© विवेक पुणतांबेकर

भारतीय सिनेमाच्या इतिहासात अनेक घराणी आपला ठसा उठवून गेली. त्यातलेच एक कपूर घराणे.या घराण्यातले एक प्रमुख पृथ्वीराज कपूर (Prithviraj Kapoor). आज त्यांच्या स्मृतिदिनी त्यांचा जीवनप्रवास जाणून घेऊया. (Remembering the Legendary Actor Prithviraj Kapoor)

 

पंजाबच्या ल्यालपूर मधल्या समुंद्री गावात खत्री कुटुंबात पृथ्वीराज कपूर यांचा जन्म ३ नोव्हेंबर १९०६ ला झाला. त्यांचे वडिल दिवाण बसेश्वरनाथ कपूर त्या वेळच्या इम्पेरियल पोलिस दलात अधिकारी होते. त्यांची नेमणूक पेशावर ला झाली. शालेय शिक्षण पेशावर ला घेतल्यावर ल्यालपूर चे खालसा काॅलेज, फैसलाबाद आणि एडवर्ड काॅलेज पेशावर येथून कायद्याची पदवी पृथ्वीराज नी घेतली. त्यांचे आजोबा केशवमल कपूर ल्यालपूरचे तहसीलदार होते. त्यांची अपेक्षा आता पृथ्वीराज नी वकीली सुरु करावी. पण पहिल्यापासूनच पृथ्वीराज कपूर ना अभिनयाची, मर्दानी खेळांची आवड होती. ल्यालपूर ला अनेक नाटक मंडळी येत असत. त्यात पृथ्वीराज भाग घेत असत. आपल्या आत्याकडून पैसे उसने घेऊन पृथ्वीराज मुंबईला आले. मुंबईत इम्पेरियल फिल्म कंपनीत पृथ्वीराज नोकरीला लागले. मूकपटाचा जमाना होता. लहान भुमिका मिळत होत्या. १९२८ साली बेघारी तलवार या मूकपटात एका नगण्य भुमिकेत पृथ्वीराज पहिल्यांदा पडद्यावर दिसले. १९२९ च्या सिनेमा गर्ल या मूकपटात त्यांना प्रमुख भुमिका मिळाली. नऊ मूकपटात अभिनय केल्यावर पहिल्या भारतीय बोलपटात आलमआरा मध्ये सहाय्यक भुमिका पृथ्वीराज ना मिळाली. १९३७ सालच्या विद्यापती सिनेमात ते प्रमुख भुमिकेत होते. यानंतर सोहराब मोदींच्या ‘सिकंदर’ सिनेमासाठी पृथ्वीराज कपूर गेले. त्यावेळी त्यांची शरिरयष्टी किरकोळ होती. सोहराब नी सांगितले महिनाभरात जर तुम्ही कसरत करुन भरदार शरिर दाखवू शकलात तरच ही भुमिका तुम्हाला मिळेल. हे आव्हान पृथ्वीराज नी यशस्वीपणे स्वीकारले आणि सिकंदराच्या भुमिकेत त्यांची निवड झाली. या सिनेमापासून त्यांची आणि सोहराब मोदींची मैत्री जमली ती अखेर पर्यंत कायम राहिली.

 

Prithviraj Kapoor in Sikandar
Prithviraj Kapoor in Sikandar

सिनेमात यशस्वी झाले तरी रंगभूमी ची ओढ पृथ्वीराज ना होती. मुंबईच्या ग्रेट अंडरसन या इंग्रजी नाटक कंपनीत पृथ्वीराज कामाला लागले. याचा फायदा असा झाला की नाटक आणि सिनेमा या दोन्ही क्षेत्रात ते खूप यशस्वी झाले.
पृथ्वीराज सतरा वर्षाचे असताना रामसरनी मेहरा यांच्याशी त्यांचा विवाह झाला. लग्नानंतर त्यांचे नाव रमादेवी ठेवले. घरातले सगळे जण त्यांना शायजी म्हणत. या जोडप्याचे पहिले अपत्य रणबीर उर्फ राज कपूर यांचा जन्म डिसेंबर १९२४ चा. यानंतर त्यांना दोन अपत्ये झाली. देविंदर आणि तेजींदर. यातला देविंदर न्यूमोनिया ने गेला. तेजींदर चुकून उंदराचे विष खाल्यामुळे गेला. १९३० साली मुंबईत आल्यावर रमादेवींनी समशेर राज उर्फ शम्मी कपूर ला जन्म दिला. यानंतर बलबीर राज उर्फ शशी आणि त्यानंतर उर्मिला अशी पाच अपत्ये या जोडप्याला झाली.

Prithviraj Kapoor with Family Members

इंडियन पीपल थिएटर असोशिएशन (इप्टा) या संस्थेची १९४४ साली स्थापना झाली. पृथ्वीराज कपूर या संस्थेचे फाऊंडर मेंबर होते. याच वर्षी त्यांनी स्वतःची पृथ्वी थिएटर्स ही नाट्यसंस्था स्थापन केली. कालिदासाच्या अभिजात शकुंतलम नाटकापासून नाट्यनिर्मिती सुरु करुन रंगभूमिवर लक्ष्य केंद्रीत केले. अनेक कलावंत आपल्या संस्थेत घेतले यातूनच तयार झालेल्या कलावंतानी, संगीतकारांनी, गीतकारांनी सिनेमासृष्टी गाजवली. राज कपूर, शम्मी कपूर, शशी कपूर यांच्या जडण घडणीत पृथ्वी थिएटर्स चा मोलाचा वाटा आहे. अनेक उत्तमोत्तम नाटके पृथ्वी थिएटर्स नी सादर केली. त्यांची नाटके देशभक्ती, सद्भावनेने प्रेरित असत. सतत सोळा वर्षे या संस्थेने २६६२ नाट्य प्रयोग केले. या सगळ्यात प्रमुख भुमिकेत पृथ्वीराज अभिनय करत असत. त्यांचे सगळ्यात गाजलेले हिंदु मुस्लीम ऐक्यावर आधारित ‘पठाण’ नाटक १३ एप्रिल १९४७ ला रंगभूमिवर आले. या नाटकाचे ६०० प्रयोग झाले. हा पण एक उच्चांक होता. त्यांच्या नाटकांना तिकीट नसे तर प्रयोग संपल्यावर प्रेक्षकांमध्ये स्वतः पृथ्वीराज झोळी फिरवत. प्रेक्षक पण भरभरुन प्रतिसाद देत असत. प्रेक्षक हे आपले मायबाप ही भावना बालगंधर्वांप्रमाणेच पृथ्वीराज कपूर यांच्याकडे होती. पन्रासच्या दशकात सिनेमाच्या वाढत्या प्रभावामुळे नाटक कंपनी चालवणे कठिण व्हायला लागले. एकदा पठाण नाटक सुरु असताना त्यांचा आवाज बसला. त्यांनी नाटक थांबवले. प्रेक्षकांनी सांगितले पृथ्वीराज तुमचा आवाज एकू आला नाही तरी नाटक सुरु ठेवा. आम्ही तुम्हाला पहायला आलो आहोत. पण पृथ्वीराजनी हात जोडून क्षमा मागितली. ठेकेदाराचे पैसे परत केले आणि दुसर्‍या दिवसापासून नाटक कंपनी बंद करुन टाकली.

सिनेमातही दुय्यम भुमिकेत त्यांनी आपला ठसा उठवला. ‘आवारा’ च्या वेळी जज्ज रघुनाथ ही भुमिका स्वीकारायला पृथ्वीराज तयार नव्हते. पण त्यांचे मित्र खलनायक के.एन. सिंग नी त्यांची समजूत काढल्यावर ते तयार झाले. त्या वेळी राज कपूर नी त्यांना असे सांगितले की आज माझी ओळख पृथ्वीराज चा मुलगा अशी आहे पण एक वेळ अशी येईल की तुम्हाला लोक ओळखतील राज कपूर चे वडिल म्हणून. ‘आवारा’ रिलिज झाल्यावर राज कपूर यांची लोकप्रियता इतकी वाढली की खरोखरीच पृथ्वीराज नंतरच्या काळात ओळखले गेले ते राज कपूर यांचे वडिल म्हणूनच.

‘मुगले आझम ‘ची निर्मिती १९४६ ला सुरु झाली खरी पण मध्येच बंद पडून परत १९५१ ला सुरु झाली. कलावंत बदलेले गेले. अपवाद होता पृथ्वीराज यांचा. शूटींग सुरु व्हायच्या आधी पृथ्वीराज डोळे मिटून शांतपणे बसत. त्या भुमिकेत शिरल्याशिवाय कॅमेर्‍यासमोर येत नसत. त्यांच्या चालण्यातून ही अकबर जाणवायचा इतके ते या भुमिकेशी समरस झाले होते. अजमेर च्या दर्ग्यात मन्नत मागायला अकबर जातो हा प्रसंग वाळवंटात भर दुपारी चित्रित केला. अनवाणी चालण्यामुळे त्यांच्या पायाला फोड आले पण काहिही न बोलता त्यांनी ते दृश्य अतिशय परिणाम कारक दिले. ‘प्यार किया तो डरना क्या’ गाण्यातला संतापाने फुललेला अकबर विसरता येणे शक्यच नाही.

व्ही शांताराम यांच्या १९५० च्या ‘दहेज’ मधली त्यांची भुमिका अविस्मरणीय होती. पृथ्वीराज चेनस्मोकर होते. शांतारामबापूंना धूम्रपान चालत नसे. त्यामुळे शाॅट संपला की पृथ्वीराज स्टुडिओच्या बाहेर जाऊन सिगारेट ओढून यायचे. एकदा शांतारामबापूंना ही गोष्ट समजली. त्यांनी अपवाद म्हणून स्टुडिओतल्या एका बाजूच्या खोलीत पृथ्वीराज ना सिगारेट ओढायची परवानगी दिली. आवारा, आनंदमठ परदेसी, जग्गा डाकू, जिंदगी, हरिश्चंद्र तारामती, रुस्तम सोहराब, प्यार किया तो डरना क्या, गझल, जहांआरा, जानवर, सिकंदरे आझम, डाकू मंगल सिंग, ये रात फिर ना आयेगी, लाल बंगला, तीन बहुरानीयां, हिर रांझा, कल आज और कल अशा गाजलेल्या हिंदी सिनेमात अभिनय केलेल्या पृथ्वीराज नी नानक नाम जहाज है, नानक दुखीया सब संसार आणि मेले मित्रां दी या पंजाबी सिनेमात तसेच साक्षातकारा या कानडी सिनेमात ही अभिनय केला.

पृथ्वीराज नी सिनेमात अभिनय केल्यामुळे नाराज झालेले त्यांचे वडिल दिवाण बसेश्वर नंतर त्यांचावर खूश झाले. दिलिप कुमार चे वडिल आणि दिवाण बसेश्वर नाथ यांची मैत्री होती. दिलीप कुमार नी सिनेमात जायचे ठरवल्यावर पृथ्वीराज यांचे उदाहरण देऊन त्यांची समजूत काढली. इतकेच नाही तर मुंबईत दिलिप कुमारचा ज्वारभाटा सिनेमा रिलिज झाल्यानंतर त्यांना दिवाण बसेश्वर नाथांनी हा सिनेमा दाखवल्याचा उल्लेख दिलिप कुमारांच्या आत्मचरित्रात आहे. दिलीप कुमारच्या लग्नात त्याच्या घोड्याचा लगाम पृथ्वीराज नी धरल्याचा उल्लेखही सापडतो. पृथ्वीराज कुटुंबवत्सल होते. प्रेमळ तितकेच शिस्तप्रिय होते. राज कपूरना चंदूलाल शहा कडे उमेदवार म्हणून नेमताना त्यांनी अटच घातली याला पगार द्यायचा नाही. सामान्य कामगारासारखा वागवायचा. रणजीत स्टुडिओत शूटींग ला जाताना ते आपल्या फोर्ड गाडीतून जात तर राजकपूर बस ने जात असे. या शिस्तीतूनच त्यांची तिन्ही मुले आणि नातवंडे घडली.

मराठी नाटकाला नाट्यसंमेलनाला पृथ्वीराज आवर्जून हजेरी लावत. निर्मात्यांशी अत्यंत सहकार्याने वागत अडवणूक करत नसत. स्वाभिमानी होते. ‘मुगले आझम’ चा प्रिमीयर शो मुंबईच्या मराठा मंदिर सिनेमात होता. राज कपूरनी आपली गाडी पाठवली. पृथ्वीराज नी नकार दिला. आपल्या जुन्या फोर्ड गाडीतून ते थिएटरवर निघाले. गाडी रस्त्यात अनेकदा बंद पडली. थिएटरवर पोहोचले तेव्हा अर्धा सिनेमा संपला होता.

Prithviraj Kapoor

वैजयंतीमाला प्रकरणात ते ठामपणे कृष्णा कपूरच्या मागे उभे राहिले आणि राजकपूर चा संसार वाचवला. रणधीर कपूर ने दिग्दर्शन करायचे ठरवल्यावर ‘कल आज और कल’ मध्ये अभिनय करायला ते तयार झाले. पहिल्याच दिवशी रणधीर ला सांगितले आधी तू अभिनय करुन दाखव मगच आम्ही शाॅट देऊ. उद्या आमच्या जागी दुसरा कोणी असेल तेव्हा कसे करायचे हे तुला समजायलाच हवे. ही आठवण रणधीर कपूर ने एका मुलाखतीत सांगितली. ते शिवभक्त होते. राज कपूर, शम्मी कपूर आणि शशीकपूर निर्मित सिनेमाची सुरुवात त्यांच्या शिवपूजनाने होत असे. चेनस्मोकर पृथ्वीराज ना फुफ्फुसाचा कॅन्सर झाला. त्यांच्या आवाजावर ही याचा परिणाम झाला.

‘तीन बहुरानी’या मधले सगळे डबिंग बिपीन पाल यांच्या आवाजात करावे लागले. ‘कल आज और कल’ च्या वेळी प्रकृती खूप बिघडली होती. खूप ताप असतानाही ते जिद्दीने शूटींगला येत. शेवटी मुंबईच्या टाटा हाॅस्पिटल मध्ये त्यांना ठेवले. आपला मित्र सोहराब मोदीं बरोबर त्यांनी रमादेवींना निरोप पाठवला ‘अब पृथ्वी वापस नही आयेगा’. रमादेवींनी निरोप पाठवला ‘आपके पिछे मै आनेवाली हूं’. ते गेल्यावर आठव्या दिवशी रमादेवी गेल्या. अभिनयाचे घराणे सुरुवात करणार्‍या पृथ्वीराज कपूर यांची पिढी संपत आली. कालाय तस्मै नमः

Vivek Puntambekar
+ posts

Science Graduate from Somayya College in the year 1977.

Started Carrier in Kohinoor Mills in SQC Dept. After the closer of mill, began carrier as a Medical Sales Representative.

Retired as Zonal Sales Manager. Since childhood fond of Films and film music.

Wrote programs for FM Radios. Wrote articles in various Diwali magazines.

Participated in Doordarshan program. Performing an audio visual programs based on Golden era of hindi music.

Regularly writing articles for newspaper. Die hard fan of Raj Kapoor and his entire team.

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.