– जयश्री जयशंकर दानवे, कोल्हापूर 

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

हसरत जयपुरी (Lyricist Hasrat Jaipuri) हे हिंदी फिल्म जगतातलं एक खणखणीत नाव. त्यांनी आपल्या नावासोबत ‘जयपुरी’ जोडून जयपूरला सन्मान दिला. रामगंज मोहल्ल्यात त्यांची मोठी हवेली होती. ज्याचं नाव होतं ‘फिरदौस मंझील’. फिरदौसी हे त्यांच्या आईचं नाव. जिच्यावर त्यांचं फार प्रेम होतं. फिरदौसचा अर्थ ‘जन्नत’ म्हणजे स्वर्ग. हसरतना आपली हवेली स्वर्गापेक्षा कमी वाटत नसे. त्या हवेलीच्या बाल्कनीत त्यांची एक खास जागा होती. जिथे त्यांच्या लेखणीतून एकसे बढकर एक शायरी तसेच नायाब गीतं लिहिली गेली. १५ एप्रिल १९२२ रोजी जयपूरच्या चार दरवाजा परिसरात जन्मलेल्या इक्बाल अहमद हुसैनने म्हणजेच हसरतनी आपले आजोबा (आईचे वडील) फिदा हुसेन यांच्याकडून शायरीचा वारसा उचलला आणि पुढे उर्दूचा अभ्यास केला .त्यामुळे त्यांची गैरफिल्मी शायरीसुद्धा खूप प्रसिद्ध होती. (Remembering Hasrat Jaipuri’s, renowned lyricist of Hindi cinema and his Unforgettable and Evergreen Songs)

उदा :  ‘वो अपने चेहरेमें सौ आफताब रखते हैं , इसलिए तो वो रुखपे नकाब रखते है ’

‘ पीछे मत देख न शामिल हो गुनहगारोमें,  सामने देख कि मंजील है तेरी तारोमें ’

कोवळ्या वयातच राधा नामक प्रेयसीकडून नाकारलं गेल्याची खंत त्यांना आयुष्यभर छळत राहिली. ’संगम’ चित्रपटातील ‘ये मेरा प्रेमपत्र पढकर’ ही शायरी राधाच्या आठवणीत त्यांनी खूप पूर्वी केली होती. त्यामुळेच स्वत:चं नाव त्यांनी ‘हसरत’ (अपूर्ण आकांक्षा किंवा अभिलाषा या अर्थाने) असं ठेवलं. हे त्यांचे ‘पेन नेम’ होते. तसेच आजोबांचे मित्र ‘हसरत’ मोहानी यांचा आदर्शही त्यांच्यासमोर होताच. ‘हसरत’ हे नाव धारण करण्यामागे आणखी हा एक आदरभावदेखील कारणीभूत होता. वेळ मिळाला की, मुशायऱ्यात भाग घेणं त्यांच्यासाठी विरंगुळ्याचं साधन होतं. त्यांचे आईवर खूप प्रेम असूनही जेव्हा आईने त्यांना ‘अगर शायरी करनी है तो मेरे घरसे निकल जाओ’ अशी धमकी दिली तेव्हा शेर-शायरीच्या प्रेमात असणाऱ्या हसरतनी याच शब्दांना पकडून घर सोडले आणि पुढील काळात सिनेजगताला एक नायाब हिरा मिळाला. वयाच्या विसाव्या वर्षी त्यांनी मुंबईची वाट धरली. तेव्हा त्यांना खरा जीवनसंघर्ष करावा लागला. ना खिशात पैसा ना खायला रोटी, ना राहण्याचा ठिकाणा ना कोणाची जान पहचान. अशावेळी फुटपाथवर त्यांनी रात्र काढली. त्यानंतर सुरुवातीला मुंबईच्या ‘बेस्ट’ कंपनीत कंडक्टर म्हणून काही वर्षं त्यांनी काम केलं. त्यावेळी त्यांना अकरा रुपये मिळत. त्यानंतर काही काळ क्रोकरी व खेळणी विकत, थिएटरमध्ये बुकिंग क्लार्क म्हणून त्यांनी नोकरीही केली. अशावेळी शेरो-शायरीचा आधार घेऊन रात्रीच्यावेळी कवी संमेलन आणि मुशायरीत भाग घेऊन त्यांनी आपली उपजीविका चालविली.

अशात ‘इप्टा’च्या मुशायऱ्यात पृथ्वीराज कपूरनी हसरतना ‘मजदूर की लाश’ ही कविता वाचताना ऐकलं आणि ते भारावून गेले. फुटपाथवर झोपायला लागलं तेव्हा त्यांच्या शेजारीच मजूर लोकांची वस्ती होती. तिथल्या एका मजुराचे मरण पाहून त्यांचा जीव एवढा कळवळला की त्यांनी या दु:खाला कवितेत शब्दांनी बद्ध केलं. तीच ही कविता ‘मजदूर की लाश’. या कलंदर कवीला पृथ्वीराज कपूरनी राजकपूरला भेटायला सांगितलं. हसरत आणि राजकपूरची पहिली मुलाखत रॉयल ओपेरा हाऊस येथे झाली. राज कपूर हसरतांची शायरी ऐकून प्रभावित झाले. ‘आप बनी बनायी धुनोंपर गाने लिख पाओगे?’ असा त्यांनी प्रश्न विचारताच हसरतनी क्षणाचाही विलंब न लावता होकार दिला. राज कपूरनी टेबलावर ठेका धरीत गाण्याचे डमी बोल ऐकविले, ‘अंबुआका पेड है, सूनी मुंडेर है, आजा मोरे बालमा अब काहे की देर है’ तत्क्षणी हसरतांच्या लेखणीतून ओळी उतरल्या, ‘जिया बेकरार है, छायी बहार है, आजा मोरे बालमा तेरा इंतजार है’. राज कपूरनी मनापासून दाद दिली आणि आर. के. फिल्म्सला हसरत जयपुरी नावाचा गीतकार मिळाला.

हे त्यांचे चित्रपटासाठी लिहिलेले पहिले गाणे. ‘बरसात’मध्ये राजकपूरनी हसरत यांचेकडून सात तर शैलेंद्रकडून दोन गाणी लिहून घेतली. ‘बिछडे हुए परदेसी, छोड गये बालम, मेरी आंखोंमें बस गया कोई रे’ अशी सदाबहार गीत हसरतनी दिली आणि शंकर-जयकिशन हे आघाडीचे संगीतकार बनले. राज कपूरसारख्या मित्राचे ऋण त्यांनी जीवनभर लक्षात ठेवले आणि पुढील काळात गाणे लिहिले होते, ‘एहसान मेरे दिलपे तुम्हारा है दोस्तो, ये दिल तुम्हारे प्यारका मारा है दोस्तो ’ ते हिंदी फिल्म जगतातील सफल गीतकार होते. पण ते गीत किंवा शायरी उर्दूत लिहित असत. हिंदी भाषा त्यांना फारशी अवगत नव्हती. त्यामुळे राज कपूरच्या ‘राम तेरी गंगा मैली’ मधील ‘सुन साहिबा सुन’ हे गाणे तयार करताना सुन शब्दाला साजेसे धून, चून, पुन, बून, शगुन असे शब्द त्यांच्या मुलीने म्हणजेच किश्वरीने त्यांना सुचवले आणि त्यांनी फटाफट पुढील गीत तयार केले. या मशहूर गीतातील तिच्या योगदानाबद्दल हसरतनी हे गाणे तयार होताच आपल्या मुलीला पाच हजार रुपयाचे इनाम दिले होते.

‘बरसात’ साठी गीतलेखन करताना हसरत यांचे सूर वृत्तीने दिलदार आणि वाणीने मिठ्ठास असणाऱ्या जयकिशनबरोबर जुळले. मूळातच हसरतमियां स्त्रीसौंदर्याचे दिवाने होते. त्यांचा कंडक्टर म्हणून काम करतानाचा अनुभव खूपच रोमांचकारी होता. एका मुलाखतीत सांगताना ते म्हणाले, ‘बसमध्ये प्रवास करणाऱ्या सौंदर्यवती ललनांकडून मी तिकिटांचे पैसे घेत नसे, कारण त्यांच्याकडून मला काव्याची प्रेरणा मिळत असे.’ अशा आशयाची प्रांजळ कबुली त्यांनी दिली होती. जयकिशनही सौंदर्यासक्त वृत्तीचे असल्याने दोघांचं ट्युनिंग जुळायला वेळ लागला नाही. ‘छोड गये बालम’ या द्वंद्वगीतात प्रथमच मुकेशच्या आवाजावर लता मंगेशकरांची आलापी हार्मनीच्या स्वरुपात ओव्हरलैप करून शंकर-जयकिशननी एक नवा ट्रेंड संगीतात आणला. ‘बरसात’ १० मार्च १९५० रोजी ग्रैट रोडच्या इम्पिरियल थिएटरात झळकला आणि रेकॉर्ड ब्रेक यश मिळविलं.

‘चोरी चोरी’ चित्रपटातील नऊ धमाल गाण्यांपैकी हसरत यांनी पाच गाणी लिहिली.त्यातील ‘पंछी बनू उडती फिरू मस्त गगनमें’ या गाण्यातील नायिकेची उंच गगनात भरारी घालणारी स्वप्नं नर्गिसने पडद्यावर सुंदर साकार केली आहेत. त्यातील ‘रसिक बलमा’ हे अत्यंत लोकप्रिय गाणे झाले. जे शुद्ध कल्याण रागात बांधले होते. ‘आजा सनम मधुर चांदनीमें हम’ हे युगुलगीत केवळ अप्रतिम.  हिंदी चित्रपट संगीताच्या सुवर्णकाळात हसरत यांची गीते आणि शंकर-जयकिशननी केलेली कर्णमधुर संगीताची ‘बरसात’ म्हणजे धुंद करणारा अनुभव होता. सात दशकांचा काळ उलटून अद्यापही त्याची झिंग ओसरलेली नाही. यात हसरत-शंकर जयकिशन यांच्या नेत्रदीपक कामगिरीचा सिंहाचा वाटा आहे. आर.के.फिल्म स्टुडीओमध्येच हसरतसारख्या गीतकारांची काव्यप्रतिभा बहरली.

‘बरसात’ नंतर १९५१ मध्ये ‘आवारा’ चित्रपटगृहात झळकला आणि चित्रपट संगीतात ऑर्केस्ट्रेशनचे देदीप्यमान पर्व सुरु झालं. रशियाच्या बाजारपेठेत शिरकाव करण्याची अनोखी कामगिरी ‘आवारा’च्या संगीताने करून दाखविली. किशोर साहूंच्या ‘काली घटा’ या संगीतप्रधान चित्रपटात हसरतनी लिहिलेल्या ‘काली घटा घीर  आयी रे’ व ‘हमसे ना पुछो कोई प्यार क्या है’ या अवीट गोडीच्या गाण्यांनी कहर केला. ‘बादल’ मधील ‘मैं राही भटकनेवाला हूं’ हे मुकेशनी गायलेलं गाणंही हिट ठरलं. शंकर-जयकिशननी ‘पूनम’ साठी हसरतची काही नितांतसुंदर गाणी आकर्षक चालीत गुंफली होती. लताबाईंच्या ‘चंदा की चांदनी में झूमे झूमे दिल मेरा’ या गाण्यातील नादमधुर शब्दरचनेमुळे हे गाणं आजही कानाला गोड लागतं.

‘दाग’ मधील त्यांच्या ‘कोई नहीं मेरा इस दुनिया में’ या गाण्याच्या इंट्रोत, ऑर्गनच्या कॉर्डसच्या पार्श्वभूमीवर ‘चांद इक बेवा की चुडीकी तरह टूटा हुआ’ या भावविव्हल ओळी तलत मेहमूदच्या दर्दभऱ्या स्वरांत अंत:करणाचा ठाव घेतात. ‘हम दर्द के मारों का इतनाही फसाना है’ या गाण्यातही वैफल्याचा गहिरा रंग कायम होता. ‘काहेको देर लगायी रे’ या लताबाईंच्या विरहगीतातील आर्तता हेलावून टाकते. अमीन सयानी यांना दिलेल्या एका मुलाखतीत हसरत जयपुरींनी सांगितलं की, ‘शैलेंद्र आणि माझ्यात गुरु-शिष्याचं नातं होतं. शैलेंद्र मला हिंदी शिकवीत असे आणि मी त्याला उर्दू. दो जिस्म एक जान असं आमचं निखळ मैत्रीचं नातं होतं, त्यात चढाओढीची किंवा असूयेची भावना कधीच नव्हती.म्हणूनच शैलेंद्रची निर्मिती असलेल्या ‘तिसरी कसम’ मध्ये काही गाणी लिहिण्याचा मान त्याने मला दिला होता.’ १९६६ च्या फणीश्वरनाथ रेणू यांच्या कादंबरीवर बनलेला हा चित्रपट यातील ‘मारे गये गुलफाम, दुनिया बनानेवाले क्या तेरे मनमें समायी’ ही गाणी अविस्मरणीय ठरली.

हसरत जयपुरींनी लिहिलेली व शंकर-जयकिशन यांच्या लाजवाब सुरावटीनी सजविलेली बहारदार गाणी खूप गाजली.उदा : ‘आजा रे अब मेरा दिल पुकारा (आह), याद किया दिलने (पतिता), आ नीले गगन तले (बादशहा), वो जानेवाले मुडके जरा देखते जाना (श्री ४२०), सुनो छोटीसी गुडिया की लंबी कहानी (सीमा), रसिक बलमा (चोरी चोरी), मुरली बैरन भई कन्हैय्या तेरी (नई देहली), मैं पिया तेरी तू माने या न माने (बसंत बहार), वो चांद खिला वो तारे हंसे (अनाडी), तेरा जलवा जिसने देखा (उजाला), जाऊं कहा बता ए दिल (छोटी बहन), सजन संग कैसे नेहा लगाये (मैं नशेमें हूं), धीर धीरे चल चांद गगन में (लव्ह मैरेज), सौ साल पहले मुझे तुमसे प्यार था (जब प्यार किसीसे होता है) तेरी प्यारी प्यारी सूरत को (ससुराल),तुझे जीवन की डोर से (असली नकली), इब्तिदा-ए-इश्क में हम (हरियाली और रास्ता), आवाज देके हमे तुम बुलाओ (प्रोफेसर), उनकी पहली नजर क्या असर कर गई (एप्रिल फूल), तुम कमसीन हो नादां हो (आयी मिलन की बेला), बेदर्दी बालमा तुझको (आरजू), नील गगन की छांव में (आम्रपाली), ओ मेरे शाहेखुबां (लव्ह इन टोकियो), बहारो फूल बरसाओ (सूरज), उनसे मिली नजर (झुक गया आसमान), परदे में रहने दो (शिकार), बदन पे सितारे लपेटे हुए (प्रिन्स), गर तुम भुला न दोगे (यकीन)’

हसरत जयपुरीनी संगीतकार एस.डी.बर्मन यांचेकरिता ‘दिल का भंवर करे पुकार, तू कहां ये बता’ (तेरे घरके सामने), ‘प्यार की आग में तनबदन जल गया, रात का समां’ (जिद्दी) तर संगीतकार कल्याणजी-आनंदजी यांचेसाठी ‘हम छोड चले मेहफिल को’ (जी चाहता है), महफिल में हुस्न तेरा (हमराही), बोल मेरे साथिया (ललकार), अपराध, रखवाला, ‘समां है सुहाना’ (घर घर की कहानी), ‘जिसके सपने हमें’ (गीत), सट्टा बाजार,सम्राट चंद्रगुप्त अशा अनेक  चित्रपटांमधून गाणी दिली.

हसरत म्हणजे एक साधा सच्चा माणूस. ‘He was very down to earth’. ते ‘godgifted’ होते. त्यांना लिहिण्यासाठी एकांताची गरज नसे. प्रसंग ऐकला की काही मिनिटात ते गाणे लिहित.१९५३ मध्ये त्यांचे लग्न झाले.त्यांच्या पत्नीचे नाव ‘बिलकिस’. ते पत्नीला बिलकिस-ए-जमानी म्हणत. म्हणजेच दुनिया की राजकुमारी.त्यांना तीन मुले होती. एक मुलगी आणि दोन मुलगे. त्यांची पत्नी त्यांची प्रेरणा होती,ताकद होती. सर्व बऱ्या-वाईट परिस्थितीत त्या दोघांची साथ घट्ट राहिली. त्यांच्या पत्नीच्या हातचा मोंगलाई खाना त्यांना पसंत होता. म्हणूनच पत्नी गेल्यानंतर ते लिहून गेले,

‘गम उठाने के लिए मै तो जिये जाऊंगा, सांस की लयपे तेरा नाम लिए जाऊंगा’ तिच्या आठवणीत पुढे ते म्हणतात, ‘तू खयालोमें मेरे अब भी चली आती है,अपनी पलकोंपे उन अश्कोंका जनाजा लेकर’ १९६३ च्या ‘दिल एक मंदिर’ चित्रपटातही त्यांनी एक अविस्मरणीय गीत लिहिले आहे.

‘जानेवाले कभी नही आते, जानेवालेकी याद आती है, दिल एक मंदिर है,

प्यार की जिसमें होती है पूजा, ये प्रीतम का घर है

हर धडकन है आरती वंदन, आंख जो मिंची हो गये दर्शन, मौत मिटा दे चाहे हस्ती, याद तो अमर है’  

त्यांच्या गीतात बऱ्याचवेळा मुहब्बत बद्दल संदर्भ येई तेव्हा त्यांच्या नजरेसमोर त्यांची पत्नी असे. म्हणूनच ‘तुमसे अच्छा कौन है’ मध्ये ‘रंगत तेरी सुरत की किसी में नही नही, खुशबू तेरे बदनसी किसीमे नही नही’ असं गाण ते लिहून गेले. ‘हम तेरे प्यार में सारा आलम खो बैठे’ हे दिल एक मंदिर मधील फक्त एक गीत नाही तर प्रेमाची बरसात आहे, जी स्वर्गातून पृथ्वीवर बरसली आहे. त्यांच्या ‘लाल पत्थर’ मधील ‘उनके खयाल आये तो आके चले गये’ हे गझलस्टाईल गीत असो वा १९७० च्या ‘पगला कहीं का’ मधील ‘तुम मुझे यूं भुला ना पाओगे’ हे गीत असो ही गाणी अत्यंत संवेदनशील आणि रोमैन्टिकही होती. त्याचं कारण त्यांच्या गीतात दिलकशी आणि जिंदादिली भरपूर होती. ‘गीत गाया पत्थरोने’ या गाण्याने दगडालाही नाचायला मजबूर केलं होतं. १९६४ चं हे गाणं आजही हृदयाला स्पर्श केल्याशिवाय राहत नाही.

१९६१ च्या ‘जंगली’ तलं रफींच हिट गाणं ‘एहसान तेरा होगा मुझपर’ या गाण्याला शम्मीकपूरने सर्वोत्तम गाणं म्हणून सर्टीफीकेट दिलं होतं. ‘अंदाज’ चित्रपटातील ‘जिंदगी एक सफर है सुहाना’ हे गाणे १९७१ चे बिनाका गीतमालाचे टाप सॉंग होते. १९७२ मध्ये या गाण्यासाठी हसरतना फिल्मफेअर अवार्ड मिळाले. ‘सूरज’मधील ‘बहारो फूल बरसाओ मेरा मेहबूब आया है’ या गीताला तर song of the sentury ची पदवी मिळाली. १९६८ मध्ये ‘मेरे हुजूर’ चित्रपटातील ‘झनक झनक तोरी बाजे पायलिया’ या गाण्यासाठी डॉ.आंबडेकर अवार्ड मिळाले.तसेच त्यांना डॉक्टरेट पदवीसुद्धा मिळाली होती. ४० वर्षांच्या कारकिर्दीत हसरतनी ३५० चित्रपटांत जवळजवळ दोन हजार पेक्षा अधिक गाणी लिहिली. आजच्या निरंतर धावपळीच्या युगात वर उल्लेख केलेल्या एखाद्या गाण्याची नुसती ओळ जरी कानावर पडली तरी मन प्रफुल्लित व प्रसन्न होतं. ही मधाळ गाणी जोवर विसरली जात नाहीत तोवर या गाण्यांचे जनक विस्मृतीत जाणं शक्यच नाही.

हसरत म्हणजे अभिलाषा. त्यांनी नेहमीच आपल्या इच्छा-अभिलाषांना गीतांमधून वाट करून दिली.‘ ढलते सूरज की, हंसी तुम न उडाना यारों, लाख बूढा हूं, इरादे तों जवां रखता हूं ’  ही त्यांच्या मनाची धारणा होती. आयुष्याच्या संधीकाळातही लेखनाची इच्छा तशीच धगधगत होती. ते त्या वयातही मनाने नेहमीच तरुण राहिले. ते म्हणत, ‘शायर बूढा हो तो उसकी गर्दन हिलती है, पर उसकी कलमकी गर्दन कभी नहीं हिल सकती l’. त्यांच्या बैठकीच्या खोलीत राजकपूरांचा फोटो लावलेला होता.ते अधूनमधून त्याकडे नजर टाकत अन आठवणी जाग्या ठेवत. शेजारच्या भिंतीलगत त्यांना मिळालेली असंख्य पारितोषिकं त्यांना या आठवणी ताज्या ठेवण्यास मदत करत. लेखन ही माझी पूजा आहे ती मी कधीच थांबवणार नाही असं ते अभिमानानं म्हणत. संगीतकारांनी स्वत:चं गीतलेखन करणं त्यांना पसंत नव्हतं. पण त्यांनी आपलं आयुष्य अगदी आनंदानं उपभोगलं अगदी अखेरपर्यंत. त्यांची गीतं पहाता लक्षात येतं की,त्यांनी बहुतेक गाणी रोमैन्टिक लिहिली आणि दार्शनिक गीते काही प्रमाणातच लिहिली. हसरतनी ‘अंदाज’ चित्रपटासाठी लिहिले ‘जिंदगी एक सफर है सुहाना, यहां कल क्या हो किसने जाना’ आणि ‘मेरा नाम जोकर’ साठी लिहिले ‘ जाने कहां गये वो दिन कहते थे तेरी यादमें’ ही दोन गाणी त्यांच्या यशस्वी कारकीर्द समजण्यासाठी पुरेशी आहेत.

हसरत यांच्या शब्दांत सांगायचं झाल्यास ..

‘ तुम मुझे यूं भुला न पाओंगे, जब कभी भी सुनोगे गीत मेरे संग संग तुम भी गुनगुनाओगे ’     

१७ सप्टेंबर १९९९ रोजी हसरत जयपुरी काळाच्या पडद्याआड गेले. पण त्यांच्या गीतामुळे ते आपल्यात आजही अजरामर आहेत. त्यांच्यासाठी म्हणावंस वाटतं…

       ‘ जाने कहां गये वो दिन कहते थे तेरी याद में, नजरोंको हम बिछायेंगे

         चाहे कहीं भी तुम रहो, चाहेंगे तुमको उम्रभर, तुमको न भूल पाएंगे ’  

हिंदी चित्रपट संगीताच्या गोल्डन इरा काळातील दर्जेदार माहितीपूर्ण लेखांसाठी क्लिक करा 

jayashree jaishankar danve
Jayashree Jaishankar Danve
+ posts

जयश्री जयशंकर दानवे, कोल्हापूर

   (एम.ए. संगीत विशारद) (ज्येष्ठ लेखिका)

*  ताराराणी विद्यापीठात उषाराजे हायस्कूलमध्ये २३ वर्षे संगीत शिक्षिका म्हणून कार्यरत.

*  निवृत्तीनंतर चरित्रग्रंथ,व्यक्तिचित्रण,कथा संग्रह,ललित लेख अशा विविध विषयांवर आजवर

   ३१ पुस्तके प्रकाशित 

*  ‘कलायात्री’ चरित्रग्रंथाला आजवर १० मान्यवर संस्थांचे पुरस्कार.

*  वैयक्तिक ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ व इतर अनेक पुस्तकांच्या पुरस्काराने पुरस्कृत.

*  नियतकालिके व मासिकातून असंख्य लेख प्रसिद्ध.

*  अनंत माने दिग्दर्शित ‘पाच रंगांची पाच पाखरे’ व ‘पाहुणी’ या चित्रपटासाठी पार्श्वगायन.

*  ‘ड्रीम मेकर्स’ व ‘म्युझिकल नाईट’ ऑर्केस्ट्रात गायिका म्हणून सहभाग.

*  शेगांवच्या गजानन महाराजांच्या जीवनावरील भक्तीगीतांचे १०० हून अधिक कार्यक्रम.

*  समूहगीत,नाटक,नृत्य,बालनाट्य अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचे दिग्दर्शन.

*  गेली ३५ वर्षे ‘नटश्रेष्ठ जयशंकर दानवे’ यांच्या स्मृतीचे जतन तसेच कलायात्री पुरस्काराचे  

   संयोजक म्हणून सहभाग.

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.