– विवेक पुणतांबेकर

“अजीब दास्तां है ये … कहाँ शुरू कहाँ ख़तम ..”
‘दिल अपना और प्रीत पराई’ चे हे मधुर गीत ऐकताक्षणी राज कुमार, मीना कुमारी, नादिरा यांच्या बरोबर एक आणखी एक अभिनेत्री आठवते ‘शम्मी’ उर्फ ‘नर्गिस रबाडी’. या पारसी देखण्या अभिनेत्रीचा हा जीवनपट…आज तिच्या स्मृतिदिनानिमित्त. 

२६ एप्रिल १९२९ ला नारपोल संजाण येथे पारसी कुटुंबात आजोळी नर्गिसचा जन्म झाला. तिचे वडिल मुंबईच्या पारसी अग्यारीत पुजारी होते. तिच्या जन्मानंतर काही महिन्यातच तिला घेऊन तिची आई आणि बहिण मुंबईला आल्या. या सनातनी पारसी कुटुंबाचा सिनेजगताशी कसलाही संबंध नव्हता. नर्गिस तीन वर्षाची असताना अचानक वडिल गेले. या संकटाला सामोरे जाणे भाग होते. आई ने पारसी समाजात स्वयंपाकाची कामे करायला सुरुवात केली. तिच्या मावशी बरोबर परेल च्या टाटा ब्लाॅकस् मधे या तिघी १९३० ते १९४७ पर्यंत रहात होत्या. मोठ्या झाल्यावर दोघी बहिणीं नोकरी करुन शिक्षण पूर्ण करण्याच्या प्रयत्नात होत्या. नर्गिसने टाटांच्या खेळण्याच्या कारखान्यात नोकरी करायला सुरुवात केली. मोठ्या बहिणीने शालेय शिक्षण संपवून जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीत सेक्रेटरी म्हणून नोकरी मिळवली. १९४२ साली कंपनीने औषधी गोळ्यांची निर्मिति सुरु केली. नर्गिस आपले शालेय शिक्षण पुर्ण करुन पॅकर म्हणून कंपनीत शंभर रुपये महिना पगारावर नोकरीला लागली. मोठी बहिण पिपल्स थिएटर या नाट्यसंस्थेत जात असे. तिच्या बरोबर नर्गिस पण जात असे. अभिनयाचे संस्कार नकळत तिच्यावर होत होते. इथेच तिची ओळख मेहबूब खानचे सहाय्यक चिमणकांत गाधी यांच्याशी झाली. चिमणकांत गांधी आणि अभिनेता शेख मुख्तार यांची मैत्री होती. शेख मुख्तार आपला सिनेमा उस्ताद पेड्रो निर्माण करत होते. सहनायिकेच्या शोधात होते. चिमणकांत गांधींनी नर्गिस चे नाव सुचवले. शेख मुख्तार ना शंका होती की या पारसी मुलीला हिंदी नीट बोलता येते की नाही. पण नर्गिस भेटल्यावर सगळ्या शंका दूर झाल्या. तिला सहनायिकेची भुमिका मिळाली. सी.रामचंद्र यांनी संगीतबध्द केलेला हा सिनेमा १९५१ साली रिलिज झाला. उस्ताद पेड्रो चे दिग्दर्शक होते तारा हरिश. ३० आणि ४० च्या दशकात दिग्दर्शक तारा हरिश नावाजलेले होते. औरत, बहन, एक ही रास्ता, जेलयात्रा या सारखे गाजलेले सिनेमे त्यांनी दिग्दर्शित केले होते. त्यांना गायक मुकेश निर्मित मल्हार सिनेमा दिग्दर्शित करायला मिळाला. यात नायिकेची भुमिका त्यांनी नर्गिस ला दिली.त्यावेळी जद्दनबाईची मुलगी नर्गिस नामवंत अभिनेत्री होती. या साठी तारा हरिश यांनी नर्गिस रबाडी चे नाव बदलले. मल्हार सिनेमापासून ती शम्मी नावाने ओळखली गेली.

actress shammi

मल्हार सिनेमाच्या वेळी शम्मीची मैत्री नर्गिस बरोबर झाली. मल्हार सिनेमाने शम्मीला जरा स्थैर्य आले. नंतर ती वांद्रे येथे रहायला गेली. नर्गिस च्या शिफारसी मुळे शम्मीला ‘मिस इंडिया’ सिनेमात सहाय्यक अभिनेत्रीचा रोल मिळाला. नर्गिस ला त्या काळात एक लाख रुपये मानधन मिळायचे तर शम्मीला दहा हजार रुपये मिळत. १९५२ सालच्या ‘संगदिल’ सिनेमात शम्मीला दिलीपकुमार बरोबर काम करायची संधी मिळाली. श्रवणीय संगीत असूनही दिलिप कुमार मधुबाला जोडीचा हा सिनेमा अपयशी झाला. ‘संगदिल’ च्या अपयशामुळे काही महिने शम्मीला काम मिळाले नाही. घरखर्च तिच्यावर अवलंबून होते म्हणून येईल ती कामे स्वीकारणे भाग होते. महिपाल, मनहर देसाई, करण दिवाण या नायकांबरोबर तिला नायिकेच्या भुमिका मिळाल्या. के.असिफच्या ‘मुसाफिरखाना’ मधली जाॅनी वाॅकर बरोबरची विनोदी भुमिका गाजल्यावर तश्याच भुमिका मिळायला सुरुवात झाली. यानंतर इल्जाम (१९५४), पहली झलक (१९५५), बंदिश (१९५५), आझाद (१९५५), सन आॅफ सिंदाबाद (१९५५), हलाकू (१९५६), खजांची (१९५८), घरसंसार (१९५८), आखरी दाव (१९५८), कंगन (१९५९), भाई बहन (१९५९) आणि दिल अपना और प्रीत पराई (१९६०) या यशस्वी सिनेमात शम्मीने केलेल्या सहाय्यक अभिनेत्रीच्या भुमिका खूप गाजल्या. एका मुलाखतीत शम्मीने सांगितले होते की माझे करियर आखीव रेखीव कधीच नव्हते. मिळेल त्या भुमिकेत ती समाधानी होती. यामुळेच २०० पेक्षा जास्त सिनेमात तिने सहाय्यक अभिनेत्रीच्या भुमिका केल्या.

shammy aunty

१९६२ ते १९७० पर्यंत विनोदी ढंगाच्या तसेच खलनायकी स्वरुपाच्या भुमिका तिच्या वाट्याला आल्या. हाफ तिकीट, इशारा, जब जब फूल खिले, प्रीत ना जाने रीत, आमने सामने, उपकार, इत्तेफाक, साजन, डोली, राजासाब आणि द ट्रेन या सिनेमातल्या तिच्या भुमिका गाजल्या. ७० च्या दशकात पूरब और पश्चिम आणि अधिकार सिनेमापासून आईच्या भुमिका साकारायला सुरुवात केली. समाज को बदल डालो या सिनेमातल्या भुभिकेसाठी बाॅम्बे फिल्म जर्न्यालिस्ट चा सर्वोकृष्ट सहाय्यक अभिनेत्री चा पुरस्कार मिळाला. १९७० साली तिने निर्माता दिग्दर्शक सुलतान अहमद बरोबर विवाह केला. शम्मीच्या सिनेजगतातल्या ओळखीमुळे सुलतान अहमद ला सिनेमे मिळत गेले. राजेश खन्ना, सुनील दत्त आशा पारेख यांनी सुलतान अहमद च्या सिनेमात अभिनय केला. तिने सुलतान अहमद बरोबर हिरा आणि ‘गंगा की सौंगंध’ सिनेमाची सह निर्मिती केली. मातृसुख तिला लाभले नाही. बाहेरच्या निर्मात्यांच्या आॅफर्स नाकारुन तिने चूक केली. नवीन घर घेतले. पण संसारात वादविवाद व्हायला लागल्यावर नाईलाजाने सात वर्षानंतर विभक्त होऊन नेसत्या कपड्यांसकट ती आपल्या जुन्या घरी परतली. तिचे हाल पाहून नर्गिसने तिला ‘बर्नींग ट्रेन’ सिनेमातला रोल द्यायला लावला. राजेश खन्ना ने पण तिच्यासाठी प्रयत्न करुन रेड रोज, आंचल, कुदरत, आवारा बाप आणि स्वर्ग या सिनेमात तिला भुमिका द्यायला लावल्या.

actress shammi

यानंतर १९८५ साली ‘पिघलता आसमान’ सिनेमाची निर्मिती तिने सुरु केली. सुरुवातीला राजेश खन्ना प्रमुख भुमिकेत होता. पण दिग्दर्शक इस्माईल श्राॅफ बरोबर च्या मतभेदामुळे तो बाहेर पडला. मग शशिकपूर ला घेऊन परत शूटींग सुरु झाले. पण दिग्दर्शकाच्या तर्‍हेवाईक स्वभावामुळे त्याला काढून शम्मीने हा सिनेमा दिग्दर्शित केला. पण हा सिनेमा अपयशी झाला. यासाठी झालेल्या कर्जातून तिला बाहेर काढण्यासाठी राजेश खन्ना ने दूरदर्शन मालिकेत तिला काम दिले. यानंतर तिला सतत कामे मिळत गेली. देख भाई देख, जबान संभालके, श्रीमान श्रीमती, फिल्मी चक्कर या तिच्या गाजलेल्या मालिका.

आपली मैत्रिण आशा पारेख बरोबर बाजे पायल, कोरा कागज, कंगन, कुछ पल साथ तुम्हारा या मालिकांची निर्मिती तिने केली. शम्मीची मोठी बहिण मणी रबाडी फॅशन डिझायनर बनली. तिला तिच्या कामाबद्दल राष्ट्रपतिंचे बक्षिस मिळाले. सुलतान अहमद च्या पुतण्यावर इक्बाल रिझवी वर शम्मीचा फार जीव होता. ती त्याच्यावर पुत्रवत माया करत असे. शम्मी जूहूच्या गुलमोहर सोसायटीत रहात असे. तिला वाचनाची आणि संगीताची फार आवड होती. तिच्या संग्रहात उत्तमोत्तम पुस्तके आणि सी.डी.होत्या. स्वभावाने अत्यंत धार्मिक होती. गणेश भक्त होती. घरात गणेशाच्या शेकडो मुर्ती होत्या. ललिता सहस्रनाम आणि हनुमान चालिसाच्या स्मरणाने तिचा दिवस सुरु व्हायचा. घरात असताना विष्णुसहस्रनाम म्हणायची. आपल्या मनाने मस्तीत जगली. ‘दैवाने मला कधीच कमी पडून दिले नाही’ असे म्हणायाची. मिळालेल्या भुमिकांवर संतुष्ट होती.

Waheeda Rehman, Asha Parekh, Shammi and Helen
Waheeda Rehman, Asha Parekh, Shammi and Helen

शम्मीने १९९० ते २००० मध्ये कुली नं.वन, हम, मर्दोवाली बात, गुरुदेव, गोपी किशन, हम साथ साथ है या यशस्वी सिनेमात कामे केली. वाढत्या वयामुळे सिनेमात काम मिळणे बंद झाले. तिचे पडद्यावरचे शेवटचे दर्शन शिरीन फरहाद की तो निकल पडी या २०१३ च्या सिनेमात झाले. पारसी महिलेची भुमिका होती तिची. योगायोग म्हणजे ज्या डेझी इराणी ने तिच्या बंदिश सिनेमा मध्ये बालकलाकाराची भुमिका केली होती तिने या सिनेमात सुनेची भुमिका केली होती. वाढते वय व ढासळती तब्येत यामुळे ती रिझवीकडे अंधेरीला मिल्लत नगरला रहायला गेली. प्रदीर्घ आजारामुळे ५ मार्च २०१८ ला वयाच्या ८९ व्या वर्षी शम्मी या जगातून गेली.

Vivek Puntambekar
+ posts

Science Graduate from Somayya College in the year 1977.

Started Carrier in Kohinoor Mills in SQC Dept. After the closer of mill, began carrier as a Medical Sales Representative.

Retired as Zonal Sales Manager. Since childhood fond of Films and film music.

Wrote programs for FM Radios. Wrote articles in various Diwali magazines.

Participated in Doordarshan program. Performing an audio visual programs based on Golden era of hindi music.

Regularly writing articles for newspaper. Die hard fan of Raj Kapoor and his entire team.

Leave a comment