– जयश्री जयशंकर दानवे, कोल्हापूर

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Remembering Hindi Cinema’s Finest Actor, Screenwriter, Comedian, and Producer Kader Khan. कादर खान  हे हिंदी-उर्दू चित्रपटांचे पटकथा लेखक आणि त्यांत अभिनय करणारे नट होते. ते एक असे कलाकार होते ज्यांच्यात भिन्न प्रकारच्या माणसांच्या प्रवृत्ती साकार करण्याची अभिनय क्षमता होती. ते सिनेमाच्या लेखन क्षेत्रात कार्यरत असणारे अवलिया कलाकार होते. त्यांचा जन्म बलुचिस्तान येथे १८ डिसेंबर १९३७ मध्ये झाला. त्यांच्या जन्माआधी त्यांना ३ भाऊ होते. परंतु दुर्दैवाने ते लहानपणीच वारले. त्यामुळे कादरचेही तसे काही होऊ नये, असे आईला वाटे. कादर जेव्हा एक वर्षाचे होते, तेव्हा त्यांच्या आईने तलाक घेतला अन कादरला घेऊन त्या मुंबईला आल्या. अतिशय गरीबीत ते वाढले. थोडे मोठे झाल्यावर ‘मला कुठल्यातरी कामाला जाऊ दे’ असे ते आईला सांगू लागले. पण आईने त्यांना शिक्षण घ्यायला लावले व बाकीच्या सर्व अडचणी स्वतः झेलल्या.

मुंबईच्या म्युनिसिपल शाळेत त्यांनी शिक्षण घेतले. शालेय काळात आईने नमाजासाठी मशिदीत पाठवले की ते नमाजाला दांडी मारून कबरस्तानात जात व दोन कबरींच्यामध्ये बसून स्वतःशीच संवाद करीत फिल्मी डायलॉग्ज बोलत. एकदा असे करताना त्यांना अशरफ खान यांनी पाहिले. त्यांच्या नाटकात काम करण्यासाठी त्यांना एका आठ वर्षाच्या मुलाची गरज होती. अशरफ खान यांनी त्यांना आपल्या नाटकात काम दिले.

त्यानंतर ते पदवीधर झाले. १९७० ते ७५ मध्ये काही काळ मुंबईच्या वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीत प्रोफेसर म्हणून ते कार्यरत होते. कॉलेजमध्ये असताना त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घ्यायला सुरुवात केली. एकदा त्यांचे नाटक ‘लोकल ट्रेन’ सादर करताना जज होते लेखक आणि निर्माता राजेंद्रसिंह बेदी आणि नरेंद्र बेदी. त्या दोघांनी कादरना चित्रपट लिहिण्याविषयी प्रोत्साहित केले. १५०० रुपयात नरेंद्र बेदींच्या ‘जवानी दिवानी’ चित्रपटासाठी त्यावेळी त्यांनी लिखाण करण्यास प्रारंभ केला. ती फिल्म त्यांच्यासाठी मैलाचा दगड ठरली. त्यानंतर त्यांचा फिल्मी रस्ता खुला झाला. मग त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. ‘रोटी, धरम वीर , सुहाग, नसीब, गंगा जमना सरस्वती, मुक्कदर का सिकंदर अशा असंख्य चित्रपटासाठी त्यांनी लेखन केले. एकदा तर अभिनेता दिलीपकुमार यांनी त्यांचे नाटक पाहिले आणि ते त्यांच्या कामावर इतके खुश झाले की त्यांनी आपल्या ‘सगीना महतो, बैराग’ या दोन चित्रपटासाठी त्यांना साईन केले. अशा रीतीने कादर खान यांची फिल्मी कारकीर्द जोरात सुरू झाली.

त्यांचा फिल्मी अभिनय प्रवास १९७३ मध्ये सुरु झाला. यश चोप्रा यांच्या  ‘दाग’ चित्रपटात त्यांनी प्रथमच काम केले, सोबत राजेश खन्ना होते. ज्या चित्रपटाची कथा कादर खान लिहीत, किंवा ज्या चित्रपटात ते अभिनय करीत त्या चित्रपटांत ते स्वतःला पूर्णपणे झोकून देत. चित्रपटाचा ते कणा असत. त्यांच्या कथेत त्यांना मोडतोड होताना दिसली तर ते दिग्दर्शक-निर्मात्याशी भांडत, आणि कथेत का बदल केला हे दिग्दर्शकाने पटवून दिले की शांत होत. नंतर मात्र त्यांचे दिग्दर्शकाला पूर्ण सहकार्य असे. दक्षिणी भारतीय चित्रपटांच्या संवादांचे ते सुरेखपणे हिंदीत भाषांतर करीत. 

कादरखान म्हणजे ‘विनोदाचा बादशहा’ हे नंतरच्या काळात हिंदी चित्रपटसृष्टीने मान्य केले होते.कारण ९० च्या दशकातील प्रत्येक चित्रपटप्रेमी कादरखान या नावाशी परिचित होता कारण एकच त्यांचे विनोद. त्यांचे प्रत्येक चित्रपटात ५ ते १० कॉमेडी सीन जरूर असायचे. पण हा कलाकार अभिनयात इतका मुरब्बी होता की त्यांनी कित्येक ग्रे शेडच्या भूमिका तसेच संवेदनशील भूमिका बखूबी निभावल्या. अशा प्रकारे वेगवगळ्या प्रकारच्या व्यक्तिरेखा साकारून त्यांनी आपली एक वेगळी ‘पहचान’ निर्माण केली.

त्यांच्या विनोदी ढंगाच्या अभिनयाची करामत डेव्हिड धवन यांच्या अनेक चित्रपटातून पहावयास मिळते. गोविंदा सोबत त्यांची जोडी प्रसिद्ध झाली. तसेच शक्तीकपूर बरोबर त्यांनी जवळजवळ १०० चित्रपट केले. त्यांनी विनोदासह गंभीर भूमिकाही तेवढ्याच ताकदीने निभावल्या. १९८३ ची कुली ही त्यांची फिल्म त्यांच्या करिअरमधील सुपरहिट फिल्म होती. दुष्ट खलनायक म्हणून त्यांचे हास्य थरकाप उडवणारे असले तरी त्यांच्या चेहऱ्यावरचे तेच हास्य निरागस हास्यात रुपांतरीत करण्याची किमया त्यांच्या अभिनयात होती. त्यांनी एका बाजूला जवळजवळ ३०० चित्रपट आपल्या अभिनयाने गाजवले तर दुसरीकडे २५० चित्रपटांसाठी लेखन केले. अनेक दिग्गज कलाकाराबरोबर काम केल्याने ते हमेशा प्रसिद्धीच्या झोतात राहिले. त्यांनी चित्रपटासोबत काही सिरीयलही केल्या.

गालिब आणि मंटो यांची प्रेरणा घेऊन त्यांनी आपल्या लिखाणासं सुरुवात केली. संवादलेखक म्हणूनही त्यांची एक वेगळी ओळख सिनेजगतात असून त्याची उदाहरणे म्हणजे त्यांचे आजही न विसरणारे त्यांचे वेधक आणि वेचक संवाद. उदा…..

 जैसी करनी वैसी भरनी : सुख तो बेवफा तवायफ की तरह है  जो आज इसके पास कल उसके पास l अगर इन्सान दुख से दोस्ती कर ले तो फिर जिंदगी में कभी उसको सुख की तमन्ना ही नहीं रहेगी l हराम की दौलत इन्सान को शुरू शुरू में सुख जरूर देती है मगर बाद में जाकर एक ऐसे दुख के सागर में ढकेल देती है जहां मरते दम तक सुख का किनारा कभी नजर नहीं आता l

नसीब :  औरों के लिए गुनाह सही हम पिएं तो शबाब बनती है l अरे सौ गमों को निचोडने के बाद एक कतरा शराब बनती है l  

मुकद्दर का सिकंदर : जिंदा है वो लोग जो मौत से टकराते हैं l मुर्दों से बदतर है वो लोग जो मौत से घबराते हैं l

आतिश : जब जिंदगी की गाडी इश्क के पेट्रोल पर अटक जाए तो उस गाडी में थोडासा शादी का पेट्रोल डाल देना चाहिए तो गाडी आगे बढ जाती है l

अमर अकबर एंथनी : अपन फेमस आदमी है l बडा बडा पेपर में अपनका छोटा छोटा फोटो छ्पता है l लकी मैन l

कानून अपना अपना : हम का है मालूम l RDU यानी रिक्शा ड्रायव्हर युनियन का लीडर हूं l इसके अलावा HGU मतलब हाथ गाडी की जो युनियन है  उसका भी लीडर हूं l कोई मामूली आदमी नहीं हूं l

सपूत : कितना फर्क है तुम में और मुझमें l तुम दुश्मन को ताने मारते हो और मैं दुश्मन को गोली मारता हूं l

कादरखानना जवळजवळ ९ वेळा कॉमेडीयन अवार्डसाठी फिल्मफेअरमध्ये नामांकन मिळाले. १९८२ मध्ये ‘मेरी आवाज सुनो’ चित्रपटातील बेस्ट डॉयलॉग बद्दल फिल्मफेअर अवार्ड, १९८४ मध्ये हिम्मतवाला, १९८६ मध्ये आज का दौर, १९९० मध्ये सिक्का या चित्रपटांसाठी बेस्ट कॉमेडीयन अवार्ड, १९९१ मध्ये बाप नंबरी बेटा दस नंबरी, १९९२ मध्ये हम, १९९४ मध्ये आंखे चित्रपटातील बेस्ट कॉमेडीयन फिल्मफेअर अवार्ड, १९९३ मध्ये ‘अंगार’ चित्रपटाकरिता बेस्ट डॉयलॉग फिल्मफेअर अवार्ड, १९९५ मध्ये मैं खिलाडी तू अनाडी, १९९६ मध्ये कुली नं १, १९९७ मध्ये साजन चले ससुराल आणि १९९९ मध्ये दुल्हे राजा या सर्व चित्रपटांकरिता बेस्ट कॉमेडीयन फिल्मफेअर अवार्ड, तसेच फिल्म इंडस्ट्री आणि सिनेमामधील योगदानाबद्दल २०१३ मध्ये कादरखानना ‘साहित्य शिरोमणि अवार्ड’ ने सन्मानित केले गेले.

 मध्यंतरी कादरखाननी कलाकार मंडळी राजनीती मध्ये जातात त्यावर आपले मत मांडले होते. ते म्हणाले, ‘मी जेवढी कलाकार मंडळी राजनीती मध्ये गेलीत त्यांना सांगू इच्छितो की त्यांनी परत यावं कारण राजनीती आपली मंझिल नाही आणि ही राजनीती आपल्या करिअरला धोका पोहचवू शकते.’ इतकेच नाही तर त्यांनी अमिताभ बच्चनना देखील राजनीतीमध्ये न जाण्याचा सल्ला दिला होता. सन २०१५ मध्ये कादरखान पुन्हा बॉलीवूडच्या जगतात परत आले तेव्हा त्यांचे सहकलाकार सुपरस्टार अमिताभ बच्चननी त्यांचं स्वागत केलं होतं. त्यांच्याविषयी विनम्रतापूर्वक त्यांनी आपले मत मांडले की, ‘कादरखान एक महान सहकलाकार, रायटर असून माझ्या खूपशा यशस्वी चित्रपटात कादरखान यांचे योगदान आहे. ते पुन्हा इंडस्ट्रीमध्ये परत आले आहेत मी त्यांना वेलकम म्हणतो.’

त्यांची पत्नी आजराखान आणि त्यांची दोन मुले शहानवाज आणि सरफराज हे त्यांचे कुटुंब. ते त्यांच्या मुलांना सेटवर कधीही नेत नसत. आपल्या मुलांनी खूप शिकावं अशी त्यांची इच्छा होती. त्यांच्या मुलासाठी त्यांनी कामातून सवड काढून दिलेली पाच मिनिटेसुद्धा मुलांना ‘क्वालीटी टाईम’ वाटत असत, असे त्यांची मुले आजही सांगतात. ते मुंबईला राहात असले तरी भारतासोबत कॅनडाचेही नागरिकत्व त्यांना मिळाले होते. अखेरच्या काळात ते आपल्या कुटुंबासोबत कॅनडामध्ये होते. असा हा अवलिया कलाकार ३१ डिसेंबर २०१८ ला सिनेजगताला सोडून गेला. पण आजतागायत त्यांच्या विनोदी भूमिका तसेच त्यांचे संवाद प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिले आहेत. अशा हरहुन्नरी कलाकाराला,लेखकाला सर्व रसिकांची भावपूर्ण श्रद्धांजली !

हिंदी सिनेमाच्या १९७० व ८० च्या दशकातील अनेक दर्जेदार लेखांसाठी क्लिक करा 

jayashree jaishankar danve
Jayashree Jaishankar Danve
+ posts

जयश्री जयशंकर दानवे, कोल्हापूर

   (एम.ए. संगीत विशारद) (ज्येष्ठ लेखिका)

*  ताराराणी विद्यापीठात उषाराजे हायस्कूलमध्ये २३ वर्षे संगीत शिक्षिका म्हणून कार्यरत.

*  निवृत्तीनंतर चरित्रग्रंथ,व्यक्तिचित्रण,कथा संग्रह,ललित लेख अशा विविध विषयांवर आजवर

   ३१ पुस्तके प्रकाशित 

*  ‘कलायात्री’ चरित्रग्रंथाला आजवर १० मान्यवर संस्थांचे पुरस्कार.

*  वैयक्तिक ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ व इतर अनेक पुस्तकांच्या पुरस्काराने पुरस्कृत.

*  नियतकालिके व मासिकातून असंख्य लेख प्रसिद्ध.

*  अनंत माने दिग्दर्शित ‘पाच रंगांची पाच पाखरे’ व ‘पाहुणी’ या चित्रपटासाठी पार्श्वगायन.

*  ‘ड्रीम मेकर्स’ व ‘म्युझिकल नाईट’ ऑर्केस्ट्रात गायिका म्हणून सहभाग.

*  शेगांवच्या गजानन महाराजांच्या जीवनावरील भक्तीगीतांचे १०० हून अधिक कार्यक्रम.

*  समूहगीत,नाटक,नृत्य,बालनाट्य अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचे दिग्दर्शन.

*  गेली ३५ वर्षे ‘नटश्रेष्ठ जयशंकर दानवे’ यांच्या स्मृतीचे जतन तसेच कलायात्री पुरस्काराचे  

   संयोजक म्हणून सहभाग.

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.