आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Renowned Veteran actor of Marathi and Hindi Cinema Ramesh Deo passed away मराठी आणि हिंदी सिनेमाचे सुप्रसिद्ध अभिनेते रमेश देव यांचे आज मुंबईत हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. चित्रपटसृष्टीत सलग ६५ वर्ष सक्रिय असलेले व काळानुरूप वेगवेगळे प्रयोग करणारे आणि कला क्षेत्रातील सर्वच विभागांत यशस्वी कारकिर्द घडविणारे म्हणून रमेश देव यांची ओळख होती.

रमेश नारायणसिंग देव यांचे घराणे मूळचे राजस्थानातील जोधपूरचे. कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी त्यांच्या आजोबांना कोल्हापूरला बोलावून घेतले, तेव्हापासून हे कुटुंब त्याच शहरात स्थिरावले. रमेश देव यांचे शिक्षण कोल्हापूरमध्येच झाले. महाविद्यालयामध्ये असतानाच भालजी पेंढारकर, दिनकर पाटील अशा मान्यवरांशी रमेश देव यांचा परिचय होता. ‘आंधळा मागतो एक डोळा’ या चित्रपटातील त्यांची खलनायकाची भूमिका गाजली. या चित्रपटाने रौप्यमहोत्सव साजरा केला. त्यानंतर त्यांनी रामराम पाव्हणं’, ‘पाटलाचा पोर’ अशा अनेक चित्रपटातून कामे केली. भालजी पेंढारकर यांच्या येरे माझ्या मागल्या मध्ये त्यांनी मुख्य खलनायकही साकारला अशोक ताटे दिग्दर्शित ‘मंगळसूत्र’ या चित्रपटातही त्यांनी भूमिका केली आहे.

‘आरती’ या राजश्री प्रॉडक्शनच्या पहिल्या चित्रपटामध्ये त्यांना छोटी भूमिका मिळाली. तो चित्रपट गाजला. त्यानंतर ‘मोहब्बत इसको कहते हैं’ या चित्रपटात त्यांना सहनायकाची भूमिका मिळाली. त्यानंतर ‘लव्ह अँड मर्डर’मधून त्यांना नायक होण्याची संधी मिळाली. दरम्यानच्या काळात रमेश देव यांनी अजिंक्य थिएटर्स ही स्वतःची नाट्यनिर्मिती संस्था काढून काही नाटकांची निर्मिती केली. ‘तुझे आहे तुजपाशी’, लग्नाची बेडी’. ‘मवाली’ कर्ता करविता’ ‘लाल बंगाली, ‘अकुलिना’, ‘फोन ३३३३३’ आदी नाटकांचे अनेक प्रयोग त्यांनी केले.

त्यांच्या अभिनयाने गाजलेल्या मराठी चित्रपटांमध्ये आंधळा मागतो एक डोळा, गाठ पडली ठका ठका, देवघर, सात जन्माचे सोबती, पैशाचा पाऊस, जगाच्या पाठीवर, सुवासिनी, माझी आई, वरदक्षिणा, भाग्यलक्ष्मी, माझा होशील का, पडछाया, शेवटचा मालुसरा, गुरुकिल्ली, चिमुकला पाहुणा, स्वप्न तेच लोचनी, ओवाळते भाऊराया, फटाकडी, भामटा, बायको असावी अशी, सव्वाशेर, हेच माझे माहेर या चित्रपटांचा समावेश आहे. त्यांनी अभिनय केलेल्या काही प्रमुख हिंदी चित्रपटात दस लाख, आरती, मेहरबान, शिकार,दर्पण, जीवन मृत्यु, खिलौना, आनंद, मेरे अपने, संजोग, ललकार, कोशिश, कोरा कागज़, फकीरा, ड्रीमगर्ल या सिनेमांचा समावेश होता

खलनायकी भूमिकांमधून त्यांचा चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला होता, पण नंतर नायक म्हणून लोकप्रिय झाले. चित्रपट क्षेत्राशी संबंधित सर्व विभागात काम करण्याची इच्छाही रमेश देव यांना होती. त्यांनी स्वतःच्या निर्मिती संस्थेतर्फे ‘सर्जा’ चित्रपटाची निर्मिती केली. ‘सर्जा’ला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. सेनानी साने गुरुजी या चित्रपटाच्या उत्कृष्ट दिग्दर्शनासाठी रमेश देव यांना इराण, इराक आणि चीन या देशांतही पुरस्कार मिळाले. असा मान मिळवणारे ते पहिले मराठी दिग्दर्शक आहेत. क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके’, ‘गोष्ट लग्नानंतरची’, ‘जेता’ आदी चित्रपटांची निर्मितीही त्यांनी केली.

रमेश देव यांना सामाजिक कार्याचीही पहिल्यापासून आवड होती.  त्यासाठीच त्यांच्या प्रेरणेतून त्यांचा मुलगा अजिंक्य देव आणि सून आरती यांनी विशेष मुलांसाठी एक शाळाही मुंबईत सुरू केली. रमेश देव यांनी तीनशे हिंदी आणि सुमारे अडीचशे मराठी चित्रपटांत काम केले. 

चित्रपट जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment