— © विवेक पुणतांबेकर.

‘मोरा गोरा अंग लइ ले मोहे शाम रंग दइ दे’ बंदिनी सिनेमातले हे गाणे कधीही रेडिओ वर लागले की हमखास डोळ्यासमोर येते आपली मराठमोळी, नैसर्गिक अभिनयाने आपल्या ह्रदयात शिरणारी नूतन. चार जून १९३५ साली कुमार सेन समर्थ आणि शोभना समर्थ या दांपत्याच्या घरात वटपौर्णिमा दिवशी नूतन (Actress Nutan) ने जन्म घेतला. गुटगुटीत पण रंगाने सावळी असलेली लहानगी नूतन रात्रभर रडत असे. म्हणून एका ज्योतिषाला तिची पत्रिका करायला सांगितले.  त्याने पत्रिका तयार करुन भविष्य सांगितले हिच्या रुपात एक महान आत्मा जन्माला आला आहे.त्याचे काम बाकी राहिले आहे म्हणून त्याला जन्म घ्यावा लागला आहे. म्हणून तो आत्मा सतत रडत असतो. (Remembering Actress Nutan and Revisiting her Acting Journey in hindi films) 

लाडात वाढलेल्या नूतन ला लहानपणापासून कुत्र्याचे वेड होते. घरात कुत्रा आवश्यक बनला. चेंबूरमध्ये १८ व्या रस्त्यावर शोभना समर्थ यांचा बंगला होता आणि त्यांच्याकडे एकूण वेगवेगळ्या जातीची २० कुत्री होती. फोटो काढून घ्यायची नूतनला विलक्षण हौस होती. अजीबात कँमेरा कॉंन्शस नसे. तसेच लहानपणी तिला नाचाची अतिशय आवड होती. अडीच वर्षाची असताना तिने ताजमहाल हॉटेलमध्ये कार्यक्रम केला होता. चार वर्षाची झाल्यावर. एक्सलसिअर सिनेमा मध्ये केलेल्या नाचाच्या कार्यक्रमा नंतर एकाने तिचा ऑटोग्राफ घेतला आणि तो बरेच वर्षे जपून ठेवला होता.

पेडर रोड येथील आयडियल स्कूल मध्ये शिकत असतानाच नूतन पंडित जगन्नाथ प्रसाद यांच्या कडे शास्त्रीय गाणे शिकली. तसेच मोहनलाल पांडे यांच्या कडे कथ्थक शिकली. सगळ्या भावंडात नूतन मोठी, त्यानंतर तनुजा, मग चतुर आणि धाकटा भाऊ जयदीप. आपल्या भावंडाचे नूतन अतिशय लाड करत असे. नूतन चा पडद्यावर पहिला प्रवेश नल दमयंती सिनेमात झाला. निर्माते ह़ोते छोटूभाई देसाई. अनेक दिग्दर्शक बदल्यावर त्याचे दिग्दर्शन कुमार सेन समर्थ (नूतन च्या वडिलांनी)नी केले. रात्री ची शिफ्ट होती. नूतन चा शॉट आला तेव्हा रात्रीचे अडीच वाजले. पेंगुळलेल्या अवस्थेत वडिल सांगतील तसे शॉट नूतन ने भराभर दिले. कुमार सेन समर्थ चांगले संकलक होते. लहानगी नूतन ते संकलन करत असताना शेजारी बसायची. नूतन चा सिनेमात काम करायचा उत्साह पाहून निर्माते चंदूलाल शहांनी हमलोग सिनेमा ची ऑफर दिली. राज कपूर दिलीप कुमार आणि नूतन अशी स्टारकास्ट ठरली. पण तो प्रोजेक्ट बारगळला. शोभना समर्थ नी नूतन ला लॉंच करायला ‘हमारी बेटी’ सिनेमा निर्माण करायचा निर्णय घेतला. नूतन नायिका असलेल्या या सिनेमात मोतीलाल, डेव्हिड, के.एन.सिंग आणि वीरा यांच्या प्रमुख भुमिका होत्या. सिनेमा पुर्ण व्हायच्या आधी रशेस पाहून नूतन ला ऑफर्स यायला लागल्या. साल होते १९५०. पांचोली चा नगीना, चंदूलाल शहांचा हमलोग (जो नंतर बलराज सहानी ना घेऊन परत सुरु केला) नूतननी स्विकारला. ‘हमारी बेटी’ फ्लॉप झाला.

Actress Shobhana Samarth with daughters Tanuja and Nutan
Actress Shobhana Samarth with daughters Tanuja and Nutan

‘हमलोग’ आणि ‘नगीना’ हिट झाले आणि नूतनकडे निर्मात्यांची रांग लागली. हंगामा, आगोश, शीशम, निर्मोही, परबत, लैला मजनू, शबाब हे सिनेमे नूतन नी स्विकारले पण ते सगळे फ्लॉप झाले आणि नूतनवर अनलकी गर्ल चा शिक्का बसला. शबाब नंतर काही काळ सिनेविश्वापासून लांब जाण्याचा निर्णय नूतननी घेतला आणि ती स्वित्झर्लंडला निघून गेली. तिथे तिने सेक्रेटरियल कोर्स ला प्रवेश घेतला. आठ महिने तिथे राहिल्यावर भारतात परतल्यानंतर एस.मुखर्जी यांच्या हीर सिनेमात नायिकेचा रोल नूतन ला मिळाला. नायक होता प्रदिपकुमार. ‘हीर’ सुपरफ्लॉप झाला. पण या नंतरचा बलराज सहानींबरोबरचा ‘सीमा’ सुपरहिट ठरला. ‘सीमा’च्या भुमिकेसाठी बेस्ट अँक्ट्रेस चे फिल्मफेअर अवॉर्ड नूतन ला मिळाले. इथून नूतनचा ग्राफ वर गेला. ‘सोने की चिडीयाँं’, ‘सुजाता’ असे उत्तमोत्तम सिनेमे नूतन ला मिळत गेले. ‘सुजाता’ मधली सावळी सालस हरिजन तरुणी रंगवताना नूतनच्या संयत अभिनयाचे दर्शन रसिकांच्या कायम लक्षात राहीले. ‘सोने की चिडीया’ मध्ये दोन भिन्न रुपे तिने इतक्या ताकदीने साकारली की पहाताना डोळ्यात पाणी येत असे. 

आता नूतन चे करिअर नीट मार्गी लागले होते. तनुजाला ब्रेक देण्यासाठी शोभना समर्थ नी ‘छबिली’ सिनेमा काढायचा निर्णय घेतला. ‘छबिली’ मध्ये अभिनयाबरोबर दिग्दर्शन आणि संकलन पण नूतन ने केले. इतकेच नाही तर संगीतकार स्नेहल भाटकर यांच्या संगीतात ‘ऐ मेरे हमसफर’ गाणे सुध्दा गायले. ‘छबिली’ आणि ‘छलिया’ चे शूटिंग सुरू असतानाच नौदल अधिकारी रजनिश बहल यांच्या बरोबर लग्न करून सिनेमातून काम करणे बंद करायचा निर्णय घेतला. पण लग्नानंतर लगेचच बिमल रॉय नी ‘बंदिनी’ चा आवाहनात्मक रोल ऑफर केला. नूतन नसेल तर आपण या सिनेमाचा विचार सोडून देणार असे बिमल रॉय नी सांगितले. शेवटी नूतनने भुमिका स्विकारली.

‘बंदिनी’ साठी परत एकदा नूतनला बेस्ट अँक्ट्रेस चा पुरस्कार मिळाला. याच वेळी तिच्या मुलाचा मोहनीशचा जन्म झाला. मुलाच्या जन्मानंतर घर संसार संभाळून जास्तीत जास्त पाच सिनेमात दरवर्षी काम करत असे. शोभना पिक्चर्सने ‘सूरत आणि सीरत’ सिनेमा निर्माण करायला घेतला. नायिका होती नूतन आणि दिग्दर्शक होते नूतन चे यजमान रजनीश बहल. हा प्रयोगात्मक सिनेमा प्रेक्षकांनी नाकारला. एडिंबरो येथल्या चित्रपट महोत्सवात आऊटस्टँंडिंग मेरीट अर्वाड मिळाले पण वितरण नीट झाले नाही. इथेच आर्थिक समस्या सुरु झाल्या. गैरसमजाने शोभना समर्थ आणि नूतन यांच्यात दुरावा झाला. प्रकरण कोर्टापर्यंत गेले. नूतन नी माहेरच्यां बरोबर संबंध तोडले. जवळजवळ वीस वर्षे हा दुरावा होता. नूतन ची आजी आजारी झाली. शेवटच्या अवस्थेत असताना नूतन माहेरी गेली आणि संबंध परत जुळले.

नूतनचा अभिनय सहजसुलभ होता. पडद्यावर गाणे सादर करावे तर ते नूतननेच. माझ्या गाण्याला योग्य न्याय देणारी फक्त नूतन अशी कबुली लतादिदींनी दिली आहे. सीमा, लाईटहाऊस, दिल्ली का ठग, पेईंग गेस्ट , छलिया, दिल ही तो है, अनाडी, कन्हैय्या, मंझिल, बारिश, तेरे घर के सामने, दिल ने फिर याद किया, यादगार, खानदान, गौरी, भाई बहन, देवी, मिलन, मेहेरबान, छोटा भाई, सरस्वती चंद्र अश्या सिनेमातून नूतनचा दमदार अभिनय पहायला मिळाला. नूतन भुमिकेसाठी नेहमीच विशेष तयारी करायची. सरस्वती चंद्र सिनेमात काम करायच्या आधी या कादंबरीचे चारही भाग तिने वाचून काढले होते. ‘छबिली’ आणि ‘सूरत और सीरत’ चे संकलन केल्यामुळे संकलकांच्या समस्या लक्षात घेऊन ती अभिनय करायची. राजश्री पिक्चर्स च्या ‘सौदागर’ मध्ये गूळ बनवणा-या स्री ची भुमिका साकारायच्या आधी मुद्दाम गुळ तयार करणा-यांच्या वस्तीत जाऊन निरीक्षण करणारी नूतन ही एकमेव अभिनेत्री.

 

पंचवीस वर्षाच्या कारकिर्दीनंतर १९७४ साली भारत सरकारने ‘पद्मश्री’ किताब देऊन तिचा सन्मान केला. नूतनची वास्तव्यातली इमेज आणि प्रत्यक्षातली इमेझ यात अजीबात फरक नसल्याने कधीच कोणत्याही हिरो बरोबर तिचे नाव जोडले गेले नाही. संजीव कुमार ने ‘देवी’ सिनेमाच्या वेळी लगट करायचा प्रयत्न केल्यावर नुतनने त्याला कानाखाली सणसणीत वाजवली होती. नूतन अतिशय शिस्तप्रिय आणि वक्तशीर होती. वेळेआधीच सेटवर पोहोचून मेकअप करुन तयार रहात असे. नूतनचा स्वतः चा ऑर्केस्ट्रा ग्रुप होता. म्युझिकल नाईटस् नावाने ती कार्यक्रम सादर करायची. शंकर जयकिशन बरोबर पण तिने जाहीर कार्यक्रम केले होते.

नूतनने अभिनय केलेला एक अप्रतिम सिनेमा ‘मयूरी’ थिएटरमध्ये रिलीज झाला नाही. या सिनेमात चार गाणी नूतन ने लिहिली आणि गायली होती. हा सिनेमा दूरदर्शनवर दाखवला होता. ‘जिंदगी और तूफान’ या सिनेमात नूतनने तवायफ ची भुमिका केली होती. हा सिनेमा फक्त पाकिस्तान मध्ये रिलीज झाला आणि यशस्वी झाला. नूतनचे आणखी एक वैशिष्ट्य होते. एखादा सिनेमा आवडला तर आवर्जून त्या कलाकाराला कळवत असे. ‘३६ चौरंगी लेन’ सिनेमा पाहिल्यावर जेनिफरला आणि अपर्णा सेनला पत्र पाठवून सिनेमा अतिशय आवडल्याचे नूतन ने कळवले होते. नूतन स्वतः फार छान भजनं लिहायची. स्वतः च्या भजनांना सुरेख चाली लावून स्वतः गात असे. सत्संगात जायला लागल्यावर नूतन ला मन:शांती मिळाली.

सगळं स्थिरस्थावर झालं होत. संसार सुखात चालला होता. माहेरी संबंध व्यवस्थित झाले होते. सिनेमात चरित्र भुमिका मिळत होत्या. मुलगा सिनेमात पदार्पण करत होता. नेमक्या अश्या वेळी नूतनला कँंसर झाला. ऑपरेशन करावे लागले. रेडिएशन द्यावे लागले. राहीलेले सिनेमे जमेल तसे पुरे करायला नूतननी सुरुवात केली. १९९१ सालाच्या पहिल्या दिवशी नूतन ला समजले लिव्हरला सूज आहे. सेकंडरी ग्रोथ आहे. केमोथेरपी सुरु झाली. मुलगा मोहनीश आऊटडोअर शूटींगला उटी ला गेला होता. २० फेब्रुवारी ला तब्येत ढासळली. ब्रीच कँंडी हॉस्पिटलमध्ये नूतनला हलवले. मुलाला तातडीने बोलावणे पाठवले. २१ फेब्रुवारीला दुपारी मोहनीश हॉस्पिटलमध्ये पोहोचला. पण पंधरा मिनिटे आधीच दुपारी बारा वाजून सात मिनीटानी नूतन या जगातून गेली. ५४ वर्षे आयुष्य लाभलेल्या नूतनचे आवडते दिग्दर्शक बिमल रॉय कँंसरने गेले आणि नूतन पण कँंसर ने गेली. हा एक विचित्र योगायोग. नूतनजींवर अलिकडेच दिवंगत झालेल्या लेखिका ललीता ताम्हाणेंनी सुरेख पुस्तक लिहीले आहे असेन मी नसेन मी. जरुर वाचा.

 

Vivek Puntambekar
+ posts

Science Graduate from Somayya College in the year 1977.

Started Carrier in Kohinoor Mills in SQC Dept. After the closer of mill, began carrier as a Medical Sales Representative.

Retired as Zonal Sales Manager. Since childhood fond of Films and film music.

Wrote programs for FM Radios. Wrote articles in various Diwali magazines.

Participated in Doordarshan program. Performing an audio visual programs based on Golden era of hindi music.

Regularly writing articles for newspaper. Die hard fan of Raj Kapoor and his entire team.

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

[elfsight_twitter_feed id="4"]

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.