-जयश्री जयशंकर दानवे, कोल्हापूर

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

यश चोप्राजी म्हणजे रोमैन्टिक चित्रपटाचे जादूगार. त्यांच्याबद्दल  म्हणावसं वाटतं…..

लम्हे लम्हे चलता रहा बस्स यहीं सिलसिला, धूल का फूल  दिवार पर अलग तरहसे खिला

वक्त के त्रिशुल से पडा जब कभी साहस ढिला, बढा तुरंत लेकर मशाल जीवन जोशीला

कभी कभी तो इत्तफाक से दाग भी मिले, लम्हे लम्हे चलता रहा बस्स यहीं सिलसिला

कभी राह में टकराया जब काला पत्थर, छोड दिया तब परंपरा का सारा ही डर

कोशिश रण में इतनी ऐसी जोर की बनी, मिली विजय फिर बिखर गयी हर जगह चांदनी

मिटे आदमी और इन्सान के सभी फासले, लम्हे  लम्हे चलता रहा बस्स यहीं सिलसिला

     यश चोप्रा (Director Yash Chopra) असं नुसतं नाव उच्चारलं तरी डोळ्यासमोर अतिशय सुंदर, मनोहारी, निसर्गदृश्य तरळू लागतात. कधी स्वित्झर्लंड तर कधी पंजाब मधील ती रमणीय दृश्य असतात. क्षितिजापर्यंत जाणारी झाडे, उंच पर्वतांच्या रांगा, लांबच लांब पसरलेली ट्युलीपची फुले, बर्फाच्छादित वातावरण तर कधी हिरवीगार शेतं, विस्तीर्ण शेतातून जाणारी आडवळणी वाट, या वाटेवर बसलेले शेतकरी, शेतातून वाहणारे पाट, पंजाबी लोकगीतं गाणाऱ्या रंगीबेरंगी चुनरी पहेनलेल्या सुस्वरूप स्त्रिया, आकाशातून चित्राकृतीत विहरणारे स्वच्छंदी पक्षी, अशा शोभिवंत दृश्यात अतिशय मधुर गीतासह तरल रोमान्स करणारे आपले आवडते नायक व नायिका. एकूणच अशी दृश्ये पडद्यावर पाहताना डोळे खिळून राहतात आणि मन एका वेगळ्याच रसिकतेने, भावनेने हळुवार होते, प्रसन्न होते आणि रोमान्सचा बादशहा यश चोप्रांची आठवण येते. (Remembering Director Yash Chopra Hindi Cinema’s King of Romantic Films) 

     प्रेमाचा अनभिषिक्त सम्राट या नात्याने त्यांनी रसिकांना चित्रपटाच्या माध्यमातून प्रेमाची भाषा समजावून सांगितली. ज्यांचं मन अखेरपर्यंत हिरवं टवटवीत राहिलं त्या यशजींनी प्रेम हेच जगातील अंतिम शाश्वत सत्य आहे हे प्रेक्षकांच्या मनावर बिंबवलं आणि हेच यश चोप्रांच्या यशाचे गमक होय. प्रगल्भ प्रेम असो वा तरुणाईच्या धुंदीतलं प्रेम असो अतिशय कल्पक दिग्दर्शक म्हणून त्यांनी ते प्रेम अत्यंत उत्कटपणे आणि उत्कृष्ट पद्धतीनं आपल्या चित्रपटातून चित्रित केलं. कॅमेराच्या चौकटीत अभिनयासह अप्रतिम दृश्ये बंदिस्त करून रसिकांना भुलवणारे जादुगार दिग्दर्शक म्हणजे यश चोप्रा.

     यश चोप्रांचा जन्म २७ सप्टेंबर १९३२ ला पंजाबमधील लाहोरमध्ये झाला. बी.आर.चोप्रा, धरम चोप्रा, राज चोप्रा, यश चोप्रा आणि हिरू जोहर (धर्मा प्रोडक्शनच्या  यश जोहरची पत्नी तसेच निर्माता व दिग्दर्शक करण जोहरची आई) अशा भावंडातील यश शेंडेफळ होते. त्यांचे पूर्ण नाव यशराज. पण त्यांनी यश चोप्रा नावाला आपलंस केलं. त्यांचे शिक्षण लाहोरमध्येच झाले. १९४५ मध्ये त्यांचे कुटुंब पंजाबच्या लुधियाना मध्ये राहू लागले. यश चोप्रा इंजिनिअर बनण्याची इच्छा मनात घेऊन मुंबईत आले. ते शिक्षणासाठी लंडनला जाणार होते पण त्यांचे थोरले भाऊ बी.आर.चोप्रा तोपर्यंत मुंबईला सिनेसृष्टीत प्रस्थापित झाले. बी.आर. चोप्रा हे उंचेपुरे, सणसणीत देहयष्टीचे तर यश चोप्रा त्यांच्याइतके उंच नसले तरी कर्तृत्वाच्या नव्या उंचीला गवसणी घालणारे त्यांचे धाकटे बंधू होते. या भांवडांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. बी.आर.नी मुंबईत प्रस्थापित होतानाच आपल्या सर्व भावंडांना संधी दिली. धरम चोप्रा हे सिनेमा फोटोग्राफर झाले. त्यांच्या कॅमेऱ्यात जादू होती आणि यशजी बी.आर.चे सहाय्यक म्हणून काम करू लागले. त्या वेळी बी.आर.चोप्रांनी बी.आर. फिल्म्सच्या बैनरखाली ‘धूल का फूल, धर्मपुत्र, आदमी और इन्सान ,इत्तफाक’ हे चित्रपट निर्माण केले. हे चित्रपट त्यांनी यशजींना दिग्दर्शित करण्यास दिले.

     यशजींचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट १९५९ चा ‘धूल का फूल’. ‘धूल का फूल’ हा चित्रपट एका अशा मुसलमानाची कहाणी होती जो एका पोरक्या मुलाला सांभाळतो पण तो मुलगा हिंदू निघतो. चोप्रा परिवाराने फाळणीच्या वेळी धार्मिक खूनखराबा बघितला होता. त्याचाच हा परिणाम होता. यातील ‘तू हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा’ हे गाणं त्यातूनच उपजलं असावं. या चित्रपटात हिरो राजेंद्रकुमारला ग्रे शेडमध्ये प्रदर्शित करण्याचं धाडसही यशजींनी केलं. खरं तर बी.आर.चोप्रांना राजेंद्रकुमार ऐवजी राजकुमार हवा होता पण पहिल्यांदा दिग्दर्शन करण्याऱ्या यश चोप्रांबद्दल राजकुमारने संशय घेतला होता. त्यामुळे राजेंद्र कुमारला संधी मिळाली.हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. १९६१ च्या ‘धर्मपुत्र’ मध्येही फाळणीच्या वेळचा धार्मिक उन्माद होता. कट्टर हिंदूच्या रोलमध्ये शशी कपूरकडून यशजींनी उत्तम काम करवून घेतले. या चित्रपटाला खूप प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटाला राष्ट्रीय पारितोषिकही मिळाले.त्यांनी प्रत्येकवेळी हटके प्रयोग केले अन ते यशस्वीही ठरले.

     १९६५ च्या ‘वक्त’ मध्ये बी.आर. आणि यशजींनी चित्रपटांसाठी खूप मोठमोठे सितारे एकत्र आणले.  आपल्या सिनेमा क्षेत्रातील हा पहिला मल्टीस्टार चित्रपट. बलराज सहानी, अचला सचदेव, राजकुमार, सुनील दत्त, साधना, शशी कपूर, शर्मिला टागोर, रहमान, मदनपुरी, जीवन इतक्या कलाकारांना एकत्र आणणे, त्यानुसार कथा रचणे, पटकथा गुंफणे हे दिग्दर्शक म्हणून यशजींनी कौशल्याने पार पाडले. त्यांनी या प्रत्येक कलाकारांच्या प्रतिमेचा चपखलपणे वापर केला. लहानपणी भाऊ भाऊ एकमेकांपासून दुरावणे आणि शेवटी बिछडलेले भाऊ एकत्र आणणे हा एक नवीन ट्रेंड यशजींनी चित्रपटात आणला. ‘वक्त’ मध्ये lost & found चा फॉर्म्युला असला तरी त्या चित्रपटातील दृश्यांची अशी गुंफण केलेली आहे की कोणीही चित्रपटाचे एकही दृश्य सोडत नाही. एक जरी दृश्य सुटले तरी त्या चित्रपटाची मजाच राहात नाही अशी दृश्यांची गुंफण केलेली होती.

     १९६९ चा ‘इत्तफाक’ ही त्यांची एक्स्प्रीमेंटल फिल्म होती. ही एक रहस्यमय कलाकृती होती. २८ दिवसात बनलेला हा चित्रपट म्हणजे एक मर्डर मिस्ट्री होती. यात एकही गाणे नव्हते. चित्रपटाच्या कथेत सलगतेची अवश्यकता होती. पण त्याकाळी मध्यंतराशिवाय चित्रपटगृहात चित्रपट लावणे शक्य नव्हते. तेंव्हा यशजींनी २० मिनिटांची एक डॉक्युमेंटरी तयार केली. ती सिनेमाच्या सुरुवातीला दाखवली जात असे आणि नंतर मध्यांतर होऊन सलग ‘इत्तफाक’ हा चित्रपट दाखवला जात असे. या चित्रपटाच्यावेळी राजेश खन्ना नवीन कलाकार होता आणि नंदा ग्रे शेड मध्ये होती. हा चित्रपट प्रेक्षकांना खिळवून ठेवत असे. त्यामुळे चित्रपट खूप चालला.

     १९७० मध्ये यश चोप्रांनी एक मोठा निर्णय घेतला. मोठ्या भावाबरोबर अनेक हिट चित्रपट दिल्यानंतर स्वत:चं प्रोडक्शन असावं असं यशजीना वाटणं स्वाभाविक होतं. कारण गरुडाला पंख फुटले की, त्याला अंगणातलं आभाळ ठेंगण वाटायला लागतं. त्यांनी  बी.आर. चोप्रांपासून वेगळे होऊन ‘यशराज फिल्म्स’ ची स्थापना केली. ही गोष्ट बी.आर.ना फारशी रुचली नाही परंतु यशजीनी सिनेसृष्टीत उत्तरोत्तर जसजसी स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण केली तसतसा बी.आर.ना त्यांचा अभिमान वाटू लागला. भावापासून वेगळे होऊन चित्रपट करण्याची जोखीम यशजींनी घेतली. हे वेगळे पाऊल उचलले आणि २७ एप्रिल १९७३ ला ‘यशराज फिल्म्स’ चा पहिला चित्रपट प्रदर्शित केला ‘दाग’.

दाग मध्ये एक व्यक्ती जिच्या दोन पत्नी आहेत अशी प्रेमकहाणी चित्रित करताना सामाजिक नैतिकतेचे भान जपणे फार अवघड काम होते. हा त्यांचा पहिलाच दिग्दर्शित चित्रपट होता आणि राजेश खन्ना, शर्मिला, राखी हे मोठे कलावंत त्यात होते. यशजींनी पहिल्यांदा त्यांनाच  साईन केले होते. पण यशजींना शुटींगसाठी स्टुडिओ मिळेना. जर वेळेवर शुटींग झालं नसतं तर त्यांचं बजेट कोलमडल असतं.कदाचित दिग्दर्शक म्हणून त्यांची कारकीर्द आकाराला आली नसती. ते हताश झाले तेव्हा चित्रपती व्ही.शांताराम यांनी या दाग चित्रपटासाठी या नवोदित दिग्दर्शकाला परळच्या राजकमल स्टुडीओचे दरवाजे सताट उघडून दिले. हे व्ही. शांतारामांचे सहकार्य यशजी आयुष्यात विसरले नाहीत म्हणूनच दाग पासून त्यांनी आपल्या प्रत्येक चित्रपटाचा काही भाग आवर्जून राजकमल स्टुडीओमध्ये शूट केला.

 

     त्यानंतर गुलशन रॉय यांच्या त्रिमूर्ती फिल्म्सच्या बैनरखाली यशजींनी तीन चित्रपट दिग्दर्शित केले. १९७३ साली ‘जोशीला’, १९७५ साली ‘दिवार’ आणि १९७८ साली ‘त्रिशूल’. विजय आनंदने काही कारणास्तव नाकारलेला जोशीला त्यांनी  स्वीकारला आणि त्यांना देव आनंदला दिग्दर्शित करण्याची संधी मिळाली. या चित्रपटाची कथा एक कवयित्री एका अपराधी नायकाच्या प्रेमात गुरफटते अशी होती. यात देव आनंद, हेमामालिनी, राखी, प्राण असे कलाकार होते. संगीत आर.डी. बर्मन यांचे होते. यातील गाणी खूप गाजली. त्यानंतर स्वत:च्या यशराज फिल्म्सच्या बैनरखाली त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपट दिग्दर्शित केले. ‘ कभी कभी,काला पत्थर, सिलसिला, मशाल, फासले, विजय, चांदनी, लम्हे, परंपरा, डर, दिल तो पागल है, वीर झारा आणि जब तक है जान’ इ.

     मानवी नाते संबंधांचा अभ्यास करणारा हा दिग्दर्शक होता. त्यामुळे त्यांनी माणसांमाणसांतील नाती, संबंध, तणाव, भावनिक अंतर यांना आपल्या प्रत्येक चित्रपटातून अतिशय उत्तमरीत्या हाताळल्याचे दिसून येते. १९७५ च्या ‘दिवार’ मध्ये विजय (अमिताभ) आपला भाऊ रवी (शशी कपूर) आणि आई (निरूपा रॉय) यांना जुहू येथील आपले प्रशस्त घर दाखवायला आणतो. त्यावेळी त्याला वाटते की,आईने आपल्या अलिशान घरात राहावे. तेंव्हा रवी म्हणतो, ‘मां मेरे पास रहेगी’. आईला सुद्धा विजयने वाईट मार्गाने उभे केलेले ते साम्राज्य मान्य नसते आणि ती रवीपाशीच राहते. या चित्रपटात मैलाचा दगड ठरावेत असे भावनोत्कट प्रसंग आहेत. विजय भावाला म्हणतो, ‘मेरे पास गाडी है,बंगला है, बँक बैलन्स है, क्या है  तुम्हारे पास?’ असा विजयचा शेवटचा घाव बसतो आणि या नाट्यपूर्ण प्रसंगात त्याची सरशी होणार असे वाटत असतानाच रवी केवळ चार शब्द उच्चारतो, ‘मेरे पास मां है..’ हा अल्प संवाद साकारताना शशी कपूर यांनी मुद्रभिनायात डोळ्यांचा चेहऱ्याचा वापर इतक्या उत्कटपणे केला आहे की, आईची थोरवी कुठल्याही संपत्तीशी जोडता येत नाही हे त्यांनी एकाच वाक्यात अतिशय कौशल्याने मांडले.दिवार मुळे केवळ अमिताभचीच नव्हे तर शशी कपूरची प्रतिमा सुद्धा अधोरेखित झाली याला कारण सलीम-जावेद यांची लेखणी आणि यशजींचे दिग्दर्शन. या चित्रपटात थेट गुंडांच्या साम्राज्यात जाऊन ‘ तुम मुझे वहां ढूंढ रहे थे और मै तुम्हारा यहां इंतजार कर रहा था ’ असा आव्हान देणारा यशजींचा अमिताभ प्रेक्षकांना आवडून गेला.

     यशजींची कमाल ही होती की, एकाचवेळी वेगवेगळ्या मिजाजचे चित्रपट ते एकाच वेळी दिग्दर्शित करत होते. उदा: १९७५ चा दिवार आणि १९७६ चा कभी कभी. अमिताभला घेऊन दिवार एक एक्शनफुल चित्रपट आणि कभी कभी मध्ये रोमैन्टिक हिरो एकाचवेळी चित्रित करणारे कुशल दिग्दर्शक म्हणजे यश चोप्रा. त्यांनी आपल्या चित्रपटाद्वारे अनेक कलाकारांना स्टारडम चा दर्जा मिळवून दिला. अमिताभला एंग्रीयंग मैन ची प्रतिमा ‘दिवार, त्रिशूल’ या चित्रपटातून कायमची मिळवून दिली आणि त्याच एंग्रीमैनच्या व्यक्तिरेखेला बाजूला सारून ‘कभी कभी, सिलसिला’ अशा चित्रपटातून त्याच्यातील रोमैन्टिक हिरो, एक हळवा, कवी मनाचा हिरो प्रेक्षकांसमोर साकार केला. त्यानंतर अमिताभला यशजींच्या ‘मोहोब्बते’ ने नवे यश मिळवून दिले. अशा प्रकारचे धाडसी निर्णय घेण्याचे ते नेहमीच धाडस करत. तसेच जुन्या प्रतिमा आणि साचे मोडीत काढत.

९७७ च्या ‘दुसरा आदमी’ चित्रपटात प्रौढ स्त्रीने तिच्यापेक्षा लहान असलेल्या तरुणाच्या प्रेमात पडणे, त्यामधून निर्माण होणारी तिची भावनिक वादळे हा आजही धाडसी वाटणारा पण हटके असणारा विषय त्यांनी हाताळला.  १९७८ साली यशजींनी संजीवकुमार, अमिताभ बच्चन, शशी कपूर, हेमामालिनी, राखी, सचिन, पूनम धिल्लों, प्रेम चोप्रा अशी तगडी स्टारकास्ट घेऊन ‘त्रिशूल’ चित्रपट बनवला. १९७९ च्या ‘काला पत्थर’ मध्ये असेच खटकेबाज संवाद आणि लक्षवेधी दृश्ये होती. शत्रुघ्न सिन्हा आणि अमिताभ यांचा धाब्यावर चहा पिण्याचा प्रसंग आणि मध्येच टपकणारा इंजिनिअर शशी कपूर हा प्रसंग अतिशय लक्षवेधी आहे. हा कोळशाच्या खाणीतील कामगारावर आधारित चित्रपट होता.

   १९८१ च्या आपल्या महत्वाकांक्षी ‘सिलसिला’ या चित्रपटात यशजींनी गीतकार जावेद अख्तर आणि संगीतकार शिव-हरी यांची जोडी जमवली. अमिताभ आणि लताच्या ‘ये कहां आ गये हम’ या गाण्याची निर्मिती आणि गाण्याचे मेकिंग मनोरंजक आहे. जावेद कविता लिहित होते त्यावेळी अमिताभ प्रचंड बिझी असल्याने शिफ्ट संपल्यावर रात्री १२.३० ते एक वाजता गाण्याच्या सिटींगसाठी हजर राहायचे. प्रथम अमिताभ कविता वाचून दाखवणार आणि लता मंगेशकरच्या स्वरातील आलाप त्याच्या कवितेला फॉलो करणार असे ठरले होते. अमिताभच्या स्वरातील हळवेपणा आणि दर्द याचा उपयोग करून घ्यायचे ठरले होते पण लताच्या आलापीचे म्युझिक पीस ऐकल्यावर अमिताभ म्हणाले, ‘क्यूं न हम इस धुनपर शब्द लिखकर कोई गीत बनाये?’ म्हणून जावेदनी त्या धुनवर शब्द लिहिले ‘ ये कहां आ गये हम’. सिलसिला बनवताना महत्वाच्या रोलमध्ये जया बच्चन तर होतीच पण अमिताभच्या आग्रहामुळे यशजींनी रेखाला घेतले होते. सिलसिला रंगवताना स्वित्झलैंडच्या फुलांचे गुलाबी ताटवे, रेखा व जया या दोन्ही नायिकांच्या सिफॉनच्या साड्या आणि दोघी सोबतचे नायकाचे (अमिताभ) अत्यंत मधुर व दिलधडक प्रेमप्रसंग हे सारे पाहूनच यशजींना  प्रेमाविष्काराचा दिग्दर्शक अशी प्रतिमा चिकटवली गेली. 

 

     १९८४ च्या ‘मशाल’ या चित्रपटात पत्नीच्या पोटात प्रचंड प्रमाणात दुखू लागल्याने एका वृत्तपत्राचा संपादक (दिलीपकुमार) आपल्या पत्नीला (वहिदा रहमान) घेऊन डॉक्टरकडे जात असताना अचानक त्याची गाडी बंद पडते. म्हणून तो तेथून जाणाऱ्या प्रत्येक गाडीला थांबण्याची विनंती करतो पण त्याचा आक्रोश, त्याची व्याकुळता, त्याची अगतिकता कोणीही पहात नाही आणि थांबतही नाही हा प्रसंग यशजींच्या दिग्दर्शनातला एक उत्कट प्रसंग आहे. या चित्रपटात अनिल कपूर ने रफटफ नायक उभा केला होता. या चित्रपटाला हृदयनाथ मंगेशकरांचे संगीत होते. १९८५ साली ‘फासले’ हा चित्रपट दिग्दर्शित केला.या चित्रपटाची कथा ओल्ड जनरेशन आणि युथ जनरेशन च्या संघर्षाची होती. यात सुनील दत्त, रेखा, फरहा, फारुख शेख कलाकार होते. या चित्रपटाला शिव-हरींचे संगीत होते.

     १९८८ च्या ‘विजय’ चित्रपटात त्यांनी इत्तफाक , दाग नंतर पुन्हा राजेश खन्नाला दिग्दर्शन केले. हा चित्रपट देखील मल्टीस्टार होता. यात हेमामालिनी, अनिल कपूर, ऋषी कपूर, सोनम, मीनाक्षी शेषाद्री, अनुपम खेर, सईद जाफरी असे नामवंत कलाकार होते. विजय चित्रपटाच्या मारधाडीनंतर १९८९ च्या ‘चांदनी’ चित्रपटात पुन्हा रोमांटिक यशजी परत आले आणि त्यांना उपाधी मिळाली ‘किंग ऑफ रोमान्स’. या चित्रपटामुळे बॉलीवूडमध्ये हिंसात्मक चित्रपटाची आलेली लाट थोडी मंदावली आणि संगीत व मनोरंजनाची लाट पसरली. यात  ऋषी कपूर आणि विनोद खन्ना यांच्या सोबत श्रीदेवी होती. ‘चांदनी’ पासून त्यांना अस्सल रुपेरी रोमान्स गवसला. प्रेमातला हळुवारपणा, असोशी, तगमग, ओढ या भावना त्यांनी अप्रतिम चितारल्या. अवघ्या तीन पानाभोवती देखील तीन तासांची प्रेमकथा फुलू शकते हे सामर्थ्य यशजींचा हा चित्रपट ब्लॉक बस्टर झाला. ब्रिटनमध्ये या चित्रपटाने खूप बिझनेस केला.

     १९९१ साली यशजींनी ‘लम्हे’ चित्रपटात अनिल कपूर आणि श्रीदेवी यांना घेऊन एक वेगळाच विषय हाती घेतला. ‘लम्हे’ हा काळाच्या पुढे जाणारा प्रणयपट होता. मध्यम वयातील अनिल कपूर आणि तरुण श्रीदेवी यांच्यातील प्रेमाची गुंफण मांडली. श्रीदेवीची दुहेरी धाडसी भूमिका हे या चित्रपटाचे वैशिष्ट्य होतं. यात खूप वर्षांनी वहिदा रहमान दिसली. हा चित्रपट त्यांच्या सर्व चित्रपटातील त्यांचा आवडता चित्रपट होता. त्यांनी १९९३ साली ‘परंपरा’ हा चित्रपट दिग्दर्शित केला. या चित्रपटाची कथा दोन परिवारांच्यातील दुष्मनीची होती. यात सुनील दत्त, विनोद खन्ना, अमीर खान, सैफ अली खान, रविना टंडन, नीलम, अश्विनी भावे, अनुपम खेर असे कलाकार होते.

     शाहरुख खानच्या जडणघडणीत यशजींचा मोलाचा वाटा आहे. अमिताभ बच्चनना जसे त्यांनी बॉलीवूड मध्ये प्रस्थापित केले तसेच शाहरुख खानला म्हणजे त्यावेळच्या नवख्या कलाकाराला १९९३ च्या ‘डर’ चित्रपटात निगेटिव्ह नायक करण्याचे धाडस त्यांनी केले. त्याच शाहरुखला १९९७ च्या नृत्यावर आधारित लव्ह स्टोरीत म्हणजेच ‘दिल तो पागल है’ मध्ये माधुरी दीक्षित आणि करिष्मा कपूर सोबत एका प्रेमीची भूमिका देऊन त्यांनी  हिट केले. या चित्रपटातूनच शाहरुखचा सुपरस्टारचा प्रवास सुरु झाला. २००४ च्या ‘वीर झारा’ तली शाहरुख, प्रीती झिंटा आणि रानी मुखर्जी यांची लव्ह स्टोरी एक उदाहरण बनून राहिली. इंडियन एअरफोर्स मधील जवान आणि एका पाकिस्तानी स्त्री मधील प्रेमाची ती कहाणी होती. २०१२ ला ‘जब तक है जान’ मध्ये शाहरुख खान सोबत अनुष्का शर्मा व कैतरिना कैफ होती. याचे शुटिंग काश्मीरमध्ये केले. या चित्रपटासाठी त्यांनी संगीतकार मदनमोहन यांची काही दुर्मिळ गाणी मिळवली व त्यांचा उपयोग चित्रपटात केला.   

     १९९५ मध्ये निर्माता म्हणून त्यांनी ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ चित्रपट केला आणि त्यांचा मुलगा आदित्य ज्याचं वय केवळ २३ वर्षाचं होतं त्याला हा चित्रपट दिग्दर्शनासाठी दिला. १९९५ च्या दिवाळीत न्यू एक्सलेसियर या मुख्य चित्रपटगृहात ५० आठवडे आणि त्यानंतर मराठा मंदिरमध्ये १००० च्या वर आठवडे गर्दी खेचत राहिला. गिनीज बुक मध्ये नोंद झालेला हा चित्रपट म्हणजे (शाहरुख) राज व (काजोल) सिमरन यांची बहारदार प्रेमकथा आहे. दिवाळीच्या सुमारास मोठा चित्रपट प्रदर्शित करण्याचा ट्रेंडही या चित्रपटामुळे रुळला. काहीं कलाकृती काळबदलला, माध्यमं बदलली तरी त्याच्याही पुढे राहतात याचे हे उत्तम उदाहरण ठरेल. या चित्रपटाने यशजींना प्रचंड पैसा मिळवून दिला. आर्थिक स्थैर्य दिलं. नाम, दाम, शोहरत सारं मिळालं. आदित्यही करिअरमध्ये सेटल झाला. या मुलाबद्दल त्यांना अतिशय अभिमान वाटत असे.   

     या सर्व चित्रपटातून देखणा आणि सभ्य, मनापासून प्रेम करणारा हिरो उभा करताना प्रत्येक नायकाने एक वेगळीच उंची गाठली आहे. तसेच नायिकेला सभ्यतेच्या मर्यादा पाळूनच चित्रित केले आहे. त्यांच्याबद्दल असे म्हणत की, ‘He was a romantic at heart ’. त्यांच्या चित्रपटातील रोमान्स अतिशय देखण्या स्वरुपात चित्रित होत असे. निर्मिती स्वत:ची असो वा दुसऱ्याची त्या चित्रपटावर यश चोप्रांचे शिक्का मोर्तब असे. स्क्रीनप्ले, स्क्रिप्ट, संवाद कोणीही लिहिलेले असले तरी दिग्दर्शक यश चोप्रांचा त्यांच्यावरील प्रभाव जाणवत असे. चित्रपटाचा विषय, आशय, कलाकार कोणतेही असोत पण यश चोप्रांचा रोमान्स मात्र प्रफुल्लीत असे. त्यांनी प्रत्येक चित्रपटागणिक रोमान्सची व्याख्या बदलती ठेवली. त्यामुळे कोणत्याही वयातील व्यक्तीला त्यांच्या चित्रपटातील प्रेम धुंद करणारे आणि नेत्रांना सुखावणारे ठरले.

      ‘ भगवानने महिला को सुंदर बनाया है l मुझे उनमें कोई बुराई नहीं दिखती मैं उनकी इज्जत करता हूं और भगवानकी कृतिको और सुंदर बनानेका प्रयास करता हूं l इसलिए मेरी फिल्मोंमें हिरोईन इतनी खुबसुरत लगती हैं l ’ हे स्त्री बद्दलचे यश चोप्रांचे मत होते. आपल्या नायिकेला ते पडद्यावर अतिशय सुंदर पद्धतीने पेश करत. तसेच ती बऱ्याचदा पांढऱ्या साडीत असे अन तिचे नांव ‘चांदनी’ असे. त्यांच्या दिग्दर्शनाखाली काम करण्यास नायिका खूप उत्सुक असत. त्यांची नायिका छान छान वस्त्रांत दिसते कशी, सजते कशी, आकर्षक कशी वाटते याची सिनेमा सृष्टीकडून ‘रंगीन’ दखल घेतली गेली. स्त्रियांविषयी त्यांच्या मनात प्रचंड आदर होता. ते नेहमी म्हणत, ‘चित्रपटात जर स्त्रीला आम्ही परावलंबी दाखवलं तर आपण समाजाला काय उत्तर देऊ शकू?’ सभ्यता, सुसंस्कृतपणा आणि आदबशीर वागणं हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. मैत्रीच्या नात्याचं मूल्य त्यांना महत्वाचं वाटे. या चोप्रा बंधूंचं सर्वात महत्वाचं म्हणजे ते निर्व्यसनी होते. त्यांचं व्यसन एकच चित्रपट निर्मिती.

     त्यांच्या प्रत्येक चित्रपटातले प्रेमाचे वेगवेगळे रंग लुभावणारे आहेत. ‘दाग’ चित्रपटात राजेश खन्ना, राखी आणि शर्मिला टागोर यांच्या माध्यमातून त्यांनी रोमान्सला एका वेगळ्याच स्तरावर नेऊन ठेवले. ‘सिलसिला’ त रंग बरसे भिगे चुनरवाली या गाण्यामधील प्रणय जबरदस्त होता. या चित्रपटातील देखा एक ख्वाब हे गीत अमिताभ आणि रेखाच्या प्रणयाची सुरुवात म्हणून चित्रित केले आणि उत्तरार्धात रेखाचे लग्न झाल्यानंतर अमिताभचा अपघात होतो. तेंव्हा त्याला फुलांचा गुच्छ घेऊन भेटायला आलेली रेखा आणि बैंकग्राउंडला ‘ फुल हो दरमिया, तो फासले हुए’ हे शब्द असणारे गीत ऐकू येते आणि यशचोप्रांचे प्रभुत्व या दृश्यातून प्रकट होते. जया बच्चन वरील ‘जो तुम तोडो पिया’ या गाण्यातून अमर श्रद्धा असणारे प्रेम आणि ‘नीला आसमां सो गया’ या गाण्यातून अमिताभ रेखामधील विरहाचे प्रेम प्रकट झाले आहे.

     राजेश खन्ना व शर्मिलाचा ‘दाग’ मधील ‘मेरे दिलमें आज क्या है’ या गाण्याच्या वेळचा अभिनय जबरदस्त होता. ‘जब जी चाहे नयी दुनिया बसा लेते है लोग’ या गाण्यातली शर्मिलाची असहाय्यता अंतर्मन हलवणारी आहे. ‘अब चाहे मा रुठे या बाबा’ या गाण्यातून बेफिकीर प्रेमाचे दर्शन घडते. ‘आदमी और इन्सान’ चित्रपटातील ‘जिंदगी के रंग कई है साथी रे’ या गाण्यातून प्रेमाचे वेगवेगळे रंग प्रकट होतात. ‘नीले परबतों की धारा’ या गाण्यातून प्रतीकात्मक प्रेमाचे दर्शन घडविलेले आहे. ‘धूल का फूल’ चित्रपटात ‘ तेरे प्यार का आसरा चाहता हूं’ अशा पद्धतीची नायकाची सौम्य प्रेम याचना आणि लटक्या पद्धतीने ‘बडे नासमझ हो ये क्या चाहते हो’ हे नायिकेचे उत्तर असणारे गाणे त्याकाळात प्रेमाचे प्रतीकच होते.‘कभी कभी’ मध्ये ‘मै पल दो पल का शायर हूं’ या गाण्याच्या वेळी अमिताभचा संयमित रोमान्स आणि त्याच चित्रपटात ऋषी कपूर आणि नीतू सिंग यांचा ‘ तेरे चेहरेसे नजर नही हटती’ आणि ‘तेरा फुलों जैसा रंग’ यातील तरुणाईचा रोमान्स म्हणजे यशजींना सलामच आहे. ‘प्यार कर लिया तो क्या’ या गाण्यातून दुनियेची पर्वा न करणारे प्रेम यशजींनी दाखवून दिले.

      ‘त्रिशूल’ मध्ये अमिताभ, शशी कपूर, हेमा मालिनी व राखीवर चित्रित झालेल्या ‘मोहब्बत बडे  काम की चीज है ’ या गाण्यातून प्रेमाचे अनेक रंग प्रकट होतात. ‘वक्त’ मध्ये ‘दिन है बहारके’ या गाण्यात तरुणाईचे प्रेमाचे उत्कट रंग तर बलराज सहानी यांच्यावर चित्रित ‘ए मेरी जोहरा जबीन’ या गाण्यातून मध्यम वयातील प्रेमाचे सुरेख दर्शन घडते. ‘चांदनी’ मध्ये ‘चांदनी ओ मेरी चांदनी’ या गाण्याच्या वेळी ऋषी कपूर श्रीदेवीचा प्रेमाचा रंग आणि त्याच चित्रपटात ‘ लगी आज सावनकी फिर वो घडी’ या गाण्याच्या वेळी विनोद खन्नाची प्रेमाची आर्त हाक यातून प्रेमाचे अनेक कंगोरे दिसून येतात. ‘डर’ मध्ये ‘ जादू तेरी नजर’ यातून उत्कट आणि असुरी प्रेमाचे रंग दिसून येतात तर ‘वीर झारा’ मध्ये ‘ मै यहां हूं’ या गाण्यातून प्रेमाची हाक ऐकू येते. ‘दिल तो पागल है’ या गाण्यातून शुद्ध रोमान्स दिसून येतो.प्रेमाच्या अशा वेगवेगळ्या छटांची, रंगांची उधळण फक्त यश चोप्राच करू शकत म्हणूनच त्यांना ‘रोमान्सचा बादशहा’ म्हणत असत. प्रेमाचा आविष्कार व गीत-संगीत-नृत्याचे दृश्य सौंदर्य ही त्यांच्या दिग्दर्शनाची वैशिष्ट्ये गणली जातात.  

     यशजींच्या प्रत्येक चित्रपटातील संगीतकार वेगवेगळे आणि दिग्गज होते. उदा: रवी, शिव-हरी,  एन.दत्ता, दिलीप रॉय, उत्तम सिंग, आर.डी.बर्मन, हृदयनाथ मंगेशकर. परंतु त्यांना संगीताची उत्तम जाण असल्यामुळे त्यांच्या चित्रपटातील गाण्यावर त्यांचीच छाप दिसून येते. संगीत हा यशजींच्या चित्रपटाचा आत्मा होता. त्यांनी संगीताची मदत घेऊनच आपल्या चित्रपटांना एक लय दिली. म्हणूनच त्यांच्या चित्रपटातील गाणी हिट झाली आणि रसिकांनी त्यांचा प्रत्येक चित्रपट पसंत केला. त्यांना वेलची वगैरे चघळत सतत गुणगुणायची आणि त्याचवेळी सीनची जुळवाजुळव करण्याची सवय होती. ‘तू हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा, जिंदगी इत्तेफाक है, मै हर एक पलका शायर हूं, आगे भी जाने ना तू’ अशा असंख्य गाण्यातून त्यांनी जगण्याचा संदेश दिला.

     पामेला यांच्याशी लग्न झाल्यानंतर माझी वैयक्तिक भरभराट झाली असं यशजी म्हणत.आदित्य आणि उदय चोप्रा या दोन्ही चिरंजीवानी त्यांचे बैनर सांभाळले. आदित्य चोप्रांनी ‘यशराज’ बैनरचे ‘रब ने बना दी जोडी, चक दे इंडिया, एक था टायगर, जब तक है जान, फना, धूम, धूम२’ असे अनेक चित्रपट दिग्दर्शित केले. यश बैनरचा ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या चित्रपटाने तर ‘धूम’ मचा दी. कित्येक वर्षे गर्दी खेचणारा चित्रपट म्हणून त्याची ख्याती आहे.त्यां चा मुलगा उदय चोप्रा बॉलीवूड कलाकार झाला.

     शुटींगसाठी यशजींचे प्रिय डेस्टीनेशन म्हणजे स्विझर्लंड. तेथील बगीच्यात ‘देखा एक ख्वाब’ या गाण्याचे चित्रीकरण त्यांनी इतक्या सुंदर रीतीने केले की त्यांना २०१० मध्ये तेथील क्लचरल एम्बैसीडर बनवले गेले. एवढेच नाही तर तेथे त्यांच्या नावाने एक रस्ता बनला आणि एक ट्रेन सुद्धा सुरु केली. ते सिगरेट, दारू सारख्या व्यसनापासून नेहमीच दूर राहिले. परंतु खाण्याचे ते शौकीन होते. त्यांचा फिल्मी सिलसिला ६० वर्षे लांबीचा होता. त्यांनी या कारकिर्दीत ५० हून अधिक चित्रपट केले. त्यांना त्यांच्या काळात दर्जेदार कलाकाराबरोबर काम करण्याची संधी मिळत गेली. निर्मिती, दिग्दर्शन, आउट डोअर शुटींग सगळं शिकण्याची संधी मिळाली. मदर इंडिया, मुगल-ए-आजम, संगम, प्यासा आणि राजकपूरचे चित्रपट त्यांना आवडत होते.

त्यांच्यामुळे परदेशातील स्वर्गीय सौंदर्य बसल्या बसल्या प्रेक्षकांना पाहायला मिळालं. त्यांचं पडद्यावरचं आणि पडद्याबाहेरचं आवडतं लव्हली कपल म्हणजे ऋषी कपूर आणि नीतू सिंग. काजोल या नायिकेमध्ये त्यांना सौंदर्य,ग्लैमर आणि अभिनयाचा एकत्र संगम आढळला असे ते म्हणत.त्यांचा स्वभाव रोखठोक असल्याने त्यांनी मैत्री आणि व्यवसाय यांची गल्लत होऊ दिली नाही. त्यांनी स्टारचे नखरे सहन केले पण एका लिमिटपर्यंत. फिल्मी दुनियेच्या प्रलोभनापासून दूर असणारं हे व्यक्तिमत्व.    

यशजींना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. ‘डर, चांदनी, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे,  दिल तो पागल है, वीर झारा, लम्हे’ या त्यांच्या चित्रपटाना सहा वेळा राष्ट्रीय फिल्म पुरस्कार मिळाले. सर्वश्रेष्ठ दिग्दर्शक म्हणून ‘वक्त, इत्तफाक, दाग, दिवार’ या चार चित्रपटांसाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. २००१ मध्ये त्यांना भारत सरकारने ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ ने सन्मानित केले.२००५ मध्ये भारतीय सिनेमातील योगदानाबद्दल त्यांना ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित केले गेले.

     शेवटपर्यंत कार्यरत राहण्याची यशजींची इच्छा पूर्ण झाली. त्यांचा शेवटचा रोमैन्टिक चित्रपट ‘जब तक है जान’ २०१२ ला प्रदर्शित झाला. त्यावेळी ते ८० वर्षांचे होते. क्रिएटीव्ह माणसाला वयाची अजिबात अट नसते. चित्रपट क्षेत्रात शिस्त व व्यावसायिक दृष्टीकोन ठेवून यशस्वी कसे रहावे आणि विविध प्रकारची प्रयोगशीलता याचे आदर्श व सुंदर उदाहरण म्हणजे यश चोप्रा. त्यांनी चित्रपटापासून निवृत्त होण्याची त्यांनी त्यावेळी घोषणा केली. त्यानंतर आपला सर्व वेळ आपल्या परिवारासोबत ते घालवू इच्छित होते पण ते आपल्या कुटुंबाला वेळ देऊ शकले नाहीत कारण २१ ऑक्टोबर २०१२ ला त्यांनी चित्रपटसृष्टीला तसेच या दुनियेला आखरी सलाम केला.

रुपेरी पडदा व्यापून टाकणारी आणि प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारी दृश्ये त्याला अतिभव्यतेची साथ, डोळ्यांच्या कडा पाणावणारी सुंदर प्रेमदृश्ये हा गेली ५० वर्षे प्रेक्षकांना रुपेरी पडद्यावर नजराणा पेश करणारे ज्येष्ठ दिग्दर्शक, निर्माते, पटकथाकार यश चोप्रा सर्वाना सोडून गेले. या प्रेमाच्या बादशहाने ‘दाग’ या आपल्या प्रथम दिग्दर्शित चित्रपटातून राजेश खन्नाच्या संवादाच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांसाठी जे प्रेम व्यक्त केले तेच त्यांच्या आयुष्यालाही लागू पडते.त्यांच्यावर प्रेम करणारा रसिक प्रेक्षक पाहून जणू ते म्हणतात….

       ‘ प्यार एक शख्स का भी अगर मिल सके तो, बडी चीज है जिंदगी के लिए

आदमी को मगर ये भी मिलता नहीं, मुझको इतनी मुहब्बत मिली आपसे

ये मेरा हक नहीं मेरी तकदीर है, मैं जमाने की नजरोमें कुछ भी न था

इस मुहब्बत के बदले मैं क्या नजर दूं, मैं तो कुछ भी नहीं l ’    

     यशजी म्हणत, ‘मैं पंजाबी हूं l मुझे फक्र है अपने पंजाबी होने पर..और मै समझता हूं  मै अपना कल्चर बहुत गहराई से जानता – समझता हूं l’ त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं, ‘सिनेमा ही देखील समाजाच्या एकतेची महत्वपूर्ण नाळ असते. माझं स्वत:चं विशेष प्रेम आहे स्वित्झलैंडवर. माझ्या चित्रपटांमध्ये जर स्वित्झलैंडचा एकही शॉट नसल्यास मलाच काय पण माझ्या प्रेक्षकांनाही चुकल्यासारखं वाटेल. इतकी ही सवय अंगात भिनलेली आहे. एखाद्या विषयावर चित्रपट काढताना मी कथेचा प्लॉट बघतो. आजच्या तरुणाईला माझा सिनेमा आवडेल का हा माझा प्रथम निकष असतो. देशातील सत्तर टक्के जनता ही युथ आहे. तेव्हा त्यांना काय आवडेल हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे. युथ  के लिए फिल्म बनती है तो then you have to be young. youth should connect with your film. माझं शारीरिक वय झालंय. लौकिक अर्थानेही मी वयस्क झालोय. पण माझं मन अजून हिरवं आहे’. त्यांच्या निधनाने एका ‘जोशीला’ व्यक्तिमत्वाची अखेर झाली.

हिंदी सिनेमाच्या अशाच जुन्या जमान्यातील गोल्डन इरा काळातील अधिक लेखांसाठी क्लिक करा

jayashree jaishankar danve
Jayashree Jaishankar Danve
+ posts

जयश्री जयशंकर दानवे, कोल्हापूर

   (एम.ए. संगीत विशारद) (ज्येष्ठ लेखिका)

*  ताराराणी विद्यापीठात उषाराजे हायस्कूलमध्ये २३ वर्षे संगीत शिक्षिका म्हणून कार्यरत.

*  निवृत्तीनंतर चरित्रग्रंथ,व्यक्तिचित्रण,कथा संग्रह,ललित लेख अशा विविध विषयांवर आजवर

   ३१ पुस्तके प्रकाशित 

*  ‘कलायात्री’ चरित्रग्रंथाला आजवर १० मान्यवर संस्थांचे पुरस्कार.

*  वैयक्तिक ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ व इतर अनेक पुस्तकांच्या पुरस्काराने पुरस्कृत.

*  नियतकालिके व मासिकातून असंख्य लेख प्रसिद्ध.

*  अनंत माने दिग्दर्शित ‘पाच रंगांची पाच पाखरे’ व ‘पाहुणी’ या चित्रपटासाठी पार्श्वगायन.

*  ‘ड्रीम मेकर्स’ व ‘म्युझिकल नाईट’ ऑर्केस्ट्रात गायिका म्हणून सहभाग.

*  शेगांवच्या गजानन महाराजांच्या जीवनावरील भक्तीगीतांचे १०० हून अधिक कार्यक्रम.

*  समूहगीत,नाटक,नृत्य,बालनाट्य अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचे दिग्दर्शन.

*  गेली ३५ वर्षे ‘नटश्रेष्ठ जयशंकर दानवे’ यांच्या स्मृतीचे जतन तसेच कलायात्री पुरस्काराचे  

   संयोजक म्हणून सहभाग.

Leave a comment