– अजिंक्य उजळंबकर

‘पहेला नशा’ (१९९३) आणि ‘बाझी’ (१९९५)… या दोन चित्रपटांची नावे आज आठवायची म्हटली तर डोक्याला थोडंसं तरी खाजवावे लागते. यशस्वी मसाला चित्रपटांचे सर्व नियम पाळून बनविलेले सेफ प्रपोजल्स असूनही हे दोन सिनेमे तिकीट खिडकीवर जेंव्हा कोसळले तेंव्हा आशुतोष गोवारीकर नावाच्या तरुण दिग्दर्शकाला आपले काय चुकले याचा शोध घ्यावा लागला होता. प्रेक्षकांना काय आवडेल हे दाखविण्याच्या प्रयत्नात असलेला हा तरुण यानंतर स्वतःला काय बघायला, लिहायला आवडेल याचा विचार करू लागला. या विचाराने झपाटलेल्या त्याच्या लेखणीने मग कागदं काळी करायला सुरुवात केली. आधीच्या दोन चित्रपटांत सर्व नियम पाळून तोंडावर पडलेली ही लेखणी यावेळी कसलेच नियम, बंधन मानायला तयार नव्हती. हिंदी चित्रपटसृष्टीचे सर्व अलिखित व अव्यावसायिक नियम मोडीत या लेखणीने कागदं काळी केली खरी पण ती वाचून आमिर खान सारख्या प्रयोगशील अभिनेत्याला सुद्धा “हा काय वेडेपणा आहे? हे शक्य नाही. ही कथा तू दुसऱ्या कुणाला ऐकवू पण नकोस. चित्रपट बनविणे तर फार दूरची गोष्ट आहे” असे म्हणावयास भाग पाडले.(Untold Stories behind Making of a Timeless Classic Hindi Movie ‘Lagaan’; 20 Years of Lagaan)

आमिरची असली प्रतिक्रिया ऐकून काहीसा बंडखोर तरुणासारखा झालेला आशुतोष त्याच कथेला पटकथेत (संवादासहित) रुपांतरीत करण्याच्या मागे लागला. काही दिवसांनी परत आमिर खानकडे गेल्यावर त्याने त्याला म्हणाला ” मला तुझा एकसाथ ४ ते ५ तासांचा वेळ हवाय. तुला पटकथा ऐकवायची आहे” ही तीच पटकथा आहे हे आशुतोषने सांगितल्यावर आमिर म्हणाला ” मला याबद्दल काहीही ऐकायचे नाहीए. तू जरी या पटकथेकरिता ४ महिने घालवले असशील तरी मी माझे ४ तासही वाया घालविणार नाही.” आशुतोषने यानंतर केलेल्या विनवण्या बघून आमिर कसेबसे पटकथा ऐकण्यास तयार झाला. सुरुवातीला ज्या कथेला ऐकून आमिर हसला होता आता त्याची पटकथा ऐकून तो पुरता हलून गेला होता. पटकथा तर जाम आवडली होती पण ‘कुठलीही चौकट न जुमानणाऱ्या या सिनेमाला हो म्हणावे एवढे गट्स माझ्यात नाहीत’, हे आमिरचे उत्तर ऐकून आशुतोष प्रचंड निराश झाला.

Lagaan 2001 Movie Scene

अनेक निर्मात्यांना, अभिनेत्यांना पटकथा ऐकविण्यात एक वर्ष गेले. पटकथा आवडूनही कोणीच हात लावायला तयार होईना. नाही म्हणाला होता पण तरीही  आमिरच्या डोक्यातून ही कथा काही जात नव्हती. घरातील चित्रपट निर्मितीची परंपरा आमिरने अतिशय जवळून अनुभवली होती. त्यामुळे अशा प्रकारच्या पटकथेला बनविण्यासाठी दिग्दर्शकाला फ्री हॅन्ड देणारा निर्माता हवा असतो हे त्याला माहीत होते. आमिरने आशुतोषला तिसऱ्यांदा पटकथा वाचनासाठी बोलावले. पण यावेळी ऐकायला आमिर सोबत त्याचे सर्व कुटुंब, निर्माता झामु सुगंध इत्यादी मंडळी पण होती. सर्वांनी एकमुखाने आमिरला हा चित्रपट करच म्हणून सांगितल्यावर आमिर तयार झाला.. आशुतोषला म्हणाला ” मी केवळ या चित्रपटात काम करणार नाही तर त्याची निर्मिती सुद्धा करेल” 

१९९८ च्या एप्रिल महिन्यात मग सुरु झाला अशक्य असे वाटणाऱ्या एका चित्रपटनिर्मितीचा प्रवास. निर्मितीची प्रमुख म्हणून धुरा सांभाळली आमिरची बायको रिनाने.  शोध सुरु झाला त्या गावाचा.. चंपानेरचा जे १८९३ सालचे वाटेल. शोध सुरु झाला अभिनेत्यांचा. आशुतोष सोबत या शोधात सामील होते कला दिग्दर्शक नितीन देसाई, ऑस्कर विजेत्या ड्रेस डिझायनर भानू अथैय्या, व छायाचित्रकार अनिल मेहता. शूटिंग सुरु होण्याच्या ९ महिने आधी प्रॉडक्शन टीम मधील सर्व सदस्यांना पटकथा देण्यात आली. असे करण्याची भारतीय सिनेमातील बहुधा ही पहिलीच वेळ होती. नियोजन अचूक ठेवणे याला पर्याय नव्हता. कॅनडा येथील निकोल डेमर्स यांना मेक-अप व पिना रिझी यांना हेअर डिझायनिंग ची जबाबदारी देण्यात आली. के.पी. सक्सेना यांना अवधी भाषेत संवाद लिहिण्याची जबाबदारी देण्यात आली. नकुल कामटे  यांना सिंकसाउंड डिझायनिंग, अब्बास अली मुघल यांना ऍक्शन व डॅनिअल रॉफे यांच्यावर ब्रिटिश कलाकारांचा शोध घेण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. गीतकार जावेद अख्तर यांनी लिहिलेल्या अर्थपूर्ण गीतांना संगीतबद्ध करण्यासाठी एकमेव नाव समोर होते.. ए.आर. रहेमान. भारतीय ग्रामीण लोकसंगीतावर आधारलेली तेही १८९३ च्या काळाचा फ्लेवर असलेली गाणी बनविणे हे शिवधनुष्य पेलू शकणारा एकमेव म्हणून रहेमान शिवाय दुसरा पर्याय नव्हता.

Aamir Khan and Gracy Singh on the sets of Lagaan
Aamir Khan and Gracy Singh on the sets of Lagaan

तब्बल एक वर्षानंतर व भारतभर फिरून झाल्यावर आशुतोषला जून १९९९ मध्ये स्वतःच्या स्वप्नातलं गावं चंपानेर चा शोध लागला. गुजरातच्या कच्छ येथील भुज हे ते गाव. उन्हाळ्यात ५० डिग्री पर्यंत तळपणारा सूर्य भुज येथे असतो… आजूबाजूला दूरदूरपर्यंत शूटिंगसाठी काहीएक सुविधा नाहीत. असे असूनही आशुतोषला भूजमध्येच चंपानेर सापडले असल्याने तेच फायनल झाले. त्याचवेळी एक-एक करून कलाकारांची निवड प्रक्रिया व त्यांचा अभिनय सराव सुरु होता. जुलै १९९९ पर्यंत ब्रिटिश कलाकार सुद्धा फायनल झाले होते जे सर्वात अवघड काम होते कारण हे केवळ कलाकार असून भागणार नव्हते तर ते चांगले क्रिकेटर असणेही तितकेच आवश्यक होते.  चित्रपटाच्या बजेटवर काम करणं चालू होते. हा प्रकल्प अतिशय खर्चिक आहे याची सर्वांना कल्पना होती त्यामुळे तो नियंत्रणात ठेवणे यासाठी आमिरची पत्नी रीना दिवसरात्र झटत होती.

Lagaan 2001 Movie Scene

आमिरचा जवळचा मित्र सत्या वर याची प्रॉडक्शन हेड म्हणून जबाबदारी होती. सप्टेंबर १९९९ मध्ये तब्बल ४०० जणांचे युनिट कच्छ येथे आले .. पुढील जवळपास सहा महिन्यांसाठी.. चंपानेर साकारण्यासाठी. इतक्या लोकांना उतरण्यासाठी, राहण्यासाठी, खाण्यासाठी भुज इथे काहीच सोय नव्हती. सुदैवाने ‘सहजानंद टॉवर्स’ नावाची कच्छ मधील सर्वात मोठी इमारत या अख्ख्या युनिटसाठी मिळाली. भूजमधील गावकऱ्यांनीच चंपानेर गावाच्या सेटच्या उभारणीत मदत केली त्यामुळे चंपानेर इतके खरेखुरे गाव वाटत होते. शूटिंग सुरु होण्याला १५ दिवस बाकी असतांना अजूनही रहेमान चे संगीतावर काम चालूच होते. त्यासाठी आशुतोष दोन महिन्यांपासून चेन्नई ला वास्तव्यास होता. ६ जानेवारी २००० या दिवशी शूटिंगला ऑन ग्राउंड प्रारंभ झाला त्याच्या महिनाभर आधी चंपानेर गाव तयार झाले होते. 

Lagaan 2001 Movie Scene

पहिला मुहूर्ताचा शॉट संपन्न झाला तेंव्हा सिनेमात ढोल वाजविणारा मुका बाघा तिथे आनंदाने ढोल वाजवीत होता. संगीतकार ए आर रहेमान, आमिरचे निर्माते वडील आणि काका याप्रसंगी उपस्थित होते. दुसऱ्या दिवशीपासून सिंक साउंडमध्ये शूटिंग सुरु होत असल्याने युनिटसमोर सेटवर कुठलाही आवाज होऊ न देण्याचे अवघड आवाहन होते. कारण नंतर कुठलीही डबिंग न होता शूटिंगच्या वेळी रेकॉर्ड झालेला साउंड फायनल असणार होता. १२५ एकर परिसरात सिनेमाचे इतके मोठे युनिट आणि त्यात इतक्या मोठ्या संख्येने गावकरी या सर्वांना शूटिंग सुरु असतांना शांत ठेवणे हे जवळपास अशक्यप्राय काम होते. नुसतं सेटवरच नाही तर आजूबाजूच्या परिसरात सुद्धा कुठला आवाज होऊ न देणं तितकंच महत्वाचं होतं. त्यामुळे सहाय्यक दिग्दर्शकांचं काम वाढलं होतं. अपूर्व लाखिया सोबत याच युनिटमध्ये अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या नंबरच्या सहाय्यक दिग्दर्शिका होत्या रिमा कागती आणि आमिरची सध्याची पत्नी किरण राव.

Lagaan 2001 Movie Scene

जवळपास ३०-३५ कलाकारांना रोज पहाटे उठवून, तयार झाल्यावर सकाळी ५ वाजता बसमध्ये बसवून सेटवर शिस्तीत घेऊन जाण्याचे काम यांनी सांभाळले होते. कॅप्टन रसेल आणि त्याची बहीण एलिझाबेथ यांची भूमिका साकारणारे पॉल ब्लॅकथ्रोन आणि रेचल शेली यांनी हिंदी शिकविण्याची जबाबदारी टीममधील समीन नावाच्या पाकिस्तानी महिलेला देण्यात आली होती. आमिर शूटिंगच्या आदल्या रात्री बसून अवधी भाषा बोलण्याची तयारी करत असे. शूटिंग सुरु झाल्यानंतर काही दिवसांनी युनिटमधील सर्वात ज्येष्ठ कलाकार, वय वर्षे ८४ असलेले, ज्येष्ठ अभिनेते ए.के. हंगल साहेबांना पाय घसरून पडल्याने दुखापत झाली. परंतु ‘शो मस्ट गो ऑन’ या म्हणीला जागत, पायात भयंकर त्रास होत असतांनाही हंगल साहेबांनी तसेच शूटिंग पूर्ण केले. 

सिंक साउंड शूटिंगला कधी भुज वरून उडणाऱ्या एअर फोर्स च्या जेट विमानांमुळे तर कधी सातत्याने वाळवंटात येणाऱ्या ताशी २० किमी गतीच्या वादळांमुळे अडथळा निर्माण होत असे. वादळ, वारा, थंडी, ऊन अशा निसर्गाने तर इतक्या काही अडचणी निर्माण केल्या की कित्येक दिवस एकही शॉट घेता येत नसे. एकीकडे लांबणीवर पडत चाललेल्या शुटिंगमुळे बजेट अव्वाच्या सव्वा वाढत चालले होते. शूटिंग कमालीचे थंडावले होते. ठरविलेल्या तारखेच्या किमान ३०% मागे शूटिंग पडत चालले होते. सिनेमाच्या शेवटी असलेल्या क्रिकेट मॅच च्या शूटिंगसाठी ३ आठवड्यांचे शेड्युल बनविण्यात आले होते. यासाठी जवळपास १० हजार गावकऱ्यांची आवश्यकता होती. हे शूटिंगसाठी जितकं महत्वाचे होते तितकेच प्रत्यक्षावर आणणे अशक्य. परंतु आमिरच्या विनंतीला मान देऊन कच्छ चे स्थानिक व तेथील लोकप्रिय व्यक्ती दानाभाई यांनी यासाठी गावकऱ्यांची जमवाजमव सुरु केली. इतक्या मोठ्या लोकांची जमवाजमव रोज करणे शक्य नव्हते त्यामुळे एकाच दिवसात सर्व शॉट्स ओके होणेही तितकेच गरजेचे होते.

Lagaan 2001 Movie Scene

सकाळी पाच वाजल्यापासून आजूबाजूच्या परिसरातील गावकरी सेटवर येणं सुरु झालं. सकाळी सात वाजता शूटिंग सुरु होणं अपेक्षित असतांना इतक्या मोठ्या गावकऱ्यांना धोती-कुर्ता, चनिया-चोली हे ड्रेस वाटून, घालून येईपर्यंत १०-१०:३० वाजले. एक-दोन नव्हे तर तब्बल पाच कॅमेरे एकाचवेळी एवढ्या मोठ्या मॉबला शूट करीत होते. इतक्या मोठ्या गर्दीला कंट्रोल करणे हे मोठे जोखमीचे काम होते. १० हजार लोकांना दुपारच्यावेळी जेवणासाठी तितकेच जेवणाचे पॅकेट्स ट्रकभरून आणण्यात आले. आलेल्या लोकांचे मनोरंजन करण्यासाठी आमिरला त्यांच्यासाठी “आती क्या खंडाला?” हे  सुप्रसिद्ध गीत गावे लागले. अखेरीस सर्वांना अपेक्षित शूटिंग त्यादिवशी पूर्ण झाले.

क्लायमॅक्स शूट करतांना आणखी एक चॅलेंज आशुतोष समोर होते. आमिरच्या टीम मधील सर्व कलाकार असे होते ज्यांना खरोखर क्रिकेट फारसे खेळता येत नव्हते कारण ते रंगवत असलेल्या पात्रांना कथेनुसार क्रिकेट येणे अपेक्षित नसल्याने आशुतोषने तसेच कलाकार निवडले होते. परंतु आता क्रिकेटच्या शॉट्स साठी थोडेफार तरी क्रिकेट येणे आवश्यक होते. हे सर्व भारतीय कलाकार अभिनय अफलातून करायचे परंतु बॉलिंग, बॅटिंग आणि फिल्डिंग करतांना या मंडळींची त्रेधातिरपीट उडत असे, त्यांच्याकडून असंख्य चुका होत असत. याच्याविरुद्ध ब्रिटिश कलाकार छान क्रिकेट खेळत असत. याचा परिणाम असा झाला की परत एकवार शूटिंग लांबणीवर पडणे सुरु झाले. तीन आठवडे झाले तरी अर्धेच शूटिंग पूर्ण झाले होते. एव्हाना सर्व कलाकार प्रचंड थकले होते. रणरणत्या उन्हात दिवसभर खेळणे, शॉट्सचे सारखे रिटेक्स आणि सोबत अभिनय करणे हे सर्व दिवसेंदिवस सर्वांसाठी कठीण होत चालले होते. अर्धे युनिट मेंबर्स, ब्रिटीश कलाकार आजारी पडले. त्यातील काहींना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावे लागले. बजेट वाढत चालले होते. क्लायमॅक्स शूटिंग सुरु होते तोपर्यंत २०-२२ कोटी खर्च झाला होता.

Lagaan 2001 Movie Scene

त्यात भर पडली एका मोठ्या   संकटाने. आशुतोषला एका दिवशी  अचानक  पाठीत प्रचंड त्रास होऊ लागला. डॉक्टरांनी स्लिप डिस्क आहे सांगून महिनाभर बेड रेस्ट सांगितली. अशा परिस्थितीत दिग्दर्शक महिनाभर गायब होणे अशक्य होते. परंतु पुन्हा एकदा सर्व काही थांबले होते. आशुतोष ने ठरविले की याच परिस्थितीत शूटिंग करायचे. त्याने स्वतःमधील नायक जागा केला. यावर उपाय असा होता की सेटवर आशुतोष बेडवर झोपून दिग्दर्शन करायचा. तसाच झोपून सूचना द्यायचा. हळूहळू सर्व अडचणी दूर होत गेल्या. शॉट्स ओके होत गेले. तब्बल ६ महिन्यांचे खडतर शूटिंग अखेर संपले तो दिवस होता १८ जून २०००. एप्रिल १९९८ ला सुरु झालेला प्रवास संपला २ वर्षांनी. नंतर वर्षभर पोस्ट-प्रॉडक्शन काम सुरु होते. 

शूटिंग संपल्याच्या सहा महिन्यानंतर २६ जानेवारी २००१ रोजी आलेल्या भूजमधील भूकंपाने सारे जग हादरले. शूटिंग झालेले गाव, तेथील गावकरी सर्व काही उध्वस्त झाले होते. लगान चे युनिट ज्या  इमारतीत थांबले होते ते सहजानंद टॉवर्स सुद्धा पूर्णतः जमीनदोस्त झाले होते. असे असूनही भूकंपाच्या ६ महिन्यानंतर लगान च्या प्रीमियरला गावातील जमेल तितक्या मंडळींनी हजेरी लावली. पडद्यावर आमीरने जेंव्हा “ओ भैईय्या” जोरात आरोळी दिली, ती ऐकून थिएटरमध्ये प्रेक्षकांमध्ये बसलेल्या भुजवासीयांनी ” छुटे लगान ” असा जोरदार प्रतिसाद दिला होता. भूकंपाचे दुःख काही काळाकरिता तरी हे लोकं विसरले होते. 

‘लगान’ च्या मेकिंग ची ही पडद्यामागची कहाणी. अगदी थोडक्यात. प्रत्यक्षात असंख्य अडचणींना या युनिटने तोंड दिले आहे जे इथे विस्तारात मांडणे अशक्य आहे. त्यासाठी एक पुस्तक कमी पडेल. ‘मॅडनेस इन डेजर्ट’ अर्थात वाळवंटातील वेडेपणा या नावाने मेकिंग ऑफ लगान’ हा सत्यजित भटकळ दिग्दर्शित अधिकृत चित्रपट नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे. तो बघूनच व त्याआधारे शक्य तितकी माहिती, कमीत कमी शब्दात मी इथे मांडली आहे. सर्वांनी हा चित्रपट अवश्य बघावा.

लगान … एक टाइमलेस क्लासिक, ज्याने आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये अतिशय सुंदरतेने आपले स्वतःचे स्थान कोरले आहे. वीस वर्षांपूर्वी, आजच्या दिवशी आमिर खानचा प्रसिद्ध आणि संस्मरणीय स्पोर्ट्स एपिक ‘लगान’ प्रदर्शित झाला होता, जो मुख्य प्रवाहातील हिंदी सिनेमाचा चेहरामोहरा बदलणारा एक महत्त्वाचा चित्रपट होता. दिग्गज  ए.आर. रहमान यांचे सुश्राव्य संगीत, आशुतोष गोवारीकर यांचे दिग्दर्शन आणि परफेक्शनिस्ट आमिर खान व इतर सर्वच कलाकारांचा उत्तम अभिनय आजही रसिकांच्या मनात घर करून आहे. चित्रपटाशी संबंधित १२ गोष्टी ज्या आपल्याला कदाचित माहित नसतील आणि चला याकडे एक नजर टाकू या.

1. कथेशी आणि त्यांच्या पात्रांशी संबंधित असलेल्या भावनेस प्रेरित करण्यासाठी, सर्व कलाकार संवाद दरम्यान त्यांच्या स्क्रीन नावे एकमेकांना संबोधित करीत असत.

2. सेटवर शिस्तबद्ध वातावरण ठेवण्यासाठी, सर्व कलाकारांना (आमिर खान सह) तयार होऊन सकाळी 5 वाजता रिपोर्ट  करणे बंधनकारक असायचे नाहीतर त्यांना हॉटेलमध्येच सोडून बस शुटिंगस्थळी निघत असे. पहिल्याच दिवशी उशीर झाल्याने बस आमिर खानला मागे सोडून इतर कलाकारांना घेऊन लोकेशनवर निघून गेली.

3. १९९८ मध्ये दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी लगानच्या स्क्रिप्टवर काम केले होते. सीआयडी या मालिकेच्या सेटवर ते शॉट्स दरम्यान असतांना त्यांनी यशपाल शर्माला पाहिले जेथे त्यांना  त्याचे काम आवडले आणि नंतर त्याने चित्रपटात कास्ट केले.

4. लगानचे बहुतेक ऑडिशन मुंबईतील आमिर खानच्या घरी झाले होते.

5. अमीन हाजी जेव्हा क्रिकेट सामना पहायला गेले, तेव्हा वीरेंद्र सेहवाग, सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकर यांनी त्यांच्या चरित्र्याच्या नावाने त्यांना ‘बाघा’ म्हणून संबोधित केले.

6. आमिर खान आणि राज झुत्शी यांना त्यांच्या पात्रांसारखे दिसण्यासाठी काही दिवस सन बाथ (उन्हातले स्नान) घ्यावा लागला होता.

7. चले चलो या गाण्याच्या शूटिंग दरम्यान, आमीरने चित्रपटाच्या सेटवर छत्री किंवा सावली शिवाय  प्रत्येकाला पडद्यावर अस्सल दिसण्यासाठी 50० डिग्री तापमानात शूटिंग करण्याची सूचना दिली.

8. लगान हा पहिला हिंदी चित्रपट ठरला जो सिंक ध्वनीचा वापर करून शूट करण्यात आला, म्हणजेच संवाद आणि आवाज शूटच्या वेळीच थेट नोंदविले गेले. त्या काळातील बहुतेक भारतीय चित्रपट स्टुडिओमध्ये डब केले गेले होते. लगानबरोबर, कॉल टाइम या संकल्पनेला वेग आला.

9. आशुतोष गोवारीकर यांनी याची खात्री करुन घेतली होती की क्रिकेटची कुठलीही पार्श्वभूमी नसलेल्या  आणि यापूर्वी कधीही हा खेळ ना खेळलेल्या कलाकारांना त्याने कास्ट केले. जेणेकरून ते स्क्रीनवर गेम शिकत असताना वास्तविक दिसतील. आमिर आणि राज जुत्शी हे यात अपवाद होते.

10. आशुतोषने मुकेश ऋषीला या चित्रपटात कास्ट करण्याची योजना आखली होती पण त्याच्या तारखा उपलब्ध नव्हत्या. मग त्याने लगानमधील देवाची भूमिका साकारण्यासाठी प्रदीप सिंगकडे संपर्क साधला.

11. ‘लगान’ हा सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेतील चित्रपट प्रकारात ऑस्करच्या शॉर्टलिस्टमध्ये स्थान मिळवणारा तिसरा बॉलिवूड चित्रपट ठरला. या आधी मदर इंडिया (1957) आणि सलाम बॉम्बे! (1988) ने या एलिट क्लबमध्ये प्रवेश केला होता.

12. एका चित्रपटात ब्रिटीश कलाकारांची सर्वाधिक संख्या कास्ट करण्याचा विक्रम लगानच्या नावावर आहे.  ब्रिटिश अभिनेते, रॅशेल शेली (एलिझाबेथ) आणि पॉल ब्लॅकथॉर्न (कॅप्टन रसेल) यांच्यासाठी हिंदी शिक्षकाची नेमणूक करण्यात आली. या प्रक्रियेस सुमारे 6 महिने लागले

Lagaan 2001 Movie Scene

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.