सुप्रसिद्ध नाट्य, टीव्ही व सिनेअभिनेते व दिग्दर्शक विनय आपटे यांचा आज स्मृतिदिन. अभिनयातील सहजता व आवाजातील भारदस्तता म्हणजे विनय आपटे. रंगभूमी, दूरदर्शन व सिनेमा या तिन्ही क्षेत्रात काम केलेलं असलं तरी विनयजींचे पहिले व शेवटचे प्रेम हे रंगभूमीच होते. विद्यार्थी दशेत रंगभूमीवर काम करण्यास सुरुवात केली. नेपथ्य व दिग्दर्शनाची आवड होतीच. राज्यनाट्य स्पर्धांमध्ये भाग घेतला व सलग तीन वर्षे राज्यनाट्य स्पर्धेत दिग्दर्शनाचे पारितोषिक पटकावले. छबिलदासच्या प्रायोगिक नाटकांतूनही सुरुवातीला त्यांनी अभिनय केला होता. मुंबईत दूरदर्शनची सुरुवात झाल्यानंतर त्यांनी अनेक वर्ष नाटक विभाग सांभाळला. ‘गणरंग’ ही व्यावसायिक नाटकांची निर्मिती करणारी संस्थाही स्थापन केली होती. ‘मी नथुराम बोलतोय’ व ‘कुसुम मनोहर लेले’या बहुचर्चित आणि गाजलेल्या नाटकांचे दिग्दर्शन त्यांनी केले होते.
‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘दुर्वा’ या मालिकेत व काही हिंदी मालिकांमध्येही त्यांनी काम केले होते. तसेच त्यांनी ‘गांधी’, ‘सत्याग्रह’, ‘चांदनी बार’, ‘धमाल’, ‘आंदोलन, ‘एक चालीस की लास्ट लोकल‘, ‘सत्याग्रह‘, ‘आरक्षण‘, ‘राजनीती‘ यासारख्या हिंदी चित्रपटात भूमिका केल्या. ‘दुसरा सामना’, ‘वन रूम किचन’, ‘चंद्र जिथे उगवत नाही’, ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’, ‘रानभूल’, ‘कबड्डी कबड्डी’, ‘डॅडी आय लव्ह यू’ ही त्यांनी काम केलेली काही गाजलेली नाटके होती. भारदस्त आवाजाच्या देणगीमुळे कित्येक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन तर केलेच शिवाय कित्येक जाहिराती व माहितीपटांसाठी आपला आवाज विनयजींनी दिला होता.
आजच्या दिवशी, ७ वर्षांपूर्वी, म्हणजे २०१३ साली विनय आपटे यांचे हृदयविकाराच्या त्रासाने निधन झाले.
विनय आपटे यांना विनम्र आदरांजली.