भारताला सिनेमाचे स्वप्न ज्यांनी पहिल्यांदा दाखवले… नुसतेच दाखवले नाही तर ते प्रत्यक्षात उतरविले ..जोपासले… वाढवले.. ‘भारतीय सिनेमाचे पितामह’ म्हणून ज्यांची ओळख आहे असे ‘धुंडिराज गोविंद फाळके’ उर्फ ‘दादासाहेब फाळके’ यांचा आज ७७ वा स्मृतिदिन आहे. आजच्या दिवशी १९४४ साली त्यांचे निधन झाले. वयाच्या अवघ्या ३५ व्या वर्षी या अवलियाने भारतात पहिल्यांदा सिनेमा आणायचे स्वप्न पाहिले होते ज्याला मूर्त स्वरूप येण्यास ६ वर्षांचा कालावधी गेला. १९१३ साली ‘राजा हरिश्चंद्र’ प्रदर्शित झाला तेंव्हा फाळके यांचे वय ४३ वर्षांचे होते. २००९ साली प्रदर्शित व परेश मोकाशी दिग्दर्शित ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ या सिनेमाद्वारे दादासाहेबांनी केलेला हा अभूतपूर्व प्रवास पहिल्यांदा रसिकांसमोर आला.

आज त्यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने दादासाहेबांबद्दलच्या काही रंजक गोष्टी जाणून घेऊ यात: 

१. दादासाहेबांचे मूळ आडनाव ‘भट’ असे होते, परंतु त्यांचे वंशज पेशव्यांना जेवणासाठी केळ्यांचे ‘फाळके’ पुरवत असत त्यावरून त्यांना ‘फाळके’ हे आडनाव पडले. त्यांचा जन्म झाला तेंव्हा त्यांचे उघडे डोळे बघून त्यांचे नाव ‘धुंडिराज’ ठेवण्यात आले असे म्हणतात.  

२. चित्रनिर्मितीकडे वळण्याच्या अगोदर दादासाहेबांनी ब्रिटिशांच्या पुरातत्व विभागात छायाचित्रकार म्हणून नौकरी व नंतर भागीदारीत स्वतःचा प्रिंटिंग उद्योग काही काळ चालविला होता. 

३. सिनेमा बनविण्याच्या नादात अहोरात्र मेहनत करणाऱ्या दादासाहेबांच्या डोळ्यांवर इतका काही गंभीर परिणाम झाला होता की त्यांची दृष्टी जाण्याची वेळ आली होती. 

४. लाईफ ऑफ ख्राईस्ट या सिनेमाने प्रेरित होऊन दादासाहेबांनी चित्रनिर्मिती करण्याचे ठरवले व त्यासाठी एक-एक करत घरातील सर्व सामान विकण्याची वेळ त्यांच्यावर आली होती. 

५. अतिशय कल्पक अशा दादासाहेबांनी, श्रीकुष्ण जन्म या सिनेमात कृष्ण जन्मानंतर कंसाला सर्वत्र कृष्ण दिसायला लागतो या दृश्यासाठी वापरलेले तंत्र तेंव्हा परदेशात सुद्धा अवगत नव्हते. हे तंत्र पाहून अवाक झालेल्या ब्रिटिशांनी दादासाहेबांना लंडनमध्ये चित्रनिर्मितीचा आग्रह धरला परंतु देशाभिमानी दादासाहेबांनी ती ऑफर नाकारली. 

Dadasaheb Phalke
Dadasaheb Phalke

६. राजा हरिश्चंद्र सिनेमात कोणी स्त्री पात्र साकारायला तयार नसल्याने त्याच्या शोधासाठी दादासाहेब जेंव्हा वेश्यावस्तीत गेले तेंव्हा एका वेश्येने दादासाहेबांना अट घातली… “माझ्या मुलीशी तुम्ही लग्न करायला तयार असाल तर मी तिला सिनेमात काम करायला परवानगी देते” . अखेर हॉटेलमधील वेटरला स्त्री पात्रात उभे करावे लागले. 

७. दादासाहेब अत्यंत शिस्तप्रिय होते. एकदा ऑफिसमधील शाईच्या दौतीला बूच लावलेले न दिसल्याने दादासाहेबांचा पारा चढला व त्यांनी त्या दिवसाचे शूटिंग रद्द केले. तसेच एके दिवशी शुटिंगस्थळी घेऊन जाण्यासाठी ड्रायव्हरला येण्यास उशीर झाल्याने दादासाहेब शुटिंगस्थळापर्यंत ६ मैल पायी गेले. थोड्या वेळाने ड्रायव्हर आला पण दादासाहेब काही त्याच्या गाडीत बसले नाहीत.

 
८. दादासाहेब जात-धर्म मानणारे नव्हते. शूटिंगच्या वेळी सर्व टीम मेम्बर्सना एकाच पंक्तीत सोबत जेवणाला घेऊन बसत. 

९. गंगावतरण या दादासाहेबांच्या शेवटच्या चित्रपटात तब्बल १७ गाणी होती व त्याला २.५ लाख रुपये खर्च आला होता. आपले जावई श्रीकृष्ण पुसाळकर यांच्याबरोबर तिकीट खिडकीबाहेर रांग लावून तिकीट काढून हा सिनेमा दादासाहेबांनी बघितला. 

१०. दादासाहेबांच्या या ध्येयवेड्या, ऐतिहासिक व यशस्वी प्रवासात त्यांची पत्नी सरस्वतीबाई यांचे सुद्धा तितकेच महत्वाचे योगदान आहे.

 
आजच्या स्मृतिदिनी दादासाहब फाळकेंना भावपूर्ण श्रद्धांजली. 

-टीम नवरंग रुपेरी 

Website | + posts

Leave a comment