– जयश्री जयशंकर दानवे,कोल्हापूर.

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Remembering Dada Kondke, one of the Iconic and Most Renowned Actor of Marathi Cinema. मराठी चित्रपटसृष्टीचं दालन संपन्न करण्यात मराठी कलाकाराचं मोठं योगदान आहे. कलाकार म्हणून जगताना दिग्दर्शनक्षेत्रही गाजविणारे जे भाग्यवंत आहेत त्यातील एक म्हणजे सदाबहार व्यक्तिमत्व मिळालेले दादा कोंडके. चित्रपटाचा हिरो म्हंटल की, आपल्या डोळ्यासमोर एक रुबाबदार,स्टायलिश हेअरस्टाईल, धिप्पाड अन उंचपुरं व्यक्तिमत्व साकारतं; पण या तथाकथित राजबिंड्या हिरोच्या इमेजला फाटा देत दादांसारख्या कलाकारानं प्रथमच दुसऱ्याचा मागून आणलेला मोठ्या मापाचा ढगळा शर्ट, गुडघ्याखाली येणारी ढगळ हाफ पैंट,लोंबणारी नाडी, घसा खाकारल्यासारखा आवाज, जेमतेम उंची, चेहऱ्यावर निरागस लहान मुलाचे भाव अशा प्रचंड अजागळपणाची साक्ष देणारा बावळट हिरो चित्रपटाद्वारे सादर केला अन अशा नायकावर टंच वाटणारी नायिका भाळते हीच मोठी नवलाची गोष्ट होती.पण दादांच्या रूपावर फक्त नायिकाच भाळल्या नाहीत तर या अवतारावर प्रेक्षकही भाळले. हे जगातले आश्चर्यच म्हणावे लागेल. कारण आजवर चित्रपटसृष्टीने राजकपूर,चार्ली चैप्लीन सारखे निरागस हिरो दिले होते पण तरीही दादांनी चित्रपटात एक प्रकारची क्रांती आणली.

दादांच्या नाट्यमय जीवनाची सुरुवातच झाली ती त्यांच्या जन्मापासून.कृष्णाष्टमीच्या दिवशी म्हणजेच ८ ऑगस्ट १९३२ साली त्यांचा जन्म झाला म्हणून त्यांचं नांव कृष्णा ठेवलं गेलं; परंतु भोईवाड्यातील माणसं त्यांना दादा म्हणू लागली आणि जन्मभरासाठी ‘दादा’ हेच नांव त्यांना चिकटलं. जन्माला आल्यानंतर दादांची प्रकृती थोडी नाजूक होती. त्यामुळे ते दवाखान्यात असतानाच मिलमध्ये काम करणाऱ्या दादांच्या वडिलांना दवाखान्यातून निरोप गेला. हा निरोप मिळताच मूल दगावलं असं समजून वडील, काका आणि त्यांच्यासोबत मिलमधील दोन-अडीचशे कामगार हॉस्पिटलमध्ये हजर झाले. इतकी माणसं बघून हॉस्पिटलचे कर्मचारी चक्रावले. पण मुलगा सुरक्षित होता हे पाहून सर्वजण आनंदले. पुढे वडिलांचे निधन झाले तेव्हा गावाला न जाता तरुण वयातील दादा एकटेच मुंबईला राहिले. आणि त्या काळात त्यांनी अनेक उद्योग केले. स्थानिक गुंडाचा फंटर म्हणून गळ्यात रुमाल बांधून हाणामारी केली, दारूच्या भट्ट्यांची देखरेख केली. बैंड पथकामध्ये वाद्ये वाजवली आणि अपना बाजारच्या दुकानामध्ये सेल्समन म्हणून कामही केले. राष्ट्रीय सेवा दलामध्ये दादा काम करायचे ते शाहीर अमरशेख व अन्य कम्युनिस्ट नेत्यांच्या मिटींग्ज दगडफेक करून उधळून लावण्याचे. परंतु अमरशेख गाऊ लागले की आपण मिटिंग उधळायला आलो हे विसरून दादा गाण्यामध्ये तल्लीन होत असत. बॅंड पथकातून सुरुवात करून हळूहळू वगनाट्ये, नाटके केलेल्या दादांचे चित्रपट जीवन पुढील काळात मेहनतीने साकारले गेले. नाटकांच्या निमित्ताने केलेल्या राज्यभराच्या दौऱ्यांनी दादांना सर्वसामान्यांसाठी करमणुकीचे महत्त्व व कोसा-कोसांवर बदलत जाणारी रसिकता कळली व हेच पुढे त्यांच्या यशाचे गमक सिद्ध झाले.

खऱ्या अर्थाने दादा पहिल्यांदा रंगभूमीवर आले ते ‘विच्छा माझी पुरी करा’ या व्यावसायिक नाटकामधून. संपूर्ण महाराष्ट्रात या लोकप्रिय नाटकाचे दीड हजाराहून अधिक प्रयोग झाले. प्रेक्षकांना खदखदायला लावणारं एखादं उस्फूर्त वाक्य आणि ताज्या घडामोडींवर कोटी करायची दादांची खासियत. नाटकामधील एका दृश्यामध्ये राम नगरकर व दादा यांच्या संवादामध्ये दादा बेहया, बेमुर्वत, बत्तमीज असे शब्द वापरत तेव्हा राम नगरकर त्यांना विचारीत, ‘काय रे,आज इतक्या शिव्या कशाला देतो’ यावर दादा म्हणत, ‘अरे, काय करणार, आज सकाळीच ‘मराठा’ वाचला होता ना !’ १९७५ पर्यंत ते या नाटकाचे प्रयोग करत होते पण जेव्हा देशात आणीबाणी लागू झाली त्यावेळी दादांनी विच्छाचे प्रयोग करणे बंद केले.

नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्ने, अशीच अवस्था दादांच्या पहिल्यावहिल्या चित्रपटाच्या निर्मितीच्या वेळी झाली होती. भालजी उर्फ बाबा पेंढारकरांनी दादांची ‘विच्छा माझी पुरी करा’ हे लोकनाट्याच्या बाजाचं पण प्रचलित परिस्थितीवर, समाजातील ढोंग, बनवेगिरी, पुढाऱ्याची चालूगिरी आणि मंत्री-संत्री यांची खाबूगिरी यावर अचूक बोट ठेवणारं, अनेक ताज्या घटनांच्या संदर्भासह मार्मिक मल्लीनाथी करून ते पाहणाऱ्यांना भरपेट हसविणारं, म्हणूनच सदा-सतेज मुक्त नाटक पाहिलेलं. त्यातील दादा रंगवीत असलेला बेरक्या हवालदार बाबांच्या मनात ठाण मांडून बसलेला.

रुपेरी पडद्यावर दादांचं पदार्पण झालं ते भालजी पेंढारकरांच्या ‘तांबडी माती’ या सिनेमातून. दादा सिनेकलावंत म्हणून घडले ते कोल्हापूरात. चित्रपटासाठी सर्वप्रथम ते कॅमेऱ्यासमोर गेले  कोल्हापूरच्याच जयप्रभा स्टुडीओत. चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांनी  त्यांना आपल्या‘तांबडी माती’ या कुस्तीगिराच्या जीवनावरील अस्सल मराठमोळ्या चित्रपटाद्वारा रुपेरी पडद्यावर पेहेलवान नायकाच्या मित्राच्या महत्वपूर्ण भूमिकेत झळकविलं. दादा सर्वप्रथम रुपेरी पडद्यावर गायिले ते याच तांबडी माती मध्ये. पं.हृदयनाथ मंगेशकर यांच्या भावमधुर आवाजात बैल गाडीवरचं ते गाणं. त्याचे बोल होते  ‘जीवा शिवाची बैलजोडी.’ हे गाणं खुद्द भालजी पेंढारकर यांनीच लिहिलेलं होतं. भालजीबाबा त्यावेळी  योगेशच्या नावाने चित्रपट गीत लिहित. त्यावेळी स्वरश्री लता मंगेशकर यांनी या चित्रपटाला ‘आनंदघन’ या टोपण नावाने संगीत दिलं होतं. म्हणजे दादाचं पडद्यावरचं पहिलं गीत या तिघा मातब्बरांनी सजविलेलं दादांनी पडद्यावर रंगविलं. तरीही दादा कोंडके आणि जयवंत कुलकर्णी हे रसायन काही वेगळंच होतं.

तांबडी मातीच्या अपयशानंतर दादा सिनेनट म्हणून चारी मुंड्या चीत झाल्यामुळे दादांनी निर्णय घेतला पुन्हा सिनेमाच्या वाटेला जाणं नाही. पण त्यानंतर ‘तुम्ही आता सरळ चित्रपट निर्मितीकडे वळायचं. मी तुमच्या पाठीशी आहे.’ असा बाबांनी दादांना आदेशच दिला. त्यामुळे कोल्हापुरात कलानगरीत ते बाबांच्या प्रेरणेने, प्रोत्साहनाने चित्रपट निर्माते आणि नायक बनले. भालजींच्याच सल्ल्यावरून दादांनी ‘सोंगाड्या’ या चित्रपटाची निर्मिती केली. त्यांच्या ‘सोंगाड्या’चा जन्म याच कसदार मातीतला आणि या चित्रपटाद्वारे दादा लोकप्रिय झाले. बाबा दादांना आपला मुलगाच मानत. बाबांनीच ‘सोंगाड्या’ची कथा कल्पना दादांच्या विच्छाचे लेखक वसंत सबनीस यांना सांगून त्यांच्याकडून लिहून घेतली. ‘सोंगाड्या’ मधील भोळाभाबडा नाम्या साकार झाला.नाम्याचा वेष निश्चित झाला. हाफ पैंटमध्ये मी बावळट दिसेन, असं दादाच म्हणाले. पण मग त्यांनी चटकन जीभ चावली कारण खुद्द बाबाच हाफ पैंट वापरीत असत. या चित्रपटात उषा चव्हाणने प्रमुख नायिकेची भूमिका केली. तेव्हा तिच्या नावावर हा एकमेव चित्रपट होता. रत्नमालाबाई प्रथमच याच चित्रपटापासून दादांच्या ‘आये’ बनल्या. पुढं दादांच्या प्रत्येक चित्रपटात ‘हीच’ आये गाजत आणि गर्जत राहिली. या चित्रपटाला राम कदम यांनी संगीत दिलं होतं. या चित्रपटाच्या यशस्वी विक्रमी यशाने मरगळलेल्या मराठी चित्रपटसृष्टीला संजीवनी मिळाली.या चित्रपटाने इतिहास घडविला हे मात्र खरं.

‘सोंगाड्या’ चित्रपट प्रदर्शित झाला तो दादरच्या त्यावेळच्या कोहिनूर थिएटरमध्ये. दोन आठवड्यांनी थिएटरच्या मालकाने ‘सोंगाड्या’ उतरवून देव आनंदचा ‘तेरे मेरे सपने’ लावला. त्यावेळी त्यांच्या मदतीला धावून आले ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे. बाळासाहेबांनी मध्यस्थी करून थिएटरच्या मालकाला हा चित्रपट उतरवण्यास मनाई केली. तेव्हापासून दादा बाळासाहेबांचे मित्र बनले ते कायमचे. शिवेसना-भाजप युतीचं राज्य स्थापित झालं त्यावेळी बाळासाहेबांनी दादा, तुम्हाला कोणती जागा (मंत्रीपद) पाहिजे?’ दादा म्हणाले, ‘मी शिवसैनिकच राहणं पसंत करेन, कारण त्याचा मान सगळ्यात मोठा !’ दादांनी दिलेल्या या उत्तरावर बैठकीला उपस्थित असलेल्या नेत्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला नसला तरच नवल होतं. दादा शेवटपर्यंत कट्टर शिवसैनिक राहिले. शिवसेनेच्या बऱ्याच प्रचार सभांमध्ये दादा हे एक मुख्य आकर्षण असायचे. निवडणुकीच्या प्रचाराची भाषणे करताना दादा विरोधी पक्षाचा खरपूस समाचार आपल्या भन्नाट शैलीत घ्यायचे त्यामुळे या सभांना प्रचंड गर्दी होत होती. आजही दादांची जुनी प्रचार सभेतील भाषणे आवर्जून ऐकली जातात.

सोंगाड्या चित्रपटात त्यांनी नाम्याची भूमिका केली व तोच त्यांच्या जीवनाचा ‘टर्निंग पॉंईंट’ ठरला. ह्या भोळ्या ‘नाम्या’ ने दादांना एका रात्रीत यशाच्या शिखरावर नेऊन ठेवले. पण उभ्या आयुष्यात त्याच ‘नाम्या’ सारखे दादा साधेपणाने वावरले. त्यांच्या सारखा खरोखरचा ‘डाउन टू अर्थ’ नट मिळणे असंभव ! त्यांनी मराठी रसिकांचे मनोरंजन करण्याचा विडाच उचलला.रसिकांच्या मनावर सर्वात जास्त प्रभाव पाडणारी गोष्ट म्हणजे दादांची संवादफेक. आपल्या विशिष्ट संवाद फेकीच्या जोरावर त्यांनी रसिकांच्या हृदयावर राज्य केले. अगदी योग्य टायमिंग साधत हास्याचा पंच मारण्या मध्ये दादांचा हात कोणीच धरू शकत नाही.

दादा कोंडके आणि सेन्सॉर बोर्ड यांचा कायमचाच छत्तीसचा आकडा राहिला. चित्रपटाविषयी वाद निर्माण झाला की मराठी शब्दकोश घेऊनच दादा सेन्सॉर बोर्डाच्या मिटींगला हजर असत. दादांच्या द्विअर्थी संवादांचा सेन्सॉर बोर्डने इतका धसका घेतला होता की, त्यांना दादांच्या प्रत्येक चित्रपटातील संवाद चावट व द्विअर्थी वाटत असत. दादांचे शब्दोच्चार एके ५६ रायफलमधून सुटणाऱ्या गोळ्यांसारखे सुसाट असायचे, पण नेमक्या ठिकाणी पॉज घेतल्याने प्रेक्षक अख्खे थिएटर (मग ते नाटकाचे असो की सिनेमाचे) डोक्यावर घ्यायचे. अभिनयासोबतच त्यांनी प्रामुख्याने मराठी भाषेत तसेच हिंदी आणि गुजराती भाषेतील चित्रपटांची निर्मिती केली.

एखाद्यावर पूर्ण विश्वास कसा टाकावा हे दादांकडून शिकावे. त्यांनी कामाक्षी प्रॉडक्शनची निर्मिती केली आणि त्यांची टीम वर्षानुवर्षे कायम राहिली. त्यात उषा चव्हाण ही अभिनेत्री, राम लक्ष्मण ह्यांचे संगीत, महेंद्र कपूर व उषा मंगेशकर  पार्श्वगायनासाठी तर ‘बाळ मोहिते’ प्रमुख दिग्दर्शन साहाय्यक असत. दादांचे चित्रपट तांत्रिकदृष्ट्या मोठे दर्जेदार होते अशातला भाग नाही. त्यांचे ‘सोंगाड्या, एकटा जीव सदाशिव, आंधळा मारतो डोळा आणि पांडू हवालदार हे चारही चित्रपट कृष्णधवल (ब्लैंक एंड व्हाईट) पण आजच्या रंगाच्या दुनियेत देखील त्यांचा प्रेक्षक कधी कमी झाला नाही. याचं कारण एकच त्यात अगदी तळागाळाच्याही सर्वसामान्याचं भरपूर रंजन होईल असाच रंग भरलेला असे. मग या रंगात यथेच्छ डुंबणाऱ्यांना अन्य सप्तरंगांची आठवण होणार कशी ? फारच थोड्यांना ही किमया साधलेली असते. दादा कोंडके हे नांव त्यात अग्रेसर होते.

१९७२ साली ‘एकटा जीव सदाशिव’ प्रदर्शित झाला. या चित्रपटाची हाईट इतकी झाली होती, की खुद्द राज कपूरने ऋषीकपूरला लॉंच करताना चित्रपटाची तारीख पुढे ढकलली, आणि ‘बॉबी’ पाच महिने उशिरा प्रदर्शित झाला. असे म्हणतात की बॉबी प्रदर्शित करताना राज कपूरला सिनेमागृहांना ‘एकटा जीव सदाशिव’ उतरवण्याची विनंती करायला लागली होती. बॉबी गाजलाच, पण त्यामागोमाग आलेल्या ‘आंधळा मारतो डोळा’ने लाईम-लाईट पुन्हा दादा कोंडकेंवर आणला. पुढील काळात अमिताभ बच्चनच्याही नव्या चित्रपटांचा प्रेक्षक दादांच्या चित्रपटांनी खेचल्याचा अनुभव प्रेक्षकांना आला.

सन १९७३ ला दादा कोंडकेंनी ‘आंधळा मारतो डोळा’ चित्रपट काढला. त्यावेळी सिनेसृष्टीवर भालजी पेंढारकरांचे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून तसेच सिने-नाट्य सृष्टीत खलनायक म्हणून प्रसिद्ध असणारे आणि नाट्यदिग्दर्शक नटश्रेष्ठ जयशंकर दानवे यांना त्यांनी आपले पुतणे विजय कोंडके यांच्याकडून बोलावणे पाठवले. दादांनी दानवेंना त्यांच्या काकाची खलनायकाची मध्यवर्ती भूमिका दिली होती. त्यांचे  हस्तक होते धुमाळ, भालचंद्र कुलकर्णी व गुलाब मोकाशी. या चित्रपटाचे दिग्दर्शक होते प्रभाकर पेंढारकर ऊर्फ दिनेश. या चित्रपटाचा मुहूर्त झाला. तो मुहूर्ताचा शॉट दानवेंच्यावर चित्रित केला होता. दादांच्या निरागस भाबड्या स्वभावाच्या पार्श्वभूमीवर दानवेंचा खलनायकी काका फारच उठावदार झाला होता. दादा त्यांच्या कामावर इतके खुश झाले की त्यांनी दानवेंना या चित्रपटातील कामाबद्दल मानधन किती घेणार हे विचारले तेव्हा ते म्हणाले, ‘‘माझा रोल फारसा नाही. ५००रु. दिलेत तरी पुरेत.’’ हे ऐकताच दादांनी कपाळावर हात मारून घेतला आणि एवढ्या मोठ्या कलाकाराकडून असा अनुभव प्रथमच आला याची कबुली दिली. या चित्रपटात दादा कोंडके आणि रजनी चव्हाण या बहिण –भावाचे काका त्यांची इस्टेट मिळविण्यासाठी सतत त्यांच्यावर कुरघोडी करत असतात. रजनी चव्हाण खिडकीतून पाहात असते आणि  काका दिसताच आपल्या भावाला म्हणजे दादा कोंडकेंना काका आल्याची खूण करते असा शॉट होता. शॉट सुरू होताच दानवेंनी खिडकीतून रजनीकडे पाहून असा काही भयानक लूक दिला की सेटवर रजनी जोरात किंचाळली. कट् कट् असा आवाज झाला. सर्व जण धावत आले तेव्हा ती इतकी घाबरली होती की दादांना तिने विनंती केली, या माणसाला पुन्हा माझ्याकडे पहायला लावू नका, नाहीतर माझे पुढचे काम होणार नाही. सर्व जण सेटवर हसू लागले. तेव्हा दादा कोंडके दानवेंना म्हणाले,‘ ‘वा! नुसते डोळ्यांनी बोलून समोरच्या कलाकाराला तुम्ही घायाळ करू शकता. खरोखरच तुम्हाला अभिनयाची दैवी देणगी लाभली आहे.’’ असे दुसऱ्या कलाकाराचे कौतुक करणारा मनाचा मोठेपणा दादांजवळ होता.

या कृष्णधवल चित्रपटानंतर दादांनी ‘तुमचं आमचं जमलं, राम राम गंगाराम, बोट लावीन तिथं गुदगुदल्या, ह्योच नवरा पाहिजे, आली अंगावर’ हे पाचही रंगीत चित्रपट काढले. ओळीने नऊ रौप्य, सुवर्ण महोत्सवी चित्रपट सादर करण्याचा भारतीय नव्हे तर जागतिक विक्रम दादा कोंडके यांच्या नावावर नोंदविला गेला. त्यानंतर दादांनी ‘मुका घ्या मुका, मला घेऊन चला, पळवापळवी, येऊ का घरात, सासरचं धोतर, वाजवू का ?’ अशा आणखी सहा मराठी चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन केलं. अर्थात त्या सर्व चित्रपटांचे नायक दादाच होते. याच दरम्यान दादांनी आपला मोर्चा हिंदी चित्रपट निर्मितीकडे वळविला.  ‘अंधेरी रात में दिया तेरे हाथ में, आगे की सोच, खोल दे मेरी जुबान’ असे तीन हिंदी चित्रपट निर्माण केले.

१९७५ सालच्या महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवात ‘पांडू हवालदार’ सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला. त्याला अव्वल क्रमांकाचं दादासाहेब फाळके पारितोषिक लाभलं आणि दादा कोंडके त्या वर्षाचे सर्वोत्तम दिग्दर्शक ठरले. आहे की नाही चमत्कार ! लागोपाठ ९ मराठी चित्रपटांच्या रौप्यमहोत्सवी आठवड्यांचे ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ त्यांनी केले. १९७७ साली पांडू हवालदार ह्या मराठी चित्रपटाच्या धर्तीवर “चंदू जमादार” हा गुजराती चित्रपट काढला. ‘पांडू हवालदार’मध्ये दादांनी ‘अशोक सराफ’ या उमद्या कलावंताला संधी दिली. यातूनच दादांची दूरदृष्टी दिसून येते. मराठी चित्रपटाला अत्युच्च उंचीवर नेण्यात दादा कोंडके यांचा फार मोठा वाटा आहे. मराठी कलाकार लक्ष्मीकांत बेर्डे आणि हिंदी चित्रपट अभिनेता गोविंदा हे दादांच्या अभिनयानेच प्रेरीत होऊन त्यांच्यासारखी नक्कल करण्याचा बरेचदा प्रयत्न करत असत. उषा चव्हाण या अभिनेत्रीने दादांसोबत जास्तीत जास्त चित्रपट केले. १९९४ साली प्रदर्शित झालेला ’सासरचं धोतर’ हा दादांचा त्यांनीच निर्मीती केलेला अखेरचा सिनेमा होता.

या सर्व नटांपेक्षा दादा कोंडके यांच्या नायकाची जातकुळीच वेगळी होती. एक तर वयाच्या ४२ व्या वर्षी ‘सोंगाड्या’ बनून रुपेरी पडद्यावर चमकलेले दादा सत्तरी उलटली तरीही हिरो म्हणूनच चंदेरी पडद्यावर मोठ्या उत्साहाने वावरत होते आणि गर्दीही खेचीत होते. सतत २८ वर्षे लोकप्रियतेच्या लाटेवर विराजमान झालेले दादा मराठीतील एव्हरग्रीन हिरो होते. दादांच्या श्वासातच चित्रपट होता. अष्टौप्रहर ते आपल्या चित्रपट निर्मितीचाच विचार करीत असत. पानाव्यतिरिक्त अन्य कसलंच व्यसन त्यांना नव्हतं. मित्रमंडळीत मैफल जमवून गप्पा मारणं आणि टेलिफोनवरून तासनतास बोलणं ही त्यांची व्यसनं. त्यांना शिकारीचाही नाद होता. ‘ढगाला लागली कळ’ या रिमिक्समुळं आजही आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजत असलेल्या त्यांच्या सदासतेज गीतासह त्यांच्या गाजलेल्या अनेक गीतांचा जन्म अगदी चालीसह याचं शिकारीच्या धामधुमीत जंगलात झालाय. सत्तरच्या दशकाचा विचार केला तर प्रेक्षकवर्गाला पसंत पाडणारी गीतं लिहिण्यात दादांचा हातखंडा होता. मराठी चित्रगीतांना खऱ्या अर्थानं ‘पॉप’ चा अंदाज देण्याचं काम दादांच्या गीतांनी केलं. त्यांच्या गीतांचा रंगच वेगळा.कवितेपेक्षा बोलीगाणी म्हणजे काय याचा सुंदर साक्षात्कार दादांच्या गीतांमधून जाणवायचा.

उदा: ‘गंगू तारुण्य तुझं बेफाम,

शंभराची नोट माझ्या हातामंदी दे,

गालावरची खळी तुझ्या,

ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळं,

चंदनाच्या पाटावर सोन्याच्या ताटामधी,

काल रातीला सपान पडलं,

काय गं सखू ? काय गं सखू ? बोला दाजीबा,

नको चालूस दुडक्या चाली,

लबाड लांडगं ढ्वांग करतंय,

मुंबईची केळीवाली,

माळ्याच्या मळ्यामध्ये कोन गं उभी,

मी तर भोळी अडाणी ठकू,

राया मला पावसात नेऊ नका,

अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान,

आई माझ्या लग्नाची गं,

राया चला घोड्यावरती बसू,

गेला सोडून मजसी कान्हा,

आला महाराजा सोबत बैंडबाजा,

खिडकीत वाकून पाहू नका,

अहो नाना करू नका हो चावटपणा,

मला एक चानस हवा,

चल रं शिरपा देवाची किरपा,

हिल हिल पोरी हिला तुझ्या कप्पाळीला टिळा,

झाल्या तिन्ही सांजा करून सिणगार माझा’

अशी कितीतरी हिट गाणी दादांनी दिली होती. आजही ही गाणी त्या काळाएवढी प्रसिद्ध आहेत.

शहरातील मराठी प्रेक्षक ज्यावेळी रंगीत हिंदी चित्रपटांकडे वळला होता तेव्हा दादांच्या चित्रपटांनी तो प्रेक्षक परत मिळविला. कारण त्यांचे विनोदी चित्रपट ग्रामीण आणि शहरी अशा दोन्हीकडच्या प्रेक्षकांना रंजविणारे, खुश करण्याची ताकद असणारे होते. म्हणूनच त्यांच्या चित्रपटांनी हिंदी चित्रपटांशी जोरदार स्पर्धा करून मराठी चित्रपटांचं अस्तित्व टिकविण्याचं मोलाचं काम केलं. मराठी चित्रपट ‘हाऊसफुल्ल’ होतो हा चमत्कार केवळ दादा कोंडकेच करू शकले. दादा कोंडके हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. व्हाईट कॉलर्ड (पांढरपेशा) वर्गाला त्यांच्या  विनोदांनी त्यांच्या सिनेमांपासून दूरच ठेवले. पण पिटातल्या प्रेक्षकांनी त्यांना डोक्यावर उचलून घेतले त्यानेच त्यांची कारकीर्द यशस्वी झाली. द्विअर्थी विनोदाकडे झुकणारे संवाद, चित्रपटातल्या तारिकेशी पडद्यावरची घसट व ह्या सर्वामुळे सतत सेन्सॉर बोर्डाशी उडणारे खटके/वादंग ह्यांनी त्यांच्या चित्रपटांना सतत निगेटिव्ह प्रसिद्धी मिळत राहिली……. पिटातल्या प्रेक्षकांना ह्या सर्वाशी काही देणे घेणे नव्हते. दादांचा प्रेक्षक वर्ग ठरलेला असे. नवे नवे विनोदी प्रसंग खुलविण्याचं काम दादा मोठ्या खुबीने खूप मेहनतपूर्वक करीत असत. दादा कोंडके यांचे जनमाणसातील अढळस्थानच याला कारणीभूत आहे.

नागरी कुटुंबांचे प्रश्न, युवकमनाचे प्रश्न, स्त्रियांचे, दलित-पीडितांचे प्रश्न इत्यादींची धावती छटाचित्रे एका हलक्याफुलक्या विनोदाच्या पातळीवर दादांच्या चित्रांनी उभी केली आणि तरीही सामाजिक-राजकीय दृष्ट्या अत्यंत प्रक्षोभक कालखंडात त्यांच्या चित्रांना प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. मराठीच्या समस्याप्रधान चित्रपरंपरेत किंवा शहरी कुटुंबकथांच्या परंपरेत भर टाकण्यापेक्षा या दोन्ही परंपरांना अज्ञात असलेला एक नवाच प्रवाह दादांनी सुरू केला. लोकरंगभूीवर ज्या तमाशाने किंवा लोकनाट्याने आपला गाशा गुंडाळून ठेवला होता, त्या लोककलेचे दादांनी रुपेरी पुनरुज्जीवन घडवून आणले. म्हणूनच मराठी चित्र इतिहासात दादांच्या निर्मितीला एका सदाहरित पण बेटासारख्या प्रेक्षणीय पर्यटनस्थळाचे स्थान आहे. दादांचा उद्देश केवळ चार घटका मनोरंजनाएवढाच होता.

आयुष्यभर त्यांनी प्रेक्षकांना हसवलं आणि गेल्यानंतरही प्रेक्षकांच्या मनामध्ये विनोदाचा ‘दादा’ अशीच स्वत:ची प्रतिमा कायम ठेवून गेले. प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणारा, त्यांना खळखळून हसवणारा हा अवलिया १४ मार्च १९९८ ला सिने-नाट्य सृष्टीला सोडून गेला. 

मराठी चित्रपटसृष्टीच्या ७० च्या दशकापर्यंतच्या  माहितीपूर्ण लेखांसाठी क्लिक करा 

मराठी चित्रपटसृष्टीच्या ८० च्या दशकानंतरच्या माहितीपूर्ण लेखांसाठी क्लिक करा 

jayashree jaishankar danve
Jayashree Jaishankar Danve
+ posts

जयश्री जयशंकर दानवे, कोल्हापूर

   (एम.ए. संगीत विशारद) (ज्येष्ठ लेखिका)

*  ताराराणी विद्यापीठात उषाराजे हायस्कूलमध्ये २३ वर्षे संगीत शिक्षिका म्हणून कार्यरत.

*  निवृत्तीनंतर चरित्रग्रंथ,व्यक्तिचित्रण,कथा संग्रह,ललित लेख अशा विविध विषयांवर आजवर

   ३१ पुस्तके प्रकाशित 

*  ‘कलायात्री’ चरित्रग्रंथाला आजवर १० मान्यवर संस्थांचे पुरस्कार.

*  वैयक्तिक ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ व इतर अनेक पुस्तकांच्या पुरस्काराने पुरस्कृत.

*  नियतकालिके व मासिकातून असंख्य लेख प्रसिद्ध.

*  अनंत माने दिग्दर्शित ‘पाच रंगांची पाच पाखरे’ व ‘पाहुणी’ या चित्रपटासाठी पार्श्वगायन.

*  ‘ड्रीम मेकर्स’ व ‘म्युझिकल नाईट’ ऑर्केस्ट्रात गायिका म्हणून सहभाग.

*  शेगांवच्या गजानन महाराजांच्या जीवनावरील भक्तीगीतांचे १०० हून अधिक कार्यक्रम.

*  समूहगीत,नाटक,नृत्य,बालनाट्य अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचे दिग्दर्शन.

*  गेली ३५ वर्षे ‘नटश्रेष्ठ जयशंकर दानवे’ यांच्या स्मृतीचे जतन तसेच कलायात्री पुरस्काराचे  

   संयोजक म्हणून सहभाग.

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

Twitter

[elfsight_twitter_feed id="4"]

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2024. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2024. All rights reserved.