-धनंजय कुलकर्णी

भारतीय चित्रपट सृष्टीत कपूर खानदानाची एक वेगळी ओळख आहे. त्यातील एक  चार्मिंग ‘शशी कपूर ‘ जाऊन आता चार वर्ष झालीयत. आज १८ मार्च . शशीचा जन्मदिन. १८ मार्च १९३८ चा त्याचा जन्म.त्या निमित्ताने त्याच्या कलाजीवनाचा आढावा घेताना मेन स्ट्रीम कम करीत असताना कलात्मक सिनेमा बाबत एक वेगळी ओढ शशी कपूर यांना होती. त्याच्या याच पैलूवर एक नजर!

तीन सुपरस्टार (राजेंद्रकुमार, राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन ) यांच्या लोकप्रियतेच्या कालखंडात स्वत:ला सिनेमानुगनिक सिद्ध करणे त्याला जमू शकले. मल्टी स्टारर सिनेमातही शशीने आपले वेगळेपण यशस्वी करून दाखवले. अमिताभ सोबत तब्बल बारा चित्रपटातून तो चमकला. आणि प्रत्येक वेळी तो अमिताभ समोर कुठेही कमी पडला नाही. ज्यावेळी अमिताभ आणि रेखा हि पेयर यशाच्या शिखरावर होती त्या वेळी जया भादुरीला एका पत्रकाराने खवचट पणे विचारले होते की ‘अमिताभची जोडी सध्या कोणत्या कलाकारासोबत परफेक्ट जमते असे आपल्याला वाटते?’ यावर जयाने प्रश्नकर्त्याच्या कावेबाजपणाला मुत्सद्दी उत्तर दिले ‘ सध्या अमिताभची जोडी परफेक्ट जमते ती केवळ शशी कपूर सोबतच!’ आणि जयाचे विधान अक्षरश: खरे होते. ‘रोटी कपडा और मकान ‘, ’दिवार’,’ कभी कभी ‘, ’इमान धरम ‘, ‘त्रिशूल’, ’काला पत्थर’, ’सुहाग’, दो और दो पांच’, सिलसिला ‘, ’नमक हलाल’, ’शान’, ’अकेला’ या सर्व सुपरहिट सिनेमात हि जोडी होती. त्याच्यावर चित्रित गाणी त्याच्यासारखीच टवटवीत होती. हे सर्व जरी खरे असले तरी त्याच्या इंग्रजी सिनेमा आणि पुरस्कार प्राप्त चित्रपटांवर काहीच लिहिले गेले नाही याची खंत वाटते. शशी कपूरला जागतिक रणभूमी आणि सिनेमा चांगली जाण होती. आणि त्या प्रवाहात त्याने स्वत:ला झोकून दिले होते. लोकप्रिय गोष्टी रसिकांना ठावूक असतात.पण एखाद्या व्यक्तीचे कलावंताचे सर्वांगीण मूल्य मापन करावयाचे असल्यास त्याच्या या गुणी पण काहीशा अप्रसिध्द पैलूवर चर्चा व्हायला हवी.

shashi kapoor and amitabh bachchan
Shashi Kapoor and Amitabh Bachchan in Deewar

पृथ्वीराज कपूर याचं पहिलं प्रेम नाटकावर होतं. या रंगभूमीच्या प्रेमाने ते झपाटलेले असायचे साऱ्या भारतभर त्यांचा दौरा चालू असायचा. पित्याचे हे नाट्यप्रेम शशी कपूर मध्ये उतरले होते. त्याला साथ मिळाली ती त्याची अर्धांगिनी जेनिफरची. तिचे कुटुंब असेच नाट्यप्रेमी. शेक्सपियर च्या नाटकावर अतोनात प्रेम करणारे. या दोन रंगकर्मींची गाठ पन्नासच्या दशकात पडली. प्रेमात पडले आणि विवाहाच्या बंधनात अडकले. जेनिफर मुलच शशीचा कलाकृतीकडे पाहण्याचा पारंपारिकसठी दृष्टीकोन बदलला. व्यावसायिक चित्रपट करताना त्याची नाळ जुळली जागतिक पातळीवरील समांतर आणि साहित्याशी निगडीत अशा चित्रपटांशी. आज त्याच्या अशाच काही अनोळखी पण उत्कृष्ट कलाकृतीवर नजर टाकूया.

१९६१ साली शशीचा पहिला नायक म्हणून असलेला  ‘धर्मपुत्र’ आणि ‘चार दिवारी ‘ हे सिनेमे झळकले. त्याच्या पुढच्याच वर्षी त्याचा पहिला इंग्रजी चित्रपट आला ‘ द हाउस होल्डर’. हा चित्रपट इस्माईल मर्चंट यांनी दिग्दर्शित केला होता. हा सिनेमा रूथ प्रवेर झबवाला यांच्या १९६० साली प्रदर्शित झालेल्या कादंबरीवर आधारीत होता. यात शशीची नायिका लीला नायडू होती. यात दुर्गा खोटे यांची ही भूमिका होती. संगीत उस्ताद अली अकबर खान यांचे होते. सत्यजित रे यांनी या सिनेमा करीता मोलाचे मार्गदर्शन केले होते. रे यांचे  छायाचित्रकार सुब्रता मित्रा यांनीच या चित्राचे छायांकन केले होते. दिल्ली शहरात घडणाऱ्या या चित्रपटाला व्यावसायिक यश भलेही मिळाले नसले तरी जागतिक पातळीवर याचे सर्वत्र कौतुक झाले. १९६५ साली इस्माईल मर्चंट यांच्या ‘ शेक्सपियर वाला’ यां इंग्रजी सिनेमात शशीची नायिका फेलीसिटी कॅंडॉल होती. ( रियल लाईफ मध्ये तिच्या बहिणी सोबत म्हणजे जीनिफार सोबत शशीने लग्न केले !) कॅंडॉल कुटुंब जगभर शेक्सपियर च्या कलाकृतींचे नाट्यप्रयोग करीत असायचे.

shakespeare wallah movie

याच कथानकावर आधारीत या चित्रपटाचे बजेट कमी असल्याने कृष्ण धवल रंगात चित्रित केला होता. यातील शशी ने संजू या गुल छबू तरुणाची भूमिका केली होती. या अमेरिकन  सिनेमाला सत्यजित रे यांचे संगीत होते हे याचे आणखी एक वैशिष्ट्य! १९६७ साली शशी कपूर एका ब्रिटीश फिल्म ‘प्रेटी पॉली‘ मध्ये चमकला. गे ग्रीन यांनी दिग्दर्शित केलेला हा इंग्रजी चित्रपट नोएल कोवर्ड यांच्या प्रेटी पॉली बार्लो या कथेवर आधारीत होता. यात शशी कपूर ची भूमिका अमर नावाच्या सिंगापूर स्थित गाईड ची होती. १९७० साली जेम्स आयव्हरी दिग्दर्शित ‘बॉम्बे टॉकी’ या सिनेमात पहिल्यांदा शशीकपूर आणि जेनिफर नायक – नायिकेच्या भूमिकेत चमकले. मूळ इंग्रजी भाषेत जरी हा चित्रपट असला तरी त्यातील वातावरण मुंबई फिल्मी दुनियेचे असल्याने यात हिंदी गाणी होती. संगीत शंकर जयकिशन यांचे होते. आणि गाणी रफी, आशा, किशोर, उषा उथप यांनी गायली होती. यात अपर्णा सेन आणि उत्पल दत्त या भारतीय कलाकारांच्या भूमिका होत्या.

bombay talkie movie

१९७२ साली हर्मंस हेस यांच्या ‘सिद्धार्थ’ या अमेरिकन चित्रपटात शशी कपूर आणि सिम्मी गरेवाल यांच्या भूमिका होत्या. या सिनेमाचे बव्हंशी चित्रण उत्तर भारतात आणि ऋषिकेश येथे झाले होते .दिग्दर्शन कोनार्ड रूक्स यांचे होते. हा चित्रपट त्यातील न्यूड सीन मुळे खूपच वादग्रस्त ठरला होता. सेन्सोर बोर्डाने यावर मोठे निर्बंध घातले होते. या सिनेमाचा अमेरिका आणि इंग्लंड मध्ये भव्य प्रीमियर झाला होता. १८ जुलै १९७३ साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमाची डीव्हीडी २००२ साली आल्यावर पुन्हा एकादा चर्चेत आला होता पण तोवर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते. ‘सिद्धार्थ’ नंतर पुढची दहा वर्षे शशी कपूर बॉलीवूड मध्ये बिझी राहिला. १९८२ साली पुन्हा इस्माईल मर्चंट, जेम्स आयव्हरी यांच्या ‘हिट अ‍ॅंड डस्ट’ या ब्रिटनच्या सिनेमात शशी कपूरने भूमिका केली. यात त्याच्या समवेत ग्रेटा स्काची, ज्युली ख्रीष्टी यांच्या भूमिका होत्या. या सिनेमात दोन कालखंड दाखविले होते. १९२० सालच्या ब्रिटीश इंडियाचा आणि नंतर १९८० सालचा स्वतंत्र भारताचा. यात शशीची भूमिका नवाबाची होती. हा सिनेमा रूथ प्रवेर झबवाला यांच्या कादंबरीवर आधारीत होता (या कादंबरीला १९७५ सालचा बुकर पुरस्कार प्राप्त झाला होता.) सिनेमाचा स्क्रीनप्ले तिनेच लिहिला होता. व्यावसायिक दृष्टया या सिनेमाला जगभरात व्यापक यश मिळाले. १९८३ सालच्या कांसफिल्म फेस्टिवल मध्ये त्याचा समावेश होता.

junoon movie

या व्यतिरीक्त शशी कपूरने निर्माता म्हणून भारतीय सिनेमाला जे अनमोल योगदान दिले त्यास तोड नाही. १९७८ साली रस्किन बॉंड यांच्या ‘फाइटस ऑफ पिजनस ‘ या कादंबरीवर ‘जुनून’ हा १८५७ च्या बंडाच्या कालखंडावरील सिनेमा शशीकपूरने बनविला. श्याम बेनेगल यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्राला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला होता. ३० मार्च १९७९ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे छायाचित्रण गोविंद निहलानी यांचे तर संगीत वनराज भाटीया यांचे होते.अनेक महोत्सवात दाखविल्या गेलेल्या यां सिनेमाला अनेक पुरस्कार मिळाले होते. १९८१ साली महाभारतावरून प्रेरणा घेवून दोन मोठ्या उद्योग विश्वातील शह काटशहाचे राजकारण दर्शविणार  ‘कलियुग’ हा चित्रपट शशी कपूर  ने बनविला (दि.श्याम बेनेगल). या मल्टी स्टांरर सिनेमात आधुनिक महाभारत फार सुरेख रीतीने दाखविले गेले यात शशीची कर्ण सदृश्य  भूमिका वाखाणण्या जोगी होती. हा चित्रपट १२ व्या मास्को आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखविला गेला. १९८१ साली त्यांची निर्मिती असलेला ’३६ चौरंगी लेन’ हा सिनेमा झळकला. यात शशीची भूमिका नव्हती. यात मुख्य भूमिकेत जेनिफर कॅंडॉल होती. एका अ‍ॅंग्लो इंडियन प्रौढ स्त्रीची भूमिका तिने केली होती. अपर्णा सेन च देखणं दिग्दर्शन याला होतं. या सिनेमाला अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. जेनिफरची भूमिका तिच्या कारकीर्दीचा माइलस्टोन ठरली. १९८२ साली शशी कपूर ने आणखी एका मह्त्वाकांशी सिनेमाची निर्मिती केली. गोविंद निहलानी यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट होता ‘विजेता’. भारतीत हवाई दलाच्या नेमक्या हालचालींचे  अतिशय सुंदर चित्रण यात होते.

vijeta movie

या सिनेमाला अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले. १९८४ साली शूद्रकाच्या ‘मृच्छकटीक‘ या संस्कृत नाटकावर एक भव्य सिनेमा शशीकपूर ने बनविला ‘उत्सव’. गिरीश कर्नाड यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा भलत्याच कारणाने चर्चिला गेल्याने त्याचा नेमका संदेश प्रेक्षकांपर्यंत पोचू शकला नाही. ‘मन क्यू बहका रे बहका ‘ हे आशा-लता चे गाणे यात होते. चारुदत्त च्या भूमिकेत शेखर सुमन तर वसंत सेनेच्या भूमिकेत रेखा होती. १९८४ साली शशीच्या पत्नीचे जेनिफर चे निधन झाले १९८७ साली मोठा भाऊ राज कपूर निघून गेला. शशी कपूरला हे दोन्ही आघात पचविणे खोप कठीण गेले. १९९१ सालच्या ‘अजूबा’ चा अपवाद वगळता त्याने निर्मिती थांबवली. १९८६ साली प्रदर्शित झालेल्या ‘न्यू दिल्ली टाईम्स’ मधील पत्रकाराच्या भूमिकेकरिता राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता तर दिवार करीता फिल्म फेयर चा.

आज शशीकपूर आपल्यात नाही पण त्याच्या कलाकृती आपल्या समोर आहेत. त्याच्या एकूण कलाजीवनाचे दर्शन घडविताना त्याच्या कलाजीवनाचा अनोळखी पैलू रसिकांसमोर यावा या करीता हा लेख प्रपंच.

shashi kapoor with rishi kapoor and amitabh bachchan on the sets of ajooba
Shashi Kapoor with Rishi Kapoor and Amitabh Bachchan on the sets of Ajooba

 

 

 

 

 

Dhananjay Kulkarni
+ posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.