-अशोक उजळंबकर

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Interesting story about the change in Veteran Actor Ramesh Deo’s Surname..How Thakur family became Deo family?  मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत सलग ६ दशके सक्रिय असलेले प्रतिभासंपन्न ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे आज दुःखद निधन झाले. नायक, खलनायक, चरित्र अभिनेता म्हणून रमेश देव यांनी अभिनयक्षेत्र तर गाजवलेच सोबत नाट्य व सिने निर्माता म्हणूनही ते यशस्वी ठरले होते. राजा परांजपे यांच्या ‘आंधळा मागतो एक डोळा’ या सिनेमामधील खलनायकी भूमिकेने रमेश देव यांचा व्यावसायिक सिनेमामधील अभिनयाचा श्रीगणेशा झाला. पण रमेश देव यांच्याघराण्याबद्दलचे अत्यंत रंजक सत्य जे फार कमी रसिकांना माहीत आहे त्याबद्दल.

रमेश देव यांचे पूर्ण नाव रमेश नारायणसिंग देव. त्यांचे घराणे मूळचे राजस्थानचे. राजस्थानच्या जोधपूरहून हे घराणे कोल्हापुरात स्थायिक झाले ते  रमेश देव यांच्या पणजोबाच्या काळात. देव यांचं मूळ आडनाव देव नव्हे. त्यांचं घराणं ठाकूर. ते देव असं बदललं त्याला रमेश देव यांचे वडील कारणीभूत आहेत. ते कसे ते वाचा- 

रमेश देव यांचे वडील अतिशय हुषार होते. त्यांना कोल्हापूर सरकारची स्कॉलरशीप होती, त्याच स्कॉलरशीपवर ते वकील झाले. मुंबईस ते बॅरिस्टर झालांकडे असिस्टंट म्हणून काम करत होते. तेव्हा त्यांच्या हाती हायकोर्टात एक पुस्तक सहजच लागलं. त्यात कुठल्या राजे महाराजाचे काय काय अधिकार आहेत हे लिहिलं होतं. त्यात कोल्हापूरच्या छत्रपतीचे अधिकार देखील होते.

रमेश देव यांचे वडील कोल्हापूरला सणाच्या सुट्टीसाठी आले असताना आजोबांच्याकडून त्यांना कळलं की शाहूमहाराज फार काळजीत आहेत. कारण त्यांच्यावर पुण्यातील एका वकिलाने हायकोर्टात केस केली आहे व हायकोर्टाचे त्यांना समन्स आले आहे व त्यांना हायकोर्टात हजर रहावं लागणार आहे. महाराजांना हायकोर्टात जाणं अपमानास्पद वाटत होतं. शाहू महाराजाचं म्हणणं होतं की, ‘हायकोर्टात हजर रहाण्यापेक्षा मी मरण पत्करेन’.

रमेश देव यांच्या वडिलांना छत्रपतींच्या राईट्सबद्दल आठवलं, ते तडक महाराजांना भेटण्यासाठी राजवाड्यात गेले, तिथं कळलं की महाराज राधानगरीच्या वाड्यात गेलेत, आजोबांना सांगून माझे वडील राधानगरीस गेले. पण तिथं त्यांना तसं कुणी ओळखत नव्हते व महाराजही कुणाला भेटण्याच्या मनःस्थितीत नव्हते. त्यामुळे त्यांच्या वडिलांची व महाराजांची भेट काही होईना. राधानगरीचा वाडा तसा फार मोठ्ठा नसल्याने  महाराज ज्या खोलीत होते त्या खोलीच्या खालच्या लॉनवर रमेश देव यांचे वडील गेले व महाराजांना उद्देशून ओरडू लागले, ‘महाराज, मी अॅडव्होकेट पुणेकर ठाकूर. तुम्हाला हायकोर्टात जाण्याची बिलकूल गरज नाही. तुम्हाला हायकोर्टात जाण्याची गरज नाही. तुमचे अधिकार हायकोर्टापेक्षा जास्त मोठे आहेत, मला भेटण्याची वेळ द्या. मी सिद्ध करून देतो.’

रमेश देव यांच्या वडिलांच्या मोठ्याने ओरडण्यामुळे महाराजांच लक्ष त्यांच्याकडे गेले. त्यांनी त्यांना वर बोलावून घेतले. “महाराज, मी आपणांस खात्रीने सांगतो की आपणाला हायकोर्टात जाण्याची काही गरज नाही. हायकोर्टाला तुम्हाला कोर्टात बोलावण्याचा अधिकारच नाही.’ असं त्यांनी महाराजांना मोठ्या विश्वासानं सांगितलं . त्यावर महाराज म्हणाले “तू आत्ता वकील झालायस. पण इथल्या जुन्या व जाणत्या वकिलांना हे कसं माहिती नाही?”

त्यावर नारायणसिंग उत्तरले ‘महाराज, कायद्याच्या कुठल्याही पुस्तकात तुमचे हे खास अधिकार लिहिलेले नाही. पण मी इंग्रज सरकार व छत्रपती महाराज यांच्यात जो त्यावेळी करार झालाय तो वाचलाय, त्यात छत्रपतींचे काही खास अधिकार आहेत, त्यात एक अधिकार असा आहे की तुमच्यावर भारतात कुणीही केस करू शकत नाही आणि जर कुणाला केस करायचीच असेल तर ती लंडनच्या प्रीव्ही कौन्सिल समोर किंवा हाऊस ऑफ लॉर्डस् (लंडन) इथेच करू शकतो. तेव्हा आपण बिलकूल काळजी करू नका. इथल्या हायकोर्टाच्या न्यायाधीशाने देखील हा करार माहीत नसणार. तो त्यांना दाखविला तर, ताबडतोब ते ही केस मागे घेतील.” 

शाहू महाराजांनी प्रधान सुर्वेंना व रमेश यांच्या वडिलांना ताबडतोब मोटारीने मुंबईस पाठविले. हायकोर्टाच्या जज्जला तो करार दाखवला. जज्जनं ताबडतोब केस मागे घेतली. शिवाय त्यांचे  वडील पुण्याच्या वकिलाकडे गेले. त्याला समजावलं व महाराजांवर आलेलं मोठ संकट टळलं.

महाराजांना फार आनंद झाला व ते म्हणाले, ‘ठाकूर वकील, तुम्ही मला देवासारखे भेटलात. तर आजपासून तुझे आडनाव ‘देव. ठाकूर नाही.’ तेव्हा परिस्थिती राजा बोले, प्रजा हाले अशी व त्यात शाहू महाराजांसारखा कर्तृत्ववान राजाचं सांगणं. त्यामुळे त्या दिवसापासून हे  घराणे ठाकूरचे देव झाले. 

(*संदर्भ- या सुखांनो या-रमेश देव यांचे आत्मचरित्र) 

Ramesh Deo Biography-Ya Sukhano Ya

मराठी चित्रपटसृष्टीच्या ७० च्या दशकापर्यंत च्या अशाच माहितीपूर्ण लेखांसाठी क्लिक करा 

Founder Editor of Navrang Ruperi Mr Ashok Ujlambkar
Ashok Ujlambkar
+ posts

Leave a comment