-जयश्री जयशंकर दानवे

इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये जायला निघालेला, सधन घरातला एक तरुण केवळ एका नाटकात काम केल्यावर सिनेमात जाण्याचा निर्णय घेतो ही घटना त्या तरुणाच्या औद्योगिक क्षेत्रात वावरणाऱ्या पित्याला भयंकर-नव्हे तर कलंककारक वाटली होती. त्यांनी म्हणे चिरंजीवांवर बंदूक रोखून त्याची वाट अडवली होती. पण त्या मुलाच्या माऊलीनं पतीची समजूत घालून मुलाचा मार्ग मोकळा करून दिला. ज्या मुलाच्या जीवनात हे नाट्य घडलं ते होते प्रथम खलनायक, नंतर सहनायक आणि नंतर नायक असा प्रवास करून चित्रपट कारकिर्दीस सुरुवात करणारे विनोद खन्ना. त्यांच्या जीवनाचा वादळी म्हणावा की अदभूत म्हणावा असा हा विलक्षण पूर्वार्ध. (Remembering Vinod Khanna)

त्यांनी जवळपास पाच दशके हिंदी चित्रपटसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. पेशावरमधील एका पंजाबी कुटुंबात कमला आणि कृष्णचंद खन्ना यांच्या घरी ६ ऑक्टोबर, १९४६ रोजी विनोद खन्ना (Vinod Khanna) यांचा जन्म झाला. फाळणीनंतर त्यांचे कुटुंब दिल्लीमध्ये राहण्यास गेले. शाळा-कॉलेजच्या दिवसातच त्यांना चित्रपटांची गोडी लागली आणि चित्रपटसृष्टीतच करिअर करायचा निर्णय त्यांनी घेतला. सुनील दत्त या निर्मात्याच्या धाकटया भावाला (सोम दत्त) नायक बनवण्यासाठी चित्रपट तयार होणार होता मन का मीत. त्या परिस्थितीत बॉलीवूडमध्ये प्रवेश मिळवायचा, तर खलनायकी भूमिका पत्करण्याविना विनोद खन्नापाशी दुसरा पर्याय नव्हता. म्हणून १९६८ मध्ये सुनील दत्तच्या ‘मन का मीत’ या चित्रपटाद्वारे खलनायक म्हणून विनोद खन्ना यांनी चित्रपट कारकीर्द सुरु केली. सुरुवातीच्या टप्प्यात ‘आन मिलो सजना, मेरा गांव मेरा देश’ यासारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी तगडा खलनायक रंगवला. चित्रपटाच्या माध्यमातून जेव्हा त्यांनी रुपेरी पडद्यावर प्रवेश केला तेव्हा ते २२ वर्षांचे होते. अंगकाठी बारीक असली तरी त्यांचे रूप लपून रहात नव्हते. १९७१ मध्ये ‘ मेमसाब ’ नावाच्या चित्रपटात विनोद खन्ना नायक म्हणून झळकले. त्यांची नायिका होती योगिता बाली. तसेच १९७१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ हम तुम और वो ’ या चित्रपटातही त्यांना नायक साकारण्याची संधी मिळाली. त्यानंतर नायकाच्या रुपात अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांनी त्यांना पाहिले. विनोद खन्ना यांच्या डोळ्यांमधील भाव, त्यांची संवादशैली आणि राजबिंडे रूप अनेकांना पाहताक्षणी आकर्षित करीत असे.

 

Remembering Vinod Khanna
Vinod Khanna in Mera Gaon Mera Desh

 

सत्तरचे दशक ‘ मल्टीस्टार ’ चित्रपटांचे होते. मुख्य नायकासोबत सहनायक घेऊन चित्रपट निर्माण करण्याचा हा काळ होता. ‘सोलो हिरो’ म्हणून काम करण्यापेक्षा दोन नायकांना एकत्र घेऊन चित्रपट निर्मितीचा फंडा वापरला जात होता. प्राण, अजित, अमजद खान यासारखे खलनायक फार्मात होते. त्यामुळे खलनायक म्हणून बस्तान बसवण्यापेक्षा सहनायक म्हणून स्वत:ची ओळख निर्माण करण्याचे विनोद खन्नांनी ठरविले. अमिताभ बच्चनसोबत ‘अमर अकबर एंन्थोनी, परवरीश, रेश्मा और शेरा, मुक्कदर का सिकंदर, जमीर, हेरा फेरी, खून-पसीना’ यासारख्या चित्रपटांत अमिताभ आणि विनोद खन्ना ही जोडी हिट ठरली. अनेक चित्रपटांत अमिताभ बच्चन आणि विनोद खन्ना यांची जुगलबंदी प्रेक्षकांना पाहायला मिळाली. हे चित्रपट बॉक्स ऑफिसवरही दणक्यात चालले. शतकातील महानायक मानल्या गेलेल्या अमिताभ बच्चन यांचा झंझावात सुरु असताना एक्शनपटात त्यांना तोडीस तोड ठरू शकेल, अशा एकाच एक्शन हिरोची चर्चा चित्रपट रसिकांमध्ये होती ती म्हणजे विनोद खन्नांची.

अमिताभ नावाच्या वादळात आपली वेगळी ओळख टिकवून ठेवण्यात हा अभिनेता यशस्वी झाला होता. अनेक नायक असलेला चित्रपट असला, तरी विनोद खन्ना यांची वेगळी छाप पडत असे. अनेकदा त्यांना सहायक भूमिकाही कराव्या लागल्या, परंतु त्यांचे वेगळेपण लपले नाही. पडद्यावर विनोद खन्ना नेहमी धाडसी, साहसी दिसले. बॉलीवूडमध्ये ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’  हे बिरूद सर्वात आधी विनोद खन्ना यांना लावण्यात आले होते. गुलजार यांच्या ‘मेरे अपने ’मध्ये त्यांनी रंगविलेली श्याम ही व्यक्तिरेखा त्या काळातील तरुणांची प्रातिनिधिक प्रतिक्रिया होती. ‘हत्यारा, दि बर्निंग ट्रेन, लहू के दो रंग’ यासारख्या  मसाला चित्रपटांमध्ये काम करण्याऱ्या विनोद खन्ना यांनी ‘ मेरे अपने, परिचय, अचानक, लेकीन, रिहाई, लीला ’अशा वेगळ्या विषयांवरील चित्रपटातही उल्लेखनीय भूमिका केल्या. अमिताभबरोबरच मनोजकुमार, शशी कपूर, सुनील दत्त, जितेंद्र, राजेश खन्ना, धर्मेंद्र, शत्रुघ्न सिन्हा, ऋषी कपूर अशा आघाडीच्या बहुतेक अभिनेत्यांसोबत त्यांनी काम केले. सुलक्षणा पंडित, हेमा मालिनी, रेखा, श्रीदेवी, माधुरी दीक्षित, अमृता सिंग यांच्यासमवेत त्यांची पडद्यावर जोडी रंगली.

 

विनोद खन्नातला नायक राज खोसला, गुलजार आणि अरुणा-विकास देसाई या दिग्दर्शकांनी ओळखला. ‘मेरा गांव मेरा देश ’ मध्ये विनोदना खलनायक बनवणाऱ्या खोसलांनी ‘कच्चे धागे ’ मध्ये त्यांना ‘एन्टी हिरो’ तर गुलजारनी ‘अचानक’ आणि ‘मीरा’ मध्ये त्यांच्या व्यक्तिरेखांना संवेदनशीलतेचा रंग दिला. विश्वासघातकी पत्नीची हत्या करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्यामधला माणूस दाखवणारे किती तरी प्रसंग ‘अचानक’ मध्ये पाहायला मिळतात. ‘अचानक’च्या आधी ‘मेरे अपने’तून गुलजारनी विनोदमधल्या नायकाची खरी ओळख करून दिली. बेकारीमुळे राजकारण्यांच्या हातातलं बाहुलं बनून जाळपोळ, दंगेधोपे आणि हिंसक उचापती करणाऱ्या तरुणांच्या टोळ्क्यांचे म्होरके म्हणून विनोद खन्ना आणि शत्रुघ्न सिन्हा यांचा प्रेक्षणीय सामना प्रेक्षकांना भावला आणि खलनायकी मागे सोडण्यात विनोदजी यशस्वी झाले.

त्यांनीच स्वत:च्या कर्तृत्वाने त्यांचा खलनायकी प्रवास झटपट संपवला आणि त्याला नायकाच्या राजमार्गावर आणून सोडलं. विनोदजींच्या नजरेत हुकमत होती पण उग्रता आणि दुष्टता नव्हती. ते मूळचा भला, पण परिस्थितीनं गुन्हेगारीकडे वळलेला तरुण म्हणून ऐन्टी हिरोच्या साच्यात चपखल बसले. पोलीस अधिकारी किंवा सैन्याधिकारी नायक असेल, तर विनोद खन्नाना पर्याय नव्हता. चोर-शिपाई या खेळात विनोदजी शिपायाच्या भूमिकेत अधिक वेळा दिसले. विनोद खन्नासारखा अस्सल मर्दानी देखणा चेहरा भारतीय चित्रपटामध्ये कमीच दिसतो. विनोद खन्नाची एखाद्या शिल्पासारखी घडीव, घाटदार शरीरयष्टी आणि रुबाबदार, सतेज व्यक्तिमत्व ही हुकमी अस्त्रं होती. त्यांचं आणखी वेगळेपण म्हणजे त्यांचा क्लास, त्यांचा आब आणि चेहऱ्यावरचं तेज. ‘कच्चे धागे’ मध्ये दरोडेखोर म्हणून दिसणाऱ्या विनोद खन्नाना ‘मीरा’ मध्ये राजपूत राणा म्हणून स्वीकारणं प्रेक्षकांना कठीण गेलं नाही.

शिस्तीचा आणि छडीचा बडगा न उगारता उनाड विद्यार्थ्यांना प्रेमानं सुधारणारा त्यांचा ‘इम्तिहान’ मधला शिक्षक  विश्वासार्ह वाटला. त्यावेळी त्यांच्या नजरेत हुकुमत दिसली नाही; दृढनिश्चय,निर्धार आणि त्या मस्तीखोर मुलांबद्दल विश्वास दिसला. ‘इम्तिहान’ ही ‘टू सर विथ लव्ह’ या गाजलेल्या हॉलीवूडपटाची आवृत्ती होती. विनोद खन्नाचं वेगळं रूप त्या चित्रपटानं दाखवलं हे नाकारता येणार नाही. ते ‘स्टाईल’ मारत नसत. खटकेबाज वाक्यं फेकत नसत. लकबी, हातवारे यांच्या कुबड्या घेत नसत.

 

आपल्या मर्यादा जाणून लक्ष्मणरेखा चुकूनही ते ओलांडत नसत. भूमिका निवडताना त्यांच्यातला स्टार अहंकाराचा फणा काढत नसे. ‘मीरा’ आणि ‘रिहाई’ हे नायिकाप्रधान चित्रपट होते. तरीही त्यांनी या दोन्ही भूमिका स्वीकारल्या. गुलजारनी ‘मीरा’ बरोबरच तिच्या पतीची कथादेखील त्या चित्रपटात सूक्ष्मपणे बोलकी केली आहे. पत्नीला वेळोवेळी समजून घेणारा, राजमाता व धर्माधिकारी यांचा राग पत्करूनही तिला साथ देणारा, पण अखेर राजसत्ता व धर्मसत्ता यांच्यापुढे निष्प्रभ होणारा राणा ‘मीरा’ मध्ये विनोदजींनी अतिशय समर्थपणे रंगवला. अंगभूत रुबाब, आब आणि संयम यांच्या बळावर विनोद खन्नानी राणाच्या भूमिकेला न्याय दिला. ‘परिचय’मधली त्यांची दहा मिनिटांची पाहुणी भूमिकादेखील लक्षात राहते. ‘दि बर्निंग ट्रेन’ आणि ‘राजपूत’ या चित्रपटांमध्येही  त्यांना चांगली भूमिका होती.

 

काही व्यक्तिमत्वे अशी असतात की त्यांची आपण पराभूत, हवालदील अवस्थेत कल्पनाच करू शकत नाही. विनोद खन्नांची पडद्यावरील प्रतिमा ही कोणत्याही आव्हानाला निधडया छातीने सामोरे जाणाऱ्या बेधडक व्यक्तीची होती. त्यांनी हळव्या भूमिका केल्या, प्रेमकथा रंगवल्या, विरहाची गाणीही म्हंटली, तरीही त्यांचा ठसा रगेल, निडर व्यक्ती म्हणूनच प्रामुख्याने उमटला. मर्दानी व्यक्तिमत्व आणि तरीही चेहऱ्यावर मात्र मार्दव असा योग विनोदजींच्या बाबतीत जुळून आला होता. चित्रपटांव्यतिरिक्त क्रिकेट, संगीत, फोटोग्राफी आणि ड्रायव्हिंगची विनोद खन्ना यांना खूप आवड होती. शाळा-कॉलेजात त्यांनी नेहमी खेळांमध्ये भाग घेतला. जिम्नॅस्टिक आणि बॉक्सिंग या खेळांमध्ये त्यांनी यश मिळविले होते. कदाचित या खेळांमुळेच त्यांच्या अंगात झुंजण्याची जिगर निर्माण झाली असावी. सहायक भूमिका असली, तरी त्यांनी ती अशाप्रकारे पार पाडली की, त्यांची वेगळी छाप स्पष्टपणे दिसून आली. अशी रुबाबदार छाप रुपेरी पडद्यावर टाकणारा एक चतुरस्त्र आणि उमदा अभिनेता म्हणजे विनोद खन्ना.    

     प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचण्याच्या क्षणीच विनोद खन्ना आध्यात्मिक मार्ग पत्करून अमेरिकेतील ओरेगॉन येथील ओशोंच्या म्हणजेच रजनीशांच्या कम्युनमध्ये जाऊन राहिले. त्याकाळात विनोद खन्ना यांचे नामकरण ‘विनोद भारती’ असे झाले होते. तेथे त्यांच्यावर बाग कामाची जबाबदारी सोपविली होती. कारण त्यांना बागकामाची विशेष आवड होती. त्यांनी सायनिंग अमाऊंट जेव्हा निर्मात्यांना परत केली तेव्हा त्यांच्या चित्रपट संन्यास घेण्याच्या बातमीने त्यांचे चाहते चकित झाले. तीन वर्षे प्रकाशझोतापासून दूर राहूनही नंतर पुन्हा त्यांनी रुपेरी पडद्याकडे पुनरागमन केले तेव्हा त्यांचं स्वागत झालं. मायदेशी आणि बॉलीवूडकडेसुद्धा. चमत्कार म्हणजे विनोद खन्ना पुन्हा एकदा श्रेष्ठ कलाकारांच्या वर्गात रुबाबानं दाखल झाले आणि त्यांनी नव्याने लोकप्रियता मिळवली.

Remembering Vinod Khanna

संन्यासानंतर ‘ इन्साफ ’ या चित्रपटातून १९८७ मध्ये विनोद खन्ना यांनी बॉलीवूडमध्ये पुनरागमन केले. १९८७ ते १९९४ हा काळ त्यांच्या कारकिर्दीतील सुवर्णकाळ मानला गेला त्यानंतर जवळजवळ त्यांनी ६० चित्रपट केले. उदा:‘ सत्यमेव जयते, जमीन, आखरी अदालत, फैसला, चांदनी, बटवारा, सूर्या, पहचान, महादेव, जुर्म, सी.आय.डी., महासंग्राम, कारनामा, पत्थर के इन्सान, क्षत्रिय, इन्सानियत के देवता, इना-मीना-डिका, क्रांती, दीवानापन, खून का कर्ज, परंपरा, फरिश्ते, हमशकल, निश्चय, पुलिस और मुजरीम, दबंग, दबंग २, प्लेयर्स, दिलवाले, एक थी रानी ऐसी भी ’ इ.   

विनोद खन्ना यांचं व्यावसायिक जीवन आणि कौटुंबिक जीवनदेखील आबादी आबाद होतं. शूटिंग संपल्यावर पार्ट्यांमध्ये रमणं हा त्यांचा विरंगुळा नव्हता. त्यांचं मन वाचनात रमत होतं. शास्त्रीय संगीताचे ते चाहते नव्हे, भक्त होते. शूटिंग संपल्यावर भीमसेन जोशींच्या कार्यक्रमाला ते पुण्याला जायचे आणि मैफल संपली की रातोरात मुंबईला परतायचे. शूटिंगला वेळेवर हजर व्हायचे. आपलं दिमाखदार घर आणि संपन्नता यांचं प्रदर्शन विनोद खन्नानी कधीच मांडलं नाही. शूटिंग संपल्यावर चारचौघांसारखं साधं सरळ आयुष्य जगणारा तो माणूस होता. पण आईच्या मृत्यूनंतर ते अध्यात्माकडे वळले आणि त्यांनी चंदेरी दुनियेला रामराम ठोकला होता. अशी अदभूत घटना हॉलीवूड आणि बॉलीवूड दोघांच्या इतिहासानं पाहिली नसेल.

विनोद खन्नाचं आणखी एक वेगळेपण म्हणजे १९९७ मध्ये त्यांनी आपला मुलगा अक्षय खन्नासाठी ‘ हिमालय पुत्र ’ या चित्रपटाची निर्मिती केली. खासगी आयुष्याबाबत फार न बोलणारे विनोद खन्ना सामाजिक जीवनातही कार्यरत होते. आपण केलेले विधायक कार्य माध्यमांपासून दूर राहावे, यासाठी ते विशेष प्रयत्न करीत होते. गुजरातमध्ये झालेल्या भूकंपानंतर विनोद खन्ना यांनी तेथे मोठया प्रमाणावर मदत दिली होती. मात्र,त्यांची बातमी होणार नाही याची त्यांनी काळजी घेतली. चित्रपटसृष्टी आणि आध्यात्मिक मार्ग यांच्या जोडीलाच विनोद खन्ना यांनी राजकारणातही सहभाग नोंदविला. १९९७ मध्ये पंजाबातील गुरुदासपूर लोकसभा मतदारसंघातून ते विजयी झाले आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये पर्यटनमंत्रिपदही सांभाळले. परराष्ट्र खात्याच्या राज्यमंत्रिपदाची धुराही त्यांच्याकडे देण्यात आली होती. चार वेळा लोकसभेवर ते निवडून आले. २००९ मधील निवडणुकीत त्यांचा पराभव झाला, मात्र २०१४ मध्ये गुरुदासपूर मतदातसंघातून त्यांनी पुन्हा मोठा विजय नोंदविला. कारकिर्दीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये भाजपचे ‘ स्टार प्रचारक ’ म्हणूनही विनोद खन्ना यांनी उल्लेखनीय योगदान दिले. सक्षम राजकारणी म्हणूनही त्यांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली होती.

Remembering Vinod Khanna

     १९७५ मध्ये ‘ हाथ की सफाई ’ चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहनायकाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला तर १९९९ मध्ये ‘ फिल्मफेअर ’ने जीवन गौरव पुरस्कार देऊन त्यांना गौरविले. विनोद खन्ना यांचे निधन २७ एप्रिल २०१७ रोजी झाले. कोणतीही विशिष्ट हेअर स्टाईल, ड्रेस स्टाईल अशा बाह्य घटकावर अवलंबून नसलेल्या विनोद खन्नांचे कर्तृत्व, यश आणि रुबाबदार व्यक्तिमत्व हे इतर नायकांपेक्षा भरीव आणि वेगळं होतं.

‘कोई होता जिसको अपना,हम अपना कह देते यारो’ आणि ‘रुक जाना नही तू कही हार के’ या अविस्मरणीय गाण्यांनी निश्चितच विनोद खन्ना लक्षात राहतील. ‘रुक जाना नही तू कही हार के’ हा त्यांचा जीवनमंत्र त्यांच्या आयुष्यातून दिसून येतो.

jayashree jaishankar danve
Jayashree Jaishankar Danve
+ posts

जयश्री जयशंकर दानवे, कोल्हापूर

   (एम.ए. संगीत विशारद) (ज्येष्ठ लेखिका)

*  ताराराणी विद्यापीठात उषाराजे हायस्कूलमध्ये २३ वर्षे संगीत शिक्षिका म्हणून कार्यरत.

*  निवृत्तीनंतर चरित्रग्रंथ,व्यक्तिचित्रण,कथा संग्रह,ललित लेख अशा विविध विषयांवर आजवर

   ३१ पुस्तके प्रकाशित 

*  ‘कलायात्री’ चरित्रग्रंथाला आजवर १० मान्यवर संस्थांचे पुरस्कार.

*  वैयक्तिक ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ व इतर अनेक पुस्तकांच्या पुरस्काराने पुरस्कृत.

*  नियतकालिके व मासिकातून असंख्य लेख प्रसिद्ध.

*  अनंत माने दिग्दर्शित ‘पाच रंगांची पाच पाखरे’ व ‘पाहुणी’ या चित्रपटासाठी पार्श्वगायन.

*  ‘ड्रीम मेकर्स’ व ‘म्युझिकल नाईट’ ऑर्केस्ट्रात गायिका म्हणून सहभाग.

*  शेगांवच्या गजानन महाराजांच्या जीवनावरील भक्तीगीतांचे १०० हून अधिक कार्यक्रम.

*  समूहगीत,नाटक,नृत्य,बालनाट्य अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचे दिग्दर्शन.

*  गेली ३५ वर्षे ‘नटश्रेष्ठ जयशंकर दानवे’ यांच्या स्मृतीचे जतन तसेच कलायात्री पुरस्काराचे  

   संयोजक म्हणून सहभाग.

Leave a comment