-अशोक उजळंबकर

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम

————————

सुरय्याच्या आवाजातील ‘ये कैसी अजिब दास्ताँ हो गयी है, छुपाते छुपाते बयाँ हो गयी है’ हे गाणं आठवलं की लगेच आठवतो फाटक्या तोंडाचा सज्जाद हुसैन (Music Director Sajjad Hussain). मी त्याला फाटक्या तोंडाचा सज्जाद असं म्हणण्याचं कारण म्हणजे तो खरोखरच रागीट स्वभावाचा होता, हेकट स्वभावाचा होता व आपल्या आयुष्याची एवढी फरकट झाली तरी त्याची त्याला खंत नव्हती. आपल्या स्वभावात त्याने जराही बदल केला नाही. गायक कलावंत तर त्याच्या  रेकॉर्डिंगला जायला घाबरत असत. आपलं गाणं पूर्ण होईपर्यंत हा संगीतकार आपल्याला काय म्हणेल याचीच त्यांना धास्ती वाटायची. याला लताचाही अपवाद नव्हता. (Remembering Music Director Sajjad Hussain)

      1935 साली सज्जाद मुंबईत दाखल झाला. मध्य प्रदेशातील सीतामह या संस्थानात आपली दाद घेतली जात नाही हे लक्षात आल्यावर त्याची पावलं ताबडतोब मुंबईकडे वळली होती. सज्जादचे वडील सतारवादक होते तर सज्जाद स्वतः मेंडोलिन सुंदर वाजवायचा. मीनाकुमारीचे वडील सरदार अल्लाबक्ष यांच्याकडे त्याला ‘पनाह’ मिळाली. मास्टर अल्लाबक्ष देखील आपल्या दोन्ही मुलींना चित्रपट व्यवसायात कशी संधी मिळेल याची वाट पाहात होते. अल्लाबक्ष यांच्याकडे राहत असताना त्यांना ‘दोस्त’ हा चित्रपट मिळाला. ‘दोस्त’ मधील नूरजहाँच्या आवाजातील ‘बदनाम मुहब्बत कौन करे’, ‘कोई प्रेमका देके संदेसा’, आलम पे आलम सितम पे सितम हम उठाये है’ ही तिन्ही गाणी गाजली. सर्वत्र सज्जादचं नाव झालं. त्या काळी गुलाम हैदर यांनी देखील आपला जम बसवायला सुरूवात केली होती, परंतु सज्जादची गाणी लोकप्रिय ठरली. सज्जादच्या रागीट स्वभावाचा पहिला शिकार ठरला तो नूरजहाँचा पती शौकत हुसेैन. ‘दोस्त’ चित्रपटाचा तोच निर्माता होता व चित्रपट पूर्ण झाल्यावर त्याचे शौकत हुसेनशी भांडण झाले. तुझ्या नूरजहाँ शिवाय मी माझी गाणी पॉप्युलर करून दाखवितो असे चॅलेंज त्याने केले व त्यामुळेच त्याला येथून पाय काढता घ्यावा लागला.

‘गदर’ या चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी त्याला 1946 मध्ये मिळाली. ‘गदर’चे कथानक 1857 मधील क्रांती युद्धावर आधारीत होते. ‘गदर’ ची गाणी गाजली नाहीत, पण सज्जादच्या वैशिष्ठपूर्ण संगिताची दखल इतर संगीतकारांना घ्यावी लागली. नूरजहाँवर बहिष्कार घातल्यानंतर त्याला राजकुमारीची मदत घ्यावी लागली. मधुबाला, नर्गिस, दिलीपकुमार यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘हलचल’चे संगीतही सज्जादनेच तयार केलं होतं. ‘कोई किस तरह राजे उल्फत’ ही कोठीवरची शायरी राजकुमारीकडून अगदी नूरजहाँच्या स्टाईलवरच गाऊन घेतली. नूरजहाँच्या शौकत हुसेन बरोबर त्याचा सर्वप्रथम खटका उडाला. त्या वेळेपासूनच तो चांगल्या स्वभावाचा नाही, अशी त्याची खास प्रसिद्धी करायचं काम काही लोक येथे व्यवस्थितपणे पार पाडत होते.

‘हलचल’ ची गाणी गाजली, ‘आज मेरे नसीबने मुझको रूला रुला दिया’ आणि ‘भुल जा ऐ दिल’ ही त्यांची दोन गाणी अविस्मरणीय आहेत. आज ‘हलचल’ ची गाणी आठवतात ती सज्जादची मोहम्मद शफीची नाही, पण सज्जादकडे चटकन निर्माते येत नव्हते. त्याच्या विक्षिप्त स्वभावाबद्दल ऐकूनच ते येण्यास घाबरत असत. ‘हलचल’ नंतर ‘सैंया’, ‘रूकसाना’, ‘फर्ज और इष्क’, ‘कसम’ या चित्रपटांना सज्जादने संगीत दिलं होतं; परंतु लोकप्रिय व्हावं अशी गाणी यात नव्हती. ‘हलचल’ देखील त्याला पूर्ण करता आला नव्हता. कारण त्यावेळी त्याचे के. आसिफशी बिनसले होते. आपल्या संगीत क्षेत्रात निर्माता, दिग्दर्शक, कलावंत यांनी दखल देणे सज्जादला मान्य नव्हतं. ‘हलचल’चे निर्माते के. आसिफ गाणं कसं असावं व धून कशी असावी याबाबत सुचना करू लागले व एक दोन वेळा त्याच्या कानावर आपल्या सूचना घातल्या. ‘हलचल’ चे संगीत सज्जादने सोडून दिले व पुढे संगीतकार महंमद शफी यांना तो पूर्ण करावा लागला. याच वेळी ‘रूपलेखा’, ‘मगरूर’ हे दोन चित्रपट असेच त्याच्या हातून निघून गेले. निर्माता, दिग्दर्शक, कलावंत या मंडळी बरोबर योग्य तडजोड न करता आल्यामुळेच सज्जाद यांना अनेक चित्रपट सोडावे लागले.

आपण संगीत देत असलेल्या चित्रपटांतील गाण्यांना उसना आवाज कोणाचा वापरायचा, वाद्यवृंद कसा असावा, गाण्याचा सुरसाज कसा असावा या बाबतीत त्याचे ठोकताळे, गणित ठरलेलं होतं व त्यात कुणी बदल करा असं म्हटलं तर त्यांना राग येत असे. 1952 साली प्रदर्शित झालेल्या दिलीपकुमार-मधुबाला यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘संगदिल’ याची आठवण झाली की लगेच ओठावर तलतच्या मखमली आवाजातील ‘ये हवा ये रात ये चांदनी’ हे गाणं आठवतं. अगदी याच गाण्याचा आधार घेऊन मदन मोहन यांनी महमंद रफीकडून ‘आखरी दाव’ची गझल गाऊन घेतली होती. रसिकांना थोडा आठवायला त्रास होईल; परंतु ‘ये हवा ये रात ये चांदनी’ या ओळी गुणगणल्या की लगेच आठवतात त्या रफीच्या आवाजातील ‘तुझे क्या सुनाऊँ मैं दिलरूबा, तेरे सामने मेरा हाल है.’ या ओळी. 1951 च्या ‘सैंया’मध्ये सज्जन-मधुबाला ही जोडी होती. या चित्रपटातील सर्वच गाणी एकापेक्षा एक होती. परंतु निर्मात्याबरोबर मतभेद झाल्यामुळे या गाण्याच्या रेकॉर्डस देखील निघू शकल्या नाहीत. ‘संगदील’ मधलं लताच्या आवाजातील गाणं, ‘वो तो चले गए ओ दिल, याद से उनकी प्यार कर’ मस्त जमून आलं होतं. लता तलत यांच्या युगल स्वरात ‘दिल में समा गये साजन, फुल खिले चमन चमन’, हेही तितकंच लोकप्रिय झालं होतं, यात गोडवाही होता. गीतादत्तच्या आवाजातील भजन, ‘दर्शन प्यासी आयी दासी’ खूप प्रसिद्ध झालं होतं. ‘संगदील’ संगिताच्या दृष्टिकोनातून यशस्वी ठरला होता. प्रतिभावंत संगीत दिग्दर्शक असूनसुद्धा सज्जाद यांना येथे काम मिळालं नाही, याची कारणं अनेक होती. पण मुख्य कारण म्हणजे त्याचा रागीट स्वभाव!

सज्जाद हा प्रतिभावंत कलावंत होता. याची खातरजमाच करून घ्यायची असेल तर 1963 साली प्रदर्शित झालेल्या ‘रुस्तम सोहराब’ या चित्रपटातील गाणी आठवा. शेवटची गायिका अभिनेत्री सुरैय्याचा हा शेवटचा चित्रपट. या ‘रुस्तम सोहराब’चे इतर कलावंत होते पृथ्वीराज कपूर, प्रेमनाथ, मुमताज, सज्जन व आजाद. ‘रुस्तम सोहराब’ चे दिग्दर्शक विश्राम बेडेकर हे होते. या चित्रपटात एकंदर गाणी चार होती, परंतु प्रत्येक गाण्याचा गोडवा अवर्णनीय असाच होता. नायिका सुरैय्याच्या आवाजातील ‘येे कैसी अजब दास्ताँ हो गयी है, छुपाते छुपाते बयाँ हो गयी है’ हे आजही विसरता येत नाही. लताच्या ‘ए दिलरूबा नजरे मिला’ चा ठेका बऱ्याच अंशी आशा स्टाईलवर बेतला होता. रफी व मन्नाडे यांच्या आवाजातील, ‘फिर तुम्हारी याद आयी ऐ सनम’ ही कव्वाली रोशनच्या सगळ्या कव्वाल्यांना मागे टाकणारी होती. तलतच्या आवाजाचं सगळं कंपन जणू ‘माजंदरा मेरे वतन मेरे जहाँ’ मध्ये अनुभवायला मिळालं होतं. ‘रूस्तम-सोहराब’ या ऐतिहासिक चित्रपटानंतर सज्जादच्या वाट्याला एकही चित्रपट आला नाही.

मेंडोलीन सज्जादचं आवडतं वाद्य. या वाद्यावर त्याची एवढी हुकूमत होती की मेंडोलीनवर तो शास्त्रीय संगिताचे स्वतंत्र कार्यक्रम करीत असे. संगीतकार म्हणून आपण वेगळा ठसा उमटवू शकतो याचा त्याला पुरेपूर विश्‍वास होता. पण सगळ्याच गोष्टी जमून येतात असे नाही.

सज्जादची दास्ताँ खरोखरच अजीब होती, जी सांगता सांगता कधीच संपणार नाही.

हेही वाचा – स्वर : भावूक , नशीला…..गीता दत्त

Founder Editor of Navrang Ruperi Mr Ashok Ujlambkar
Ashok Ujlambkar
+ posts

Leave a comment