जयश्री जयशंकर दानवे

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

खेळीमेळीच्या पद्धतीने खुलवलेले आणि सहकुटुंब पाहता येतील असे सिनेमे बनवणारे, ज्यांच्या चित्रपटात श्रवणीय संगीत असणे हा त्या चित्रपटाचा आधारस्तंभ असायचा आणि ज्यांच्या चित्रपटात  गाण्याच्या प्रसंगांचे क्षण कथेशी सुसूत्रता न मोडता अलगदपणे अवतरायचे ते हिंदी चित्रपटसृष्टीतले अत्यंत गाजलेले आणि प्रतिभावान दिग्दर्शक म्हणजे हृषीकेश मुखर्जी (Director Hrishikesh Mukherjee) . त्यांचं बंगाली आणि हिंदी सिनेमात मोठं योगदान आहे. १९५०-६० हे दशक म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीसाठी फार मोलाचे ठरले. याच दशकात एक ठळक नाव पुढे आले ते म्हणजे हृषीकेश मुखर्जी. (Remembering Hrishikesh Mukherjee One of the Finest Director of Hindi Cinema)

       कौटुंबिक, सामाजिक, संगीतप्रधान, दिग्गज कलाकारांचा सहजसुंदर अभिनय, हृदयस्पर्शी कथा ही त्यांच्या सिनेमांची वैशिष्ट्ये होती. हृषीकेश मुखर्जीचा चित्रपट म्हणजे  उत्तमच असणारच याची प्रेक्षकांना खात्री असे. मस्त कथा आणि संगीत दोहोंची पर्वणी. त्यांच्या चित्रपटात आखलेल्या प्रसंगात हृषीदांनी संवाद खास लिहून घेतलेले असत, ठरवून आखीवरेखीव असा गीतसंवाद फुलत असे आणि श्रोत्यांना कर्णमाधुर्य देत कथा पुढे जात असे. जास्तीत जास्त कौटुंबिकता जपणारे हृषीदा प्रियकर, प्रेयसी आणि खलनायक या चाकोरीत न अडकता रक्ताची नाती हलक्या फुलक्या पद्धतीने फुलवत  राहिले आणि चित्रपटातील गाण्याच्या प्रसंगांची रंगत वाढवीत राहिले. हृषीदांनी ४० वर्षाच्या आपल्या कारकिर्दीत एकंदर ४२ चित्रपट दिग्दर्शित केले. त्यातले बरेचसे चित्रपट आजही क्लासिक चित्रपट म्हणून गणले जातात.

     हृषीकेश मुखर्जी यांचा जन्म ३० सप्टेंबर १९२२ रोजी झाला. त्यांचे वडील शीतलचंद्र मुखर्जी सरकारी नोकरीत होते. पण चार मुले व पत्नी असे मोठे कुटुंब असल्याने शीतलचंद्र इतर काही जोड व्यवसाय करून हातातोंडाची मिळवणी करत असत. हृषीदा वडील बंधू असल्याने लहानपणापासून ते आपल्या वडिलांच्या घरगुती व्यवसायाला मदत करीत व त्याचबरोबर शिक्षणही घेत.शिक्षण घेता घेताच ते सतारही शिकले आणि उत्तम सतारवादक म्हणून विद्यार्थीदशेतच त्यांनी नाव कमावले.संगीत आणि अध्यापनाचे संस्कार त्यांच्यावर लहानपणापासून झाले. कलकत्ता विद्यापीठातून बी.एस.सी.ची पदवी मिळाल्यावर त्यांनी कलकत्त्याच्या ऑल इंडिया रेडीओमध्ये काही काळ नोकरी केली. पण किमान गरजेपुरता पैसाही त्यांना या काळात मिळत नव्हता.

    हृषीकेश मुखर्जी यांचे एक नातेवाईक कलकत्त्याच्या न्यू थिएटर्स या अत्यंत गाजलेल्या चित्रपट कंपनीशी निगडीत होते. त्यांनी हृषीकेशची व त्याकाळी तिथे दिग्दर्शक म्हणून काम करणारे सुप्रसिद्ध दिग्दर्शक नितीन बोस यांची ओळख करून दिली. रसायनशास्त्रात पदवी घेतलेल्या या तरुणाला लैब असिस्टंची नोकरी मिळाली. हे साल होते १९४४-४५. नव्या नोकरीत रुजू झाल्यावर तरुण हृषीकेशने स्वत:च्या पद्धतीने नवनवे प्रयोग करायला सुरुवात केली. पण त्यांनी सुचवलेल्या कल्पना तिथल्या लोकांना पटेनात. हृषीदांकडून ते काम काढून घेतले गेले व फिल्मची रिळे फिरवून गुंडाळणे असे हलके काम या तरुण पोराला देऊ केले. त्याने तेही काम आनंदाने स्वीकारले. याच काळात या तरुण पोराची न्यू थिएटर्समध्येच काम करणाऱ्या एका सिनेमाटोग्राफरची ओळख झाली. त्या छायालेखक आणि दिग्दर्शकाचे नाव होते बिमल रॉय.

     बिमल रॉय आणि हृषीकेश मुखर्जी यांची दोस्ती जमली. हळूहळू हृषीकेशने संकलन विभागात प्रवेश करून चित्रपटांचे संकलन करण्याचे शिकून घेतले व लवकरच उत्कृष्ट संकलक म्हणून नावलौकिक मिळविला. १९४८ साली ‘तथापि’ या बंगाली चित्रपटाचे स्वतंत्ररित्या संकलनही केले. मग ‘मंत्रमुग्ध’ या १९४९ सालच्या बंगाली चित्रपटाच्या वेळी बिमलदांनी हृषीकेश मुखर्जी यांना आपल्या मदतीला घेतले व पटकथा, संवाद व संकलन याबाबत त्यांचे सहाय्य घेतले. या काळात त्या दोघांचा चांगलाच स्नेह जमला, पण लवकरच बिमल रॉय यांना कलकत्ता सोडून मुंबईला ‘मां’ या १९५२ च्या चित्रपटासाठी जावे लागले.आपल्याबरोबर त्यांनी यावेळी इतर काही तंत्रज्ञ नेले. त्यात हृषीकेश मुखर्जी यांचाही समावेश होता. ‘मां’ या चित्रपटाचे पूर्णतया संकलन हृषीदांनीच केले.पुढच्याच वर्षी म्हणजे १९५३ साली आलेल्या ‘परिणीता’ या बिमल रॉय यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटाचे संकलन हृषीदांनीच केले.

     मुंबईत बिमलदांनी ‘बिमल रॉय प्रोडक्शन’ ही आपली स्वत:ची संस्था सुरु केली व ‘दो बिघा जमीन’ हा १९५३ साली चित्रपट सुरु करायचे ठरवले. सलील चौधरी यांच्या कथेवरून चित्रपट घ्यायची कल्पना हृषीदांनीच बिमल रॉय यांना सुचवली. पण त्यावेळी बिमल रॉय ‘परिणीता’ च्या कामात गुंतलेले असल्याने हृषीकेश मुखर्जी यांनीच ‘दो बिघा जमीन’ ची पटकथा लिहली आणि चित्रपटाचे संकलनही केले. बिमल रॉय यांच्या ‘देवदास’ चित्रपटाच्या संकलनाची जबाबदारी हृषीदा पेलत होते त्याचवेळी ‘सुजाता, बंदिनी, यहुदी, मधुमती’ या चित्रपटांचे संकलनही हृषीदांनी केले. नंतर बिमल रॉय यांचा आशीर्वाद घेऊन स्वत:ला पूर्णपणे दिग्दर्शन क्षेत्रात झोकून दिले.

     हृषीदा बिमल रॉय यांना आपले गुरु मानत. हृषीदांनी बिमल रॉय यांच्याकडे अनेक चित्रपटांचे संकलन करता करता हळूहळू दिग्दर्शनाचे धडे गिरवायलाही सुरुवात केली होती. म्हणूनच १९५७ साली हृषीकेश मुखर्जी यांनी फिल्म ग्रुप या संस्थेसाठी ‘मुसाफिर’ या चित्रपटाचे स्वतंत्रपणे दिग्दर्शन केले. त्यांनी या पहिल्या चित्रपटासाठी दिलीपकुमार, सुचित्रा सेन या दोन मोठ्या कलाकारांना आपल्या चित्रपटासाठी निवडले. हा चित्रपट भली मोठी स्टारकास्ट असलेला होता. त्यामध्ये किशोर कुमार, निरुपा रॉय, दुर्गा खोटे, उषा किरण, डेव्हिड, बिपीन गुप्ता, शेखर, बेबी नाझ, डेझी इराणी, केश्तो मुखर्जी, नाझीर हुसेन हेही सुप्रसिद्ध कलावंत होते. एकाच घरात घडणाऱ्या तीन वेगवेगळ्या कथांची ‘मुसाफिर’ ही वेगळी निर्मिती होती. सलील चौधरी यांचे संगीत व शैलेंद्रची गाणी ही जमेची बाजू होती. ‘लागी नाही छुटे राम’ हे शास्त्रीय संगीतावर आधारित गीत लता मंगेशकर व स्वत: दिलीपकुमार यांनी गायलेले होते.

    हृषीदांच्या ‘मुसाफिर’ चित्रपटापासून पाहिलं तर त्यांचं वेगळेपण जाणवतं. यात किशोरकुमार, निरुपा रॉय यांचं नातं दीर आणि वहिनीचं. वहिनीच्या गरोदर अवस्थेत अचानक भावाचा मृत्यू, विधवा वहिनीची जबाबदारी दीरावर, वयोवृद्ध वडील सोबत अशी परिस्थिती असताना या गरोदर वहिनीला जास्तीत जास्त हसवून खुश ठेवणारा चुळबुळ्या, चळवळ्या दीर किशोरने उत्तम साकारला. ‘मुन्ना बडा प्यारा ! अम्मी का दुलारा! कोई कहे चांद, कोई आंखका तारा!’ किशोरने लाजबाब गायलेलं हे गीत सलिलदांच्या संगीताने नटलेलं. अकाली वैधव्य आलेल्या वहिनीमुळे अकाली प्रौढ झालेल्या बालिश दीराची कथा त्या नंतर पुढे सरकते.

पण ‘प्रथमग्रासे मक्षिकापात:’ या उक्तीप्रमाणे हृषीदांची स्थिती झाली. बिमल रॉय यांनी त्यांना नाउमेद होऊ नका म्हणून सल्ला दिला आणि आपल्या चित्रपटांच्या संकलनाची जबाबदारी त्यांच्याकडे अबाधित ठेवली. ‘मुसाफिर’ पडला पण त्याला राष्ट्रीय पातळीवर बहुमान मिळाला. ही गोष्ट दिलीप कुमारच्या चांगलीच लक्षात आली व धडपडणाऱ्या हृषीदांना त्याने पुढचा चित्रपट दिग्दर्शित करण्यासाठी मिळवून दिला तो होता ‘अनाडी’.

     राज कपूर व नूतन यांच्या प्रमुख भूमिका, उत्कृष्ट कथा, अभिनय, संगीत या सर्वांच्या जोरावर ‘अनाडी’ ने ठिकठिकाणी रौप्यमहोत्सव साजरे केले आणि उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून प्रथमच हृषीकेश मुखर्जी या नावाचा बोलबाला झाला. एवढेच नव्हे तर ‘सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट’ म्हणून ‘अनाडी’ ला राष्ट्रपती पारितोषिक सुद्धा मिळाले. हृषीकेश मुखर्जी यांच्या ‘अनाडी’ चित्रपटातलं विमनस्क आरतीनं (नूतन) म्हंटलेलं ‘तेरा जाना दिल के अरमानों का लूट जाना’ हे गाणं अतिशय गाजलं.

राज कपूर, नूतन, शुभा खोटे, मोतीलाल, ललिता पवार इ. कलावंत तसेच शैलेंद्र व हसरत जयपुरी यांची गीते व शंकर-जयकिशन यांचे संगीत यामुळे हा चित्रपट एक यशस्वी चित्रपट म्हणून गणला गेला. हृषीदांनी यात राजकपूरच्या मुद्रा अभिनयावर जोर देऊन एका जागी स्तब्ध राहून ‘सबकुछ सीखा हमने ना सीखी होशियारी’ हे नितांत सुंदर गाणं सादर केले. ‘वो चांद खिला वो तारे हंसे, किसी की मुस्कराहटोंपे, दिल की नजरसे’ ही लता, मुकेश यांच्या आवाजातील सर्वच गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. शंकर जयकिशन ह्या जोडीने अकॉर्डीयन, व्हायोलीन या वाद्यांचा सुरेख वापर या चित्रपटासाठी केला. या चित्रपटाला फिल्मफेअरची ५ पारितोषिके मिळाली. हा चित्रपट १९५९ साली प्रकाशित झाला व हृषीदांकडे अनेक चित्रपट निर्माते दिग्दर्शनासाठी धाव घेऊ लागले.

त्यानंतर एल.बी. लछमनचा ‘अनुराधा’ १९६० साली आला. त्याची नायिका लीला नायडू. हिला हृषीदांनीच पहिल्यांदाच रजतपटावर आणले. बलराज सहानी, अभी भट्टाचार्य, नझीर हुसेन वगैरे कसलेल्या कलाकारांना घेऊन हृषीदांनी हा चित्रपट सादर केला. चित्रपट उत्कृष्ट होता आणि चाललाही चांगला. सुप्रसिद्ध सितारवादक पं. रविशंकर यांच्या संगीत रचनांनाही सिनेरसिकांकडून चांगलीच दाद मिळाली. या चित्रपटास १९६० सालचा सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून राष्ट्रपती पारितोषिक बहाल करण्यात आले.

त्यानंतरच्या काळात हृषीदांनी ‘छाया, मेमदिदी, आशिक, असली नकली, सांझ और सवेरा, अनुपमा, आशिर्वाद, सत्यकाम’ अशा अनेक चित्रपटांची धुरा सांभाळली आणि  दिग्दर्शन क्षेत्रात आपली आगेकूच सुरूच ठेवली. त्यापैकी ‘अनुपमा, आशिर्वाद, सत्यकाम’ या तीन चित्रपटांसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट प्रादेशिक चित्रपट या विभागातून राष्ट्रपती पारितोषिके मिळाली. १९६१ साली सुनील दत्त व आशा पारेख यांचा ‘छाया’ चित्रपट हृषीदांनी केला. याचे संगीत सलील चौधरी यांचे होते. ’इतना ना मुझसे तू प्यार बढा, आंखो में मस्ती शराब की, छम छम नाचत आयी बहार’ ही गाणी खूप गाजली.

१९६२ मध्ये ‘असली नकली’ व ‘आशिक’ हे दोन चित्रपट हृषीदांनी दिग्दर्शित केले. असली नकली मध्ये देव आनंद व साधना, नंदा होते. साधना या चित्रपटात एक मराठमोळी तरुणी भासली. विशेषत: ‘तेरा मेरा प्यार अमर’ हे गाणे ह्या चित्रपटाच्या यशात महत्वाचे ठरले. इतरही गाणी ‘तुझे जीवन की डोर से, एक बुत बनाऊंगा, असली क्या है नकली क्या है’ ही सर्व गाणी लता, रफी यांच्या आवाजातील तसेच शैलेंद्र व हसरत जयपुरी गीतकार व शंकर जयकिशन संगीतकार यांच्यामुळे हिट झाली. त्यानंतर ‘आशिक’ मध्ये राजकपूर, नंदा व पद्मिनी हा त्रिकोण होता. ‘मेहताब तेरा चेहरा, तुम आज मेरे संग हसलो, तुम जो हमारे मीत ना होते’ ही मुकेश व लता मंगेशकर यांची गाणी फार सुमधुर होती. ‘आशिक’ हा हृषीदांचा सर्वोत्कृष्ट चित्रपट समजला जातो. त्यानंतर हिंदी चित्रपटसृष्टीतील एक मान्यवर दिग्दर्शक म्हणून हृषीदा ओळखले जावू लागले.

१९६६ चा ‘अनुपमा’ हा एक भावपूर्ण चित्रपट होता. यात प्रथमच बाप आणि मुलगी यांच्यातील दुराव्याची कथा मांडली होती. मुलीला जन्म देताना आपल्या पत्नीचं निधन झालं म्हणून बाप त्या मुलीची नफरत करत असतो. अशा परिस्थितीत वाढलेली ती मुलगी म्हणजे शर्मिला टागोर. छोट्या प्रसंगातून मानवी भावनांचे नाट्य फुलवणे हे हृषिदांचे वैशिष्ट्य. सकाळच्या महाबळेश्वरच्या प्रसन्न वेळी स्वत:च्या कोशात राहून ‘कुछ दिलने कहा कुछ भी नही, ऐसे भी बाते होती है’ हे गाणं म्हणणारी उमा (शर्मिला) हे एक अप्रतिम चित्रीकरण आहे.  धर्मेंद्रच्या तोंडी हेमंतकुमार यांचा प्ले बैक देऊन ‘या दिल की सुनो दुनियावालो’ हे गाणं चित्रित केलं आहे. गाण्याच्या शब्दातून तसेच संवादातून प्राप्त स्थितीवर उपरोधिक टीका करणे ही हृषीदांची खासियत होती. सर्वजण एकत्र जमलेत. पार्टी सुरु आहे आणि धर्मेंद्र ही कैफियत मांडतो. आखून सवरून चित्रित केलेला हा गीत प्रसंग. हीच पार्टी सॉंगची आयडिया अनेक दिग्दर्शकांनी पुढे जशीच्या तशी वापरली.

     १९६७ च्या ‘मंझली दीदी’ मध्ये सुद्धा आपल्या आजारी आईला आपलं गाण्यात मिळालेलं बक्षीस आतुरतेने दाखवायला आलेला मुलगा (सचिन) जवळ येताच आई त्याला क्षीण अवस्थेतही विचारते,  ‘तूने कौनसा गाना गाया l मुझे गाके तो सुनाओ l’ तेव्हा ‘मां ही गंगा मां ही जमुना’ हे गीत उचित प्रसंगावधान राखत हृषीदांनी चित्रित केलंय. यात प्रमुख भूमिकेमध्ये धर्मेंद्र आणि मीनाकुमारी होते. ‘एक था बचपन, छोटासा नन्हासा बचपन’ हे गाणं हृषीकेश मुखर्जी यांच्या १९६८ च्या  ‘आशिर्वाद’ चित्रपटातील आहे.  पितृप्रेमाची अगाध महती देणारं हे गीत हृषीदांनी आपल्या शैलीत आखून रेखून चित्रपटामध्ये उतरवलंय.  गुलजार यांचं अर्थपूर्ण काव्य, संगीतकार वसंत देसाईंचं मधुर संगीत, लताजींचा काळजाला भिडणारा सूर, बुजुर्ग कलाकार अशोक कुमार आणि बंगाली अभिनेत्री सुमिता संन्याल यांचा डोळ्यांच्या कडा ओलावणारा अभिनय असा सुरेख संगम या गाण्यात आहे. ‘आशिर्वाद’ मधल्या जोगी ठाकूरची भूमिका अशोक कुमारकडून करवून घेताना पुन्हा तो विविध छंदोबद्ध कविता रचणारा दाखवलाय. त्याच्या भणंग जोगी वृत्तीला साजेसा मृदंगवादक गरीब मित्र (हरिंद्रनाथ चटोपाध्याय) अशोक कुमारच्या सोबतीला देऊन हृषिदांनी मृदुंगाचे तुकडे छंदातून मांडले व ते शब्दबद्ध काव्यातून रसिकांपर्यंत पोचवले. या चित्रपटात अशोकुमारनी स्वत: गाणं गायलं आहे. प्रसिद्ध लावणी नर्तकी लीला गांधी यांना या सिनेमात संधी देऊन मराठमोळ्या सवालजबाबाचा एक चटकदार नजराणा हिंदी भाषेतून त्यांनी मांडला.

      ‘सत्यकाम’ आणि ‘प्यार का सपना’ हे हृषिदांचे १९६९ चे चित्रपट. सत्यकाम मधला सत्यवादी (धर्मेंद्र) हा नवसमाजाची उभारणी करण्याची स्वप्नं बघणाऱ्या पिढीचा प्रतिनिधी आहे. या वाटचालीत त्याच्या आयुष्यात जमीनदाराकडून अत्याचार झालेली एक मुलगी (शर्मिला) येते. तो तिच्याशी लग्न करून अत्याचारातून जन्मलेल्या मुलाचं पितृत्व स्वीकारतो. उच्च नितीमुल्य जपणाऱ्या वडिलांशी नातं तोडतो. नायकाच्या व्यक्तिमत्वाला मोठेपणाची किनार देऊन हृषिदांनी माणूसपणा दर्शवला आहे आणि या सगळ्या उदात्त संघर्षात मानसिक हेलकाव्यात त्याची अखेर होते. प्रख्यात बंगाली लेखक नारायण संन्याल यांच्या सशक्त कथानकावर बेतलेला हा चित्रपट खरोखरच आदर्शवादी होता. विश्वजित, माला सिन्हा आणि अशोककुमार यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘प्यार का सपना’ चित्रपटाचे त्याकाळी लंडनला चित्रीकरण केले होते. 

     त्यानंतर  ‘आनंद, गुड्डी, बावर्ची, अभिमान, नमक हराम, फिर कब मिलोगी, चुपके चुपके, मिली, चैताली, आलाप, कोतवालसाब, नौकरी, गोलमाल, जुर्माना’ अशा १९७० ते ७९ या दशकात आलेल्या चित्रपटांनी हृषीदांना किर्ती शिखरावर नेऊन बसवले. तो काळ खरं म्हणजे खून, बलात्कार, मारामाऱ्या वगैरे दृश्यांनी ठोस भरलेल्या गल्लाभरू चित्रपटांचा होता. पण हृषीदांनी आपल्या चित्रपटामधून या साऱ्या बाबी वगळल्या आणि आम जनतेला सहजसुंदर आणि स्वच्छ चित्रपट दिले. अमिताभ बच्चन, जया भादुरी, राजेश खन्ना, अमोल पालेकर वगैरे कलाकार प्रसिद्धीला आले ते याच काळात. त्यांच्या अभिनयाचा खूप आगळावेगळा पैलू सिनेरसिकांच्या समोर उभा केला तो हृषीदांनीच.

     १९७१ सालचा हृषीकेश मुखर्जी यांचा ‘आनंद’ हा सिनेमा म्हणजे जीवनाची एक सुंदर कविता आहे. आनंदात कसं जगावं याचा तो संदेश आहे. ‘आनंद सहगल’ नावाचा एक तरुण (राजेश खन्ना).आनंदाचा सुगंध पसरवणारा हा ‘आनंद’ मृत्युच्या दारात उभा आहे. हे जेव्हा डॉक्टर ‘बाबू मोशाय’ला (अमिताभ बच्चन) कळतं तेव्हा तोच अधिक गंभीर व उदास होतो आणि इथून पुढे ‘आनंद’ची कहाणी सुरु होते. ही कहाणी हृदयाला भिडणारी आहे. आपण किती जगतो यापेक्षा कसं जगतो याबाबत सकारात्मक विचार मांडणारा ‘आनंद’ केवळ अलौकिक वाटतो. अनाडीचे दिग्दर्शन करीत असताना हृषिदांच्या डोक्यात ‘आनंद’ ची कथा घोळत होती. राज कपूरला ‘आनंद’ची भूमिका देण्याचं त्यांनी पक्क ठरवलं होतं. पण…प्रत्यक्षात तसं होऊ शकलं नाही. त्यानंतर सुमारे एक दशकानंतर त्यांनी ‘आनंद’ हाती घेतला. त्यावेळी बहरात असलेल्या राजेश खन्नाला त्यांनी ‘आनंद’ बनवलं. 

 ‘सात हिंदुस्थानी’ नंतर हाती फारसं काम नसलेल्या अमिताभ बच्चनला त्यांनी ‘बाबू मोशाय’ ची भूमिका दिली. हा चित्रपट चालला याचं कारण म्हणजे दिग्दर्शक हृषीकेश मुखर्जी तसेच पटकथा, संवाद व लेखक गुलजार यांच्या असामान्य प्रतिभेची. लेखक, दिग्दर्शक एखाद्या कलाकृतीला किती उंचीवर नेऊ शकतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे ‘आनंद’. असा चित्रपट दुर्मिळच! ‘आनंद’ ही व्यक्तिरेखा रुपेरी पडद्यावर खरोखर अजरामर राहावी अशी आहे. याप्रसंगी याच चित्रपटातील ‘आनंद मरा नहीं आनंद मरते नहीं’ हा बाबू मोशाय अमिताभचा डॉयलॉग आठवतो. ‘आनंद’ मध्ये स्वत:ला कैन्सर झालाय आणि क्षणाक्षणाला मृत्यू आपल्या समीप येतोय हे माहित असूनही हरहुन्नरी आनंदी, स्वच्छंदी हसरा खेळता राहणारा, कायम आनंद देणारा राजेश खन्ना सर्वांनाच ‘मैने तेरे लिये ही सात रंग के’ या आपल्या गाण्यातून आपलंसं करतो. या सिनेमातील अप्रतिम गाणी म्हणजे ‘जिंदगी कैसी है पहेली हाय, कहीं दूर जब दिन ढल जाए, ना जिया लागे ना’. कवी योगेश यांचे शब्द, सलील चौधरींचं कर्णमधूर संगीत आणि आवाज होते मन्ना डे, मुकेश, लता मंगेशकर यांचे. हा चित्रपट माईलस्टोन समजला जातो.

     खरं आयुष्य आणि मृगजळ यांतला फरक दाखवणारं हृषीदांचं १९७१ चं चित्र ‘गुड्डी’. चित्रपटांचं वेड असलेली, थोडी लाडावलेली गुड्डी (जया भादुरी). मोठा भाऊ, वहिनी, वडील, योग्य मुलाशी लग्न ठरवतात पण तिला लग्न करायचंय ते स्वप्नातल्या हिरोशी म्हणजे धर्मेंद्रशी. धर्मेंद्रची भूमिका तिथे हिंदी चित्रपटांमधला एक नावाजलेला हिरो अशीच आहे. तो गुड्डीला ओळखतही नाही. पण खरा मोती आणि अळवावरच्या पाण्याचा थेंब यातल्या फरकाची जाणीव होताच मनोमन आपल्या होणाऱ्या नवऱ्यासाठी आतुरलेली ही गुड्डी एका प्रतिक्षेच्या उत्कट क्षणी ‘आजा रे परदेसी’ हे गीत गाते. ती सिनेमाशौकीन आहे. म्हणून तिच्या तोंडी ‘मधुमती’ मधलं ‘आजा रे परदेसी’ हेच गीत दिलंय. आपल्याला पार्टीत कुणी गायला सांगितलं तर आपण रफी, किशोर, लता, आशा वगैरे यांची जुनीच गाणी गातो. त्या अनुषंगाने हृषीदांनी गाण्याचा प्रसंग आणला. इथे त्यांनी कौटुंबिकता, सामान्य मध्यमवर्गीय माणसाच्या घरात घडणाऱ्या पार्टीच्या वास्तवाचं भान ठेवलेलं दिसतं.

     गुड्डीसाठी जया भादुरी आणि डिंपल कपाडिया या दोघींचा विचार झाला होता. गुलजारना डिंपल शाळकरी मुलगी म्हणून योग्य वाटली. त्याचवेळी हृषिदा पुण्यात एका महोत्सवाचे ज्युरी म्हणून गेले. त्यावेळी तेथील एका लघु फिल्ममधली जया त्यांना गुड्डी म्हणून आवडली. नंतरच्या काळात अमिताभ आणि राजेश खन्नाच्या अर्धांगिनी बनलेल्या जया आणि डिंपल. हृषिदा पुण्यात गेले नसते तर गुड्डी डिंपल बनली असती आणि बॉबीचे काय झाले असते? आणि जयाला गुड्डी चित्रपट मिळाला नसता तर ती बंगाली सिनेमाकडे वळली असती. याला म्हणतात योगायोग. याच काळातला आनंद आणि गुड्डी यांच्यापेक्षा एक वेगळा चित्रपट ‘बुढा मिल गया’. खून, गुन्हेगारी, स्मगलिंग असा विषय या चित्रपटातून हाताळताना ती कथा स्वररंजीत करून हृषीदांनी मांडली कारण खूनी माणूस संगीत गायक दाखवला. ‘आओ कहां से घनश्याम’ हे मन्ना डे यांचे ओमप्रकाशच्या तोंडी असणारे गाणे खूपच गाजले. 

 एकत्र कुटुंबपद्धतीचा ऱ्हास होऊ लागला तेव्हा हृषीदांचा १९७२ ला  ‘बावर्ची’ आला. हृषीदांनी अतिशय साधेपणाने हा सिनेमा चित्रित केल्यामुळे सर्वांना तो आपलासा वाटला. एका प्रसंगात राजेश खन्ना म्हणतो, ‘It is so simple to be happy..but it is so difficult to be simple’. हा संवाद लक्षात राहणारा आहे. मनामनांत उफाळलेला अभिमानच समजूतदारपणाला बाजूला सारतो आणि उरते ती फक्त तेढ. जमा-खर्च, पगार, खरेदी, कामांची विभागणी ही एकत्र कुटुंबातील मतभेद, धुसफूस, वाद, तंटा यांची निमित्तं असतात. मग समुपदेशनाची गरज साऱ्या कुटुंबालाच भासते. ही भूमिका  राजेश खन्नाने बावर्ची बनून साकारली आहे. तो भाऊ-भाऊ, जावा-जावा, चुलत भावंडं यांच्यातल्या अभिमानाचा अंधार बाजूला सारतो. सर्वांसाठी तो गातो ‘भोर आयी गया अंधियारा सारे जगमें हुआ उजियारा’ (किशोर-मन्ना डे). साठी उलटलेल्या दुर्गा खोटेची पावलंही त्या स्वरांवर पदन्यास करतात. शेवटी संगीत सर्वाना एकत्र आणतं. खास हृषीकेश शैलीतला गाण्याचा सीन. त्यात पाश्चात्य सुरावटीचे विवादी सूर छेडत येणारा असरानीही या विचारधारेत सामावतो. ‘तुम बिन जीवन कैसा जीवन  (मन्ना डे), मस्त पवन डोले रे (लता) , मोरे नैना बहारे नीर (लता)’ या गीतांनी सिनेमा सुरीला केला आहे. आघाडीचे कलाकार राजेश खन्ना आणि जया भादुरी यांना अनग्लैमरस अशा भूमिका देऊन हा सिनेमा हृषीदांनी हिट करून दाखविला. चित्रपटाच्या सुरुवातीला संस्कृत नाटकाच्या सूत्रधाराप्रमाणे अमिताभच्या आवाजात कथेचे सार सांगून चित्रपटाच्या शेवटी ‘रघू किसी नये घर की तलाशमें जा रहा है, आशा है वो घर आपका नही होगा’ असे सांगून प्रेक्षकांची फिरकी घेतली आहे. 

पुन्हा कौटुंबिकतेची कास न सोडता संगीत, कला आणि त्यातला अहंकार, तोही पती पत्नीतला, ‘अभिमान’ मधून चित्रित झाला १९७३ साली. हृषीदांनी कमालीचा वेगळा कथाबाज खुलवला. कलाकार हा अहंकारी झाल्यावर तो विवेकाची पातळी सोडून कोणत्या थरापर्यंत जाऊ शकतो याचं छान चित्रण आहे. चित्रपटातलं प्रत्येक गाणंच ठरवून आखलेलं आहे. संपूर्ण चित्रच संगीतमय असून तो बहुमान मिळाला सचिन देव बर्मनना. पती पत्नीच्या रुपात अमिताभ आणि जया भादुरी होते. हा चित्रपट आजही प्रेक्षकांना भावतो. या चित्रपटातील तेरे मेरे मिलन की ये रैना, अब तो है तुमसे, लुटे कोई मन का नगर, मित ना मिला, पिया बावरी ही गाणी आजही लोकप्रिय आहेत.        

याच वर्षी हृषीदांनी ‘नमक हराम’ हा चित्रपट काढला. गिरणी कामगार, कापड कारखाने, मिल मजदूर संघटना असे सामाजिक प्रश्न निर्माण झाले होते त्याचवेळी त्यांनी हा चित्रपट काढला आणि आपले समाजभान दर्शवले. क्षयरोगाने पछाडलेला, मरणासन्न अवस्थेतला गरीब परिस्थितीने गांजलेला मित्र शेवटचे श्वास मोजता मोजता राजेश खन्नाला आपलं स्वत:चं काव्य गायला सांगतो आणि ‘मैं शायर बदनाम’ हे गाणं चित्रित झालं. राजेश खन्ना गातोय आणि त्याचा मित्र अमिताभ त्यांचं गाणं आपल्या संग्रही राहावं म्हणून तो गाता गाता शूटिंग करतोय असा सीन निर्माण करून ‘दिये जलते है’ हे गीत चित्रित झालं. ही दोन्ही गाणी खूप गाजली. 

 १९७५ साली ‘चुपके चुपके’ मध्ये जीजाजी आणि साली यांच्यातल्या नात्याची खुशखुशीत मेजवानी होती आणि हृषीदांनी त्यात ‘अबके सजन सावनमें’ हा आपल्या ढंगाचा ठरवून दिलेला गाण्याचा सीन आणला. इंग्रजी माध्यमाचा बडेजाव, इतर भाषांचा विचार करायला लावेल असा विषय विनोदातून खुलवला. या चित्रपटात धर्मेंद्र, अमिताभ विनोदी भूमिकेत होते आणि त्यांना साथ होती जया भादुरी,शर्मिला टागोर यांची. यातील हिंदी भाषा शुद्ध बोलण्याचा आग्रह धरणारा ओमप्रकाश लक्षात राहिला.

 याचवर्षी आलेला ‘मिली’ हा अमिताभ आणि जया भादुरी चा संवेदनाशील चित्रपट. कैन्सर बरा होतो का? परदेशात त्यावर उपचार होतो का? हे प्रश्न त्यांनी रसिकांवर सोपवले. ‘बडी सुनी सुनी है’ हे किशोरकुमारचे आणि ‘मैनें कहां फुलोंसे’ हे लताचे गाणे खूप गाजले. संगीत हाच विषय पुन्हा एकदा अमिताभच्याच अभिनयाने हृषीदांनी खुलवला तो १९७७ च्या ‘आलाप’ मधून. कलेशी फारकत घ्यायला लावणारी वडिलांची अतिरेकी शिस्त न जुमानणारा गायक नायक घरालाच दुरावतो. पण एका कलासक्त संस्थानिकाच्या समुपदेशानंतर तेच वडील  क्षयाने पछाडलेल्या आपल्या मुलाला आजारी अवस्थेत घरी आणतात असा सकारात्मक शेवट असणारा गंभीर विषय हाताळला होता. परंतु यात देखील अमिताभचा मोठा भाऊ व वहिनी यांच्यातली गाऱ्हाणी गाण्यातून सोडवण्याचा एक खुमासदार प्रसंग हृषीदांनी आणलाय. ‘काहे चांद अकेला जाए सखी री’ हे येसुदास आणि जयदेव यांचं कर्णमधुर गीत आपला वेगळेपणा उमटवतंच.

 १९७९ साली ‘गोलमाल’आणि ‘जुर्माना’ असे हृषीदांचे दोन चित्रपट आले. गोलमाल ही एक विनोदी कथा असून अमोल पालेकरची दुहेरी भूमिका आहे असे भासवले आहे. ‘आनेवाला पल जानेवाला है’ हे गीत खूप गाजले. यात पुरुषांनी मिशी ठेवलीच पाहिजे असा हट्टीपणा जोपासणाऱ्या उत्पल दत्त या बुजुर्ग कलाकाराची व्यक्तिरेखा उत्तम आहे. ‘जुर्माना’ ही दोन मित्रांची आगळीवेगळी पैज लावण्याची कथा. पण मस्करीची कुस्करी होते. ‘सावन के झुले पडे’ हे राखीचे गीत खूप गाजले. राखी, अमिताभ आणि विनोद मेहरा यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत.

 १९८० साली अशोक कुमार, रेखा, दीना पाठक, राकेश रोशन व शशिकला यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘खुबसुरत’ हा चित्रपट त्यांच्या यशस्वी चित्रपट कारकिर्दीत भर घालणारा ठरला. त्यानंतर ‘नरम गरम, बेमिसाल, अच्छा बुरा, नामुमकीन, किसीसे ना कहना, रंगबिरंगी’ असे  चित्रपट आले. ‘नरम गरम’ हा विनोदी चित्रपट होता. ‘बेमिसाल’ मध्ये काश्मीरच्या नजाऱ्यासोबत राखीचं ‘ए री पवन’ हे सुंदर गीत चित्रपटाचा मानबिंदू होते. यात राखी, अमिताभ आणि विनोद मेहरा हे त्रिकुट होते. १९८६ साली प्रदर्शित झालेल्या ‘झुठी’ तली चुलबुली, खोटे बोलणारी  रेखा रसिक विसरू शकत नाहीत.

नंतरच्या काळात हृषीदा शरीराने व मनाने फार थकले. गुडघेदुखी त्यांना अत्यंत त्रास देत होती. तरीही  त्यांनी १९९८ साली ‘झूठ बोले कौआ काटे’ या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वीकारले. त्यामध्ये अनिल कपूर, जुही चावला, अमरीश पुरी, अनुपम खेर वगैरे लोकप्रिय कलावंत होते. हा एक अत्यंत विनोदी  चित्रपट होता. हाच हृषिदांचा शेवटचा दिग्दर्शित चित्रपट.

याच काळात छोट्या पडद्याचा प्रभाव घरोघरी पडू लागला व मोठ्या पडद्यावरचे चित्रपट चालेनात.ही गोष्ट लक्षात घेऊन हृषीदांनी छोट्या पडद्यासाठी ‘उजाले की ओर, धूपछांव, रिश्ते, तलाश, हम हिंदुस्थानी’ अशा पाच मालिका सादर केल्या. या सर्वच मालिका सर्वोत्तम वाटल्या. मोठा पडदा व छोटा पडदा याचे माध्यम एकच असले तरी त्यांची ठेवण एकमेकांपासून एकदम भिन्न असूनही  हृषीदांना या नव्या माध्यमामध्ये प्रवेश करताना फारशी अडचण आली नाही.

 चित्रपट दिग्दर्शनाखेरीज हृषीदांनी फिल्म इंडस्ट्रीमधील काही प्रमुख जागावर काम केले. फिल्म एडीटर्स असोसीएशनचे ते काही काळ अध्यक्ष होते. फिल्म फायनान्स कार्पोरेशनचे ते निर्देशक बनले. सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सेन्सॉर या संस्थेचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. फिल्म फायनान्स कार्पोरेशनचेच रुपांतर नैशनल फिल्म डेव्हलपमेंट कार्पोरेशनमध्ये झाल्यावर त्याचेही ते निर्देशक बनले. राष्ट्रीय पारितोषिके, चिल्ड्रेन फिल्म्स असोसिएशन वगैरे संस्थासाठीही त्यांनी ज्यूरींचा अध्यक्ष म्हणून यशस्वीरित्या काम केले.

त्यांची ठोस व प्रदीर्घ कारकीर्द लक्षात घेऊन भारत सरकारने त्यांना १९७२ साली ‘पद्मश्री’, २००० साली दादासाहेब फाळके पारितोषिक आणि २००१ साली ‘पद्मविभूषण’ पदव्या बहाल केल्या. बिमल रॉय यांना गुरुस्थानी मानणारा त्यांचा शिष्य काही बाबतीत त्यांच्याही पुढे गेला आणि आपल्या गुरुचे नाव त्यांनी रोशन केले. हृषीकेश मुखर्जी आणि त्यांचे चित्रपट म्हणजे साधे, निरागस, भव्यतेचा हव्यास नसलेले, तुमच्या आमच्या आयुष्याशी नातं सांगणारे, कसलाही आव न आणता साधं, सोपं आणि महत्वपूर्ण तत्वज्ञान सांगणारे होते. सामाजिक-राजकीय जाणीव तसेच साधेपणाबरोबरच  आदर्शवाद, समाजातील माणसांची विसंगती त्यांच्या चित्रपटात दिसून येते. त्यांचा चित्रपट कधी कधी विनोदी पद्धतीनं पण गंभीरपणानं एक संदेश देतो. म्हणूनच त्यांच्या चित्रपटातलं प्रत्येक पात्र महत्वाचं ठरतं.

     अशोक कुमार, बलराज सहानी, राज कपूर, देव आनंद, धर्मेंद्र, संजीव कुमार, राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, अमोल पालेकर, नूतन, साधना, शर्मिला टागोर, जया भादुरी, रेखा अशा दिग्गज कलावंतानी हृषीदांची चित्रपटातील ‘प्रतिमा’ जपण्यासाठी आपापले ‘मुखवटे’ बाजूला ठेवले. व्यक्तिरेखेला साजेल असे वागणे, बोलणे, चालणे, संवादफेक अशा गोष्टी हृषीदांनी या कलावंताकडून बारकाव्यानिशी काढून घेतल्या. तसेच उत्तम संगीतकाराकडून कौशल्याने उच्च प्रतीची संगीत निर्मिती करवून घेतली. हृषीदांनी अनेक चांगले चित्रपट दिले. त्यांच्या चित्रपटातून अनेक कलावंत व तंत्रज्ञ उदयाला आले. असा कौटुंबिक मध्यमवर्गीयांचा उदगाता २७ ऑगस्ट २००६ रोजी सिनेजगताला सोडून गेला. हृषिदांच्याचा फिलोसॉफी संवादांनी त्यांना श्रद्धाजंली देऊया…….

       ‘ जिंदगी लंबी नही बडी होनी चाहिए, बाबू मोशाय

         जिंदगी और मौत उपरवाले के हाथ में होती हैं

         उसे ना आप बदल सकते हैं ना मैं l

         हम सब रंगमंच की कठपुतलियां हैं l

         जिसकी डोर उपरवाले के हाथ में बंधी हैं l

         कब कौन कहां उठेगा ये कोई नही बता सकता … ’  

हिंदी सिनेमाच्या अशाच जुन्या जमान्यातील गोल्डन इरा काळातील अधिक लेखांसाठी क्लिक करा

 

                               

jayashree jaishankar danve
Jayashree Jaishankar Danve
+ posts

जयश्री जयशंकर दानवे, कोल्हापूर

   (एम.ए. संगीत विशारद) (ज्येष्ठ लेखिका)

*  ताराराणी विद्यापीठात उषाराजे हायस्कूलमध्ये २३ वर्षे संगीत शिक्षिका म्हणून कार्यरत.

*  निवृत्तीनंतर चरित्रग्रंथ,व्यक्तिचित्रण,कथा संग्रह,ललित लेख अशा विविध विषयांवर आजवर

   ३१ पुस्तके प्रकाशित 

*  ‘कलायात्री’ चरित्रग्रंथाला आजवर १० मान्यवर संस्थांचे पुरस्कार.

*  वैयक्तिक ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ व इतर अनेक पुस्तकांच्या पुरस्काराने पुरस्कृत.

*  नियतकालिके व मासिकातून असंख्य लेख प्रसिद्ध.

*  अनंत माने दिग्दर्शित ‘पाच रंगांची पाच पाखरे’ व ‘पाहुणी’ या चित्रपटासाठी पार्श्वगायन.

*  ‘ड्रीम मेकर्स’ व ‘म्युझिकल नाईट’ ऑर्केस्ट्रात गायिका म्हणून सहभाग.

*  शेगांवच्या गजानन महाराजांच्या जीवनावरील भक्तीगीतांचे १०० हून अधिक कार्यक्रम.

*  समूहगीत,नाटक,नृत्य,बालनाट्य अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचे दिग्दर्शन.

*  गेली ३५ वर्षे ‘नटश्रेष्ठ जयशंकर दानवे’ यांच्या स्मृतीचे जतन तसेच कलायात्री पुरस्काराचे  

   संयोजक म्हणून सहभाग.

Leave a comment