धनंजय कुलकर्णी

स्केच सौजन्य- श्रीकांत धोंगडे 

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Unknown aspects of R.D. Burman as a Singer. संगीतकार राहुल देव बर्मन तथा पंचम  हे काही आहे प्रोफेशनल सिंगर नव्हते तरी त्यांनी काही चित्रपटांतून पार्श्वगायन केले. परंतु  दुर्दैवाने पंचम  यांच्या गायकीचा हा पैलू फारसा चर्चिला गेला नाही. कदाचित संगीत क्षेत्रातील त्यांचे इतर काम इतके महान आहे की त्यांच्या या कर्तृत्वाकडे रसिकांनी फारसे लक्ष दिले नसावे. पण आज इतक्या वर्षानंतर आपण जेव्हा पंचम यांनी स्वतःच्या स्वरात गायलेली गाणी ऐकतो त्यावेळेला त्यातील वेगळा ‘स्पार्क’ लक्षात येतो.त्यांच्या स्वरात एक नैसर्गिक उत्स्फूर्तता होता. जोश होता. हा स्वर कॅची होता. त्याच वेळी गाणे गाताना त्यांनी केलेला ‘वेगळा’ विचार देखील लक्षात येतो. पंचम यांनी मेहमूद यांच्या ‘भूत बंगला’ या चित्रपटात पहिल्यांदा पार्श्वगायन केले होते. त्यानंतर मात्र पुढची पाच सहा वर्ष त्यांनी केवळ संगीत क्षेत्रामध्ये आपले लक्ष केद्रित केले. 1967 साली आलेला ‘ तिसरी मंझिल’, १९६८ सालचा ‘पडोसन’ आणि त्यापाठोपाठ नासिर हुसेन यांचा आलेला  ‘प्यार का मौसम’ या चित्रपटाच्या संगीताची जादू रसिकांच्या लक्षात आली होती. 1969 सालच्या ‘आराधना’ या चित्रपटाला सचिन देव बर्मन यांच्या जरी संगीत असले तरी त्यावरील आर डी बर्मन यांचा अदृश्य ठसा रसिकांच्या लक्षात येतोच!

1970 साली राजेश खन्ना आणि नंदा यांचा ‘द ट्रेन’ हा चित्रपट झळकला होता. यात पंचम यांनी ‘ओ मेरी जा मैने कहा…’ हे गाणे आशा भोसले सोबत गायले होते. या गीतातील पंचमचा घोगरा स्वर , पूर्ण ताकदीनिशी केलेले  उच्चार रसिकांच्या लक्षात आले आणि हा काही वेगळाच स्वर आहे याची खात्री पटली. या चित्रपटात हे एक क्लब सॉंग होते आणि हेलन या अभिनेत्रीवर चित्रित झाले होते. अभिनेत्री हेलन आणि पंचम यांचा स्वर हे कोम्बिनेषण तयार झाले होते. कारण 1971 साली नासिर हुसेन यांचा ‘कांरवा’ हा चित्रपट आला होता. या चित्रपटातील सगळीच गाणी गाजली परंतु ज्या गाण्याने रसिकांना एका वेगळ्या विश्वात नेले ते गाणं होतं ‘पिया तू अब तो आजा’ हे गाणे हेलन (आणि जलाल आगा) वर चित्रित होते. पंचम यांनी या गाण्यामध्ये फक्त ‘मोनिका ओ माय डार्लिंग ‘ एवढंच म्हटलं होतं. पण या गाण्यात पंचमने वापरलेला वाद्यांचा मोठा ताफा आणि ‘मोनिका’ शब्द उच्चारताना त्याने घेतलेली प्रदीर्घता आणि त्यानंतर आशाचे ‘देखो देखो वो आ गया,वो आ गया’  असे म्हणणे आणि त्या नंतर पंचम चे ‘ओ माय डार्लिंग’ मस्त जमून आले होते. ब्रेथलेस हा प्रकार नंतर सुरु झाला पण त्याचा खरा पायोनियर पंचमच म्हटला पाहिजे. आज या गाण्यातील वाद्यांचे  बारीक-सारीक तपशील अगदी लख्ख सारे सारे आठवते ही किमया पंचम यांची होती!

याच वर्षी शक्ती सामंत यांचा ‘कटी पतंग’ हा एक चित्रपट आला होता. या चित्रपटात बिंदू वर चित्रीत ‘मेरा नाम है शबनम प्यार से लोग मुझे शब्बो कहते है…’ या गाण्यात पंचम ने फक्त श्वासांचा अजीबोगरीब वापर करत फक्त उसासे टाकले होते! यापूर्वी भारतीय सिनेमात असला प्रकार कधी झाला नव्हता. आर डी बर्मन चे वेगळेपण हे असं होतं. तो एक ट्रेंड सेटर होता. 1972 साली राजेश खन्ना आणि मुमताज यांचा अपना देश हा चित्रपट आला होता. या चित्रपटात ‘दुनिया मे लोगो को धोखा कभी हो जाता है…’ हे गाणं पंचमने आशा सोबत गायले होते. सुरुवातीला पंचमाच्या स्वराला नाके मुरडणारी आता त्याच्या स्वरातील ‘झिंग’ आणणाऱ्या मदहोशीला दाद देत होते. हे वेगळेपणच पंचमला लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार करीत होते. याच काळात ‘मदहोश’ नावाचा एक सिनेमा आला होता त्यात शराबी आंखे गुलाबी चेहरा ‘ या क्लब डान्स सॉंग मध्ये पंचम चा स्वर बहरला होता. (पडद्यावर पुन्हा हेलन च होती!)

1975 साली रमेश सिप्पी यांचा बिग्गेस्ट हिट ‘शोले’ हा चित्रपट झळकला. हा चित्रपट हीट होण्याची 500 कारणे सांगितली  जातात त्यापैकी एक नक्कीच पंचम ने गायलेले ‘मेहबूबा मेहबूबा गुलशन में फुल खिलते है’ हे गाणे आहे! कारण जिप्सी वेषातील हेलन आणि जलाल आगा यांच्यावर चित्रित हे गाणे आज देखील प्रचंड लोकप्रिय आहे. पंचम ने हे गाणे गाऊन त्याला चार चाँद लावले. याच वर्षी ऋषी कपूर आणि नीतू सिंग यांचा ‘खेल खेल मे’ हा चित्रपट आला होता. या चित्रपटात ‘सपना मेरा टूट गया’ हे आशा भोसले सोबत चे गाणे पंचमने गायले होते. यात त्याने बर्‍यापैकी सॉफ्ट व्हॉइस वापरलेला दिसतो. चित्रपटात हे गाणे अरुणा इराणी आणि राकेश रोशन यांच्यावर चित्रित  होते. यातील ‘घबराना छोड दे तू शरमाना ना छोड दे तू …’ हे पंचमी इतक्या भावस्पर्शी स्वरात म्हटले आहे कि ते  आजही  रसिकांच्या लक्षात आहे. शान या गाजलेल्या सिनेमात रफी सोबत ‘यम्मा यम्मा ‘ गे गाणे आणि ‘गोलमाल’ सिनेमातील किशोर सोबत चे ‘गोलमाल है भाई सब गोलमाल है’ आजही चटकन आठवते. द बर्निंग ट्रेन आणि द ग्रेट गम्बलर मधील शीर्षक गीतात पंचम चा स्वर होता. ‘डोली में सवार’ हे बालिका बधू मधील गाणे अनेकांच्या स्मरणात असेल!

गुलजार आणि आर डी बर्मन यांच्यात एक विलक्षण वेगळेच असं नातं होतं. भारतीय चित्रपट संगीतातील एक वेगळा अध्याय या दोघांनी लिहिला त्यांच्या अनेक लोकप्रिय गाण्यासोबतच एक गाणे गुलजार यांच्या ‘किताब’ या सिनेमात होते. ‘धन्नो कि आंखो में…’ हेच ते गाणे जे आजही पंचम प्रेमींमध्ये आवडीने ऐकले जाते.1973 सालच्या  ‘यादोंकी बारात ‘ या सिनेमात संगीताने धमाल उडवून दिली होती. यात ‘आपके कमरे में कोई रहता है’ या गाण्याच्या नंतर  ‘दिल मिल गये कि दिल खिल गये’ या गाण्यात पंचमच्या स्वराने किशोर सोबत ज्या हरकती केल्यायात त्याला तोड नाही. सत्तर च्या दशकाच्या अखेरीस ऋषीकपूर साठी पंचम स्वर बऱ्याच ठिकाणी वापरलेला दिसतो. (तशी सुरुवात ‘जहरीला इन्सान ‘ पासून झाली होती.) ‘तुम क्या जानो मुहोब्बत क्या है दिल कि महफिल सनम ये महफिल नही दिल है’ पुढे ‘जमाने को दिखाना है’ मढील पंचम स्वरातील  ‘दिल लेना खेल है दिलदार का भूले से नाम न लो प्यार का …’ जबरदस्त हिट झाले.

ऐंशीच्या दशकात पंचम ची गाणी मोठ्या संख्येने दिसू लागली. संजय दत्त यांच्या पहिल्या चित्रपटात (‘रॉकी’) पंचम ने गायलेले एक गाणं होतं ‘आ देखे जरा किसमे कितना है दम’ त्याच प्रमाणे अमिताभ बच्चन यांच्या ‘सत्ते पे सत्ता’ या चित्रपटात ‘दुक्की पे दुक्की हो या सत्ते पे सत्ता’,’ ‘परियो का मेला है हर दिल अकेला है’,’ जिंदगी मिलके बितायेंगे हाले दिल गाके सुनायेंगे’ आणि सर्वात गाजलेले ‘प्यार हमे किस मोड पे ले आया’ हि पंचम ची गाणी आजही लक्षात आहेत.

अभिनेता कमल हसन आणि रिना रॉय यांचा ‘सनम तेरी कसम’ या चित्रपटासाठी राहुल देव बर्मन यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटात ‘जाना ओ मेरी जाना मै हू तेरे खाबो का राजा ‘ आणि ‘जाने जा ओ मेरी जाने जा’ हे दोन डान्स नंबर्स पंचम ने जोरदार गायले होते. अमिताभ बच्चन यांचा ट्रिपल रोल असलेल्या ‘महान’ मध्ये पंचम ने आशा भोसले सोबत ‘ये दिन तो आता है एक दिन महिने मे’ हे गाणं गायलं होतं. अमिताभ बच्चन आणि झीनत अमान यांच्या 1983 सालच्या  ‘पुकार’ या चित्रपटात ‘समुंदर मे नहा के और भी नमकीन हो गयी हो’ आणि ‘बचके रहना रे बाबा बचके रहना रे ‘ही गाणी पंचमी गायली होती . पंचम ने त्याच्या संपूर्ण कारकीर्दीत 50 हून अधिक गाणी गायली होती . त्यातील निम्मी गाणे लोकप्रिय ठरली. मुळात प्रस्थापित गायक हाताशी असताना पंचम ने जो स्वतः गाण्याचा प्रयोग केला त्याला रसिकांनी चांगली दाद दिली.

आज 27 जून पंचम यांचा वाढदिवस! त्यानिमित्ताने त्याच्या या अज्ञात आणि फारशा चर्चिल्या न गेलेल्या पैलूवर हा एक कटाक्ष.

R. D. Burman

हिंदी चित्रपट संगीताच्या गोल्डन इरा काळातील दर्जेदार माहितीपूर्ण लेखांसाठी क्लिक करा 

Dhananjay Kulkarni
+ posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.