-अशोक उजळंबकर

‘ओ दूर जानेवाले, वादा ना भूल जाना’ असं शेवटपर्यंत ती देव आनंदला म्हणाली नाही. कृष्णमहल येथे तिची मुलाखत घेण्याची संधी दोन वेळेस मला मिळाली. परंतु एकाही वेळेस देव आनंदसोबतच्या मैत्रीचा विषय चर्चेला आला नाही. उलट मुलाखत संपल्यावर तिनेच विचारले, “आपने मुझे देव साहबके बारे में कुछ पूछा हीं नहीं?’’ मी उत्तरलो, “वो तुम्हारा जाती मामला था, मुझे आपके फिल्मी करिअर में दिलचस्पी है.’’ भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नूरजहाँ व खुर्शीद पाकिस्तानात गेल्या. तेव्हा हिंदी चित्रपटांतून गायिका अभिनेत्री बोटावर मोजण्याइतक्याच उरल्या होत्या. त्यातच  लता नावाचे वादळ येथे येऊ घातलं होतं. नूरजहाँ व खुर्शीद यांच्या काळात येथे पार्श्‍वगायिकांचे प्रस्थ फारसे वाढलेले नव्हते. सुरय्या येथे दाखल झाली ती एक अभिनेत्री म्हणून. (Remembering Singer and Actress Suraiya) पार्श्‍वनायिका म्हणून चमकण्यापूर्वी ती एक बाल कलावंत म्हणून ‘मुमताज महल’, ‘स्टेशन मास्तर’ या चित्रपटांत चमकली होती. पुढे चालून आपण नायिका व्हावं असा तिने कधीच विचार केला नव्हता. कारण तिला अभिनयापेक्षा गायनाची गोडी जास्त होती. आकाशवाणी मुंबई केंद्रावर लहान मुलांच्या कार्यक्रमांत तिच्यासोबत राज कपूर, मदन मोहन हेही असायचे.

      आकाशवाणीवर कार्यक्रम सादर करणाऱ्या सुरय्याचा चित्रपट व्यवसायात प्रवेश झाला तो  ‘नई दुनिया’ या चित्रपटाद्वारे. ‘नई दुनिया’मधील सुरय्याचा आवाज ऐकून नौशादमियाँचे तिच्याकडे लक्ष गेले. त्यावेळी कारदारच्या ‘शारदा’ या चित्रपटाची नायिका मेहताब हिच्याकरिता सर्वप्रथम त्यांनी सुरय्याचा आवाज वापरला. ‘शारदा’मधील सुरय्याने गायिलेल्या ‘पंछी जा, पीछे रह गया मेरा बचपना’ या गाण्यामुळे तिचा गायकीला आकार आला. ‘शारदा’मधील मेहताबकरिता सुरय्याने गायिलेली गाणी खुद्द मेहताबलाच इतकी आवडली की, ती नेहमीच सुरय्याच्या पार्श्‍वगायनाचा आग्रह धरू लागली. ‘संजोग’, ‘शमा’, ‘कानून’, ‘जीवन’ या सर्वच चित्रपटांत मेहताबकरिता सुरय्याचा आवाज वापरला होता. देखणे रूप लाभलेल्या या गायिकेला अभिनेत्री बनण्याची संधी दिली ती निर्माते जे. के. नंदा यांनी, आपल्या ‘इशारा’ या चित्रपटात. त्यांनी तिच्या ध्यानीमनी नसताना नायिका बनविलं. अशा रीतीने नूरजहाँ व खुर्शीद यांच्याप्रमाणे गायिका अभिनेत्री म्हणून तिचा येथे प्रवेश झाला. 1943 मध्ये पडद्यावर आलेल्या ‘इशारा’पासून सुरू झालेली सुरय्याची रुपेरी कारकीर्द संपली ती 1963 मध्ये पडद्यावर आलेल्या ‘रूस्तुम सोहराब’ या चित्रपटाद्वारे. तब्बल वीस वर्षे ती येथे गायिका अभिनेत्री म्हणून चमकली. इतकच नव्हे तर सैगलसारख्या स्वरसम्राटाबरोबर ती ‘उमर खय्याम’, ‘तदबीर’, ‘परवाना’ या चित्रपटांत यशस्वीपणे उभी राहिली. ‘अनमोल घडी’मध्ये नूरजहाँ व सुरेंद्र यांच्या आवाजात आपला आवाज मिसळून तिने आपले एक वेगळे स्थान निर्माण केले.

      सुरय्या येथे दाखल झाली तेव्हा लता नावाच्या चमत्काराचा उदय झाला होता. नायिकेला गायिका असणं तितकं महत्त्वाचं नव्हतं. शांता आपटे, काननबाला, जयश्री, नलिनी जयवंत या नायिका आपली गाणी स्वत:च म्हणत होत्या तेव्हा लता मंगेशकर यांनी आपल्या आवाजात त्यांना गायला भाग पाडले होते. लताच्या अद्भुत आवाजाच्या जादूने आमचा आवाज मागे पाडला, अशी स्पष्ट कबुली यापैकी काही नायिकांनी दिली होती. लतापेक्षा त्याकाळी सुरय्याच्या आवाजाचे रसिक दिवाणे झाले होते. लता तेथे दाखल झाल्यानंतर, ‘प्यार की जीत’, ‘बडी बहन’ या चित्रपटांतील अभिनयामुळे सुरय्या अभिनेत्री म्हणून चांगली परिचीत झाली होती. ‘बडी बहेन’ हे नाव समोर आलं की लक्षात येतात त्या, ‘चुपचुप खडे हो जरूर कोई बात है’ या गाण्याच्या ओळी, तसेच लताचा ‘चले जाना नही’ या गाण्यामधील सुरेख स्वर. एकीकडे लताच्या या स्वरांनी धूम मचवली होती तर दुसरीकडे सुरय्याच्या आवाजातील ‘वो पास रहे या दूर रहे’, ‘बिगडी बनाने वाले बिगडी बना दे’ या गाण्यांनी रसिकांना वेडावून सोडलं होतं. लताच्या आवाजाचा दणका बघून अनेक गायिका अभिनेत्रींनी हार पत्करली होती; परंतु सुरय्या मात्र आपले वेगळे स्थान टिकवून होती.

      गायिका-नायिका हे स्थान सुरय्याने आपल्या आवाजाच्या व अभिनयाच्या बळावर मिळवलं होतं. कारदार यांच्या ‘दिल्लगी’, ‘नाटक’, ‘दर्द’, ‘दास्तान’, ‘दीवाना’ या सर्वच चित्रपटांतील तिचा अभिनय दमदार झाला होता. ज्या कारदार यांच्या ‘शारदा’मध्ये तिने पार्श्‍वगायिका म्हणून प्रवेश मिळवला होता त्याच कारदार यांच्या पुढील अनेक चित्रपटांत ती नायिका म्हणून चमकली. सुरय्याचा आवाज व अभिनय ही कारदार यांच्या चित्रपटांची जमेची बाजू असायची. सुरय्याचा आवाज व नौशाद यांचं संगीत लाभल्यामुळे ‘नाटक’, ‘दिल्लगी’ हे चित्रपट यशस्वी ठरले. ‘मुरलीवाले मुरली बजा’ हे सुरय्याच्या आवाजातील गाणे आजही तेवढेच लोकप्रिय आहेे. सुरय्याच्या आवाजाला खरा ब्रेक दिला तो नौशाद यांनीच. सुरय्याच्या आवाजाचा सुरेल उपयोग इतर अनेक संगीतकारांनी देखील करून घेतल्याने दिसून येते. हुस्नलाल भगतराम यांनी ‘ओ दूर जाने वाले…’प्रमाणेच ‘तेरे नैनोंने चोरी किया’ हे सुरेल गीत ‘प्यार की जीत’ मध्ये तिच्याकडून गाऊन घेतले. एस. डी. बर्मन यांनी तिच्याकडून ‘मन मोरा हुआ मतवाला’ व ‘नैन दीवाने एक नही माने’ (अफसर), ‘लाई खुशी की दुनिया’ (विद्या) यासारखी गाणी गाऊन घेतली. लताचे या पार्श्‍वगायनाच्या क्षेत्रात आगमन झाले होतेच. त्यामुळे तिच्यासोबत द्वंद्वगीत गाताना तिने स्वत:ला कुठेच कमी पडू दिले नाही. ‘बलम’, ‘सनम’, ‘शोखियां’ या सर्व चित्रपटांत लतासोबत ती गायिली; परंतु कधीही तिचा आवाज डावा वाटला नाही. 

      लताच्या आवाजाचा आग्रह संगीतकार सी. रामचंद्र नेहमीच धरतात ही बाब सुरय्याला माहिती होती. ‘दुनिया’ या चित्रपटाच्या संगीताच्या वेळी सी. रामचंद्र यांनी सुरय्याला गाण्याकरिता पाचारण केेले. त्यावेळी तिने त्यांना विचारले, ‘प्रत्येक चित्रपटात तुम्ही लताच्या आवाजाचा आग्रह धरता, मग या चित्रपटातही तिच्याच आवाजाचा आग्रह धरून तुम्ही मला तिचा उसना आवाज का देत नाहीत?’ त्यावर सी. रामचंद्र तिला म्हणाले, ‘तुझ्यासाठी मी लताच्या आवाजाचा आग्रह धरला तर मला चित्रपट सोडावा लागेल.’ गुलाम महंमद, अनिल विश्‍वास, हंसराज बहल इत्यादी मान्यवर संगीतकारांनी सुरय्याच्या आवाजाचा सुरेल उपयोग करून घेतला. सुरय्याच्या गाण्याइतक्याच तिच्या प्रेमकथा सर्वत्र मशहूर आहेत. चॉकलेट हिरो देव आनंद यशाच्या पायऱ्या चढला तो सुरय्याबरोबर काम करूनच. सुरय्या एके काळी देवसाठी वेडी झाली होती हे सर्वांनाच माहिती होते. ‘आगे बढो’, ‘मोहन’, ‘उद्धार’ या चित्रपटांत देव आनंद साफ आपटला होता. तेव्हा त्याला आपल्यासोबत घेऊन सुरय्यानेच यशस्वी केलं. ‘जीत’, ‘निली’, ‘अफसर’, ‘सनम’, ‘शायर’ या चित्रपटांत सुरय्या-देव आनंद ही जोडी खूपच गाजली. प्रसिद्ध चरित्र अभिनेत्री वीणा हिचा भाऊ इफ्तिकार तर सुरय्याच्या सौंदर्यावर पागलच झाला होता. संध्याकाळच्या वेळी तो सुरय्याच्या घराजवळील भिंतीजवळ येऊन उभा राहायचा व सकाळ झाली की घरी परत जायचा. सुरय्याचं त्याच्यावर प्रेम आहे असं तो सांगायचा. तो जेव्हा सुरय्याच्या दारासमोर बसलेला असायचा, तेव्हा हजारो रसिक त्याला बघायला येत असत. त्याच्या प्रेमपत्रांना तिने अजिबात दाद दिली नाही. त्यावेळी मरीन ड्राईव्हच्या रहिवाशांनी मुख्यमंत्र्यापर्यंत या प्रकरणी तक्रारी केल्या होत्या.

      देव आनंदचं आपल्या नातीवर प्रेम आहे व तो तिच्याशी लग्न करणार आहे याचा सुगावा सुरय्याच्या आजीला लागला होता. त्वरित तिने सुरय्याचे चित्रपट थांबवले. एका हिंदू तरुणास जावई करून घेणं ही बाब तिला मान्यच होणार नव्हती. दुर्गा खोटे, गुरुदत्त ही बडी बडी मंडळी देव-सुरय्याचा पत्रव्यवहार सांभाळीत होती. देव आनंदने तिला आणलेली हिऱ्यांची अंगठी सुरय्याच्या आजीला सापडताच तिने ती मरीन ड्राइव्हच्या समुद्रात फेकून दिल्याची सुरस कथाच सुरय्याने एका मुलाखतीत सांगितली होती. ‘जीत’ या चित्रपटाच्या सेटवरच लग्न करण्याची त्यांची योजना सुरय्याच्या घरच्यांनी उधळून लावली होती. सुरय्याच्या घरचे आपली डाळ शिजू देत नाहीत हे लक्षात आल्याबरोबरच देव कल्पना कार्तिकशी लग्न करून मोकळा झाला.

      यशाच्या शिखरावर असतानाच सुरय्याने आपणहून निवृत्तीचा निर्णय घेतला. तिच्या या निर्णयाने निर्मात्यांना धक्का बसला, परंतु गायिका अभिनेत्री ही दुहेरी भूमिका पार पाडणे सुरय्याला जडच चालले होते. त्यावेळी प्रत्येक नायिकेजवळ 10 ते 12 चित्रपट असायचे व एका एका चित्रपटात 10 गाणी असायची. मिर्झा गालीबच्या चित्रीकरणाच्या वेळी एका नृत्याच्या वेळी चक्कर येऊन ती खाली पडली. त्यानंतर मात्र तिने करार केलेले चित्रपट पूर्ण केले. ‘शमा’ व ‘रूस्तुम सोहराब’ हे तिची भूमिका असलेले शेवटचे चित्रपट होत.

      आपल्या सौंदर्याने अनेकांना पागल करणारी तर आपल्या गायनाने रसिकांना तृप्त करणारी तिच्यासारखी गायिका अभिनेत्री दुसरी सापडणार नाही. सुलक्षणा पंडित दोन्ही आघाड्यांवर अयशस्वी ठरली. तर तिची नक्कल करणारी मुबारक बेगम अपयशीच ठरली. अमीरबाई कर्नाटकीच्या गायनाची छाप असलेल्या सलमा आगाला तर ‘दिल के अरमा आँसूओमे बह गये’ असेच म्हणावे लागले. एकदा निवृत्ती घेतल्यानंतर परत पडद्याकडे बघावे, असे तिला कधीच वाटले नाही. मरीन ड्राईव्ह येथील आपल्या कृष्णभवन निवासस्थानी ‘वो पास रहे या दूर रहे, नजरों में समाये रहते है, इतना तो बता दे कोई हमे क्या प्यार इसीको कहते है’ या ओळी आठवत तिने आपल्या आयुष्याचा उत्तरार्ध संपवला.

 

Founder Editor of Navrang Ruperi Mr Ashok Ujlambkar
Ashok Ujlambkar
+ posts

Leave a comment