-जयश्री जयशंकर दानवे, कोल्हापूर.

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

गीतकारांच्या मांदियाळीत अग्रस्थानी असलेलं मोठं नाव म्हणजे गीतकार राजेंद्रकृष्ण (Lyricist Rajendra Krishan). आपल्या मायबोलीतील ग. दि. माडगूळकरांप्रमाणे राजेंद्रजी शीघ्रकवी होते. दिग्दर्शकाने प्रसंग सांगावा आणि राजेंद्रकृष्ण यांनी हुकमी गीत झरझर आपल्या हातातील सिगरेटच्या डब्यावर लिहावं अशी त्यांची ओळख होती. ६ जून १९१९ रोजी जलालपूर जेहान येथे राजेंद्रकृष्ण यांचा जन्म झाला. त्यांचे पूर्ण नाव राजेंद्रकृष्ण दुग्गल. अगदी शालेय जीवनापासून त्यांचा कवितेकडे ओढा होता. इतकेच नाही तर, कवितेची उर्मी त्यांनी जोपसलीसुद्धा होती. (Remembering Rajendra Krishan, the Multi-Talented Lyricist, Poet and Writer from Golden Era of Hindi Film Music)

अनेक देशी-विदेशी साहित्यकृतींचे त्यांनी वाचन केले होते त्या काळात मैफिली, मुशायरा यांचे आयोजन मोठ्या प्रमाणावर केले जायचे. अशा कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित राहून त्यांनी आपल्या जाणिवांच्या कक्षा जोपासल्या आणि म्हणूनच ते गीतकार- कवी म्हणून लवकरच प्रसिद्ध झाले. फिराक गोरखपुरी आणि एहसान दानिश यांचे ऋण राजेंद्रकृष्ण मान्य करत. हे सर्व करीत असताना ते नोकरीसुद्धा करीत होते.सिमला नगरपालिकेत त्यांनी कारकून म्हणून काम केले आणि त्याचवेळी ते एक आघाडीचे कवी म्हणून आसपासच्या गावात प्रसिध्द होते. ज्या इमारतीत त्यांचे कार्यालय होते त्याच्या वरच्या मजल्यावर एका फोटो स्टुडीओत पुढील काळात चरित्र अभिनेता आणि खलनायक म्हणून नावारूपास आलेले प्राण प्लेट री-टचिंगचे काम करायचे. त्याचवेळी एकमेकांशी त्यांची ओळख झाली.

 सिमला येथील अनेक कवीसंमेलनात त्यांची नियमित हजेरी असे.सुरुवातीच्या काळात ते ‘दर्द शिमलवी’ (सिमल्याचे रहिवासी असल्याने ‘शिमलवी) या नावाने शायरी करत. उर्दू शायरी त्यांच्या नसानसांतून वहात होती. हिंदी, उर्दू भाषेतील बारकावे जाणून घेण्यासाठी त्यांनी फिराक, पंत निराला यांचे काव्यसंग्रह अभ्यासले.एका मुशायरात जिगर मुरादाबादीनी या तरुण शायरला शेर ऐकवण्याची विनंती केली तेव्हा त्यांनी शेर पेश केला ‘कुछ इस तरह वो मेरे पास आ बैठे है, जैसे आग से दामन बचाए बैठे है’ हे ऐकताच जिगरनी दिलेली कौतुकाची थाप पाहून राजेंद्रजींच्या मनात आत्मविश्वास निर्माण झाला आणि शायरीच्या वेडापायी त्यांनी सिमल्यातील सरकारी नोकरीवर लाथ मारली.

मुंबईची चित्रपटसृष्टी त्यांना खुणावत होतीच. कविता आणि गीते याशिवाय त्यांचा गद्य लेखनाकडे कल होताच. ही सगळी स्वप्ने घेऊन ते १९४२ च्या सुमारास मुंबईत दाखल झाले. चित्रपट गीतकार बनण्याची स्वप्ने बघणाऱ्या राजेंद्रजींची पहिली चार वर्षे खूप कष्टाची गेली. त्यानंतर त्यांना ‘जनता’ नावाच्या चित्रपटाची पटकथा आणि दोन गीते लिहिण्याची संधी मिळाली. १९४७ मध्ये त्यांनी ‘जंजीर’ चित्रपटाची काही गीते लिहिली. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात चित्रपटांची पटकथा लिहूनच केली होती. राजेंद्रकृष्ण यांच्या गाण्यावर एक नजर टाकली तर आपल्या लक्षात येतं की, त्यांनी सर्वप्रकारच्या रचना केल्या होत्या. गजलसदृश्य गीत हा त्यांचा पिंड होता,तरीही चित्रपटासाठी त्यांनी सगळे प्रकार हाताळले. एक चित्रपट कथालेखक व संवादलेखक म्हणून त्यांनी येथे उदंड मान्यता मिळवली असली तरी चित्रपटव्यवसायात त्यांना सर्वात प्रथम प्रकाशात आणले ते त्यांच्यातील गीतकारानेच.

गीतकार म्हणून राजेंद्रकृष्ण यांचे नाव पुढे आलं ते एका दुर्दैवी घटनेनंतर. महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर त्यांनी एक दीर्घ कविता लिहिली होती..‘सुनो सुनो ऐ दुनियावालो, बापूकी ये अमरकहानी’  या गाण्यामुळे ते एकदम प्रकाशझोतात आले. खऱ्या अर्थाने त्यांचे भाग्य उजळले ते १९४८ मध्ये. मोहम्मद रफी यांनी गायलेलं हे गीत हुस्नलाल भगतराम यांनी स्वरबद्ध केलं होतं. चार भागांतील या गाण्यांमध्ये गांधीजींच्या एकंदर जीवनाचा सगळा इतिहासच आहे.

या ध्वनीमुद्रिकेचा खप प्रचंड झाला. राजेंद्रकृष्ण हे नाव आघाडीचा गीतकार म्हणून स्वीकारले गेले त्याकाळातील हे गाणे. ते लिहिताना या गाण्याची ध्वनिमुद्रिका निघावी वा एखाद्या चित्रपटासाठी या गाण्याचा उपयोग व्हावा, असा कोणताही हेतू त्यांच्या मनात नव्हता.  पण गाण्याचे कागद फेमस पिक्चर्सचे बाबुराव पै यांच्या हाती पडले तेव्हा त्यांच्या डोक्यात एक वेगळीच कल्पना चमकून गेली. या गाण्याचा वापर करून गांधीजींच्या जीवनावरील एक लघुपट तयार करता येईल असे वाटून पैनी ताबडतोब त्या दृष्टीने हालचाल सुरु केली. त्यानंतर गांधीजींच्या जीवनावरील ‘बापू की अमर कहानी’ हा लघुपट तयार झाला. या गाण्याचे एक वैशिष्ट्य हे होते की, हे गाणे लिहिताना राजेंद्रकृष्णनी आपला विवेक मात्र कोठेच सोडला नव्हता. यामुळे या गाण्यात नथुराम गोडसेचा नामोल्लेख त्यांनी कोठेही येऊ दिला नाही. ‘लेकीन उस दिन होनी अपना रूप बदलकर आयी और अहिंसाके सीनेपर हिंसाने गोली बरसाई’ या शब्दात गांधीहत्येचे वर्णन करून हिंसक प्रवृत्तीचा या गाण्यात त्यांनी फक्त निषेध केला. या गाण्यामुळेच ते कायमचे चित्रपट व्यावसायिक बनून गेले.

जनक पिक्चर्समध्ये राजेंद्रकृष्ण यांचा प्रवेश झाला तेथे ‘जनता’ या चित्रपटातील ‘गोरी घुंघट के पट खोल, आया है आज मेरे प्यारका दिन आया है’ ही दोन गाणी लिहिली. तिथे त्यांचा पगार होता दरमहा सहाशे रुपये; पण या संस्थेची परिस्थिती हलाखीची झाल्यामुळे त्यांनी फेमस पिक्चर्समध्ये प्रवेश केला. तेथे ‘नर्गिस’ या चित्रपटाची निर्मिती चालू होती. एका रेपचे चित्रण व्हायचे होते. हे चित्रण सूचकतेने दाखवण्यासाठी राजेंद्रजींच्या डोक्यात एक कल्पना आली. नायक व्हायोलीन वाजवत आहे. व्हायोलीनच्या आवाजातला कंप एकसारखा वाढत जातो आणि वाढलेल्या त्या कंपाच्या आवाजात नायकाच्या खोलीत असलेल्या आरशाच्या काचेला एक तडा जातो. ही कल्पना सर्वांना आवडली व सिनेमात घेतली गेली.

हुस्नलाल-भगतराम यांच्याबरोबर १९४८ मध्ये ‘आज की रात’ आणि ‘प्यार की जीत’ असे दोन चित्रपट राजेंद्रजींनी केले. यातील प्यार की जीत मधील सुरैय्याने गायलेल्या….. ‘तेरे नैनों ने चोरी किया, मेरा छोटासा जिया परदेसिया ’ या गाण्याने त्यांच्या लोकप्रियतेचे नवे दालन उघडले.याच संगीतकार जोडीने संगीत दिलेला ‘बडी बहेन’ (१९४९) मध्ये आला. त्यात राजेंद्रकृष्णांची गाणी होती. ‘चूप चूप खडे हो जरूर कोई बात है, पहली मुलाकात है जी पहली  मुलाकात है आणि चले जाना नही नैन मिलाके’ ही हलकी-फुलकी गाणी रसिकांना आवडली. लतादिदीचा आवाज प्रकाशात आणण्याची महत्वपूर्ण कामगिरी राजेंद्रकृष्ण यांनी लिहिलेल्या या दोन गाण्यांनी बजावली. या दोन चित्रपटांपैकी ‘प्यार की जीत’ या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद व काही गाणी त्यांनी लिहिली होती तर ‘बडी बहेन’ ची फक्त गाणीच त्यांनी लिहिली होती.

या चित्रपटानंतर लगोलग आला संगीतकार शामसुंदर यांचा ‘लाहोर’. देशाच्या विभाजनाचे दु:ख अनेकांनी भोगले होते, त्याची पार्श्वभूमी असलेला लाहोर भारतभर लोकप्रिय झाला. त्यातील गाणी हे त्याचे एक कारण होते. ‘बहारे फिर भी आयेगी, मगर हम तुम जुदा होंगे’ हे राजेंद्रकृष्ण यांचे शब्द ही जनतेच्या मनातील सल होती. लता मंगेशकरनी संगीत जीवनाच्या रौप्यमहोत्सवी प्रसंगी त्यांना आवडलेली जी दहा गाणी निवडली, त्यात राजेंद्रकृष्ण यांच्या बहारे फिर भी आयेगी या गाण्याला पहिला क्रमांक दिला होता. ‘दुनिया हमारे प्यारकी, यूंही जवा रहे’ हे युगलगीत याच चित्रपटातील. आजही हे गाणे हमेशा जवान बनले आहे. हुस्नलाल-भगतराम आणि शामसुंदर यांच्यामुळे राजेंद्रकृष्ण यांची सुरुवात अशी लोकप्रिय झाली असली तरी, त्यांच्या एकंदर कारकीर्दीचा विचार केला तर दोन संगीतकार मोठ्या प्रमाणात दिसतात सी.रामचंद्र आणि मदनमोहन हे ते दोन संगीतकार. सी.रामचंद्र यांच्यासाठी ‘आशा, आजाद, अमरदीप, समाधी, बारीश, अनारकली, शहनाई, अलबेला’ अशा अनेक चित्रपटांसाठी त्यांनी गाणी लिहिली.तसेच मदनमोहन यांच्यासाठी ‘पूजा के फूल, अदालत, मनमौजी, देख कबीरा रोया, आशियाना, जेलर, चाचा जिंदाबाद, जहां आरा, भाई भाई, गेटवे ऑफ इंडिया’. इ. चित्रपटांच्यासाठी सुंदर गाणी लिहिली.

१९४९ साली राजेंद्रकृष्ण यांनी सी.रामचंद्र यांच्या ‘पतंगा’साठी गाणे लिहिले होते ‘मेरे पिया  गये रंगून किया है वहांसे टेलिफून’  या गाण्याने लोकप्रियतेचे उच्चांक निर्माण केले. या गाण्यातील शब्दांचा शोध सुरु असताना टेलिफोनची घंटा खणखणली आणि त्यांनी टेलिफोन हा शब्द गाण्यासाठी पकडला.या गाण्याचा जन्म झाला त्यावेळी भारत व बर्मा या दोन देशात टेलिफोन लाईन सुरु झाली नव्हती, पण या गाण्याला लाभलेल्या लोकप्रियतेनंतर उभय देशातील टेलिफोन लाईन सुरु झाली. त्याच चित्रपटातील ‘ओ दिलवालो दिलका लगाना, अच्छा है पर कभी कभी’ ही गाणीसुद्धा लोकांनी डोक्यावर घेतली. खरे तर ‘रंगून, टेलिफोन’ असली यमके जुळवणारे कवी राजेंद्रकृष्ण नव्हते पण सिनेमाची एक वेगळीच परिभाषा आणि मागणी असते, त्यात ते खपून जाते याची त्यांना अटकळ होती. त्यामुळे सी.रामचंद्र यांच्या धूनप्रमाणे त्यांनी प्रसंगाला साजेसे गीत लिहिले. सी.रामचंद्र जनमानसाच्या मनातील सिनेमाचे अपील ओळखून होते. पतंगाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मद्रासला या चित्रपटाला मिळालेले यश. तोपर्यंत मद्रासला हिंदी चित्रपट फारसे लागत नव्हते अन लागले तर चालत नव्हते. सोळा आठवडे चाललेला मद्रासमधील हा पहिला हिंदी चित्रपट.

 यामुळे मद्रासच्या निर्मात्यांचे लक्ष राजेंद्रकृष्ण यांचेकडे वळले आणि पाहता पाहता ते ‘मद्रासकिंग’बनून गेले. मद्रासच्या कोणत्याही निर्मात्याचे पान त्यांच्या लेखणीशिवाय हालेनासे झाले. तेथे लोकप्रियतेचा त्यांनी एक नवा इतिहास घडवला. राजेंद्रकृष्ण व सी.रामचंद्र यांचे ‘आजाद, इन्सानियत, देवता, शारदा, अमरदीप’ यांसारखे चित्रपट मद्रासमध्ये गाजले. मद्रासकडील निर्माते राजेंद्रकृष्ण यांच्यावर खुश होते हे त्यांच्या चित्रपटांवरून दिसून येते. ‘भाई-भाई, भाभी, बरखा, मैं चूप रहूंगी’ या सर्व चित्रपटांतील गाणी यांचीच होती. संगीतकार वेगवेगळे असले तरी सी.रामचंद्र आणि मदनमोहन यांच्या संगीतात राजेंद्रकृष्ण एक प्रतिमा बनून येतात. दाक्षिणात्य निर्माते हे कायम जलद निर्मितीसाठी प्रसिद्ध होते. त्यामुळे लिहिण्यावर हुकुमत असणारे आणि साहित्याची जाण असणारे गीतकार त्यांनी निवडले. त्यामुळे साहजिकच राजेंद्रकृष्ण यांच्याशी त्यांचे सूर जुळले.

 ‘अलबेला’ (१९५१) चित्रपटामधील सर्व गाणी राजेंद्रकृष्ण यांनीच लिहिली होती. ‘शोला जो  भडके, दिल मेरा धडके आणि भोली सूरत दिलके खोटे, नाम बडे और दर्शन खोटे’ या गाण्यांनी लोकप्रियतेचे सर्व अंदाज चुकवून उच्चांक निर्माण केला. राजेंद्रकृष्ण आणि सी. रामचंद्र यांचे यातील अविस्मरणीय असे हे अंगाई गीत. ‘धीरेसे आजा री  आंखियनमें निंदिया तू आ जा री आजा’. ही तर हिंदी चित्रपटसंगीतातील सर्वोत्कृष्ट लोरी ठरावी.

१९५३ साली ‘अनारकली’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. राजेंद्रकृष्ण यांचा आणखी एक संपूर्ण गीतमय चित्रपट. ‘ये जिंदगी उसी की है जो किसीका हो गया’ हे गीत प्रसंगानुरूप चित्रपटात दोनवेळा येते. सलीम-अनारकली हे प्रेमीयुगुल भेटते तेव्हा अनारकली म्हणते….

‘ये जिंदगी उसीकी है, जो किसीका हो गया, प्यार ही में खो गया l

ये बहार, ये समा, कह रहा है प्यार कर, किसीकी आरजू में अपने दिल को बेकरार कर

जिंदगी है बेवफा, लूट प्यार का मजा l ’

चित्रपटातील दुसरा प्रसंग असा की, अनारकलीला भिंतीत चिणून मारत असताना ती म्हणते …

‘ए जिंदगी की शाम आ,तुझे गले लगाऊ मैं l तुझी मै डूब जाऊं मै जहां को भूल जाऊं मै

बस एक नजर मेरे सनम,अलविदा अलविदा l’

या दोन्ही गीतांची रचना करताना राजेंद्रकृष्ण यांनी समर्पक आणि अर्थवाही शब्द योजना केली आहे. असे ऐकिवात आहे की,रेकॉर्डिंगच्यावेळी या गाण्याची रंगीत तालीम तब्बल चौदा तास सुरु होती. हे गाणे सर्वाधिक पसंतीचे गाणे ठरले. ‘जिंदगी प्यार को दो चार घडी होती है, चाहे छोटी भी हो ये उम्र बडी होती है’ तसेच ‘जाग ए दर्द इश्क जाग’ ही हेमंतकुमारची गाणी आजसुद्धा पुन्हा पुन्हा ऐकली जातात.या चित्रपटाचे ‘जमाना ये समझे के हम पीके आये’ हे गाणे हायलाईट होते. 

     १९५५ च्या ‘आजाद’ या संगीतमय चित्रपटाची नऊ गीते राजेंद्रकृष्ण आणि सी.रामचंद्र यांनी एका रात्रीत तयार करून एक आगळाच विक्रम केला होता. रंभा-संभा, रॉक एंड रोल हे सी.रामचंद्र यांनी हिंदी चित्रपट संगीताला दिलेले एक नवे वळण. या वळणावर राजेंद्रकृष्ण त्यांचे सहाध्यायी होते. ‘समाधी’ चित्रपटात ‘गोरे गोरे ओ बाके छोरे’ हे गाणे बनत असताना सी. रामचंद्र यांचा जॉनी नामक एक सहाय्यक, जो गोव्याचा होता तो एक गोव्याचे लोकगीत गुणगुणत होता. त्याचे ‘टीका टीका’ हे बोल राजेंद्रजींनी अचूक पकडले आणि ‘गोरे गोरे’ हे हिंदी चित्रपट संगीतातील पहिले रंभा-संभा गीत जन्माला आले. तसेच ‘आशा’ या चित्रपटात ‘इना मीना डिका’ या रॉक एंड रोल गाण्याचा जन्म राजेंद्रकृष्ण यांच्या मुलांच्या चेंडूच्या खेळातील ‘इनी, मिनी, तिनी’ यातून झाला.

   १९५२ मध्ये ‘आशियाना’ चित्रपटासाठी राजेंद्रकृष्णनी संगीतकार मदनमोहन यांचेसाठी प्रथमच गाणी लिहिली. मदनमोहन यांचा पिंड मुळात गझलचा. ‘मेरा करार ले जा’ हे या चित्रपटासाठी राजेंद्रकृष्णनी गाणे लिहिले आणि मदनमोहनसोबत जणू करारच केला. ‘मैं पागल मेरा मनवा पागल’ हे तलत मेहमूद यांच्या आवाजातील गाणं. एरव्ही आपला विश्वासदेखील बसत नाही की, इना मीना डिका हे गाणं लिहिणारे राजेंद्रकृष्ण मैं पागल मेरा मनवा पागल सारखं गाणही लिहू शकतात. पुढे याच मदनमोहनसाठी त्यांनी ‘मेरा नाम अब्दुल रहेमान, पिस्तेवाला मै हूं पठान’ (भाई-भाई, १९५६) हे गाणं लिहिलं. ‘ए दिल मुझे बता दे, तू किसपे आ गया है, वो कौन है जो आकर खाव्बों पे छा गया है’  हे गीता दत्तच्या आवाजातले गाणे आजही लोकप्रिय आहे. राजेंद्रकृष्णच्या ‘कदर जाने ना’ या अप्रतिम गाण्याने गजलसम्राज्ञी बेगम अख्तर यांचे मन जिंकून घेतले होते.

     १९५७ साली ‘देख कबीरा रोया’ हा चित्रपट केवळ राजेंद्रकृष्ण यांच्या गीतामुळे आजही रसिकांच्या लक्षात आहे. यातील ‘कौन आया मेरे मनके द्वारे,तू प्यार करे या ठुकराए, मेरी वीणा तुम  बीन रोये’ सारखी गाणी गाजली होती. ‘हमसे आया न गया, तुमसे बुलाया न गया’ हे तलत मेहमूद यांच्या मखमली आवाजातील गीत रसिकांनी पुन:पुन्हा ऐकले. ‘गेटवे ऑड इंडिया’ मधील ‘सपने में सजनसे दो बाते,इक याद रही इक भूल गये’ या गीतांबद्दल काय बोलावे ? किती तरल शब्द. याच चित्रपटातील ‘दो घडी वो जो पास आ बैठे’ हे युगलगीतही खूप गोड आहे. 

     १९५८ च्या ‘अदालत’ मध्ये मदनमोहन यांच्या संगीतदिग्दर्शनाखाली राजेंद्रकृष्ण यांची गाणी होती त्यातील अर्थछटा फारच गहिऱ्या आहेत. या चित्रपटातील ‘यूं हसरतों के दाग, उनको ये शिकायत है,जाना था हमसे दूर’ या लतादीदींच्या आवाजातील तीन गझला म्हणजे गानरसिकांना मेजवानीच. याचवर्षी आलेल्या ‘जेलर’ या चित्रपटामध्ये एका अयशस्वी प्रेमाची अवस्था राजेंद्रकृष्णनी आपल्या गाण्यातून व्यक्त केली आहे…….

‘ हम प्यारमें जलनेवालो को चैन कहां हाय आराम कहां

 बहलाए जब दिल ना बहले, तो ऐसे बहलाए ,गम ही तो है प्यारकी दौलत ये कहकर समझाए

 अपना मन छ्लनेवालोंको चैन कहां हाय आराम कहां ’

     १९६४ च्या ‘जहां आरा’ मध्येही राजेंद्रकृष्ण असेच व्यक्त झाले होते. ‘तेरी आंखके आंसू पी जाऊं, फिर वही शाम, वही गम, वही तन्हाई’ या तलत मेहमूदच्या गाण्यातून दर्दच दिसतो.यातील आणखी एक गाणं  ‘वो चूप रहे तो मेरे दिलके दाग जलते है’. मदनमोहनसाठी त्यांनी लिहिलेली आणखी काही हळुवार गाणीसुद्धा होती. या गाण्यांमधून दर्द जाणवत नाही पण ती शांत आणि मधुर आहेत. उदा : ‘झूम झूमके दो दिवाने (मस्ताना), दिल दिलसे मिलाकर देखो, कहता है दिल तुम हो मेरे लिए (मेमसाब)’. ‘बहाना’मधील ‘बेरहम आसमां’ आणि यमन रागातील ‘जा रे बदरा बैरी जा’, चाचा जिंदाबाद मधील ‘बैरन नींद न आये’,पूजा के फूल मधील ‘मेरी आंखों से कोई नींद लिये जाता है’, मनमौजीतील ‘मै तो तुमसे नैन मिलाके’ आणि किशोरकुमारसाठी अल्लड अंदाजातील एक गीत लिहिले. ‘जरुरत है जरुरत है जरुरत है एक श्रीमतीकी कलावतीकी सेवा करे जो पतीकी’, संजोग मधील मुकेश यांनी गायलेले ‘भूली हुई यादों मुझे इतना ना सताओ अब चैन से रहने दो मेरे पास न  आओ’ आणि लतादीदींचे ‘वो भूली दास्तां लो फिर याद आ गयी’ ही गीते म्हणजे राजेंद्रकृष्ण आणि मदनमोहन या जोडीची अलौकिक कामगिरीच.

     हेमंतकुमार, रवी किंवा चित्रगुप्त यांच्या गाण्यांतही राजेंद्रजींचे विविध भाव-दर्शन होते. संगीतकार चित्रगुप्त यांचं ‘भाभी’ चित्रपटातलं ‘चल उड जा रे पंछी’ या गाण्याबद्दल काय बोलावं? या गाण्यात पक्ष्याचं रूपक वापरून राजेंद्रजींनी माणसाला अधिक संवेदनशील करण्याचा छान संदेश दिला आहे. याच गाण्यात ‘अच्छा है कुछ ले जानेसे देकरही कुछ जाना’ हा गीतेतला सिद्धांतसुद्धा सोप्या पण परिणामकारक शब्दात सांगितला आहे. यातील चली चली रे पतंग मेरी चली रे हे गाणेसुद्धा अविस्मरणीय झाले.’ चांद जाने कहां खो गया’ हे मैं चूप रहूंगी मधील युगलगीत तसेच आजही जे गाणे प्रार्थना म्हणून म्हंटले जाते ते ‘तुम्ही हो माता पिता तुम्ही हो, तुम्ही हो बंधू  सखा तुम्ही हो’ अविस्मरणीय ठरले आहे. ‘इक रातमें दो दो चांद खिले’ (बरखा) हेही एक गोड गाणे. हे सर्व चित्रपट दक्षिणेतील होते. राजेंद्रकृष्ण यांनी संगीतकार हेमंतकुमार यांच्यासाठी गाणी लिहिली. अर्थात त्यातील सर्वात महत्वाचा चित्रपट म्हणजे ‘नागिन’. ‘मन डोले मेरा तन डोले’ आणि ‘जादूगर सैंया’ या गाण्यांच्या लोकप्रियतेला तोड नाही. ‘जिंदगी देनेवाले’ किंवा ‘तेरे द्वार खडा इक जोगी’ ही सुद्धा गाणी खूप गाजली.

हेमंतकुमारांच्यासाठी राजेंद्रकृष्ण यांनी लिहिलेली बहुतेक गाणी ही हलकी-फुलकी होती. ‘कहां ले चलो हो बता दो मुसाफिर (दुर्गेश नंदिनी), गोरी बुलाये तेरा सावरिया (ताज), वृंदावन का कृष्ण कन्हैय्या,ये मर्द बडे दिल सर्द (मिस मेरी), छुप गया कोई रे दूरसे पुकारके (चंपाकली)’ ही सगळी गाणी सहज गुणगुणता येतील अशी आहेत.

संगीतकार रवी यांच्याकडेसुद्धा त्यांनी बरीच गाणी लिहिली. ‘बिखराके जुल्फे चमनमें न जाना’, ‘इक वो भी दिवाली थी’ ही ‘नजराना’ मधील दोन्ही गाणी मुकेश यांची आहेत. ‘खानदान’ या चित्रपटातील ‘तुम्ही मेरी मंजिल, तुम ही मेरी पूजा’ हे लतादीदींच्या आवाजातील गीत त्यागाची व असिम प्रेमाची मूर्ती नूतनच्या रुपात होतं.या गीताला त्यावर्षीचा फिल्मफेअर पुरस्कार न मिळता तरच नवल होतं.ही लोरी नाही पण शांतवणारे भाव आणि संथ चाल यांनी तिला लोरीचा दर्जा प्राप्त करून दिला. यातील  ‘नील गगनसे उडते बादल’ हे गाणंही तितकचं अप्रतिम.

संगीतकार सलील चौधरी आणि राजेंद्रजी या जोडीने ‘उसने कहा था,झूला,प्रेमपत्र,छाया या चित्रपटांतून काम केले. यातील गाजलेली गाणी ‘आहा रिमझिम के ये प्यारे प्यारे,एक समय पर दो बरसाते, दो अखियां झुकी झुकी,इतना ना मुझ से तू प्यार बढा, आंसू समझ के क्यूं मुझे, आंखों में मस्ती शराब की’.

शंकर-जयकिशन यांचेबरोबर राजेंद्रजींचा योग जुळून आला तो १९६० साली ‘कॉलेज गर्ल’ या चित्रपटात. १९६८ नंतर ‘सच्चाई, तुमसे अच्छा कौन है, ज्वाला, तुम हसीन मैं जवां’ या चित्रपटात त्यांनी त्यांच्याबरोबर काम केले. तुमसे अच्छा कौन है चित्रपटात ‘गंगा मेरी मां का नाम, बाप का  नाम हिमालय’ हे गाणे प्रथम टीकेस पात्र ठरले. गंगा हिमालयातून उगम पावलेली असल्यामुळे ती त्याची कन्या ठरते. अशा स्थितीत राजेंद्रकृष्णनी त्यांना पती-पत्नी कसे मानले? यावर राजेंद्रजी म्हणाले, “महात्मा गांधींना आपण बापू म्हणतो याचा अर्थ ते प्रत्येकाचे बाप आहेत असा होत नाही. फक्त आदराची भावना त्यातून दिसते. हिमालयाला पिता आणि गंगाला माता म्हणताना हीच भावना माझ्या मनात होती. ‘ना मैं सिंधी ना मैं मराठी ना मैं हूं गुजराती’ असं सांगून या गाण्यातून मला राष्ट्रीय एकात्मतेची भावना निर्माण करायची होती.” 

     ‘सैय्या दिलमे आना रे, आके फिर ना जाना रे’ हे शमशाद बेगमनी गायलेले बहार चित्रपटातील सचिन देव बर्मन यांचे संगीत असलेले गीत आजही ऐकले जाते. एस.डी. बर्मनसाठी राजेंद्रजींनी दिलेला पहिला चित्रपट ‘प्यार’. नंतर ‘एक नजर, बहार, सजा, मिस इंडिया’ या चित्रपटात त्यांनी बर्मनदाबरोबर काम केले. तसंच आर.डी. बर्मन यांच्याबरोबर पडोसन (१९६८), वारिस, सास भी कभी बहु थी’ या चित्रपटात त्यांनी गाणी लिहिली. ‘मेरे सामनेवाली खिडकीमें’ हे गाणं पडोसन मधलं गाजलं. हे गाणं लिहिताना राजेंद्रजींनी गाण्याचे शब्द सोपे, सुटसुटीत व साधे ठेवण्यावर कटाक्ष ठेवला होता आणि त्याचप्रमाणे चालही सोपी व सरळ असावी असा आग्रह धरला होता. ‘पडोसन’ मधील ‘एक चतुर नार कर  के सिंगार, मेरे मन के द्वार ये घुसत जात, हम मरत जात, अरे हे हे हे ’. या किशोरदा-मन्ना डे-मेहमूद यांच्या आवाजांनी खळाळणाऱ्या गाण्याला तब्बल नऊ तासांनी पंचमदांनी ‘ओके’ सिग्नल दिला. राजेंद्रकृष्ण यांचे हे गीत हिंदी चित्रपट संगीतात विनोदी गाण्यांमध्ये शीर्षस्थानी रूढ असणारे  विनोदी गीत.

     संगीतकार कल्याणजी-आनंदजी यांच्याबरोबर राजेंद्रजींनी ‘ब्लफ मास्टर,घर घर की कहानी, जॉनी मेरा नाम,गोपी’ या चित्रपटात काम केले. ‘गोपी’ (१९७०) चित्रपटातील हे भजन सर्वश्रुत आहे. ‘सुखके सब साथी दुखमें ना कोय’ तसेच ब्लफ मास्टर (१९६३) मध्ये ‘गोविंदा आला रे आला, हुस्न चला कुछ ऐसी चाल, सोचा था प्यार हम ना करेंगे’, सुहाग रात (१९६९) मध्ये ‘हैय्या ओ  गंगामैय्या’, इमानदार (१९८७) मध्ये ‘और इस दिलमें क्या रक्खा है’ कहानी किस्मत की (१९७३) मधील ‘अरे रफ्ता रफ्ता देखो आंख मेरी लडी है ’, बनारसी बाबू (१९७३) मधील ‘कोई कोई रात ऐसी होती है, मेरे पीछे एक लडकी,आप यहां से जाने का क्या लोगे’, जॉनी मेरा नाम (१९७०) मधील ‘ओ मेरे राजा खफा ना होना’, ब्लैकमेल (१९७३) मधील ‘पल पल दिल के पास,मिले मिले दो बदन, मै डूब डूब, आशा ओ आशा, नैना मेरे रंग भरे’, फरार (१९७५) मधील ‘मैं प्यासा तू सावन’, रखवाला (१९७१) मधील ‘रहने दो गिले शिकवे छोडो भी तकरार की बातें’, घर घर की कहानी (१९७१) मधील ‘जय नंदलाला जय जय गोपाला’.

     राजेंद्रकृष्ण यांनी लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्यासमवेत ‘प्यार किये जा, जबाब व इंतकाम’ असे काही चित्रपट केले. यापैकी प्यार किये जा व इंतकाम यांच्या संगीताने भरपूर लोकप्रियता मिळवली. इंतकाम (१९६९) साठी ‘आ जाने जा, आ मेरा ये हुस्न जवां’ हे लतादीदींनी गायलेले कैब्रे गीत आजही अविस्मरणीय आहे. तसेच ‘कैसे रहूं चूप की मैने पी ही क्या है’ आणि ‘हम तुम्हारे लिए तुम हमारे लिए’ अशी गाणी खूपच गाजली.

     राजेंद्रकृष्णनी इतर संगीतकारांकडेसुद्धा चांगली गाणी लिहिली होती. संगीतकार अनील विश्वास यांचेबरोबर  ‘आराम,  दो सितारे, बडी बहु व हीर या चित्रपटात त्यांनी काम केले. उदा: ‘शुक्रिया ऐ प्यार तेरा (आराम), सज्जाद यांच्याबरोबर संगदिल व सैंय्या या दोन चित्रपटात काम केलं.‘ये हवा ये रात ये चांदनी, ‘दिलमें समा गये सजन’ (संगदिल), ‘मांझी मेरी किस्मत के’ (हम हिंदुस्थानी-एस.एन. त्रिपाठी), संगीतकार नौशाद यांचेबरोबर ‘गंवार’ या एकाच चित्रपटात त्यांनी काम केले. रोशन यांचेबरोबर ‘मालकिन, जशन, आंगन’ या तीन चित्रपटासाठी त्यांनी काम केले.संगीतकार के.दत्ता म्हणजेच दत्ता कोरगांवकर या संगीतकारासोबत त्यांनी ‘अमर कहानी, दामन’ असे चित्रपट केले. हंसराज बहल यांचेसाठी सिकंदर-आजम मधील हे जोशपूर्ण गीत म्हणजे रसिकांसाठी अनमोल खजिनाच.

‘जहां डाल डाल पर सोनेकी चिडियां करती हैं बसेरा, वो भारत देश है मेरा,

जहां सत्य अहिंसा और धर्मका पग पग लगता डेरा, वो भारत देश है मेरा’

या गाण्यात राजेंद्रजींनी भारतमातेच्या महन्मंगल, देदीप्यमान संस्कृतीचे मनोहारी दर्शन घडविले आहे. या देशभक्तीपर समूहगीतानं संगीतप्रेमींवर घातलेली मोहिनी आजही अबाधित आहे.

फक्त ओ.पी. नय्यर हा एक अपवाद वगळता हिंदी चित्रपटातील एकजात साऱ्या लहान-मोठ्या संगीतकारांबरोबर राजेंद्रकृष्णनी काम केले. ओ.पी.नय्यर इतरांना सांगत, ‘संगीत यशस्वी करण्यासाठी बहुतेक संगीतकारांना लताचा आवाज व राजेंद्रकृष्ण यांचे शब्द लागतात पण या दोघांशिवाय यशस्वी ठरलेला मी एकमेव संगीतकार आहे.’ हे ऐकल्यानंतर राजेंद्रजींची प्रतिक्रिया वेगळीच होती की, ‘असे बोलून ते आम्हा दोघांची फुकटची पब्लिसिटीच करीत आहेत.’ पण एकूणच राजेंद्रकृष्ण आणि ओ.पी.हा योग जुळून आला नाही.

राजेंद्रकृष्ण हे उत्तम गीतकार तर होतेच. पण ते उत्कृष्ट कथा-पटकथाकार व संवाद लेखकही होते. दक्षिणेकडल्या अनेक कौटुंबिक चित्रपटांच्या कथा व संवाद त्यांचेच होते.त्यांनीच लिहिलेल्या ‘नया दिन नयी रात’ या चित्रपटामुळे संजीवकुमार या कलाकाराने नऊ रूपे धारण करून या चित्रपटात आपल्या इमेजची चौकट मोडली होती. राजेंद्रजींच्याच आत्मविश्वासामुळे ‘खानदान’ या चित्रपटात सुनील दत्तना आव्हानात्मक रोल करण्याची संधी मिळाली. प्यार किये जा या चित्रपटात ओमप्रकाश आणि मेहमूदचा जो कथाकथनाचा सीन आहे त्यासाठी अनेक दिवस सर्वांनी एकत्र बसून तालीम केलेली आहे.मद्रासच्या अनेक हिंदी चित्रपटात भूमिका केल्या असूनही मीनाकुमारीची दक्षिणेतील हिंदी चित्रपटातील वाटचाल ‘आजाद’ चित्रपटापासून सुरु झाली. तसेच ए.व्ही.एम.च्या ‘भाभी’चित्रपटाची तयारी सुरु असताना नट होण्यासाठी आलेले राजेंद्रकुमार दिल्लीहून शाम बहल यांचे पत्र घेऊन राजेंद्रकृष्ण यांचेकडेच आले होते. त्यांच्याच घरी राहिले आणि राजेंद्रकुमार पुढे पाहता पाहता प्रमुखनट बनले. अशा प्रकारे मदतीसाठी राजेंद्रकृष्ण नेहमीच तयार असत.

राजेंद्रकृष्ण या गीतकाराचं वैशिष्ट्य म्हणजे उर्दू शायरीचा अभ्यास करूनही त्यांनी गीतरचना करताना मात्र उर्दूचा अट्टाहास टाळला. अत्यंत साधे-सोपे, पण काळजाला भिडणारे अर्थपूर्ण शब्द, तरल भाव आणि काव्यातील उत्कटता ही त्यांच्या गीतांची वैशिष्ट्ये होती. ते हिंदी भाषिक असल्यामुळे त्यांची हिंदीवर पकड होतीच. पण साहित्य-मूल्य ही काही वेगळी गोष्ट आहे आणि कविता ही सोपी सहज साध्य नाही हे ते जाणून होते. हिंदी रचनांचा अभ्यास म्हणून त्यांनी सुमित्रानंदन पंत आणि निराला या कवींचा अभ्यास केला आणि फैज अहमद फैज यांच्यासुद्धा कविता अभ्यासल्या. त्यांचा कोणा निर्मात्याशी वा संगीतकारांशी वादविवाद झाला नाही.

राजेंद्रकृष्णजींना रेसचा खूप नाद होता. एक ना एक दिवस रेसमध्ये आपला घोडा बिनमध्ये येणार व आपल्याला घबाड मिळणार असं त्यांना वाटायचं आणि घडलं ही तसंच. त्यांना तब्बल अठ्ठेचाळीस लाखांचा जैकपॉट लागला. एवढचं नव्हे तर पुढे कालांतराने त्यांना महाराष्ट्र राज्य लॉटरीचं एक लाखाचं बक्षिस लागलं.ती लाखाची रक्कम त्यांनी तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्याकडे पंतप्रधान निधीसाठी सोपवली. यावरून त्यांची उदार वृत्ती दिसून येते. 

     सोप्या आणि अर्थपूर्ण गीतांचा हा गीतकार अखेर मुंबईतच २३ सप्टेंबर १९८७ रोजी निधन पावला आपली गाणी मागे ठेऊन ! राजेंद्रकृष्णजींना त्यांच्याच गाजलेल्या गाण्याने श्रद्धांजली देऊया. ‘वो भूली दास्तां लो फिर याद आ गयी’ त्यांच्या आठवणी लिहित असताना ही भूली दास्तां डोळ्यासमोरून तरळून गेल्यास नवल ते काय !

हिंदी चित्रपट संगीताच्या गोल्डन इरा काळातील दर्जेदार माहितीपूर्ण लेखांसाठी क्लिक करा 

jayashree jaishankar danve
Jayashree Jaishankar Danve
+ posts

जयश्री जयशंकर दानवे, कोल्हापूर

   (एम.ए. संगीत विशारद) (ज्येष्ठ लेखिका)

*  ताराराणी विद्यापीठात उषाराजे हायस्कूलमध्ये २३ वर्षे संगीत शिक्षिका म्हणून कार्यरत.

*  निवृत्तीनंतर चरित्रग्रंथ,व्यक्तिचित्रण,कथा संग्रह,ललित लेख अशा विविध विषयांवर आजवर

   ३१ पुस्तके प्रकाशित 

*  ‘कलायात्री’ चरित्रग्रंथाला आजवर १० मान्यवर संस्थांचे पुरस्कार.

*  वैयक्तिक ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ व इतर अनेक पुस्तकांच्या पुरस्काराने पुरस्कृत.

*  नियतकालिके व मासिकातून असंख्य लेख प्रसिद्ध.

*  अनंत माने दिग्दर्शित ‘पाच रंगांची पाच पाखरे’ व ‘पाहुणी’ या चित्रपटासाठी पार्श्वगायन.

*  ‘ड्रीम मेकर्स’ व ‘म्युझिकल नाईट’ ऑर्केस्ट्रात गायिका म्हणून सहभाग.

*  शेगांवच्या गजानन महाराजांच्या जीवनावरील भक्तीगीतांचे १०० हून अधिक कार्यक्रम.

*  समूहगीत,नाटक,नृत्य,बालनाट्य अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचे दिग्दर्शन.

*  गेली ३५ वर्षे ‘नटश्रेष्ठ जयशंकर दानवे’ यांच्या स्मृतीचे जतन तसेच कलायात्री पुरस्काराचे  

   संयोजक म्हणून सहभाग.

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.