— वंदना विनायक कुलकर्णी

Remembering Hrishikesh Mukherjee One of the Finest Director of Indian Cinema त्यांच्या चित्रपटात मोठे मोठे सेट्स नव्हते , पाच पाच जणांना एकटा लोळवू शकेल असा हिरो नव्हता , कथे मध्ये धक्का देणारी नाटकीय वळणे नव्हती, दिल खेचक नृत्य नव्हती , थोडक्यात व्यावसायिक यशाची हमखास खात्री देणारा कोणताही मसाला नव्हता . तरीही त्यांच्या १९५७ च्या मुसाफिर पासून ते १९८५ च्या रंग बिरंगी पर्यंत चाळीस चित्रपट ( त्या नंतर बऱ्याच वर्षांच्या विश्रांती नंतर १९९८ मध्ये झूठ बोले कौव्वा काटे ) त्यातले एखाद दुसरा अपवाद वगळता सर्व च्या सर्व व्यावसायिक रित्या यशस्वी झाले , समीक्षकांनी नावाजले आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे सिने प्रेक्षकांनी गर्दी करून पुन्हा पुन्हा पहिले. 

३० सप्टेम्बर १९२२ रोजी कलकत्ता इथे जन्म झालेल्या ऋषिकेश मुखर्जी यांना , कलकत्ता युनिव्हर्सिटी मधून सायन्स ची पदवी घेतल्या नंतर , खरे तर प्रोफेसर व्हायचे होते . पण फोटोग्राफीचा छंद त्यांना न्यू थिएटरस कडे घेऊन गेला . तिथे सगळ्या विभागांची मुशाफिरी करता करता संकलन विभागात ऋषिदा रमले आणि तिथे सुबोध मित्र (केंचीदा ) यांच्या मार्गदर्शना खाली संकलक (एडिटर) म्हणून कारकीर्द सुरु झाली. इथेच त्यांची गाठ विख्यात बिमल रॉय यांच्याशी पडली . १९४७ साली देशाची फाळणी झाली आणि कलकत्ता , लाहोर आणि पुणे इथे पसरलेला सिनेमा उद्योग मुंबई मध्ये एकवटायला सुरुवात झाली . सम्पूर्ण देशभरातून विविध कलाकार, गीतकार , संगीतकार आणि इतर कारागीर यांचा ओघ मुंबई कडे सुरु झाला . परिणामी बिमल रॉय जेव्हा मुंबईत यायला निघाले तेव्हा त्यांच्या बरोबर त्यांची सगळी टीम होती आणि त्यात अर्थातच ऋषिकेश मुखर्जी यांचा समावेश होता. १९५१ मध्ये बिमल रॉय प्रॉडक्शन्स ची सुरुवात झाली आणि ह्रिषीदा तिथे संकलक आणि सहायक दिग्दर्शक म्हणून काम करू लागले .

बिमल दांचा सिनेमा संवेदनशील होता , सामाजिक प्रश्नांची संयत पणे मांडणी करणारा होता. तोच वारसा घेऊन आणि त्यात आपला मध्यमवर्गीय खुसखुशीत पणा मिसळत १९५७ साली ह्रिषीकेश मुखर्जी यांनी आपला पहिला स्वतंत्र चित्रपट “ मुसाफिर “ याची निर्मिती केली आणि त्या बरोबरच या क्षेत्रातल्या मुशाफिरी ला सुरुवात केली . हा पहिलाच चित्रपट अगदी वेगळा विवाह , जन्म , मृत्यू या मानवी आयुष्यातल्या तीन अवस्था अत्यंत सोप्या सरळ भाषेत दर्शकांपुढे घेऊन आला . या मध्ये तीन वेगवेगळ्या गोष्टी एकाच घराच्या व्यासपीठावर एका पाठोपाठ घडताना पाहायला मिळाल्या.

त्या नंतर अनाडी, अनुराधा, छाया , मेम दीदी , असली नकली , सांझ और सवेरा, अनुपमा, आशीर्वाद, सत्यकाम, आनंद , गुड्डी, बावर्ची, अभिमान , नमक हराम, चुपके चुपके, मिली, आलाप, गोलमाल, खूबसूरत, बेमिसाल, रंगबिरंगी ….. असा हा यशस्वी चित्रपटांचा सिलसिला ३०/३५ वर्षे सुरु राहिला आणि आपल्या चित्रपटांच्या द्वारे ह्रिषीदा रसिकांच्या हृदयावर राज्य करत राहिले. अशी ही चाळीस यशस्वी चित्रपटांच्या दिग्दर्शकाची प्रचंड मोठी कारकीर्द एका छोट्या लेखात सामावणारी नाही. हा एका स्वतंत्र पुस्तकाचा विषय आहे . तरीही त्यांच्या चित्रपटांची काही वैशिष्ट्ये नक्की सांगता येतील. मुख्य म्हणजे हा मध्यम वर्गाचे प्रतिनिधित्व करणारा सिनेमा होता. अगदी घरगुती वातावरण असलेला, साधा सरळ पारदर्शी सिनेमा ज्या मध्ये कोणी खलनायक नव्हता . प्रतिकूल परिस्थिती आणि त्यातून मार्ग काढत एक साधा सरळ नायक आपल्या प्रेमा पर्यंत, आपल्या इच्छित स्थळी पोहोचत असे . मानवी नाते संबंध आणि त्यांचा आयुष्यातील गुंता सोडवणे हा त्यातला महत्वाचा पैलू होता. अनाडी ( राज कपूर व ललिता पवार ), मझली दीदी ( मीना कुमारी आणि छोटा सचिन ) अनुपमा (शर्मिला टागोर आणि अभि भट्टाचार्य ) नमक हराम (अमिताभ आणि राजेश खन्ना ) आशीर्वाद ( अशोक कुमार आणि सुमिता सन्याल ) इत्यादी .

नायक अथवा नायिका यांचा मृत्यु अतिशय संवेदनशील पणे हाताळणारे त्यांचे मुसाफिर , आनंद आणि मिली हे चित्रपट प्रेक्षकांना हेलावून सोडणारे होते .

एका प्रतिभावान कलाकार स्त्रीची तिच्या अत्यंत बुद्धिमान पतीने नकळत केलेली उपेक्षा १९६० मधल्या अनुराधा मध्ये अतिशय हळुवार पणे चितारली होती , तर १९७३ चा अभिमान मध्ये ,आपल्या पेक्षा यशस्वी आणि प्रतिभावान पत्नी चे यश पती चा अभिमान हाताळू शकत नाही हे सत्य मांडले होते . तरीही त्यांच्या चित्रपटात कुठीलीही शिकवणूक देण्याचा अभिनिवेश नव्हता. गोलमाल , खूबसूरत सारखे काही चित्रपट म्हणजे तर संपूर्ण निखळ मनोरंजन होते.

व्यावसायिक आणि कलात्मक अशा दोन्ही प्रवाहांचा एक सुरेख संगम त्यांच्या सर्व सिनेमात पाहायला मिळाला .

त्या त्या वेळेला स्टार पदी असलेल्या सर्व अभिनेत्यांनी त्यांच्या सिनेमात अगदी साध्या सरळ माणसांची कामे केली त्यांना त्यांच्या प्रस्थापित इमेज मधून बाहेर काढून मुखर्जी यांच्या सिनेमात त्यांना अगदी वेगळ्या प्रकारे सादर करण्यात आले आणि रसिक प्रेक्षकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला .

दिलीप कुमार ( मुसाफिर ) , राज कपूर ( अनाडी ) , देव आनंद (असली नकली ) , गुरु दत्त (सांझ और सवे रा) अशोक कुमार ( आशीर्वाद ) धर्मेंद्र ( अनुपमा , सत्यकाम , गुड्डी, चुपके चुपके, ) ,सुनील दत्त ( छाया ,गबन ) विश्वजीत ( दो दिल, प्यार का सपना ) राजेश खन्ना ( आनंद , बावर्ची , नमक हराम ) अमिताभ बच्चन ( अभिमान , नमक हराम , चुपके चुपके , मिली , आलाप , बेमिसाल ) इत्यादी .

हिंदी चित्रपटांच्या सोनेरी कालखंडात संगीत हे एक अविभाज्य अंग होते आणि ह्रिषीकेश मुखर्जी यांचा सिनेमा सुद्धा याला अपवाद नव्हता . त्या त्या वेळच्या गाजलेल्या संगीतकारांनी त्यांच्या चित्रपटात संगीत दिले . याचा परिणाम स्वरूप १९८० पर्यंतच्या त्यांच्या सिनेमात आपल्याला अतिशय मधुर आणि वरच्या दर्जाचे संगीत ऐकायला मिळाले .

सलील चौधरी – लागी नाही छुटे रामा ( मुसाफिर ) , कही दूर जब दिन ढल जाये ( आनंद )

शंकर जयकिशन- तेरा जाना दिल के अरमनोका लूट जाना ( अनाडी ) , तेरा मेरा प्यार अमर (असली नकली )

वसंत देसाई – एक था बचपन , झिर झिर बरसे सावन अंखिया ( आशीर्वाद ) हम को मन की शक्ती देना , बोल रे पपीहरा ( गुड्डी )

सचिन देव बर्मन – पिया बिना बासिया , अब है तुमपे हर ख़ुशी अपनी ( अभिमान ) बडी सुनी सुनी है (मिली )

आणि अर्थातच राहुल देव बर्मन ज्यांनी ह्रिषी दांच्या तब्बल अकरा सिनेमांना संगीत दिले. आर . डी . च्या इतर सिनेमा पेक्षा इथे अतिशय वेगळे मृदू , मधुर असे संगीत ऐकायला मिळाले . उदा .-बुध्दा मिल गया , नमक हराम , जुर्माना , गोल माल, खूबसूरत , नरम गरम ,बेमिसाल इत्यादी .

त्यांच्या अनेक चित्रपटांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध पुरस्कारांनी नावाजले गेले.

आनंद आणि खूबसूरत या दोन चित्रपटांना फिल्मफेअर सर्वोत्कृष्ठ फिल्म , आणि राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये , अनाडी ,आशीर्वाद ,अनुपमा , सत्यकाम , आनंद या चित्रपटां साठी प्रेसिडेंटस सिल्वर मेडल, तर अनुराधा साठी गोल्ड मेडल मिळाले आहे. (अनुराधा.. बर्लिन फिल्म फेस्टिव्हल मध्ये golden bear पुरस्कार)

त्या आधी विमल रॉय यांच्या बरोबर काम करताना नौकरी, आणि मधुमती या चित्रपटा करता उत्कृष्ट संकलक म्हणुन आणि अनोखी रात करता उत्कृष्ट पटकथा कार म्हणुन सन्मानित केले होते. ऋषिकेश मुखर्जी यांना १९९९ साली दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला तर २००१ साली पद्म विभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले.

१९९८ च्या “ झूठबोले कव्वा काटे “ नंतर त्यांनी चित्र संन्यास घेतला. २७ ऑगस्ट २००६ रोजी ऋषिकेश मुखर्जी हे जग सोडून निघून गेले. परंतु जाताना आपल्यासाठी सदा बहार चित्रपटांचा खजिना सोडून गेले. जवळ जवळ चाळीस वर्षा मध्ये प्रेक्षकांच्या तीन पिढ्यांनी हे ताजे टवटवीत चित्रपट परत परत पहिले आहेत.

Vandana Vinayak Kulkarni
+ posts

Leave a comment