-अजिंक्य उजळंबकर

 

८०-९० च्या सुरुवातीच्या दशकातील दूरदर्शनचे चाहते त्यांना ‘करमचंद’ व ‘फटीचर’ म्हणून ओळखतात तर ९० च्या शेवटच्या दशकातील चाहते त्यांना ‘मोहनदास बीए एलएलबी’ व ‘ऑफिस ऑफिस’ चा मुत्सद्दीलाल म्हणून. समांतर अथवा कलात्मक सिनेमाच्या रसिकांना त्यांनी रंगविलेला ‘एक डॉक्टर कि मौत’ मधला व राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित डॉ दीपांकर रॉय स्मरणात आहे तर कुणाला ‘मकबूल’ मधला अब्बाजी. व्यावसायिक सिनेमाचे प्रेक्षक त्यांचा ‘चमेली कि शादी’ मधला ना कल्लूमल कोयलेवाला विसरू शकलेत ना ‘दस’ मधला खलनायक जमवाल. आजची पिढी ज्यांना कबीर सिंग अर्थात शाहिद कपूरचे वडील म्हणून ओळखते असे अष्टपैलू व प्रतिभावान पंकज कपूर (Pankaj Kapur) यांचा आज वाढदिवस.

पंकज कपूर यांचा जन्म २९ मे १९५४ रोजी पंजाबच्या लुधियाना येथे झाला. पंजाबमध्ये त्यांचे शिक्षण पूर्ण झाले आणि शालेय शिक्षण घेत असतांनाच त्यांना अभिनयाची आवड निर्माण झाली. पंकज हे नॅशनल स्कुल ऑफ ड्रामामधले पदवीधर. ८० च्या दशकात दूरदर्शन मालिकांमधून काम करत असतांना सोबतच श्याम बेनेगल यांच्या ‘आरोहन’ या सिनेमाद्वारे इंडस्ट्रीत प्रवेश केला. मग गांधी सिनेमात गांधीजींच्या सहाय्यकाची भूमिका व बेन किंग्सले यांनी साकारलेल्या गांधींसाठी हिंदी मधून स्वतःचा आवाज दिला. या दशकात त्यांनी ‘मंडी’, ‘जाने भी दो यारो’, ‘मोहन जोशी हाजीर हो’, ‘एक रुका हुवा फैसला’ इत्यादी चित्रपटांमधून भूमिका केल्या.

आमिर खान अभिनीत १९८९ चा ‘राख’ या चित्रपटातील इन्स्पेक्टर पीके च्या भूमिकेसाठी त्यांना पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.दिग्दर्शक म्हणून पंकज कपूर यांनी मोहनदास बी.ए.एल.एल.बी., वाह भाई वाह, साहबजी बिविजी गुलामजी आणि दृष्टांत, कनक दि बल्ली, अल्बर्ट ब्रिज इत्यादी सहीत ७० हून अधिक नाटक व मालिकांचे दिग्दर्शन केले आहे. १९८६ मध्ये, सुष्मिता मुखर्जी यांच्यासोबत त्यांची दूरदर्शनवरील ‘करमचंद’ या डिटेक्टिव्ह कॉमेडी सीरियल मध्ये करमचंद जासू (जासूस) च्या भूमिकेसह, अनेक मालिकांत पंकज कूपर यांनी अभिनय केला ज्यात फटीचर, कब तक पुकारू, जबान संभाल के, विजया मेहता सोबत लाइफलाइन, नीम का पेड इत्यादी काही नावे उल्लेखनीय आहेत. मणिरत्नम यांच्या ‘रोजा’ या प्रसिद्ध चित्रपटातील त्यांच्या अतिरेक्याचे भूमिकेचे समीक्षकांनी खूप कौतुक केले होते. १९९१ साली त्यांना ‘एक डॉक्टर की मौत’  या चित्रपटातील वैज्ञानिकाच्या भूमिकेसाठी  राष्ट्रीय (विशेष ज्युरी) पुरस्काराने गौरविण्यात आले.मकबूलमधील खलनायकी अब्बाजी या व्यक्तिरेखेने पंकज यांना २००३ साली परत एकवार सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळवून दिला.

 

२००७ साली प्रदर्शित बनारसच्या एका पंडिताची प्रमुख भूमिका असलेला त्यांचा ‘धर्म’ नावाचा चित्रपट, राष्ट्रीय पुरस्कारासोबतच अनेक आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्येही कौतुकास पात्र ठरला होता. २०११ साली त्यांनी मुलगा शाहिद कपूर व सोनम कपूर यांना घेऊन ‘मौसम’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले. २०१३ साली विशाल भारद्वाज दिग्दर्शित ‘मटरू कि बिजली का मंडोला’ चित्रपटात इम्रान खान व अनुष्का शर्मा सोबत पंकजजींची प्रमुख भूमिका होती. सर्वच समीक्षकांनी या भूमिकेसाठी त्यांच्या अभिनयाचे खूप कौतुक केले होते व त्यांना फिल्मफेअरसाठी नामांकनाही मिळाले होते. असे ग्रेट पंकज कपूर यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.

हॅप्पी बर्थडे पंकज सर!

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.