-अनंत पावसकर , मुंबई   

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

On his Birth Anniversary Remembering the Legendary Classical Singer of India Bharat Ratna Pandit Bhimsen Joshi..शब्द.. कधी तारेवरून चालल्यासारखे तोल सांभाळून चालणारे… कधी उपमा, उत्प्रेक्षांच्या अलंकारांनी नटलेले, तर कधी कधी जडजंबाल होऊन विटलेले. शब्द… शब्द… साबणाच्या बुडबुड्यात फक्त प्रतिमेची इंद्रधनुषी छटा दिसते.. आभास निर्मिते.. पकडून पाहिलं तर बुडबुडा फट्कन.. तसंच शब्दांचे. काही काही प्रतिमांना शब्दांच्या कोंदणात नाही येत कोंडता… पं. भीमसेन जोशी… स्वरांचे जादूगार की,… की स्वतःच्या स्वरांच्या हिंदोळ्यावर स्वतःच झुलणारे झुलवा; पण कशाला काढायचा शब्दांचा कीस? स्वयंप्रकाशी सूर्याची करून द्यावी लागते का ओळख.. तसेच पं. भीमसेनजी… सूर्यमंडळालाही भेदणारे… स्वरमंडळ लीलया खेळवणारे. नकोत तुम्हाला कोंदणं… नको सत्कार… कारण तुम्ही आमच्या मनाच्या देव्हाऱ्यात सतत… मागणं एकच ‘त्या’च्याकडे… जीवेत शरद: शतम… पण नियतीला हे मंजूर नव्हतं… 

      पं. भीमसेनजींच्या आवाजाशी लहानपणापासूनच जान-पहचान होती हो, पण ती काय चीज आहे हे उमगायला बरीच वर्षे खर्ची पडली. १९९३ साल होतं ते. कॅसेटस्‌चा जमाना होता. ध्वनिमुद्रण अधिकारी म्हणून मी नुकतीच सूत्रे हाती घेतलेली. आषाढीला पंढरपुरात  लाखो भाविक येत असल्याने, मे महिन्यातच मी मुद्दाम आठवडाभराची टूर करायचं ठरविलं. तिथे जाताच लक्षात आलं की, एच.एम.व्ही. कंपनीच्या अमुकच अल्बम्सची चलती आहे. नवं करायला वाव होता. संधी होती. आपण चांगले अल्बम्स बनविले तर खचितच उत्तम प्रतिसाद मिळणार. मान्यवर गायकांना घेऊन दोन सणसणीत प्रोजेक्टस्‌ करून मैदान मारायचं अशा विचारात मुंबईला परतलो. अगदी वरच्या वर्तुळातल्या दिग्गजांकडे जावं तर पं. भीमसेनजी, पं. जितेंद्र अभिषेकीजी, लतादीदी, आशाताई ही नाव फारच मोठी. बजेटही अव्वाच्या सव्वा होणार. (खरं तर त्यांच्याकडे जायची हिम्मतच होईना) पहिलं गाठलं ते परम मित्र पं. सुरेश वाडकरजींना. ‘ओंकार स्वरूपा’ने यशाची शिखरे पादाक्रांत केलेली असल्याने त्यांनी नव्या अल्बमचा प्रस्ताव मंजूर केला.

आता मित्रवर्य पं. अजितकुमार कडकडेंना भेटलो. ‘देवाचिये द्वारी’ ही त्यांची अभंगाची पहिलीच कॅसेट तुफान लोकप्रिय झालेली. त्यांनीही नवं काही तरी करण्यास अनुमोदन दिलं. झालं! आखणी झाली. ‘पंढरीनाथा पांडुरंगा’, ‘पंढरीचा राणा’ अशा दोन अल्बम्सची निर्मिती समाधानकारक झाली. व्हायब्रेशन्स, पुणे  (आता त्यांची स्वतःची फाऊन्टन म्युझिक कंपनी आहे) यांनी पंढरपुरातल्या वितरणाची जबाबदारी खांद्यावर घेऊन चक्क हजारो कॅसेटस्‌ एका दमात संपवल्या. मालक खुश! आम्हा संबंधितांना ‘प्लॅटिनम-डिस्क’ देऊन गौरविण्यात आलं. ‘इतका चांगला प्रतिसाद असेल तर जुन्या गाजलेल्या अभंगांचं व्हर्शन्स का नाही करत! बाबूजी है.. पं. भीमसेनजी है वगैरे वगैरे’ इति मालक. मी तीन-ताड उडालो. दिग्गजांच्या अभंगांची व्हर्शन्स? पं. भीमसेनजींच्या अभंगाची? ‘गाणार कोण?..’ ती गाणी रसिकांच्या काळजावर कोरली गेलीत. कुणा पाणचट आवाजात पेशकश झाली ना तर खैर नाही आपली. (आदल्या वर्षी शिकार, पुढल्या वर्षी भिकार?!) बजेटची काळजी नव्हती हो, पण असलं अश्‍लाघ्य वर्तन करायला मन धजावत नव्हतं.

त्या काळात रिमिक्सचं फॅड नुकतंच आलेलं. अभंगांचं ‘रिमिक्स’ करण्याचा प्रस्ताव घेऊन कुणा मंत्र्यांच्या वशिल्याचा तट्टू असलेला एक दीडशहाणा म्युझिक कॉन्ट्रॅक्टर उपटला. डायरेक्ट बॉसला भेटला. त्याने ‘डेमो’ दिलेला. अभंगांना ड्रम्स, कीक वगैरे वेस्टर्न संगीतात गुंफलेलं ऐकून पायाखालची जमीनच सरकली. पुढे तसले अनेक प्रस्ताव येऊ लागले. एका क्षणी असं वाटलं की एखादा महाभाग प. पू. बाबामहाराज सातारकरांच्या कीर्तनाचंही ‘रिमिक्स’ करायचा प्रस्ताव आणतोय की काय! (त्यात काय एवढं. ‘कीर्तन’ हा शब्द उल्टा वाचला की ‘नर्तकी’.. सिंपल यार!) निर्दयपणे बरेचसे प्रस्ताव अक्षरशः पायदळी तुडविले. केराची टोपली दाखवली. ‘रिमिक्स’ वगैरे विकृती करण्यापेक्षा तद्दन भारतीय वाद्यांचाच वापर करून (अन्‌-प्लग्ड) अण्णांच्याच एखाद्या शिष्याच्या आवाजात नवं सादरीकरण करण्याची कल्पना दृष्टीपथात आली. मी आमच्या संगीत-संयोजकांना सांगावा धाडला. सुचलेली कल्पना सांगितली.  नेहमीप्रमाणे चांगले वादक घ्यायचं ठरवलं. बजेट मंजूर झालं. फतवा निघाला. याद्या झाल्या. पं. भीमसेनजींची गाणी करायचीत. (कठीण आहे!) अण्णांचे जेवढे म्हणून अल्बम्स प्रकाशित झालेले… आणले एकदाचे!

सगळे अभंग आमच्या लहानपणापासून कानावर पडत होते व तेच ऐकत (तेव्हा चाळिशीत असलेली आमची पिढी) आम्ही मोठे झालो होतो ही वस्तुस्थिती असली तरी त्याचं व्हर्शन करायचं म्हणता ते नीट ऐकणं, अनेकदा व्यवस्थित पारायणं करणं क्रमप्राप्त होतं. संगीत संयोजक नोटेशन काढायच्या तयारीत पेन सरसावून बसले. कॅसेट वाजू लागली. एकच अभंग पुनः पुन्हा ऐकत होतो आम्ही. ऐकता ऐकता थक्क होत होतो. बाप रे! काय गायलंय अण्णांनी! इकडे संयोजकही नोटेशन काढताना दहादा थबकत होते. अनेक जागी त्यांचा हात थरथरताना स्पष्ट दिसत होता. गाणं संपलं की ते शून्यात नजर लावून बसायचे. पाचेक मिनिटं त्याच आश्‍चर्यमुग्ध अवस्थेत व्यतीत केल्यावर भानावर येत पुन्हा अभंग लावला जाई. दुपारी सुरू केलेली ही श्रवणशक्ती बरेच तास सुरूच होती. ते संगीतकार; पण मी सर्वसामान्य श्रोता! दोनेक अभंग नीटसे ऐकले असतील. या दोनच अभंग श्रवणात चारी मुंड्या चीत झालो आम्ही. अण्णांनी जे आणि ज्याप्रकारे गायलं होतं. त्याचा इम्पॅक्ट कानामनावर इतका जबरदस्त झाला की दोन अभंगांनंतर ‘बस्स!!’ असे भान विसरून किंचाळलो.. पेन डाऊन स्ट्राईक! नोकरी गेली तरी बेहत्तर; पण अण्णांच्या अभंगांचं व्हर्शन करणार नाही म्हणजे नाही! पं. भीमसेनजी म्हणजे काय चीज आहे हे इथेच उमगले. तो ‘हँग ओव्हर’, ते भारावलेपण आजही कानामनात कायम वस्तीला आहे.

      भारतरत्न पं. भीमसेनजी (भीमण्णा) यांच्याविषयी आपण बरंच वाचलेलं आणि ऐकलेलं आहे. त्यांच्यावर बरीच पुस्तकंही प्रसिद्ध झालीत. उपलब्ध माहितीनुसार त्यांचं संपूर्ण नाव भीमसेन गुरुराज जोशी, जन्म १९२२ सालच्या रथसप्तमीचा. कर्नाटकातल्या गदग गावातला. तिथी रथसप्तमीची असली तरी ते आपला वाढदिवस ४ फेब्रुवारीला साजरा करायचे, हे आपणांस माहीतच आहे. त्यांचे वडील गुरुराजजी हे एक व्यासंगी संस्कृत भाषिक विद्वान होते. सरकार दरबारी मानमरातब होता. त्यांच्या अकरा मुलांपैकी सर्वात ज्येष्ठ. ते आपले पं. भीमसेनजी. त्यांच्या आईच्या गळ्यातून ऐकायला मिळालेली कानडी भजने हा भीमसेनजींच्या बाल-गळ्यावर झालेला पहिला संस्कार. गाण्याची आवड ही इथेच निर्माण झाली. घरात भावंडांचा गोतावळा असल्याने भीमसेनजी त्यांच्यापासून थोडंसं अलिप्त राहून घराजवळच्या ग्रामोफोनच्या रेकॉर्डस्‌ विकणाऱ्याच्या दुकानात तासन्‌तास बसत असत. हा दुकानदार नवीन रेकॉर्ड आली की ती सतत जाहिरातीसारखी वाजवायचा. गाणं हेच आपलं जीवन, संगीत हाच आपला श्‍वास आहे; आपल्याला आता त्याचीच गोडी लागलीय हे त्यांना बालवयात उमगलं. अनेक दिग्गजांनी गायलेली गाणी तबकडीवर ऐकत तोंडपाठ करून ती पुन्हा पुन्हा गायचा सपाटाच लावला. परिचितात कौतुक होऊ लागलं.

दुकानदाराकडे येणाऱ्यांच्या गप्पांमधून बुजुर्ग व नामांकित गायकांबद्दल बरंच काही ऐकायला मिळे. १९३२ साली उस्ताद अब्दुल करीम खाँसाहेबांची ‘पिया बिन आवत नाही चैन..’ ही ‘झिझोटी’ रागातली ठुमरी ऐकली आणि त्यांच्या गायकीने भीमसेनजींना अक्षरशःवेड लावलं. आपल्या या मुलाचं मन संगीतात रमतंय हे बाबांच्या लक्षात आलं. बाबांनी हार्मोनियम आणून दिला. त्यांनी गावातल्याच एका जन्नप्पा (की चन्नप्पा) कुर्तकोटीबुवांकडे त्याला धाडलं. त्यांच्याकडे काहीबाही शिकेल असं वाटलेलं खरं पण भीमसेनजींच्या मनात वेगळंच होतं. त्यांचं मन तिथे रमेना. आपल्या गळ्यात उस्ताद अब्दुल करीम खाँ वगैरे दिग्गजांसारखं गाणं यायला हवं असा ध्यास होता. त्याच वेडानं झपाटलं होतं. एके दिवशी घरात काहीतरी कारण सांगून स्वारी पळून गेली, थेट उत्तरेकडे.

विजापूर ते पुणे आणि पुढे ग्वाल्हेर, कधी उपाशी, तर कधी अर्धपोटी असा खडतर प्रवास. त्या काळात ग्वाल्हेर हे ठिकाण संगीत आणि कलेचं माहेरघर म्हणून ओळखलं जायचं. खिशात छदाम नाही, पाठीवर शिदोरी कसली तर रेकॉर्डस्‌ ऐकून पाठ केलेल्या तोडक्या-मोडक्या बंदिशी. ग्वाल्हेर महाराजांच्या संगीत विद्यालयात कार्यरत असणाऱ्या उस्ताद हफीज अली खाँसाहेब (विख्यात सरोदवादक उस्ताद अमजदअली खाँसाहेबांचे वडील) यांच्या मेहरबानीने एका ठिकाणी खाण्याची सोय झाली, पण गाण्याचं काय? शेवटी उस्ताद गंजड खाँसाहेबांच्या घरात गुरुकुल पद्धतीनं शिकताना त्यांच्या घरात राबराब राबून थोडी विद्या हासिल केली. नंतर खडगपूर येथल्या केशवराव लुखे, विश्‍वदेव चटर्जी, तसेच न्यू थिएटर्सचे पहाडी संन्याल यांच्याही सान्निध्यात संगीताचे धडे गिरवले. काहीही केल्या एकाग्रता येईना. मन रमेना. या गुरूंच्या व्यस्त दिनचर्येमुळे साधनेत खंडही पडू लागला होता.

पहाडी संन्यालने त्यांना चक्क सिनेमात प्रयत्न करा असा सल्लाही दिला होता. अण्णांना तो पटला नाही. त्यांनी सरळ जालंदर गाठलं. तिथल्या आर्य संगीत विद्यालयात त्या काळातले सुप्रसिद्ध ध्रुपद गायक भक्त मल्होत्रा भेटले. त्यांच्याकडे काही काळ शे-दीडशे धुपदं शिकले. निपुत्रिक असलेल्या एका मिल मालकाने आश्रय दिलेला. भीमसेनजींना त्यांनी पोटच्या मुलाप्रमाणे वागवलं. पहेलवानी खुराक आणि गाणं असा दिनक्रम. जालंदरमध्ये ‘हरी वल्लभका मेला’नामक संगीत संमेलन व्हायचं. नामांकित गायकांची मांदियाळी भरायची. आपली सांगीतिक तृष्णा भागविण्यासाठी देशभरातून लोक तिथे हजेरी लावायचे. भीमसेनजी तानपुरा घेऊन काहींची साथसंगत करायचे. याच संगीत संमेलनात त्यांची गाठ पडली ती पं. विनायकबुवा पटवर्धनजींशी. त्यांनी भीमसेनजींची आस्थेनं विचारपूस केली. तो गाणं शिकायला दूर जालंदरला आलेला पाहून बुचकळ्यात पडले.

‘गाणं शिकायला तू इतक्या दूरवर आलायस? अरे तुझ्या गावाजवळंच कुंदगोळला संगीतातली एक महान व्यक्ती राहते. उस्ताद अब्दुल करीम खाँसाहेबांचेच शिष्य  आहेत ते. सवाई गंधर्व त्यांचं नाव. त्यांच्याकडेच जा तू..’ भीमसेनजी त्यांच्याकडे पाहतच राहिले. ‘काखेत कळसा आणि गावाला वळसा’ म्हणतात ना तसंच वाटलं भीमसेनजींना. अण्णा तडक घरी परतले. आपल्या चुलत आजोबांच्या विश्‍वनाथ महाशब्दे नावाच्या मित्राबरोबर कर्नाटकातल्या कुंदगोळ गावी गेले आणि त्यांनी पं. रामभाऊ कुंदगोळकर अर्थात सवाई गंधर्व यांचा गंडा बांधला. नंतर १९३६ ते १९४० या कालखंडात त्यांनी या गुरूगृही राहून कठोर संगीतसाधना केली. घरात पाणी भरण्यापासूनची सर्व कामं करावी लागायची. कळीचं फूल बनण्याच्या अवस्थेत म्हणजेच तरुणाईत प्रवेशतानाच जालंदरच्या आश्रयदात्यांच्या मेहेरबानीमुळे योग्य वेळी पहेलवानी खुराक मिळाल्यामुळे शरीर धडधाकट होतं.

गुरूंच्या घरची कामं म्हणूनच हलकी झाली, हे सुदैव! अण्णांनी संगीतसागरातले मोती हे इथेच वेचले. १९४४ साली विक्रमादित्य संगीत समारोह झाला. मुंबईत झालेल्या या निमित्ताने त्यांची खाँसाहेब बडे गुलाम अली खाँ, कुमार गंधर्वजी आणि पु. ल. देशपांडेसाहेबांशी परिचय झाला व त्याचं रूपांतर स्नेहात झालं. १९४६ साली गुरू सवाई गंधर्वजींच्या षष्ट्यद्बीपूर्ती समारोहात गुरूंनी त्यांना गाण्याची परवानगी दिली. अण्णांनी एक बंदीश आणि उप-शास्त्रीय चीज म्हणून एक नाट्यसंगीत पेश केलं. याच व्यासपीठावरून संगीतातल्या क्षितिजावर खऱ्या अर्थाने या स्वरभास्कराचा उदय झाला. याच वर्षी पंडितजींची पहिली स्वतंत्र मैफल पुण्यातच झाल्यानंतरच या स्वरभास्कराची रसिकांशी जान-पहचान झाली. खऱ्या अर्थाने सांगीतिक प्रवास हा इथेच सुरू झाला.

      गाता गळा असेल तर गाणं नीट शिकून, घोकंपट्टी करून एखादं गाणं जमू शकतं. मिळालेले शब्द, संगीतकारांनी शिकवलेल्या चालीत आपल्या स्वरयंत्राद्वारे उच्चारणं एकवेळ सोपं म्हणता येईल. मी आमच्या स्टुडिओत माईकवर ‘सूर’ आणि ‘असूर’ दोघांनाही गाताना पाहिलंय! (‘सूर’ म्हणजे गायक आणि ते ‘असूर’ म्हणजे स्वतःला गायक नट म्हणविणारे सुपर-स्टार्स) माईकवर अनेकांची भंबेरी उडताना, भल्याभल्यांची पिवळी होताना पाहिलीय. शास्त्रीय चीज हा वेगळाच प्रांत आहे. एखादा राग/चीज आळवणं म्हणजे सोपं काम नसतं. ती चीज नुसतीच डोक्यात असून चालत नाही. दिलो दिमागसे ते गळ्यातून कसं उतरेल हीच कसोटी असते शास्त्रीय गायकाची. बारा सुरांचा प्रपंच. रंग तेच, कुंचला तोच, पण एखादा कसबी चित्रकार नुसत्या काही फटकाऱ्यात एखादा चांगला अर्थगर्भित आविष्कार करतो ना तसंच काहीतरी. शेवटी सारी मदार असते ती गायकाच्या गळ्यावर. डोक्यात असलेलं ताकदीनं गळ्यातून उतरवावं लागतं. माईकचाही सेन्स असावा लागतो. पं. भीमसेनजींच्या गळ्यावर विधात्याने अनेक गुणांची वैपुल्याने खैरात केलेली असावी.

या दैवी गुणांच्या साथीला अथक, अपरंपार अशा रियाजाची जोड, तसेच प्रखर आत्मविश्‍वास असल्यामुळेच की काय ते मैफल जिंकायचेच. आत्मविश्‍वासपूर्ण सादरीकरण, दमदार फिरत, दमसास आणि गायकीतली त्यांची ती ऐट वाखाणण्यासारखीच. अण्णा आपली पेशकश करताच त्यांच्या अटक नसलेल्या रसपरिपोषक गायकीतून मैफिलीत समोर बसलेला श्रोता दंगच होऊन जाई. श्रवणानंदातले झपाटलेपण, भारावलेपण म्हणतात ना तसं काहीतरी. सकारात्मक कंपनं, चैतन्यमय ऊर्जा. ‘मॅग्नेटिक अफेक्शन’! जणू काही त्या आवाजाने नजरबंदी होतेय की काय, असा आश्‍चर्यजकारक अनुभव. ‘हॅलोजन’सारखा प्रखर प्रकाशझोत चहूबाजूंनी अंगावर यावा अशी अनुभूती. दाही दिशा व्यापून उरेल असा स्वर. आसमंतात भरून राहिल्यासारखा धीरगंभीर आवाज. समोरच्या श्रोतेमंडळीवर स्वरांचे गारूड घालून सत्ता मिळवणारा हा शहेनशहा. आवाजाची जातकुळी म्हणाल तर अस्सल पुरुषी, मर्दानी, किराणा घराण्याची गायकी म्हणजे अनुनासिक, बारीक, टोकदार आणि उंच पट्टी हा तथाकथित समज खोटा ठरवणारी. भीमसेनजींचा आवाज हा ईश्‍वरीस्पर्श झालेला, रुंद, पल्लेदार, गोडवा असलेला; पण पिळदार का कोण जाणे, अण्णांच्या गायकीतले काही गुण, काही बारकावे तर थेट पतियाळा घराण्याशी ताल्लुक असणाऱ्या खाँसाहेब बडे गुलाम अली खांॅ यांच्या गाण्यातले आहेत की काय, असा संभ्रम पडायचा. सारंच चमत्कारिक. एक चीज ऐकून होतेय. त्याचा भर ओसरतोय न ओसरतोय तोच अण्णा पुढे काय ऐकवणार आहेत ही उत्कंठा शिगेला पोहोचलीय.

चमत्कृतीचा धक्का! कानामनावर ‘हँग-ओव्हर’ असतानाच दुसऱ्या चीजने स्तिमित केलंय. हे भारावलेपण कित्येक रसिकांनी अनुभवलं आहे. अण्णांना मैफिलींचा बादशाह म्हणतात ते काही खोटे नाही. काही गायक स्वतःची अशी चाकोरी बनवतात. चौकट बनवतात आणि त्यातच अडकून पडतात; पण अण्णा अशा तथाकथित चौकटीत अडकलेच नाहीत. त्यांनी आपल्या गायकीवर संस्कार करत प्रयत्नपूर्वक उत्तुंग स्वरलेणी चढवली. त्यांच्या  मराठी उच्चारात काहीशी कानडी झाक आहे. गाण्यातल्या काही जागा, ताना, हरकती तर अक्षरशः कर्नाटकी लकबीने येताना जाणवतात; पण त्यात आपलेपणा जाणवतो, गोडवा जाणवतो. स्वराचं सच्चेपण जाणवतं. शास्त्रीय संगीतात अनेक राग आहेत व शास्त्रीय गायक ते आपापल्या पद्धतीनं गातात हे जरी खरं असलं तरी पं. भीमसेनजींचं काही रागांवर भलतंच प्रभुत्व होतं. अमुक रागांवर त्यांचा स्वतःचा असा ठसा होता. ललत, भटियार, मियाँ की तोडी, दरबारी कानडा, कलाश्री, पुरीया कल्याण आणि सदासुहागन भैरवीवर अण्णांची वेगळी अशी जबरदस्त छाप असायची. जाणकार सांगतात की अमुक राग ऐकावे तर पं. भीमसेनजींचेच. धीरगंभीर प्रकृतीची ‘ललत’, रोम रोम पुलकित करणारी ‘तोडी’, रोमांचक ‘कल्याण’, कोमल गांधाराला मुलायम स्पर्श करणारा ‘मुलतानी’, दरबाराला अचंबित करणारा ‘दरबारी’, आपल्या सर्जकतेने गंभीर प्रकृतीचा असूनही कलात्मकतेनं फुलवलेला ‘शुद्ध-कल्याण’ मेघासारख्या गर्जणारा ‘मेघमल्हार’, नादब्रह्म सामावलेले ‘पुरिया’ ‘कलाश्री’ ‘मारूबिहाग’!! किराणा घराण्याच्या खास अशा रागांवर जबरदस्त हुकूमत होती. हे राग ऐकावेत तर पंडितजींकडूनच असा सूर असायचा रसिकांचा. अण्णांनी अनेक नव्या रागांची निर्मिती केली. ललत, भटियार, हिन्डोलिता आणि कलाश्री हे त्यापैकीच काही अजरामर झालेले राग.

      ऋषितुल्य अशा पं. भीमसेनजींच्या गायकीतल्या काही गोष्टी नक्कीच अभ्यास करण्याजोग्या आहेत. त्यांनी सादर केलेल्या आविष्काराचं कुबेरधन नव्या गायकासाठी खचितच मार्गदर्शक ठरणारे आहे. ‘पं. भीमसेन’ हे नवं घराणं उदयास यावं इतकी त्यात ताकद आहे. शास्त्रीय संगीत हे खरं तर मोठं एव्हरेस्ट शिखर, त्याचा आवाका इतका प्रचंड की आपणा सर्वसामान्यांचे हात तिथवर पोहोचणं म्हणजे कठीणच काम. मैफिलीत शेवटच्या रांगेत (चपला असतात ना त्याच्या आसपास) बसणाऱ्या आमच्यासारख्या सर्वसामान्य रसिकांना अस्सल शास्त्रीय संगीत काय खाक समजत होतं? पुढच्या रांगेतल्यांनी नागासारखा फणा काढून मान डोलावली की आपणही मान डोलावायची. त्यांनी दाद दिली की ‘बोल जमुरे’ सारखी आपणही वाहवा करायची.

बस्स! पण पं. भीमसेनजींनी आपल्या अभंग-गायकीतून असा काही करिष्मा केला, जादूगिरी केली की अभंगाच्या रूपातून नकळत शास्त्रीय संगीत आपणा सर्वसामान्यांच्या घराघरात पोहोचलं, रुजलं, वाढलं आणि याच पुण्याईवर की काय अशा प्रकारातले अभंग आणि भक्तिगीतं पुढे वटवृक्षाइतकी फोफावली. पं. भीमसेनजींच्या अभंग गायकीतली प्रासादिकता, आर्तता तसेच ईश्‍वराचरणी समर्पित होणारी भावना मनाला फारच स्पर्शून जाते. नास्तिकाचंही मन क्षणभर विचलित होऊन त्याच्या नकळत देवासमोर आपसुकच हात जोडले जातात. मन परमेश्वराचरणी नतमस्तक होईल अशी ताकद आहे अण्णांच्या भजनगायकीत. कानावर पडणारे सूर इतके सच्चे आहेत की तो दिवस त्यांच्यासाठी आठवणींच्या कुपीत कायम बंदिस्त करण्याइतका लाजवाब ठरायचा. कालांतरानं त्याचं चक्क देवभोळ्या भक्तात रूपांतर होणार हे जणू ठरलेलंच. मला आठवतंय. वीस-पंचवीस वर्षांपूर्वी पं. हृदयनाथजी अरुण दातेंसोबत ‘भावसरगम’ हा निहायतही खुबसूरत असा भावगीतांचा कार्यक्रम करीत असत, तर त्याच काळात पं. भीमसेनजी ‘संतवाणी’ नावाचा एक कार्यक्रम करत असत.

निरनिराळ्या संतांच्या रचना ते अशा तन्मयतेनं गात की समोरचे रसिक मंत्रमुग्ध होऊन डोलू लागत. अभंगांचा मनमुराद आस्वाद घेताना ब्रह्मानंदी टाळी लागल्याची रोमांचक अनुभूती! त्यातल्या अभंगरसाने कित्येक पिढ्या नादावल्या आहेत. ‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ हा अभंग कळसाध्याय म्हणून सादर करताना तर भक्तिरसाचा जणू परमोच्च बिंदू गाठला जायचा. या अभंगातील ‘नामा म्हणे माझा विठ्ठल सापडला..’ या ओळी आळवताना असलं जबरदस्त स्वरशिल्प उभारलं जायचं की त्यामुळे संपूर्ण प्रेक्षागारात अत्युच्च भारावलेपण जाणवायचं. ती कंपणं (व्हायब्रेशन्स) अंगावर शहारे आणायची. रोमरोम पुलकित व्हायचा. भक्तिरसात न्हाऊन निघायचा प्रत्येकजण. त्याक्षणी, ज्या संतश्रेष्ठांनी हे अभंग रचले आहेत ते धन्य होत्साते. स्वर्गातून पंडितजींवर जणू पुष्पवृष्टीच करीत आहेत की काय, असा विचार मनात चमकून जायचा. अमेझिंग! मार्व्हलस!!! ज्यांना या मैफिलींना वारंवार जायला मिळालंय ते खरोखरच भाग्यवान.

      एखादे घराणे बनताना निदान तीनेक पिढ्यांचे तरी सातत्य लागते आणि मुख्य म्हणजे तसं असल्याखेरीज ‘घराणे’ असा शब्दच वापरला जात नाही, असे म्हणतात. पहिल्यानंतर दुसऱ्या आणि त्यानंतरच्या तिसऱ्या पिढीतल्याने आपल्या घराण्याशी ताल्लुक असलेली गायकी तर शिकायचीच; पण आपल्या अंगभूत कौशल्याने त्यात नवनवोन्मेषशाली प्रयोग करायचे, भर घालायची. खाँसाहेब अब्दुल करीम खाँ यांच्या घराण्याची पं. सुरेशबाबू माने, सवाई गंधर्व आणि श्रीमती हिराबाई बडोदेकर ही दुसरी पिढी तर श्रीमती गंगूबाई हनगल, पं. भीमसेनजी आणि पं. फिरोज दस्तूर ही तिसरी पिढी. खाँसाहेब अब्दुल करीम खाँसाहेब, त्यांचे शिष्य सवाई गंधर्व आणि नंतर त्यांच्या नक्श-ए-कदमवर जाऊनही स्वतःची अशी स्वतंत्र ओळख निर्माण करणारे भारतरत्न पं. भीमसेनजी जोशी! सवाई गंधर्वांनी स्वतःची गायकी समृद्ध करण्यासाठी अनेक घराण्याच्या तालमीचा व संस्काराचा पुरस्कार केला होता.

त्यांच्या गायकीवर किराणा घराण्याबरोबरच ग्वाल्हेर घराण्याच्या खाँसाहेब निसार हुसैन खाँ व चतुरस पं. भास्करबुवा बखले (ग्वाल्हेर, आग्रा, जयपूर) यांचाही पगडा होता, असे जाणकार सांगतात. सवाई गंधर्वांनी आपल्या या शिष्योत्तमाला आपल्या किराणा घराण्यातल्या गायकीसह इतरही सगळे नीरक्षीरविवेक शिकवले होते. गायकाला ‘घराणं’ असं हे हवंच असतं. त्याशिवाय त्याला लोकमान्यता मिळत नाही; पण चाकोरीबद्ध गाणं किंवा गुरूने जे जे शिकवलंय तेवढंच जर लोकांपुढे मांडलं तर ती पोपटपंची होते, अशा मताचे होते सवाई गंधर्वजी. पं. भीमसेनजींनी पुढे आपल्या ‘किराणा’ घराण्याची ध्वजा आसेतुहिमालय फडकवत ठेवली होती, यात वादच नाही; पण त्यांनी एका चाकोरीतच न राहता चौकस, चौफेर नजरेने वेगवेगळ्या घराण्यातल्या गायकीचे गुण डोळसपणे ऐकून त्याचा स्वतःच्या गायकीत बेधडकपणे समावेश केला, हे विशेष. खरं तर ही बगावतखोरी पण त्यांच्या करदार, भरदार आवाजाचं कर्णमधुर रूप सामोरं येताच रसिक भारावले जायचे. अभंगगायकीचे तर ते सर्वसामान्यांच्या गळ्यातले ताईत बनले.

      १२ सप्टेंबर १९५२ या दिवशी अण्णांचे गुरू सवाई गंधर्वजींचा स्वर्गवास झाला. त्यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त अण्णांनी सवाई गंधर्व संगीत सोहळा आयोजित केला. हाच सोहळा आज जगभरात सुप्रसिद्ध झाला आहे. शास्त्रीय संगीतातील जवळजवळ सर्वच मातब्बरांनी इथे हजेरी लावलीय. नव्या कलावंतांसाठी हे हक्काचं व्यासपीठ आहे, हे विशेष.

 आज पं. भीमसेनजी आपल्यात नाहीत ही खंत खूपच क्लेशदायी… त्यांच्या महानिर्वाणानंतर त्यांच्यावर बऱ्याच बुजुर्ग लेखकांकडून रकाने भरभरून लिहिलं गेलंय… पण मनात एकच हुंदका दाटून येतोय… वाटतं… आज संगीत क्षेत्रातील ज्याच्या पायांवर नतमस्तक व्हावं असे पाय गेले. कविवर्य विंदा करंदीकरांच्याच शब्दांत सांगायचं तर ‘अमृताचे डोही। बुडविले तुम्ही, बुडताना आम्ही। धन्य झालो. मीपण संपले। झालों विश्‍वाकार, स्वरात ओंकार। भेटला गा.’

भारतरत्न पं. भीमसेनजींचे जे काही अभंग आपल्या काळजावर कामयचे कोरले गेलेयत… त्याची ही नामावली … आठवणीतली गाणी… (कानडी भाषेसह इतर भाषेतही बरेच अल्बम्स आहेत; पण तूर्त आपल्या मराठीपुरतंच…)

०१. माझे माहेर पंढरी…

०२. राजस सुकुमार मदनाचा पुतळा…

०३. आरंभी नंदिन अयोध्येचा राजा…

०४. जाता पंढरीसी सुख वाटे जीवा…

०५. आता कोठे धावे मन…

०६. तुका आकाशाएवढा…

०७. ज्ञानियांचा राजा गुरू महाराव…

०८. इंद्रायणी काठी देवाची आळंदी… – गुळाचा गणपती (१९५३)

०९. जे का रंजले गांजले…

१०. काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल…

११. माझा भाव तुझे चरणी…

१२. अधिक देखणे तरी निरंजन पाहणे..

१३. कसा मला टाकून गेला राम…

१४. नामाचा गजर गरजे भीमातीर…

१५. पावलो पंढरी वैकुंठ भुवन…

१६. पंढरीचा वास चंद्रभागे स्नान…

१७. पंढीरीनिवासा सख्या पांडुरंगा…

१८. मन हो रामरंगी रंगले…

१९. सावळे सुंदर रूप मनोहर…

२०. सगुणाची शेज…

२१. सुख अनुपम संतांचे चरणी…

२२. धन्य आजि दिन झाले…

२३. सुखाचे हे नाम आवडीने घ्यावे…

२४. टाळ बोले चिपळीला… (सोबत डॉ. वसंतरावजी) – भोळी भाबडी (१९७३)

२५. तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल…

२६. विठ्ठल हा चित्ती…

२७. डोलत डोलत ठमकत चाले…

२८. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग…-राजा शिवछत्रपती (१९७४)

२९. ज्याचा सखा हरि त्यावरी…

३०. पंढरीची वारी जयाचिये कुळी…-पंढरीची वारी (१९८८)

३१. विठ्ठलाच्या पायी थरारली वीट…-देवकीनंदन गोपाळा (१९७७)

३२. विठ्ठल गीती गावा…

३३. रम्य ही स्वर्गाहुनि लंका…-स्वयंवर झाले सीतेचे (१९६४)

३४. पुण्यपर उपकार…

३५. देवासी तो पुरे एक प्रेमभाव…

३६. संपले जीवन संपली ही गाथा…

३७. आज मन लाग्यो लंगरवा…

३८. पिया मिलन की आस…-मी तुळस तुझ्या अंगणी (१९५५)

३९. गाऊ कोणते गीत रसिका…

४०. पिया बिन नही आवत चैन…-पतिव्रता

४१. मोरे घर आओ प्रीतम प्यारे…-भैरवी (१९६०)

४२. आज मोरे मन लाग्यो…-सुवासिनी (१९६१)

४३. देव दयेचा अथांग सागर…-क्षण आला भाग्याचा (१९६२)

४४. रंगली आज जुगलबंदी…-शेरास सव्वाशेर (१९६६)

४५. संत तुलसीदास (१९७२)

४६. रेशीम गाठी (१९८८)

४७. केतकी गुलाब… (मन्ना डेंसोबत) – बसंत बहार

४८. रघुवर तुमको मेरी लाज… अनकही

४९. जो भजे हरी को सदा…

४९. रंगरेलिया करत सौतन के साथ… (पं. जसराजजींसोबत) – बिरबल माय ब्रदर (इंग्रजी)

संगीतकार पं. श्रीनिवासजी खळेसाहेबांनी संगीतबद्ध केलेला ‘राम श्‍याम गुणगान’ हा त्यांचा लतादीदींबरोबरचा अल्बमही श्रवणीय… दोन भारतरत्न गायकांचा हा आविष्कार…

१. बाजे रे मुरलिया…

२) नारायण वंदन..

३) श्रीराम जय राम

४) राम के गुणगान

पं. भीमसेनजींना मिळालेले मान-सन्मान

१९७२ – पद्मश्री

१९७६ – संगीत नाटक अकादमी पुरस्कार

१९८५ – पद्मभूषण

१९८५ – सर्वोत्कृष्ट पार्श्‍वगायनासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

१९८६ – पहिली प्लॅटिनम डिस्क

१९९९ – पद्मविभूषण

२००० – आदित्य विक्रम बिर्ला – कलाशिखर पुरस्कार

२००१ – कन्नड विद्यापीठाचा नाडोजा पुरस्कार

२००२ – महाराष्ट्रभूषण

२००३ – केरळ सरकारचा ‘स्वाती संगीत पुरस्कारम्‌’

२००५ – कर्नाटकरत्न

२००८ –       भारतरत्न

२००८ – स्वामी हरिदास पुरस्कार

२००९ – दिल्ली सरकारचा ‘जीवन गौरव पुरस्कार’

२०१० – राम सेवा मंडळी, बंगळुरू कृत ‘एस. व्ही. नारायणस्वामी राष्ट्रीय पुरस्कार’

‘पंडित’ (रामेश्‍वर मंदिर, पुणे येथील ब्रह्मवंदाकडून सन्मानपूर्वक – १९५४

‘उस्ताद बडे गुलाम अली खाँ पुरस्कार’ (१ नोव्हेंबर, १९६१)

‘गायनाचार्य’ – (अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय – १९६४)

‘संगीतरत्न’ (श्री राघवेंद्रस्वामी पीठाकडून साशीर्वाद – १९७२)

‘वज्रदेही’ (श्री.बापूजी भंडारी कृत पुरस्कार)

‘मियाँ तानसेन पुरस्कार’ (फिल्म संगीत उपहार रात्री ६ मे, १९७४)

‘संगीताचार्य’ (जयपूर गांधर्व महाविद्यालयातर्फे)

‘महामहोपाध्याय’ (अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय – १९८२)

‘सर्वोत्तम पार्श्‍वगायक’ (नॅशनल फिल्म फेस्टिवल – १९८५)

‘गौरव’ स्क्रोल ऑफ ओनर (हस्ते के. प्रभाकरराव) २६ जानेवारी, १९८६

‘डी. लिट’ – गुलबर्गा विद्यापीठ ४ मार्च, १९८६

‘संगीत नाट्य अकादमी पुरस्कार’ १९८७

‘गौरव’ दक्षिणी वार्ता (कोलकाता)

‘अभिनंदन पत्र’ कानपूर, महानगरपालिका, १५ ऑक्टोबर १९८९

‘महाराष्ट्र गौरव पुरस्कार’ – महाराष्ट्र शासन, १९९०

‘मियाँ तानसेन पुरस्कार’ (तानसेन समारोह- मध्यप्रदेश) ६ डिसेंबर, १९९१

‘डी. लिट.’ पुणे विद्यापीठ – २७ डिसेंबर, १९९१

‘दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ (दीनानाथ स्मृती प्रतिष्ठान) – १९९२

‘देशिकोत्तम’ – विश्‍वभारती, १९९३

‘डी. लिट.’ – टिळक महाराष्ट्र विद्यापीठ – १८ डिसेंबर, १९९४

‘गौरव’ – पुणे महानगरपालिका – ४ फेब्रुवारी, १९९६

‘गौरव’ – पुणे फेस्टिव्हल – २६ सप्टेंबर, १९९६

‘पुण्यभूषण’ (पहिलाच पुरस्कार) – त्रिदल संस्था.

हिंदी चित्रपट संगीताच्या गोल्डन इरा काळातील दर्जेदार माहितीपूर्ण लेखांसाठी क्लिक करा 

 

Anant Pavaskar
Anant Pavaskar
+ posts

अनंत पावसकर

ज्येष्ठ पत्रकार आणि संगीत संयोजक

१९९२ साली "आज दिनांक" दैनिकातून "संगीत विषयक लेख" लिहिण्याला प्रारंभ. त्यानंतर साप्ताहिक श्री, वृत्तमानस आणि विविध दिवाळी अंकात लेखन.
१९९३ साली "दै. सामनाच्या" फुलोरा पुरवणीत ब-याच कव्हर स्टोरीज लिहिल्यानंतर "आठवणीतील गाणी" हे सदर सुरू झाले..जे सलग सात वर्षे सुरू होते. आपला व्यवसाय म्हणून व्हीनस म्युझिक कंपनी मध्ये ध्वनिमुद्रण अधिकारी या पदावर काम करत असताना संगीत क्षेत्रातील दिग्गजांच्या मुलाखती आणि थेट संवाद साधत केलेलं लिखाण वाचकप्रिय झालं. मराठीत पहिले "ई-बुक" बनविण्याचा मान त्यांच्याकडे जातो. आज त्यांची चार "ई-बुक्स" खूपच लोकप्रिय झालेली आहेत.

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.