– © धनंजय कुलकर्णी, पुणे

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कला विश्वाला एक सुरेल गोड स्वप्न पडलं होत; नारायण श्रीपाद राजहंस तथा बालगंधर्व (Marathi Singer and Stage Actor Bal Gandharva) ! हजारो लाखो मराठी संगीत नाट्य रसिक या मखमली स्वराच्या छायेत पन्नास वर्षाहून अधिक काळ भारावले गेले. आज एकविसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकात देखील संगीताची /नाट्याची चर्चा बालगंधर्वाच्या नावाशिवाय सुरू होवू शकत नाही इतकी अजोड कामगिरी या कलावंताने केली आहे. त्यांच्या शब्द-सूर, ताल लयीचे अंदाज, रंगमंचावरील स्त्री भूमिकेतील त्यांचा वावर, त्यांच्या नाटकातील दैदिप्यमान उंची डोळ्याला भुरळ पाडणारी नेपथ्य रचना या सर्वांनी मराठी मनावर ‘गारूड’ केलं. त्यानी मराठी रंगभूमीला अभिजात दर्जा प्राप्त करवून दिला. इतर भाषिक रसिकांनाही रंगभूमीपर्यंत खेचून आणण्याचं सामर्थ्य त्यांच्या स्वराभिनायात होत. (Remembering Marathi Singer and Stage Actor Narayan Shripad Rajhans popularly known as Bal Gandharva) 

पण १९३१ साली बोलपटाचा प्रारंभ झाला आणि प्रेक्षकांची टेस्ट बदलली. याचा थेट परीणाम नाट्य व्यवसायावर झाला. त्यांना आर्थिक अडचणीमुळे १९३५ मध्ये ’गंधर्व नाटक कंपनी’ बंद करावी लागली. रंगभूमीवर विक्रमादित्य असणार्‍या बालगंधर्वांना रूपेरी पडद्यावर मात्र यश मिळालं नाही. त्या काळच्या ’प्रभात फिल्म कंपनी’च्या मालकांना गंधर्वांची हि अवस्था दिसत होती. दामले-फतेलाल-व्ही शांताराम यांनी काही काळ गंधर्व नाटक कंपनीत उमेदवारीही केली होती. रंगभूमीवरील या नटश्रेष्टाला काही मदत करता येईल का याचा विचार ते करू लागले. यातूनच गंधर्वांना घेवून एक चित्रपट बनवण्याची प्रक्रिया सुरू झाली. आपल्या चित्रपटाची विद्यमान सामाजिक वास्तवाशी सांगड घालण्यावर प्रभातचा कटाक्ष असे. १९३५ साली म.गांधी यांची अस्पृश्योद्धाराची चळवळ जोमात होती. याच चळवळीचे पौराणीक कथानकाशी नाते जोडत संत एकनाथ यांच्यावर ’महात्मा’ हा सिनेमा करायचे ठरले व त्यातील एकनाथांच्या भूमिकेत बालगंधर्वांना चमकवण्याचे ठरवले. ©

remembering bal gandharva

बालगंधर्वांना मात्र चित्रपट हे माध्यम रूचले नाही. रंगभूमीवर अखंडपणे सहा सहा तास वावरणारा हा नटवर्य सिनेमातील तुकड्या तुकड्याने घेतले जाणार्‍या दृष्यामुळे त्यांची एकात्मता भंग होवू लागली. वारंवार येणारा व्यत्यय, टेक रिटेक, हालचालींवरची बंधने यामुळे ते भूमिकेशी समरस होवू शकले नाहीत. ते संवाद कायम विसरत. त्या साठी शांताराम बापूंनी एका प्लायवूडवर मोठ्या अक्षरात संवाद लिहून कॅमेर्‍याच्या मागे एका व्यक्तीच्या हातात दिले. एकदा एक मोठा ट्रॉली शॉट घ्यायचा होता ; फिल्म वाया जावू नये म्हणून शांताराम आठवल्यांवर बापूंनी एक जवाबदारी दिली. त्यांनी कॅमेर्‍याच्या रेंज मध्ये न येता बालगंधर्वांना फॉलो करायचे व त्यांचे संवाद हळू आवाजात त्यांच्या कानात सांगायचे! पण याचाही काही उपयोग झाला नाही. गंधर्व मध्येच ब्लँक झाले. बापू आठवलेंवर कडाडले तेंव्हा गंधर्व बापूंना म्हणाले “देवा, यात आठवल्यांचा काहीच अपराध नाही. ते संवाद बरोबर म्हणत चालले होते. परंतु दोष आहे तो माझ्या उजव्या कानाचा! देवा, उजव्या कानाने मला नीट ऐकू येतच नाही!’ गंधर्व पुरूषी वेषात कसे दिसतात याचे सामान्यांना जबरदस्त कुतूहल होते. सेन्सार बोर्डाने सिनेमाच्या शीर्षकावरच आक्षेप घेत त्याचं नाव बदलायला लावून ’महात्मा’चं ’धर्मात्मा’ करायला लावलं. त्या काळी प्रत्येक राज्याचे निरनिराळे सेन्सार बोर्ड असायचे त्यामुळे हिंदी ’महात्मा’ कलकत्त्यात पास होवून प्रदर्शित ही झाला. नामांतर व काटछाटीनंतर ’धर्मात्मा’ ७ डिसेंबर १९३५ रोजी मुंबईला कृष्ण सिनेमात प्रदर्शित झाला पण अपयशी ठरला.

Dharmatma 1935 film Bal Gandharva

बालगंधर्वांनी मराठी संगीत नाटकांचे सुवर्ण युग निर्माण केले पण माध्यमांतराच्या प्रयोगात मात्र ते फसले. बालगंधर्वांना रूपेरी पडदा जरी गाजवता आला नसला तरी रवि जाधव यांनी निर्मिलेला ’बालगंधर्व’ हा सिनेमा मात्र तुफान गाजला. २६ जून गंधर्वांचा जन्मदिन. त्या निमित्तने त्यांच्या न बहरू शकलेल्या रूपेरी प्रवेशाचे हे स्मरण!

हेही वाचा- मानापमान’ आता रुपेरी पडद्यावर

Dhananjay Kulkarni
+ posts

Leave a comment