फौलादी दारासिंग  

— © विवेक पुणतांबेकर

परवा जुन्या डिव्हीडींचे खोके पहात असताना अचानक समोर आली फौलाद ची डिव्हिडी सापडली. त्याच बरोबर आठवले दारासिंग चे सिनेमे.आज सिक्स पॅक बाॅडी दाखवणारे हिरो नव्या पिढीचे आदर्श आहेत.तसेच आमच्या काळी आमचा आदर्श होता दारासिंग. शाळेत एखादा उगाचच शायनिंग करायला लागला की स्वत:ला दारासिंग समजतो काय अशी शेरेबाजी सुरु व्हायची इतके दारासिंग चे नाव सातत्याने घेत असत. कोण होता दारासिंग ??? असा प्रश्र नव्या पिढीला नक्कीच पडेल. या साठीच  हा लेखन प्रपंच.

 

पंजाब मधल्या अमृतसर जिल्हातल्या धर्मूचक खेड्यातल्या  शेतकर्‍याचा हा मुलगा दारासिंग. आपल्या आजोळी रतनगडला १९ नोव्हेंबर १९२८ ला दारासिंग चा जन्म झाला. दोन भावंडांमधला दारासिंग हा थोरला. त्याचे पाळण्यातले नाव दिदारसिंग रंधवा.गृहकलहामुळे झालेल्या वाटण्यांमुळे दारासिंग च्या वडिलांच्या वाट्याला जी अल्पशी जमीन आली तिच्यावर शेती करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अशक्य होते. यामुळे त्याचे वडिल आणि मामा सिंगापूर ला १९ धंद्यानिमित्त वारंवार चकरा मारत. वयाच्या अठराव्या वर्षा पर्यंत दारासिंग शेतीकामाबरोबर कुस्तीचे प्राथमिक धडे गिरवीत गावाकडेच राहीला. १९४७ साली दिदारसिंग आपल्या मामाबरोबर पहिल्यांदा सिंगापूर ला गेला. सिंगापूर ला जाताना मद्रास बंदरात कस्टम नी पासपोर्ट वर दिदारसिंग चे दारासिंग असे सुटसुटीत नाव लिहिले. अश्या रीतीने दिदारसिंग रंधवा दारासिंग नावाने जन्मभर ओळखला गेला आणि त्याच नावाने प्रसिध्द झाला. सिंगापूर मधे कुस्तीचा खेळ फार लोकप्रिय होता. तिथले दोन कुस्तीचे आखाडे हॅपी वर्ल्ड आणि ग्रेट वर्ल्ड नावाजलेले होते.

 

दारासिंग ची उंची आणि बलदंड शरीरयष्टी पाहून त्याला अनेकांनी धंदेवाईक कूस्तीपटू  बनायचा सल्ला दिला. हॅपी वर्ल्ड मधे उस्तादांचा हरकाम्या बनूनही सहा महिने एकदाही कुस्ती खेळायचा मौका मिळाला नाही. या हट्याकट्या होतकरु पहलवानाकडे ग्रेट वर्ल्ड आखाड्याचे उस्ताद हर्मनसिंग जीं चे लक्ष गेले, त्यांनी दारासिंग ला आपला शिष्य म्हणून स्वीकारले. शिष्यत्व मिळाले खरे पण आवश्यक खुराकाचे, आहाराचे काय करायचे असा प्रश्र दारासिंग ला पडला. पण सिंगापूरवासी पंजाबी लोकांनी त्याची तजवीज केली. तीन वर्षे जबरदस्त मेहनत केल्यावर १९५० साली दारासिंग ने मलेशियन चॅंम्पियन स्पर्धेत विजेतेपद पटकावले. या पाठोपाठ इंडोनेशिया आणि ब्रम्हदेशात झालेल्या स्पर्धेतही तो विजयी वीर  झाला. १९५१ साली श्रीलंकेत झालेल्या स्पर्धेत त्याने हंगेरियन मल्ल किंगकाॅंग ला चीतपट करुन विजेतेपद मिळवले. किंगकाॅंग ची ख्याती अशी होती की त्याला कोणीच हरवू शकत नसे. त्याला हरवल्यामुळे दारासिंग एकदम जगप्रसिध्द झाला. १९५३ साली झालेल्या अखिल भारतीय कुस्ती स्पर्धेत १५० मल्लांनी भाग घेतला होता. अंतिम फेरीत टायगर जोगींदर चा पराभव करुन दारासिंग ने विजेतेपद पटकावले.या नंतर सातत्याने तीन वर्षे दारासिंग ने विजेतेपद कायम राखले.

१९६८ साली राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेत अमेरिकन मल्लाला धूळ चारुन दारासिंग कुस्तीतला जगज्जेता बनला. या आधी हा मान फक्त एकाच भारतीय मल्लाने मिळवला होता. तो होता गामा गुंगा. कुस्त्यांची अनेक बक्षीसे सातत्याने जिंकणारा जगज्जेता दारासिंग १९८३ साली कुस्तीतून निवृत्त झाला. दारासिंग चा सिनेमातला प्रवेश मात्र अनपेक्षितपणे झाला. निर्माते लाला जगतनारायण १९५४ ला एका सिनेमाची निर्मिती करत होते पहली झलक . दिग्दर्शक रामन ना एका स्वप्न दृश्यात ओमप्रकाश दारासिंग बरोबर कुस्ती करतो असे दाखवायचे होते. या साठी दारासिंग ला बोलावले. सिनेमात काम करायचे या कल्पनेने दारासिंग ला घाम फुटला . पण दिग्दर्शक रामन नी सांगितल यात तुला एकही वाक्य बोलायचे नाही. या मुळे फारशी अडचण न येता शूटींग झाले. पहली झलक चे संवादलेखक होते राजेंद्रकृष्ण. या नंतर सहा वर्षानी भक्तराज सिनेमात भगवान दादां बरोबर कुस्ती करायचा रोल दारासिंग ना मिळाला. यात मात्र एक छोटा संवाद दारासिंग ला म्हणायचा होता. कॅमेरा समोर असताना संवांद बोलणे दारासिंग ला अजीबात जमत नव्हते. अनेक रिटेक्स झाले. शेवटी दिग्दर्शक व्यास नी सांगितले शक्य होईल तेव्हढे अचूक संवाद बोल. बाकीचे डबिंग मधे सुधारता येतील. डबिंग म्हणजे काय हे दारासिंगला माहीत नव्हते. बरोबरच्या सहकार्‍याने सांगितले तुला कुठे हिरो बनायचे आहे?? तू फक्त कुस्तीच्या सीनवर लक्ष केंद्रीत कर. या नंतर सगळं विसरुन कुस्तीचे सीन दारासिंग ने प्रभावीपणे सादर केले. छोटे मोठे रोल पडद्यावर साकारणार्‍या दारासिंग ची फिल्मी कारर्किद सुरु झाली १९६० च्या दशकात.
निर्माता देवी शर्मा कुस्तीवर सिनेमा निर्माण करत होता. या साठी नायकाची भुमिका दारासिंग ला द्यायचा त्याने विचार केला. अभिनय हे माझे क्षेत्रच नाही असे सांगून दारासिंग ने त्याचा प्रस्ताव फेटाळला खरा पण देवी शर्माने सांगितले तू फक्त करारावर सही कर. तुझ्याकडून अभिनय करुन घेणे माझे काम. दारासिंग विचारात पडला. नायकाची भुमिका केल्यामुळे कुस्ती जगतात आपण हास्याचा विषय बनणार याची त्याला फार भीती वाटत होती. बर गुरुंनी पहलवानांना सिनेमा पहायची बंदी घातलेली कारण सिनेमा हा रिकामटेकड्या, नखरेल लोकांचा प्रांत असे त्यांचे ठाम मत. पण अनेक प्रथितयश मल्लांची शेवटच्या कालखंडात झालेली परवड दारासिंग ने पाहिली होती. गामा पहलवानाचा शेवटचा काळ विपन्नावस्थेत एका अंधार्‍या जागेत गेलेला दारासिंग ने पाहिला होता. कोल्हापूर चे प्रसिध्द मल्ल बुलेट पहलवान उदरनिर्वाहासाठी टांगा चालवायचे. हे पाहिल्यावर दारासिंग ला जाणवले आपण भविष्यासाठी काहीच तरतूद केलेली नाही. नाईलाजाने दारासिंग ने देवी शर्मा चा प्रस्ताव स्वीकारला. १९६२ साली आलेल्या  किंगकाॅंग सिनेमापासून दारासिंग नायक बनला. किंगकाॅंग सुपरहिट झाला आणि तश्याच सिनेमांचा प्रस्ताव घेऊन निर्माते दिग्दर्शक यांची रांग दारासिंगच्या घरी लागायला लागली. आपल्या कुस्ती प्रेमामुळे दारासिंग ने निर्माता दिग्दर्शकांना अट घातली की कुस्तीतून वेळ मिळेल तेव्हाच मी शूटींग करीन. दारासिंगचे सिनेमे तुफान धंदा करत असल्याने ही अट मान्य केली. भाषेवर अजीबात प्रभुत्व नसल्याने हिंदी आणि उर्दू शिकण्यासाठी दारासिंग ला शिक्षक नेमावा लागला. किंगकाॅंग सिनेमा रिलीज झाल्यावर एका चाहत्याचे पत्र दारासिंग ला आले. ‘तुम्ही भीम आहात तुमच्या हाती बीन (बासरी) शोभत नाही’. या मुळेच प्रेरीत होऊन कसून मेहनत करुन १९६८ ला जगज्जेदा बनायचा मान दारासिंग ना मिळाला.

१९६३ च्या फौलाद सिनेमासाठी निर्माता दिग्दर्शकांना नावाजलेली नायिका हवी होती. पण दारासिंग बरोबर काम करायला कोणीच तयार झाल्या नाहीत. शेवटी अनेक सिनेमात लहान सहान भुमिका करणारी मुमताज तयार झाली. फौलाद तुफान यशस्वी झाला. या नंतर १२ यशस्वी सिनेमात दारासिंग मुमताज जोडी होती. मुमताज ची कारर्किद फुलायला लागल्यावर निशी आणि दारासिंग जोडी पण यशस्वी झाली. ८० सिनेमात दारासिंग ने नायकाची भुमिकाघ् केली. यातले किंगकाॅंग, सॅमसन, महाभारत, शेरदिल, लुटेरा, ठाकुर जर्नेलसिंग, सगदिल, निशांत, बलराम श्रीकृष्ण, तुलसी विवाह, हरहर महादेव, हरिदर्शन, जय बोलो चक्रधारी उल्लेखनीय होते. राजकपूरच्या आग्रहामुळे मेरा नाम जोकर मधली रिंगमास्टर ची भुमिका दारासिंग ने स्वीकारली. तसेच आनंद मधे पाहुणा कलाकार म्हणून दारासिंग ने काम केले. नायक म्हणून दारासिॅग चा शेवटचा सिनेमा होता  रुस्तम. मर्द सिनेमापासून दारासिंग ने चरित्र भुमिका स्वीकारायला सुरुवात केली, हे साल होते १९८५. याच कालखंडात दूरदर्शन वर आली मेगा सिरियल रामायण. यातला दारासिंग चा हनुमान खूप गाजला. यानंतर विक्रम और वेताळ, लव कुश, नीयत , तकदीर, हद कर दी आपने आणि क्या होगा निम्मो का या सिरियल्स मधे दारासिंग च्या भुमिका लक्षणीय होत्या. दारासिंग ची दोन लग्ने झाली. पहिल्यांदा वयाच्या ९ व्या वर्षी बालविवाह झाला.

५० च्या दशकात तिच्यापासुन दारासिंग विभक्त झाला. या पहिल्या विवाहापासून झालेला मुलगा प्रद्युम्न अभिनेता होता. रामानंद सागर यांच्या आंखे सिनेमात अक्रम च्या भुमिकेत पहिल्यांदा पडद्यावर दिसला. या नंतर सोनिया सहानी बरोबर शैलेंद्र नावाने बंदीश सिनेमात दिसला होता. १९७१ च्या गंगा तेरा पानी अमृत मधे ही त्याने भुमिका केली होती. प्रद्युम्न मीरतमधे आपल्या फार्म हाऊसवर शांतपणे रहात असतो. दारासिंग ने अमृतसरच्या सुरजित कौर औलाख बरोबर १९६१ ला  द्वितीय विवाह केला. या विवाहापासून कमल, लवलीन, दीपा या तीन मुली, तसेच वीरेंद्र सिंग आणि अमरिक सिंग ही दोन मुले आहेत, वीरेंद्र सिंग हा अभिनेता आहे विंदू या नावाने ओळखला जातो. बिग बाॅस मधे गाजलेला आणि मॅच फिक्सिंंग प्रकरणात पकडलेला हाच विंदू. कुस्तीतले नैपुण्य दाखविल्यावर दारासिंग चा धाकटा भाऊ सरदारा सिंग हा पण सिनेमात आला. रंधवा या टोपणनावाने ओळखला जातो. याने मुमताज ची धाकटी बहीण मल्लिका बरोबर लग्न केले. यांचा मुलगा शाद रंधवा अभिनेता आहे. वो लम्हे, आवारापन, आशिकी २ आणि मस्तीझादे सिनेमात त्याने भुमिका केल्या आहेत. दारासिंग ने १२ हिंदी आणि पंजाबी सिनेमांची निर्मिती केली. ५० सिनेमात चरित्र अभिनेत्याची भुमिका केली. यात महावीरा, ऐलाने जंग, अजूबा, अनमोल, दिल्लगी, केहर, कल हो न  हो आणि जब वुइ मेट चा समावेश आहे. २०१२ साली आलेला आता पता लापता सिनेमा दारासिंग चा शेवटचा सिनेमा. सिने आणि टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन चे अध्यक्षपद भुषवलेल्या ‘राज्यसभेवर खासदार असलेल्या दारासिंगचा १२ जुलै २०१२ ला मृत्यु झाला. त्याची नायकाची भुमिका असलेले बहुतेक सिनेमे स्टंटपट, पौराणिक, दुय्यम दर्जाचे होते. पण असे सिनेमे पहाणारा प्रेक्षकवर्ग दारासिंग ने तयार केला हे विसरता येत नाही.
Vivek Puntambekar
+ posts

Science Graduate from Somayya College in the year 1977.

Started Carrier in Kohinoor Mills in SQC Dept. After the closer of mill, began carrier as a Medical Sales Representative.

Retired as Zonal Sales Manager. Since childhood fond of Films and film music.

Wrote programs for FM Radios. Wrote articles in various Diwali magazines.

Participated in Doordarshan program. Performing an audio visual programs based on Golden era of hindi music.

Regularly writing articles for newspaper. Die hard fan of Raj Kapoor and his entire team.

Leave a comment