.

वय होते पंधरा आणि साल होते १९३४. मग स्वतः चा मेळा सुधीर फडकेंनी काढला. स्वतः चा गाण्याचा क्लास सुरु केला. पण तो ही बंद पडला. मग एका मराठी शाळेत गायन मास्तर ची नोकरी मिळाली पगार होता फक्त सहा रुपये. सिनेमात जायची स्वप्ने सुधीर फडके पहायला लागले. पाध्ये बुवांची शिकवणी पण सुरु होतीच. व्हायोलिन वादक सदलगेकर यांनी सुधीर फडके यांना आवाज लावायला शिकवले. शंकरराव सरनाईक यांचे गाणे चोरुन ऐकून अनेक चीजा सुधीर फडके यांच्या पाठ झाल्या. भावाचे लग्न झाले. वहिनींनी धाकट्या दीरावर माया केली. वडिलांची तब्येत सुधरायला लागली. थोडे चांगले दिवस दिसायला लागले. पण १ मार्च १९३६ ला वडिल गेले. कोल्हापूर मुक्कामातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यात सुधीर फडके ओढले गेले. यातूनच झालेल्या ओळखीतून पुण्याला जायचा निर्णय फडके यांनी घेतला. पुण्यात आले तरी मुंबई ची ओढ कायम होतीच. परत मुंबई गाठली. दुसरा मोठा भाऊ ओगलेवाडीची नोकरी सोडून मुंबईत आला होता. दोघे भाऊ एकत्र राहू लागले.

जेवायला जात त्या ठिकाणी ऑल इंडिया रेडिओचे ऑफिसर निमकर यांच्या शी भेट झाली. निमकरांनी दुसऱ्या दिवशी रेडिओ स्टेशनला यायला सांगितले. दिनकरराव अमेंबल यांनी सुधीर फडके यांची ऑडिशन घेतली. फॉर्म भरून घेतला आणि दहा रुपये प्रत्येक कार्यक्रमासाठी मानधन ऑफर केले. फेब्रुवारी १९३७ ला सुधीर फडके यांचा पहिला कार्यक्रम रेडिओवर झाला. फडके रेडिओ स्टार बनले. संघातल्या काही आडमुठ्या लोकांच्या वागण्याने गायन क्लास काढण्यासाठी घरून मागवलेले दोनशे रुपये कार्यालयासाठी खर्च झाले. ते परत मिळालेच नाहीत. शिवाय अपमानीत करुन संघातून घालवून देऊन सामान हलवायला सांगितले. घरच्यांचा गैरसमज झाला हे पैसे सुधीरनींच उडवले. या मुळे १९३९ साली सुधीर फडके अक्षरशः रस्त्यावर आले.

पोटाची भूक भागविण्यासाठी वाद्ये गहाण ठेवायला लागली. रेडिओचे दहा रुपये मिळत होते. पण त्यातून भागणे शक्यच नव्हते. एका बँंडेज तयार करणाऱ्या कारखान्यात दरमहा पंधरा रुपयावर मिळालेली नोकरी पण दहा दिवसात सुटली. तोंड दाखवायला ही जागा राहिली नाही. शेवटी खोलीचे थकलेले भाडे देण्यासाठी वाद्ये देऊन टाकावी लागली. खोली गेली. मग काही दिवस फूटपाथचा, बागेचा सहारा घेणे भाग पडले. बरोबर एक मित्र. उरलेल्या पैश्यातून एक वेळ तीन पैश्याला मिळणारा परोठा उसळ खाणे भाग पडले. काही कपडे चोरबाजारात विकले. एका मित्राकडे आसरा मागितला. पण त्याचा नकार आला. दुर्गाबाई खोटेंकडे केलेली याचना पण वाया गेली. ट्राम मधून विदाऊट तिकीट प्रवास पण करणे भाग पडले. संघसंचालक हेडगेवारना सुधीर फडके यांच्यावर झालेला अन्याय जाणवला. त्यांनी सुधीर ना भेटायला बोलावले. हेडगेवार यांचे दर्शन घेऊन काही न बोलता फडके बाहेर पडले. क्लाससाठी मिळालेली जागा विघ्नसंतोषी व्यक्ती मुळे सोडावी लागली. अश्या बिकट प्रसंगात डॉक्टर रायकर या मित्राने आधार दिला. जणूकाही देवदूतच भेटला.

कुठे चहाचा, भाजीचा व्यापार करण्याच्या अयशस्वी प्रयत्नानंतर बडोदा येथे महाराजांच्या राज्याभिषेक समारंभात गाण्याचा कार्यक्रम मिळण्याचा फडके यांचा प्रयत्न अयशस्वी झाला. फडके कविता लिहीत आणि त्यांना चाली लावत. हिराबाई जव्हेरी यांनी फडके यांना ओडियन ग्रामोफोन या जर्मन कंपनीत नेले. तिथले प्रमुख आर.बी.रेळे यांनी संगीतकार दत्ता डावजेकरांशी ओळख करुन दिली. बालगंधर्वांची गाणी सुधीर फडके यांच्या आवाजात रेकॉर्ड करायचे ठरले. तेव्हड्यात दुसरे महायुद्ध सुरू झाले आणि ओडियन कंपनीने गाशा गुंडाळला. २ फेब्रुवारी १९४० ला रायकरांचे घर सोडून उत्तरेकडे जायचा निर्णय सुधीर फडके यांनी घेतला आणि सुरु झाली भटकंती.

नाशिक शहरात सुधीर फडके आले खरे पण इथे एकही कार्यक्रम मिळाला नाही. मग मालेगाव ला आले इथे मात्र एका सज्जनाने त्यांना एक कार्यक्रम मिळवून दिला. उत्पन्न फक्त पाच रुपये. पण त्या काळात ते पाच रुपये म्हणजे संजीवनी मंत्र होता. मग धुळे येथे गणपती उत्सवात कार्यक्रम मिळाले. मग जळगाव, रावेर, फैजपूर, खांडवा, इंदूर, देवास, उज्जैन, ग्वाल्हेर, झाशी, कानपूर,  अंबाला, दिल्ली, मोगलसराई अश्या भम्रंतीत अनेक भलेबुरे अनुभव घेत राहिले. जवळ पैसे पण जमले होते. मुंबईत परतायची ओढ कायम होती. मोगलसराईने मात्र त्यांच्या जीवनाची मार्ग अनपेक्षितपणे बदलला. इथे भागवतांच्या घरी ते पाहुणे म्हणून उतरले. इथे त्यांनी सुप्रसिद्ध गायक कुंदंनलाल सहगलच्या भरपूर रेकॉर्डस् ऐकल्या. फडकेंचा आत्मविश्वास वाढला. तब्येत पण सुधारली. परत जायच्या वेळी पैसे चोरांनी लांबवले. आयुष्य संपवायचा विचार सुधीर फडके करू लागले. अश्या मन:स्थितीत असताना अजमेर ला मिळालेल्या कार्यक्रमाने मनाला हुरूप आला. मग परत मुंबईत परतले.

परत एकदा भटकंती सुरू झाली. अनेक ठिकाणी फिरत, कार्यक्रम करत फडके नागपूरला आले. मग कलकत्ता येथे जाण्यासाठी प्रवास सुरू झाला. १९३९ सालापासून जवळजवळ दीड वर्षे त्यांचा प्रवास सुरू होता. कलकत्ता येथे आले खरे पण पुढे काय करायचे याचे निश्चित उत्तर नव्हते. इथे शुक्ला नावाच्या माणसाशी ओळख झाली. हा शुक्ला इंडिया रेकॉर्ड नावाच्या छोट्या ग्रामोफोन कंपनीत मँनेजर होता. तो एके दिवशी आपल्या कंपनीत फडके यांना घेऊन गेला. मालक पंजाबी होता. नेपाळी भाषेतल्या रेकॉर्डस् एच.एम.व्ही.च्या स्टुडिओत रेकॉर्ड करून इंडिया रेकॉर्ड कंपनीचे लेबल छापत. फडकेंच गाण मालकांना पसंत पडल. त्यांच्या मराठी रेकॉर्ड काढायचे ठरले. या साठी एच.एम.व्ही.च्या स्टुडिओत नेऊन ट्रायल झाली. इंडियन रेकॉर्ड कंपनीत नेपाळी संगीतकाराचा सहाय्यक म्हणून ७५ रुपये पगार पण ठरला. महिन्याभरात तो नेपाळी येणार होता. मग काम सुरू होणार आणि फडके यांच्या रेकॉर्ड निघणार असेही ठरले. इतक्यात मोठा भाऊ खूप आजारी असल्याचे कळल्यावर कंपनीत परवानगी घेऊन फडके कोल्हापूरला आले. भाऊ बरा झाल्यावर परत जायच्या वेळी सपाटून आजारी पडले. कंपनीने काही दिवस वाट पाहून कळवले आता तुम्ही येऊ नका. नशिबाने हुलकावणी दिली. परत प्रयत्न करायचा विचार करत असतानाच एक आशादायी किरण दिसला. एच.एम.व्ही.कंपनी कोल्हापूरला आली होती.

माधव पातकर या कवी मित्राने फडकेंना आपल्या कवितेला चाली लावायला एच.एम.व्ही.कडे नेले. तिथे दर्यावरी आमची डोले होडी या कोळीगीताला फडके यांनी चाल लावली. एच.एम.व्ही.च्या वसंतराव कामेरकरांना चाल ऐकवायला फडके गेले. तिथेच त्यांची पहिल्यांदा भेट झाली ग.दि. माडगूळकर यांच्या बरोबर. माडगूळकर आणि कामेरकरांना चाल अतिशय आवडली आणि हे गाणे फडके यांच्या आवाजात रेकॉर्ड करायचे ठरले. त्याच दिवशी दुपारी माडगूळकरांनी दुसरे गाणे लिहिले. त्या दिवसापासून माडगूळकर आणि फडके यांची मैत्री जमली जी शेवटपर्यंत टिकली. कोल्हापूर च्या शालिनी स्टुडिओत गाणी रेकॉर्ड झाली. मेणाच्या रेकॉर्ड वर आधी रेकॉर्डिंग करुन कलकत्ता येथे पाठवत. तिथे तांब्याची निगेटिव्ह करुन मग विनाईल रेकॉर्ड तयार व्हायची. त्याला वेळ लागायचा. कोल्हापूर च्या साहित्य संमेलनात फडके यांनी सादर केले गीत दर्यावरी आमची डोले होडी. श्रोते मंत्रमुग्ध झाले. अनेक वेळा वन्समोर मिळाला. त्या रात्रीपासून फडके आणि माडगूळकर ही जोडी कोल्हापूर मध्ये प्रसिद्ध झाली. अनेक वेळा हुलकावणी दिलेला नशिबाचा दरवाजा आता किलकिला झाला. या रेकॉर्डस् प्रसिद्ध झाल्या आणि फडके यांची वाटचाल संगीतकार म्हणून सुरू झाली. १९४१ साली एच.एम.व्ही मध्ये फडके यांची करीयर सुरू झाली.

१९४६ मध्ये प्रभात फिल्म कंपनीच्या वंदे मातरम पासून ते संगीतकार बनले. वंदे मातरम चे नायक होते पु.ल. देशपांडे आणि नायिका सुनीता देशपांडे. इथेच राजा परांजपे यांच्याशी मैत्री झाली. फडके माडगूळकर राजा परांजपे असे त्रिकूट जमले. या नंतर आलेल्या पुढचे पाऊल मध्ये पु.ल. देशपांडे, हंसा वाडकर, राजा परांजपे यांच्या भुमिका होत्या. गीतकार होते ग.दि. माडगूळकर आणि संगीत होते सुधीर फडके यांचे. या त्रिकुटाने मराठी चित्रपटाची चौकट अनेक वर्षे सजवली. १९४६ च्या गोकुळ पासून २००१ च्या वीर सावरकर पर्यंत एकूण १०२ (मराठी आणि हिंदी मिळून) सिनेमांना सुधीर फडके यांचे सुमधुर संगीत लाभले. हिंदीत त्यांनी एकूण २१ हिंदी सिनेमांना संगीत दिले. त्यांचे हिंदी सिनेमा फारसे यशस्वी झाले नाहीत पण संगीत गाजले. 

माडगूळकरांचे साधे पण काळजात घुसणारे शब्द, त्याला सुधीर फडके उर्फ बाबूजींनी लावलेली चाल, बाबुजी, आशाताई यांचा मधुर स्वर आणि राजा परांजपे यांचे गाण्याचे टेकींग आजतागायत विसरता येत नाही. अशी असंख्य गाणी बाबुजींनी दिली. तसेच त्यांनी संगीतबद्ध केलेली असंख्य भावगीते हा मराठी मनाचा ठेवा बनला. ‘लाखाची गोष्ट’ सिनेमा पैश्याअभावी अर्धा राहीला. महाराष्ट्र बँंकेचे संचालक पटवर्धनांनी अर्थसहाय्य केल्यामुळे सिनेमा पुरा झाला. या त्रिकुटांना अनेक सिनेमात महाराष्ट्र बँंकेने अर्थसहाय्य केल्यामुळेच अनेक उत्तमोत्तम सिनेमे तयार झाले. पुणे आकाशवाणी केंद्र स्थापन झाले. सीताकांत लाड हे कलासक्त केंद्राधिकारी लाभले. त्यांच्या प्रेरणेतून तयार झालेला अविस्मरणीय कार्यक्रम म्हणजे गीत रामायण. १९५५ सालच्या रामनवमी पासून कार्यक्रम सुरु व्हायचा होता. आदल्या दिवशी रेकॉर्डिंग च्या वेळी कवितेचा कागद सापडेना. बरीच वादावादी झाली. सीताकांत लाडांनी माडगूळकरांना एका खोलीत कोंडले आणि गाणे लिहून झाल्याशिवाय दार उघडणारच नाही असे बजावले. काही वेळातच माडगूळकरांनी दुसरे गाणे लिहिले. बाबूजींनी चाल लावली. इकडे घरी वातावरण चिंतेत होते. लहानग्या श्रीधर ला घटसर्प झाल्यामुळे हॉस्पिटलमध्ये ठेवावे लागले. अशा चिंताजनक वातावरणात बाबुजींनी गाणे रेकॉर्ड केले. श्रीधर या जीवघेण्या दुखण्यातून वाचला. गीत रामायणाने महाराष्ट्रात इतिहास घडवला. गीत रामायणाचे अनेक जाहीर कार्यक्रम बाबुजींनी केले. एका मुलाखतीत बाबुजींनी सांगितले होते गीत रामायण मी किंवा माडगूळकरांनी केले नाही तर वरुन दैवी शक्तीने आमच्याकडून करून घेतले. परत करायचे तर आम्हाला जमणार नाही. गोळवलकर गुरुजी तसेच सावरकरांसमोर कार्यक्रम करायला मिळाला हे आपले परमभाग्य असे बाबुजी मानत.

बाबुजी माडगुळकर यांच्या पेक्षा चार महिन्यानी मोठे. दोघांची मैत्री माडगूळकरांच्या निधना पर्यंत अतूट राहीली. मैत्रीत अनेकदा वाद होत. काही काळ अबोलाही रहायचा. पण एखाद्या क्षणी पँचअप लगेच व्हायचे. माडगूळकरांना श्रद्धांजली वहाताना बाबुजींनी सांगितले कोल्हापूरहून मी पुण्यात आलो मागून माडगूळकर आले. मी मुंबईत आलो पाठोपाठ ते आले. आज मात्र मला फसवून माझ्या आधी माडगूळकर निघून गेले. गोवा मुक्ती स्वातंत्र्य संग्रामात बाबुजींचा सक्रिय सहभाग होता. दादरा नगर हवेली आणि सिल्वासा पोर्तुगीजांपासून मुक्त करायला जीवावर उदार होऊन बाबूजी बेधडक पणे शिरले आणि हे प्रांत पोर्तुगीजांच्या ताब्यातून सुटले.

जीवनात साथ द्यायला सुविद्य अशी पत्नी लाभली. ललिता फडके उत्तम गायिका होत्या. पण लग्नानंतर त्यांनी गाणे सोडून दिले. श्रीधर कॉम्प्युटर इंजिनिअर झाला. एयर इंडियात नोकरीला होता. पण तो सुद्धा अव्वल संगीतकार झाला. सावरकर बाबुजींचे आराध्य दैवत. त्यांना पडद्यावर साकारण्यासाठी बाबुजींनी डोंगराएव्हडे कष्ट केले. मेहनत करुन भांडवल उभारले. अनेकदा कलाकार बदलावे लागले. खूप टीका सहन करावी लागली. पण जिद्दीने त्यांनी सिनेमा पुर्ण केला. ब्रायटन किनाऱ्यावर ने मजसी ने गाण्याचे शूटींग सुरू होते. एक माणूस सारखा रडत होता. कारण विचारल्यावर म्हणाला मला शब्द, अर्थ कळत नाही पण ज्यांनी गायले आहे त्याचे गायन ऐकून मन हेलावून गेले. हा माणूस मुसलमान होता. ही बाबुजींच्या सुरांची महती. बाबुजी म्हणायचे सुवर्ण युगाच्या माडगूळकरांच्या आठवणी घेऊन परत जन्मायला मला नक्कीच आवडेल. मेंदूतल्या रक्तस्त्रावामुळे २९ जुलै २००२ च्या सकाळी बाबुजी आपल्यातून गेले. असंख्य गाण्यातून ते अमर आहेत. 

मराठी चित्रपट संगीताविषयी यासारख्या लेखांसाठी क्लिक करा 

Vivek Puntambekar
+ posts

Science Graduate from Somayya College in the year 1977.

Started Carrier in Kohinoor Mills in SQC Dept. After the closer of mill, began carrier as a Medical Sales Representative.

Retired as Zonal Sales Manager. Since childhood fond of Films and film music.

Wrote programs for FM Radios. Wrote articles in various Diwali magazines.

Participated in Doordarshan program. Performing an audio visual programs based on Golden era of hindi music.

Regularly writing articles for newspaper. Die hard fan of Raj Kapoor and his entire team.

Leave a comment