-अशोक उजळंबकर

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Remembering Hindi Cinema’s Popular Writer Director Kamal Amrohi  चित्रपटाचं प्रत्येक अंग आपल्या कल्पनेनुसारच झालं पाहिजे असा आग्रह धरणारा दिग्दर्शक म्हणजे कमाल अमरोही. निर्माता त्याला कंटाळून जात असे; परंतु कमाल आपला हट्ट कधीच सोडत नसे. कमाल अमरोही आजच्या पिढीला थोडा फार लक्षात आहे तो ‘पाकिजा’मुळे. स्व. मीनाकुमारीचा शेवटचा चित्रपट. जो तिच्या निधनानंतर सुपरहिट ठरला. कमाल अमरोहीच्या प्रत्येक निर्मितीला कित्येक वर्षे लागत असत. पाकिजाची गाणी 1960 च्या सुमारास तयार झाली होती, तर चित्रपट पडद्यावर यायला 1972 साल उजाडले होते.

      कमाल अमरोही यांचा सिनेमाशी काहीच संबंध नव्हता. या क्षेत्रात आपण कधी येऊ असं त्यांना वाटलं नव्हतं; परंतु मित्रांमुळे ते या क्षेत्रात ओढले गेले. एका मासिकाचे संपादक म्हणून ते काम करीत होत, त्यामुळे लेखनाची सवय त्यांना खूप होती. बऱ्याच कथा प्रसिद्ध झाल्या होत्या. पटकथा लेखन व गीतकार, आगा जानी काश्‍मिरी हे त्यांचे मित्र. हे दोघे मुंबईत आले व त्यांनी स्टुडिओचे दार ठोठावले. आगा जानी यास नायक व्हायचे होते, तर कमालसाहेब आपली पटकथा एखाद्या चित्रपटाला फिट होते का, याकरिता प्रयत्नशील होते. मुंबईच्या जे.जे. रुग्णालयाजवळील एका चाळीत ते राहत असत. त्या काळी म्हणजे 1938 साली खोलीचे भाडे होते फक्त दोन रुपये. लहानपणापासूनच कमालसाहेबांना उर्दू व फारसी या दोन्ही भाषांचे चांगले ज्ञान होते. अनेकांना ते आपल्या फारसी बोलीमुळे आश्‍चर्यचकित करीत असत. मुंबईत आल्यानंतर कमालसाहेबांची भेट ख्वाजा अहमद अब्बास यांच्याशी झाली. लाहोरमध्ये असताना त्यांची मैत्री झाली होती व कमालसाहेबांची ‘आँखो का मंदिर’ ही कथा त्यांनी वाचली होती. ही कथा त्यांना आवडल्यामुळे त्यांनी बॉम्बे टॉकीजचे हिमांशू रॉय यांना कमालची ही कथा ऐकवली. हिमांशू रॉय त्याकाळी फार बडे प्रस्थ होते. त्यांनी लगेच कमालसाहेबांना 350 रु. पगारावर बॉम्बे टॉकीजकरिता करारबद्ध केले.

      बॉम्बे टॉकीजच्या चित्रपटाकरिता पटकथा, लेखक म्हणून कमाल अमरोही वयाच्या 19 व्या वर्षी दाखल झाले; परंतु त्यांच्या आगमनानंतर काही महिन्यांनी हिमांशू रॉय यांचे निधन झाले व ‘आँखो का मंदिर’ची निर्मिती होऊ शकली नाही. त्यानंतर अब्बास यांनी सोहराब मोदी यांची भेट घेण्याचा सल्ला दिला. बॉम्बे टॉकीजप्रमाणे मिनर्व्हा मूव्हिटोन ही कंपनीदेखील त्या काळी फॉर्मात होती व सोहराब मोदी या नावाचा सर्वत्र दबदबा होता. सोहराब मोदी यांना उर्दू भाषेचे वेड होते व त्यांनी कमाल यांच्या लघुकथा वाचल्या होत्या. सोहराब मोदी यांना कमाल अमरोही यांनी ‘जेलर’ ही कथा ऐकवली. ‘जेलर’ची भूमिका सोहराब यथायोग्य पार पाडतील, असे त्यांनी सांगितले. कमाल यांची ही कथा त्यांना आवडली व त्यांनी लीला चिटणीस व शीला या दोन नायिका घेऊन ‘जेलर’ तयार केला. दिग्दर्शनाची जबाबदारी सोहराब मोदी यांनीच पार पाडली. ‘जेलर’ची कथा चांगली होती; परंतु तिच्यामधील वेगळेपणा सामान्यांना समजू शकण्यासारखा नव्हता. कथा, संवाद व गीते अशी तिहेरी जबाबदारी कमाल अमरोही यांनी ‘जेलर’द्वारा पार पाडली. जेलरचे संगीत मीरसाहेब यांनी दिले होते. याच ‘जेलर’ची दुसरी आवृत्ती 1958 साली सोहराब मोदी यांनी परत काढली; परंतु आता कामिनी कौशल व गीता बाली हे कलावंत यात काम करीत होते.

      1938 च्या सुमारास कमाल अमरोही मिनर्व्हा मूव्हिटोनच्या ‘जेलर’ द्वारा खरे प्रकाशात आले. ‘जेलर’ला त्या काळी यश मिळाले होते. म्हणून खूश होऊन सोहराब मोदी यांनी आपल्या ‘पुकार’ची जबाबदारी त्यांच्यावर टाकली. चंद्रमोहन, नसीम, शीला असे बडेबडे कलावंत त्यात होते. ‘पुकार’ त्या काळी रौप्यमहोत्सवी ठरला. पेशावर येथे तर ‘पुकार’ दोन चित्रपटगृहांत लागला होता. ‘पुकार’चे संवाद खूपच गाजले. सोहराब मोदीचा कणखर आवाज व कमाल अमरोहीचे दमदार संवाद यामुळे पुकारला कमालीची लोकप्रियता मिळाली. केवळ संवाद एकण्याकरिता प्रेक्षक ‘पुकार’ बघायला जात असत. त्यानंतर त्यांनी मोदी यांच्या ‘मैं हारी’ करिता पटकथा व संवाद लिहिले. नसीम बानूची प्रमुख भूमिका असलेल्या ‘उजाला’चे संवाद त्यांचे होते. सोहराब मोदी यांनी संधी दिल्यामुळे कमालसाहेब पटकथा, संवाद व लेखक म्हणून खूपच प्रसिद्ध होत होते. हे करीत असतानाच त्यांनी गीतरचनादेखील केली; परंतु त्यांची गाणी लोकप्रिय ठरली नाहीत.

      सोहराब मोदीसोबत काम करीत असतानाच कमाल अमरोही यांचे त्यांच्याशी खटके उडत होते व शेवटी ‘शीश महल’च्या वेळी कमालसाहेब मोदी यांच्या मिनर्व्हा मूव्हिटोनमधून बाहेर पडले. त्यानंतर बॉम्बे टॉकीजच्या वाच्छा यांच्याकडे त्यांनी काम करण्यास होकार दिला. ‘महल’ या चित्रपटाची कथा त्यांनी एस. मुखर्जी, कारदार यांना ऐकवली होती; परंतु त्यांनी त्या कथेकडे फारसे गांभीर्याने पाहिले नाही. वाच्छा यांना त्यांनी महलचे कथानक ऐकवले. कमाल अमरोही यांनी प्रथमच एक रहस्यमय कथा लिहिली होती व तिचे दिग्दर्शने स्वतःच करावे, अशी त्यांची इच्छा होती. त्यावेळी बॉम्बे टॉकीजच्या चित्रपटातून अशोककुमार फॉर्मात होते. अशोककुमार यांना ‘महल’चे कथानक आवडले होते व त्यांनी या चित्रपटात काम करण्यास होकार दिला होता. नायिका म्हणून अनेक चेहरे पाहण्यात आले; परंतु शेवटी मधुबालाकडे ही भूमिका गेली. ‘महल’ जेव्हा तयार झाला तेव्हा अनेकांना हा चित्रपट चालणार नाही असेच वाटत होते; परंतु पहिले दोन आठवडे संपल्यानंतर या रहस्यकथेने जो वेग घेतला तो रौप्यमहोत्सवी मजल मारेपर्यंत. अशोककुमार यांना सिगारेट कशी ओढावी याचे ट्रेनिंग कमाल अमरोही यांनी ‘महल’च्या सेटवरच दिले. ‘महल’मध्ये अशोककुमार यांची चालण्याची ढबदेखील निराळीच होती.

      खेमचंद प्रकाश यांच्या संगिताने सर्वत्र बहार उडवून दिली होती. ‘आयेगा आयेगा, आयेगा, आनेवाला’ हे गाणं आजही लोकप्रिय आहे. रहस्यमय चित्रपटांची सुरुवात जणू ‘महल’पासून झाली असे म्हणता येईल. अशोककुमार यांनी कमाल अमरोही यांना ‘महल’चे खास मानधन म्हणून 40,000 रु. दिले. ‘महल’मध्ये अनेक रहस्यमय दृश्‍यांच्या वेळी कमालसाहेबांनी आपल्या कुशल दिग्दर्शनाचा उपयोग करून त्यात जिवंतपणा आणला होता. ‘महल’ला मिळालेल्या यशापासून कमाल अमरोही यांच्या नावाचा दबदबा सर्वत्र झाला होता. दुसऱ्या निर्मात्याकंडे काम करण्यापेक्षा स्वतःची निर्मिती संस्था सुरू करावी, असे त्यांना वाटत होते व त्यांनी काही दिवसांत ‘कमाल पिक्चर्स’ ही संस्था सुरू केली. ‘दायरा’ ही कमाल पिक्चर्सची पहिलीच निर्मिती. दिग्दर्शनाचे काम कमाल अमरोही यांनी आपल्याकडेच ठेवले. एका तरुणावर प्रेम असतानादेखील एका मुलीचे लग्न एका वयस्क पुरुषाबरोबर लावले जाते. या मुलीच्या मनाची झालेली द्विधा अवस्था त्यांनी ‘दायरा’ मध्ये मांडली होती. विषय थोडा जडच होता; परंतु कमाल अमरोही यांनी त्यात थोडासा वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न केला होता. चित्रपट तयार करण्यापूर्वी त्याच्या यशाबद्दल कमाल यांना थोडा जास्तच आत्मविश्‍वास होता.

  ‘दायरा’च्या सेटवर कमालसाहेबांच्या भेटीगाठी मीनाकुमारीसोबत वाढल्या व त्या भेटीचे लग्नात रूपांतर झाले; परंतु पुढे घटस्फोटापर्यंत मजल गेली. ‘दायरा’मध्ये नासिरखान व कुमार हे दोन नायक होते, तर संगिताची बाजू जमाल सेन यांनी सांभाळली होती. व्यावसायकिदृष्ट्या ‘दायरा’ला यश मिळाले नाही व कमालसाहेबांची गुंतवणूक फायदेशीर ठरली नाही. ‘दायरा’ फ्लॉप झाल्यानंतर किशोर साहू ‘दिल अपना और प्रीत पराई’ चे कथानक घेऊन कमाल अमरोही यांच्याकडे आले व त्यांनी मीनाकुमारीला नायिका म्हणून करारबद्ध केले होते.

      ‘दिल अपना और प्रीत पराई’ सुवर्णमहोत्सवी ठरला. या चित्रपटाचे दिग्दर्शन किशोर साहू यांनी केले होते, तर पटकथा कमाल अमरोही यांची होती. ‘दिल अपना और प्रीत पराई’ नंतर पाकिजाची निर्मिती त्यांनी सुरू केली. ‘मौसम है आशिकाना’ हे गाणं त्यांनीच लिहिलं होतं. ‘पाकिजा’ची निर्मिती हातात घेतली तेव्हा कमाल अमरोही यांच्या डोक्यात ‘दायरा’चे अपयश होते. ‘दायरा’मध्ये करमणूक नव्हती. गाणी कर्णमधुर नव्हती म्हणूनच ‘दायरा’ बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला नव्हता. ‘पाकिजा’चे संगीत त्यांनी गुलाम महंमद यांच्याकडून तयार करून घेतले होते. सर्वच गाणी सुपरहिट होती. ‘पाकिजा’ ची निर्मिती मोठ्या प्रमाणावर करायचा त्यांचा विचार होता. मीनाकुमारीसोबत कमालसाहेबांचा झालेला घटस्फोट ‘पाकिजा’च्या उशिराला कारणीभूत ठरला. त्यातच मीनाकुमारी आजारी पडली. तिच्या आजारपणात चित्रपट रखडला. मीना कमालसाहेबांकडून वेगळी झाली होती; परंतु तिने नंतर तो चित्रपट पूर्ण करून दिला. ‘पाकिजा’मध्ये कमाल अमरोही यांनी आपले सर्वस्व पणाला लावले होते. ‘पाकिजा’ हिट ठरला; परंतु श्रेय मीनाकुमारीला मिळाले. कारण मीनाकुमारी याच सुमारास मरण पावली. मीनाच्या मृत्यूमुळे ‘पाकिजा’ हिट गेला असे म्हणतात; परंतु तसे नव्हे. असे जर असते तर मीनाकुमारीचा ‘गोमती के किनारे’ हा खरा शेवटचा चित्रपट; तो काही हिट ठरला नाही.

‘पाकिजा’ नंतर ‘रझिया सुल्तान’ ही ऐतिहासिक कलाकृती सुपर फ्लॉप ठरली. हेमामालिनी, धर्मेंद्र असे बडे कलावंत यात होते; धर्मेंंद्र-हेमा यांच्यावर वयाचा परिणाम दिसू लागला होता. त्यामुळे प्रेमी जोडी म्हणून प्रेक्षकांनी त्यांचा स्वीकार केला नाही. ‘याकूत’च्या भुमिकेसाठी धर्मेंद्रने घेतलेले परिश्रम आजही जाणवतात. कमाल साहेबांचे सुपुत्र शानदार याचीही एक भूमिका या चित्रपटात होती. रेडिओ उद्घोषक कब्बन मिर्झा यांचा वजनदार आवाज ‘याकुत’च्या गाण्यासाठी त्यांनी वापरला होता. ‘आयी जंजीर की झंकार खुदा खैर करे’ हे गीत आजही ऐकायला आवडतं.

इतक्या वजनदार आवाजाचा हा मालक घशाच्या कर्करोगाने मरण पावला ही दैवगती निराळीच. शंकर हुसेन हा कमाल अमरोही यांचा चित्रपट नवोदित कलावंताचा भरणा असल्यामुळे व रखडल्यामुळे चालला नाही. मोहम्मद रफी यांनी गायलेले ‘कहीं एक मासुम नाजुक सी लडकी’ हे गाणे गाजलं तर लताच्या आवाजातील ‘आप यु फासलोसे गुजरते रहे’ आणि ‘अपने आप रातो मे’ ही खय्यामच्या संगितातील गाणी त्या काळी गाजली होती. कमाल अमरोहीच्या कारकीर्दीचा विचार केला, तर ‘महल’, ‘पुकार’, ‘पाकिजा’ ही तीनच नावं डोळ्यासमोर येतात. दिग्दर्शक म्हणून त्याच्या ‘पाकिजा’ला मिळालेले यश खरोखरच खूप मोठे होते. वैयक्तिक जीवनात मीनाकुमारीसोबत ते जमवून घेऊ शकले नाहीत, परंतु त्यांची छाया ‘पाकिजा’ वर मात्र पडलेली दिसून येत नाही.    

हिंदी चित्रपटाच्या गोल्डन इरा काळातील इतर दर्जेदार लेखांसाठी क्लिक करा 

Founder Editor of Navrang Ruperi Mr Ashok Ujlambkar
Ashok Ujlambkar
+ posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.